देवाचा मित्र कोणास होता येईल?
तुम्हाला देवाचे मित्र होता येईल. सुमारे ४,००० वर्षांपूर्वी अब्राहाम हा मनुष्य यहोवा देवावर संपूर्ण विश्वास ठेवून होता. हेच त्याच्यासाठी नीतीमत्त्व असे गणले गेले व या कुलपित्याला “यहोवाचा मित्र” असे म्हणण्यात आले. (याकोब २:२३) यास्तव, तुम्ही जर यहोवावर विश्वास ठेवून असाल तर तुम्हीही देवाचे मित्र होऊ शकाल.
मित्रांना सहसा पाहुणे म्हणून जेवणास येण्याचे आमंत्रण दिले जाते. प्रत्यक्षात, २३ वे स्तोत्र या सर्व-परिचित स्तोत्रभागात, देवास प्रेमळ यजमानाचा सन्मान दिला आहे. ते म्हणतेः “तू [यहोवा] माझ्या शत्रूंच्या देखत मजपुढे ताट वाढितोस, . . . माझे पात्र काठोकाठ भरले आहे.”—स्तोत्रसंहिता २३:५.
दुसऱ्या एके प्रसंगी, तोच स्तोत्रकर्ता—प्राचीन काळच्या इस्राएलांचा राजा दावीद—विचारणा करतोः “हे यहोवा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? याचा लाक्षणिक अर्थ, यहोवाकडे प्रार्थना व भक्तीद्वारे जाणे असा आहे. केवढा हा भयावह हक्क! मग, अपूर्णावस्थेतील मानवांना देवाचे मित्र व पाहुणे कसे होता येईल बरे?
१५वे स्तोत्र याचे उत्तर देते. ज्यांना देवाचे मित्र व पाहुणे बनायचे आहे अशांसाठी ते आवश्यक अशा दहा गरजांचा उल्लेख करते. तर या, आपण २ऱ्या वचनापासून सुरवात करून एकानंतर एक अशा क्रमाने या गरजांचा विचारविनिमय करू.
“जो सात्विकतेने चालतो व नीतीने वागतो”
अब्राहाम यहोवासमोर सात्विकपणे चालल्यामुळे त्याची संतति संख्येने विपुल झाली. (उत्पत्ती १७:१, २) “चालणे” या शब्दाचा अर्थ काही वेळा जीवनातील विशिष्ठ मार्ग अनुसरणे असा होतो. (स्तोत्रसंहिता १:१; ३ योहान ३, ४) देवाचे मित्र व पाहुणे असण्यासाठी एखाद्या धर्माशी संबंधित असणे, तिच्या भव्य, शृंगारीत इमारतीमध्ये आनंद मानणे व शिष्टाचार म्हणून काही गोष्टी करणे एवढेच पुरे नाही. तसेच, “प्रभुजी, प्रभुजी” असे म्हणणाऱ्या किंवा आपण देवाला ओळखून आहोत असे जाहीरपणे सांगणाऱ्या सर्वांना देवाच्या राज्याचे आशीर्वाद मिळतीलच असे नाही. (मत्तय ७:२१-२३; तीत १:१६) यहोवाचे मित्र त्याच्यासमोर ‘सात्विकपणे वागत’ असतात व ते त्याच्या दर्जांनुरुप ‘धार्मिकता आचरतात.’—मीखा ६:८.
हे हरप्रकारची अप्रामाणिकता, लैंगिक अनैतिकता आणि भ्रष्टाचार यांना समूळ खोडून टाकते. हे असे का, ते देवच आम्हाला याप्रकारे सांगतोः “मी पवित्र आहे, यास्तव तुम्हीही पवित्र व्हा.” (१ पेत्र १:१६) तुमचा धर्म देवाच्या उच्च दर्जांना चिकटून आहे का, तसेच तो जे देवाच्या गरजांनुरुप जगण्याचे नाकारतात अशांना बहिष्कृत करतो का? आपली स्वतःची तसेच आपल्या कौटुंबिक सदस्यांची वागणूक नीतीमान असावी यावर तुम्ही जोर देऊन आहात का? तर देवाचे मित्र व पाहुणे बनण्यामध्ये जी दुसरी गरज पुढे दाखविली आहे ती तुम्ही पुरी कराल.
“आपल्या हृदयापासून सत्य बोलतो”
आम्हास देवाची मैत्री हवी आहे तर लबाडी किंवा असत्य असे आपण बोलूच शकत नाही, तसेच दुजाभाव ठेवून गुळगुळीत बोलीचा आसरा घेणार नाही. (स्तोत्रसंहिता १२:२) आम्ही ‘हृदयापासून सत्य बोलले पाहिजे,’ ते केवळ ओठांवर रेंगाळलेले नसावे. होय, आम्ही अंतर्यामी प्रामाणिक असावे आणि “निष्कपट विश्वास” याचे प्रमाण देण्यास हवे. (१ तीमथ्य १:५) काही लोक तोंड लपविण्यासाठी सर्रास खोटे बोलतात किंवा अर्धवट माहिती देतात. काही इतर शालेय परिक्षात फसवेगिरी करतात किंवा खुशाल चुकीचे करपत्रक भरतात. अशी ही कृत्ये योग्य त्या गोष्टीविषयीच्या प्रेमाची उणीव असल्याचे स्पष्ट दाखवितात. पण देवाचे मित्र असणाऱ्यांच्या अंतःकरणापासून सत्यता व नीतीकृत्ये या गोष्टी बाहेर येत असतात. (मत्तय १५:१८-२०) ते कुटिल किंवा फसवेगिरी करणारे नसतात.—नीतीसूत्रे ३:३२; ६:१६-१९.
प्रेषित पौलाने लिहिलेः “एकमेकांबरोबर लबाडी करू नका; कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसुद्धा काढून टाकले आहे; आणि जो नवा मनुष्य . . . त्याला अंगी ल्याला आहा.” (कलस्सैकर ३:९, १०) होय, जे खरोखरी अंतःकरणापासून सत्य बोलत असतात त्यांनी ‘नवे मनुष्यपण’ परिधान केलेले असते. तुमच्या बाबतीत बघता, तुम्ही स्वतःशी तसेच इतरांसोबत पूर्ण प्रामाणिक असून आपल्या अंतःकरणापासून सत्य बोलत आहात असे दिसते का? जर होय, तर मग याचा तुम्ही इतरांविषयी जे बोलाल त्याजवर परिणाम करणारे ठरेल.
“आपल्या जिव्हेने चहाडी करीत नाही”
देवाचे पाहुणे बनण्यासाठी ही गरज पूर्ण करायची आहे तर आम्ही इतरांची कधीही निंदा-नालास्ती करू नये. (स्तोत्रसंहिता १५:३) “चहाडी” या अर्थी जो इब्री शब्द येथे उपयोगात आणला आहे, तो “पाऊल” या शब्दापासून बनलेला आहे व याचा अर्थ “पावलोपावली जाणे,” किंवा “सर्वत्र पसरविणे” असा होतो. इस्राएलांना अशी आज्ञा होतीः “आपल्या लोकात इकडेतिकडे चहाड्या करीत फिरू नको; आपल्या शेजाऱ्याच्या जिवावर उठू नको. मी यहोवा आहे.” (लेवीय १९:१६; १ तीमथ्य ५:१३) आम्ही कोणाबद्दल चहाड्या करीत फिरतो, तर त्याची ती बदनामी करीत असतो. यामुळे आम्ही देवाचे मित्र होऊ शकणार नाही.
दाविदाने जाहीर केलेः “आपल्या शेजाऱ्याची गुप्तपणे चहाडी करणाऱ्यांना मी स्तब्ध करीन.” (स्तोत्रसंहिता १०१:५) आम्हीही, आम्हापाशी चहाड्या आणणाऱ्या लोकांकडे कान न देता, त्यांना स्तब्ध करू शकतो. शिवाय आम्ही एखाद्याच्या समक्ष काही बोलू शकत नाही तर त्याच्या पाठीमागेही बोलू नये हा एक उत्तम नियम ठरेल. आम्ही आपली जीभ ताब्यात ठेवली तर ते उत्तमच असेल. याचप्रमाणे आमच्या हालचालींवर देखील नियंत्रण राखून असणे केवढ्या महत्त्वाचे आहे बरे!
“आपल्या सोबत्याचे वाईट करीत नाही”
येथे येशूचे शब्द लक्षात घेण्याजोगे आहेतः “याकरता, लोकांनी जसे तुम्हाबरोबर वर्तन करावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्हीही त्यांच्याबरोबर वर्तन करावे. कारण नियमशास्त्र व संदिष्टशास्त्र यांचे सार हेच आहे.” (मत्तय ७:१२) देवाच्या कृपेचा आनंद अनुभवण्यासाठी आम्ही दुसऱ्याचे वाईट करण्यापासून दूर राहिले पाहिजे. स्तोत्रकर्ता म्हणतोः “अहो, यहोवावर प्रीती करणाऱ्यांनो, वाईटाचा द्वेष करा. तो आपल्या भक्तांचा प्राण रक्षितो, तो त्यांस दुर्जनांच्या हातातून सोडवितो.” (स्तोत्रसंहिता ९७:१०) यास्तव, आम्हास देवाचे मित्रत्व व मदत हवी आहे तर आम्ही त्याच्या दर्जांचा स्वीकार केला पाहिजे.
कोणाही व्यवहारात, व्यापारात किंवा इतर प्रकारात गैरप्रकार नसावेत हे वाईट करण्यापासून दूर राहण्यात समाविष्ट आहे. आमच्या सोबत्यांना इजा होईल असे शब्दात किंवा कृत्यात असे काही करू नये. उलट आपल्यापरिने त्याच्यासाठी जे चांगले तेच करावे. हे जीवनाच्या हर प्रकारास लागू होणारे आहे. उदाहरणार्थ, वाहन चालविताना आपण सौजन्यपूर्वकतेत पादचाऱ्यांनाही त्यांचे हक्क देऊ. आम्ही वयस्करांचे साहाय्य करू शकतो, निराश झालेल्यांना उत्तेजन व शोकग्रस्तांचे सांत्वन करू शकतो. याबाबतीत यहोवा देवाने आपले सर्वोत्तम उदाहरण ठेवले आहे. येशूने म्हटले त्याप्रमाणे देव “वाईटांवर व चांगल्यावर आपला सूर्य उगवितो, आणि धार्मिकांवर व अधार्मिकांवर पाऊस पाडतो.” (मत्तय ५:४३-४८) इतरांच्या हिताचे करण्याचा मानस राखून असण्यामध्ये आम्ही स्तोत्रकर्त्याच्या पुढील विधानानुरुप जुळणारे ठरू.
“आपल्या शेजाऱ्याची निंदा ऐकत नाही”
आम्ही सर्व चुकणारे आहोत. आमचे मित्र जेव्हा आमच्या सर्वसाधारण चुकांकडे दुर्लक्ष करण्याचे पसंद करतात तेव्हा आम्हास केवढी कृतज्ञता वाटते! पण तेच आमच्या एखाद्या जिवलग मित्राने आमच्या क्षुल्लक पण संकोचित करणाऱ्या कमतरता इतरांना उघड केल्यास आम्हाला किती निराश झाल्याचे वाटते. काही लोक स्वतःच्या चुकांकडे दुर्लक्ष व्हावे किंवा आपण इतरांपेक्षा कोणी विशेष आहोत असे भासविण्यासाठी असे करीत असतात. पण अशी ही कृत्ये देवाचे मित्र होऊ पाहणाऱ्यांना शोभत नाहीत.
“जो इतरांच्या अपराधांवर झाकण घालतो तो प्रेमाची वृद्धी करतो; पण जो गत गोष्टी घोकित बसतो त्याला मित्र अंतरतात.” असे नीतीसूत्रे १७:९ म्हणते. अर्थातच, आम्ही गंभीर चुकांवर पांघरूण घालू नये. (लेवीय ५:१; नीतीसूत्रे २८:१३) आम्हाला देवाचे मित्र बनायचे आहे तर सरळपणे वागणाऱ्या आमच्या परिचितांविषयी उठविलेल्या निंदक कथाकहाण्या “उचलून धरणार नाही,” किंवा खऱ्या मानणार नाही. (१ तीमथ्य ५:१९) यहोवाचे मित्र देवाच्या सेवकांविषयी कपोलकल्पित कहाण्या पसरविणार नाहीत; तसेच अधार्मिक लोकांद्वारे लावल्या जाणाऱ्या कुत्सिक दूषणांना अधिक रंगवून सांगत फिरणार नाही; तर प्रशंसोद्गार काढतील. देवाचे मित्र व पाहुणे आपल्या सहवासाविषयी देखील दक्षता बाळगतील, जे दावीदाने पुढे ४ थ्या वचनात सांगितले आहेः
“अधमाला तुच्छ लेखतो”
आपमतलबी फायद्यांच्या आमिषाने काही लोक श्रीमंत किंवा नामांकित व्यक्तींच्या सहवासात, मग ते भ्रष्टाचारी असले तरी, राहण्याचे पसंद करतात. (पडताळा यहुदा १६.) पण आम्ही अधमांची संगत राखल्यास देवाचे मित्र असू शकणार नाही. आम्हाला अर्धमाचा एवढा वीट वाटावा की, जे त्याला अनुसरतात अशांचा सहवास देखील नकोसा वाटावा. (रोमकर १२:९) इस्राएलाचा राजा यहोराम इतका अधम होता की, अलिशाला हे सांगावे लागलेः “ज्याच्या हुजुरास मी असतो त्या सेनाधीश यहोवाच्या जीविताची शपथ; येथे असलेला यहुदाचा राजा यहोशाफाट याला मी मान देत नसतो तर मी तुजकडे ढुंकूनही पाहिले नसते.” (२ राजे ३:१४) देवाचे मित्र बनायचे आहे तर पौलाच्या इशाऱ्याकडे लक्ष दिलेच पाहिजे की, “कुसंगतिने नीती बिघडते.”—१ करिंथकर १५:३३.
आम्हास यहोवाच्या मित्रत्वाचे मोल आहे तर आम्ही कोणाही अधमाची संगत ठेवण्यास नकार देऊ. अशांसोबत केवळ जरुरीच्या व्यवहाराचे दळणवळण ठेऊ. आमच्या मित्रांची निवड जगातील त्यांच्या मोठेपणामुळे नव्हे तर देवासोबत त्यांनी टिकविलेल्या चांगल्या भूमिकेच्या आधारावर असेल. आम्हाठायी देवाबद्दलचे आदरयुक्त भय आमचे मित्र सूज्ञपणे निवडण्यात मार्गदर्शन देईल. या संदर्भात, जी सातवी गरज, यहोवाच्या पाहुण्यांच्या बाबतीत अपेक्षित आहे, ती लक्षात घ्या.
“यहोवाचे भय बाळगणाऱ्यांचा सन्मान करतो”
देवाचे मित्र व पाहुणे असण्यासाठी आम्ही त्याचे भय धरले पाहिजे. नीतीसूत्रे १:७ म्हणतेः “यहोवाचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय.” हे “यहोवाचे भय” काय आहे? ते देवाचे आदरयुक्त भय व त्याला असंतुष्ट न करण्याची हितकारी दहशत बाळगणे, हे आहे. यामुळे सत्याचे ज्ञान, जीवन वाचविणारी शिस्त आणि स्वर्गीय सूज्ञता मिळते. ते योग्य मार्गदर्शन देते.
यहोवाचे भय मानणाऱ्यांना त्याच्या आज्ञांना चिकटून राहण्यामध्ये जरी अपमान सहन करावा लागला तरीही ते त्यामध्ये टिकून राहतात. उदाहरणार्थ, देवाचे भय बाळगणारे मेहनतीने काम करतात, कामावर प्रामाणिक राहतात किंवा इतरांचे आध्यात्मिक रितीने साहाय्य करू पाहतात तेव्हा अनेक त्यांचा उपहास करतात. पण कोणी देवभिरु अशा सरळ व्यक्तीकडे कोणत्या दृष्टीने पाहील? ‘यहोवाचे भय बाळगणाऱ्यांचा तो सन्मान करतो,’ आणि त्यांच्याखातर जरी अपमान सहन करावा लागला तरी अशांना तो उंचावून धरतो. मग, देवाचे भय बाळगणाऱ्यांविषयी तुम्ही असा आदर राखून आहात का? ईश्वरी कृपेविषयीची आणखी एक गरज प्रस्तुत करताना स्तोत्रकर्ता म्हणतोः
“आपण वाहिलेल्या शपथेने स्वतःचे अहित झाले तरी ती मोडीत नाही”
यातील तत्त्व हे आहे की, जसे देव आपले अभिवचन पुरे करतो तसे आम्हीही आमच्या वचनांची पूर्तता करावी. (१ राजे ८:५६; २ करिंथकर १:२०) आपण दिलेले वचन पूर्ण करणे अवघड आहे हे जरी नंतर आमच्या लक्षात आले तरीही आम्ही आपल्या विचारात बदल करू नये, आपले वचन मोडू नये. येथे ग्रीक भाषेतील सेप्ट्युजंट, सिरियाकमधील पेशीटा आणि लॅटिन व्हलगेटचे अवतरण म्हणतेः “शेजाऱ्यांना दिलेले वचन.” आम्ही काही करण्याची शपथ वाहिली, किंवा योग्य प्रतिज्ञा केली तर तिची फेड केलीच पाहिजे. (उपदेशक ५:४) अर्थात, ज्याचे आम्ही वचन दिले ती अशास्त्रीय गोष्ट आहे हे लक्षात आले तर मग ती आम्ही पूरी करू नये.
यहोशवाला नंतर कळाले की त्याची फसवणूक करण्यात आली, तरी त्याने गिबोनी लोकांबरोबर केलेला करार मोडला नाही. (यहोशवा ९:१६-१९) यास्तव, आम्हीही शब्द राखणारे स्त्री, पुरुष व मुले असू. आम्ही कोणाशी वचनबद्ध झालो व नंतर आम्हाला दुसरी अधिक आकर्षक संधी मिळाली तर त्यामागे धाव घेऊन इतरांना घोटाळ्यात पाडणारे असे न होण्यापेक्षा कसलीही वचनबद्धता करू नये. येशूने म्हटलेः “तुमचे बोलणे होय तर होय, किंवा नाही तर नाही एवढेच असावे.” (मत्तय ५:३७) यहोवास समर्पित असणाऱ्यांनी खासपणे त्याचे साक्षीदार म्हणून त्याची आजन्म सेवा करीत राहण्याचे वचन पूर्ण करण्यासाठी जागण्यास हवे. वचने पाळून चालण्याव्यतिरिक्त आम्ही आर्थिक बाबींविषयीचाही विचार केला पाहिजे, जे दावीद १५ व्या स्तोत्राच्या ५ व्या वचनात पुढे सांगतो.
“आपला पैसा वाढीदिढीला [व्याजाला] लावीत नाही”
पैसा उसनवारीने व्यापाराकरता देणे यामागे उद्देश हाच असू शकतो की त्याची परतफेड व्याजासह व्हावी. पण येथे दावीद कंगालास आर्थिक मदत करण्याचा उल्लेख करीत आहे. मोशाचे नियमशास्त्र खास निर्देश करून म्हणतेः “तुझ्याजवळ राहणाऱ्या माझ्या लोकांपैकी कोणी कंगाल असला व तू त्यास पैसे उसने दिले तर तू त्याजशी सावकाराप्रमाणे वागू नकोस, व त्याजपासून व्याज घेऊ नको.” (निर्गम २२:२५; लेवीय २५:३५, ३६) नेहम्यास जेव्हा कळाले की, दरिद्री सावकारांचे सावज बनले असून हालअपेष्टा सोशीत आहेत, तेव्हा त्याने या पिळवणूकीस तत्काळ बंद केले.—नेहम्या ५:१-१३.
“वाढीदिढी [व्याज]” यासाठी जो इब्री शब्द दावीदाने उपयोगात आणला तो “चावा घेणे” असा अर्थ होणाऱ्या दुसऱ्या एका शब्दापासून आहे. यावरून हे सूचित होते की लोभी सावकार दरिद्र्यांना व जे काही तुटपुंजे असेल तेही गिळण्यास पाहात असतात. हे स्पष्ट आहे की, अशा कंगालास, काही न अपेक्षिता, साहाय्य केले पाहिजे. हाच मुद्दा येशूने असा स्पष्ट केलाः “जेव्हा दुपारची किंवा सायंकाळची जेवणावळ करशील तेव्हा तू . . . दरिद्री, व्यंग, लंगडे व अंधळे यांस आमंत्रण कर; म्हणजे तू धन्य होशील. तुझी फेड करावयास त्यांजजवळ काही नाही. तरी धार्मिकांच्या पुनरुत्थानासमयी तुझी फेड होईल.” (लूक १४:१२-१४) देवाचा मित्र व पाहुणा बनू इच्छिणाऱ्यांनी आपल्या गरीब शेजाऱ्यांच्या दारिद्र्याचा कधीही गैर फायदा घेऊ नये; तर स्तोत्रकर्ता पुढे म्हणतो त्याप्रमाणे वागावे.
“निरपराध्याची हानि करण्याकरता लांच घेत नाही”
लांच ही अपभ्रष्ट करण्याचा प्रभाव राखते. इस्राएलांना हा आदेश दिला होताः “लांच घेऊ नये; कारण लांच शहाण्याचे डोळे अंधळे करते आणि धार्मिकांचे निर्णय विपरीत करते.” (अनुवाद १६:१९) कोणा “निरपराध” व्यक्तीची हानि करण्यासाठी लांच घेणे व न्यायालयातील जबानीत फेरफार करणे ही भयंकर दुष्टाई होय. लांच घेऊन निरापराध येशूचा विश्वासघात केल्यामुळे यहुदा इस्कर्योत केवढा नीच ठरला!—मत्तय २६:१४-१६.
या बाबतीत आपण निर्दोष आहोत असे कदाचित तुम्हाला वाटेल. पण कोणा पेच प्रसंगातून निभावण्याचा मार्ग विकत घेण्याचा मोह कधी तुम्हाला झाला होता का? शमुवेल संदेष्ट्याने कधीच “लांच” घेतली नाही. (१ शमुवेल १२:३, ४) आम्हाला देवाचे मित्र व त्याचे अतिथी बनायचे आहे तर मग सर्वांनी सातत्याने तशीच वागणूक ठेवली पाहिजे.
“जो असा वागतो तो कधी ढळणार नाही”
सरळ जनांबाबत दहापदरी वर्णन दिल्यावर हे १५ वे स्तोत्र वरील उद्गारांसह आपला समारोप करते. हे कदाचित आम्हाला आपल्या धर्माचे परिक्षण करण्याचे उत्तेजन देईल. तो खरा विश्वास आहे तर मग त्याने आम्हास (१) सात्विकतेने चालणे व नीतीने वागणे, (२) अंतकरणापासून सत्य बोलणे, (३) जिव्हेने चहाडी करण्याचे टाळणे, आणि (४) वाईट करण्यापासून आवर घातला पाहिजे. देवास पसंत वाटणारा धर्म (५) आम्हास सरळजन, आमच्या खास परिचयाचे असणाऱ्यांची निंदा ऐकण्यापासून किंवा ती ‘उचलून धरण्यापासून’ दूर ठेवील, तसेच (६) तिरस्करणीय अधमांची संगत टाळण्यास भाग पाडील. खरा विश्वास आम्हाला (७) यहोवाचे भय बाळगणाऱ्यांचा आदर करण्यास, (८) आम्ही दिलेले रास्त वचन पाळून चालण्यास, (९) गरीबांना व्याज न आकारता आर्थिक साहाय्य देण्यास आणि (१०) निरापराध व्यक्तीची हानि करण्यासाठी कधीही लांच स्वीकारण्याचे उत्तेजन देणार नाही.
कोणी वर नमूद असणाऱ्या गोष्टी वाचल्या, ऐकल्या, बोलल्या इतकेच काय पण मानल्या तर त्यामुळे ‘तो कधी ढळणार नाही,’ असे दावीदाने म्हटले नाही. तर असा हा अनुभव केवळ त्याच व्यक्तीला येईल, जो ‘असा वागतो व करतो.’ विश्वास क्रियांवाचून निर्जीव आहे व त्यामुळे ईश्वरी कृपा लाभत नाही. (याकोब २:२६) पण स्तोत्रसंहिता १५ मध्ये उल्लेखिलेल्या गोष्टी अनुसरणारे कधीही ढळणार नाहीत, कारण यहोवा अशांचे रक्षण करील व त्यांना उंचावील.—स्तोत्रसंहिता ५५:२२.
अर्थातच, शुद्ध भक्तीत १५ व्या स्तोत्रात उल्लेखिलेल्या दहा गोष्टींसह पुष्कळ समाविष्ट आहे. देवाची “आत्म्याने व खरेपणाने उपासना” कशी करावी ते येशूच्या शिष्यांना नंतर शिकायला मिळाले. (योहान ४:२३, २४) तुम्हालाही ते शिकता येईल, कारण या गोष्टी आचरणारे लोक आज हयात आहेत. यहोवाच्या साक्षीदारांसोबतचा नियमित रुपाचा सहवास व पवित्र शास्त्राचा अभ्यास तुम्हाठायी या पृथ्वीवरील नंदनवनात जीवन व्यतित करण्याची आशा उभारील, जेथे तुम्ही देवाचे अतिथी व त्याचे मित्र म्हणून सदासर्वकाळ वास्तव्य करू शकाल.