देवाच्या स्वातंत्र्यपूर्ण नव्या जगाचे उत्साहाने स्वागत करणे
“[देव] त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; यापुढे मरण हे नाही; शोक, रडणे व कष्ट हीही नाहीत.”—प्रकटीकरण २१:४.
१, २. खरे स्वातंत्र्य केवळ कोण देऊ शकतो, आणि याच्याबद्दल आपण पवित्र शास्त्रातून काय शिकू शकतो?
“मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही. पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही.” यिर्मया संदेष्ट्याने लिहिलेल्या या शब्दांची सत्यता इतिहासाने दाखवली आहे. तर मग, केवळ कोण मनुष्याच्या पावलांस मार्गदर्शन देऊ शकतो? यिर्मया पुढे म्हणतोः “हे परमेश्वरा [यहोवा, न्यू.व.] मला शिक्षा कर.” (यिर्मया १०:२३, २४) होय, मानवी कुटुंबाला पीडा देणाऱ्या समस्यांपासून केवळ यहोवाच खरी मुक्तता देऊ शकतो.
२ यहोवापाशी स्वातंत्र्य प्रदान करण्याचे सामर्थ्य आहे याबद्दल पवित्र शास्त्रात पुष्कळशी उदाहरणे आहेत. ते त्याने त्याची सेवा करणाऱ्यांच्या बाबतीत करून दाखवले. “जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले, ते सर्व आपणास शिक्षण मिळण्याकरिता लिहिले, यासाठी की, शास्त्रापासून मिळणाऱ्या सहनशीलतेच्या व समाधानाच्या योगे आपल्याला आशा प्राप्त व्हावी.” (रोमकर १५:४) यहोवाने खोट्या उपासनेवर जे न्यायदंड बजावले तेही लिहून ठेवण्यात आले आहेत, आणि हे “ज्या आपणांवर युगांचाशेवट आला आहे त्या आपल्या बोधासाठी [इशाऱ्यासाठी, न्यू.व.] लिहिल्या आहेत.”—१ करिंथकर १०:११.
आपल्या लोकांना मुक्त करणे
३. मिसरातील आपल्या लोकांना मुक्त करण्याचे सामर्थ्य यहोवाने कसे प्रदर्शित केले?
३ देव खोट्या उपासनेविरुद्ध दंडाज्ञा बजावू शकतो आणि आपल्या इच्छेप्रमाणे करणाऱ्या लोकांची मुक्तता करू शकतो याबद्दलचे एक उदाहरण प्राचीन काळी त्याचे लोक मिसरमध्ये गुलामगिरीत असताना घडले. निर्गम २:२३-२५ म्हणते की, त्यांनी “मदतीसाठी केलेला आकांत वर देवापर्यंत जाऊन पोहंचला. देवाने त्यांचा आकांत ऐकला.” मिसरच्या खोट्या दैवतांवर आपले प्रभुत्व आहे याचे अभूतपूर्व प्रदर्शन सर्वसमर्थ देवाने त्या राष्ट्रावर दहा पीडा आणून केले. प्रत्येक पीडा ही मिसरच्या एकेका दैवताची मानखंडणा करणारी होती व तिने ते खोटे असल्याचे आणि जे मिसरी त्यांची भक्ति करीत त्यांची मदत करण्यास असमर्थ असल्याचे दाखवले. अशाप्रकारे देवाने आपल्या लोकांची मुक्तता केली आणि फारो व त्याच्या सैन्यांचा तांबड्या समुद्रात नाश केला.—निर्गम अध्याय ७ ते १४.
४. कनान्यांविरुद्ध न्यायदंड बजावला हा देवाचा अन्याय का नव्हता?
४ देवाने इस्राएलांना कनानात आणताना तेथील दुरात्मिक उपासना आचरणाऱ्या रहिवाशांचा नाश केला व आपल्या लोकांना त्याने तो देश दिला. विश्वाचा सार्वभौम शासक या नात्याने यहोवाला त्या नीच धर्मांना शासन करण्याचा अधिकार आहे. (उत्पत्ती १५:१६) कनानी धर्मांबद्दल हॅले यांचे बायबल हॅडबुक म्हणतेः “कनानी दैवतांच्या भक्तीमध्ये अत्यंत बेताल नाचगाण्यांचा समावेश होता; त्यांची देवळे अनैतिक कामांची केंद्रे होती. . . . अनिर्बंधित अनैतिक वागणूक ही त्यांच्या धार्मिक विधींचा एक भाग होती; ती ते आपल्या दैवतांसमोर आचरीत; आणि मग ते आपल्या ज्येष्ठ पुत्रांचा याच दैवतांप्रीत्यर्थ यज्ञ करीत. एकंदरीत असे दिसते की, कनानचा देश राष्ट्रीय परिमाणात सदोम व गमोराचे रुप धरून होता.” ते पुढे म्हणतातः “अशा या घाणेरड्या व क्रूर वसाहतीला अस्तित्वात राहू देण्याचे काही कारण होते का? . . . कनानी शहरांचे संशोधन ज्या शास्त्रज्ञांनी केले, त्यांना, देवाने या शहरांचा आधी का नाश केला नाही याचे आश्चर्य वाटते.”
५. देवाने आपल्या प्राचीन लोकांची केलेली मुक्तता आमच्या काळासाठी कशी नमूना ठरते?
५ अशाप्रकारे, देवाने खोट्या धर्माविरुद्ध केलेली कृति, आपल्या करारबद्ध लोकांना मुक्त करणे व त्याकना वचनयुक्त देश देणे हे येणाऱ्या गोष्टींचा नमूना आहे. ते सर्व अशा नजीकच्या भविष्याकडे निर्देश करते, जेव्हा देव या जगाच्या सर्व खोट्या धर्मांना व त्यांना पाठबळ देणाऱ्यांना चिरडून टाकील आणि आपल्या आधुनिक सेवकांना नीतीमान नवीन जगामध्ये नेईल.—प्रकटीकरण ७:९, १०, १३, १४; २ पेत्र ३:१०-१३.
देवाच्या नव्या जगातील खरे स्वातंत्र्य
६. देव आपल्या नवीन जगात लोकांना काही कोणते अद्भूत स्वातंत्र्य देणार?
६ देवाने मानवी कुटुंबासाठी उद्देशिलेल्या स्वातंत्र्याच्या सर्व अद्भूत पैलूंचा आशीर्वाद तो आपल्या लोकांना नवीन जगात देईल. तेथे सर्व राजकीय, आर्थिक आणि खोट्या धार्मिक घटकांपासून स्वातंत्र्य असेल. तेथे पाप व मरण यापासून सुटका मिळून लोकांना पृथ्वीवर सदासर्वकाळ जगण्याचे भवितव्य असेल. “धार्मिक पृथ्वीचे वतन पावतील; तीत ते सर्वदा वास करतील.”—स्तोत्रसंहिता ३७:२९; मत्तय ५:५.
७, ८. नवीन जगात पूर्ण स्वरुपाच्या सुदृढ आरोग्यप्राप्तीचा कोणता अनुभव येणार?
७ ते नवे जग प्रस्थापित झाल्यावर लागलेच त्याच्या रहिवाशांना अद्भूतरित्या पूर्ण आरोग्य मिळेल. ईयोब ३३:२५ म्हणतेः “त्याचे शरीर बालकाच्यापेक्षा टवटवीत [होवो]; त्याचे तारुण्याचे दिवस त्याला पुनः प्राप्त [होवोत].” यशया ३५:५, ६ हे अभिवचन देतेः “तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील, बहिऱ्यांचे कान खुले होती; तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील.”
८ वार्धक्य तसेच अशक्तपणामुळे शारीरिक आजारांचा अनुभव करणारे तुम्ही, जरा विचार करा की, नवीन जगात दर दिवशी पहाटेच उठल्यावर तुम्हाला केवढे सुदृढ व उत्साही असल्याचे वाटू लागेल. तुमच्या शरीरावर असलेल्या सुरकुत्यांच्या जागी आता मऊ व सुदृढ कातडी दिसेल—तेव्हा त्वचेच्या कसल्याही मलमाची गरज लागणार नाही. तुमची अंधूक झालेली दृष्टी, तुमचे अंध नेत्र आता उघडले जाऊन त्यांना चांगले दिसू लागले आहे; त्यांना चष्म्याची गरज नाही. आता तुम्हाला चांगले ऐकू येते, तेव्हा ते कानांना लावलेले यंत्र काढून टाका. तुमचे पंगू झालेले पाय आता मजबूत व पूर्ण आहेत, तेव्हा काठी, कुबड्या, आणि चाकाच्या गाड्या सोडून द्या. शिवाय आता आजार देखील नाही, तेव्हा ती औषधे फेकून द्या. यशया ३३:२४ सांगतेः “‘मी रोगी आहे,’ असे एकही रहिवासी म्हणणार नाही.” तो आणखी सांगतोः “ते आनंद व हर्ष पावतील; दुःख व उसासे पळ काढतील.”—यशया ३५:१०.
९. युद्धाचे कायमचे निर्मूलन कसे केले जाईल?
९ त्या काळी कोणालाही युद्धास अर्पिले जाणार नाही. “[देव] दिगंतापर्यंत लढाया बंद करितो, तो धनुष्य मोडितो, भाला तोडून टाकितो, रथ अग्नीत जाळून टाकितो.” (स्तोत्रसंहिता ४६:९) देवाच्या राज्याचा शासनकर्ता, येशू ख्रिस्त हा पुन्हा कधीही युद्धाच्या शस्त्रांना अनुमति देणार नाही. यशया ९:६ त्याला “शांतीचा राजपुत्र” असे म्हणते. पुढचे ७वे वचन सांगतेः “त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार.”
१०, ११. संपूर्ण शांतीचा पृथ्वीसाठी कोणता अर्थ असेल?
१० युद्धांच्या शस्त्रास्त्रांपासून मोकळीक मिळाल्यामुळे तो मानवजात व पृथ्वीसाठी केवढा मोठा आशीर्वाद ठरणार! सध्या तर, मागील युद्धात वापरण्यात आलेली शस्त्रे अद्याप लोकांचा नाश करीत आहेत. एकाच राष्ट्रात म्हणजे फ्रान्समध्ये, मागील युद्धात उरलेल्या स्फोटक शस्त्रास्त्रांना निकामी करताना १९४५ पासून साधारण ६०० पेक्षा अधिक तंत्रज्ञांना ठार व्हावे लागले. बॉम्ब निकामी करणाऱ्या एका एजन्सीच्या प्रमुखाने तेथे म्हटलेः “आम्हाला अद्याप १८७० मध्ये झालेल्या फ्रान्स्को-प्रुशियन युद्धात अवशिष्ट राहिलेले जिवंत असे कॅनन बॉल्स आढळत आहेत. पहिल्या महायुद्धाच्या वेळी विषारी हातबॉम्बनी भरलेली सरोवरे अद्याप आहेत. कधी कधी एखादा शेतकरी आपला ट्रॅक्टर चालवीत असताना तो जमिनीत पेरलेल्या सुरंगाला धडकतो व मग तेच घडते; तो सुरुंग फुटतो व तो माणूस ठार होतो. हे सगळीकडे घडत आहे.” दोन वर्षाआधी द न्यू यॉर्क टाइम्सने असे विवेचन दिले होतेः “दुसरे जागतिक महायुद्ध झाल्यानंतर ४५ वर्षामध्ये [बॉम्ब निकामी करणाऱ्या गटांनी] [फ्रेंच] भूमीतून १ कोटी ६० लाख स्फोटक क्षेपणास्त्रे, ४,९०,००० बॉम्ब आणि ६,००,००० पाण्याखालील सुरुंग निकामी केले आहेत. . . . लाखो एकरात कुंपण लावलेल्या जागा आहेत, जेथे गुडघ्याभर खोलवर शस्त्रास्त्रे पुरुने ठेवली आहे व हे फलक आहेतः ‘शिवू नका; ठार व्हाल!’”
११ यापेक्षा नवे जग किती वेगळे असेल! प्रत्येकाला राहायला चांगले घर, मुबलक अन्न, आणि ही पृथ्वी उद्यानात बदलविण्याचे प्रतिफळ देणारे व शांतीचे काम असेल. (स्तोत्रसंहिता ७२:१६; यशया २५:६; ६५:१७-२५) तेव्हा लोक व पृथ्वी यांजवर लक्षावधी स्फोटक शस्त्रांचा मारा होणार नाही. हेच नवे जग येशूच्या मनात होते व याचाच उल्लेख त्याने त्याच्यावर विश्वास प्रदर्शित करणाऱ्या एका माणसला केला. त्याने म्हटलेः “तू मजबरोबर सुखलोकात असशील.”—लूक २३:४३.
जीवनासाठी गोलार्धव्याप्त शिक्षण
१२, १३. येशू तसेच यशया यांनी आमच्या काळी कोणते गोलार्धव्याप्त स्वरुपाचे शैक्षणिक कार्य होईल असे भाकित केले?
१२ देवाच्या नवीन जगाबद्दल कोणी शिक्षण घेतो तेव्हा त्याला, यहोवाने आमच्या दिवसात खऱ्या भक्तिसाठी एका जागतिक मंडळीचे संघटन निर्माण केले असल्याचेही शिकायला मिळते. ते नवीन जगाचे मूळ केंद्र असेल व देव आता याचा इतरांना त्याच्या उद्देशांची शिकवण देण्यात उपयोग करीत आहे. ही ख्रिस्ती संघटना आज अशा प्रतीचे व इतक्या प्रमाणात गोलार्धव्याप्त रुपात शैक्षणिक कार्य करीत आहे की, जे इतके पूर्वी कधी झाले नव्हते. असे कार्य होईल असे येशूने भाकित केले होते. तो म्हणालाः “सर्व राष्ट्रांस साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवितील, तेव्हा शेवट होईल.”—मत्तय २४:१४; तसेच मत्तय ६:९, १० देखील पहा.
१३ या गोलार्धव्याप्त शैक्षणिक कार्यक्रमाबद्दल यशयाने देखील भाकित केले. त्याने म्हटलेः “शेवटल्या दिवसात [आमच्या काळी] असे होईल की, परमेश्वराच्या [यहोवा, न्यू.व.] मंदिराचा डोंगर [त्याची उंचावण्यात आलेली खरी भक्ति] पर्वताच्या माथ्यावर स्थापण्यात येईल आणि त्याकडे सर्व राष्ट्रातील लोक लोटतील. देशोदेशातील लोकांच्या झुंडी जातील व म्हणतीलः ‘चला, आपण परमेश्वराच्या [यहोवा, न्यू.व.] पर्वतावर . . . चढून जाऊ. तो आम्हास आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू.”—यशया २:२, ३.
१४. आज देवाच्या लोकांची ओळख आपल्याला कशी मिळू शकेल?
१४ अशाप्रकारे, देवाच्या राज्याची साक्ष देण्याबद्दल होत असलेले गोलार्धव्याप्त कार्य हे आम्ही सध्याच्या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या अंताला आलो आहोत याचा जोरदार पुरावा आहे. त्यामुळे खरे स्वातंत्र्य आता जवळ आलेले आहे. देवाच्या नवीन जगाचा आशेने युक्त असणारा संदेश घेऊन लोकांची भेट घेणाऱ्यांचे प्रे. कृत्ये १५:१४ मध्ये “[देवाच्या] नामाकरिता लोक” असे वर्णन करण्यात आले आहे. आज यहोवाचे नाम स्वतःला लावून यहोवा व त्याच्या राज्याची गोलार्धव्याप्त साक्ष कोण देत आहेत? या २०व्या शतकाचा ऐतिहासिक अहवाल उत्तर देतोः केवळ यहोवाचे साक्षीदार. आज त्यांची संख्या ४० लाखांच्या पुढे गेली असून ते जगभर ६६,००० पेक्षा अधिक मंडळ्यात आहेत.—यशया ४३:१०-१२; प्रे. कृत्ये २:२१.
१५. राजकीय घडामोडींच्या अनुषंगानेही आपल्याला देवाच्या खऱ्या सेवकांची कशी ओळख मिळू शकते?
१५ राज्य प्रचाराच्या कामाचा भविष्यवाद यहोवाचे साक्षीदार पूर्ण करीत आहेत याचा आणखी एक पुरावा यशया २:४ मध्ये दिसतोः “ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करतील, आपल्या भाल्यांच्या कोयत्या करितील. यापुढे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर तरवार उचलणार नाहीत; ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत.” अशाप्रकारे, देवाच्या राज्याचा गोलार्धव्याप्त रुपाने प्रचार करणाऱ्यांनी ‘इतःपर युद्धकला शिकता कामा नये.’ येशूने म्हटले की, त्यांनी या ‘जगाचे नसावे.’ (योहान १७:१६) याचा अर्थ हा होतो की, त्यांनी राजकीय घडामोडीत तटस्थ असले पाहिजे, आणि राष्ट्रांच्या उलाढालीत व युद्धात बाजू घेऊ नये. मग, आज कोण या जगाचे नाहीत व युद्धकला शिकत नाहीत? पुन्हा, या २०व्या शतकाचा ऐतिहासिक अहवाल तीच साक्ष देतो की, ते केवळ यहोवाचे साक्षीदारच आहेत.
१६. देवाचा गोलार्धव्याप्त शैक्षणिक कार्यक्रम केवढा पूर्ण रुपाचा असेल?
१६ देवाने सध्याच्या दुष्ट जगाची समाप्ती केल्यावर देखील यहोवाच्या साक्षीदारांचे गोलार्धव्याप्त शैक्षणिक कार्य पुढे चालू राहील. यशया ५४:१३ म्हणतेः “तुझी सर्व मुले परमेश्वरापासून [यहोवा, न्यू.व.] शिक्षण पावतील.” हे शिक्षण इतके पूर्ण रुपाचे राहील की, यशया ११:९चे असे भाकित आहे की, “सागर जसा जलपूर्ण आहे, तशी परमेश्वराच्या [यहोवा, न्यू.व.] ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.” हे प्रगत शिक्षण या जुन्या जगाच्या अंतामधून बचावून राहिलेल्यांसाठीच नव्हे तर नवीन जगात पुढे जन्मणाऱ्या मुलांसाठी आणि पुनरुत्थानाद्वारे परत येणाऱ्या लाखो लोकांसाठीही असेल. मग, पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येकाला आपले स्वेच्छास्वातंत्र्य देवाच्या नियमांच्या चाकोरीत कसे योग्यपणे वापरावे ते शिकवण्यात येईल. आणि याचा परिणाम? “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड सुखाचा उपभोग घेतील.”—स्तोत्रसंहिता ३७:११.
सध्याही मुबलक स्वातंत्र्य
१७. मोशाने देवाच्या प्राचीन लोकांना काय करायला सांगितले?
१७ प्राचीन इस्राएली लोक वचनयुक्त देशात प्रवेश करण्याच्या बेताला मोशाने त्यांच्यासोबत बोलणी केली व म्हटलेः “मी . . . आपला देव परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] याच्या आज्ञेप्रमाणे तुम्हास विधि व नियम शिकवले आहेत, ते अशासाठी की, ज्या देशाचे वतन पावण्यास तुम्ही जात आहात त्यात तुम्ही त्याप्रमाणे चालावे. तुम्ही ते मान्य करून पाळावे; कारण तेणेकरुन देशोदेशींच्या लोकांच्या दृष्टिसमोर तुमची बुद्धि व समंजसपणा प्रगट होईल. हे सर्व विधि ऐकून ते म्हणतीलः ‘हे मोठे राष्ट्र खरोखर बुद्धिमान व समंजस लोकांचे आहे.’ आमचा देव परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] याचा आम्ही धावा करितो तेव्हा तो आमच्या समीप असतो. ज्याचा देव याप्रकारे समीप असतो असे दुसरे मोठे राष्ट्र कोणते आहे?”—अनुवाद ४:५-७.
१८. देवाची सेवा करणाऱ्यांना आताही कोणत्या स्वातंत्र्याचा अनुभव येत आहे?
१८ आजही, यहोवाची भक्ति करणारे लाखो लोक एका वचनयुक्त देशाच्या—नवीन जगाच्या—उंबरठ्यावर उभे आहेत. ते देवाचे नियम पाळीत असल्यामुळे तो त्यांच्या समीप आहे व ते लोक इतर सर्व लोकांपेक्षा वेगळेच दिसतात. यांची देवाने आधीच खोट्या धार्मिक कल्पना, वंशभेद, अनिष्ट मादक द्रव्याचे सेवन, राष्ट्रीयत्व, युद्ध आणि लैंगिकरित्या संक्रमित होणारे आजार यापासून सुटका केलेली आहे. याखेरीज, त्याने त्यांना अतूट प्रेमाच्या आंतरराष्ट्रीय बंधुत्वात एकत्रित केले आहे. (योहान १३:३५) त्यांना भविष्याबद्दलचा त्रागा वाटत नाही, उलट ते “हर्षित चित्ताने जयजयकार करतात.” (यशया ६५:१४) खरेच, देवाला आपला शासक मानल्यामुळे त्यांना केवढ्या स्वातंत्र्याचा अनुभव येत आहे!—प्रे. कृत्ये ५:२९, ३२; २ करिंथकर ४:७; १ योहान ५:३.
खोट्या विश्वासापासून इतरांची मुक्तता करणे
१९, २०. मृतांच्या स्थितीबद्दल पवित्र शास्त्र जे शिक्षण देते त्यामुळे लोकांची कशी सुटका होते?
१९ यहोवाचे साक्षीदार ज्यांना प्रचार करतात अशांपैकी पुष्कळांना या स्वातंत्र्याचा अनुभव येत आहे. उदाहरणार्थ, पूर्वजांची भक्ति केली जात आहे अशा राष्ट्रांत यहोवाचे साक्षीदार इतरांना जाहीर करतात की, मृत कोठेही जिवंत नाहीत व ते जिवंतांना काहीही इजा करू शकत नाही. साक्षीदार उपदेशक ९:५ वचन दाखवितात, जे असे म्हणतेः “आपणास मरावयाचे आहे हे जिवंतांना निदान कळत असते; पण मृतांस तर काहीच कळत नाही.” ते स्तोत्रसंहिता १४६:४ देखील दाखवतात, जे म्हणते की, मनुष्य मरतो तेव्हा “तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो, त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो.” अशाप्रकारे, पवित्र शास्त्र स्पष्ट करते की, बरे करण्याचे काम करणारा किंवा जिवंतांना दहशतीत लोटणारा असा कोणी भूताचा आत्मा किंवा अमर आत्मा नाही. या कारणामुळे, आपल्या परिश्रमाने मिळवलेला पैसा मांत्रिकांच्या सेवेखातर व इलाजास्तव खर्च करण्याची काही गरज नाही.
२० अशा प्रकारातील पवित्र शास्त्राचे अचूक ज्ञान लोकांना अग्निनरक व परगेटरी या खोट्या शिक्षणापासून मुक्त करते. मृत हे बेशुद्धावस्थेत, जणू गाढ झोपेत आहे हे सत्य लोकांना पवित्र शास्त्रातून शिकायला मिळते तेव्हा आपल्या प्रिय मृतजनांचे काय होत असणार याबद्दलची चिंता त्यांच्याठायी राहात नाही. उलटपक्षी, ते अगदी उत्कंठेने त्या अद्भूत काळाकडे आपले डोळे लावून आहेत, ज्यात पौलाने म्हटले की, “धार्मिकांचे व अधार्मिकांचे पुनः उठणे होईल.”—प्रे. कृत्ये २४:१५.
२१. पुनरुत्थितांमध्ये कोणाचा निश्चये समावेश असेल, आणि त्यांची प्रतिक्रिया बहुधा कशी असेल?
२१ मृतांचे पुनरुत्थान झाल्यावर ते अशा पृथ्वीवर जीवन व्यतित करू लागतील, जिला आदामाच्या अनुवंशिक मृत्युपासूनची मुक्तता मिळाली असेल. या पुनरुत्थित लोकांमध्ये मोलख मूर्तीस बळी देण्यात आलेली मुले, ॲझटेक दैवताला यज्ञार्पित करण्यात आलेली तरुण माणसे, आणि युद्धदेवतेला बळी दिलेली लाखो अगणित लोक असतील यात काही शंका नाही. खोट्या धर्माच्या त्या पूर्वीच्या बळींना केवढे आश्चर्य व आनंद वाटेल! असे हे पुनरुत्थित लोक आनंदाने जाहीर करतीलः “अरे मृत्यु, तुझ्या महामाऱ्या कोठे आहेत? अरे अधोलोका, [“शिओल,” न्यू.व.] तुजकडून होणारा विनाश कोठे आहे?”—होशेय १३:१४.
यहोवाचा शोध
२२. आपल्याला देवाच्या नवीन जगात राहायचे आहे तर आम्ही काय ध्यानात ठेवले पाहिजे?
२२ तुम्हाला ज्यात खरे स्वातंत्र्य अनुभवण्यास मिळणार आहे त्या देवाच्या नीतीमान नव्या जगात राहण्याची इच्छा आहे का? जर आहे, तर २ इतिहास १५:२ मधील शब्द स्वतःच्या अंतःकरणी लावाः “तुम्ही परमेश्वराच्या [यहोवा, न्यू.व.] बरोबर राहाल तोवर तो तुमच्याबरोबर राहील. तुम्ही त्यास शरण जाल तर तो तुम्हास पावेल; पण तुम्ही त्यास सोडाल तर तो तुम्हास सोडील.” शिवाय हे ध्यानात ठेवा की, तुम्ही देवाबद्दल शिकून घेण्याचे व त्याला संतुष्ट करण्याचे जे प्रांजळ परिश्रम घ्याल त्याची दखल घेतली जाईल. इब्रीयांस ११:६ म्हणते की देव, “त्याजकडे धाव घेणाऱ्याला प्रतिफळ देणारा होतो.” तसेच रोमकर १०:११ म्हणतेः “जो कोणी त्याजवर विश्वास ठेवितो तो फजीत होणार नाही.”
२३. देवाच्या स्वातंत्र्यपूर्ण नवीन जगाचे आम्ही उत्स्फुर्ततेने का स्वागत करण्यास हवे?
२३ देवाचे खरे स्वातंत्र्यपूर्ण नवे जग क्षितिजावर उभे आहे. तेथे “सृष्टि स्वतः नश्वरतेच्या दास्यत्वातून मुक्त होऊन तिला देवाच्या लेकरांची गौरवयुक्त मुक्तता मिळेल.” आणि “[देव] त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; यापुढे मरण हे नाही; शोक, रडणे व कष्ट हीही नाहीत.” (रोमकर ८:२१; प्रकटीकरण २१:३, ४) त्यावेळी यहोवा देवाचे सर्व सेवक आपली डोकी उंचावतील व आनंदाने देवाच्या स्वातंत्र्यपूर्ण नवीन जगाचा जयघोष करून म्हणतीलः ‘हे यहोवा देवा, सरतेशेवटी आम्हाला लाभलेल्या खऱ्या स्वातंत्र्यासाठी आम्ही तुझे उपकार मानतो!’
तुम्ही कसे उत्तर देणार?
▫ यहोवाने आपल्या लोकांना मुक्त करण्याची क्षमता कशी प्रदर्शित केली?
▫ देवाच्या नवीन जगात कोणकोणते अद्भूत स्वातंत्र्य अनुभवण्यास मिळणार?
▫ यहोवा लोकांना जीवनासाठी कसे शिक्षण देत आहे?
▫ यहोवाची सेवा केल्यामुळे आज देखील त्याचे लोक कोणत्या स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहेत?
[१४ पानांवरील चित्रं]
यहोवाने मिसरच्या खोट्या दैवतांवरील आपले प्रभुत्व दाखवले, आणि आपल्या उपासकांची मुक्तता केली
[१६, १७ पानांवरील चित्रं]
आज देवाच्या खऱ्या उपासकांची ओळख, ते पूर्ण करीत असलेले गोलार्धव्याप्त शैक्षणिक कार्य व त्यांनी आपणावर लावून घेतलेले त्याचे नाव यामुळे मिळते