सूक्ष्मदृष्टी प्राप्त करण्यासाठी यहोवाकडे बघा
“मी तुला सूक्ष्मदृष्टी देईन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन.”—स्तोत्रसंहिता ३२:८.
१. एखादा निर्णय सूज्ञपणे घेतला जात आहे हे कोणकोणत्या गोष्टींनी ठरविता येते? (पडताळा अनुवाद ३२:७, २९.)
दर दिवशी आम्हाला निर्णय घ्यावे लागतात—काही तसे पाहता किरकोळ असतात, तर काही महत्त्वाचे असतात. पण आमचे निर्णय सूज्ञ ठरतील का? हे बहुतांशी आम्ही उतावीळ आहोत की कृती करण्याआधी वा काही बोलण्याआधी विचार करतो त्यावर अवलंबून असते. तरीपण अशा पुष्कळ गोष्टी आहेत ज्यात सूज्ञ निर्णय घेण्यासाठी आम्ही जे समोर दिसते त्याच्या पलिकडे पाहण्याची गरज असते. उदाहरणार्थ, सध्याच्या जागतिक घटनांचा परिणाम काय ते कदाचित जाणण्यासाठी आत्मिक क्षेत्रात काय घडत आहे त्याची आम्हाला कल्पना करता आली पाहिजे. पण हे आम्हास जमेल का? कोणा मानवाला नुसता अंदाज नव्हे तर वर नमूद असलेल्या पद्धतीने ते करणे जमेल का?
२. जीवनभर यशस्वी मार्ग चालविण्यासाठी आम्हाला कसली मदत हवी आहे व का? (नीतीसूत्रे २०:२४)
२ मानवाला मानसिक क्षमतेची अद्भूत देणगी लाभली आहे, पण त्याला देवाकडील मदतीविना जीवनभर यशस्वी मार्गाक्रमण चालविण्याची क्षमता बहाल करण्यात आलेली नाही. प्रेरित संदेष्टा यिर्मया याने लिहिलेः “हे यहोवा, मला ठाऊक आहे की, मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही; पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही.”—यिर्मया १०:२३.
३. मार्गदर्शनासाठी यहोवाकडे बघण्याचे आम्ही नाकारले तर काय परिणाम होणार? (पडताळा उत्पत्ती ३:४-६, १६-२४.)
३ या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष केले व काय सूज्ञ आहे ते किंवा बरोबर काय व चूक काय ते ठरविण्यासाठी आम्ही स्वतःवरच किंवा इतर मानवावर विसंबून राहिलो तर काय होईल? अशावेळी शारीरिक विचारसरणीने मार्गदर्शित होत राहिल्यामुळे देवाला जे वाईट दिसते त्याच गोष्टी आम्हाला आवडू लागतील व जो मार्ग मूर्खतेचा आहे असे देव म्हणतो तोच आम्हाला सूज्ञतेचा वाटू लागेल. (यशया ५:२०) हे मार्गाक्रमण जरी आम्ही अजाणपणे घेतले तरी हे इतरांना अडखळविण्याचे कारण ठरू शकते. (पडताळा १ करिंथकर ८:९.) जे यहोवाकडे मार्गदर्शनासाठी बघण्याचे सातत्याने टाळतात अशांना मिळणाऱ्या परिणामाविषयी त्याचे वचन म्हणतेः “मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो, पण त्याच्या शेवटास मृत्युपथ फुटतात.”—नीतीसूत्रे १४:१२.
४. यहोवा आपल्या सेवकांना उदारपणे कसले अभिवचन देऊन आहे? (पडताळा यिर्मया १०:२१.)
४ तर मग, आम्हाला कशाची गरज आहे? स्पष्टपणे आपल्याला यहोवाकडून मदतीची गरज आहे. यासाठीच तो म्हणतोः “मी तुला सूक्ष्मदृष्टी देईन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन. मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन.”—स्तोत्रसंहिता ३२:८.
सूक्ष्मदृष्टीमध्ये कशाचा समावेश होतो
५. “सूक्ष्मदृष्टी” म्हणजे काय?
५ तर मग, शास्त्रवचनात उल्लेखिण्यात आलेली “सूक्ष्मदृष्टी” काय आहे? ती परिस्थितीचे निरिक्षण करण्याची, जे समोर दिसते त्याच्यापलिकडे बघण्याची क्षमता आहे. थिऑलॉजीकल वर्डबुक ऑफ द ओल्ड टेस्टमेंट या ग्रंथानुसार “सूक्ष्मदृष्टी”साठी वापरण्यात आलेल्या इब्री शब्दाचा अर्थ, कोणत्याही गोष्टीविषयी “विचारविनिमय करण्याचे बौद्धिक ज्ञान” असा होतो. हे अशा प्रकारचे ज्ञान आहे जे त्या माणसाला सूज्ञपणे हालचाल करण्यास व यश संपदित करण्यास समर्थ बनवते. या मूलभूत अर्थाच्या सहमतात तसेच त्या इब्री क्रियापदातील भाव व्यक्त करण्यासाठी न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ‘सूक्ष्मदृष्टी असणे’ या बरोबरच ‘बुद्धीपूर्वक हालचाल करणे,’ ‘चतुर असणे,’ तसेच ‘यशप्राप्ती मिळविणे’ या अर्थाच्या संज्ञा देते.—स्तोत्रसंहिता १४:२.
६. “आपली वाणी स्वाधीन” ठेवणारा बुद्धीमानपूर्वक किंवा सूक्ष्मदृष्टीने हालचाल करीत असतो असे का म्हटले जाऊ शकते?
६ अशाप्रकारे “आपली वाणी स्वाधीन” ठेवणाऱ्याला “बुद्धीपूर्वक हालचाल करणारा,” किंवा सूक्ष्मदृष्टी असणारा असे म्हटलेले आहे. (नीतीसूत्रे १०:१९) असा माणूस बोलण्याआधी विचार करतो. त्यावेळी तो हे लक्षात आणतो की, तो जे काही म्हणणार त्याचा इतर कसा अर्थ घेणार; तसेच तो दुसऱ्या व्यक्तीवषयी जे काही म्हणणार ते सूज्ञ, प्रेमळ व आवश्यक असे असणार का. (नीतीसूत्रे १२:१८; याकोब १:१९) यहोवाकडील मार्गाविषयीच्या प्रेमाने भारावल्यामुळे तसेच सहमानवाला मदत देण्याची त्याची खरी इच्छा असल्यामुळे तो जे म्हणत असतो ते इतरांसाठी उभारणीकारक असते.—नीतीसूत्रे १६:२३.
७. चतुराईने कार्यसिद्धी करणारा अशी ख्याति दाविदाला कशामुळे मिळू शकली?
७ इशायचा पुत्र दावीद याच्याविषयी असे लिहिण्यात आलेः “जिकडेजिकडे शौल दाविदास पाठवी तिकडेतिकडे जाऊन तो चतुराईने कार्यसिद्धि करी,” किंवा सूक्ष्मदृष्टी राखी. दावीदाने हे ओळखले की, त्याच्या कामात योद्ध्यातील लढाईपेक्षा अधिक गोवलेले होते. त्याने हेही ओळखले की, तो व त्याच्याबरोबर असणारी माणसे यहोवाच्या युद्धात सामील होते. या कारणासाठीच दाविदाने मार्गदर्शन व आशीर्वादासाठी यहोवाकडे आपली दृष्टी लावली. (१ शमुवेल १७:४५; १८:५; २ शमुवेल ५:१९) याचा परिणाम हा दिसला की, दाविदाने हाती घेतलेल्या मोहिमा यशस्वी झाल्या.
८. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनात ‘सूक्ष्मदृष्टी असणे’ याचा अनुवाद करताना कोणकोणत्या कल्पना कळविण्यात आल्या आहेत?
८ ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनात ‘सूक्ष्मदृष्टी असणे’ या क्रियापदाचे ‘चा अर्थ समजणे,’ आणि ‘कळणे’ अशा पद्धतीने अनुवाद करण्यात आला आहे. (रोमकर ३:११; मत्तय १३:१३-१५; इफिसकर ५:१७) देव आपल्या सेवकांना या गोष्टी करण्याची क्षमता पुरविण्याचे अभिवचन देतो. पण तो ही सूक्ष्मदृष्टी त्यांना कशी प्रदान करतो?
यहोशवाला कशी सूक्ष्मदृष्टी मिळाली
९. प्राचीन इस्राएलात यहोवाने लोकांना कशी सूक्ष्मदृष्टी प्रदान केली?
९ प्राचीन इस्राएलात यहोवाने लेव्यांनी त्याच्या राष्ट्राला त्याचे नियमशास्त्र शिकवावे अशी त्यांना नियुक्ती दिली होती. (लेवीय १०:११; अनुवाद ३३:८, १०) हे नियमशास्त्र देवाकडील प्रेरित होते; तसेच ते शिकवण्यासाठी जी संघटनात्मक व्यवस्था करण्यात आली होती तिजवर यहोवाचा आत्मा कार्यवाहित होता. (मलाखी २:७) याकरवी यहोवाने ‘इस्राएलांना चतुराई दिली,’ किंवा सूक्ष्मदृष्टी दिली असे नेहम्या ९:२० मध्ये सांगण्यात आले.
१०, ११. (अ) यहोशवा १:७, ८मध्ये दाखविल्यानुसार यहोशवाला कशामुळे सूक्ष्मदृष्टी लाभणार होती? (ब) शिक्षणासाठी करण्यात आलेल्या कोणत्या तरतुदीविषयी त्याने रसिकता बाळगणे महत्त्वाचे होते? (क) याचप्रमाणे यहोशवाकडून देखील कोणत्या व्यक्तीगत प्रयत्नांची अपेक्षा होती?
१० पण त्या राष्ट्रातील वैयक्तीकांना सूक्ष्मदृष्टीने वागता येणे शक्य होते का? यासाठी त्यांनी व्यक्तीशः काही करायचे होते. वचनयुक्त देशात इस्राएलांना घेऊन जाण्याचे नेतृत्व करण्याची जबाबदारी यहोशवाला सोपविली गेली तेव्हा यहोवाने त्याला म्हटलेः “तू खंबीर हो व खूप हिंमत धर, आणि माझा सेवक मोशे ह्याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ; ते सोडून उजवीडावीकडे वळू नको, म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होशील. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे; त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशःप्राप्ती घडेल.” “यशस्वी,” व “यशप्राप्ती” यासाठी जो इब्री शब्द वापरण्यात आलेला आहे त्याचा अर्थ “सूक्ष्मदृष्टीने हालचाल करून यश संपादणे” असाही होतो.—यहोशवा १:७, ८.
११ यहोवा ही सूक्ष्मदृष्टी यहोशवाला कशी देणार होता? कोणाही अद्भूत चमत्काराने नव्हे. देवाचे लिखित वचन ही त्यामागील गुरुकिल्ली होती. यहोशवाने आपले मन व अंतःकरण या वचनांनी भरण्याची जरूरी होती, त्याचे नियमित रुपात वाचन व मनन करणे जरूरीचे होते. नियमशास्त्राचे शिक्षण लेव्यांकडून मिळणार हे देवाच्या वचनात सांगितले असल्याचे यहोशवाला ठाऊक होते. यासाठीच, त्याने स्वतःला फटकून राहू देण्याचे व नियमशास्त्रातील अर्थ स्वतःच लावण्याचे टाळणे किती आवश्यक आहे हे जाणून घेणे जरुरीचे होते; कारण त्याच्यावर राष्ट्राची जबाबदारी देण्यात आली होती. (नीतीसूत्रे १८:१) तेव्हा यहोशवाने देवाच्या लिखित वचनाचा परिश्रमी अभ्यास करणे महत्त्वाचे होते. ते त्याने केले, कोणताही भाग दुर्लक्षिला नाही, तसेच त्याचे पालन केले तर मग, त्याची हालचाल सूक्ष्मदृष्टीची असणार होती.—पडताळा १ राजे २:३.
आज यहोवा सूक्ष्मदृष्टी कशी देतो
१२. यहोवा पुरवीत असलेल्या सूक्ष्मदृष्टीचा लाभ मिळविण्यासाठी आम्ही कोणत्या तीन गोष्टी केल्या पाहिजे?
१२ यहोवाने आपल्या सेवकांनी सूज्ञतेने वागावे यासाठी आमच्या काळापर्यंत त्यांना मार्गदर्शन दिले आहे. या मार्गदर्शनापासून लाभ मिळविण्यासाठी आम्हाला व्यक्तीशः या विविध गोष्टी आचरल्या पाहिजेतः (१) यहोशवाप्रमाणेच आम्हालाही यहोवाच्या संस्थेविषयीची रसिकता वाटली पाहिजे. आमच्या बाबतीत ही रसिकता अभिषिक्त जणांची ख्रिस्ती मंडळी, “विश्वासू व बुद्धीमान दास” व त्याचे नियमन मंडळ यांना आवश्यक ते सहकार्य देण्यात दिसली पाहिजे. (मत्तय २४:४५-४७; पडताळा प्रे. कृत्ये १६:४.) ही रसिकता सभांच्या नियमित उपस्थितीत दिसली पाहिजे. (इब्रीयांस १०:२४, २५) (२) आम्ही देवाच्या वचनाचा तसेच या वचनाचे स्पष्टीकरण समजण्यासाठी “दास” वर्गाने पुरविलेल्या प्रकाशनांचा वैयक्तीकपणे परिश्रमी अभ्यास करावयास हवा. (३) आम्ही शिकलेल्या गोष्टींचे अवलंबन आम्हाला आमच्या जीवनात कसे करता येईल आणि इतरांनाही याविषयीची कोणती मदत देता येईल त्यावर मनन करण्यासाठी वेळ देणे जरुरीचे आहे.
१३. यिर्मया ३:१५ मध्ये जे अभिवचन देण्यात आले आहे त्याचा अर्थ काय?
१३ आज आमच्या काळी यहोवा जी देखरेख तसेच आध्यात्मिक भरवणूक देणार होता त्याविषयी त्याने यिर्मया ३:१५ मध्ये म्हटलेः “मी तुम्हास माझ्या मनासारखे मेंढपाळ देईन; ते तुम्हास ज्ञान व अक्कल [सूक्ष्मदृष्टी] ह्यांनी तृप्त करतील.” होय, या आध्यात्मिक भरवणूकीच्या कार्यक्रमामुळेच आम्हाला परिस्थितीचे निरिक्षण करण्यास व कोणता मार्ग चोखाळावा की ज्यामुळे यशप्राप्ती मिळू शकेल ते निश्चित करण्याची अप्रतिम क्षमता संपादित करण्यास मदत मिळू शकेल. तर मग, या सूक्ष्मदृष्टीचा स्रोत कोण आहे? स्वतः यहोवा देव.
१४. ‘विश्वासू दास’वर्गाला सूक्ष्मदृष्टी का आहे?
१४ ‘विश्वासू दास’ याला ही सूक्ष्मदृष्टी कशी लाभली आहे? कारण त्यांनी देवाच्या वचनाचा काळजीपूर्वक अभ्यास करून त्याच्या मार्गदर्शनाला अनुसरले आहे. त्यांनी यहोवाच्या मार्गदर्शनाअधीन स्वतःला केले असल्यामुळे यहोवाने आपला आत्मा त्यांना दिला आहे व त्यांचा आपल्या उद्देशानुरुप उपयोग करून घेत आहे. (लूक १२:४३, ४४; प्रे. कृत्ये ५:३२) प्रेरित स्तोत्रकर्त्याने फार काळाआधी हे लिहिले होतेः “माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मी अधिक सूक्ष्मदृष्टीचा आहे; कारण मी तुझ्या निर्बंधांचे सतत मनन करतो.”—स्तोत्रसंहिता ११९:९९.
१५. (अ) “दास” वर्ग आपल्याला जी सूचना सातत्याने देत असतो त्यातील सारांश काय आहे? (ब) रक्त संक्रमणाविषयी ख्रिस्ती दृष्टीकोन कोणता असावा याविषयी आवश्यक असणारे “सूज्ञान व सूक्ष्मदृष्टी” “दास”वर्गाला कित्येक वर्षांआधी कशी मिळू शकली?
१५ काय करणे योग्य आहे अशी जेव्हा विचारणा होत असते तेव्हा “विश्वासू व बुद्धीमान दास” याचा नेहमी हाच सल्ला आहेः ‘पवित्र शास्त्रात जे लिहिले आहे त्याचा अवलंब करा. यहोवावर भाव ठेवा.’ (स्तोत्रसंहिता ११९:१०५; नीतीसूत्रे ३:५, ६) रक्त संक्रमण हा एक दर्जेदार वैद्यकीय उपचार म्हणून लोकांत संमत झाला व तो यहोवाच्या साक्षीदारांपुढे एक वादग्रस्त प्रश्न बनला तेव्हा द वॉचटावर मासिकाच्या जुलै १, १९४५ च्या अंकाने रक्ताच्या पावित्र्याविषयीच्या ख्रिस्ती धोरणास स्पष्ट केले. त्याने हे दाखविले की, ईश्वरी मनाईहुकुमामध्ये प्राणी तसेच मानवाचे रक्तही समाविष्ट आहे. (उत्पत्ती ९:३, ४; प्रे. कृत्ये १५:२८, २९) त्या लेखात कोणते शारीरिक परिणाम उद्भवतील त्यांची चर्चा नव्हती; कारण याविषयीची माहिती त्याकाळी मर्यादित होती. देवाच्या कायद्यास आज्ञाधारकता हा त्यामागील वादविषय तेव्हा होता व आजही आहे. आज लोकांना रक्त संक्रमणास नकार देण्यामागील व्यवहारिक सूज्ञानाची किंमत कळली असून त्याचा स्वीकार अधिकाधिक लोकांकरवी होत आहे. पण एवढ्या काळापर्यंत यहोवाचे साक्षीदार सूक्ष्मदृष्टीने वागू शकले कारण त्यांनी आपल्या निर्मात्यावर भाव ठेवला होता. कोणा माणसापेक्षा केवळ त्यालाच रक्ताविषयीचे जास्त ज्ञान आहे.
१६. लैंगिक नैतिकता, एक-पालकीय कुटुंब आणि नैराश्य यावर वॉचटावर मध्ये देण्यात आलेला सल्ला गरजेनुरुप होता हे का घडले?
१६ लैंगिक आचरणाविषयीची मुक्त प्रवृत्ती लोकांमध्ये वाढू लागली तेव्हा द वॉचटावर मासिकाने लोकात प्रसिद्ध असणाऱ्या मार्गाचा बोध करण्याऐवजी सबळ शास्त्रवचनीय मार्गदर्शन दिले. हेच आज बहुतेकांना यहोवासोबत असणारे आपले मूल्यवान नाते सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच क्षणिक सुखोपभोगाऐवजी दीर्घकालीन सौख्यानंदाकडे आपले लक्ष देण्यासाठी साहाय्यक ठरत आहे. याचप्रमाणे, वॉचटावरमध्ये एक-पालकीय कुटुंबाकरता आणि नैराश्यासोबत सामना देणाऱ्या लोकांसाठी देण्यात आलेले लेख, ज्यांना यहोवाचे विचार मोलवान वाटत होते व जे त्याजकडे कळकळीने प्रार्थित होते की, “तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकीव; कारण तू माझा देव आहेस,” अशांना सूक्ष्मदृष्टी देणारे ठरले.—स्तोत्रसंहिता १४३:१०; १३९:१७.a
१७. (अ) १९१४ या वर्षाबद्दल यहोवाच्या सेवकांना काही दशकाआधीच काय कळू शकले? (ब) देवाच्या लोकांना १९१४ नंतर ज्या प्रश्नांचा सामना करावा लागला त्याविषयीची सविस्तर माहिती उपलब्ध होती तरी त्यांना असे काय ठाऊक होते ज्यामुळे त्यांच्या जीवनाला सबळ मार्गदर्शन मिळाले?
१७ यहोवाने “विश्वासू व बुद्धीमान दास” याजमार्फत कित्येक दशकांआधी त्याच्या सेवकांना हे कळू दिले की, १९१४ हे वर्ष विदेश्यांच्या काळाची समाप्ती करणारे वर्ष ठरेल. (लूक २१:२४) पहिल्या जागतिक महायुद्धानंतरच्या युगात प्रवेश केल्यावर त्यांना भांबावून टाकणारे कित्येक प्रश्न आले. पण त्यांना जे काही ज्ञात होते ते सूज्ञ हालचाल करण्यास पुरेसे होते. त्यांना शास्त्रवचनाद्वारे हे कळले की, देवाने या दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश करण्याची वेळ आली आहे, त्यामुळे जगाच्या यशप्राप्तीविषयक असणाऱ्या भौतिक दर्जांना आपल्या जीवनास वळण लावू देणे व त्याच्यावर आपली भिस्त ठेवणे हे मूर्खपणाचे आहे असे समजले. मानवजातीस संत्रस्त करणाऱ्या सर्व समस्यांचे खरे निवारण केवळ यहोवाचे राज्यच करू शकते हे त्यांना ठाऊक होते. (दानीएल २:४४; मत्तय ६:३३) यहोवाचा अभिषिक्त राजा ख्रिस्त येशू व त्याचे राज्य यांची घोषणा करण्याची सर्व खऱ्या ख्रिश्चनांवर जबाबदारी आहे हे देखील त्यांनी ओळखले. (यशया ६१:१, २; मत्तय २४:१४) १९२५ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या “राष्ट्राचा जन्म” या लेखाकरवी प्रकटीकरणाच्या १२ व्या अध्यायाच्या स्पष्ट समजूतीमुळे त्यांना दृढ केले गेले व यामुळेच स्वर्गात मानवी नेत्रांना अदृश्य असणारे असे काय घडत आहे त्याची समज त्यांना मिळू शकली. अशा या सूक्ष्मदृष्टीमुळे त्यांच्या जीवनाला सबळ मार्गदर्शन मिळाले.
१८. आम्हाला आता कोणती सुसंधि व जबाबदारी आहे, आणि आम्ही कोणते प्रश्न स्वतःला विचारावेत?
१८ तेव्हा साक्षीदार या नात्याने यहोवाची सेवा करणारे जे थोडे हजार जन होते त्यांनी देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रसार जगातील सर्व भागात नेण्यासाठी पुढाकार घेतला. याचा परिणाम, लाखो लोकांना यहोवाची समज घडून ते त्याच्यावर प्रीती करू लागले व यांना सार्वकालिक जीवनाचे भवितव्य लाभले. त्यांच्या प्रेमळ परिश्रमामुळे ज्या आम्हाला सत्य मिळू शकले त्या आम्हास या कामात आम्हीही सहभागी होण्याचा, भेटणाऱ्या प्रत्येक माणसाला कसून साक्ष देण्याचा व यहोवा सांगेपर्यंत त्याचे काम करीत राहण्याचा हक्क आहे हे दाखविण्यात आले. (प्रकटीकरण २२:१७; पडताळा प्रे. कृत्ये २०:२६, २७.) अशाप्रकारे यहोवाने आपल्या दृष्य संस्थेकरवी जे मार्गदर्शन दिले आहे त्याविषयीची रसिकता आपणाठायी आहे हे तुम्ही आपले जीवन ज्या पद्धतीने जगत आहात त्याकरवी दिसून येते का?
१९. (अ) यहोवा आपल्या संस्थेकरवी जी सूक्ष्मदृष्टी देत आहे त्याची रसिकता व्यक्त करणाऱ्या एकाच्या जीवनाचे उदाहरण द्या. (ब) या उदाहरणाकडून आपण काय शिकतो?
१९ पृथ्वीवर सर्वत्र राहणाऱ्या मोठा लोकसमुदायाच्या जीवनाकडे पाहिल्यास वरील प्रश्नाचे उत्तर होय, असेच मिळू शकेल. उदाहरणार्थ, जॉन कटफोर्थ यांचा विचार करा. साधारण ४९ वर्षांपूर्वी त्यांनी, ‘विश्वासू दास’ याने ज्या शास्त्रवचनीय सल्ल्याकडे तेव्हा लक्ष वेधविले आणि आजही वेधवीत आहे, त्याला आपल्या अंतःकरणी बिंबविले. तो सल्ला असाः “तुम्ही प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळविण्यास झटा; म्हणजे याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हास मिळतील. ह्यास्तव उद्याची चिंता करू नका.” (मत्तय ६:३३, ३४) यहोवाच्या सेवेतील पुष्कळ वर्षांच्या अनुभवानंतर बंधु कटफोर्थ यांनी म्हटलेः ‘माझ्या मनावर ज्या गोष्टी मोठ्या जोरदारपणे बिंबविण्यात आल्या त्यापैकी एक ही की, यहोवाची येथे या पृथ्वीवर संस्था आहे, तो तिचे मार्गदर्शन करीत आहे. मला व्यक्तीशः या संस्थेसोबत मिळून कार्य करता येणे शक्य आहे आणि तिचे मार्गदर्शन व नेतृत्व मी पूर्णपणे अनुसरल्यास मला शांती, समाधान, तृप्ती, पुष्कळ मित्र आणि इतर समृद्ध आशीर्वाद मिळतील.’ ही मनोभावना, त्यांनी अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया व पापुआ न्यू गिनिआ येथे जे आध्यात्मिक आशीर्वादांनी युक्त असे समृद्ध जीवन घालविले त्याकरवी मोठ्या हर्षितपणे तृप्त झाली.b होय, आज आम्हा सर्वांसाठी सूज्ञ मार्ग हाच की, यहोवा आपल्या लोकांना सूक्ष्मदृष्टी ज्या माध्यमाने देत आहे त्याविषयी आपली रसिकता प्रवर्तित करणे.—मत्तय ६:१९-२१.
सूक्ष्मदृष्टी गमावली जाऊ नये याची दक्षता घ्या
२०, २१. (अ) काही लोकांनी एकेकाळी त्यांच्यापाशी असणारी ईश्वरी सूक्ष्मदृष्टी कशी गमावली? (ब) घातक मार्ग धरण्यापासून काय आमचे संरक्षण करील?
२० यहोवा जी सूक्ष्मदृष्टी प्रदान करीत आहे ती बहुमोल खजिन्यासमान आहे. तिचा नीटपणे संभाळ केला जाण्यास हवा. यासाठीच आम्ही याची दखल घेण्यास हवी की, ज्या मार्गाक्रमणामुळे आम्हाला ईश्वरी सूक्ष्मदृष्टी मिळालेली आहे त्यामध्ये टिकून न राहिल्यास ही सूक्ष्मदृष्टी गमावली जाऊ शकते. काहींना याचा अनुभव आला हे दुःखद आहे. (नीतीसूत्रे २१:१६; दानीएल ११:३५) त्यांच्या अंतःकरणाला जाऊन भिडलेल्या शिस्तीचा जेव्हा त्यांनी नकार केला तेव्हा ते आपल्या दृष्टीने जे करीत होते त्याचे समर्थन करू लागले. गर्वाने त्यांच्यावर पाश टाकला. त्यांना, देवाचे वचन जे वाईट असल्याचे म्हणते तेच चांगले दिसू लागले, व यामुळेच ते यहोवाच्या संस्थेपासून दूर झाले. किती ही दुःखदायक घटना!
२१ अशा व्यक्तीची परिस्थिती स्तोत्रसंहिता ३६:१-३ नुसारची आहे, जेथे आम्ही वाचतोः “दुर्जनांच्या अंतःकरणातून अधर्माचा ध्वनि निघत असतो.” याचा अर्थ हा की, त्याचे स्वार्थी विचार व इच्छा त्याला अधर्म करण्यास प्रवृत्त करीत असतात. “त्याच्या दृष्टीपुढे देवाचे भय नाही,” असे स्तोत्रकर्ता पुढे म्हणतो. “आपले पाप उघडकीस येणार नाही, त्याचा कोणी तिटकारा करणार नाही, अशी तो आपल्या मनाची समजूत करून घेतो. त्याच्या तोंडचे शब्द अनीतीचे व कपटाचे असतात.” पण यामुळे त्याच्यावर काय परिणाम घडतो? ‘तो सद्वर्तन करण्यासाठी आवश्यक असलेली सूक्ष्मदृष्टी सोडून देतो.’ आपण करतो तेच चांगले अशी तो स्वतःची भावना करतो व तेच अनुसरावे अशी दुसऱ्यांना शिफारस करू लागतो. यासाठीच, आम्हाठायी केवळ सूक्ष्मदृष्टी हवी आहे इतके नसून यहोवाने ज्या माध्यमाने ती आम्हाला दिली आहे तिच्याविषयी रसिकता दाखवून तिचे जतन करणे हे केवढे महत्त्वपूर्ण आहे बरे!
[तळटीपा]
a १९३०-१९८५ च्या वॉचटावर पब्लिकेशन्स इंडेक्स मध्ये “मॅरेज,” “फॅमिलिज्,” “मॉरल ब्रेकडाऊन” आणि डिप्रेशन (मेंटल)” या शीर्षकाखालील माहिती पहा.
b द वॉचटावर जून १, १९५८ चा अंक, पृष्ठे ३३३-६ पहा.
तुम्हाला काय आठवते?
◻ सूज्ञ निर्णय घेण्यासंबंधाने काय आम्हाला मदत करील?
◻ “सूक्ष्मदृष्टी” यात कशाचा समावेश होतो?
◻ आमच्या काळात यहोवा त्याच्या सेवकांना कशी सूक्ष्मदृष्टी देत आहे?
◻ यहोवा देत असलेल्या सूक्ष्मदृष्टीकडून जर लाभ मिळवावयाचा आहे तर आम्ही आपल्यापरिने काय केले पाहिजे?
[२८ पानांवरील चित्रं]
यहोवा देत असलेल्या सूक्ष्मदृष्टीकडून लाभ मिळविण्यासाठी आम्हाला संस्थेविषयीची रसिकता वाटली पाहिजे, व्यक्तीगत अभ्यासात परिश्रम घेण्यास हवेत आणि जे शिकलो त्याचा कसा अवलंब केला पाहिजे त्यावर मनन केले पाहिजे