सृष्टी म्हणते, ‘त्यांना कसलीही सबब सांगता येणार नाही’
“कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत. अशासाठी की, त्यांना कसलीही सबब राहू नये.”—रोमकर १:२०.
१, २. (अ) ईयोबाने यहोवाबद्दल कोणती कटु तक्रार केली? (ब) तदनंतर ईयोबाने कोणती माघार घेतली?
प्राचीन काळातील ईयोब नावाच्या मनुष्याने यहोवा देवाला अतुट सात्विकता राखल्यामुळे, सैतानाकडून त्याला खडतर परिक्षांचा सामना करावा लागला. दियाबलाने ईयोबाची सर्व भौतिक मालमत्ता गमावली, त्याने त्याच्या पुत्र आणि कन्यांवर मरण आणले आणि त्याला किळसवाण्या आजाराने पीडित केले. ईयोबाला वाटले देव ह्या आपत्तींना त्याच्यावर आणीत आहे, आणि कटुतेने त्याने यहोवाकडे तक्रार केली: “तू मला छळतोस हे तुला उचित वाटते काय . . . म्हणून तू माझा अधर्म शोधतोस व माझे पाप हुडकितोस काय? तुला तर ठाऊक आहेच की मी दुष्ट नाही.”—ईयोब १:१२-१९; २:५-८; १०:३, ६, ७.
२ याच्या काही काळानंतर, ईयोबाने देवाला म्हटलेल्या काही शब्दांनी अगदी उलट बाजू घेतली: “मला समजत नाही ते मी बोललो, ते माझ्या आटोक्याबाहेरचे अद्भुत आहे, ते मला कळले नाही. मी तुजविषयी कर्णोपकर्णी ऐकले होते. आता तर प्रत्यक्ष डोळ्यांनी मी तुला पाहत आहे. म्हणून मी माघार घेऊन धुळराखेत बसून पश्चाताप करीत आहे.” (ईयोब ४२:३, ५, ६) ईयोबाच्या वृत्तीत कशामुळे बदल झाला?
३. सृष्टीबद्दल कोणता नवीन दृष्टिकोन ईयोबाला प्राप्त झाला?
३ मध्यंतराच्या काळात, यहोवा वावटळीतून ईयोबाला सामोरा गेला. (ईयोब ३८:१) तो ईयोबाला प्रश्न विचारीत राहिला. ‘मी पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कोठे होतास? समुद्रास कवाडे लावून तो कोणी अडविला व उन्मत लहरीं थांबविल्या? तुजवर विपूल जलवर्षाव व्हावा म्हणून मेघांस तुला पुकारून सांगता येईल काय? तू कोवळी हिरवळ उगवेशी करु शकतो काय? सप्तऋषींस त्यांच्या समूहासह तुला मार्ग दाखवता येईल काय?’ ईयोबाच्या पुस्तकाच्या ३८ ते ४१ अध्यायात, यहोवाने ईयोबावर या प्रश्नांचा आणि त्याच्या सृष्टीतल्या अशा अनेक गोष्टींचा भडिमार केला. देव आणि मनुष्यात जे प्रचंड अंतर आहे ते त्याने ईयोबाला पाहण्यास लावले, देवाच्या सृष्टीत प्रकट असलेली बुद्धी आणि शक्तीची त्याने ईयोबाला आठवण करुन दिली, अशा गोष्टी ज्या ईयोबाच्या आकलन शक्तीच्या पलिकडील किंवा समजण्यापलिकडील होत्या. सर्वशक्तीमान देवाचे त्याच्या सृष्टीद्वारे प्रकट झालेले भीतीदायक सामर्थ्य आणि अविश्वसनीय बुद्धीमुळे ईयोब भारावून गेला, व असा विचार करायला लागला की यहोवासोबत त्याने केलेला वादविवाद उद्धटपणाचा होता. यास्तव त्याने म्हटले: “मी तुजविषयी कर्णोपकर्णी ऐकले होते. आता तर प्रत्यक्ष डोळ्यांनी मी तुला पाहत आहे.”—ईयोब ४२:५.
४. यहोवाच्या सृष्टीतून आम्हाला कशाचे आकलन होते, आणि जे त्याचे आकलन करण्यात उणे पडतात त्यांची परिस्थिती कशी होते?
४ अनेक शतकांनंतर पवित्र शास्त्राच्या प्रेरित लेखकाने यहोवाचे गुण त्याच्या सृष्टीवरुन ज्ञात होतात याला पुष्टी दिली. प्रेषित पौलाने रोमकर १:१९, २० मध्ये लिहिले: “देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते कारण देवाने त्यांना ते दाखवून दिले आहे. कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत अशासाठी की, त्यांना कसलीही सबब राहू नये.”
५. (अ) मनुष्याला जन्मतः कशाची गरज असते, आणि काहींनी ती अयोग्यप्रकारे कशी भागविली? (ब) अथेन्स्मधील ग्रीकांसाठी पौलाची कोणती शिफारस होती?
५ उच्च शक्तीची उपासना करण्याच्या गरजेसह जन्मतःच मनुष्याची सृष्टी केली. डॉ. के. जी. जंग यांनी त्यांच्या द अनडिस्कव्हर्ड सेल्फ पुस्तकात या गरजेचा उल्लेख “मनुष्याजवळ असलेली विशेष उपजतप्रवृत्ती आणि तिचे प्रकटन मानवी इतिहासभर केले जाऊ शकते.” असा केला. प्रेषित पौल मनुष्याच्या, उपासनेसाठी असलेल्या जन्मतःच्या आर्जवाविषयी बोलला, अथेन्स्मधील ग्रीकांनी ज्ञात आणि अज्ञात अशा देवांच्या मूर्त्या आणि वेद्या का बनविल्या याचे तो स्पष्टीकरण करतो. पौलाने त्यांना खऱ्या देवाची देखील ओळख करून दिली आणि खरा देव यहोवा याचा शोध करण्याद्वारे त्यांनी त्यांच्या जन्मतःच्या आर्जवाला उचितपणे तृप्त केले पाहिजे हे दाखवले. त्यांनी “चाचपडत चाचपडत त्याला कसे तरी प्राप्त करून घ्यावे [कारण] तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही,” असे पौलाने म्हटले. (प्रे. कृत्ये १७:२२-३०) त्याच्या सृष्टीच्या जितके आम्ही समीप असू तितक्या जवळून आम्ही त्याचे गुण आणि स्वाभाविक गुणांची पारख करु शकतो.
पाण्याचे अद्भुत चक्र
६. पाण्याच्या चक्रावरुन यहोवाच्या कोणत्या गुणाविषयी आम्ही शिकतो?
६ उदाहरणार्थ, आच्छादिलेल्या मेघात हजारो लिटर वजनाच्या पाण्याच्या क्षमतेला पाहिल्यावर यहोवाच्या कोणत्या गुणांचे आम्हाला आकलन होते? पृथ्वीच्या समृद्धीसाठी तो पाऊस देतो त्यात आम्ही त्याचे प्रेम आणि बुद्धी पाहतो. उपदेशक १:७ वचनात उद्धृत केल्यानुसार पाण्याच्या चक्रामध्ये अद्भुत रचना गोवलेली असल्यामुळे तो हे करतो: “सर्व नद्या सागराला जाऊन मिळतात तरी सागर भरुन जात नाही; ज्या स्थळी त्या जाऊन मिळतात तेथेच त्या पुनःपुन्हा वाहत राहतात.” हे कार्य कशारितीने होते याविषयी पवित्र शास्त्रातील ईयोबाचे पुस्तक स्पष्टपणे सांगते.
७. सागरातील पाणी मेघांत कसे जाते, आणि आच्छादलेले मेघ हजारो लिटर वजनाचे पाणी कसे सामावून घेतात?
७ हिवाळ्यात सागराकडे जेव्हा पाण्याचा झोत वाहतो, तेव्हा तो तेथेच थांबत नाही. यहोवा “जलबिंदू आकर्षितो; त्यांची वाफ होऊन ते पर्जन्यरूपाने पडतात.” कारण पाणी बाष्परुपात असते आणि त्यात सुक्ष्म जलबिंदू असतात. “मेघ समतोल राहतात, त्या सर्वज्ञाच्या अद्भुत कृत्यांचे मर्म.” (ईयोब ३६:२७; ३७:१६, मराठी रेफरन्स बायबल) जलबिंदू असेपर्यंत मेघ वाहत असतात: “तो आपल्या निबिड मेघांच्या आत जले कोंडून ठेवतो; आणि त्यांच्याखाली आभाळ फाटत नाही.” (पंडिता रमाबाई भाषांतर) किंवा आणखी एक भाषांतर असे म्हणते: “घनदाट मेघात तो पाणी साठवतो; पण त्यामुळे मेघ फाटत नाही.”—ईयोब २६:८, मराठी कॉमन लँग्वेज बायबल.
८. “आकाशाचे बुधले” कोणत्या दोन वेगळ्या मार्गांनी ओतले जातात आणि पाण्याचे चक्र पूर्ण होते?
८ पृथ्वीवर पाऊस पाडण्यासाठी “आकाशाचे बुधले कोण ओततो”? (ईयोब ३८:३७) त्या “सर्वज्ञाच्या अद्भुत कृत्यांनी” तो त्यांना त्या ठिकाणी ठेवतो, आणि “त्यांची वाफ होऊन ते पर्जन्यरूपाने पडतात.” धुक्यातून पावसाच्या थेंबात प्रक्रिया होण्यासाठी कशाची गरज आहे? धुळ किंवा मीठ यासारखे अतिसुक्ष्म कण असले पाहिजेत. सुक्ष्म थेंबाच्या भोवती केंद्रासारखे कार्य करण्यासाठी हवेच्या प्रत्येक घनाकार सेंटीमीटरमध्ये हजारो, लाखो ते असतात. असे अनुमान काढले आहे की मेघातील पाण्याच्या दहा लाख सुक्ष्म थेंबांचा मिळून पावसाच्या पाण्याचा सरासरी एक थेंब बनतो. ह्या सर्व प्रक्रियानंतर मेघ पृथ्वीवर पावसाच्या धारा पाडतात आणि पाणी सागराला परत जाऊन मिळते. पाण्याचे चक्र पूर्ण होते. असे हे सर्व कोणाच्या निर्देशनाविना होते का? खरोखर याला “कसलीही सबब राहत नाही!”
शलमोनाच्या बुद्धीचा एक स्रोत
९. एका जातीच्या मुंगीच्या बाबतीत कोणती उल्लेखनीय गोष्ट शलमोनाला मिळाली?
९ प्राचीन जगात, शलमोनाची बुद्धी अद्वितीय होती. त्या बुद्धीचा बहुतेक संबंध यहोवाच्या सृष्टीबरोबर होताः “[शलमोनाने] लबानोनावरील देवदारुपासून तो भिंतीतून उगवणाऱ्या एजोब झाडापर्यंत सर्व उद्भिजांचे विवेचन केले. तसेच पशू, पक्षी, रांगणारे जंतु व मासे यांचेही त्याने विवेचन केले.” (१ राजे ४:३३) याच शलमोन राजाने लिहिले: “अरे आळशा, मुंगीकडे जा तिचे वर्तन पाहून शहाणा हो; तिला कोणी धनी, देखरेख करणारा किंवा अधिपती नसता ती उन्हाळ्यात आपले अन्न मिळविते आणि कापणीच्या दिवसात आपले भक्ष्य जमा करुन ठेवते.”—नीतीसूत्रे ६:६-८.
१०. कापणी करणाऱ्या मुंग्यांबद्दल शलमोनाच्या दृष्टांताचे समर्थन कसे झाले?
१० मुंगीला, हिवाळ्यातील थंडीसाठी उन्हाळ्यात अन्न साठविण्यासाठी कोणी शिकवले? मुंग्या कापणी करतात व हिवाळ्यात वापरण्यासाठी अन्न साठवितात शलमोनाने लिहिलेल्या या अचूकतेबद्दल अनेक शतके शंका व्यक्त केली जात होती. त्यांच्या अस्तित्त्वाचा कोणाला कसलाही पुरावा मिळाला नाही. तथापि, १८७१ मध्ये एका ब्रिटीश सुष्टपदार्थवेत्त्याने, त्यांच्या खोल जमिनीतील धान्याच्या कोठारांचा शोध लावला व यामुळे पवित्र शास्त्राने सांगितलेल्या अचूकतेला समर्थन मिळाले. परंतु ह्या मुंग्यांना हिवाळ्यातील थंडी येणार आहे याची दूरदृष्टी उन्हाळ्यातच कशी प्राप्त होते आणि याबद्दल काय केले पाहिजे ही बुद्धी त्यांना कशी मिळते? यहोवाच्या सृष्टीत त्यांच्या बचावासाठी बुद्धी कार्यक्रमच तयार केलेला असतो, याचे स्पष्टीकरण स्वतः पवित्र शास्त्र करते. कापणी करणाऱ्या या मुंग्या ग्राहकांना हा त्यांच्या निर्माणकर्त्याकडून मिळालेला आशीर्वाद आहे. नीतीसूत्रे ३०:२४ याविषयी बोलते: “ते अत्यंत शहाणे आहेत.” अशी बुद्धी आपोआप येते हा तर्क करणे शहाणपणाचे नाही; यामागे बुद्धीमान निर्माणकर्ता आहे याचे आकलन करण्यास अपयशी होण्यास कसलीही सबब सांगता येत नाही.
११. (अ) सिकोआचा प्रचंड वृक्ष आश्चर्यजनक का आहे? (ब) प्रकाश संश्लेषणाच्या पहिल्या प्रक्रियेच्या बाबतीत काय आश्चर्यकारक आहे?
११ अतिशय प्रचंड असलेल्या सिकोआ झाडाजवळ उभा असलेला माणूस, त्याच्या विशालतेबद्दल आश्चर्यचकीत होतो व त्याला त्यासमोर एका लहान मुंगीप्रमाणे वाटते. या वृक्षाचा आकार आश्चर्यजनक आहे: ९० मीटर उंच, ११ मीटरचा व्यास, त्याची साल ०.६ मीटर जाडीची, त्याची मुळे तीन ते चार एकरापर्यंत पोहचलेली आहेत. तथापि, त्याच्या वाढीच्यासंबंधी आश्चर्यकारक म्हणजे यात रासायनिक आणि भौतिकशास्त्र गोवलेले आहे. याची पाने मुळांद्वारे पाणी शोषतात, हवेतून कार्बन डायोक्साइड घेतात, आणि साखर बनविण्यासाठी सूर्यापासून ऊर्जा घेतात व प्राणवायू सोडतात—या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात यात ७० रासायनिक प्रक्रियांचा समावेश असतो, व सर्वच समजल्या जात नाहीत. आश्चर्यकारकपणे, यातील पहिली प्रक्रिया सूर्याकडील योग्य रंगाच्या प्रकाशाची, व उचित लाटेची रेषा यावर आधारीत असते; असे झाले नाही तर प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेला सुरवात होण्यासाठी हरितद्रव्यांचे कण त्याला शोषणार नाहीत.
१२. (अ) सिकोआ झाडाच्या पाण्याच्या वापरासंबंधी काय उल्लेखनीय आहे? (ब) झाडाची वाढ होण्यासाठी नायट्रोजन का आवश्यक आहे आणि त्याचे चक्र कसे पूर्ण केले जाते?
१२ आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे, याची मुळे ९० मीटर उंच असलेल्या प्रचंड आकाराच्या झाडाच्या शेंड्यापर्यंत पाणी नेतात. प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक असलेल्या पाण्यापेक्षा अधिक पाणी नेले जाते. अधिक असलेले पाणी पानांच्या पृष्ठभागाद्वारे निघून बाष्पिभवनाद्वारे हवेत मिसळते. आम्हाला घाम आल्यावर जसे गार वाटते तसेच यामुळे झाडाला गार वाटते. वाढीसाठी प्रथिने तयार करण्यासाठी, साखरेत नायट्रोजन, किंवा कार्बोहायड्रेड मिसळले पाहिजे. हवेतून घेतलेले वायुरूप नायट्रोजन पाने वापरु शकत नाहीत, परंतु मातीतील घटक नायट्रोजन वायुला पृथ्वीत नायट्रिक ॲसिडपासून तयार झालेल्या व पाण्यात मिसळू शकणाऱ्या लवणात परिवर्तीत होतात, मग ते मुळाकडून पानांपर्यंत वर पोहोचते. त्यांच्या प्रथिनात ह्या नायट्रोजनचा वापर करणारे झाड व प्राणी मरतात आणि कुजतात, तेव्हा त्यातून नायट्रोजन सुटला जातो व नायट्रोजन चक्र पूर्ण केले जाते. ह्या सर्व गोष्टीत, गुंतागुंतीची किचकट रचना समाविष्ट असते, जी रचना किंवा मार्गदर्शनाविना साध्य करणे अशक्य आहे.
वाचा किंवा शब्द किंवा वाणीविना ते बोलतात!
१३. तारांगणाने दावीदाला काय जाहीर केले आणि आम्हाला देखील ते काय म्हणत आहेत?
१३ पाहणाऱ्यांना आदराने भरुन टाकणारे रात्रीच्या आकाशातील तारांगण निर्माणकर्त्याच्या अद्भुततेची किती प्रतिछाया पाडते! स्तोत्रसंहिता ८:३, ४ मध्ये दावीद त्याचे आश्चर्य व्यक्त करतो: “आकाश जे तुझे अंगुलीकार्य, व त्यांत तू नेमलेले चंद्र व तारे ह्यांच्याकडे पहावे तर मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी? य․कश्चित मानवजातीची तू पर्वा करावी?” [मराठी कॉमन लँग्वेज बायबल.] ज्यांना पाहण्यासाठी डोळे आहेत, ऐकण्यासाठी कान आहेत आणि समजण्यासाठी हृदय आहे, अशांना दाविदाला जसे बोलले त्याप्रमाणे हे तारांगण बोलते: “आकाश देवाचा महिमा वर्णिते.”—स्तोत्रसंहिता १९:१-४.
१४. आम्हासाठी एका ताऱ्याची प्रचंड शक्ती (ऊर्जा) का महत्त्वाची आहे?
१४ ताऱ्यांविषयी आम्हाला अधिक माहीत असल्यास आमच्यासोबत ते अधिक मोठ्याने बोलत असतात. यशया ४०:२६ मध्ये त्यांचे प्रचंड सामर्थ्य पाहण्यासाठी आम्हाला निमंत्रण दिलेले आहे: “आपले डोळे वर करून पाहा; ह्यांना कोणी उत्पन्न केले? तो त्यांच्या सैन्यांची मोजणी करुन त्यांस बाहेर आणतो; तो त्या सर्वांस नावांनी हाका मारतो, तो महासमर्थ व प्रबळ सत्ताधीश आहे; म्हणून त्यांपैकी कोणी उणा पडत नाही.” गुरूत्वाकर्षणाची शक्ती आणि त्यांच्यातील प्रचंड शक्ती असलेला आपला सूर्य पृथ्वीला तिचा भ्रमणमार्ग ठरवून त्यावर राहू देतो. त्याद्वारे झाडांची वाढ होते आणि आम्हाला उबदार ठेवले जाते, ह्यामुळे पृथ्वीवरील सर्वांना राहणे शक्य होते. ईश्वरी प्रेरणेने प्रेषित पौलाने म्हटले: “ताऱ्यांताऱ्यांच्या तेजात भेद आहे.” (१ करिंथकर १५:४१) विज्ञानाला, सूर्यासारख्या आमच्या पिवळ्या ताऱ्यांविषयी, तसेच निळे तारे, लाल प्रचंड तारा (पृष्ठभागावरील तापमान कमी असलेल्या व सूर्याच्या तुलनेत मोठा व्यास असलेला तारा), व्हाईट ड्र्व्फ (कमी स्वाभावीक, प्रज्वलित असलेला पांढरा तारा), न्यूट्रॉन तारे आणि स्फोट पावणारे तारे ज्यातून आकलन न करता येणारी शक्ती निघत असते याविषयी माहिती आहे.
१५. सृष्टीविषयी अनेक शोधक काय शिकले आणि अनुकरण करण्याचा प्रयत्न त्यांनी कसा केला आहे?
१५ अनेक शोधक सृष्टीपासून शिकले आहेत व त्यांनी जीवधारी प्राण्यांच्या क्षमतेची कृती करण्याचा प्रयत्न केला आहे. (ईयोब १२:७-१०) सृष्टीतील काही उल्लेखनीय गोष्टींचा जरा विचार करा. समुद्रपक्षी त्याच्या ग्रंथीद्वारे समुद्राच्या पाण्यातील मीठ काढून टाकतो; मासे, आळया, आणि कीडे शीत प्रकाश निर्माण करतात; वटवाघूळ आणि डॉलफिनस् प्रतिध्वनीचा वापर करतात; एक प्रकारच्या गांधील माशा कागद तयार करतात; पूल बांधणाऱ्या मुंग्या; एक प्रकारचे केसाळ प्राणी बंधारे बांधतात; आत तपमापक असलेले साप; पाँड नावाचा किडा शुद्ध हवेचा पुरवठा करणारी लांब नळी जी तळाशी उघडली जाते त्या शुद्ध हवा नळीद्वारे नेणाऱ्या उपकरणाचा वापर करतो; ऑक्टोपस नावाचा सागरी प्राणी फवारा बाहेर टाकणाऱ्या शक्तीचा वापर करतो; कोळी सात विविध प्रकारची कोळीष्टके करतात, चोर दरवाजा, जाळी तसेच फांस तयार करतात आणि लहानग्या कोळ्यांना त्यात फुग्याप्रमाणे बसवून हजारो किलोमीटर उंचीवरून प्रवास करतात; मासे आणि कठीण कवचाचे जलचर प्राणी पाणबुडीसारख्या तरंगणाऱ्या टाकीचा वापर करतात; आणि पक्षी, किटक, समुद्री कासव, मासे आणि सस्तन प्राणी—विज्ञानाच्या शक्तीला विवेचित करता न येणाऱ्या अफाट स्थलांतराचे अद्भुत शौर्य करुन दाखवतात.
१६. विज्ञानाने शोध लावण्याच्या हजारो वर्षाआधी पवित्र शास्त्राने कोणत्या वैज्ञानिक सत्याची नोंद केली होती?
१६ विज्ञानाला माहीत होण्याच्या हजारो वर्षांआधी पवित्र शास्त्राने वैज्ञानिक सत्याची नोंद केली आहे. मोशेच्या नियमशास्त्राने (इ.स. पूर्व १६व्या शतकात) रोगाच्या जीवांणूबद्दलची जाणीव पाश्चरच्या हजारो वर्षाआधी प्रदर्शित केली. (लेवीय, अध्याय १३, १४) इ.स.पूर्व १७व्या शतकात, ईयोबाने म्हटले: “त्याने पृथ्वी निराधार टांगली आहे.” (ईयोब २६:७) ख्रिस्ताच्या हजारो वर्षांआधी शलमोन राजाने रक्ताच्या अभिसरणाविषयी लिहिले होते; याविषयी शिकण्यासाठी वैद्यकीय विज्ञानाला १७व्या शतकापर्यंत थांबावे लागले होते. (उपदेशक १२:६) यापूर्वीच, स्तोत्रसंहिता १३९:१६ मध्ये जीवशास्त्रातील आनुवंशिक नियमाच्या निर्बंधाविषयीचे ज्ञान प्रदर्शित केले: “मी गर्भात पिंडरुपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले; आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करुन ठेवले होते.” सृष्टपदार्थवेत्त्यांना समजण्याअगोदर, इ. स. पूर्व ७ व्या शतकात, स्थलांतराविषयी यिर्मयाने, यिर्मया ८:७ मध्ये लिहिले आहे: “आकाशातील करकोची आपला नेमिलेला समय जाणते; होला, निळवी व सारस आपल्या येण्याच्या वेळेचे स्मरण ठेवतात.”
उत्क्रांतीवादी निवड करीत असलेला “निर्माणकर्ता”
१७. (अ) निर्माण केलेल्या अद्भुत गोष्टींमागे बुद्धीमान निर्माणकर्ता पाहण्यास नकार देणाऱ्या काहींविषयी रोमकर १:२१-२३ काय म्हणते? (ब) एका अर्थाने, उत्क्रांतीवादी त्यांचा “निर्माणकर्ता” म्हणून कोणाची निवड करीत आहेत?
१७ अद्भुत निर्मितीच्या मागे बुद्धीमान निर्माणकर्ता असण्याचे आकलन करण्याचा नकार करणाऱ्यांविषयी एक शास्त्रवचन म्हणते: “देवाला ओळखूनसुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत; पण ते आपल्या कल्पनांनी शुन्यवत् झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरुन गेले. स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले; आणि अविनाशी देवाच्या गौरवाची, नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद पशु व सरपटणारे प्राणी ह्यांच्या प्रतिमेच्या रुपाशी त्यांनी अदलाबदल केली.” त्यांनी “देवाच्या खरेपणाची लबाडीशी अदलाबदल केली; आणि निर्माणकर्त्याऐवजी निर्मितांची भक्ती व सेवा केली.” (रोमकर १:२१-२३, २५) हे उत्क्रांतीवादी वैज्ञानिकांसारखेच आहेत ज्यांनी खरेपणाने, काल्पनिक मालिकांतील आदिजीव—आळया- मासे- उभयचर- सरपटणारे प्राणी- सस्तन प्राणी- “एप-मनुष्य” यांचा त्यांनी “निर्माणकर्ता” म्हणून गौरव केला. तथापि, या मालिकेची सुरवात करण्यासाठी खरेपणाने अवयवयुक्त जीव असणारी एक-पेशी नाही हे त्यांना माहीत आहे. अगदी साध्या असलेल्या अवयवयुक्त जीवात दहा हजार कोटी अणू असतात, एकाचवेळी हजारो रासायनिक प्रक्रिया त्यात घडतात.
१८, १९. (अ) जीवनाचा आरंभ करण्यासाठी खऱ्या अर्थाने श्रेय कोणाला मिळाले पाहिजे? (ब) आम्ही यहोवाच्या सृष्टीला कितपत पाहू शकतो?
१८ यहोवा देव जीवनाचा निर्माणकर्ता आहे. (स्तोत्रसंहिता ३६:९) तो महान व प्रथम घडवून आणणारा आहे. त्याच्या यहोवा नावाचा अर्थ, “अस्तित्त्व घडवून आणणारा” आहे. त्याची सृष्टी आमच्या मोजमापाच्या पलिकडील आहे. निश्चितच, मानवी कल्पनेच्या लाखोपटीने अधिक आहे. स्तोत्रसंहिता १०४:२४, २५ याचा उल्लेख करते: “हे परमेश्वरा [यहोवा, न्यू.व.], तुझी कृत्ये किती विविध आहेत! ती सर्व तू सूज्ञतेने केली.” ईयोब २६:१४ याबाबतीत अगदी स्पष्ट आहे: “पाहा, ह्या त्याच्या कार्यक्षेत्राच्या केवळ सीमा आहेत, त्याची केवळ चाहूल आपल्या कानी येते; पण त्याच्या प्रभावाच्या गर्जनेचा अंत कोणाला लागेल?” आम्ही काही छटा पाहतो, आम्ही काही कुजबुजणे ऐकतो परंतु त्याच्या महान मेघगर्जनांचा आवाज पूर्ण समजणे अशक्य आहे.
१९ तथापि, त्याच्या स्वाभाविक सृष्टीतून पाहण्याऐवजी आमच्याकडे एक उत्तम स्रोत देखील आहे. तो उत्तम स्रोत त्याचे वचन पवित्र शास्त्र आहे. तो स्रोत पाहण्यासाठी आम्ही पुढील लेखाकडे जाऊ या.
तुम्हाला आठवते का?
▫ वावटळीतून यहोवाने ईयोबासोबत भाष्य केले तेव्हा तो काय शिकला?
▫ काही लोकांना सबब राहत नाही असे प्रेषित पौलाने का म्हटले?
▫ पाण्याचे चक्र कसे कार्य करते?
▫ सूर्याचा प्रकाश आमच्यासाठी कोणते महत्त्वाचे कार्य करतो?
▫ विज्ञानाने शोध लावण्यापूर्वीच पवित्र शास्त्राने कोणते सत्य प्रकट केले?