वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 १/१५ पृ. १५-२०
  • यहोवाच्या मेंढरांना प्रेमळ काळजीची आवश्‍यकता आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाच्या मेंढरांना प्रेमळ काळजीची आवश्‍यकता आहे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • कळपाचे स्वेच्छुक मेंढपाळ
  • नवोदितांना प्रचार करण्याची इच्छा असते तेव्हा
  • खास गरजा पूर्ण करणे
  • नवोदिताने चूक केल्यास
  • “प्रौढतेप्रत” जाण्यासाठी त्यांना मदत करा
  • देवाची भक्‍ती करण्यासाठी इतरांना मदत देणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • वडिलांनो, सर्वात महान मेंढपाळांचे अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • तुमच्या देखरेखीखाली असलेल्या देवाच्या कळपाचे पालन करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • वडीलांनों, तुमच्या मेंढपाळकत्वाच्या जबाबदाऱ्‍या गंभीरतेने पूर्ण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 १/१५ पृ. १५-२०

यहोवाच्या मेंढरांना प्रेमळ काळजीची आवश्‍यकता आहे

“परमेश्‍वर [यहोवा, NW] हाच देव आहे हे जाणा; . . . आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहो.”—स्तोत्र १००:३.

१. यहोवा त्याच्या सेवकांशी कसा व्यवहार करतो?

यहोवा महान मेंढपाळ आहे. आपण त्याचे सेवक आहोत तर तो आपल्याला त्याची मेंढरे समजतो व प्रेमळ काळजी घेतो. आपला स्वर्गीय पिता आपल्याला सांत्वन व तजेला देतो आणि ‘आपल्या नावासाठी आपल्याला नीतिमार्गांनी चालवितो.’ (स्तोत्र २३:१-४) उत्तम मेंढपाळ, येशू ख्रिस्त आपल्यावर इतकी प्रीती करतो की त्याने आपल्यासाठी प्राण अर्पण केला.—योहान १०:७-१५.

२. देवाचे लोक स्वतःला कोणत्या परिस्थितीत पाहतात?

२ प्रेमळ काळजीचे प्रापक या नात्याने आपणही स्तोत्रकर्त्यासोबत “हर्षाने परमेश्‍वराची सेवा करा; गीत गात त्याच्यापुढे या. परमेश्‍वर [यहोवा] हाच देव आहे हे जाणा; त्यानेच आम्हाला उत्पन्‍न केले; आम्ही त्याचेच आहो, आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणांतील कळप आहो,” असे म्हणू शकतो. (स्तोत्र १००:२, ३) होय, आपण आनंदी आणि सुरक्षित आहोत. आपण जणू काय दगडाच्या भक्कम भिंती असलेल्या मेंढवाड्यात दुष्ट लुटारूंपासून सुरक्षित होतो.—गणना ३२:१६; १ शमुवेल २४:३; सफन्या २:६.

कळपाचे स्वेच्छुक मेंढपाळ

३. नियुक्‍त खिस्ती वडील देवाच्या कळपाला कसे वागवतात?

३ म्हणूनच तर आपण देवाची मेंढरे या नात्याने आनंदी आहोत! नियुक्‍त वडील आपल्यामध्ये पुढाकार घेतात. ते आपल्यावर ‘अधिकार’ गाजवत नाहीत, प्रभुत्व चालवत नाहीत किंवा आपल्या विश्‍वासावर सत्ता गाजवत नाहीत. (गणना १६:१३; मत्तय २०:२५-२८; २ करिंथकर १:२४; इब्रीयांस १३:७) उलटपक्षी ते, “तुम्हांमधील देवाच्या कळपाचे पालन करा; करावे लागते म्हणून नव्हे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा; द्रव्यलोभाने नव्हे तर उत्सुकतेने करा; तुमच्या हाती सोपविलेल्या लोकांवर धनीपण करणारे असे नव्हे तर कळपाला कित्ते व्हा,” या प्रेषित पेत्राने दिलेल्या सल्ल्याचे अनुकरण करणारे प्रेमळ मेंढपाळ आहेत. (१ पेत्र ५:२, ३) प्रेषित पौलाने सहवडिलांना सांगितले: “तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हास अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या, ह्‍यासाठी की, देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्‍ताने स्वतःकरिता मिळविली तिचे पालन तुम्ही करावे.” तसेच पवित्र आत्म्याने नियुक्‍त झालेले हे पुरुष ‘कळपाला दयेने’ वागवतात म्हणून, मेंढरे त्यांचे किती आभार मानतात!—प्रेषितांची कृत्ये २०:२८-३०.

४. चार्ल्स टी. रस्सेल कळपाबरोबर कोणत्या प्रकारच्या नातेसंबंधासाठी विख्यात होते?

४ येशूने मंडळीला, यहोवाच्या कळपाला प्रेमाने वागवणारे “कोणी पाळक” किंवा मेंढपाळ देऊन “मानवांना देणग्या” दिल्या. (इफिसकर ४:८, ११) या मानवांपैकी एक वॉच टावर संस्थेचे पहिले अध्यक्ष चार्ल्स टी. रस्सेल हे होते. मुख्य मेंढपाळ येशू ख्रिस्त याच्या मार्गदर्शनाखाली कळपाचे पालन प्रेमळ आणि दयेच्या कार्यांनी करत असल्यामुळे त्यांना पाळक रस्सेल असे म्हटले जाई. आज, यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाकरवी ख्रिस्ती वडील नेमले जातात, व पदव्या म्हणून “पाळक,” “वडील” किंवा “शिक्षक” या सारख्या संज्ञा न वापरण्याविषयी सावधगिरी बाळगली जाते. (मत्तय २३:८-१२) तरीही, सध्याच्या दिवसांतील वडील, यहोवाच्या कुरणातील मेंढरांच्या लाभासाठी पाळकत्वाचे किंवा मेंढपाळकत्वाचे कार्य करतात.

५. नवोदितांनी ख्रिस्ती मंडळीतील नियुक्‍त वडिलांशी ओळख का करून घेतली पाहिजे?

५ मेंढपाळ या नात्याने, वडील जन नवोदितांच्या आध्यात्मिक प्रगतीत महत्त्वपूर्ण भाग पार पाडतात. यास्तव, सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे नवे पुस्तक पृष्ठ १६८ वर असे म्हणते: “मंडळीतील नियुक्‍त वडिलांची ओळख करून घ्या. देवाविषयीच्या ज्ञानाचा अवलंब करण्यामध्ये त्यांना खूप अनुभव आहे, कारण यांनी बायबलमध्ये पर्यवेक्षकांकरता ज्या गुणवत्ता दर्शवण्यात आल्या आहेत त्या संपादन केल्या आहेत. (१ तीमथ्य ३:१-७; तीतास १:५-९) देवाच्या गरजांच्या विरुद्ध असणारी एखादी सवय किंवा लक्षण काढून टाकण्यासाठी तुम्हाला आध्यात्मिक मदत हवी असल्यास त्यांच्याकडे जाण्यासाठी कचरू नका. वडील पौलाच्या या सूचनेचा अवलंब करीत असल्याचे तुम्हाला दिसेल: ‘जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या, अशक्‍तांना आधार द्या, सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा.’—१ थेस्सलनीकाकर २:७, ८; ५:१४.”

नवोदितांना प्रचार करण्याची इच्छा असते तेव्हा

६. एखाद्या बायबल विद्यार्थ्याला राज्य प्रचारक व्हावयाचे आहे तर कोणती पद्धत अनुसरली जाते?

६ एक बायबल विद्यार्थी, ज्ञान घेतल्यानंतर व काही काळापर्यंत सभांना उपस्थित राहिल्यानंतर राज्य प्रचारक, सुवार्तेचा प्रचारक होऊ इच्छित असेल. (मार्क १३:१०) असे आहे तर, त्याच्यासोबत बायबल अभ्यास घेणाऱ्‍याने अध्यक्षीय पर्यवेक्षकांची भेट घेतली पाहिजे. हे अध्यक्षीय पर्यवेक्षक, बायबल विद्यार्थी आणि त्याचा शिक्षक यांच्यासोबत एकत्र येण्यासाठी मंडळीतील सेवा समिती हाताळणारे वडील आणि आणखी एक अशा दोन वडिलांची व्यवस्था करतील. आपली सेवा पूर्ण करण्यासाठी संघटित या पुस्तकाच्या पृष्ठे ९८-९९ वर आधारित ही चर्चा असेल. ही नवीन व्यक्‍ती बायबलच्या मूलभूत शिकवणींवर विश्‍वास ठेवते आणि ती देवाच्या तत्त्वांनुरुप वागते तर ती जाहीर सेवेत भाग घेण्यास पात्र आहे असे तिला सांगण्यात येईल.a ती क्षेत्र सेवा अहवालात तिचा अहवाल देऊ लागेल तेव्हा तिच्या नावाचे बनवलेल्या मंडळीच्या प्रचारकांचे नोंद कार्ड यावर नोंदवले जाईल. तो नवोदित आता ‘देवाच्या वचनाची आनंदाने घोषणा’ करणाऱ्‍या इतर लाखोंसोबत त्याच्या साक्षकार्याचा अहवाल देऊ शकेल. (प्रेषितांची कृत्ये १३:५) तो बाप्तिस्मा न झालेला प्रचारक आहे अशी घोषणा मंडळीमध्ये केली जाईल.

७, ८. बाप्तिस्मा न घेतलेल्या प्रचारकाला सेवेमध्ये कशा प्रकारे आवश्‍यक ती मदत दिली जाऊ शकते?

७ बाप्तिस्मा न झालेल्या प्रचारकाला वडिलांच्या आणि इतर प्रौढ ख्रिश्‍चनांच्या मदतीची गरज असते. उदाहरणार्थ, तो ज्या पुस्तक अभ्यासाच्या गटाला उपस्थित राहतो त्या पुस्तक अभ्यास संचालकांना त्याच्या आध्यात्मिक प्रगतीत रस घ्यावा लागतो. नवीन प्रचारकाला घरोघरच्या कार्यामध्ये प्रभावीपणे बोलण्यास कठीण वाटत असेल. (प्रेषितांची कृत्ये २०:२०) तेव्हा नक्कीच ज्याने त्याच्यासोबत ज्ञान पुस्तकातून बायबल अभ्यास घेतला त्याच्याकडून विशेषतः तो बहुधा मदत स्वीकारु शकतो. अशा प्रकारची व्यावहारिक मदत उचित आहे कारण येशू ख्रिस्ताने सेवेसाठी त्याच्या शिष्यांना तयार केले.—मार्क ६:७-१३; लूक १०:१-२२.

८ आपली सेवा प्रभावशाली होण्यासाठी चांगल्याप्रकारे पूर्व तयारी आवश्‍यक आहे. यास्तव, ते दोन प्रचारक आमची राज्य सेवा याच्या मासिक अंकांमध्ये सुचवलेल्या प्रस्तावनांचा एकत्र बसून सराव करू शकतात. ते त्यांची क्षेत्र सेवा चालू करतात तेव्हा अधिक अनुभवी व्यक्‍ती पहिल्या किंवा दुसऱ्‍या घरी बोलू शकते. एका मैत्रिपूर्ण प्रस्तावनेनंतर, दोन्ही प्रचारक साक्ष देण्यात सहभाग घेऊ शकतात. काही आठवड्यांसाठी सेवेमध्ये एकत्र काम केल्याने उत्तम पुनर्भेटी मिळू शकतात आणि सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान पुस्तकातून एक गृह बायबल अभ्यास देखील मिळू शकतो. अधिक अनुभवी प्रचारक सुरवातीला काही काळासाठी अभ्यास चालवू शकतो आणि नंतर मग नवीन राज्य उद्‌घोषकाला तो सोपवू शकतो. त्या बायबल विद्यार्थ्याने देवाच्या ज्ञानाबद्दल गुणग्राहकता व्यक्‍त केल्यास दोन्ही प्रचारकांना केवढा आनंद होईल बरे!

९. एक प्रचारक बाप्तिस्मा घेऊ इच्छितो तेव्हा कोणत्या व्यवस्था केल्या जातात?

९ बाप्तिस्मा न झालेला प्रचारक आध्यात्मिकरीत्या प्रगती करतो तसे तो प्रार्थनेमध्ये कदाचित यहोवाला समर्पण करील व बाप्तिस्मा घेऊ इच्छिल. (पडताळा मार्क १:९-११.) बाप्तिस्मा घेण्याची त्याची इच्छा त्याने मंडळीच्या अध्यक्षीय पर्यवेक्षकांना सांगावी व ते प्रचारकासोबत आपली सेवा पूर्ण करण्यासाठी संघटित पुस्तकाच्या पृष्ठे १७५-२१८ वरील प्रश्‍नांची उजळणी घेण्यासाठी दोन वडिलांची व्यवस्था करतील. प्रश्‍नांचे केलेले चार भाग, शक्य असल्यास तीन सत्रांमध्ये तीन वेगवेगळे वडील पूर्ण करू शकतात. बाप्तिस्मा न झालेल्या प्रचारकाला बायबल शिकवणींची योग्य समज आहे व इतर मार्गांनी तो पात्र आहे असे त्यांनी मान्य केले तर त्याला बाप्तिस्मा दिला जाईल असे ते त्याला सांगतील. त्याच्या समर्पण आणि बाप्तिस्म्यामुळे तो तारणासाठी ‘चिन्हित’ होतो.—यहेज्केल ९:४-६.

खास गरजा पूर्ण करणे

१०. ज्ञान पुस्तकाचा अभ्यास संपल्यावर व बाप्तिस्मा घेतल्यानंतर एक व्यक्‍ती शास्त्रवचनाचे तिचे ज्ञान कशाप्रकारे वाढवू शकते?

१० एका व्यक्‍तीने ज्ञान पुस्तकातून बायबल अभ्यास पूर्ण केल्यानंतर व बाप्तिस्मा घेतल्यानंतर एकमेव खऱ्‍या देवाच्या उपासनेतील ऐक्य या सारख्या दुसऱ्‍या पुस्तकातून त्याचा औपचारिक अभ्यास घेण्याची आवश्‍यकता नाही.b अर्थात, नव्यानेच बाप्तिस्मा घेतलेला प्रचारक ख्रिस्ती सभांची तयारी करील व त्यांना उपस्थित राहील तशा पुष्कळशा गोष्टी शिकेल. सत्याबद्दलची त्याची तहान त्याला जसजसे ख्रिस्ती प्रकाशनांना व्यक्‍तिगतरीत्या वाचण्यास व त्यांचा अभ्यास करण्यास तसेच सहविश्‍वासूंसोबत शास्त्रवचनीय बाबींची चर्चा करण्यास प्रवृत्त करील तसतसे तो अधिकाधिक ज्ञान प्राप्त करील. पण खास आवश्‍यकता समोर आल्या तर काय?

११. (अ) प्रिस्किल्ला व अक्विल्ला यांनी अपुल्लोला कशाप्रकारे मदत केली? (ब) अलीकडेच बाप्तिस्मा घेतलेला व जो विवाह करू इच्छितो त्या तरुण प्रौढाला कोणती मदत दिली जाऊ शकते?

११ “शास्त्रपारंगत” आणि येशूविषयीच्या गोष्टी नीट शिकवलेला अपुल्लो याला देखील, अनुभवी प्रिस्किल्ला व अक्विल्ला यांनी “जवळ बोलावून घेतले व त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखविला” तेव्हा लाभ झाला. (प्रेषितांची कृत्ये १८:२४-२६; पडताळा प्रेषितांची कृत्ये १९:१-७.) यास्तव, समजा अलीकडेच बाप्तिस्मा घेतलेला तरुण प्रौढ प्रणयराधना व विवाह करू इच्छितो. जास्त अनुभवी असलेला ख्रिस्ती त्याला वॉच टावर प्रकाशनांमध्ये या विषयांवर माहिती मिळवण्यास मदत करू शकतो. उदाहरणार्थ, याविषयीचे मदतदायी साहित्य तरुण लोक विचारत असलेले प्रश्‍न—उपयोगी पडणारी उत्तरे (इंग्रजी), या पुस्तकाच्या ७ व्या विभागात दिले आहे.c ज्या प्रचारकाने त्याचा बायबल अभ्यास घेतला आहे तो कदाचित या नव्या व्यक्‍तीसोबत या विषयावर चर्चा करील, पण त्यामध्ये एक नियमित अभ्यास समाविष्ट नसेल.

१२. नवीनच बाप्तिस्मा घेतलेल्या विवाहित सोबत्यांना कोणत्याप्रकारे साहाय्य दिले जाऊ शकते?

१२ आणखी एका उदाहरणाचा विचार करा. कदाचित नव्याने बाप्तिस्मा घेतलेल्या विवाहित सोबत्यांना ईश्‍वरी तत्त्वे लागू करण्यात काही अडचणी असतील. ते कदाचित एखाद्या वडिलांशी विचारविनिमय करतील जे त्यांच्याबरोबर शास्त्रवचनांमधून चर्चा करण्यासाठी व वॉच टावर संस्थेच्या प्रकाशनांमध्ये मिळणारी माहिती दाखवण्यासाठी काही संध्याकाळ घालवतील. परंतु, वडील या जोडप्यासोबत पुन्हा एक नियमित बायबल अभ्यास चालू करणार नाहीत.

नवोदिताने चूक केल्यास

१३. नव्यानेच बाप्तिस्मा घेतलेल्या मनुष्याने चूक केली पण जर तो पश्‍चात्तापी आहे तर मंडळीतील वडिलांनी त्याला दया का दाखवावी?

१३ वडील जन महान मेंढपाळ, यहोवाचे अनुकरण करतात जो म्हणतो: “मी स्वतः माझा कळप चारीन . . . घायाळांस पट्टी बांधीन, रोग्यांस बळ देईन.” (यहेज्केल ३४:१५, १६; इफिसकर ५:१) या आत्म्याच्या एकवाक्यतेत, शंका असलेल्या किंवा पाप केलेल्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना दया दाखवण्यास शिष्य यहुदाने आर्जवले. (यहुदा २२, २३) अनुभवी ख्रिश्‍चनांकडून आपण योग्यपणे जास्त प्रमाणात अपेक्षा करत असल्यामुळे चूक केलेल्या परंतु पश्‍चात्ताप करणाऱ्‍या—एका मेंढराला—म्हणजेच नव्याने बाप्तिस्मा घेतलेल्या व्यक्‍तीला नक्कीच दया दाखवली पाहिजे. (लूक १२:४८; १५:१-७) यास्तव, ‘यहोवासाठी न्याय’ करणारे वडील अशा मेंढरांना प्रेमळ काळजी देतात व सौम्यतेच्या आत्म्याने त्यांना पुन्हा ताळ्यावर आणतात.—२ इतिहास १९:६; प्रेषितांची कृत्ये २०:२८, २९; गलतीकर ६:१.d

१४. अलीकडेच बाप्तिस्मा घेतलेल्या प्रचारकाने गंभीर पाप केल्यास काय केले पाहिजे व त्याला कशी मदत दिली जाऊ शकते?

१४ समजा, अलीकडेच बाप्तिस्मा घेतलेल्या प्रचारकाला पूर्वी पिण्याची सवय होती आणि एक किंवा दोन प्रसंगी तो पुन्हा त्याच्या पिण्याच्या सवईकडे वळाला असेल. किंवा कदाचित फार दिवसांपासून तंबाखू खाण्याच्या त्याच्या सवयीवर त्याने मात केली असेल परंतु एक किंवा दोन प्रसंगी गुपचूप धुम्रपान करण्याच्या मोहाला तो बळी पडला. आपल्या नव्या बांधवाने यहोवाकडे क्षमा मागितली असली तरी ते पाप एक सवय होऊ नये म्हणून त्याने एखाद्या वडिलांची मदत घ्यावी. (स्तोत्र ३२:१-५; याकोब ५:१४, १५) तो एखाद्या वडिलांना त्याच्या चुका सांगतो तेव्हा त्या वडिलाने त्या नवोदिताला दयापूर्ण मार्गाने सुधरवण्याचा प्रयत्न करावा. (स्तोत्र १३०:३) त्यानंतर शास्त्रवचनीय सल्ले त्याला त्याच्या ‘पायांसाठी सरळ वाटा’ करण्यास पुरेसे असतील. (इब्रीयांस १२:१२, १३) कोणत्या प्रकारचे पुढील साहाय्य द्यावे हे ठरवण्यासाठी हे वडील मंडळीच्या अध्यक्षीय पर्यवेक्षकांसोबत या बाबीची चर्चा करतील.

१५. काही बाबतींमध्ये अलीकडेच बाप्तिस्मा घेतलेल्या व्यक्‍तीने पाप केल्यास काय करणे आवश्‍यक असेल?

१५ अनेक बाबींमध्ये पुष्कळ गोष्टींची आवश्‍यकता असेल. जर कुप्रसिद्ध, कळपाला धोका असलेल्या किंवा इतर गंभीर समस्या गोवलेल्या आहेत तर या बाबीची बारीक तपासणी करण्यासाठी दोन वडिलांना नेमतील. ही बाब बरीच गंभीर आहे आणि यासाठी न्यायदान समितीची गरज आहे, असे या दोन वडिलांना आढळून आल्यास त्यांनी ही गोष्ट वडील वर्गाला कळवावी. त्यानंतर मग वडील वर्ग, चूक करणाऱ्‍या व्यक्‍तीला मदत करण्यासाठी न्यायदान समिती नियुक्‍त करतील. न्यायदान समितीने त्याच्यासोबत कोमलतेने व्यवहार करावा. त्यांनी त्याला शास्त्रवचनांद्वारे ताळ्यावर आणण्याचा आटोकाट प्रयत्न करावा. न्यायदान समितीच्या दयापूर्ण प्रयत्नांना त्याने प्रतिसाद दिल्यास, राज्य सभागृहांमधील सभांमध्ये व्यासपीठावर होणाऱ्‍या भागांसाठी त्याचा उपयोग न केल्याने काही लाभ होईल की नाही सभांमध्ये विवेचन देण्यासाठी त्याने अनुमती द्यावी की नाही हे त्यांनी ठरवावे.

१६. चूक करणाऱ्‍या व्यक्‍तीला मदत करण्यासाठी वडीलजन काय करू शकतात?

१६ चूक करणाऱ्‍याने प्रतिसाद दिल्यास, न्यायदान समितीचे एखादा किंवा दोन वडील त्याच्या विश्‍वासाला आधार मिळावा व देवाच्या धार्मिक दर्जांची गुणग्राहकता वाढवण्याच्या हेतूने मेंढपाळकत्वाच्या भेटी घेऊ शकतात. दोघांपैकी प्रत्येक जण वेळोवेळी त्याच्याबरोबर क्षेत्र सेवेमध्ये कार्य करू शकतात. ते त्याच्याबरोबर कदाचित टेहळणी बुरूज व सावध राहा! यातील योग्य लेखांचा उपयोग करून कदाचित शास्त्रवचनीय चर्चा करू शकतील, पण नियमित बायबल अभ्यास पुन्हा चालू करणार नाहीत. अशा प्रेमळ काळजीमुळे, चूक करणारा येणाऱ्‍या दिवसांमध्ये शरीराच्या अपूर्णतांचा विरोध करण्यासाठी बळकट होईल.

१७. बाप्तिस्मा घेतलेली अपराधी व्यक्‍ती पश्‍चात्ताप करत नाही आणि त्याचा पापी मार्ग सोडत नाही तर कोणती पाऊले उचलली जातात?

१७ अर्थात, अलीकडेच बाप्तिस्मा घेतल्यामुळे अपश्‍चात्तापीपणे पाप करीत राहण्यासाठी मोकळीक मिळत नाही. (इब्रीयांस १०:२६, २७; यहुदा ४) बाप्तिस्मा घेतलेला अपराधी पश्‍चात्तापी नसेल व त्याचा पापी मार्ग सोडत नसेल तर त्याला मंडळीतून बहिष्कृत केले जाईल. (१ करिंथकर ५:६, ११-१३; २ थेस्सलनीकाकर २:११, १२; २ योहान ९-११) ही कारवाई आवश्‍यक असते तेव्हा वडील वर्ग न्यायदान समिती पसंत करतील. जर बहिष्कृत केले गेले तर अशा प्रकारची संक्षिप्त घोषणा केली जाईल: “. . . यांना बहिष्कृत करण्यात आले आहे.”e

“प्रौढतेप्रत” जाण्यासाठी त्यांना मदत करा

१८. बाप्तिस्मा घेतलेल्या नवोदित ख्रिश्‍चनांना तसेच इतरांना यहोवा आणि त्याच्या इच्छेबद्दल नेहमीच पुष्कळ शिकण्यासारखे असेल याची आपल्याला कशावरून खात्री आहे?

१८ देवाच्या सेवकांतील बहुतांश लोक कळपातच राहतील. तेव्हा, आपल्यातील प्रत्येक जण आनंदाने आपल्या स्वर्गीय पित्याच्या अधिक जवळ जाऊ शकेल कारण आपल्याला नेहमीच त्याच्याबद्दल आणि त्याच्या इच्छेबद्दल शिकता येऊ शकेल. (उपदेशक ३:११; याकोब ४:८) सा. यु. ३३ पेन्टेकॉस्टच्या दिवशी बाप्तिस्मा घेतलेल्या हजारोंना निश्‍चितच पुष्कळ शिकायचे होते. (प्रेषितांची कृत्ये २:५, ३७-४१; ४:४) त्याचप्रकारे शास्त्रवचनीय पार्श्‍वभूमी नसलेल्या विदेशी लोकांच्या बाबतीतही हेच झाले. उदाहरणार्थ, अथेनैमधील अरीयपगात पौलाने केलेल्या भाषणानंतर ज्यांनी बाप्तिस्मा घेतला त्यांच्याबाबतीत हे खरे होते. (प्रेषितांची कृत्ये १७:३३, ३४) आजही, नव्याने बाप्तिस्मा घेतलेल्यांना पुष्कळ शिकायचे आहे तसेच देवाच्या नजरेत जे योग्य आहे ते करत राहण्याचा त्यांनी जो निश्‍चय केला आहे तो दृढ करण्यासाठी त्यांना वेळ आणि मदतीची आवश्‍यकता आहे.—गलतीकर ६:९; २ थेस्सलनीकाकर ३:१३.

१९. बाप्तिस्मा घेणाऱ्‍यांना “प्रौढतेप्रत” वाटचाल करण्यास कशा प्रकारे मदत केली जाऊ शकते?

१९ प्रत्येक वर्षी हजारो लोक बाप्तिस्मा घेतात आणि “प्रौढतेप्रत” जाण्यासाठी त्यांना मदतीची गरज असते. (इब्रीयांस ६:१-३) बोलण्याद्वारे, उदाहरणाद्वारे आणि सेवेतील व्यावहारिक मदतीद्वारे तुम्ही काहींना नवे मनुष्यत्व परिधान करण्यास व ‘सत्यात चालत जाण्यासाठी’ मदत करू शकाल. (३ योहान ४; कलस्सैकर ३:९, १०) तुम्ही अनुभवी प्रचारक असल्यास वडील जन तुम्हाला, ख्रिस्ती विश्‍वासात नव्याने आलेल्या व्यक्‍तीला क्षेत्र सेवेत मदत करण्यास किंवा देवावरील त्याचा विश्‍वास, ख्रिस्ती सभांबद्दल त्याची गुणग्राहकता वगैरे दृढ करण्यासाठी त्याच्याबरोबर काही आठवड्यांसाठी काही विशिष्ट शास्त्रवचनांची चर्चा करावयास सांगतील. मेंढपाळ आणि कळप यांच्यातील संबंध, आवर्जून सांगणारा पिता आणि सौम्यता दाखवणारी माता यांच्यासारखा आहे. (१ थेस्सलनीकाकर २:७, ८, ११) तरीही, मंडळीत आवश्‍यक असलेल्या सर्वच गोष्टींची काळजी थोडके वडील आणि सेवा सेवक घेऊ शकत नाहीत. आपण सर्व एका कुटुंबाप्रमाणे आहोत ज्यामधील सदस्य एकमेकांना मदत करतात. आपल्यातील प्रत्येक जण आपल्या सहउपासकांना मदत करण्यासाठी काही ना काहीतरी करू शकतो. तुम्ही स्वतः उत्तेजन देऊ शकाल, अल्पधीराचे असलेल्यांना धीर देऊ शकाल, अशक्‍तांना आधार देऊ शकाल.—१ थेस्सलनीकाकर ५:१४, १५.

२० मानवजातीला देवाच्या ज्ञानाची आवश्‍यकता आहे व यहोवाचा एक साक्षीदार या नात्याने त्या ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी तुम्ही आनंदाने सहभाग घेऊ शकता. यहोवाच्या मेंढरांना प्रेमळ काळजीची आवश्‍यकता आहे व तुम्ही हे पुरवण्यास मदत करण्यासाठी एक प्रेमळ भूमिका पार पाडू शकता. यहोवा तुमच्या सेवेला आशीर्वादित करो व त्याच्या कुरणातील मेंढरांना मदत करण्यासाठी तुम्ही करत असलेल्या मनःपूर्वक प्रयत्नांचा तुम्हाला मोबदला देवो.

[तळटीपा]

a आता हा नवोदित आपली सेवा पूर्ण करण्यासाठी संघटित पुस्तकाची एक प्रत प्राप्त करू शकतो.

b वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रकाशित केलेले.

c वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क, इंकाने प्रकाशित केलेले.

d बाप्तिस्मा न झालेल्या प्रचारकांसाठी अशा प्रकारची एक व्यवस्था, नोव्हेंबर १५, १९८८ च्या द वॉचटावर, पृष्ठे १५-२० वरील “देवाची उपासना करण्यासाठी इतरांना मदत करणे” या लेखात वर्णिली होती.

e बहिष्कृत करण्याचे ठरवण्यात आले आणि त्यानंतर दाद मागितली गेली तर परिणाम माहीत होईपर्यंत घोषणा स्थगित केली जाते. आपली सेवा पूर्ण करण्यासाठी संघटित या पुस्तकाची १४७-८ पृष्ठे पाहा.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

◻ यहोवा त्याच्या मेंढरांशी कसा व्यवहार करतो?

◻ नवोदितांना प्रचार करावयाचा असतो तेव्हा काय केले जाते?

◻ विशेष आवश्‍यकता असलेल्या नवोदितांना सहविश्‍वासू कशाप्रकारे मदत करू शकतात?

◻ चूक केलेल्या परंतु पश्‍चात्तापी लोकांना वडील जन कशा प्रकारे मदत देऊ शकतात?

◻ “प्रौढतेप्रत” जाण्यासाठी तुम्ही नव्याने बाप्तिस्मा घेतलेल्या व्यक्‍तीला कशी मदत करू शकता?

२०. देवाच्या ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आणि यहोवाच्या कुरणातील मेंढरांना प्रेमळ काळजी पुरवण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

[१६ पानांवरील चित्रं]

कळपाचे प्रेमळ मेंढपाळ म्हणून चार्ल्स टी. रस्सेल सुविख्यात होते

[१८ पानांवरील चित्रं]

दयाळू मेंढपाळ देवाच्या कळपाला कोमलतेने वागवतात

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा