प्रौढत्वाप्रत प्रगती करण्यासाठी माझा निर्णय
कार्ल डकाव यांच्याद्वारे निवेदित
“प्रौढत्वाप्रत प्रगती किंवा पातकाची पूर्व स्थिती, तुम्ही कोणती निवड कराल?” हे जून १५, १९४८ च्या टेहळणी बुरुज अंकातील लेखाचे शीर्षक होते. या लेखाने माझी अमेरिकेतील शेतमळ्यातील संभाव्य आध्यात्मिक धोक्यापासून दक्षिण अमेरिकेतील मिशनरी मार्ग स्वीकारण्यास मला प्रवृत्त केले व हा मिशनरी मार्ग स्वीकारुन आता ४३ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे.
माझा जन्म मार्च ३१, १९१४ मध्ये मिनेस्टोआमधील, व्हरगॅस येथे लाकडांच्या ओंडक्यांनी बांधलेल्या लहान घरामध्ये झाला आणि घरातील चार मुलग्यांपैकी माझा तिसरा क्रमांक होता. माझ्या बालपणाची वर्षे आनंदाची होती. वडिलांबरोबर करत असलेली मासेमारी मला आठवते. तथापि, आई नेहमीच आजारी असे आणि त्यामुळे घरकामामध्ये तिला मदत करण्यासाठी इयत्ता पाचवीमध्ये मला शाळा सोडावी लागली. रोग चिकित्सा केल्यानंतर तिला फुफ्फुसाच्या कर्काचा आजार असल्याचे निष्पन्न झाले; त्यावेळी मी १३ वर्षांचा होतो.
आईला हे कळून चुकले होते, की ती आता जास्त काळ जगू शकणार नाही म्हणून तिने मला तिची जागा घेण्यासाठी तयार करण्यास सुरवात केली. ती स्वयंपाक घरामध्ये माझ्यासह बसत असे आणि स्वयंपाक कसा करावा याविषयी मार्गदर्शन करीत असे. या व्यतिरिक्त, तिने मला कपडे धुणे, बागेची काळजी घेणे आणि सुमारे शंभर कोंबड्यांची देखभाल करण्यासाठी शिकवले. तिने मला बायबलचा दररोज एक अध्याय वाचण्यासाठी देखील उत्तेजन दिले आणि मला अस्खलित वाचता येत नसतानाही मी ते करत असे. मला दहा महिन्यांपर्यंत प्रशिक्षण दिल्यानंतर आईचा जानेवारी २७, १९२८ मध्ये देहांत झाला.
युद्धामुळे आमचे जीवन बदलते
सप्टेंबर १९३९ मध्ये दुसरे जागतिक महायुद्ध सुरु झाल्यानंतर आमच्या लूथर्न चर्चमध्ये सैन्यातील तुकड्यांसाठी प्रत्येक रविवारी प्रार्थना केल्या जात होत्या. माझ्या थोरल्या भावाने लोकांची हत्या न करण्याचा निश्चय केल्यामुळे लढाई करण्यासाठी सैन्यात भरती होण्यास त्याने नकार दर्शवल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याचा छळ होतेवेळी त्याने म्हटले: “मी निरपराध लोकांना मारण्याअगोदर तुम्ही मला गोळी घालू शकता!” वॉशिंग्टन किनारपट्टीपासून दूर असणाऱ्या मॅकनेल या बेटावर त्याला एका वर्षासाठी तुरुंगवासाची शिक्षा फर्मावण्यात आली.
तेथे फ्रँकला ३०० पेक्षा अधिक यहोवाचे साक्षीदार आढळले; युद्ध काळामध्ये पूर्णपणे तटस्थ राहिल्यामुळे त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. (यशया २:४; योहान १७:१६) लवकरच त्याने त्यांच्याशी सहवास राखण्यास सुरवात केली आणि फ्रँकचा तुरुंगामध्येच बाप्तिस्मा झाला. चांगल्या वर्तणूकीमुळे त्याची शिक्षा नऊ महिन्यापर्यंत कमी करण्यात आली. नोव्हेंबर १९४२ मध्ये फ्रँकची तुरुंगातून सुटका झाल्याची बातमी आम्हाला कळाली आणि त्यानंतर लगेचच त्याने देवाच्या राज्याच्या सुवार्तेबद्दल आम्हाला सांगितले. या संदेशाचे आमच्या बायबलमधून सूक्ष्म परीक्षण केल्यानंतर फ्रँक जे काही सांगत आहे तेच सत्य असल्याची आमची खात्री पटली.
आध्यात्मिक प्रगतीमध्ये व्यत्यय
मी १९४४ मध्ये माँटेना येथील माल्टाच्या परिसरामध्ये माझ्या काकांबरोबर राहण्यासाठी गेलो. आमच्यामध्ये काहीतरी समान होते—आमच्या पत्नी ज्या आम्हाला लग्नानंतरच्या सहा महिन्यामध्ये सोडून गेल्या होत्या. काकांना शेतकामात आणि स्वयंपाकात होणाऱ्या माझ्या मदतीमुळे आनंद झाला होता त्याचप्रमाणे आम्ही मिळणारा नफा देखील निम्मा-निम्मा वाटून घेत होतो. मी त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर राहिल्यास त्यांच्या संपूर्ण ६४० एकर (२६० हेक्टर) मळ्याचा मी वारसदार होईल, असे माझ्या काकांनी मला सांगितले. शेतकामाची ती वर्षे अगदी भरभराटीची होती आणि मला ते काम फारच आवडत होते! प्रत्येक वर्षी आम्ही भरपूर पीक काढले आणि गव्हाच्या प्रत्येकी आठ गॅलनसाठी आम्ही ३.१६ डॉलर आकारत होतो.
तथापि, माल्टा येथील साक्षीदारांच्या लहान मंडळीमध्ये मी उपस्थित होत असल्याचे माझ्या काकांना आवडले नाही. माझ्या काकांना कोणतीही कल्पना न देता जून ७, १९४७ मध्ये वॉल्फ पॉईंट येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या विभागीय संमेलनामध्ये मी बाप्तिस्मा घेतला. तेथे एका ख्रिस्ती बांधवाने पायनियर किंवा पूर्ण-वेळेचा सेवक होण्याचे मला निमंत्रण दिले. माझे जीवन अशाप्रकारे व्यतीत करावे अशी माझी मनापासून इच्छा असली तरी माझे काका सेवेमध्ये इतका वेळ खर्च करण्यासाठी मला केव्हाही अनुमती देणार नाहीत, असे मी त्या बांधवाला सांगितले.
काही काळानंतर, माझ्या काकांनी लिफाफा उघडून त्यातील माझ्यासाठी असलेले पत्र वाचले; ते पत्र मला पूर्ण-वेळेचा सेवक होण्यासाठी आर्जविणाऱ्या मित्राकडून लिहिण्यात आले होते. काका माझ्यावर फारच रागवले आणि त्यांनी मला अंतिम निवड करण्याचे सांगितले—प्रचार करणे थांबव किंवा येथून निघून जा. ही अंतिम निवड खरोखरच उत्तम ठरली, कारण मला शेतकाम करणे फारच आवडत असल्यामुळे ते मी सोडू शकणार नाही हे मला ठाऊक होते. मी मिनेस्टोआ येथे माझ्या कुटुंबामध्ये परत आलो; आता कुटुंबातील सर्वांचा बाप्तिस्मा झालेला होता आणि डेट्रॉइट लेक्स या मंडळीबरोबर ते सहवास राखून होते.
सुरवातीला माझ्या कुटुंबाने मला पायनियर होण्यासाठी उत्तेजन दिले; परंतु १९४८ मध्ये त्यांचा आध्यात्मिक उत्साह मावळू लागला. याच वेळी “प्रौढत्वाप्रत प्रगती किंवा पातकाची पूर्व स्थिती, तुम्ही कोणती निवड कराल?” या लेखाने मला आवश्यक असणारी आध्यात्मिक शक्ती पुरवली. या लेखाने अशी ताकीद दिली होती की, “तुम्ही हेतुतः अभिनव ज्ञानाच्या अनुषंगाने कृती करण्याचे नाकारले तर निश्चितच तुम्हाला फारच दुःखद परिणामांना सामोरे जावे लागेल.” या लेखाने म्हटले: “आपल्याला एकाच ठिकाणी स्थिर उभे राहून किंवा अधोगती करुन चालणार नाही; परंतु आपल्याला धार्मिकतेमध्ये प्रगती केलीच पाहिजे. अविरत प्रगती पातकाची पुनरावृत्ती करण्याचे टाळण्यासाठी फार मोठी मदत आहे.”
माझ्या कुटुंबाने इतर बाबींना समोर मांडले तरी, श्रीमंत होण्याची त्यांची इच्छा ही एक वास्तविक समस्या असल्याची माझी खात्री पटली. प्रचारापेक्षा शेतकामामध्ये अधिक वेळ खर्च करण्यात त्यांना आर्थिक लाभ दिसून येत होता. संपत्ती मिळवण्याच्या इच्छेच्या पाशामध्ये अडकण्याऐवजी मी पायनियर होण्यासाठी योजना केल्या. मला हे माहीत होते, की हे इतके सोपे नाही आणि मला ते शक्य होणार नाही असा विचार देखील माझ्या मनामध्ये आला. म्हणूनच सन १९४८ मध्ये हेतुपुरस्सर, वर्षातील सर्वात खराब हवामानाच्या महिन्यामध्ये—डिसेंबरमध्ये पायनियरींगची सुरुवात करण्याद्वारे मी स्वतःची परीक्षा घेतली.
पायनियर सेवा स्वीकारणे
यहोवाने माझ्या प्रयत्नांना आशीर्वादित केले. उदाहरणार्थ, एके दिवशी तापमापीमध्ये दिसणाऱ्या थंडीपेक्षा जास्तच कडाक्याची थंडी होती आणि तापमान वजा २७ डिग्री सेल्सियस ऐवढे होते. मी नेहमीप्रमाणे मार्ग साक्ष कार्य करत होतो; हे मी हातांची वारंवार आदलाबदल करण्याद्वारे—गारठलेला हात खिशात घालणे आणि त्याचवेळी दुसरा हात गारठेपर्यंत त्यामध्ये नियकालिके धरणे आणि हा हात गारठल्यानंतर पुन्हा तो खिशात घालण्याद्वारे असे करत होतो. एक मनुष्य माझ्याजवळ आला आणि त्याने माझ्या या हालचालींचे काही वेळेपासून निरीक्षण केल्याचे मला सांगितले. त्याने मला विचारलेः “या नियतकालिकांमध्ये एवढे महत्त्वाचे आहे तरी काय? मला ती दोन नियतकालिके द्या म्हणजे मी ती वाचू शकेन.”
त्या काळामध्ये माझ्या कुटुंबाच्या सहवासामुळे माझी स्वतःची आध्यात्मिकता धोक्यात येत आहे असे मला दिसून आले. त्यामुळे वॉचटावर संस्थेला विनंती केल्यानंतर माझी नवीन नियुक्ती, माँटेना येथील माइल्स शहरामध्ये करण्यात आली. तेथे मी सोबती सेवक या नात्याने सेवा केली आता त्यास अध्यक्षीय पर्यवेक्षक या नावाने ओळखले जाते. दोन बाय तीन मीटरच्या ट्रेलरमध्ये राहत असताना मी ड्रायक्लीनिंग व्यापारामध्ये अर्धवेळ काम करुन माझा चरितार्थ चालवत होतो. अनेकदा मला सर्वात आवडणारी गोष्ट—कापणी करण्याच्या कामामध्ये मी मोलमजुरी देखील केली.
या काळामध्ये, माझ्या कुटुंबाच्या आध्यात्मिक दैनावस्थेच्या बातम्या माझ्या कानावर येत होत्या. अखेरीस, कुटुंबातील सर्व सदस्य आणि त्याचप्रमाणे डेट्रॉइट लेक्स मंडळीतील इतरजण यहोवाच्या संघटनेच्या विरोधात उठले. मंडळीतील सतरा राज्य प्रचारकांपैकी केवळ सातजन विश्वासू राहिले. मी यहोवाच्या संघटनेचा त्याग करावा असा माझ्या कुटुंबाने अट्टाहास केला; त्यामुळे पुढे प्रगती करणे हाच केवळ एकमेव मार्ग आहे याची मला जाणीव झाली. परंतु कशाप्रकारे?
मिशनरी सेवेचा पिच्छा पुरवणे
सन १९५० मध्ये न्यूयॉर्क शहरातील आंतरराष्ट्रीय अधिवेशनामध्ये मी वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या पंधराव्या वर्गातील पदवीधर मिशनरी विद्यार्थ्यांना पाहिले. ‘विदेशी जाऊन यहोवाची सेवा करणाऱ्या या लोकांपैकी मी असतो तर,’ असा विचार माझ्या मनात येऊन गेला.
मी अर्ज पाठवला आणि फेब्रुवारी १९५१ मध्ये सुरु होणाऱ्या सतराव्या गिलियड प्रशालेच्या वर्गातील सदस्य म्हणून माझी निवड करण्यात आली. उत्तर न्यूयॉर्कच्या शेतमळ्यामधील प्रशालेचे स्थान फारच सुंदर होते. वर्गाच्या तासांनंतर शेतमळ्यामध्ये कदाचित गाईंच्या गोठ्यामध्ये किंवा बाहेर शेतामध्ये काम करण्याची माझी किती उत्कट इच्छा होती! परंतु त्या वेळचे या राज्य मळ्याचे पर्यवेक्षक जॉन बूथ यांनी माझ्याशिवाय इतर कोणालाही ड्रायक्लीनिंगचा अनुभव नसल्याचे सांगितले. म्हणून ते काम करण्यासाठी माझी नेमणूक करण्यात आली.
केवळ इयत्ता पाचवी शिक्षण झालेल्या एखाद्या व्यक्तीला गिलियड ही काही सोपी कामगिरी नव्हती. आवश्यक विश्रांतीसाठी दिवे रात्री १०:३० वाजेपर्यंत बंद करावे लागत तरीदेखील मी वारंवार मध्यरात्रीपर्यंत अभ्यास करीत असे. एके दिवशी एका शिक्षकांनी मला त्यांच्या कार्यालयामध्ये बोलावले. ते म्हणाले, “कार्ल, तुम्हाला मिळालेले शेरे हे काही इतके उत्तम नाहीत.”
‘ते मला गिलियड सोडण्यास सांगतात की काय,’ असा विचार माझ्या मनात आला.
तथापि, रात्री उशीरापर्यंत अभ्यास न करता मी माझ्या वेळेचा कशाप्रकारे सदुपयोग करु शकतो याबाबतीत शिक्षकांनी मला प्रेमळपणे सल्ला दिला. मी त्यांना घाबरतच विचारले: “गिलियड पूर्ण करण्यासाठी मी येथे राहण्यास लायक आहे काय?”
त्यांनी उत्तर दिले, “होय अर्थातच, परंतु पदवी संपादन करण्यासाठी तुम्ही लायक आहात की नाही हे मला ठाऊक नाही.”
प्रशाला अध्यक्ष नेथन एच. नॉर यांच्या शब्दांनी मला सांत्वन दिले. अलीकडेच विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितले की, मिशनऱ्यांच्या शेऱ्यांचा त्यांच्यावर प्रभाव पडला नाही तर मिशनरी “नियुक्तींशी जडून” राहिल्यामुळे ते प्रभावीत झाले आहेत.
स्पॅनिश भाषा हा माझा सर्वात अवघड विषय होता; परंतु मला अलास्कामध्ये नियुक्ती मिळेल अशी माझी आशा होती आणि त्या ठिकाणचे हवामान माझ्या गावाप्रमाणेच थंड असल्यामुळे मला त्याची सवय होती. त्याशिवाय मला इंग्रजी भाषेमध्येही प्रचार करता आला असता. गिलियड प्रशालेचा कोर्स पूर्ण होण्याआधीच दक्षिण अमेरिकेतील इक्वादोर येथे माझी नियुक्ती करण्यात आली तेव्हा मला झालेल्या आश्चर्याची तुम्ही कल्पना करु शकतात. होय, भयंकर उष्मा असणाऱ्या विषुववृत्तीय प्रदेशामध्ये मला स्पॅनिश भाषेत बोलावे लागणार होते!
एके दिवशी गिलियड प्रशालेमध्ये एफबीआयच्या प्रतिनिधीने माझी भेट घेतली. त्याने मला सोबती सेवकाच्या मुलाबद्दल विचारणा केली ज्याने डेट्रॉइट लेक्स येथे आपल्या संघटनेचा त्याग केला होता. कोरियन युद्ध चालू होते त्यावेळी सोबती सेवकाच्या या मुलाने यहोवाच्या साक्षीदारांचा सेवक असल्याचा दावा करुन स्वतःची लष्करी सेवेतून सुटका करुन घेतली होती. तो आता यहोवाचा साक्षीदार नसल्याचे मी त्या प्रतिनिधीला सांगितले. या प्रतिनिधीने मला निरोप देतेवेळी म्हटले: “तुमचा देव तुमच्या कार्यामध्ये तुम्हाला आशीर्वादित करो.”
हा तरुण कोरियातील त्याच्या पहिल्या युद्धात मरण पावल्याची बातमी नंतर मला कळाली. किती दुःखद परिणाम, तो देवाच्या संघटनेत प्रौढतेप्रत प्रगती करु शकत होता!
अखेरीस, जुलै २२, १९५१ हा पदवीदानाचा आनंदी दिवस आला. अर्थातच माझ्या कुटुंबातील कोणीएक उपस्थित नव्हते; परंतु मी प्रगती करुन मिळवलेली पदवी संपादन करताना माझा आनंद गगणात मावेनासा झाला.
विदेशी क्षेत्राशी जुळवून घेणे
आईने दिलेल्या प्रशिक्षणाचे सार्थक झाल्याचे मला नियुक्ती मिळाल्यानंतर आढळून आले. स्वतः स्वयंपाक बनवणे, हाताने कपडे धुणे आणि पाण्याची कमतरता या गोष्टी माझ्यासाठी नवीन नव्हत्या. स्पॅनिश भाषेमध्ये प्रचार करणे मात्र नवीन होते! मी काही काळापर्यंत छापील स्पॅनिश संभाषणाचा वापर केला. सुमारे तीन वर्षांपर्यंत मला या छापील संभाषणाची गरज होती आता मात्र मी स्पॅनीश भाषेमध्ये जाहीर भाषण देऊ शकतो आणि ते मी विस्तृत टिपणांच्या साहाय्याने दिले देखील आहे.
मी इक्वादोर येथे १९५१ मध्ये आलो तेव्हा त्या ठिकाणी २०० पेक्षा कमी राज्य प्रचारक होते. पहिल्या २५ किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांपासून शिष्य बनवण्याचे काम मंद गतीने होत असल्याचे दिसत होते. अशास्त्रवचनीय कॅथलिक संप्रदायांपासून आमच्या बायबल शिकवणी फारच वेगळ्या होत्या आणि एकाच विवाहित सोबत्याबद्दलच्या विश्वासूपणाबद्दल असणाऱ्या बायबलमधील सूचनांना आमचे जडून राहणे, हे विशेषतः लोकांना असामान्यच होते.—इब्रीयांस १३:४.
तरीसुद्धा पुष्कळ बायबल आधारित साहित्याचे वाटप करण्यास आम्हाला शक्य झाले. केळी उत्पादन करणाऱ्या शेतमळ्यांच्या अगदी मध्यभागी वसलेले मेखॅला शहरातील आमच्या सेवेमुळे हे स्पष्ट होते. आम्ही त्या ठिकाणी १९५६ मध्ये गेलो तेव्हा निकोलस वॅसली आणि मी असे दोघेच साक्षीदार तेथे होतो. आम्ही सकाळी लवकर उठून, त्या दिवसांमध्ये प्रमुख रस्ते बांधणीच्या कार्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मालवाहू ट्रकने प्रवास करत होतो. ठराविक अंतर प्रवास केल्यानंतर आम्ही ट्रकमधून उतरुन आमच्या वस्तीस्थानाच्या दिशेने माघारी येताना संपूर्ण मार्गावर लोकांना साक्ष देत असू.
एका खास दिवशी मी आणि निकने आम्हा दोघांपैकी कोण नियतकालिकांचे जास्त वाटप करतो हे पाहण्याचे ठरवले. मला आठवते, की मध्यान्हापर्यंत मी निकपेक्षा पुढे होतो; परंतु संध्याकाळपर्यंत आम्ही दोघांनी प्रत्येकी ११४ नियतकालिकांचे वाटप केले हाते. नियतकालिक मार्गांचा स्वीकार करणाऱ्या लोकांना प्रत्येक महिन्याला आम्ही शेकडो नियतकालिके देत होतो. सहा वेळा मी एका महिन्यामध्ये एक हजारापेक्षा अधिक नियतकालिकांचे वाटप केले. या नियतकालिकांमार्फत कितीजण बायबलच्या सत्याला शिकू शकत होते याची जरा कल्पना करा!
इक्वादोरमधील मेखॅला या ठिकाणी मंडळीचे स्वतःचे पहिले राज्य सभागृह बांधण्याचा सुहक्क देखील आम्हाला मिळाला. ही ३५ वर्षांपूर्वीची म्हणजेच १९६० ची गोष्ट आहे. त्या आरंभीच्या काळामध्ये आमच्या सभांमध्ये केवळ पंधराजण उपस्थित राहत होते. आज मेखॅलामध्ये उत्कर्ष पावणाऱ्या ११ मंडळ्या आहेत!
अमेरिकेला भेट
सन १९७० च्या दशकाच्या समाप्तीस मी सुट्टीसाठी अमेरिकेमध्ये परतलो आणि त्या ठिकाणी माझा भाऊ फ्रँक याच्याबरोबर मी काही तास घालवले. त्याच्या कारमधून मला त्याने टेकडीच्या माथ्यावर नेले आणि तेथून आम्हाला दूरपर्यंत रेड रिव्हर वॅली पाहता येत होती. पिकलेल्या गव्हाच्या टपोऱ्या दान्यांचे शेत वाऱ्यावर डोलत होते आणि हे एक नयनरम्य दृश्य होते. किनाऱ्याच्या दोन्ही बाजूस झाडांच्या रांगा असणाऱ्या शियेनी नदीचे अस्तित्व आम्हाला जाणवत होते. या शांतीमय सौंदर्याने मिळणाऱ्या आनंदाचा माझ्या भावाने त्याचे नेहमीचे संभाषण सुरु करण्याद्वारे भंग केला.
“तू असा मूर्ख होऊन दक्षिण अमेरिकेत फिरत बसला नसतास तर हे सर्व तुझे देखील झाले असते!”
“फ्रँक, तुझे हे संभाषण येथेच थांबव,” मी तत्काळ त्याचे बोलणे थांबवले.
त्यानंतर पुढे तो एक शब्दही बोलला नाही. काही वर्षांनंतर अचानकपणे मेंदूमध्ये रक्तस्त्राव होऊन तो मरण पावला. उत्तर डाकोटा येथील एकूण एक हजार पेक्षा अधिक (४०० हेक्टर) व्याप्ती असलेली तीन सुंदर कुरणे तसेच माँटन येथील माझ्या काकांचा ६४० एकरचा (२६० हेक्टर) शेतमळा ज्याचा तो वारसदार झाला होता तो मागे सोडून गेला.
माझ्या कुटुंबातील सर्वजण आता मरण पावले आहेत. परंतु, डेट्रॉइट लेक्स येथे पुष्कळ वर्षांआधी आम्ही सर्वांनी यहोवाचे साक्षीदार या नात्याने आमच्या जीवनाची सुरुवात केली होती तेथे आता मला ९० पेक्षा जास्त ख्रिस्ती बंधू आणि भगिणींचे आध्यात्मिक कुटुंब आहे, यामुळे मला आनंद होतो.
अविरतपणे आध्यात्मिकरित्या प्रगती करणे
मागील १५ वर्षांमध्ये इक्वादोर येथे आम्ही पीकांची मोठ्या प्रमाणात आध्यात्मिक कापणी केली आहे. येथे १९८० मध्ये केवळ ५,००० राज्य प्रचारक होते; आता मात्र आम्ही २६,००० पेक्षा अधिक राज्य प्रचारक आहोत. शंभरापेक्षा अधिक लोकांना बाप्तिस्मा घेण्यात मदत करण्याच्या आशीर्वादांची मी कापणी केली आहे.
आता वयाच्या ऐंशीव्या वर्षी प्रत्येक महिन्यात सेवेमध्ये ३० तास खर्च करण्यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्टा करतो; परंतु १९५१ मध्ये महिन्याचा १५० तासांचा कोटा मी अगदी सहज पूर्ण करीत असे. मला १९८९ मध्ये मूत्राशयाचा कर्क असल्याचे समजल्यापासून विश्रांतीसाठी असणाऱ्या रिकाम्या समयामध्ये वाचन करण्याद्वारे त्या वेळेचा मी पूर्ण लाभ घेतला आहे. त्या वर्षापासून मी संपूर्ण बायबल १९ वेळा तर यहोवाचे साक्षीदार—देवाच्या राज्याचे उद्घोषक (इंग्रजी) हे पुस्तक ६ वेळा वाचून काढले आहे. अशाप्रकारे आध्यात्मिकरित्या प्रगती करणे मी कायम ठेवले आहे.
होय, अमेरिकेत शेतमळ्यांतील भौतिक लाभांची कापणी करण्याच्या अनेक संधी मला मिळाल्या. परंतु ही भौतिक संपन्नतेची प्रतिफळे, आध्यात्मिक कापणी करण्यात मी अनुभवलेल्या आनंदाशी तुलना करता अगदी क्षुद्र आहेत. माझ्या मिशनरी जीवनक्रमामध्ये मी १,४७,००० पेक्षा अधिक नियतकालिकांचे आणि १८,००० पेक्षा अधिक पुस्तकांचे वाटप केल्याचे इक्वादोर येथील शाखा मला कळवते. मी या साहित्याला आध्यात्मिक बीज या दृष्टीने पाहिले आहे आणि त्यातील पुष्कळ बीजांना अंकुर देखील फुटले आहेत; तसेच अजूनही अनेक लोकांच्या हृदयामध्ये राज्य सत्यांबद्दलचे वाचन केल्यानंतर या बीजांना अंकुर फुटण्याचे बाकी आहे.
देवाच्या नव्या जगामध्ये माझ्या आध्यात्मिक मुलांसोबत आणि आपला देव, यहोवा याची सेवा करण्याचे निवडलेल्या इतर लाखोजनांबरोबर प्रगती करणे यापेक्षा दुसरी कोणतीही उत्तम गोष्ट नाही असे मला वाटते. पैसा या दुष्ट जगाच्या होणाऱ्या नाशापासून एखाद्याचा बचाव करणार नाही. (नीतीसूत्रे ११:४; यहेज्केल ७:१९) तथापि, आपल्या पैकी प्रत्येकाने प्रौढत्वाप्रत कायमस्वरुपी प्रगती केली तरच—आध्यात्मिक कार्याचे प्रतिफळ आपल्याला मिळत राहील.
[२४ पानांवरील चित्रं]
सन १९४९ मध्ये माँटेनामधील माइल्स शहरात पायनियरींग करण्यासाठी तयार
[२४ पानांवरील चित्रं]
सन १९५२ मध्ये आमच्या मिशनरी गृहासाठी पाणी विकत घेताना
[२५ पानांवरील चित्रं]
सन १९५७ मध्ये मेखॅला येथे प्रचार करताना
[२५ पानांवरील चित्रं]
मी १९८९ मध्ये आजारी पडलो तेव्हापासून संपूर्ण बायबल १९ वेळा वाचून काढले