वाचन करण्यात वेळ घालवा
“मी येईपर्यंत वाचन, बोध व शिक्षण ह्याकडे लक्ष ठेव.”—१ तीमथ्य ४:१३.
१. बायबल वाचनातून आपण कसा लाभ मिळवू शकतो?
यहोवा देवाने, मानवजातीला लिहिण्यास व वाचण्यास शिकण्याची आश्चर्यकारक क्षमता प्रदान केली आहे. त्याने त्याचे वचन, बायबल देखील पुरवले आहे जेणेकरून आपण योग्यप्रकारे प्रशिक्षित होऊ शकतो. (यशया ३०:२०, २१) लाक्षणिकपणे, बायबलची पाने आपल्याला अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्या सारख्या देवभीरू कुलपित्यांप्रमाणे ‘चालण्यास’ मदत करतात. आपण सारा, रिबका आणि विश्वासू मवाबी रूथ यांसारख्या ईश्वरी स्त्रियांकडे ‘पाहू’ शकतो. होय, आपण येशू ख्रिस्ताचे डोंगरावरील प्रवचन ‘ऐकू’ शकतो. चांगले वाचक असल्यास, आपण पवित्र शास्त्रवचनांतील हा सर्व आनंद आणि महान शिक्षण प्राप्त करू शकतो.
२. येशू आणि त्याच्या प्रेषितांना अस्खलितपणे वाचता येत होते हे कशावरून सूचित होते?
२ परिपूर्ण पुरुष, येशू ख्रिस्त याला अस्खलित वाचता येत होते आणि तो हिब्रू शास्त्रवचनांमध्ये पारंगत होता यात काही शंका नाही. यास्तव, दियाबलाने येशूला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला तेव्हा येशूने वारंवार त्यांचा उल्लेख केला व म्हटले, “असा शास्त्रलेख आहे.” (मत्तय ४:४, ७, १०) एके प्रसंगी नासरेथच्या सभास्थानाजवळ, त्याने जाहीररीत्या यशयाच्या भविष्यवाणीचा एक भाग वाचला आणि तो स्वतःला लागू केला. (लूक ४:१६-२१) येशूच्या प्रेषितांबद्दल काय? त्यांच्या लिखाणांमध्ये त्यांनी बहुतेकवेळा इब्री शास्त्रवचनांचा उल्लेख केला. पेत्र आणि योहान या दोघांचे हिब्रू महाविद्यालयीन शिक्षण झाले नसल्यामुळे यहुदी शासकांनी त्यांना अशिक्षित व अडाणी समजले तरीदेखील, त्यांची ईश्वरप्रेरित पत्रे हे स्पष्टपणे शाबीत करतात, की त्यांना लिहिता व वाचता येत होते. (प्रेषितांची कृत्ये ४:१३) पण वाचता येणे खरोखरच महत्त्वपूर्ण आहे का?
‘मोठ्याने वाचणारा धन्य’
३. शास्त्रवचने आणि ख्रिस्ती प्रकाशने वाचणे इतके महत्त्वपूर्ण का आहे?
३ शास्त्रवचनांचे अचूक ज्ञान घेतल्याने व त्यास लागू केल्याने सार्वकालिक जीवन मिळू शकते. (योहान १७:३) यास्तव, पवित्र शास्त्रवचने आणि अभिषिक्त ख्रिश्चनांच्या विश्वासू आणि बुद्धिमान दास वर्गाकरवी देवाने पुरवलेल्या ख्रिस्ती प्रकाशनांना वाचणे व त्यांचा अभ्यास करणे अत्यावश्यकपणे महत्त्वपूर्ण आहे याची यहोवाच्या साक्षीदारांना जाणीव आहे. (मत्तय २४:४५-४७) वास्तविक पाहता, विशिष्ट प्रकारे तयार केलेल्या वॉच टावर प्रकाशनांचा उपयोग केल्याने हजारोंना वाचण्यास व त्याद्वारे देवाच्या वचनाचे जीवन-प्रदायक ज्ञान प्राप्त करण्यास शिकवले गेले आहे.
४. (अ) देवाच्या वचनाचे वाचन, अभ्यास आणि त्याचे अनुसरण केल्यामुळे आनंद का मिळतो? (ब) वाचनाबाबत पौलाने तीमथ्याला काय सांगितले?
४ देवाचे वचन वाचल्याने, अभ्यासल्याने आणि ते अनुसरल्याने आनंद मिळतो. हे असे आहे कारण त्यामुळे आपण देवाला खूष करतो आणि त्याचा आदर करतो, त्याचे आशीर्वाद प्राप्त करतो व आनंद अनुभवतो. त्याच्या उपासकांनी आनंदी असावे असे यहोवाला वाटते. म्हणूनच, त्याने प्राचीन इस्राएल लोकांसमोर त्याचे नियमशास्त्र वाचून दाखवावे, अशी आज्ञा याजकांना दिली होती. (अनुवाद ३१:९-१२) नक्कलाकार एज्रा आणि इतरांनी जेरूसलेमेत एकत्र झालेल्यांसमोर नियमशास्त्र वाचून दाखवल्यावर त्याचा अर्थ समजावून सांगण्यात आला व त्यामुळे तेथे “मोठा उत्सव” करण्यात आला. (नहेम्या ८:६-८, १२) नंतर, ख्रिस्ती प्रेषित पौलाने आपला सहकर्मी तीमथ्य याला सांगितले: “मी येईपर्यंत वाचन, बोध व शिक्षण ह्याकडे लक्ष ठेव.” (१ तीमथ्य ४:१३) आणखी एका अनुवादात असे लिहिले आहे: ‘शास्त्रवचनाचे वाचन करण्यात वेळ घालवा.’—सुबोध भाषांतर.
५. प्रकटीकरण १:३, आनंदाला वाचनाशी कसे जोडते?
५ देवाच्या वचनाचे वाचन आणि अनुसरण यावर आपला आनंद अवलंबून असल्याचे प्रकटीकरण १:३ मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. तेथे आपल्याला सांगण्यात येते: “ह्या संदेशाचे शब्द [मोठ्याने] वाचून दाखविणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य; कारण समय जवळ आला आहे.” होय, प्रकटीकरण तसेच संपूर्ण शास्त्रवचनांतील देवाचे भविष्यसूचक शब्द आपण मोठ्याने वाचले व ते ऐकले पाहिजेत. ‘यहोवाच्या नियमशास्त्रात रमणारा, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करणाराच’ खरोखर आनंदी व्यक्ती आहे. याचा परिणाम? “जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते.” (स्तोत्र १:१-३) तथापि, यहोवाची संघटना आम्हा प्रत्येकाला चांगल्या कारणासाठीच त्याचे वचन खासगीरीत्या, कौटुंबिकरीत्या व मित्रांसकट वाचण्यास व अभ्यास करण्यास आर्जवते.
सक्रियपणे विचार व मनन करा
६. यहोशवाला काय वाचण्याची सूचना मिळाली होती व हे फायदेकारक कसे होते?
६ देवाच्या वचनाच्या आणि ख्रिस्ती प्रकाशनांच्या वाचनातून तुम्ही सर्वोत्तम लाभ कसा प्राप्त करू शकता? प्राचीन इस्राएलचा देवभीरू नेता यहोशवा याने जे केले त्याप्रमाणे करणे तुम्हालाही फायदेकारक वाटेल. त्याला आज्ञा देण्यात आली होती: “नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे; त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे वाचन [हलक्या आवाजात वाचन, NW] कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशःप्राप्ति घडेल.” (यहोशवा १:८) ‘हलक्या आवाजात वाचणे’ याचा अर्थ, स्वतःला ऐकू येईल अशा खालच्या स्वरात वाचणे. लक्षात ठेवण्यासाठी हे एक चांगले साहाय्य आहे, कारण ते, आपण जे काही वाचतो, आपल्या मनावर उमटविते. यहोशवाला देवाचे नियमशास्त्र “रात्रंदिवस,” किंवा नियमाने वाचायचे होते. यशस्वी होण्याचा व देवाने दिलेल्या जबाबदाऱ्या सुज्ञतेने पूर्ण करण्याचा तो एक मार्ग होता. या रीतीने देवाच्या वचनाचे नियमित वाचन तुम्हालाही अशा प्रकारे मदत करू शकते.
७. देवाचे वचन वाचताना भराभर वाचण्यावर लक्ष केंद्रित का करू नये?
७ देवाचे वचन वाचताना भरभर वाचून काढण्यावर लक्ष केंद्रित करू नका. बायबल अथवा एखादे ख्रिस्ती प्रकाशन वाचण्यात तुम्ही अमुक वेळ खर्च करणार असे ठरवल्यास, हळूहळू वाचन करा. महत्त्वपूर्ण मुद्दे लक्षात ठेवण्याच्या हेतूने तुम्ही अभ्यास करता तेव्हा हे विशेषकरून महत्त्वपूर्ण आहे. तसेच वाचत असताना, सक्रियपणे विचार करा. बायबल लेखकाच्या विधानांचे पृथक्करण करा. स्वतःला विचारा, ‘या लेखकाचा उद्देश काय आहे? ही माहिती मी स्वतःला कशी लागू करू शकतो?’
८. शास्त्रवचनांचे वाचन करतेवेळी त्यावर मनन करणे फायदेशीर का आहे?
८ पवित्र शास्त्रवचनांचे वाचन करतेवेळी मनन करण्यासाठी वेळ काढा. यामुळे तुम्हाला बायबल अहवाल लक्षात ठेवण्यास व शास्त्रीय तत्त्वे लागू करण्यास मदत होईल. देवाच्या वचनावर मनन केल्याने व अशा प्रकारे मुद्दे लक्षात ठेवल्याने, तुम्हाला अंतःकरणातून बोलण्यास, म्हणजेच, नंतर तुम्हाला पस्तावा होईल असे काही बोलण्याऐवजी प्रामाणिकपणे प्रश्न विचारणाऱ्यांना अचूक उत्तरे देण्यास देखील मदत होईल. एक ईश्वरप्रेरित नीतिसूत्र म्हणते: “धार्मिक मनुष्य विचार करून उत्तर देतो.”—नीतिसूत्रे १५:२८.
जुन्या मुद्यांचा संबंध नव्या मुद्यांशी जोडा
९, १०. नवीन मुद्यांचा संबंध तुम्हाला माहीत असलेल्या जुन्या शास्त्रवचनीय मुद्यांशी जोडल्यास तुम्ही तुमचे बायबल वाचन आणखी मनोरंजक कसे बनवू शकता?
९ अनेक ख्रिश्चनांना एके काळी देव, त्याचे वचन आणि त्याचे उद्देश यांबद्दल फार कमी प्रमाणात माहिती होती हे त्यांनी कबूल केले पाहिजे. परंतु, आज, हे ख्रिस्ती सेवक, सृष्टी आणि मानव पापात कसा पडला इथपासून, ख्रिस्ताच्या बलिदानाच्या उद्देशाचे स्पष्टीकरण देऊ शकतात, या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या नाशाबद्दल सांगू शकतात, आणि आज्ञाधारक मानवजातीला कशा प्रकारे परादीस पृथ्वीवर सार्वकालिक जीवनाचे वरदान दिले जाईल, हे दाखवू शकतात. असे करणे शक्य आहे कारण, यहोवाच्या या सेवकांनी बायबलचा आणि ख्रिस्ती प्रकाशनांचा अभ्यास करून “देवाविषयीचे ज्ञान” मिळविले आहे. (नीतिसूत्रे २:१-५) त्यांनी हळूवारपणे शिकलेल्या नवीन मुद्यांचा संबंध पूर्वी समजून घेतलेल्या मुद्यांशी जोडला.
१० तुम्हाला जे माहीत आहे त्याजशी नवीन शास्त्रवचनीय मुद्यांचा संबंध जोडणे फायदेकारक व प्रतिफलदायक आहे. (यशया ४८:१७) बायबलचे नियम, तत्त्वे किंवा काहीशा सैद्धांतिक कल्पना सादर केल्या जातात तेव्हा, त्यांचा संबंध तुम्हाला आधीपासून जे माहीत आहे त्याजशी जोडा. ‘सुवचनांच्या नमुन्याविषयी’ तुम्ही जे शिकला त्याजशी या माहितीचा मेळ घाला. (२ तीमथ्य १:१३) देवासोबतचा तुमचा नातेसंबंध दृढ करण्यास, तुमचे ख्रिस्ती व्यक्तिमत्त्व सुधारण्यास किंवा इतरांना बायबल सत्ये सांगण्यास तुमचे साहाय्य करणारी माहिती शोधा.
११. वर्तनाविषयी बायबल जे काही म्हणते ते वाचत असताना तुम्ही काय कराल? उदाहरण द्या.
११ वर्तनाविषयी बायबल जे म्हणते ते वाचताना, त्यामध्ये असलेले तत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यावर मनन करा, आणि तशाच परिस्थितींमध्ये तुम्ही काय केले असते हे ठरवा. याकोबाचा पुत्र योसेफ, याने, “एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू?” असे विचारून पोटीफराच्या पत्नीबरोबर लैंगिक अनैतिकता करण्यास अनेक प्रसंगी नकार दिला. (उत्पत्ति ३९:७-९) या प्रेरक अहवालाच्या मुळाशी असलेले एक तत्त्व तुम्हाला आढळून येते—लैंगिक अनैतिकता देवाविरुद्ध पाप आहे. देवाच्या वचनातील इतर विधानांशी तुम्ही या तत्त्वाचा मनातल्या मनात संबंध जोडू शकता व अशा प्रकारच्या अपराधात पडण्याचा मोह झाल्यास या ज्ञानापासून लाभ प्राप्त होईल अशा तऱ्हेने त्याची आठवण करू शकता.—१ करिंथकर ६:९-११.
शास्त्रवचनीय घटनांचे कल्पनाचित्र रेखाटा
१२. बायबलचे अहवाल वाचत असताना त्यांचे कल्पनाचित्र रेखाटण्याची गरज का आहे?
१२ वाचत असताना तुमच्या मनावर मुद्दे बिंबवण्यासाठी, जे काही घडत आहे त्याचे कल्पनाचित्र रेखाटा. मनातल्या मनात भूप्रदेश, घरे आणि लोक पाहा. त्यांचा आवाज ऐका. भट्टीत भाजणाऱ्या भाकरीचा सुगंध घ्या. दृश्ये सजीव बनवा. तेव्हा मग तुमचे वाचन एक प्रेरक अनुभव असेल कारण, तुम्ही एक प्राचीन शहर पाहाल, उंच पर्वतावर चढाल, सृष्टीतील अद्भुत गोष्टींना पाहून अचंबित व्हाल, किंवा मोठा विश्वास असलेल्या स्त्रीपुरुषांसोबत सहवास कराल.
१३. शास्ते ७:१९-२२ मध्ये जे लिहिले आहे त्याचे वर्णन तुम्ही कसे द्याल?
१३ समजा तुम्ही शास्ते ७:१९-२२ चा अहवाल वाचत आहात. तेथे जे काही होत आहे त्याचे कल्पनाचित्र रेखाटा. शास्ता गिदोन आणि तीनशे शूर इस्राएली पुरुष मिद्यानी छावणीच्या सीमेवर उभे आहेत. रात्रीचे दहा वाजले आहेत, ‘रात्रीच्या मधल्या प्रहराच्या आरंभीचा’ तो समय आहे. मिद्यानी पहारा नुकताच बदलला आहे व इस्राएलांच्या झोपी गेलेल्या शत्रूच्या छावणीला काळोखाने झाकून टाकले आहे. ते पाहा! गिदोन आणि त्याच्या पुरुषांकडे रणशिंगे आहेत. त्यांच्या डाव्या हातात मोठमोठे घडे व त्या घड्यांच्या आत दिवट्या ठेवलेल्या आहेत. अचानक, प्रत्येकी शंभर पुरुषांच्या तीन तुकड्या रणशिंगे फुंकतात, घडे फोडतात व दिवट्या उंचावून घोष करतात: “परमेश्वराची [यहोवाची, NW] तरवार गिदोनाची तरवार!” तुम्ही छावणीकडे पाहता. तर, मिद्यानी लोक ओरडत सैरावैरा पळू लागले आहेत! ती तीनशे माणसे त्यांची रणशिंगे फुंकत असताना, देवाने प्रत्येक मिद्यानाची तरवार त्याच्या सोबत्यांवर चालवली. मिद्यानाला पिटाळून लावण्यात आले आहे व यहोवाने इस्राएलांना विजय दिला आहे.
अनमोल धडे शिकणे
१४. शास्तेच्या ९ व्या अध्यायाचा उपयोग मुलाला नम्र होण्याची गरज शिकवण्यासाठी कसा करता येईल?
१४ देवाचे वचन वाचल्याने आपण पुष्कळ धडे शिकू शकतो. उदाहरणार्थ, नम्र होण्याची गरज तुम्हाला तुमच्या मुलांच्या मनावर बिंबवायची असेल. गिदोनाचा पुत्र योथाम याच्या भविष्यवाणीत जे म्हटले होते त्याचे सहजपणे कल्पनाचित्र रेखाटून ते समजले पाहिजे. शास्ते ९:८ वाचण्यास सुरू करा. योथाम म्हणाला, “एकदा झाडे कोणाला तरी अभिषेक करून आपणावर राजा नेमावे म्हणून निघाली.” जैतुनाचे झाड, अंजिराचे झाड आणि द्राक्षवेल या तिघांनीही राज्य करण्यास नकार दिला. पण लहानशा काटेरी झुडूपाला राजा होण्यास आनंद वाटला. तुमच्या मुलांना हा अहवाल मोठ्याने वाचून दाखवल्यावर तुम्ही कदाचित त्याचे स्पष्टीकरण देऊ शकता, की त्या मौल्यवान झाडांनी पात्र लोकांचे प्रतिनिधीत्व केले ज्यांनी त्यांच्या सह इस्राएलांवरील राज्यत्वाचा हुद्दा नाकारला. केवळ जळणासाठी लायक असलेल्या काटेरी झुडूपाने, गर्विष्ठ अबीमलेखाचे प्रतिनिधीत्व केले जो इतरांवर सत्ता गाजवू पाहणारा खुनी होता परंतु योथामाच्या भविष्यवाणीनुसार त्याचा वध करण्यात आला. (शास्ते, अध्याय ९) कोणत्या मुलाला मोठे होऊन काटेरी झुडूपाप्रमाणे व्हावयास आवडेल?
१५. रूथच्या पुस्तकात एकनिष्ठेच्या महत्त्वावर कशा प्रकारे जोर देण्यात आला आहे?
१५ एकनिष्ठेचे महत्त्व बायबलमधील रूथ नावाच्या पुस्तकात सांगण्यात आले आहे. समजा, तुमच्या कुटुंबातील सदस्य आळीपाळीने तो अहवाल मोठ्याने वाचून त्यात सांगितलेल्या गोष्टी समजण्याचा प्रयत्न करत आहेत. मवाबी रूथ आपली विधवा सासू नामी हिच्याबरोबर बेथलेहेमच्या प्रवासाला निघाल्याचे तुम्ही पाहता व रूथ तिला असे म्हणताना ऐकता: “तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव.” (रूथ १:१६) कष्टाळू रूथ बवाजच्या शेतात कापणी करणाऱ्यांच्या मागे मागे सरवा वेचताना दिसत आहे. “माझ्या गावच्या सर्व लोकांस ठाऊक आहे की तू सद्गुणी स्त्री आहेस,” अशी तो तिची प्रशंसा करताना तुम्हाला ऐकू येते. (रूथ ३:११) लवकरच बवाज रूथशी विवाह करतो. दीरासोबत विवाह करण्याच्या व्यवस्थेच्या सुसंगतेत बवाजकडून तिला ‘नामीचा’ पुत्र झाला. रूथ, दावीदाची आणि कालांतराने येशूची पूर्वज होते. अशा प्रकारे तिला तिच्या ‘कृतीचे फळ’ मिळाले. शिवाय, हा शास्त्रवचनीय अहवाल वाचणारे एक अनमोल धडा शिकतात: यहोवाशी एकनिष्ठ राहा म्हणजे तुम्हाला समृद्ध आशीर्वाद प्राप्त होतील.—रूथ २:१२; ४:१७-२२; नीतिसूत्रे १०:२२; मत्तय १:१, ५, ६.
१६. तीन हिब्रूंना कोणत्या परीक्षेतून गुजरावे लागले, व हा अहवाल आपल्याला कशी मदत करू शकतो?
१६ शद्रख, मेशख आणि अबेद्नगो नावाच्या हिब्रूंचा अहवाल आपल्याला, संकटमय परिस्थितींमध्ये देवाशी विश्वासू राहण्यास मदत करू शकतो. दानीएलाचा तिसरा अध्याय मोठ्याने वाचला जात असताना त्या घटनेचे कल्पनाचित्र रेखाटा. दूरा नामक मैदानातील एका भल्यामोठ्या सोन्याच्या मूर्तीसमोर बॅबिलोनी अधिकारी एकत्र जमले आहेत. वाद्यांचा ध्वनी कानी पडताच ते, नबुखद्नेस्सर राजाने स्थापिलेल्या मूर्तीपुढे साष्टांग दंडवत घालतात. म्हणजे, शद्रख, मेशख व अबेद्नगो यांच्या व्यतिरिक्त इतर सर्व जण तसे करतात. आदरपूर्वक परंतु दृढपणे ते राजाला सांगतात, की ते त्याच्या दैवतांची सेवा तसेच सोन्याच्या मूर्तीची उपासना करणार नाहीत. या तीन हिब्रू तरुणांना धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकण्यात येते. पण काय होते? त्या अग्नीत पाहिल्यावर राजाला चार धट्टेकट्टे पुरुष दिसतात, चौथ्याचे रूप तर “एखाद्या देवपुत्रासारखे” असते. (दानीएल ३:२५) मग या तीन हिब्रूंना अग्नीच्या बाहेर आणले जाते व नबुखद्नेस्सर राजा त्यांच्या देवाचा धन्यवाद करतो. या अहवालाचे कल्पनाचित्र रेखाटणे प्रतिफलदायी ठरले आहे. यावरून परीक्षेत असताना यहोवाशी विश्वासू राहण्याविषयी किती चांगला धडा मिळतो!
कुटुंब या नात्याने बायबल वाचन करून लाभ मिळवणे
१७. एकत्र मिळून बायबल वाचल्याने तुमचे कुटुंब शिकू शकते अशा फायद्यांविषयी थोडक्यात सांगा.
१७ तुम्ही जर नियमितरीत्या एकत्र बसून बायबलचे वाचन केले तर तुमच्या कुटुंबाला अनेक फायदे मिळू शकतील. उत्पत्तीपासून तुम्ही सृष्टीचे कल्पनाचित्र रेखाटू शकता व मानवाच्या मूळ परादीस गृहाला निरखून पाहू शकता. तुम्हालाही विश्वासू कुलपित्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे अनुभव मिळतील व कोरड्या पडलेल्या लाल समुद्रातून इस्राएलांच्या मागे तुम्हीही जाऊ शकता. शेरडामेंढरांची राखण करणारा मुलगा दावीद पलिष्टी राक्षस गल्याथाचा पराभव करताना तुम्ही पाहू शकता. तुमचे कुटुंब, जेरुसलेममधील यहोवाच्या मंदिराचे बांधकाम पाहू शकते, बॅबिलोनी सैन्यांनी त्याचा केलेला नाश व प्रांताधिकारी जरुबाबेलच्या अधिकाराखाली त्याची पुनर्बांधणी पाहू शकते. बेथलेहेम जवळील गरीब मेंढपाळांबरोबर तुम्हीही येशूच्या जन्माची देवदूत करत असलेली घोषणा ऐकू शकता. त्याचा बाप्तिस्मा आणि त्याची सेवा यांचे सविस्तर वर्णन तुम्हाला मिळू शकते. खंडणी म्हणून तो आपले मानवी जीवन देताना तुम्ही त्याला पाहू शकता व त्याच्या पुनरुत्थानाच्या आनंदात सहभाग घेऊ शकता. त्यानंतर, प्रेषित पौलाबरोबर तुम्ही प्रवास करू शकता, ख्रिस्ती धर्माचा प्रसार जसजसा होत जातो तसतसे मंडळ्यांची स्थापना होत असताना पाहू शकता. मग, प्रकटीकरणाच्या पुस्तकात तुमच्या कुटुंबाला प्रेषित योहानासोबत भवितव्याबद्दलच्या महान दृष्टान्तांचा, तसेच ख्रिस्ताच्या हजार वर्षीय राजवटीचा देखील आनंद लुटता येईल.
१८, १९. कौटुंबिक बायबल वाचनाविषयी कोणते सल्ले दिले आहेत?
१८ कुटुंब मिळून तुम्ही बायबलचे मोठ्याने वाचन करत आहात तर, अस्खलितपणे व उत्साहाने वाचा. शास्त्रवचनांचे काही भाग वाचताना, कुटुंबातील एखादा सदस्य—कदाचित पिता—सामान्य अहवाल वाचू शकतात. बाकीचे, तुम्ही जणू काय बायबल पात्र आहात असे समजून योग्य भावना ओतून आपापल्या भागांना वाचू शकता.
१९ कुटुंब या नात्याने तुम्ही बायबलचे वाचन करता तेव्हा, तुमच्या वाचनाच्या क्षमतेत सुधारणा होऊ शकते. बहुधा, देवाबद्दलचे तुमचे ज्ञान वाढेल आणि यामुळे तुम्ही त्याच्या आणखी समीप जाल. आसाफाने गायिले: “माझ्याविषयी म्हटले तर देवाजवळ जाणे ह्यांतच माझे कल्याण आहे; मी प्रभु परमेश्वराला [यहोवाला] आपले आश्रयस्थान केले आहे, ह्यासाठी की, मी तुझी सर्व कृत्ये जाहीर करावी.” (स्तोत्र ७३:२८) हे तुमच्या कुटुंबाला मोशेसारखे होण्यास मदत करील ज्याने यहोवा देवाला, म्हणजेच “जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा . . . धीर धरला.”—इब्री लोकांस ११:२७.
वाचन आणि ख्रिस्ती सेवा
२०, २१. आपल्या प्रचाराच्या कामगिरीचा संबंध वाचण्याच्या क्षमतेशी कसा आहे?
२० “अदृश्य” असलेल्याची उपासना करण्याच्या आपल्या इच्छेने आपल्याला, चांगले वाचक होण्याचा प्रयत्न करण्यास प्रवृत्त केले पाहिजे. अस्खलितपणे वाचता आल्याने देवाच्या वचनातून साक्ष देण्यास आपल्याला मदत होते. ते आपल्याला, येशूने त्याच्या अनुयायांना ज्याची आज्ञा दिली होती त्या राज्य प्रचाराचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी निश्चित्तच मदत करते; तो म्हणाला होता: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.” (मत्तय २८:१९, २०; प्रेषितांची कृत्ये १:८) साक्ष देणे, हे यहोवाच्या साक्षीदारांचे प्रमुख कार्य आहे आणि वाचण्याची क्षमता आपल्याला हे कार्य साध्य करण्यास मदत करते.
२१ चांगला वाचक आणि देवाच्या वचनाचा कुशल शिक्षक होण्यासाठी परिश्रमाची गरज आहे. (इफिसकर ६:१७) यास्तव, “सत्याचे वचन नीट सांगणारा, . . . देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके” करा. (२ तीमथ्य २:१५) वाचनात स्वतःला निमग्न करून शास्त्रवचनीय सत्याच्या ज्ञानास व यहोवाचे साक्षीदार या नात्याने तुमच्या क्षमतेस वाढवा.
तुमची काय उत्तरे आहेत
◻ आनंद, देवाचे वचन वाचण्यावर कसा अवलंबून आहे?
◻ बायबलमधून तुम्ही जे काही वाचता त्यावर मनन का करावे?
◻ शास्त्रवचनांचे वाचन करताना संबंध जोडण्याची आणि कल्पनाचित्र रेखाटण्याची काय गरज आहे?
◻ बायबल वाचनातून कोणते काही धडे शिकण्यासारखे आहेत?
◻ कुटुंब या नात्याने मोठ्याने बायबल का वाचावे आणि वाचनाचा ख्रिस्ती सेवेशी काय संबंध आहे?
[१३ पानांवरील चित्रं]
कुटुंब या नात्याने बायबल वाचताना, अहवालांचे कल्पनाचित्र रेखाटा आणि त्यांच्या महत्त्वावर मनन करा