तुम्ही अलीकडेच एखाद्याला उत्तेजन दिले आहे काय?
ॲलिना हिला गर्भाशयाचा कर्क असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले तेव्हा ती केवळ १७ वर्षांची होती. ॲलिनाला होणाऱ्या अति यातनाकारक पीडा पाहवयाला लागल्यामुळे तिची आई मेरी हिला दुःखाचा सामना करावा लागला.
अखेरीस, ॲलिनाला कॅनरी बेट याठिकाणच्या तिच्या घरापासून १,९०० किलोमीटर दूर असणाऱ्या स्पेनमधील मॅडरिड येथील इस्पितळात हलविण्यात आले. मॅडरिड येथील डॉक्टरांचा गट रक्ताशिवाय शस्त्रक्रिया करण्यासाठी स्वेच्छेने तयार होता. (प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९) शस्रक्रियेच्या सुरवातीनंतर थोड्याच वेळाने ॲलिनाची अवस्था अतिशय नाजूक असल्याचे दिसून आले. अगोदरच कर्क संपूर्ण शरीरामध्ये पसरला होता आणि शस्त्रक्रिया करणारे यावर उपचार करू शकत नव्हते. मॅडरिड येथे पोहंचल्यानंतर ॲलिना आठ दिवसांनी मरण पावली.
या अत्यंत कठीण परीक्षेला तोंड देण्यामध्ये मेरी एकटी नव्हती. स्वखर्चाने मॅडरिड येथे प्रवास करून दोन ख्रिस्ती वडिलांनी आणि तिच्या थोरल्या मुलाने तिला सोबत दिली तसेच ते ॲलिनाच्या मृत्यूपर्यंत तेथे राहिले. “मी मनामध्ये अनुभव करीत असलेली नैराश्याची पोकळी भरून काढण्यासाठी त्यांनी मला मदत केली,” मेरी सांगते. “त्यांनी मला दिलेले उत्तेजन मी केव्हाही विसरणार नाही. त्यांचा आध्यात्मिक आधार आणि व्यावहारिक मदत अमूल्य होती. ते खरोखरच “वाऱ्यापासून आसरा” असे होते.”—यशया ३२:१, २.
अशाप्रकारचे मेंढपाळ त्याच्या मेंढराची अतिशय प्रेमळपणे काळजी घेतात यामुळे यहोवा आनंदी आहे. (नीतीसूत्रे १९:१७; १ पेत्र ५:२-४) तथापि, उत्तेजन देणे हा विशेषाधिकार फक्त वडिलांसाठीच नाही. सर्व ख्रिस्ती आध्यात्मिक मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आणि ‘एकमेकांना उत्तेजन’ देण्यासाठी एकत्र मिळतात. (इब्रीयांस १०:२४, २५) उत्तेजन ख्रिस्ती सहवासाचा एक अत्यावश्यक भाग आहे.
उत्तेजनामध्ये कशाचा आंतर्भाव होतो
पाण्याविना एखादे सुंदर फूल कोमेजून जाते त्याचप्रमाणे वैयक्तिक—दोन्ही, कुटुंब आणि मंडळी यामधील—उत्तेजनाच्या कमतरतेमुळे निरुत्साही होऊ शकतो. त्याउलट, समयोचित उत्तेजनामुळे मोहाच्या पाशास तोंड देणाऱ्यांना बळकटी मिळू शकते; निराश असणाऱ्यांचे मन उल्लसित होते आणि देवाची विश्वासाने सेवा करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळते.
“उत्तेजन” यासाठी भाषांतरीत केलेल्या ग्रीक शब्दाच्या अर्थामध्ये दुःखपरिहार, प्रोत्साहन आणि सांत्वन या कल्पनांचा समावेश होतो. त्यामुळे उत्तेजन, एखादा ठीक करत आहे एवढे सांगण्यापर्यंतच मर्यादित नाही. त्यामध्ये व्यवहारिक सोबत आणि आध्यात्मिक मदत याचा देखील आंतर्भाव होऊ शकतो.
वस्तुतः, “उत्तेजन” यासाठी भाषांतरित केलेल्या ग्रीक शब्दाचा अक्षरशः अर्थ “एखाद्याच्या उपस्थितीत बोलावणे” असा होतो. आपल्या आध्यात्मिक बंधू आणि भगिनी यासोबत चालल्यामुळे त्यांच्यापैकी थकलेल्यास आणि अडखळणाऱ्यास तत्काळ मदत करण्यासाठी आपण समर्थ होतो. (उपदेशक ४:९, १०) मनोरंजक म्हणजे, यहोवाचे लोक “खांद्याला खांदा लावून त्याची सेवा” करतात. (सफन्या ३:९ कॉमन लँग्वेज भाषांतर) तसेच प्रेषित पौलाने खास ख्रिश्चनाला “हे माझ्या खऱ्या सोबत्या” असे म्हटले. (फिलिप्पैकर ४:३) खांद्याला खांदा लावून एका जू खाली काम करण्याद्वारे विशेषतः, आध्यात्मिकरित्या बळकट नसणाऱ्यांचे ओझे हलके होते.—पडताळा मत्तय ११:२९.
त्यांनी उत्तेजन दिले
उत्तेजन हे अतिशय महत्त्वाचे असल्याकारणाने आपण त्याच्या काही शास्रवचनीय उदाहरणांचा विचार करू या. यहोवाचा संदेष्टा मोशे हा त्याच्या जीवनाच्या शेवटच्या काळामध्ये असताना, यहोशवाने इस्राएलांचा नेता होण्यासाठी यहोवाने त्याची नियुक्ती केली. ती एक सोपी कामगिरी नव्हती आणि स्वतः मोशेला देखील याची जाणीव होती. (गणना ११:१४, १५) आणि म्हणूनच यहोवाने मोशेला “यहोशवाला अधिकारारूढ कर व त्याला धीर देऊन दृढ कर,” असे सांगितले.—अनुवाद ३:२८.
इस्राएली शास्त्यांच्या काळाच्या दरम्यान यहोवाच्या पवित्र स्थानामध्ये सेवा करण्यासाठी इफ्ताहाच्या मुलीने कुटुंबासमवेत राहण्याच्या शक्यतेचा त्याग केल्याद्वारे ती वडिलांच्या शपथेबरोबर स्वेच्छेने सहमत झाली. तिचा त्याग हा दुर्लक्षित राहिला का? नाही, कारण शास्ते ११:४० म्हणते: “ह्यावरून इस्राएल लोकात अशी चाल पडली की, इस्राएल मुलींनी इफ्ताह गिलादी ह्याच्या मुलीच्या स्मरणार्थ शोक [स्तुती, NW] करण्यासाठी प्रतिवर्षी चार दिवस जात जावे.” इफ्ताहाच्या आत्मत्यागी मुलीसाठी अशाप्रकारच्या भेटी निश्चितच खूप उत्तेजनपर ठरल्या असतील.
उत्तेजन देण्यासाठी काही वेळेस धैर्याची गरज असते. प्रेषित पौलाच्या पहिल्या मिशनरी यात्रेमध्ये त्याने आशिया मायनरच्या कित्येक शहरांमध्ये भयंकर विरोधाचा सामना केला. अंत्युखिया मधून त्याला बहिष्कृत करण्यात आले, इकुन्यामध्ये देहदंडाच्या शिक्षेपासून थोडक्यात सुटका झाली आणि लुस्र येथे दगडमार करण्यात आला व मेला असे समजून सोडून दिले. त्यानंतर लगचेच, पौल आणि त्याचे सोबती त्या शहरात पुन्हा गेले “आणि शिष्यांची मने स्थिरावून त्यांनी त्यांना असा बोध केला की, विश्वासात टिकून राहा; कारण आपणाला पुष्कळ संकटात टिकून देवाच्या राज्यात जावे लागते.” (प्रेषितांची कृत्ये १४:२१, २२) या नवोदित शिष्यांना उत्तेजन देण्यासाठी पौल स्वतःचे जीवन धोक्यात घालण्यासाठी तयार होता.
तरीदेखील, केवळ नवोदित शिष्य असणाऱ्या ख्रिश्चनांनाच उत्तेजनाची गरज असते असे नाही. काही वर्षांनंतर पौलाने रोमच्या कठीण प्रवासाचा अनुभव घेतला आणि तेथे त्याला परीक्षेला सामोरे जावे लागणार होते. तो नियुक्ती स्थानी जात असताना त्याला निराश झाल्यासारखे वाटले असावे. परंतु रोमच्या दक्षिणेपासून ७४ किलोमीटर अंतरावर येऊन पोहंचला तेव्हा तो उल्लसित झाला. का बरे? कारण त्याला भेटण्यासाठी रोमचे बंधू अप्पियाची पेठ आणि तीन उतारशाळा येथे आले होते. “त्यांना पाहून पौलाने देवाची उपकारस्तुति करून धैर्य धरले.” (प्रेषितांची कृत्ये २८:१५) अशाच प्रकारच्या घटनेच्या वेळी, केवळ आपली उपस्थिती समविश्वासूजणांसाठी उत्तेजन देणारी ठरू शकेल.
उत्तेजन देण्यासाठी संधींचा उपयोग करा
उत्तेजन देण्यासाठी निश्चितच अनेक संधी आहेत. ईश्वरशासित सेवा प्रशालेमधील बंधू अगर भगिनीच्या उत्तम विद्यार्थी भाषणाने तुमचे हृदय पुलकित झाले नव्हते का? मंडळीमध्ये आध्यात्मिकरित्या मजबूत असलेल्या किशोरांबद्दल तुम्ही आनंदी आहात का? प्रौढ व्यक्तींच्या सहनशीलतेने तुम्हाला प्रभावित केले आहे का? घरोघरच्या सेवाकार्यात एखाद्या पायनियरची बायबल वापरण्याच्या पद्धतीचे तुम्हाला कौतुक वाटले नाही का? तर मग स्तुती करा आणि काहीतरी उत्तेजनपर बोला.
कुटुंब आणि त्याचप्रमाणे मंडळी यामध्ये उत्तेजनाची प्रमुख भूमिका आहे. ते पालकांना त्यांच्या मुलांचे संगोपन “प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात” करण्यासाठी मदत करू शकते. (इफिसकर ६:४) मुलाने उत्तम केले आहे असे म्हणणे आणि त्याचा कार्यभाव स्पष्ट करणे हे उत्तेजनपर होऊ शकते! किशोरावस्थेतील वर्षांच्या काळादरम्यान तरुणजण मोहपाश आणि दबाव यांना सामोरे जातात तेव्हा कायम उत्तेजन देत राहणे हे अत्यावश्यक आहे.
लहानपणाच्या काळाच्या दरम्यान उत्तेजनाची कमी अपायकारक ठरू शकते. आज मायकल हे एक प्रोत्साहनदायक वडील आहेत परंतु ते असे म्हणतात: “मी एखादी गोष्ट चांगली केली आहे, असे माझ्या वडिलांनी मला एकदाही म्हटले नाही. म्हणून माझी आत्मप्रशंसनेच्या कमतरतेमध्ये वाढ झाली. . . . आता मी ५० वर्षांचा असलो तरी देखील मी वडील या नात्याने उत्तम कामगिरी बजावत असल्याची माझ्या मित्रांकडून खात्री पुरविली जाते आणि त्याची मी अजूनही गुणग्राहकता बाळगतो. . . . इतरांना उत्तेजन देणे किती महत्त्वाचे आहे हे माझ्या स्वतःच्या अनुभवाने मला शिकविले आहे आणि ते देण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करतो.”
उत्तेजनाची गरज कोणाला आहे?
कठीण परिश्रम करणारे ख्रिस्ती वडील उत्तेजनाच्या पात्रतेचे आहेत. पौलाने लिहीले: “बंधुजनहो, आम्ही तुम्हास विनंती करितो की, तुम्हामध्ये जे श्रम करितात, प्रभूमध्ये तुम्हावर असतात व तुम्हास बोध करितात त्यांचा तुम्ही सन्मान करावा; आणि त्यांच्या कामामुळे त्यांना प्रीतीने अत्यंत मान द्यावा.” (१ थेस्सलनीकाकर ५:१२, १३) वडिलांच्या कठीण परिश्रमाला सामान्य समजणे हे सोपे आहे. परंतु प्रामाणिक गुणग्राहकतेच्या आणि उत्तेजनाच्या शब्दांमुळे त्यांचा भार हलका होऊ शकतो.
आपल्यापैकी कठीण परिस्थितीला सहन करणाऱ्यांना देखील उत्तेजनाची गरज आहे. बायबल सल्ला देते, “जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या अशक्तांना आधार द्या.” (१ थेस्सलनीकाकर ५:१४) एक-पालक, विधवा, किशोरवयीन, वयस्कर आणि दुर्बळ हे वेळोवेळी निराश किंवा आध्यात्मिकरित्या अशक्त असल्याचे वाटणाऱ्यांपैकी आहेत.
मरीया ही एक खिस्ती स्त्री असून तिच्या पतीने अचानक तिचा त्याग केला. तिने म्हटले: “ईयाबाप्रमाणे कधीकधी मला मरण्याची इच्छा झाली. [ईयाब १४:१३] तरीदेखील मी माघार घेतली नाही, मला मिळालेल्या उत्तेजनाबद्दल आभार. दोन वडिलांनी ज्यांच्याशी मी उत्तम परिचित होते, पूर्ण वेळेची सेवा कायम ठेवण्याचे मूल्य समजावण्यास मदत करण्यासाठी अनेक तास खर्च केले. माझे मन मी जेव्हा मोकळे केले तेव्हा दोन समजदार भगिणींनी माझे धीराने ऐकण्याद्वारे मला सांत्वन दिले. बायबलच्या साह्याने, त्यांनी मला यहोवाच्या दृष्टिकोनातून बाबींकडे पाहण्यासाठी समर्थ केले. आम्ही स्तोत्र ५५:२२, हे कितीवेळेस वाचले हे मला ठाऊक नाही; पण मला हे माहीत आहे, की मी या शास्त्रवचनाच्या वापराद्वारे माझा आध्यात्मिक आणि भावनिक तोल हळूवारपणे सावरला. हे सर्व १२ वर्षांपुर्वी घडले आणि मला हे सांगण्यास आनंद होतो, की मी आतापर्यंत पूर्ण वेळेची सेवा कायम करीत आहे. अधूनमधून येणारे भावनिक दुःख असतानाही माझे जीवन समाधानी आणि आनंदी आहे. त्या काळाप्रमाणे एखाद्या व्यक्तीला उत्तेजन मिळाल्यास तिच्या जीवनावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो याची मला खात्री पटली आहे.”
काहींना उत्तेजनाची गरज आहे कारण त्यांनी चुका केल्या आणि आता त्या सुधारण्यासाठी ते झगडत आहेत. कदाचित, त्यांना प्रेमळ वाग्दंड मिळाला असेल. (नीतीसूत्रे २७:६) वडील ज्यांनी वाग्दंड दिला आहे शास्रवचनीय सल्ल्याचे पालन होत असल्याचे पाहतात तेव्हा प्रशंसा करण्यामध्ये ते जागृत राहू शकतात. त्यांच्या उत्तेजनपर शब्दांनी—चूक करणाऱ्यासाठी त्यांचे प्रेम कायम राखणे त्यामुळे तो “दुःखसागरात” बुडून जाणार नाही आणि सल्ल्याचा अवलंब केल्याने होणाऱ्या फायद्यांचे त्याला स्मरण करून देणे, असे दुहेरी लाभ होतात.—२ करिंथकर २:७, ८.
एका विशिष्ट वडिलांनी गंभीर चूक केली आणि मंडळीची देखरेख करण्याचा विशेषाधिकार त्यांनी गमावला. “माझी वडील या पदावरून कमी करण्याची जेव्हा घोषणा करण्यात आली तेव्हा मला वाटले, की बांधवांना माझा सहवास योग्य वाटणार नाही,” ते म्हणतात. “तथापि, वडिलांनी कारण अतिशय गुप्त ठेवले आणि मला उत्तेजन देणे कायम ठेवले. त्याचप्रमाणे बाकीच्या मंडळीने देखील प्रेम आणि सहवास विस्तृत केला त्यामुळे निश्चितच आध्यात्मिकरित्या पुर्ववत होण्यासाठी मला चालना मिळाली.”
उत्तेजनपर असा
आजच्या व्यग्र जीवनामध्ये उत्तेजनाकडे दुर्लक्ष होणे सोपे आहे. परंतु ते किती लाभदायक आहे! परिणामकारक उत्तेजन देण्यासाठी तुम्ही दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. पहिली म्हणजे, काय म्हणावयाचे यावर विचार करा त्यामुळे तुमचे उत्तेजन स्पष्ट होईल. दुसरी, स्तुती करण्यास पात्र किंवा उभारणी करण्याची आवश्यकता असणाऱ्यांचा संपर्क साधण्यासाठी संधीचा शोध घ्या.
हे तुम्ही जितके अधिक कराल तितके तुम्ही आनंदित व्हाल. सरतेशेवटी, येशू आपल्याला याची खात्री पुरवतो: “घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे.” (प्रेषितांची कृत्ये २०:३५) इतरांना उत्तेजन देण्याद्वारे तुम्ही स्वतःला उत्तेजन द्याल. प्रत्येक दिवशी एखाद्याला उत्तेजन देण्याचे ध्येय तुम्ही का ठेवू नये?