खरी सुरक्षितता एक फसवे उद्दिष्ट
आर्नल्ड या लहान मुलाला त्याच्या खेळण्यांतला वाघ अतिशय प्रिय होता. तो जेथे जेथे जाई, तेथे तेथे त्या वाघालाही नेई—खेळायला जाताना, जेवणाच्या टेबलावर, अगदी अंथरुणातसुद्धा. तो वाघ जणू त्याला दिलासा, सुरक्षितता देत असे. एके दिवशी वाघ हरवला तेव्हा केवढी पंचाईत झाली!
आर्नल्ड रडत होता व तिकडे त्याच्या आईबाबांनी आणि तीन थोरल्या भावांनी वाघ शोधण्यासाठी त्यांचे मोठे घर पालथे घातले. त्यांच्यापैकी एकास शेवटी तो टेबलाच्या एका कप्प्यात सापडला. साहजिकच आर्नल्डनेच तो तेथे ठेवला होता व नंतर तो कोठे ठेवला होता हे लगेच विसरूनही गेला. असो, त्याला वाघ परत करण्यात आला व त्याने एकदाचे रडणे थांबवले. त्याला पुन्हा एकदा आनंदी व सुरक्षित वाटू लागले.
खेळण्यांतला वाघ टेबलाच्या कप्प्यात सापडण्याइतक्या सहजसोप्यारितीने सर्वच समस्या सोडवता आल्या तर केवढे बरे होईल! तथापि, अनेक लोकांसाठी सुरक्षिततेचे प्रश्न यापेक्षा कितीतरी अधिक गंभीर व गुंतागुंतीचे आहेत. जवळजवळ सर्वच ठिकाणी लोक विचार करतात, ‘मी गुन्हेगारी किंवा हिंसेला तर बळी पडणार नाही? माझी नोकरी जाण्याचा धोका आहे का? माझ्या कुटुंबाला पुरेसे अन्न मिळेल याची खात्री आहे का? माझ्या धार्मिक किंवा जातीय पार्श्वभूमीमुळे इतर लोक मला टाळणार तर नाहीत ना?’
अत्याधिक लोकांना सुरक्षिततेची उणीव भासते. संयुक्त राष्ट्र संघानुसार, जवळजवळ तीन अरब लोकांना सामान्य रोगांवरील उपचारच नव्हे तर अत्यावश्यक औषधे देखील उपलब्ध नाहीत. एक अरबपेक्षा अधिक जण भयंकर दारिद्र्यात आयुष्य कंठतात. जवळजवळ एक अरब लोक काम करण्यास समर्थ असूनही त्यांच्याकडे मिळकत देऊ शकेल असे पुरेसे काम नाही. निर्वासितांची संख्या वाढत चालली आहे. जगातील दर ११५ लोकांपैकी जवळजवळ एकाला, १९९४ च्या शेवटापर्यंत, स्वतःचे घर सोडून पळ काढणे भाग पडले होते. अपराधाच्या व हिंसेच्या अगणित कृत्यांचा जनक, अर्थात प्रतीवर्षी ५०० अरब डॉलरची उलाढाल असलेला नार्कोटिकचा व्यापार, कोट्यवधी जीवनांना उद्ध्वस्त करतो. युद्ध देखील अगणित लोकांचे जीवन उजाड करते. १९९३ सालीच, ४२ राष्ट्रे मोठमोठ्या संघर्षांत सामील झाली तर दुसरीकडे पाहता, ३७ इतर राष्ट्रांनी राजनैतिक हिंसा अनुभवली.
युद्ध, दारिद्र्य, हिंसा व मानवी सुरक्षिततेला धोका उत्पन्न करणारी इतर कारणे एकमेकांशी संबंधित आहेत आणि त्यांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. अशा समस्यांवर, टेबलाच्या कप्प्यात वाघ सापडण्याइतके सोपे तोडगे नाहीत. खरे पाहता मानव त्या सोडवणारच नाहीत.
देवाचे वचन बायबल आपल्याला इशारा देते, “अधिपतींवर भरवसा ठेवू नका; मनुष्यावर भरवसा ठेवू नका; त्याच्याकडून साहाय्य मिळणे शक्य नाही.” मग आपण कोणावर भरवसा ठेवू शकतो? हेच वचन पुढे म्हणते: “ज्याच्या साहाय्याकरिता याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर [यहोवा, NW] ह्यावर आहे, तो धन्य. त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्वकाही निर्माण केले.”—स्तोत्रसंहिता १४६:३-६.
या पृथ्वीवर सुरक्षितता आणण्यासाठी आपण यहोवावर भरवसा का ठेवू शकतो? सद्य परिस्थितीत सुरक्षित, आनंदी जीवनाचा उपभोग घेणे शक्य आहे का? मानवी सुरक्षिततेला अडखळण असलेल्या गोष्टी देव कशाप्रकारे नाहीशा करील?