राज्य घोषकांचा वृत्तांत
देवाचे वचन समर्थ आहे
“देवाचे वचन जिवंत आणि समर्थ आहे.” (इब्रीयांस ४:१२, पं. र. भाषांतर.) खोट्या धर्माद्वारे दिशाभूल झालेले लोक जेव्हा बायबलमधील सत्याच्या सामोरे येतात, तेव्हा हे वरील शब्द अनेक वेळा खरे शाबीत झाले आहेत. डॉमिनिकन रिपब्लिक येथून आलेल्या पुढील अनुभवात दाखवल्याप्रमाणे, बायबलचे सामर्थ्य लोकांच्या जीवनाला बदलवून त्यांना आशा प्रदान करू शकते.
यहोवाच्या साक्षीदारांनी एका प्रतिष्ठित कॅथलिक स्त्रीला भेट दिली होती जिने अलिकडेच तिच्या दोन लहान मुलांना मृत्यूमुळे गमावले. ती अगदी शोकमग्न झाली होती आणि तिच्या शोकान्तिकेवर दररोज विलाप करीत होती. साक्षीदारांनी तिला योहान ५:२८, २९ मध्ये पुनरूत्थानाच्या आशेविषयी बायबल काय सांगते ते दाखवले. साक्षीदारांसोबत झालेल्या अधिक चर्चेनंतर, तिला पुनरूत्थानाच्या आशेमुळे सांत्वन मिळाले इतकेच नव्हे, तर तिचे कॅथलिक धार्मिक नेते तिची दिशाभूल करत आहेत हेही तिला कळून चुकले.
तिने कॅथलिक चर्चला राजीनामा देण्यास वेळ दवडली नाही. शिवाय तिने यहोवाच्या साक्षीदारांसोबत नियमित बायबल अभ्यास करण्याचे स्वीकारले. परंतु तिच्या पतीला तिचे हे विचार मुळीच पटले नाहीत. तोही एक प्रतिष्ठित कॅथलिक असल्यामुळे, त्याने नामवंत राजकीय व धार्मिक मित्रांना, त्याच्या बायकोला भेट देऊन तिने जो मार्ग स्वीकारला होता त्याच्यापासून परावृत्त करून पुन्हा कॅथलिक धर्मात आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी सांगितले. नंतर त्याने तिला घटस्फोटाची धमकी दिली आणि एकदा तर, त्याने त्याच्या नातेवाईकांना आणि सहचर्च सदस्यांना याची सूचना दिली की ते दोघे घटस्फोट घेत आहेत.
परंतु त्याचा हा डावपेच निकामी ठरला. उलटपक्षी, ती तिचा बायबल अभ्यास चालू ठेवण्यास अधिकच दृढनिश्चयी झाली. तिच्या आध्यात्मिक वाढीमुळे व उत्तम ख्रिस्ती गुण विकसित केल्यामुळे तिच्या पतीने तिच्यापासून घटस्फोट घेण्याऐवजी तिच्यासोबतच राहण्याचे ठरवले. एके दिवशी, ती ज्या बायबल साहित्यांचा अभ्यास करत होती त्यांचे परीक्षण करण्यास तो कबूल झाला—परंतु एका अटीवर. तो त्याच्या स्वतःची कॅथलिक बायबल आवृत्ती वापरू इच्छित होता.
काय आश्चर्य, यहोवाच्या साक्षीदारांकडून मिळालेल्या साहित्याच्या साहाय्याने, तो थेटपणे त्याच्या स्वतःच्या बायबलमधून नवनवीन गोष्टी शिकू लागला. आपल्या पत्नीने योग्य तो मार्ग स्वीकारला होता हे त्याने ओळखले आणि लवकरच तोही तिच्या उदाहरणाचे अनुकरण करण्यास तयार झाला. अर्थात, आता त्याला त्याच्या स्वतःच्या जीवनात पुष्कळसे बदल करावे लागतील हे कळाले. एक सर्वात कठीण आव्हान म्हणजे त्याची सिगरेट ओढण्याची सवय तोडणे. जुलै ८, १९८९ चा अवेक! अंक, ज्याच्या मुखपृष्ठावर “विक्रीसाठी मृत्यू—धुम्रपान थांबण्याचे दहा मार्ग” हा विषय होता तो वाचल्यावर या अशास्त्रवचनीय सवयीला सोडून टाकण्याचा त्याने ठाम निर्णय घेतला. त्याच्या खिश्यात अनेक वेळा सापडणाऱ्या सिगरेट पाकीटाऐवजी, अवेक! चा तो अंक जवळ ठेवू लागला. जेव्हा जेव्हा त्याला सिगरेट ओढण्याची तलब होई तेव्हा तेव्हा तो धुम्रपानाबद्दलचे ते लेख वाचत. ही पद्धत यशस्वी ठरली! अनेक वेळा ते लेख वाचल्यावर, तो त्याची धुम्रपानाची सवय तोडू शकला.
आज दोघे पतीपत्नी बाप्तिस्मा प्राप्त सेवक या नात्याने यहोवाची सेवा करत आहेत. परिस्थिती अनुमती देते तेव्हा तो, पूर्णवेळेचा एक सेवक म्हणून, देवाच्या राज्याच्या सुवार्तेची घोषणा करण्यात त्याचा बहुतेक वेळ खर्च करतो. शिवाय, यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानिक मंडळीत तो सेवा-सेवक म्हणून देखील कार्य करतो. तो आणि त्याची पत्नी पुनरूत्थानाची वाट पाहत आहेत जेव्हा ते एका नवीन जगात त्यांच्या मुलांचे स्वागत करू शकतील. होय, देवाचे वचन, म्हणजे बायबल जिवंत व समर्थ आहे!