तुम्हाला दिसत असणाऱ्या गोष्टींपलीकडे पहा!
उत्तम शारीरिक दृष्टी एक आशीर्वाद आहे. वस्तुतः पुष्कळ लोक, त्यांची मालकी असणाऱ्या थोडक्याच वस्तू दृष्टिपेक्षा बहुमूल्य आहेत, असे म्हणतील. तथापि ख्रिश्चनांसाठी, प्रेषित पौलाने सांगितल्याप्रमाणे, उत्तम शारीरिक दृष्टिपेक्षाही अति मोलवान प्रकारची एक दृष्टी आहे. “आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो,” असे पौलाने लिहिले. (२ करिंथकर ४:१८) खरोखर, अदृश्य गोष्टी पाहण्यास एखाद्याला मदत करणारी ही अत्यंत विशिष्ट प्रकारची दृष्टी असावी! आपण तिला आध्यात्मिक प्रकारची २०/२० दृष्टी म्हणू या.
गरज का आहे?
पहिल्या शतकातील ख्रिश्चनांना, अशा प्रकारची आध्यात्मिक दृष्टी असणे अत्यावश्यक होते. अत्यंत कठीण परिस्थितीत ते आपली ख्रिस्ती सेवा पूर्ण करत होते. त्याविषयी पौलाने अशाप्रकारे व्यक्त केले: “आम्हावर चोहोंकडून संकटे आली तरी आमचा कोंडमारा झाला नाही; आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही; आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही; आम्ही खाली पडलेले आहो तरी आमचा नाश झाला नाही.”—२ करिंथकर ४:८, ९.
अशी परिस्थिती असतानाही, विश्वासू शिष्य खंबीरपणे उभे होते. देवावरील बळकट विश्वासामुळे, ते पौलाप्रमाणे असे म्हणू शकले: “आम्ही धैर्य सोडीत नाही; परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसानुदिवस नवा होत आहे.” तथापि, हे नित्याचे नूतनीकरण, कशामुळे उदयास आले बरे? पौल पुढे म्हणाला: “कारण आम्हावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आम्हासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करिते; आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो; कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत.”—२ करिंथकर ४:१६-१८.
पौल त्याच्या आध्यात्मिक बंधूंना असे उत्तेजन देत होता, की समस्या, अडचणी, छळ—कोणत्याही प्रकारच्या संकटांनी—जे वैभवशाली बक्षीस त्यांच्या समोर राखून ठेवले होते, त्यावरील त्यांची दृष्टी अंधूक होऊ नये. त्यांनी त्यांच्या विद्यमान परिस्थितींच्या पलीकडे पहावे व ख्रिस्ती मार्गाचे अनुसरण केल्यामुळे उद्भवणाऱ्या आनंदी परिणामावर आपले नेत्र ठेवावे. यामुळे, प्रतिदिवशी संग्रामात पुढे सरसावत राहण्याच्या त्यांच्या संकल्पाचे नूतनीकरण करण्यास त्यांना मदत मिळाली. आजच्या ख्रिश्चनांना, अशा प्रकारची उत्तम आध्यात्मिक दृष्टी असणे तितक्याच गरजेचे आहे.
विद्यमान संकटे क्षणभंगुर आहेत, असा दृष्टिकोन बाळगा!
अपरिहार्यपणे, आपल्याला पाहण्याची इच्छा नसते, अशा गोष्टी आपण दररोज पाहत असतो. आरशात एक क्षणिक नजर टाकताच, शारीरिक अपूर्णतेस निर्देश करणारे, आपल्या पार्थिव देहावरचे अनिष्ट डाग आणि दोष, पाहिल्यावाचून आपण राहत नाही. आपण देव वचनाच्या आरशात निरीक्षण करतो तेव्हा आपण आपल्यातली व इतरांमधली आध्यात्मिक वैगुण्ये व दोष पाहतो. (याकोब १:२२-२५) दैनिक वर्तमानपत्र व दूरचित्रवाणीच्या पडद्यावर आपण नजर टाकतो तेव्हा, अन्याय, क्रूरता आणि अनर्थ यांचे अहवाल आपल्या हृदयाच्या उत्कट भावनांचा उद्रेक करून आम्हाला उद्विग्न करतात.
आपण पाहत असणाऱ्या गोष्टींमुळे, आपला आशाभंग व्हावा किंवा परावृत्त होऊन आपण विश्वासात हेलकावे खावे असे सैतानाला वाटत असते. आपण, असे घडण्याचे कसे टाळू शकतो? येशूने घालून दिलेल्या उदाहरणाचे आपण अनुसरण करण्यास हवे, ज्याविषयी पेत्राने असा सल्ला दिला: “कारण ह्याचकरिता तुम्हास पाचारण करण्यात आले आहे; कारण ख्रिस्तानेहि तुम्हासाठी दुःख भोगले आणि तेणेकरून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हाकरिता कित्ता घालून दिला आहे.” (१ पेत्र २:२१) ख्रिस्ती जीवनाक्रमाच्या प्रत्येक पैलूत, येशू एक परिपूर्ण असे उदाहरण होता.
आपला आदर्श या नात्याने येशूकडे अंगुलिनिर्देशीत करताना, त्याने दुःख सोसले असे पेत्राने प्रामुख्याने उल्लेखिले. खरोखर, पृथ्वीवर असताना येशूने खूप दुःख सहन केले. मानवजातीच्या उत्पत्तिच्या वेळी हजर असलेला, यहोवाचा “कुशल कारागीर” या नात्याने त्याला, मानवाने कसे असावे, या देवाच्या उद्देशाबद्दल अगदी यथायोग्यपणे माहीत होते. (नीतिसूत्रे ८:३०, ३१) परंतु, पाप आणि अपरिपूर्णतेमुळे त्यांच्यावर आता काय गुदरले होते, हे त्याने प्रत्यक्ष पाहिले होते. प्रतिदिवशी तो पाहत होता व लोकांची अपरिपूर्णता व त्यांच्या कमकुवतपणाचा सामना त्याला करावा लागत असे. त्याच्यासाठी ते नक्कीच संकटमय असावे.—मत्तय ९:३६; मार्क ६:३४.
इतरांव्यतिरिक्त, येशूने स्वतःही संकटांचा अनुभव घेतला होता. (इब्री ५:७, ८) परंतु, परिपूर्ण आध्यात्मिक दृष्टी बाळगून, यांच्या पलीकडे त्याने आपली नजर टाकली व सचोटीच्या मार्गाचे अनुसरण केल्यामुळे, अमर जीवनाप्रत उंचावले जाण्याच्या बक्षिसाकडे त्याने पाहिले. मग मशीही राजा या नात्याने, पीडित मानवजातीला हिणकस अवस्थेतून काढून, यहोवाने तिच्यासाठी मुलतः उद्देशिलेल्या परिपूर्णतेप्रत तिला पुन्हा उंचावण्याचा विशेष हक्क त्याला प्राप्त झाला असता. या भविष्यातील अदृश्य आशेवर आपली नजर केंद्रित केल्यामुळे, वारंवार अनुभवण्यास येणाऱ्या संकटांमध्ये देखील, येशूने ईश्वरी सेवेतील आपला आनंद टिकवून ठेवला. पौलाने नंतर लिहिले: “जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.”—इब्री १२:२.
येशूने केव्हाही संकटमय परिस्थितींना, त्याला आशाहीन होण्यास, परावृत्त होण्यास व विश्वासात हेलकावे खाण्यास वाव दिला नाही. त्याचे शिष्य या नात्याने, त्याच्या उत्कृष्ट उदाहरणाचे आपण जवळून अनुकरण करण्यास हवे.—मत्तय १६:२४.
अदृश्य सार्वकालिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा!
येशूला ज्यामुळे सहन करण्यास मदत मिळाली, त्याविषयी बोलताना पौलाने आमच्यासाठी देखील एक मार्ग दर्शविला आहे, त्याने लिहिले: “आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे; आपण आपल्या विश्वासाचा अग्रेसर व पूर्तता करणारा येशू याच्यावर आपले नेत्र स्थिरपणे लावावेत.” (इब्री १२:१, २, सुबोध भाषांतर) होय, ख्रिस्ती मार्गावरून यशस्वीरित्या व आनंदाने धावण्यास, अगदी समोर दिसणाऱ्या गोष्टींच्या पलीकडे पाहण्यास हवे. परंतु, ‘नेत्र स्थिरपणे लावून’ आपण येशूकडे कसे पाहू शकतो व त्यामुळे आम्हाला काय फायदा आहे?
एक गोष्ट म्हणजे, देवाच्या राज्याचा राजा या नात्याने, १९१४ मध्ये येशूला अधिकारपद देण्यात आले व तो स्वर्गातून राज्य करत आहे. अर्थात, या सगळ्या गोष्टी मात्र आपल्या शारीरिक नेत्रांस अदृश्य आहेत. तरीसुद्धा जर आपण आपले ‘नेत्र स्थिरपणे लावून’ येशूकडे पाहिले तर सद्य दुष्ट व्यवस्थीकरणाचा अंत व सैतान आणि त्याच्या टोळीस निष्क्रियतेच्या बंधनात हद्दपार करण्यासाठी, तो सुसज्ज झाला आहे, हे पाहण्यास आपली आध्यात्मिक दृष्टी आपल्याला मदत करील. यापुढेही आणखी पाहिल्यानंतर, आपली आध्यात्मिक दूरदृष्टी आपल्याला एक विस्मयकारक नवीन जग प्रकट करील, ज्यात “ह्यापुढे मरण नाही; ‘शोक, रडणे’ व कष्ट ही नाहीत; कारण ‘पहिल्या गोष्टी’ होऊन गेल्या.”—प्रकटीकरण १९:११-१६; २०:१-३; २१:४.
तर मग, दररोज सामना करावा लागणाऱ्या क्षणिक संकटांमुळे भारावून जाण्यापेक्षा, चिरकालिक गोष्टींवर आपली एकाग्रदृष्टी का केंद्रित करू नये? विश्वासरुपीचक्षूंनी, या प्रदूषित पृथ्वीवरील आजारपण आणि लोभ यांच्यापलीकडे दृष्टी टाकून, निरोगी, आनंदी व काळजी वाहणाऱ्या लोकांनी व्याप्त असणाऱ्या परादीसकडे का पाहू नये? आपल्या शारीरिक व आध्यात्मिक दोषांच्या पलीकडे अवलोकन करून, येशूच्या खंडणी बलिदानामुळे, त्यांपासून कायमचे मुक्त झालेल्या आपणा स्वतःकडे का पाहू नये? युद्ध, गुन्हे आणि हिंसा यांनी मागे सोडलेल्या भयंकर रक्तपाताच्या पलीकडे, यहोवाच्या शांतीत व नीतिमत्तेत शिकवल्या जाणाऱ्या नवपुनरुत्थित लोकांकडे का पाहू नये?
देवाचे राज्य अदृश्य असले तरी देवाच्या लोकांसाठी त्याने आधीच जे काय साध्य केले आहे: ऐक्यता, शाती, बंधूप्रेम आणि आध्यात्मिक समृद्धी, यांवर आपली आध्यात्मिक दृष्टी केंद्रित करणे, याचाही ‘नेत्र स्थिरपणे लावून’ येशूकडे पाहण्यात समावेश होतो. ईश्वरी शिक्षणामुळे एकत्रित होणे, (इंग्रजी) हा व्हिडियो पाहिल्यानंतर, जर्मनीमधील एका ख्रिस्ती स्त्रीने असे लिहिले: “हा व्हिडियो मला हे ध्यानात ठेवण्यास मदत करील, की सबंध जगभरातील कित्येक ख्रिस्ती बंधू आणि भगिनी—सार्वजनिक प्रतिकार असतानाही, या क्षणाला देखील निष्ठावंतपणे यहोवाची सेवा करत आहेत. हिंसा आणि द्वेष असलेल्या जगात बांधवांमधले आपले ऐक्य किती मौल्यवान आहे!”
तुम्ही यहोवा, येशू, विश्वासू देवदूत आणि लाखो सहख्रिश्चनांना तुमच्या बाजूने उभे असल्याचे “पाहता” का? असे असल्यास, निराशेमुळे तुमची गतिशून्य अशी अवस्था करू शकतील आणि ख्रिस्ती सेवेत तुम्हाला “निष्फळ” करण्यास कारणीभूत होतील अशा ‘संसाराच्या चिंतांविषयी’ तुम्ही वाजवीपेक्षा जास्त चिंतातुर होणार नाही. (मत्तय १३:२२) म्हणून, आपले आध्यात्मिक नेत्र देवाच्या स्थापित झालेल्या राज्याकडे व त्या राज्याच्या विद्यमान आणि भविष्यातील आशीर्वादांकडे, ‘स्थिरपणे लावून’ पहा.
जे अदृश्य आहे ते पाहण्यासाठी जगा!
देवाचे सार्वकालिक नवे जग व हळूवारपणे नाश होणारे सध्याचे जुने जग, यांच्यातील पृथक भिन्नता पाहून, आपल्याला अशा प्रकारे वर्तण्यास प्रवृत्त करावे, की ज्या गोष्टी केवळ विश्वासाच्या चक्षूंनीच आपण पाहू शकतो, त्या प्रत्यक्ष पाहण्याकरता जगण्यास आपण लायक असे गणले जाऊ. पुनरुत्थित झालेले बहूविध जण, त्यांच्या मृत्यू आधीच्या जगापेक्षा कितीतरी भिन्न असलेली एक नीतीमान परादीस असणारी पृथ्वी पाहण्याकरता उठतील, तेव्हा यावर विश्वास ठेवणे त्यांना नक्कीच कठीण जाईल. त्यांचे स्वागत करण्यासाठी व देवाने काय केले आहे, याचे स्पष्टीकरण देण्याकरता जिवंत राहण्याच्या त्या आपल्या आनंदाची कल्पना करा!—पडताळा योएल २:२१-२७.
होय, उत्तम आध्यात्मिक दृष्टी किती मौल्यवान आहे व ती तीक्ष्ण ठेवणे किती महत्त्वाचे आहे! नियमितपणे, व्यक्तिगत बायबल अभ्यासात व्यग्र राहिल्याने, ख्रिस्ती सभांना उपस्थित राहिल्याने, बायबलवर आधारित असणाऱ्या आपल्या आशेबद्दल इतरांबरोबर चर्चा केल्याने आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ईश्वरी मार्गदर्शनासाठी प्रार्थना करत राहिल्याने, आपण हे करू शकतो. असे केल्यास आपली आध्यात्मिक दृष्टी तीक्ष्ण व स्पष्ट ठेवून, दिसणाऱ्या गोष्टींच्या पलीकडे पाहण्यास आपल्याला मदत मिळेल!