आपल्या पूर्वजांसाठी नवे जीवन
सर्वच लोक मृत्यूनंतर स्वाभाविकपणे आत्मिक क्षेत्रात जीवन जगावयास जातात असे देवाचे वचन बायबल शिकवते का? नाही. बायबल, मृत्यूनंतर जीवनाची एक आश्चर्यकारक आशा प्रदान करते. पण अनेक लोक विचार करतात त्याप्रमाणे नव्हे.
आपला पहिला पूर्वज, आदाम याच्याबद्दल बायबल काय म्हणते त्याचा जरा विचार करा. यहोवाने त्याला “जमिनीतील मातीचा” बनवला. (उत्पत्ती २:७) आदामाला पृथ्वीवर आनंदात अनंतकाळ जगण्याची संधी होती. (उत्पत्ती २:१६, १७) परंतु, त्याने त्याच्या प्रेमळ सृष्टीकर्त्याविरूद्ध बंड केले आणि त्यामुळे मृत्यू ओढवला.
मृत्यूनंतर आदाम कोठे गेला? देवाने त्याला म्हटले: “अंती पुनः मातीला जाऊन मिळशील; कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे, तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील.”—उत्पत्ती ३:१९.
यहोवाने आदामाला मातीपासून बनवण्याआधी आदाम कोठे होता? कोठेच नाही. तो अस्तित्वातच नव्हता. यास्तव, यहोवाने आदामाला तो “मातीला परत जाऊन” मिळेल असे म्हटले तेव्हा आदाम पुन्हा मातीप्रमाणे निर्जीव होईल हाच त्याच्या बोलण्याचा अर्थ असावा. आदाम पूर्वजांच्या आत्मिक जगाचा जनक या नात्याने ‘पार’ झाला नाही. तो स्वर्गातील शाश्वत सुखी जीवन जगण्यासाठी किंवा चिरकाल यातना होणाऱ्या ठिकाणीही गेला नाही. त्याचे केवळ एकच स्थित्यंतर झाले व ते म्हणजे, तो सजीव होता आणि त्यानंतर निर्जीव झाला, अस्तित्वाच्या स्थितीतून अस्तित्वविरहीत झाला.
बाकीच्या मानवजातीबद्दल काय? आदामाचे वंशज देखील मृत्यूनंतर अस्तित्वविरहित होतात का? बायबल त्याचे उत्तर देते: “सर्व [मनुष्य आणि पशू दोघेही] एकाच स्थानी जातात; सर्वांची उत्पती मातीपासून आहे व सर्व पुनः मातीस मिळतात.”—उपदेशक ३:१९, २०.
मृतांची स्थिती
होय, मृत निर्जीव असतात, त्यांना ऐकता, पाहता, बोलता किंवा विचार करता येत नाही. उदाहरणार्थ, बायबल म्हणते: “आपणास मरावयाचे आहे हे जिवंताला निदान कळत असते; पण मृतास तर काहीच कळत नाही; . . . त्यांचे प्रेम, त्यांचे वैर व त्यांचा हेवादावा ही नष्ट होऊन गेली आहेत.” बायबल असेही म्हणते: “ज्या अधोलोकाकडे [कबर] तू जावयाचा आहेस तेथे काही उद्योग, युक्ति-प्रयुक्ति, बुद्धि व ज्ञान यांचे नाव नाही.”—उपदेशक ९:५, ६, १०.
यास्तव, देवाच्या वचनाप्रमाणे, जिवंत लोकांना मृत्यूची जाणीव असते. परंतु मृत्यूनंतर त्यांना काहीच कळत नाही. मृत्यूनंतर ते त्यांच्या स्वतःच्या शवाशेजारी उभे राहून त्याच्यावर काय केले जात आहे ते पाहत उभे राहत नाहीत. अस्तित्वविरहित स्थितीत सुख किंवा यातना, आनंद किंवा पीडा नसते. मृतांना जाणाऱ्या वेळेची जाणीव नसते. ते गाढ निद्रेपेक्षाही अधिक बेशुद्धावस्थेत असतात.
प्राचीन काळचा देवाचा सेवक ईयोब याला माहीत होते, की मृत्यूनंतर लोकांचे अस्तित्व राहत नाही. त्याला हेही समजले, की देवाच्या हस्तक्षेपाविना पुन्हा जिवंत होण्याची आशाच नसती. ईयोबाने म्हटले: “मनुष्य मेला म्हणजे तो तसाच पडून राहतो; मनुष्याने प्राण सोडिला म्हणजे तो कोठे असतो? तसा मनुष्य पडला म्हणजे पुनः उठत नाही.” (ईयोब १४:१०, १२) ईयोबाने निश्चितच अशी अपेक्षा केली नाही, की त्याचा मृत्यू झाल्यावर तो आत्मिक जगातील त्याच्या पूर्वजांना जाऊन मिळेल.
पुनरुत्थानाची आशा
जिवंत लोक मृत्यू पावल्यावर अस्तित्वविरहित होत असल्यामुळे, “मनुष्य मृत झाल्यावर पुनः जिवंत होईल काय?” हा ईयोबाने विचारलेला महत्त्वपूर्ण प्रश्न सामोरा येतो. स्वतः ईयोबानेच त्याचे उत्तर दिले: “माझी सुटका होईपर्यंत कष्टमय सेवेचे सगळे दिवस [कबरेतील काळ] मी वाट पाहत राहीन. तू [यहोवा] मला हाक मारिशील व मी तुला उत्तर देईन; मी जो तुझ्या हातची कृति त्या मजविषयी तुला उत्कंठा लागेल.”—ईयोब १४:१४, १५.
दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, ईयोब अस्तित्व- विरहित होणार असला तरी, देव त्याला विसरणार नव्हता. यहोवा देव पुनरुत्थानाद्वारे त्याला पुन्हा “हाक” मारुन जिवंत करील तो समय येईल असा ईयोबाला विश्वास होता.
देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याने दाखवून दिले, की ईयोबाची पुनरुत्थानावरील आशा वास्तविक होती. मृतांना उठवले जाऊ शकते हे येशूने शाबीत करून दाखवले. ते कसे? मृतांना जिवंत करून! ईयोबाचे पुनरुत्थान करण्यासाठी येशू तेथे नव्हता तरी, पृथ्वीवर असताना त्याने नाईन गावातील एका विधवेच्या पुत्राचे पुनरुत्थान केले. येशूने याईर नावाच्या एका मनुष्याच्या १२ वर्षांच्या मुलीला देखील जिवंत केले. शिवाय, चार दिवसांपासून मृतावस्थेत असलेला त्याचा मित्र लाजर याचे देखील त्याने पुनरुत्थान केले.—लूक ७:११-१५; ८:४१, ४२, ४९-५६; योहान ११:३८-४४.
या चमत्कारांसोबत, येशू एका भावी महान पुनरूत्थानाबद्दल बोलला. तो म्हणाला: “कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील . . . अशी वेळ येत आहे.” (योहान ५:२८, २९) नंतर, एका तरुणाचे पुनरुत्थान करण्यासाठी यहोवाने ज्याचा उपयोग केला त्या प्रेषित पौलाने देखील भावी पुनरुत्थानावर विश्वास व्यक्त केला. तो म्हणाला: “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल अशी . . . आशा मी देवाकडे पाहून धरितो.”—प्रेषितांची कृत्ये २०:७-१२; २४:१५.
भावी पुनरुत्थानाचे हे शास्त्रवचनीय संदर्भ, आत्मिक क्षेत्रातील जिवंत राहण्याशी सुसंबद्ध नाहीत. ते त्या समयाकडे अंगुली दर्शवतात जेव्हा कोट्यावधी मृत लोक याच पृथ्वीवर दैहिक शरीराने जिवंत होतील. पुनरुत्थित झालेल्या ह्या लोकांना मृत्यूपूर्वीच्या पृथ्वीवरील त्यांच्या जीवनाची आठवण असेल. त्यांचा लहान बाळाच्या रुपात पुनर्जन्म होणार नाही. उलट, ते मृत पावले तेव्हा जसे होते त्याप्रमाणे त्याच आठवणी आणि तेच व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्ती असतील. ते स्वतःला आणि इतरांना ओळखण्याजोगे असतील. हे लोक त्यांच्या मित्रांना आणि कौटुंबिक सदस्यांना पुन्हा भेटतील तेव्हा किती आनंदीआनंद असेल! शिवाय, आपल्या पूर्वजांना भेटणे किती रोमांचकारी असेल!
स्वर्गामध्ये पुनरुत्थान
काही जण स्वर्गात जातील असे येशूने म्हटले नव्हते का? होय तो म्हणाला होता. त्याला ठार मारण्याच्या आदल्या संध्याकाळी, तो म्हणाला: “माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. . . . मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो; आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्याजवळ घेईन; ह्यासाठी की, जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे.” (योहान १४:२, ३) येशू त्याच्या विश्वासू प्रेषितांबरोबर बोलत होता, परंतु सर्व चांगले लोक स्वर्गात जातात असा त्याच्या बोलण्याचा अर्थ होत नाही.
येशूने दाखवले, की स्वर्गीय जीवनासाठी ज्यांचे पुनरुत्थान होते त्या लोकांनी केवळ सद्गुणी जीवन व्यतीत करण्यापेक्षा आणखी इतर गरजा पूर्ण केल्या पाहिजेत. एक गरज म्हणजे त्यांना यहोवा आणि त्याच्या उद्देशांबद्दलचे अचूक ज्ञान असले पाहिजे. (योहान १७:३) इतर गरजा म्हणजे, त्यांना येशू ख्रिस्ताच्या खंडणी यज्ञार्पणावर विश्वास ठेवून देवाच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे. (योहान ३:१६; १ योहान ५:३) याच्याव्यतिरिक्त, देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे बाप्तिस्मा घेतलेला ख्रिस्ती या नात्याने त्यांना ‘नव्याने जन्म’ घेण्याची आणखी एक गरज आहे. (योहान १:१२, १३; ३:३-६) स्वर्गीय जीवनासाठी पुढची एक गरज म्हणजे त्यांना येशूप्रमाणे सहन करायचे आहे, मृत्यूपर्यंत देवाला विश्वासू राहावयाचे आहे.—लूक २२:२९; प्रकटीकरण २:१०.
या उच्च गरजांचे एक कारण आहे. स्वर्गामध्ये ज्यांचे पुनरुत्थान होणार त्यांना एक महत्त्वपूर्ण कार्य करावयाचे आहे. यहोवाला माहीत होते, की मानवी सरकारांना पृथ्वीवरील कारभार यशस्वीपणे हाताळता येणार नाही. म्हणून त्याने मानवजातीवर राज्य करू शकणाऱ्या एका स्वर्गीय सरकाराची किंवा राज्याची व्यवस्था केली. (मत्तय ६:९, १०) येशू त्या राज्याचा राजा असेल. (दानीएल ७:१३, १४) पृथ्वीवरील काही निवडक लोक ज्यांचे स्वर्गीय पुनरुत्थान झाले आहे ते त्याच्याबरोबर स्वर्गामध्ये राज्य करतील. हे पुनरुत्थित लोक ‘आमच्या देवासाठी राज्य व याजक असे होतील’ “आणि ते पृथ्वीवर राज्य करितील” असे बायबलने भाकीत केले.—प्रकटीकरण ५:१०.
स्वर्गीय पुनरुत्थानासाठी पुष्कळ लोक या गरजा पूर्ण करू शकतील का? नाही. मृत्यूमध्ये झोपलेले पुष्कळ जण, ते जबाबदार नसलेल्या कारणांमुळे पात्र ठरत नाहीत. अनेकांना यहोवा आणि त्याच्या उद्देशांबद्दलचे सत्य शिकण्याची थोडीशी किंवा काहीच संधी मिळाली नाही. ते येशू ख्रिस्त किंवा देवाच्या राज्याच्या कोणत्याही ज्ञानाविना हयात होते व मरण पावले.
स्वर्गात जाणाऱ्यांना येशूने ‘लहान कळप’ असे संबोधले. (लूक १२:३२) त्यानंतर, ख्रिस्तासोबत स्वर्गामध्ये राज्य करण्यासाठी ‘पृथ्वीवरून विकत घेतलेल्यांची’ संख्या १,४४,००० असेल हे प्रकट करण्यात आले. (प्रकटीकरण १४:१-३; २०:६) येशूने उल्लेखलेली ‘पुष्कळ जागा’ व्यापण्यासाठी १,४४,००० ही संख्या खूपच मोठी असली तरी, आदामाकडून आलेल्या अब्जावधी लोकांच्या तुलनेत ती कमीच आहे.—योहान १४:२.
पार्थिव पुनरुत्थानापूर्वीच्या घटना
आपण आतापर्यंत ज्याची चर्चा केली त्याची उजळणी करू या. बायबलनुसार, जे मरण पावतात ते यहोवा देव जोपर्यंत त्यांचे पुनरुत्थान करीत नाही तोपर्यंत मृत्यूमध्ये निर्जीव आहेत. काहींचे स्वर्गामध्ये पुनरुत्थान होते, तेथे ते येशू ख्रिस्ताबरोबर राज्य सरकारात राज्य करतील. पुष्कळ लोकांना त्या राज्याची प्रजा होण्यासाठी पृथ्वीवर पुनरुत्थित केले जाईल.
पार्थिव पुनरुत्थानाद्वारे काही अंशी यहोवा पृथ्वीसाठी असलेला त्याचा उद्देश पूर्ण करील. यहोवाने पृथ्वीवर “लोकवस्ती व्हावी म्हणून” तिला निर्माण केली. (यशया ४५:१८) ती मानवजातीसाठी कायमचे घर होणार होती. म्हणूनच स्तोत्रकर्त्याने गायिले: “स्वर्ग तर परमेश्वराचा आहे; पण पृथ्वी त्याने मानवजातीला दिली आहे.”—स्तोत्र ११५:१६.
पृथ्वीवरील जीवनाचे पुनरुत्थान सुरू होण्याआधी, मोठे बदल घडले पाहिजेत. पृथ्वी युद्धे, प्रदूषण, गुन्हे आणि हिंसेने भरावी हा देवाचा उद्देश नव्हता याजशी तुम्ही निश्चितच सहमत असाल. ज्या लोकांना देव आणि त्याच्या धार्मिक नियमांबद्दल आदर नाही त्या लोकांमुळेच या समस्या उद्भवतात. अशाप्रकारे, देवाचे राज्य “पृथ्वीची नासाडी करणाऱ्यांचा नाश” करील. (प्रकटीकरण ११:१८) हे पृथ्वीवर देवाची इच्छा पूर्ण करण्याचे सर्वात मोठे पाऊल असेल. ते राज्य सर्व दुष्ट लोकांचा नाश करील, आणि या पृथ्वीवर धार्मिकांना अनंतकाळ जगण्यासाठी राखून ठेवील.—स्तोत्र ३७:९, २९.
पृथ्वीवर परादीस
स्वच्छ पृथ्वीवर पुनरुत्थित झालेले लोक सौम्य, योग्य ते करणारे असे काळजी वाहणारे लोक असतील. (पडताळा मत्तय ५:५.) देवाच्या राज्याच्या प्रेमळ देखरेखीखाली ते आनंदाने सुरक्षिततेत राहतील. तेव्हा परिस्थिती कशी असेल याची आश्चर्यकारक पूर्व कल्पना बायबल देते: “[देव] त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील, ह्यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.”—प्रकटीकरण २१:४.
होय, या पृथ्वीचे परादीसमध्ये रूपांतर होईल. (लूक २३:४३) ते कसे असेल याची कल्पना करा! इस्पितळे आणि शुश्रूषा गृहांचा काहीच उपयोग होणार नाही. आज वृद्धापकाळाच्या परिणामांमुळे पीडित झालेले लोक परादीसमध्ये पुन्हा धट्टेकट्टे आणि निरोगी होतील. (ईयोब ३३:२५; यशया ३५:५, ६) तेथे कबरस्थानातील व्यवस्थापन गृहे, कबरस्थाने आणि थडगी नसतील. यहोवा त्याच्या राज्याकरवी, “मृत्यू कायमचा नाहीसा” करील. (यशया २५:८) या आशीर्वादांचा आपल्यासाठी आणि आपल्या पूर्वजांसाठी नक्कीच नवे जीवन असा अर्थ होईल.
[७ पानांवरील चित्रं]
पृथ्वीवर पुनरुत्थित झालेले राज्याची प्रजा होतील