बायबलमधील प्रार्थना परीक्षणास पात्र आहेत
एक चिंतातुर स्त्री, एक राजा आणि देवाचा स्वतःचा पुत्र यांनी म्हटलेल्या प्रार्थनांचे आता आपण परीक्षण करणार आहोत. प्रत्येक प्रार्थना वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये करण्यात आली होती. तरीही, अशा स्थिती आज आम्हावर परिणाम करू शकतात. या उदाहरणांवरून आपण काय शिकू शकतो?
‘आपल्या दासीच्या दुःखाकडे अवलोकन कर’
तुम्ही दीर्घकाळापासून एखाद्या समस्येशी झगडत आहात का? किंवा तुम्ही चिंतेने भारावून गेला आहात का? तर मग, हन्ना तिचे पहिले मूल, शमुवेल याला जन्म देण्यापूर्वी ज्या परिस्थितीत होती त्याचप्रकारच्या परिस्थितीत तुम्ही देखील आहात. ती वांझ होती आणि दुसऱ्या स्त्रीकडून तिची थट्टा होत होती. वास्तविक पाहता, हन्नाच्या परिस्थितीने तिला इतके चिडचिडे आणि चिंताग्रस्त केले होते की ती काही खात नसे. (१ शमुवेल १:२-८, १५, १६) तिने यहोवाकडे अपील केले आणि पुढीलप्रमाणे विनंती केली:
“हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या ह्या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करिशील, माझी आठवण करिशील, आपल्या दासीला विसरणार नाहीस, आपल्या दासीला पुत्रसंतान देशील, तर तो आयुष्यभर परमेश्वराचा व्हावा एतदर्थ मी त्यास समर्पण करीन; त्याच्या डोक्यावर वस्तरा फिरविणार नाही.”—१ शमुवेल १:११.
हन्ना सर्वसामान्य गोष्टींबद्दल बोलत नव्हती हे लक्षात घ्या. तिने यहोवाला खास (एका पुत्राची) विनंती केली आणि त्यासोबत एक (त्याला देवाच्या सेवेसाठी उपलब्ध करण्याचा) ठामनिश्चय केला. हे आपल्याला काय सांगते?
संकटात असताना प्रार्थनेत तुमच्या समस्या स्पष्टपणे मांडा. तुमची समस्या काहीही असो—कदाचित तुमची घरगुती परिस्थिती, एकाकीपणा किंवा आजारपण असो—यहोवाला त्याच्याबद्दल प्रार्थना करा. त्याला तुमच्या समस्येच्या अचूक स्वरूपाचे वर्णन करा आणि तुम्हाला कसे वाटते ते सांगा. “प्रत्येक संध्याकाळी मी माझ्या सर्व चिंता यहोवाला भरवश्याने सांगते, काही वेळा माझ्या अनेक समस्या असतात, परंतु मी प्रत्येक समस्येचा स्पष्टपणे उल्लेख करते,” असे लुईझ नावाची विधवा म्हणते.
यहोवासोबत स्पष्टपणे बोलल्यामुळे फायदे प्राप्त होतात. असे केल्याने आपल्याला आपल्या समस्यांची स्पष्ट समज प्राप्त होते आणि मग त्या कमी भीतीदायक वाटतात. स्पष्ट प्रार्थना आपल्याला चिंतेतून मुक्त करतात. हन्नाला तिच्या प्रार्थनेचे उत्तर मिळण्याआधीच तिला खात्री वाटली आणि “यानंतर तिचा चेहरा उदास राहिला नाही.” (१ शमुवेल १:१८) शिवाय, स्पष्ट असणे आपल्याला आपल्या प्रार्थनेचे उत्तर ओळखण्यास जागृत करते. जर्मनीतील बर्नहार्ट नावाचा एक ख्रिस्ती म्हणतो, “मी माझ्या प्रार्थना जितक्या स्पष्ट करतो तितक्याच स्पष्टरीतीने मला त्यांची उत्तरे मिळतात.”
“पण मी तर केवळ लहान मूल आहे”
परंतु, एखाद्या व्यक्तीला मिळालेल्या नेमणूकीस तो पात्र नाही असे वाटत असल्यास त्याला एक वेगळीच चिंता लागलेली असते. यहोवाने तुम्हाला दिलेल्या जबाबदारीमुळे तुम्हाला कधी कधी भारावून गेल्यासारखे वाटते का? किंवा तुमच्या नेमणूकीस तुम्ही अपात्र आहात असे काही लोक तुम्हाला लेखतात का? तरुण शलमोनाला इस्त्राएलचा राजा म्हणून अभिषिक्त करण्यात आले तेव्हा तोही अशाच परिस्थितीत होता. काही विशिष्ट प्रमुख लोकांना वाटत होते की सिंहासनावर कोणीतरी दुसऱ्याने विराजमान व्हावे. (१ राजे १:५-७, ४१-४६; २:१३-२२) शलमोनाने त्याच्या राज्यकारभारास सुरवात केली तेव्हा त्याने प्रार्थनेत एक विनंती केली:
“हे माझ्या देवा परमेश्वरा, तू आपल्या सेवकास . . . राजा केले आहे, पण मी तर केवळ लहान मूल आहे; चालचलणूक कशी ठेवावी ते मला कळत नाही. . . . यास्तव आपल्या सेवकास तुझ्या लोकांचा न्याय करण्यास सावधान चित्त दे म्हणजे मला बऱ्यावाइटांचा विवेक करिता येईल.”—१ राजे ३:७-९.
शलमोनाने त्याची प्रार्थना, यहोवासोबतच्या त्याच्या नातेसंबंधावर, त्याला दिलेल्या नेमणूकीवर आणि ती नेमणूक पार पाडण्याच्या त्याच्या क्षमतेवर केंद्रित केली. त्याचप्रकारे, जेव्हा कधी आपल्यावर जबाबदारी सुपूर्त केली जाते आणि ती आपल्या क्षमतेपलीकडे आहे असे आपल्याला वाटते; तेव्हा ती पूर्ण करण्यास सज्ज होण्यासाठी आपण देवाला प्रार्थना केली पाहिजे. पुढील अनुभवांचा विचार करा:
युगेन स्पष्टीकरण देतो, “वॉचटावर संस्थेच्या शाखा दप्तरात मोठी जबाबदारी सांभाळण्यास सांगितल्यावर त्यासाठी मी पूर्णपणे अयोग्य असल्यासारखे मला वाटले. माझ्याहून पात्र असलेले आणि अधिक अनुभव असलेले इतर जणही होते. पुढल्या दोन रात्री मी फार कमी वेळ झोपलो, माझा अधिक वेळ मी प्रार्थनेतच घालवला. त्या प्रार्थनेने मला बळ आणि आवश्यक ती खात्री पुरवली.”
रॉयला त्याचा सुपरिचित तरुण मित्र ज्याचा अचानक आणि दुःखदायक मृत्यू झाला तेव्हा, अंत्यसंस्काराचे भाषण देण्यास सांगितले. शेकडो लोक या भाषणाला उपस्थित राहणार होते. रॉयने तेव्हा काय केले? “मी योग्य शब्द शोधण्यास, उभारणीकारक विचार व्यक्त करण्यास व सांत्वन देण्यास मला शक्ती आणि क्षमता मिळावी म्हणून क्वचितच अशी प्रार्थना केली.”
निर्माणकर्ता जशा गोष्टी ‘त्वरित घडवून आणतो’ आणि त्याची संघटना जशी विस्तारित होत राहते, तसे त्याच्या बहुतेक सेवकांना जबाबदाऱ्या सुपूर्त केल्या जातात हा एक स्वाभाविक परिणाम आहे. (यशया ६०:२२) तुम्हाला वाढता सहभाग घेण्याचे सांगितल्यास, यहोवा तुमचा अनुभव, प्रशिक्षण किंवा तुमच्या कुवतीच्या उणीवेला भरून काढील. शलमोनाने देवाला प्रार्थना केल्याप्रमाणे तुम्ही देखील करा; तो तुम्हाला नेमणूक हाताळण्यास मदत करील.
“की त्या सर्वांनी एक व्हावे”
आज उद्भवणारा तिसरा प्रसंग, प्रार्थनेसाठी एखाद्या गटाचे प्रतिनिधीत्व करणे हा होय. इतरांच्या वतीने प्रार्थना करण्यासाठी विनंती केल्यास आपण कोणत्या गोष्टींसाठी प्रार्थना करावी? योहान १७ अध्यायातील येशूच्या प्रार्थनेचा विचार करा. त्याने शेवटल्या संध्याकाळी मनुष्य या नात्याने त्याच्या शिष्यांसमोर ही प्रार्थना केली. त्याच्या स्वर्गीय पित्याला त्याने कोणत्या प्रकारच्या विनंत्या केल्या?
येशूने सर्वसामान्य ध्येयांवर जोर दिला व तेथे उपस्थित असलेल्यांच्या आशेत सहभाग घेतला. त्याने यहोवा देवाच्या नावाच्या गौरवाचा आणि त्याच्या राज्याची ओळख करून देण्याचा उल्लेख केला. शास्त्रवचनांच्या ज्ञानावर आधारित असलेल्या पिता आणि पुत्रासोबतच्या एका व्यक्तिगत नातेसंबंधाच्या मूल्यावर येशूने जोर दिला. त्याने जगापासून वेगळे असण्याबद्दल सांगितले जे त्याच्या शिष्यांना विरोधासाठी तयार करणार होते. ख्रिस्ताने त्याच्या पित्याला शिष्यांचे संरक्षण करण्यास व त्यांना खऱ्या उपासनेत ऐक्याने ठेवण्याची विनंती केली.
होय, येशूने एकतेवर जोर दिला. (योहान १७:२०, २१) त्या संध्याकाळी, शिष्य कोणत्यातरी क्षुल्लक कारणांवरून भांडत होते. (लूक २२:२४-२७) परंतु, प्रार्थनेत ख्रिस्ताने निर्भर्त्सना करण्याऐवजी त्यांना एकवटण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रकारे, कौटुंबिक आणि मंडळ्यांतील प्रार्थनांमुळे प्रीती वाढावी तसेच एकमेकांमधील मतभेदांवर मात करण्याचा प्रयत्न करावा. ज्यांचे प्रतिनिधीत्व होत असते त्यांनी ऐक्याने एकमेकांच्या जवळ यावे.—स्तोत्र १३३:१-३.
प्रार्थना ऐकणाऱ्यांनी प्रार्थना संपल्यावर, “आमेन” किंवा “तथास्तु” असे म्हटल्यावर हे ऐक्य प्रदर्शित होते. हे शक्य होण्यासाठी त्यांना प्रार्थनेत जे काही म्हटले जाते ते समजून त्याच्या एकवाक्यतेत असले पाहिजे. यास्तव तेथे उपस्थित असलेल्या एखाद्याला माहीत नसणारा विषय प्रार्थनेत उल्लेखणे अयोग्य ठरेल. उदाहरणार्थ, एखाद्या वडिलांनी प्रार्थनेत मंडळीचे प्रतिनिधीत्व करत असताना फारच आजारी असलेल्या एकाद्या आध्यात्मिक बंधू किंवा भगिणीवर यहोवाचे आशीर्वाद मागितले असतील. परंतु ते वडील ज्यांचे प्रतिनिधीत्व करतात त्यातील बहुतेकजण त्या आजारी व्यक्तीला आणि तिच्या आजारपणाबद्दल परिचित असले तर वडिलांनी असे करणे अधिक उचित ठरेल.
शिवाय, येशूने गटातील प्रत्येक सदस्याच्या व्यक्तिगत गरजा तपशीलवार सांगितल्या नाहीत हेही लक्षात घ्या. असे करण्यात काही विशिष्ट लोकांनाच माहीत असलेल्या व्यक्तिगत बाबींचा उल्लेख करणे समाविष्ट असेल. खाजगी प्रार्थनेसाठी व्यक्तिगत चिंता हा योग्य विषय आहे. या प्रार्थना हव्या तितक्या लांब आणि जिव्हाळ्याच्या असू शकतात.
उपासकांच्या मोठ्या एकत्रिकरणाचे प्रार्थनेसाठी प्रतिनिधीत्व करण्यास एखादी व्यक्ती स्वतःला कशी तयार करू शकते? एका अनुभवी ख्रिस्ती व्यक्तीने असे स्पष्टीकरण दिले: “कोणकोणत्या गोष्टींसाठी आभार मानावेत, बांधवांची कोणती विनंती असेल आणि त्यांच्यावतीने मी कोणती विनंती करू शकतो यावर मी आगाऊच विचार करतो. मी माझ्या कल्पनांना, ज्यामध्ये स्तुतीपर शब्दांचा देखील समावेश आहे योग्य प्रकारे माझ्या मनात मांडतो. सार्वजनिक प्रार्थना करण्याआधी, एका प्रतिष्ठित पद्धतीने बांधवांचे प्रार्थनेत प्रतिनिधीत्व करण्यास मदत मिळावी म्हणून मी स्वतः मनातल्या मनात प्रार्थना करतो.”
तुमची कोणतीही परिस्थिती असो, तुमच्या सारख्या परिस्थितीत कोणीतरी म्हटलेली एखादी प्रार्थना तुम्हाला नक्कीच बायबलमध्ये आढळेल. शास्त्रवचनातील प्रार्थनांची विस्तृत मालिका देवाच्या प्रेमळ कृपेचा पुरावा आहे. या प्रार्थनांचे वाचन केल्याने व त्यावर मनन केल्याने तुम्हाला तुमच्या प्रार्थना समृद्ध करण्यास मदत होईल.
[५ पानांवरील चौकट]
बायबलमधील उल्लेखनीय प्रार्थना
यहोवाचे सेवक अनेक प्रकारच्या परिस्थितींमध्ये प्रार्थना करतात. खाली उद्धृत केलेल्या परिस्थितींपैकी एका किंवा त्यापेक्षा अधिक परिस्थितींमध्ये तुम्ही कशी प्रतिक्रिया दाखवू शकता?
अलियेजर प्रमाणे तुम्हाला देवाच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे का?—उत्पत्ती २४:१२-१४.
याकोबाप्रमाणे तुम्ही जवळ येऊन ठेपलेल्या धोक्यामध्ये आहात का?—उत्पत्ती ३२:९-१२.
मोशेप्रमाणे देवाला अधिक चांगल्याप्रकारे ओळखण्याची तुमची इच्छा आहे का?—निर्गम ३३:१२-१७.
एलीयाप्रमाणे तुम्ही विरोधकांचा सामना केला आहे का?—१ राजे १८:३६, ३७.
यिर्मयाप्रमाणे तुम्हाला देखील प्रचार करणे अवघड वाटते का?—यिर्मया २०:७-१२.
दानीएलाप्रमाणे तुम्हाला पातके कबूल करण्याची आणि त्याबद्दलच्या क्षमा मागण्याची आवश्यकता आहे का?—दानीएल ९:३-१९.
योनाप्रमाणे, देवाला दिलेल्या शपथेची पूर्णता करण्याची तुमची इच्छा आहे का?—योना २:१-९.
येशूच्या शिष्यांप्रमाणे तुम्ही छळाचा सामना करत आहात का?—प्रेषितांची कृत्ये ४:२४-३१. मत्तय ६:९-१३; योहान १७:१-२६; फिलिप्पैकर ४:६, ७; याकोब ५:१६ देखील पहा.
[६ पानांवरील चौकट]
मूळावलेल्या सवयीच्या विरुद्ध लढा देतेवेळी काय प्रार्थना करावी
वारंवार उद्भवणाऱ्या कमतरतेविरुद्ध तुम्ही लढा देत आहात काय? बायबलमध्ये नोंद केलेल्या प्रार्थना कशा लाभदायक ठरु शकतात? दाविदापासून शिका, कारण त्याने स्वतःच्या कमतरतेच्या बाबतीत अनेक वेळा प्रार्थना केल्या.
दाविदाने गायिले, “हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण; मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण.” (स्तोत्र १३९:२३) दाविदाची इच्छा होती, की त्याच्यामध्ये असणाऱ्या अयोग्य इच्छा, भावना किंवा उद्देशांचा यहोवा देवाने शोध घ्यावा. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे, पातक टाळण्यासाठी दाविदाने यहोवाच्या मदतीचा आधार घेतला.
परंतु दाविदाच्या कमतरतांनी त्याच्यावर विजय मिळविला आणि त्याने फार मोठे पाप केले. त्याला पुन्हा एकदा प्रार्थनेने मदत केली—हा समय देवाबरोबर असणाऱ्या त्याच्या नातेसंबंधाची पुनर्स्थापना करावयाचा होता. स्तोत्र ५१:२ अनुसार दाविदाने विनंती केली, “मला धुऊन माझा दोष पूर्णपणे काढून टाक, माझे पाप दूर करून मला निर्मळ कर.”
आपल्या चुकीच्या मनोवृत्तीवर संयम ठेवण्यासाठी आपण सुद्धा यहोवाच्या मदतीसाठी नम्रपणे प्रार्थना करु शकतो. यामुळे मूळावलेल्या कमतरतांवर विजय मिळविण्यासाठी आपल्याला बळकटी मिळेल आणि पाप टाळण्यासाठी देखील आपल्याला मदत होऊ शकेल. मूळावलेल्या कमतरतेची पुनरावृत्ती झाल्यास त्याविरुद्धच्या लढ्याला यशस्वीपणे तोंड देण्यास मदत करण्यासाठी यहोवाला आपण परत प्रार्थना केली पाहिजे.
[७ पानांवरील चित्रं]
गटाच्या वतीने केलेल्या प्रार्थनांनी शास्त्रवचनीय आशा व सामान्य आध्यात्मिक ध्येयांवर जोर दिला पाहिजे