पोर्तुगालमध्ये बायबल सत्याचा प्रसार करणे
उत्तरेकडील कॉमेनियापासून दक्षिणेकडील व्हिला रिअल दे सँन्टो अँटोनिओ, या पोर्तुगालच्या अटलांटिक किनारपट्टीच्या ८०० किलोमीटरच्या क्षेत्रात मासेमारी करणाऱ्या हजारो रंगीबेरंगी बोटी ठिपक्यांप्रमाणे विखुरलेल्या आहेत. अनेक शतकांपासून कोळी ‘त्यांच्या गलबतांत बसून समुद्रात’ गेले आहेत, अनेक पोर्तुगीजांना ते प्रमुख अन्नाचा अर्थातच मासळीचा पुरवठा करीत आहेत.—स्तोत्र १०७:२३.
मागील ७० वर्षांपासून पोर्तुगालमध्ये एका निराळ्या प्रकारची मासेमारी होत राहिली आहे. लाक्षणिक मासे असणाऱ्या हजारो लोकांप्रत सुवार्ता पोहंचविण्यात यहोवाचे साक्षीदार व्यस्त आहेत. (मत्तय ४:१९) मे १९९५ मध्ये राज्य प्रचारकांचा उच्चांक ४४,६५० होता—प्रमाण २१० जणांसाठी १ साक्षीदार. काही शहरांमध्ये हे प्रमाण निम्मे आहे.
अनेक साक्षीदारांमुळे कित्येक ठिकाणांतील साक्ष द्यावयाच्या क्षेत्रांना प्रत्येक सप्ताहास किंवा तेवढ्या काळात उरकले जाते. यास्तव पोर्तुगालमधील साक्षीदार त्यांच्याकडे असणाऱ्या बायबलच्या आशेची सहभागिता इतरांसह करण्यासाठी लोकांशी वेगवेगळ्या प्रकारे संपर्क साधण्यात अगदी तत्पर आहेत. होय, संभाव्य प्रत्येक संधीला बायबल सत्य कळविण्याच्या महत्त्वाची ते गुणग्राहकता बाळगतात.—१ करिंथकर ९:२०-२३.
धार्मिक कल असणाऱ्यांना साहाय्य करणे
सन १९९१ च्या खानेसुमारीनुसार, पोर्तुगालमधील १८ किंवा त्यापेक्षा वयाने जास्त असणारे ७० टक्के लोक रोमन कॅथलिक असल्याचे मान्य करतात. असे असूनही, लोकांमधील बायबलच्या ज्ञानाची पातळी रसातळाला गेलेली आहे. जर्नल डे नोटीसायस या वृत्तपत्राने टिपणी केली: “कॅथलिक जगाची ही फार मोठी शोकांतिका आहे: बायबलबद्दलचे अज्ञान!” हे असे का आहे? पोर्तुगीज वृत्तपत्र एक्सप्रेसो याचे उत्तर देते. फातिमा येथील ५०० पाळकांच्या सभेचा अहवाल देऊन, वृत्तपत्र म्हणते: “धार्मिक अधिकाऱ्यानुसार, पाळकाने अनंत अनावश्यक कार्यहालचालींपासून स्वतःस वेगळे करणे गरजेचे आहे, जेणेकरून त्याला ‘निरोप्या’ या नात्याने स्वतःच्या स्थानास पुनःस्थापित करता येईल. . . . पाळकाने शुभवर्तमानाचा प्रचार मनःपूर्वक केल्यास, त्याला इतर कार्यांसाठी सवड उरणार नाही.”
उलटपक्षी, पोर्तुगालमधील यहोवाचे साक्षीदार संभाव्य प्रत्येक मार्गाने बायबल सत्य कळविण्यात व्यस्त आहेत. परिणामी, अनेक प्रांजळ कॅथलिक लोकांना बायबलचे ज्ञान मिळत आहे.
कॉर्लोटा, धर्मपरायण कॅथलिक आणि धार्मिक समाजातील युवक गटाची सदस्य होती. ती बालवाडीमध्ये शिक्षिका देखील होती आणि तेथे अँटोनिओ हा साक्षीदार कामास होता. नियमित पायनियर किंवा पूर्ण-वेळेचा सेवक असल्यामुळे, दुपारच्या जेवणाच्या सुटीत अँटोनिओ त्याच्या सहकर्मचाऱ्यांशी बायबलविषयी बोलण्याचा नेहमी प्रयत्न करीत असे. एके दिवशी, कॉर्लोटाने त्याच्याकडे नरकाग्नी आणि मेरीची उपासना यांविषयी विचारणा केली. या विषयांबद्दल बायबल काय सांगते हे अँटोनिओने तिला दाखविले आणि अनेक बायबल चर्च्यांचा तो एक प्रारंभ होता. कॉर्लोटा स्थानिक राज्य सभागृहामध्ये पहिल्यांदा सभेला उपस्थित राहिली, तेव्हा ती फारच प्रभावित झाली. तथापि, सभांची आणि ती ज्या धार्मिक समाजाची सदस्य होती त्या सभांची वेळ देखील एकच होती. निर्णय घ्यावा लागणार, याची तिला जाणीव झाली. ती आता काय करणार होती?
कॉर्लोटाने संपूर्ण युवक गटाला एकत्रित केले आणि ती राजीनामा का देत आहे, याचे बायबलमधून स्पष्टीकरण केले. स्टेला नामक एक तरुण मुलगी तिचे काळजीपूर्वक ऐकत होती, तिच्याखेरीज बाकी सर्वांनी तिच्या निर्णयावर टीका केली. नंतर कॉर्लोटा स्टेलाबरोबर बोलली, तेव्हा तिने जीवनाचा स्रोत आणि उद्देश यांविषयी अनेक प्रश्न विचारले. कॉर्लोटाने, जीवन—येथे कसे आले? उत्क्रांतीवादाने अथवा निर्मितीनेa (इंग्रजी), हे पुस्तक तिला दिले आणि तिच्यासोबत बायबल अभ्यास करण्यास सुरवात केली.
तोपर्यंत कॉर्लोटाने उत्तम प्रगती करून जून १९९१ मध्ये बाप्तिस्मा घेतला आणि सहा महिन्यांनंतर नियमित पायनियर म्हणून सेवा करण्यास सुरवात केली. मे १९९२ मध्ये ती आणि अँटोनिओ विवाहबद्ध झाले, अधिक निकड असणाऱ्या शेजारच्या मंडळीमध्ये ते अद्यापही एकत्र मिळून पायनियर सेवा करीत आहेत. स्टेलाबद्दल काय? मे १९९३ मध्ये तिचा बाप्तिस्मा झाला आणि सध्या ती नियमित पायनियर या नात्याने सेवा करीत आहे.
युवा फ्रान्सिस्को फारच धार्मिक होता. प्रत्येक रविवारी तो सकाळी माससाठी आणि दुपारी माळ जपण्यासाठी उपस्थित राहत असे. तो चर्चमध्ये सहाय्यक होता, मास होत असताना तो पाळकाला मदत करीत असे. एके दिवशी आपण “संत” व्हावे, अशी देखील प्रार्थना त्याने देवाला केली होती!
स्वतःजवळ बायबल असावे, असे फ्रान्सिस्कोला मनःपूर्वक वाटत होते आणि एके दिवशी त्याच्या मित्राने त्याला ते दिले. यहोवा, हे देवाचे नाव आहे हे समजल्यानंतर त्याला नवल वाटले. (निर्गम ६:३; स्तोत्र ८३:१८) उपासनेतील मूर्तींच्या वापराचा देव निषेध करतो, हे त्याने निर्गम २०:४, ५ येथे वाचल्यानंतर तो आणखीच आश्चर्यचकित झाला. चर्च मूर्तींनी पूर्णपणे भरलेले पाहिल्यानंतर, या संभ्रमाचे आकलन व्हावे म्हणून त्याने देवाला कळकळीने प्रार्थना केली. कित्येक दिवसांनंतर त्याची माजी शाळासोबत्याबरोबर गाठ पडली, तेव्हा तू रात्रीची शाळा का सोडली होती, असे फ्रान्सिस्कोने त्याला विचारले.
“सध्या मी अधिक चांगल्या रात्रीच्या शाळेत उपस्थित राहत आहे,” त्याच्या मित्राने प्रत्युत्तर दिले.
“ती कोणती शाळा आहे आणि तू कशाचा अभ्यास करीत आहेस?” फ्रान्सिस्कोने विचारले. मित्राच्या उत्तराने तो पूर्णपणे विस्मित झाला.
“यहोवाच्या साक्षीदारांच्या सभागृहामध्ये मी बायबलचा अभ्यास करीत आहे,” मित्राने त्याला सांगितले. “तुला माझ्यासोबत येण्यास आवडेल का?”
फ्रान्सिस्कोने पहिल्या सभेत जे पाहिले त्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता—आनंदी, स्मितहास्य करणारे चेहरे; सस्नेह आणि मित्रत्वाच्या शिष्टाचाराने लोक एकमेकांशी बोलत होते; मुले आपल्या पालकांसोबत बसून जे काही सांगितले जात होते त्याकडे लक्ष देत होती.
“मी या ठिकाणी पूर्णपणे अपरिचित होतो आणि तरी त्या कुटुंबाचा एक भाग असल्यासारखे मला वाटत होते!” फ्रान्सिस्को उद्गारला. तेव्हापासून तो सभांना नियमितपणे उपस्थित राहिला आहे. आता फ्रान्सिस्को मंडळीमध्ये वडील या नात्याने सेवा करीत आहे आणि त्याच्यासोबत त्याची पत्नी व दोन मुले देखील आहेत; देवाच्या वचनातील भव्य राज्य अभिवचनांमुळे तो आनंदित आहे.
नातेवाईकांसोबत सत्याची सहभागिता करणे
मॅन्वेले, लिस्बॉन येथील एक नियमित पायनियर आहे, नातेवाईकांसहित सर्वांना प्रेमळपणे साक्ष देण्याच्या तिच्या अथक प्रयत्नांमुळे तिने मोठ्या प्रमाणात आध्यात्मिक मासेमारी केली आहे. यांमध्ये, जॉज एद्वर्डो हा तिचा सख्खा भाऊ देखील होता ज्याने कराटेचे आणि शस्त्रांचा वापर करण्याचे प्रशिक्षण घेतले होते. त्याने कित्येकवेळा कायद्याचा भंग केला होता; अखेरीस त्यावर २२ आरोप ठेवून त्याला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. तो फारच हिंसात्मक असल्यामुळे त्याच्या सोबतच्या कैद्यांना देखील त्याची धास्ती वाटत होती, परिणामी त्याला अति-सुरक्षा कोठडीमध्ये ठेवण्यात आले होते.
मॅन्वेलेने, जॉज एद्वर्डोला सात वर्षे सहनशीलतेने भेट दिली, परंतु त्याने तिच्या बायबल संदेशाचा नेहमीच अव्हेर केला. अखेरीस, जीवन—येथे कसे आले? उत्क्रांतीने अथवा निर्मितीने? हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर त्याचा त्याने स्वीकार केला आणि बायबल अभ्यास सुरू करण्यात आला. त्यानंतर लगेचच त्याने स्वतःच्या वर्तनामध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल केले. त्याने, एका सप्ताहानंतर २०० कैद्यांना, तर पुढील आठवड्यात आणखी ६०० जणांना व्यक्तिगत साक्ष दिली. तुरुंगात त्याच्या सोबत असणाऱ्या कैद्यांना भेट देता यावी म्हणून तुरुंगातील इतर कोठडींमध्ये जाण्याची देखील त्याला अनुमती मिळाली. वर्तणुकीतील लक्षणीय परिवर्तनामुळे त्याची शिक्षा १५ वर्षांपर्यंत कमी करण्यात आली. चांगल्या वर्तणुकीमुळे १० वर्षांनंतर त्याची परिवीक्षेवर सुटका करण्यात आली. तेव्हापासून आता पाच वर्षे उलटून गेली आहेत आणि जॉज एद्वर्डो यहोवाचा बाप्तिस्माप्रात साक्षीदार असून स्थानिक मंडळीमध्ये सेवा-सेवक या नात्याने काम करीत आहे. खरोखरच, ‘लांडगा कोकऱ्याजवळ राहील’ अशा प्रकारचीच ही गोष्ट आहे!—यशया ११:६.
मॅन्वेलेने स्वतःच्या कुटुंबाला साक्ष देण्यासाठी निरंतर प्रयत्न केला, त्यामुळे तिच्या पतीला आणि स्वतःच्या कुटुंबाच्या इतर चार सदस्यांना यहोवाच्या सेवेमध्ये सक्रियपणे भाग घेण्यात तिला आनंद प्राप्त झाला आहे. तिचा पती आता सेवा-सेवक आहे.
“मी त्यांना लाथाबुक्यांनी बाहेर काढीन”
यहोवाच्या साक्षीदारांनी मारिया दो कारमो हिला भेट दिली, तेव्हा ती लिब्सन उपनगरात राहत होती. तिने जे ऐकले ते तिला आवडले आणि तिने तिचा पती अँटोनिओ याकडे घरी बायबल अभ्यास सुरू करण्याची परवानगी मागितली. “त्याचा विचार देखील करू नको!” त्याने प्रत्युत्तर दिले. “मला यहोवाचे साक्षीदार आपल्या घरात दिसले तर मी त्यांना लाथाबुक्यांनी बाहेर काढीन.” अँटोनिओ, आनुषंगिकपणे, कराटे मार्गदर्शक असून त्याने थर्ड-डीग्री ब्लॅक बेल्ट देखील मिळविला होता. म्हणून मारिया दो कारमो हिने बायबल अभ्यास इतरत्र करण्याचे ठरविले.
पुढे, अँटोनिओला कराटेच्या आठ दिवसांच्या कोर्ससाठी इंग्लंडला जावे लागणार होते तेव्हा मारिया दो कारमोने त्याच्या सूटकेसमध्ये बायबल कथांचं माझं पुस्तक (इंग्रजी) हे प्रकाशन काळजीपूर्वक ठेवून दिले.b अँटोनिओला त्याच्या दौऱ्यामध्ये पुष्कळ वेळ होता त्यामुळे त्याने ते पुस्तक वाचून काढले. विमानाने घरी परत येत असताना विमानाला वादळाचा जोराचा तडाखा बसला त्यामुळे त्यास जमिनीवर उतरविण्यास त्रास झाला. अँटोनिओने त्याच्या जीवनात पहिल्यांदाच यहोवाला प्रार्थना केली.
अँटोनिओ घरी पोहंचल्यानंतर, त्याच्या पत्नीसोबत अभ्यास घेणाऱ्या साक्षीदाराने त्यास सभेसाठी आमंत्रित केले. त्याने त्याचा स्वीकार केला आणि प्रत्येक जण फारच मैत्रिपूर्ण असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. बायबल अभ्यासासाठी योजना करण्यात आल्या आणि स्वतःस काही निर्णय घ्यावा लागणार, याची अँटोनिओला थोड्याच कालावधीत जाणीव झाली. त्याचा परिणाम असा झाला, की त्याने त्याच्या विद्यार्थ्यांना कराटे शिकविण्याचे थांबविले तसेच आता आणि सर्वकाळासाठी शांतीमय जीवन कसे जगावे, हे शिकविण्यास त्याने सुरवात केली. त्यांपैकी एक जण ज्याने देखील ब्लॅक बेल्ट मिळविला होता, आता बाप्तिस्माप्राप्त ख्रिस्ती आहे.
एप्रिल १९९१ मध्ये अँटोनिओचा बाप्तिस्मा झाला. बाप्तिस्माच्या दुसऱ्याच दिवशी त्याने साहाय्यक पायनियर म्हणून सेवा करण्यास प्रारंभ केला. सहा महिन्यांनंतर त्याने नियमित पायनियर या नात्याने सेवा करण्यास सुरवात केली आणि लवकरच तो १२ गृह बायबल अभ्यास संचालित करीत होता. जुलै १९९३ मध्ये मंडळीमध्ये त्याला सेवा-सेवक म्हणून नियुक्त करण्यात आले.
वारंवार उरकले जाणारे क्षेत्र
या देशातील अनेक भागांमधील क्षेत्र प्रत्येक सप्ताहाला किंवा तेवढ्या काळात उरकले जाते. साक्षीदार त्यांच्या ‘मासेमारीच्या’ कार्यांना फलदायकपणे कसे पार पाडतात?
झाँ, प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो. एका महिलेला भेट देत असता, घरात तिच्याखेरीज इतर कोणी राहत आहे का, अशी त्याने तिला विचारणी केली. तिने उत्तर दिले, की तिचा पती आणि दोन मुले तेथे राहतात, परंतु त्यांच्याशी संपर्क साधणे सोपे नाही कारण ते कामास जातात आणि केवळ संध्याकाळीच घरी असतात. म्हणून झाँने त्याचे प्रचार कार्य चालू ठेवून तो दुसऱ्या क्षेत्रात गेला. सुमारे दीड तासानंतर एक मनुष्य त्याला येऊन भेटला.
“तुम्हाला माझ्याशी बोलायचे आहे, असे तुम्ही म्हणालात,” त्या मनुष्याने झाँला म्हटले. “आपल्याला काय हवे आहे ते कृपया मला सांगा.”
“माफ करा, मी तुम्हाला ओळखत नाही,” झाँने प्रत्युत्तर दिले, नवल वाटून त्याने विचारले. “आपण कोण आहात?”
“मी अँटोनिओ आहे आणि या रस्त्याच्या त्या बाजूस राहतो. कुटुंबातील इतर सदस्यांशी तुम्हाला बोलायचे आहे, असे तुम्ही माझ्या आईला सांगितले होते, म्हणून तुम्हाला काय हवे आहे हे जाणून घेण्यासाठी मी येथे आलो आहे.”
झाँने त्याला सांगोपांग साक्ष दिली आणि त्याच्यासोबत बायबल अभ्यास सुरू केला. आठवड्यातून दोन वेळा अभ्यास घेता येईल का, असे अँटोनिओने दुसऱ्याच अभ्यासाच्या वेळी विचारले. काही महिन्यांतच तो झाँला येऊन मिळाला आणि त्याच रस्त्यावर सुवार्तेचा प्रचार करण्यास त्याने प्रारंभ केला. तीन महिन्यांनंतर त्याचा बाप्तिस्मा झाला. अलीकडे त्याच्या आईने सुद्धा बायबल अभ्यास करण्यास सुरवात केली. सेवाकार्यात घरातील सर्व सदस्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणे किती महत्त्वाचे आहे!
पोर्तुगालच्या पाण्यामध्ये अजूनही खूप आध्यात्मिक मासेमारी करणे बाकी आहे, हे अशा प्रकारचे उद्दीपित करणारे अनुभव दाखवून देतात. यहोवाने तेथील परिश्रमी साक्षीदारांना हजारो प्रगमनशील बायबल अभ्यासाद्वारे आशीर्वादित केले आहे. सर्व लोकांना बायबल सत्याची जाणीव देण्याकरता ते अधिकाधिक मार्ग शोधण्याचे चालू ठेवत असता, पौलाने फिलिप्पैमधील ख्रिश्चनांना दिलेल्या शब्दांची आज पोर्तुगालमध्ये पूर्णता होत आहे: “सर्व प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होते.”—फिलिप्पैकर १:१८.
[तळटीपा]
a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित.
b वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित.
[१५ पानांवरील नकाशा/चित्र]
(For fully formatted text, see bond publication)
स्पेन
पोर्तुगाल
[२४, २५ पानांवरील चित्रं]
पोर्तुगालमध्ये साक्षीदार बायबल सत्य कळविण्यासाठी प्रत्येक संधीचा फायदा घेतात