वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ७/१ पृ. १९-२४
  • खऱ्‍या उपासनेचा विजय समीप आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • खऱ्‍या उपासनेचा विजय समीप आहे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • देवाच्या आध्यात्मिक मंदिरात विदेशी
  • पवित्र स्थान आणि त्यातील सामानसुमान
  • खऱ्‍या उपासनेचा संपूर्ण विजय
  • पार्थिव पुनरूत्थान
  • प्रतिनमुनेदार मंडपाचा सण
  • इस्राएलच्या इतिहासातील आठवणीत राहिलेले सण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • “तुला अत्यानंद होईल”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • अगणित मोठा लोकसमुदाय
    प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
  • यहोवाचे महान आध्यात्मिक मंदिर
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ७/१ पृ. १९-२४

खऱ्‍या उपासनेचा विजय समीप आहे

“परमेश्‍वर सर्व पृथ्वीवर राजा होईल.”—जखऱ्‍या १४:९.

१. पहिल्या जागतिक महायुद्धादरम्यान अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना कोणता अनुभव आला, व ते कसे भाकीत केले होते?

पहिल्या जागतिक युद्धादरम्यान, अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी संग्रामी राष्ट्रांकडून पुष्कळ संकटे आणि कारावास सहन केला. यहोवाची स्तुती करण्याच्या त्यांच्या अर्पणांवर कडक बंधने होती व ते आध्यात्मिक बंदिवासात पडले. हे सर्व काही जखऱ्‍या १४:२ मध्ये भाकीत करण्यात आले होते, ज्यामध्ये जेरूसलेमवर येणाऱ्‍या आंतरराष्ट्रीय हल्ल्याविषयीचे वर्णन दिले आहे. या भविष्यवाणीतील नगर, “स्वर्गीय यरुशलेम,” देवाचे स्वर्गीय राज्य आणि ‘देवाच्या व कोकऱ्‍याच्या राजासनाचे’ ठिकाण आहे. (इब्री लोकांस १२:२२, २८; १३:१४; प्रकटीकरण २२:३) पृथ्वीवरील देवाच्या अभिषिक्‍त जनांनी त्या नगराचे प्रतिनिधीत्व केले. त्यांच्यातील विश्‍वासू जन हल्ल्यापासून बचावले, त्यांनी स्वतःला त्या “नगरातून” हद्दपार होऊ दिले नाही.a

२, ३. (अ) यहोवाच्या उपासनेचा विजय १९१९ पासून कसा झाला आहे? (ब) १९३५ पासून कोणता विकास होत आला आहे?

२ सन १९१९ मध्ये विश्‍वासू अभिषिक्‍तांना त्यांच्या बंदिवासातून मुक्‍त करण्यात आले, व त्यांनी लगेचच युद्धानंतरच्या शांतीमय काळाचा सदुपयोग केला. स्वर्गीय जेरूसलेमचे राजदूत या नात्याने त्यांनी, देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी व १,४४,००० च्या शेवटल्या सदस्यांना एकत्र करण्यात मदत करण्यासाठी या भव्य संधीचा फायदा घेतला. (मत्तय २४:१४; २ करिंथकर ५:२०) १९३१ मध्ये त्यांनी यहोवाचे साक्षीदार हे उचित शास्त्रवचनीय नाव धारण केले.—यशया ४३:१०, १२.

३ तेव्हापासून देवाच्या अभिषिक्‍त साक्षीदारांनी कधीच मागे पाहिलेले नाही. हिटलर आपल्या नात्सी युद्धतंत्राने देखील त्यांना थांबवू शकला नाही. जागतिक छळ असतानाही, त्यांच्या कार्याने संपूर्ण पृथ्वीवर फळ उत्पन्‍न केले आहे. विशेषकरून, १९३५ या वर्षापासून प्रकटीकरणाच्या पुस्तकात भाकीत केलेला आंतरराष्ट्रीय “मोठा लोकसमुदाय” त्यांना येऊन सामील झाला आहे. हा समुदाय देखील समर्पित, बाप्तिस्मा घेतलेल्या ख्रिश्‍चनांचा आहे व त्याने “आपले झगे कोकऱ्‍याच्या [येशू ख्रिस्त] रक्‍तात धुऊन शुभ्र केले आहेत.” (प्रकटीकरण ७:९, १४) परंतु हे, स्वर्गीय जीवनाची आशा असलेले अभिषिक्‍त जन नव्हेत. आदाम आणि हव्वेने जे गमावले, ते म्हणजे, परादीस पृथ्वीवरील परिपूर्ण मानवी जीवन प्राप्त करण्याची त्यांची आशा आहे. (स्तोत्र ३७:२९; मत्तय २५:३४) आज, या मोठ्या लोकसमुदायाची संख्या ५० लाखांपेक्षा अधिक जीवांची आहे. यहोवाच्या खऱ्‍या उपासनेचा विजय होत आहे, पण त्याचा अंतिम विजय अद्याप व्हावयाचा आहे.

देवाच्या आध्यात्मिक मंदिरात विदेशी

४, ५. (अ) मोठा लोकसमुदाय यहोवाची उपासना कोठे करतो? (ब) ते कोणत्या विशेषाधिकारांचा आनंद लुटत आहेत व हे कोणत्या भविष्यवाणीच्या पूर्णतेत आहे?

४ भाकीत केल्याप्रमाणे मोठा लोकसमुदाय “अहोरात्र त्याच्या मंदिरात [देवाची] सेवा करितात.” (प्रकटीकरण ७:१५, NW, तळटीप) ते आध्यात्मिक याजकीय इस्राएली नसल्यामुळे, मंदिराच्या अंगणात विदेशी जेथे उभे राहत तेथे योहानाने बहुधा त्यांना उभे असलेले पाहिले असावे. (१ पेत्र २:५) यहोवाचे आध्यात्मिक मंदिर, या मोठ्या समूहाने गच्च भरल्यामुळे व हा समूह आध्यात्मिक इस्राएलांच्या शेषांसह त्याची स्तुती करत असल्यामुळे किती वैभवी झाले आहे!

५ मोठा लोकसमुदाय देवाची सेवा, मंदिराच्या आतील याजकीय अंगणात चित्रित होत असलेल्या सेवेप्रमाणे करत नाही. देवाचे दत्तक, आध्यात्मिक पुत्र होण्यासाठी त्यांना धार्मिक घोषित केले जात नाही. (रोमकर ८:१, १५) तरीसुद्धा, येशूच्या खंडणीवर विश्‍वास प्रदर्शित केल्यामुळे ते यहोवासमोर शुद्ध भूमिकेत उभे राहू शकतात. त्याचे मित्र असल्याकारणाने त्यांना धार्मिक घोषित केले जाते. (पडताळा याकोब २:२१, २३.) त्यांनाही देवाच्या आध्यात्मिक वेदीवर स्वीकारयोग्य अर्पणे वाहण्याचा सुहक्क आहे. अशा प्रकारे, यशया ५६:६, ७ मधील भविष्यवाणी मोठ्या लोकसमुदायाच्या बाबतीत वैभवशालीपणे पूर्ण होत आहे: “परमेश्‍वराची सेवा करण्यासाठी, त्याच्या नामाची आवड धरण्यासाठी . . . जे विदेशी त्याच्या चरणी जडले आहेत, . . . त्यांस मी आपल्या पवित्र पर्वतावर आणीन आणि माझ्या प्रार्थनामंदिरात त्यांस हर्षित करीन; माझ्या वेदीवर केलेले त्यांचे होम व यज्ञ मला पसंत होतील; कारण माझे मंदिर हे सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थनामंदिर आहे असे म्हणतील.”

६. (अ) विदेशी कोणत्या प्रकारची अर्पणे वाहतात? (ब) याजकीय अंगणातील पाण्याचे गंगाळ त्यांना कशाची आठवण करून देते?

६ हे विदेशी जी अर्पणे करतात ती “[देवाचे] नाव पत्करणाऱ्‍या ओठाचे फळ [बारीक दळलेल्या अन्‍नार्पणाप्रमाणे] असा स्तुतीचा यज्ञ” आणि ‘इतरांसोबत चांगले करणे व दान करणे,’ ही आहेत. (इब्री लोकांस १३:१५, १६) याजकांना आपले हातपाय धुण्यासाठी ज्या गंगाळातले पाणी वापरायचे होते ते गंगाळ देखील या विदेशांना एक महत्त्वपूर्ण स्मरणिका आहे. देवाचे वचन जसजसे प्रगतिशीलपणे त्यांना अधिक स्पष्ट करून दिले जाते तसतसे त्यांनी स्वतःची आध्यात्मिक व नैतिक शुद्धता करून घेतली पाहिजे.

पवित्र स्थान आणि त्यातील सामानसुमान

७. (अ) मोठा लोकसमुदाय पवित्र याजकगणाच्या विशेषाधिकारांना कसे लेखतो? (ब) काही विदेशी लोकांना कोणते अधिक सुहक्क मिळाले आहेत?

७ पवित्र स्थान आणि त्यातील सामानसुमानाचा विदेशांच्या या मोठ्या लोकसमुदायासाठी काही अर्थ आहे का? त्याचे असे आहे, पवित्र स्थान असे प्रदर्शित केलेल्या अवस्थेत ते केव्हाही येणार नाहीत. स्वर्गीय नागरिकत्व मिळालेले देवाचे आध्यात्मिक पुत्र या नात्याने त्यांचा नव्याने जन्म होत नाही. यामुळे त्यांना त्यांचा हेवा किंवा त्यांच्याबद्दल ईर्षा वाटते का? नाही. उलट, ते १,४४,००० च्या शेषांना पाठिंबा देण्याच्या त्यांच्या सुहक्कामुळे आनंदी आहेत व मानवजातीला परिपूर्णतेप्रत नेण्यात ख्रिस्तासोबत भाग घेणाऱ्‍या या आध्यात्मिक पुत्रांना दत्तक घेण्यामधील देवाच्या उद्देशाची ते अतिशय कदर बाळगतात. तसेच, परादीसमध्ये सार्वकालिक जीवनाची पार्थिव आशा देऊन देवाने त्याची अपात्री कृपा दाखवल्यामुळे विदेशांचा मोठा लोकसमुदाय आनंदी आहे. यांतील काही विदेशांना, प्राचीन नथीनीमप्रमाणे, पवित्र याजकगणाला साहाय्य देण्यासाठी देखरेखीचे विशेषाधिकार देण्यात आले आहेत.b (यशया ६१:५) यांच्यातील काहींना येशू “सर्व पृथ्वीवर अधिपती” नेमतो.—स्तोत्र ४५:१६.

८, ९. पवित्र स्थानातील सामानसुमानाचा विचार केल्याने मोठा लोकसमुदाय कोणता लाभ मिळवतो?

८ ते प्रतिनमुनेदार पवित्र स्थानामध्ये प्रवेश करणार नसले तरी विदेशांचा मोठा लोकसमुदाय, त्यातील सामानसुमानापासून मौल्यवान धडे शिकतो. दीपवृक्षाला ज्याप्रमाणे तेलाच्या पुरवठ्याची सतत गरज होती त्याचप्रमाणे ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाद्वारे’ देवाच्या वचनातील प्रगतिशील सत्ये समजण्यास मदत व्हावी म्हणून विदेशांना पवित्र आत्म्याची गरज आहे. (मत्तय २४:४५-४७) शिवाय, देवाचा आत्मा त्यांना या आमंत्रणाला प्रतिसाद देण्यास मदत करतो: “आत्मा व वधू [अभिषिक्‍त शेष] ही म्हणतात, ये. ऐकणाराहि म्हणो, ये. आणि तान्हेला येवो; ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेवो.” (प्रकटीकरण २२:१७) यास्तव, दीपवृक्ष मोठ्या लोकसमुदायाला, ख्रिश्‍चन या नात्याने चमकण्याच्या त्यांच्या कर्तव्याची व देवाच्या पवित्र आत्म्याला नाखूष करील अशी कोणतीही मनोवृत्ती, विचार, बोलणे किंवा कृती टाळण्याची आठवण करून देतो.—इफिसकर ४:३०.

९ समक्षतेची भाकर असलेला मेज, मोठ्या लोकसमुदायाला, त्यांनी आध्यात्मिकरीत्या सुदृढ राहण्यासाठी बायबलमधून तसेच ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाद्वारे’ येणाऱ्‍या प्रकाशनांमधून मिळणारे आध्यात्मिक अन्‍न नियमाने घेतले पाहिजे, याची आठवण त्यांना करून देतो. (मत्तय ४:४) धूपवेदी त्यांना, सत्त्वनिष्ठा राखण्यास मदत करावी म्हणून यहोवाला कळकळीने प्रार्थना करण्याच्या महत्त्वाची आठवण करून देते. (लूक २१:३६) त्यांच्या प्रार्थनांमध्ये अंतःकरणातून आलेल्या स्तुतीच्या व आभारप्रदर्शनाच्या अभिव्यक्‍ती असल्या पाहिजेत. (स्तोत्र १०६:१) ख्रिस्ती सभांमध्ये पूर्ण अंतःकरणाने राज्य गीते गाणे व ‘तारणासाठी प्रभावकारीपणे मुखाने कबूल’ करण्यासाठी चांगल्याप्रकारे तयारी करणे, यासारख्या इतर मार्गांनी त्यांनी देवाची स्तुती करण्याची गरज आहे याचीही धूपवेदी आठवण करून देते.—रोमकर १०:१०.

खऱ्‍या उपासनेचा संपूर्ण विजय

१०. (अ) आपण कोणत्या महान आशेची वाट पाहू शकतो? (ब) पहिल्यांदा कोणता विकास घडून आला पाहिजे?

१० आज सर्व राष्ट्रांतील ‘पुष्कळ लोक’ यहोवाच्या उपासनेच्या भवनाकडे येत आहेत. (यशया २:२, ३) याची पुष्टी देत प्रकटीकरण १५:४ म्हणते: “हे प्रभो, तुला कोण भिणार नाही? तुझ्या नावाला कोण महिमा देणार नाही? कारण तूच मात्र पवित्र आहेस; आणि तुझी न्यायकृत्ये प्रगट झाली आहेत, म्हणून सर्व राष्ट्रे तुझ्यासमोर येऊन तुला नमन करितील.” त्यानंतर काय घडते त्याचे जखऱ्‍याचा १४ वा अध्याय वर्णन करते. नजीकच्या भवितव्यात, जेरूसलेमविरुद्ध अर्थात, स्वर्गीय जेरूसलेमच्या पृथ्वीवरील प्रतिनिधींविरुद्ध शेवटल्या वेळी युद्ध करण्यासाठी पृथ्वीवरील बहुसंख्य लोक एकत्र जमतील तेव्हा त्यांच्या वाईट मनोवृत्तीचा कळस गाठला जाईल. तेव्हा यहोवा कार्य करील. योद्धा राजा या नात्याने तो, हल्ला करण्याची हिंमत करणाऱ्‍या राष्ट्रांविरुद्ध “युद्ध करील.”—जखऱ्‍या १४:२, ३.

११, १२. (अ) यहोवाच्या मंदिरातील त्याच्या उपासकांवर जगव्याप्त हल्ला होईल तेव्हा तो कशाप्रकारे प्रतिसाद देईल? (ब) देवाच्या युद्धाचा परिणाम काय होईल?

११ “तेव्हा ज्या राष्ट्रांनी यरुशलेमेबरोबर लढाई चालविली त्या सर्वांचा संहार परमेश्‍वर ज्या मरीने करील ती ही: ते पायांवर उभे असता त्यांचे मांस कुजेल, त्यांचे डोळे जागच्या जागी सडतील, त्यांच्या मुखांत त्यांची जिव्हा सडेल. त्या दिवशी असे होईल की, परमेश्‍वराकडून त्यांची फार त्रेधा उडेल, ते प्रत्येक आपापल्या शेजाऱ्‍याचा हात धरितील; आणि त्या प्रत्येकाचा हात आपल्या शेजाऱ्‍याच्या हाताशी प्रतिकार करील.”—जखऱ्‍या १४:१२, १३.

१२ ही आपत्ति खरी आहे की लाक्षणिक हे समजण्यासाठी आपल्याला थांबून राहावे लागेल. परंतु, एक गोष्ट मात्र निश्‍चित आहे. देवाचे शत्रू यहोवाच्या विश्‍वव्यापी सेवकांवर हल्ला करतील तेव्हा देवाच्या सर्वशक्‍तीमान सामर्थ्याच्या विलक्षण प्रदर्शनांद्वारे त्यांना थांबवण्यात येईल. त्यांची तोंडे बंद केली जातील. जणू काय त्यांच्या आव्हानात्मक जिव्हा सडून जातील. त्यांचे संयुक्‍त ध्येय त्यांच्या दृष्टीला अंधुकसे होईल, जणू काय त्यांचे डोळे सडून जातील. हल्ला करण्यास शक्य करणारे त्यांचे शारीरिक बळ निकामी होईल. गोंधळामुळे ते एकमेकांची मोठ्या प्रमाणात कत्तल करतील. अशा प्रकारे देवाच्या उपासनेच्या सर्व पार्थिव शत्रूंना काढून टाकले जाईल. सरतेशेवटी, सर्व राष्ट्रांना यहोवाच्या सार्वभौम सत्तेला ओळखण्यास भाग पाडले जाईल. तेव्हा ‘यहोवा सर्व पृथ्वीवर राजा होईल,’ ही भविष्यवाणी पूर्ण होईल. (जखऱ्‍या १४:९) तेथूनपुढे, ख्रिस्ताची हजार वर्षीय राजवट मानवजातीसाठी राखून ठेवलेले आशीर्वाद देण्यास सुरवात करील तेव्हा सैतान आणि त्याच्या दूतांना डांबून ठेवण्यात येईल.—प्रकटीकरण २०:१, २; २१:३, ४.

पार्थिव पुनरूत्थान

१३. “राष्ट्रांपैकी अवशिष्ट राहिलेले” कोण आहेत?

१३ जखऱ्‍याची भविष्यवाणी १४ व्या अध्यायाच्या १६ व्या वचनात पुढे म्हणते: “आणखी असे होईल की येरूशलेमेवर चढाई करून आलेल्या राष्ट्रांपैकी अवशिष्ट राहिलेले सर्व, राजाधिराज सेनाधीश परमेश्‍वर याचे भजनपूजन करण्यासाठी व मंडपांचा सण पाळण्यासाठी प्रतिवर्षी यरूशलेमेस वर जातील.” बायबलनुसार, आज व या दुष्ट व्यवस्थिकरणाच्या शेवटापर्यंत जिवंत राहणारे व खऱ्‍या उपासनेचे शत्रू या नात्याने न्याय केलेले सर्व लोक “युगानुयुगाचा नाश ही शिक्षा” भोगतील. (२ थेस्सलनीकाकर १:७-९; तसेच मत्तय २५:३१-३३, ४६ हे देखील पाहा.) त्यांचे पुनरूत्थान होणार नाही. तेव्हा बहुधा, ‘अवशिष्ट राहिलेल्यांमध्ये,’ देवाच्या शेवटल्या युद्धाआधी मरण पावलेल्या व पुनरूत्थानाची बायबल आधारित आशा असलेल्या सदस्यांचा समावेश होतो. येशूने अभिवचन दिले: “ह्‍याविषयी आश्‍चर्य करू नका; कारण कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील, अशी वेळ येत आहे.”—योहान ५:२८, २९.

१४. (अ) सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी पुनरूत्थित लोकांनी काय केले पाहिजे? (ब) यहोवाला समर्पित होण्यास व खरी उपासना आचरण्यास विरोध करणाऱ्‍यांचे काय होईल?

१४ या सर्व पुनरूत्थित लोकांनी आपले पुनरूत्थान प्रतिकूल न्यायदंडाचे नव्हे तर जीवनाचे पुनरूत्थान ठरावे यासाठी काहीतरी केले पाहिजे. त्यांनी यहोवाच्या मंदिराच्या पार्थिव अंगणात येऊन येशू ख्रिस्ताद्वारे देवाला समर्पण करून त्याच्यासमोर दंडवत केला पाहिजे. कोणतीही पुनरूत्थित व्यक्‍ती असे करण्यास नकार देत असल्यास, सध्य राष्ट्रांवर जे घडणार आहे तीच पीडा ती भोगेल. (जखऱ्‍या १४:१८) कोणास ठाऊक किती पुनरूत्थित लोक मोठ्या लोकसमुदायासोबत आनंदाने प्रतिनमुनेदार मंडपाचा सण साजरा करतील? निश्‍चितच, पुष्कळ लोक असतील, आणि त्यामुळे यहोवाचे महान आध्यात्मिक मंदिर आणखी भव्य होईल!

प्रतिनमुनेदार मंडपाचा सण

१५. (अ) प्राचीन इस्राएल लोकांच्या मंडपाच्या सणाचे काही उल्लेखनीय पैलू कोणते आहेत? (ब) सणादरम्यान ७० गोऱ्‍हे का अर्पिण्यात येत?

१५ प्राचीन इस्राएलला प्रत्येक वर्षी मंडपाचा सण साजरा करावयाचा होता. तो एक आठवड्याचा असून कापणी गोळा करण्याच्या शेवटी येत असे. तो आभारप्रदर्शनाचा आनंदी काळ होता. एका आठवड्यासाठी त्यांना झाडांच्या पानांनी विशेषकरून, खजुरीच्या पानांनी झाकलेल्या छपरांच्या मंडपामध्ये तात्पुरते राहावयाचे होते. देवाने कशाप्रकारे त्यांच्या पूर्वजांना इजिप्तमधून वाचवले आणि कशाप्रकारे वाग्दत्त देशात पदार्पण करेपर्यंत ४० वर्षे रानात फिरत असताना मंडपांमध्ये राहत होते तेव्हा त्यांची काळजी घेतली, याची आठवण या सणाने इस्राएल लोकांना करून दिली. (लेवीय २३:३९-४३) सणादरम्यान, ७० गोऱ्ह्यांना मंदिराच्या वेदीवर अर्पिले जाई. सणाचा हा पैलू, येशू ख्रिस्ताने पार पाडलेल्या जीवन वाचवण्याच्या परिपूर्ण आणि संपूर्ण कार्याचे भविष्यसूचक होते हे पुराव्यानुसार दिसते. त्याच्या खंडणी बलिदानाचे फायदे कालांतराने नोहाच्या वंशातून आलेल्या मानवजातीच्या ७० कुटुंबांच्या अगणित वंशजांना मिळतील.—उत्पत्ति १०:१-२९; गणना २९:१२-३४; मत्तय २०:२८.

१६, १७. (अ) प्रतिनमुनेदार मंडपाच्या सणाची सुरवात केव्हा झाली, व तो पुढे कसा चालू राहिला? (ब) मोठा लोकसमुदाय त्या सणामध्ये कशाप्रकारे भाग घेतो?

१६ अशा प्रकारे, प्राचीन मंडपाच्या सणाने, विमोचित पापी लोकांना यहोवाच्या आध्यात्मिक मंदिरात आनंदाने एकत्रित करण्याकडे अंगुली दर्शवली. या सणाच्या पूर्णतेची सुरवात, आध्यात्मिक इस्राएल लोकांच्या ख्रिस्ती मंडळीमधील आनंदी एकत्रीकरणाच्या प्रारंभाने, अर्थात, सा. यु. ३३ च्या पेन्टेकॉस्ट रोजी झाली. (प्रेषितांची कृत्ये २:४१, ४६, ४७) या अभिषिक्‍त जनांना हे समजले, की त्यांचे “खरे नागरिकत्व तर स्वर्गात” असल्यामुळे ते सैतानाच्या जगात “परदेशवासी” होते. (१ पेत्र २:११; फिलिप्पैकर ३:२०) ह्‍या आनंदी सणाला, धर्मत्यागामुळे पुढे ज्या ख्रिस्ती धर्मजगताची प्रस्थापना झाली त्यामुळे तात्पुरते ग्रहण लागले. (२ थेस्सलनीकाकर २:१-३) परंतु १९१९ मध्ये, १,४४,००० आध्यात्मिक इस्राएलच्या सदस्यांतील शेषांचे तसेच प्रकटीकरण ७:९ मधील आंतरराष्ट्रीय मोठ्या लोकसमुदायाचे आनंदी एकत्रीकरण झाले तेव्हा त्या सणाची पुन्हा सुरवात झाली.

१७ मोठ्या लोकसमुदायाच्या हातात झावळ्या असलेले दाखवण्यात आले आहे; ज्यावरून तेही प्रतिनमुनेदार मंडपाचा सण आनंदाने साजरे करणाऱ्‍यांपैकी आहेत असे दिसून येते. समर्पित ख्रिस्ती या नात्याने, यहोवाच्या मंदिरामध्ये आणखी उपासकांना गोळा करण्याच्या कार्यात ते आनंदाने सहभाग घेतात. शिवाय, पापी असल्यामुळे त्यांना याची जाणीव आहे, की त्यांना या पृथ्वीवर कायम राहण्याचा अधिकार नाही. भवितव्यात पुनरूत्थित होणाऱ्‍या जनांसोबत त्यांनी, ख्रिस्ताच्या हजार वर्षीय राजवटीच्या अंताला मानवी परिपूर्णतेप्रत पोहंचूपर्यंत ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवला पाहिजे.—प्रकटीकरण २०:५.

१८. (अ) येशू ख्रिस्ताच्या हजार वर्षीय राजवटीच्या अंतास काय होईल? (ब) यहोवाच्या खऱ्‍या उपासनेचा विजय सरतेशेवटी कसा होईल?

१८ मग, पृथ्वीवरील देवाचे उपासक, स्वर्गीय याजकगणाच्या गरजेविना देवासमोर मानवी परिपूर्णतेत उभे राहतील. तेव्हा येशू ख्रिस्ताने “देवपित्याला राज्य सोपून” देण्याचा समय आलेला असेल. (१ करिंथकर १५:२४) परिपूर्ण मानवजातीची परीक्षा घेण्यासाठी सैतानाला “थोडा वेळ सोडले” जाईल. सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांसोबत सर्व अविश्‍वासू जनांचा कायमचा नाश केला जाईल. विश्‍वासू राहणाऱ्‍यांना सार्वकालिक जीवन बहाल केले जाईल. ते, पार्थिव परादीसचे कायमचे रहिवासी होतील. अशा प्रकारे प्रतिनमुनेदार मंडपाच्या सणाचा भव्यतम, यशस्वी समारोप होईल. यहोवाचा सार्वकालिक गौरव व मानवजातीचा अनंतकालिक आनंद यात खऱ्‍या उपासनेचा विजय झालेला असेल.—प्रकटीकरण २०:३, ७-१०, १४, १५.

[तळटीपा]

a जखऱ्‍याच्या १४ व्या अध्यायातील प्रत्येक वचनांवरील विवेचनासाठी वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने १९७२ मध्ये प्रकाशित केलेल्या मानवजातीला परादीस पुन्हा प्राप्त करून देण्यात येते—ईश्‍वरशासित पद्धतीद्वारे! (इंग्रजी), या पुस्तकाचे अध्याय २१ आणि २२ पहा.

b आधुनिक दिवसांतील नथीनीमवरील अधिक माहितीसाठी टेहळणी बुरूज जुलै १, १९९२, पृष्ठ ३० पाहा.

उजळणीचे प्रश्‍न

◻ पहिल्या जागतिक महायुद्धादरम्यान ‘यरुशलेमवर’ कशाप्रकारे हल्ला झाला होता?—जखऱ्‍या १४:२.

◻ १९१९ पासून देवाच्या लोकांच्या बाबतीत काय घडले?

◻ प्रतिनमुनेदार मंडपाचा सण साजरा करण्यात आज कोण भाग घेत आहे?

◻ कशा प्रकारे खरी उपासना पूर्णपणे विजय मिळवेल?

[२३ पानांवरील चित्रं]

मंडपाचा सण साजरा करताना खजुरीच्या झावळ्यांचा उपयोग केला जाई

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा