वाग्दत्त देशाला भेट
तुमच्या एखाद्या स्नेह्याने, बक्षीस म्हणून तुमच्यासाठी सुंदर, प्रशांत परिसरांत एक नवे कोरे घर विकत घेतले असल्याचे तुम्हाला सांगितले, अशी क्षणभर कल्पना करा. ‘ते कसे दिसते?’ तुम्हाला त्याबद्दल अर्थातच कुतूहल वाटेल. हे घर प्रत्यक्ष पाहण्यास, प्रत्येक खोलीत जाऊन तिचे निरीक्षण करण्यास तुम्ही उत्सुक असाल यात काहीच शंका नाही. शेवटी, हे तुमचे नवे घर आहे!
सा. यु. पू. १४७३ साली, यहोवाने इस्राएल राष्ट्रास एक नवे घर, अर्थात वाग्दत्त देश प्रदान केला; सरासरी लक्षात घेता हा उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, सुमारे ५०० किलोमीटर एवढा विस्तीर्ण व ५५ किलोमीटर रुंद प्रदेश होता.a वाग्दत्त देश हा फरटाईल क्रिसेंट म्हणण्यात आलेल्या प्रदेशात स्थित होता; तो अलौकिक वैशिष्ट्ये लाभलेला व राहण्याच्या दृष्टीने एक सुखकर प्रदेश होता.
तथापि, कोणा दुसऱ्याला व विशेषतः फार पूर्वी अस्तित्वात असलेल्या कोणाला देण्यात आलेल्या ‘घराबद्दल’ आज तुम्ही जिज्ञासू का असावे बरे? कारण, या ऐतिहासिक देशाबद्दलचे ज्ञान तुम्हाला बायबल वृत्तान्तांची अधिक चांगली समज देईल. दिवंगत प्राध्यापक योहानान आहारोनी यांनी लिहिले, “बायबलच्या प्रदेशात भूगोल व इतिहास परस्परांशी इतक्या अविश्लेष्यपणे संबंधित आहेत की यांपैकी कोणत्याही एकास, दुसऱ्याच्या साहाय्याखेरीज खऱ्या अर्थाने समजून घेता येत नाही.” शिवाय, वाग्दत्त देश हा आपल्या उत्कर्षाच्या कळसावर असताना, देवाच्या राज्यातील परादीस सबंध जगातील मानवजातीसाठी लवकरच जे साध्य करील त्याचा एक छोट्या प्रमाणातील नमुना होता!—यशया ११:९.
येशू ख्रिस्ताने आपल्या पृथ्वीवरील सेवेदरम्यान व्यवहार्य धडे देण्यासाठी वाग्दत्त देशातील सर्वसामान्य दृश्ये उपयोगात आणली. (मत्तय १३:२४-३२; २५:३१-४६; लूक १३:६-९) आपण देखील प्राचीन पॅलेस्टाईनचे विशिष्ट पैलू विचारात घेण्याद्वारे एका व्यवहार्य पद्धतीने पुष्कळ काही शिकू शकतो. चला, आपण जणू याच्या खोल्यांमधून फेरफटका मारू, अर्थात, शतकानुशतके देवाच्या लोकांचे घर असलेल्या या देशाच्या काही अलौकिक वैशिष्ट्यांची आपण छाननी करू. वाग्दत्त देशातून पुष्कळ काही शिकण्यासारखे आहे हे आपल्या प्रत्ययास येईल.
[तळटीपा]
a या लेखांमध्ये “वाग्दत्त देश” या संज्ञेचा वापर बायबलमध्ये प्रस्तुत करण्यात आलेल्या प्राचीन काळातील परिस्थितीच्या दृष्टिकोनानुसार असून तो, या प्रदेशांतील आधुनिक काळातील राजनैतिक/धार्मिक दाव्यांची दखल न घेता करण्यात आला आहे.