वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w86 ६/१ पृ. १०-१४
  • “तुम्ही पृथ्वीचे मीठ आहा”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “तुम्ही पृथ्वीचे मीठ आहा”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • उपशिर्षक
  • “मिठाने रुचकर”
  • “तुम्ही आपणामध्ये मीठ असू द्या”
  • “पृथ्वीचे मीठ”
  • मीठ कुजण्यापासून संरक्षण देते
  • टिकाऊपणा व निष्ठावंतपणा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
w86 ६/१ पृ. १०-१४

“तुम्ही पृथ्वीचे मीठ आहा”

“तुम्ही पृथ्वीचे मीठ आहा, पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल?”—मत्तय ५:१३.

१. मीठ हे काय आहे?

मीठ हा एक आश्‍चर्यकारक पदार्थ आहे. रासायनिकदृष्टया तो सोडियम हा असामान्य धातु व क्लोरिन या विषारी वायूचे मिश्रण आहे. हे दोन घातकी घटक एकत्र येऊन त्याचा एक किफायतशीर पदार्थ बनतो ही निर्माणकर्त्याने मानवजातीच्या भल्यासाठी पुरविलेली अद्‌भूत तरतूद होय.—स्तोत्रसंहिता १०४:२४.

२. मीठ कुजण्यापासून संरक्षण देते व टिकाऊपणा देते हे कसे विदीत करता येईल?

२ मीठाविषयी एक लक्षणीय गोष्ट अशी की ऱ्‍हास किंवा कुजण्यापासून तो चांगले संरक्षण देतो. याविषयाचे एक उदाहरण म्हणजे, एका माणसाने वधिलेल्या दोन मेंढरांची लोकर आपल्या मोटारगाडीच्या मागच्या भागाला ठेवली व तो कडक उन्हात आफ्रिकेत लांब पल्लयाच्या प्रवासाला लागला. प्रवास संपल्यावर त्याने ती लोकर बाहेर काढली तेव्हा काय दिसले? त्याची फारच दुर्गधि येत होती आणि सर्वत्र किडे वळवळत होते! तरीपण लोकरीला धुतले गेले व त्यावर चांगले मीठ चोळले गेले. परिणाम काय झाला? ही लोकर इतकी मऊ झाली की तिचा बिछान्यालगतचे अंथरूण या अर्थी कित्येक वर्षे वापर केला गेला.

३. मिठाचे मोल व उपलब्धता याविषयी काय म्हणता येईल?

३ अशाप्रकारे हे स्पष्ट आहे की मीठ हे एखादी गोष्ट टिकविण्याच्या कामी फार उपयुक्‍त आहे. त्याच्यात आणखी काही गुण आहेत. प्राचीन चीमध्ये तर त्याची किंमत सोन्यानंतर होती. “मीठ” यासाठी असणारा लॅटिन शब्द साल आहे आणि रोमी साम्राज्यकाळात सैन्याला त्यांच्या पगाराचा (सॅलरीम) काही अंश मीठाच्या रूपात मिळत असे. यापासूनच “सॅलरी” हा इंग्रजी शब्द निष्पण्ण झाला. आज बहुतेक ठिकाणी मीठ हे अर्थातच सर्वसाधारण व स्वस्त बनले आहे. समुद्रात ४५ लाख घन मैल (१ कोटी ९ लाख घन कि.मी.) मीठ आहे ज्यामुळे सबंध अमेरिका खंड एक मैलभर (१.६ कि.मी.) डुबू शकतो! येशू ख्रिस्त पृथ्वीवर असताना मीठ मुबलकपणे उपलब्ध होते. उदाहरणार्थ, मृत समुद्राच्या पाण्याने मीठाचा भरपूर साठा पुरविला व येथेच जवळपास डोंगरावर मीठ आढळत होते, जेथे लोटाची बायको “मीठाचा खांब” बनली होती.—उत्पत्ती १९:२६.

४. मीठ जीवनास महत्वपूर्ण आहे असे आम्ही का म्हणू शकतो?

४ मीठात औषधी गुणधर्महि आहे. आमच्या शरीरात साधारणतः आठ औंस (२३० ग्राम) मीठ आहे व ते नसले तर आम्ही गतप्राण होऊ. यास्तव मीठ हे जीवनासाठी जरूरीचे आहे. तरीपण पवित्र शास्त्रात त्याचा ज्या अर्थी वापर केला आहे त्यावरून त्याचा ख्रिस्ती जीवन व कार्य यावरील लाक्षणिक अर्थबोध स्पष्ट होतो.

“मिठाने रुचकर”

५. खाद्याच्या बाबतीत मीठ कोणता उद्देश साध्य करते?

५ एखाद्या पदार्थात मीठ घालण्याचे राहून गेले तर तो आळणी राहतो व खायला नको वाटते. इयोबानेहि तेच म्हटले होते: “बेचव वस्तु मिठाशिवाय खातात काय?” (इयोब ६:१, ६) मीठ खाद्याचा स्वाद वाढविते. मिठाचे प्रमाण व संरक्षक या अर्थी त्याची उपयुक्‍तता यांचा शास्त्रवचनात लाक्षणिकरित्या वापर करण्यात आला आहे. योग्य प्रकारातील बोलणे या विषयीचे वर्णन पुरविताना मिठाचा अलंकारिक वापर केलेला आहे.

६. कलस्सैकर ४:६ यहोवाच्या साक्षीदारांच्या उपाध्यपणाला कसे लागू होते?

६ प्रेषित पौलाने लिहीले: “तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्‍त, मिठाने रूचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजावे.” दुसरे भाषांतर म्हणते: “तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्‍त असावे, ते स्वादरहित कधीही नसावे.” (कलस्सैकर ४:६; द न्यू इंग्लीश बायबल) खरे ख्रिश्‍चन देवाच्या राज्याविषयी लोकांसोबत बोलण्यात कित्येक तास खर्च करतात. अर्थातच, सर्वच यहोवाचे साक्षीदार अस्खलित वक्‍ते नाहीत. तरीपण त्यांच्याठायी संदेशाबद्दल गाढ आस्था आहे व ते अगदी आत्मविश्‍वासाने व उबदारपणे बोलणी करतात तर त्यांना पुष्कळांची अंतःकरणे देववचनाच्या सत्याकडे वळवता येतील. तर मग, यहोवाच्या लोकांचे भाष्य कृपायुक्‍त व अपीलकारक असावे हे किती महत्वाचे आहे बरे!

७. ख्रिश्‍चनाचे “रूचकर” शब्द कोणता चांगला परिणाम घडवून आणतात?

७ एखाद्या ख्रिश्‍चनाचे “रूचकर” शब्द श्रोत्यांना पवित्र शास्त्राच्या संदेशाचा नुसता मधुर स्वाद देतात एवढेच नसून त्यांचे श्रवण करणाऱ्‍यांचे जीवनही रक्षण्याचे साध्य करतात. तद्वत, मीठ जसे जीवनाकरिता आवश्‍यक आहे त्याप्रमाणेच यहोवाच्या सेवकांचे भाष्यही देवाचा उद्देश व त्याच्या राज्याची माहिती आस्थेने श्रवण करणाऱ्‍यांसाठी जीवनप्रदायक ठरू शकते.—पडताळा योहान ६:६३, ६८.

८. ख्रिस्ती उपाध्यायांच्या बोलण्यात कृपायुक्‍तपणा का दिसला पाहिजे?

८ विश्‍वासात नसलेल्या लोकांसोबत बोलताना ख्रिश्‍चनांच्या बोलण्याने कृपायुक्‍तपणा प्रदर्शित केला पाहिजे. कधी कधी राज्य संदेशाचे श्रवण करणारे उद्दामपणे व निष्ठुरपणे उत्तर देतात. पण यहोवाच्या सेवकांनी त्याच सुरात प्रतिटोला देता कामा नये, उलटपक्षी त्यांनी नेहमी कृपायुक्‍त असावे. कृपायुक्‍त असणे म्हणजे काय? त्याचा अर्थ दयाळू, संतोषकारक, सौजन्यशील आणि कनवाळू असणे असा आहे. एखादा प्रश्‍न, आक्षेप, टीका व अयोग्य शिष्टाचार हाताळताना ख्रिश्‍चनाने दयावंतपणा व सहनशीलता प्रदर्शित केल्यास फारच मोठा परिणाम घडू शकतो. एक नीतीसूत्र म्हणते त्याप्रमाणे: “मृदु उत्तराने कोपाचे निवारण होते.” (नीतीसूत्रे १५:१) लोकांनी जरी कठीणता व कटुता प्रदर्शित केली तरी त्यांचे अंतःकरण चांगले असल्यामुळे ख्रिस्ती उपाध्यपणात व्यक्‍त झालेले कृपायुक्‍त, शिष्टाचारी व चाणाक्ष बोल त्यांना सौम्य करू शकतात.—नीतीसूत्रे २५:१५.

९. ख्रिश्‍चनांनी समविश्‍वासूंबरोबर कसे दळणवळण राखावे व का?

९ पण मग, ख्रिश्‍चनांनी आपल्या समविश्‍वासूंसोबत कसे दळणवळण राखावे? निर्दयीपणाने? कदापि नाही; का बरे? कारण यहोवाचे हे समर्पित सेवक सुद्धा “देवाच्या कळपा”चा भाग आहेत त्यामुळे त्यांनाही कनवाळूपणे वागविले जाण्यास हवे.—पडताळा १ पेत्र ५:२–४; प्रे. कृत्ये २०:२९.

१०. यहोवाच्या सेवकांकरवी वापरल्या जाणाऱ्‍या भाषेत इफिसकर ४:२९–३२ ने कोणते प्रभुत्व राखावे?

१० नोकरीवर असताना कोणा सोबतीच्या कर्मचाऱ्‍याने आपणाला चीड आणली तर यहोवाच्या सेवकाने त्याच्याशी अभद्र भाषण करावे का? कोणी ख्रिस्ती फोरमन आहे व त्याच्या हाताखाली काम करणाऱ्‍यांनी कामाच्या बाबतीत त्याची निराशा केली तर त्याने त्यांना शिव्या द्याव्यात का? ख्रिस्ती दांपत्यामध्ये तिडीक निर्माण झालेली आहे अशावेळी त्यांनी एकमेकाविरूद्ध मुलांसमोर किंचाळून बोलावे का? कधीच नाही; पौलाने लिहिले: “तुमच्या मुखातून कसलेच कुजके भाषण न निघो . . . सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येवोत. तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्ही एकमेकांना क्षमा करा.”—इफिसकर ४:२९–३२.

“तुम्ही आपणामध्ये मीठ असू द्या”

११, १२. मार्क ९:५० मध्ये येशू कोणत्या प्रकारच्या मिठाबद्दल बोलत होता व ते शब्द कोणत्या प्रकारचे भाष्य व वागणूक करण्याची हाक देतात?

११ आम्ही सर्व अपूर्ण असल्यामुळे बोलताना कधीतरी आमच्याकडून ख्रिश्‍चनास शोभणार नाही अशी भाषाषैली बोलली जाते. शिष्य याकोबसुद्धा म्हणतो: “आपण सगळेच पुष्कळ चुका करतो. कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय, तो सर्व शरीरही कह्‍यात ठेवू शकतो.” (याकोब ३:२, ८–१०) येशूचे आरंभाचे शिष्यही याला अपवाद नव्हते त्यामुळेच त्यांनी आपसात कृपायुक्‍त बोलणे न केल्यामुळे त्यांना दटावणी मिळाली होती. उदाहरणार्थ, एके प्रसंगी शिष्यांमध्ये सर्वात मोठा कोण याबद्दल हमरीतुमरीचा वाद झाला. यावेळी येशूने त्या सबंध शिष्यगटाला, इतरांना अडखळवू नये व तसे केल्यास ते कसे “अग्नीने शुद्ध” होतील, म्हणजे गेहेन्‍नात कसा नाश मिळेल या विषयीची सुंदर सूचना देऊ केली. यानंतर त्याने असा समारोप केला: “तुम्ही आपणामध्ये मीठ असू द्या व एकमेकांबरोबर शांतीने राहा.”—मार्क ९:३३–५०.

१२ अर्थातच याप्रसंगी येशू शिष्यांच्या देहात आढळणाऱ्‍या खरोखरीच्या मिठाबद्दल बोलत नव्हता, उलटपक्षी, आपल्या बोलण्यात व वागणूकीत तो त्यांना विचारशील, चतुर, हितकारी व शांतीप्रिय असण्याचे व त्याद्वारे इतरांना चांगला स्वाद ठरण्याचे सांगत होता. हे महत्वपूर्ण आहे कारण यामुळेच ख्रिश्‍चनांना एकमेकांसोबत शांतीसख्याने नांदता येईल.

“पृथ्वीचे मीठ”

१३. “तुम्ही पृथ्वीचे मीठ आहा” असे जेव्हा येशूने म्हटले तेव्हा त्याचा काय अर्थ होत होता?

१३ आपल्या शिष्यांबद्दल येशूने असेही म्हटले: “तुम्ही पृथ्वीचे मीठ आहा.” (मत्तय ५:१३) असे म्हणण्याद्वारे, येशूचा, त्याचे शिष्य खरोखरचे मीठ आहेत असा अर्थ नव्हता. त्याऐवजी, मीठ जसे संरक्षक आहे त्याप्रमाणे जो संदेश येशूच्या शिष्यांनी आपणासोबत नेला त्यामुळे बहुतेक लोकांच्या जीवनाचे रक्षण होणार होते. होय, ज्यांनी त्यांचा संदेश ऐकला त्यांच्यासाठी हे शिष्य संरक्षणाचा प्रभाव ठरणार होते, विशिष्ठांमध्ये आध्यात्मिक व नैतिक कुजणे घडण्यापासून संरक्षण देणार होते. येशूच्या अनुयायांमार्फत घोषित केलेली सुवार्ता जीवनाचे रक्षण करणार होती यात काही संशय नव्हता.—प्रे.कृत्ये ५:२०; १३:४६–४८.

मीठ कुजण्यापासून संरक्षण देते

१४. जगाच्या कुजकेपणाचा प्रतिकार करण्यासाठी कशाची गरज आहे?

१४ यहोवा देवाच्या अतिउच्च व शुद्ध दृष्टिकाणातून हे सबंध दुष्ट व्यवस्थीकरण, आधी उल्लेखिलेल्या मेंढराच्या कातड्यासारखे दिसते. शुद्धतेची प्रक्रिया व मिठाचा वापर होण्याआधी त्यामध्ये अति दुर्गंधि व वळवळणारे किडे होते. आता प्रत्येकजण काही ना काही प्रमाणात या जगाच्या परिस्थितीने बाधलेला आहे. त्यामुळे जीवनाच्या हरप्रकारात घुसणारी भ्रष्टता खरडून काढण्यासाठी विशिष्ठाला धैर्याची व देवास सचोटी राखण्याची गरज आहे. केवळ याच मार्गाने त्याला नैतिक कुजकेपणा प्राप्त होण्यापासून स्वतःचे रक्षण करता येईल. केवळ आपल्या भाषणातच कृपायुक्‍तपणा नव्हे तर संरक्षणाची गुणवत्ता राखली पाहिजे म्हणजे भ्रष्टता वा कुजकेपणाच्या हर प्रकाराला परावृत्त करता येईल. याबाबतीत त्याला “मिठाची” अत्यंत गरज आहे.—१ पेत्र ४:१–३.

१५. येशू व दानीएल यांनी कोणते सुंदर उदाहरण मांडले?

१५ यहोवाच्या विश्‍वासू सेवकाला वाईट सवया व मोहपाशांना “नाही” कसे म्हणायचे ते माहीत असले पाहिले. अरण्यामध्ये सैतानाने येशूची परिक्षा घेतली तेव्हा त्याने तीनदा “नाही” म्हटले होते हे आठवा. (मत्तय ४:१–१०) शिवाय संदेष्टा दानिएलानेही जे उदाहरण राखले त्याचासुद्धा विचार करा, कोवळे वय असतानाच तो “नाही” म्हणण्यास शिकला. दानिएल तरूण झाला व तो बाबेलोनच्या राजदरबारी होता तेव्हा त्याला व त्याच्या तीन साथीदारांना “राजा खात असे त्या मिष्टान्‍नातून” खाणेपिणे नेमण्यात आले. पण दानिएल व त्याच्या मित्रांनी ते नाकारले. हे काही आदरातिथ्य धुडकावून लावण्याचा प्रकार नव्हता. तर त्या चार इब्री तरूणांनी पूर्णतयः शाकाहार व पाणी असे पथ्य पाळण्याचे ठरविले, कारण यहोवाच्या नियमाकरवी निषिद्ध ठरविण्यात आलेले अन्‍न वर्ज्य करण्याचा व मूर्तिपूजक, प्रथांनी स्वतःला न विटाळविण्याचा त्यांनी चंग बांधला होता. असे हे मार्गाक्रमण पत्करण्यासाठी खऱ्‍या धैर्याची आवश्‍यकता होती. पण याचा परिणाम प्रतिफळदायक दिसला कारण परिक्षेच्या ठरलेल्या विशिष्ठ कालावधीनंतर त्यांचे शारिरीक स्वरूप, ज्यांनी बादशाही आहाराचे सेवन केले होते त्यांच्या पेक्षा अधिक चांगले दिसले. शिवाय आध्यात्मिक दृष्टया त्या इब्र्यांना यहोवाच्या आशीवार्दाचा व संमतीचा लाभ व आनंद मिळाला.—दानीएल १:५–१७.

१६. दानीएल “मिठाने रूचकर” असा यहोवाचा सेवक होता असे का म्हणता येते?

१६ दानिएल व त्याच्या मित्रांनी ‘आपणामध्ये मीठ असू दिले’ म्हणून त्यांचे रक्षण होत आहे याकडे यहोवा देवाने लक्ष दिले. पण आम्ही दानीएलापासून आणखी शिकू शकतो. बाबेलोनी सरकारात उच्च पदी त्याची नियुक्‍ति झाली होती. त्या स्थिती त असताना त्याला पुष्कळदा “नाही” म्हणावे लागले असेल कारण तो नित्याने मूर्तिपूजक लोकांनी घेरलेला होता, तसेच बादशाही दरबार निश्‍चये अनैतिकता, खोटेपणा, लाचलुचपत, राजकारणी कुयुक्त्या व इतर भ्रष्टाचारी कृत्यांनी ओतप्रोत भरला होता. दानीएलाला मोठ्या भाराखाली कित्येकदा राहावे लागले. पण जरी तो त्या काळच्या ‘जगात’ होता तरी “जगाचा भाग” नव्हता. (योहान १७:१६) दानीएल विश्‍वासू, “मीठाने रूचकर” असा यहोवाचा सेवक होता. दानीएलाची सचोटी व त्याचा प्रामाणिकपणा यामुळे जळफळलेल्या त्याच्या मित्रांनी त्याला ठार मारण्याचा प्रयत्नही केला. तरीपण त्यांना कबूल करावे लागले की “तो विश्‍वासू असून त्याच्या ठायी काही चूक किंवा अपराध . . . नाही.” (दानीएल ६:४, ५) केवढे हे उत्तम उदाहरण!

१७. आजच्या ख्रिस्ती युवकांना कोणत्या कठीण परिक्षांचा सामना करावा लागतो?

१७ तरूण दानीएल व त्याच्या मित्रांप्रमाणे ख्रिस्ती युवकांना आज कठीण परीक्षांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांना शाळेत मादक औषधे, तंबाखू, मद्याची पेये, घाणेरड्या गप्पा, अनैतिकता, फसवणूक, बंडखोरीचा आत्मा, खोटी भक्‍ती, राष्ट्रभक्‍ति, कुसंगत, उत्क्रांतीसारखे खोटे शिक्षण, आणि यासारख्या इतर जबरदस्त प्रभावाला तोंड द्यावे लागते. या सर्व मोहपाशात व परिक्षाप्रसंगात ख्रिश्‍चन युवकाला शुद्ध सचोटीं राखणारा या अर्थी असण्यासाठी “मिठाने रूचकर” असावयास हवे.

१८. (अ) ख्रिस्ती पालकांनी कोणत्या प्रश्‍नांचा विचार करणे उत्तम ठरेल? (ब) आपल्या मुलांना मदत देण्यात अडचण वाटणाऱ्‍या पालकांकरता कोणती शिफारस आहे?

१८ यास्तव, ख्रिस्ती पालकांनो, आपल्या कुटुंबाच्या परिस्थितीचे काळजीपूर्वक निरिक्षण करा. कुटुंबातील सर्व सदस्य आध्यात्मिक प्रगती करीत आहेत का? स्वतःच्या युवकांना जागतिक भ्रष्टतेची बाधा होऊ देण्यापासून तुम्ही बांध घातला आहे का? खऱ्‍या भक्‍तीविषयी त्यांना किती माहिती आहे त्याबद्दल त्यांना खरेपणाने काय वाटते, ते याविषयी काय विचार करतात याची तुम्हाला जाणीव आहे का? या जगाच्या अशुद्ध गोष्टींचा त्यांना वीट वाटतो की त्याची बाधा होण्याच्या संकटात ते सापडले आहेत? (आमोस ५:१४, १५) तुमच्या मुलांची मदत करण्यासाठी पालक या नात्याने तुम्हाला जवळीक साधता येत नाही किंवा ते कठीण वाटते तर याविषयी यहोवाकडे कळकळीची प्रार्थना का करीत नाही? या अडखळणावर मात करण्यासाठी तो तुम्हाला निश्‍चये मदत देईल.—१ योहान ५:१४.

१९. ख्रिस्ती पालकांनी ज्याला “नाही” म्हणावे अशा कोणत्या गोष्टी आहेत?

१९ ख्रिस्ती पालक या अर्थी तुम्ही मुलांपुढे कोणते उदाहरण ठेवता? तुम्हासभोवताली ज्या प्रथा प्रचलित आहेत, जसे की, खादाडासारखे खात राहणे, वाटेल तेवढे मद्यप्राशन करणे, विविध प्रकारात आचरली जाणारी अनैतिकता व अशुद्धपणा याला तुम्ही स्वतः निश्‍चयाने “नाही” म्हणता का? लाच, मूर्खतेची वटवट आणि जगातल्या लोकांप्रमाणे बाष्फळ विनोद व भाष्य यांना तुम्ही “नाही” म्हणता का? कामावर काय किंवा शेजारी काय, तुम्ही शुद्ध, प्रामाणिक व सात्विक व्यक्‍ती असल्याचे ज्ञात आहे का? योग्य वेळी काही गोष्टींना नाही, म्हणणे ही “पृथ्वीचे मीठ” असण्यातील महत्वपूर्ण गोष्ट आहे.

टिकाऊपणा व निष्ठावंतपणा

२०. प्राचीन इस्राएलात यहोवाच्या भक्‍तीच्या अनुषंगाने मिठाचा कसा वापर होई?

२० मीठ हे भ्रष्टतेपासून स्वतंत्र असल्याची सूचकता दर्शवीत होते त्यामुळेच त्याचा प्राचीन काळी इस्राएलांच्या यहोवाच्या भक्‍तीमध्ये उपयोग होई, उदाहरणार्थ, वेदीवरील सर्व अर्पणांना मीठ लावावे लागे. मोशेकरवी दिलेल्या नियमशास्त्रात असे सांगण्यात आले होते: “आपल्या देवाशी केलेल्या कराराचे मीठ आपल्या अन्‍नापर्णात घालावयास चुकू नको. तुझ्या सर्व अर्पणासह मीठ पण अर्पावे.” “मिठाचा करार” बंधनकारक मानला जात होता.—लेवीय २:१३; गणना १८:१९; २ इतिहास १३:४, ५.

२१. “पृथ्वीचे मीठ” या नात्याने आज यहोवाच्या सेवकांबद्दल काय अपेक्षा आहे?

२१ यहोवाचे साक्षीदार या नात्याने त्याचे सेवक “पृथ्वीचे मीठ” आहेत. हे त्यांना निष्कलंक, विश्‍वासू व निष्ठावान राहण्याची गरज प्रस्तुत करते. त्यानी देवाच्या पवित्र आत्म्याची फलप्राप्ती—प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्‍वास, सौम्यता व इंद्रियदमन यांची जोपासना परिश्रमाने करीत राहिले पाहिजे. (गलतीकर ५:२२, २३) आत्म्याची ही फलप्राप्ती आध्यात्मिक, मिठासारख्या गुणांचा स्रोत आहे. तरीपण, काहींनी यहोवाची सेवा कित्येक वर्षे केली ही वस्तुस्थिति, ते अजिबात पडणारच नाहीत याची हमी देत नाही. (१ करिंथकर १०:१२) याबद्दल स्वतः येशूने आम्हाला ताकीद दिली.

२२. मत्तयाच्या ५:१३ मधील उत्तरार्धात कोणती अर्थसूचकता दिसते?

२२ “तुम्ही पृथ्वीचे मीठ आहा” असे म्हटल्यानंतर येशूने लागलेच काय म्हटले ते लक्षात घ्या. तो म्हणाला: “पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायाखाली तुडविले जाण्यापलिकडे त्याचा कसलाच उपयोग नाही.” (मत्तय ५:१३) येशू पृथ्वीवर असताना ज्या मिठाचा वापर होत असे त्याच्यापैकी काहीत बाहेरील गोष्टी मिश्रित होत्या. त्यामुळेच शुद्ध मीठ पावसाने वा अन्य मार्गाने धुतले गेलेच तर जे बाकी राहत असे त्याचा फेकून देण्यासाठीच वापर होई व ते बाहेर रस्त्यावर जा ये करणाऱ्‍यांच्या पायदळी तुडविले जाई. मिठाला सुव्यवस्थित ठेवले नाही तर ते सहजगत्या भिकार बनते.

२३. यहोवाचे साक्षीदार या नात्याने आमचा, “तुम्ही पृथ्वीचे मीठ आहा” या येशूच्या शब्दाविषयींचा कोणता दृष्टिकोन असावा?

२३ तद्वत, यहोवा देव आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त यांचे निष्ठावंत सेवक या अर्थी ‘आम्ही आपली शक्‍ती गमावू नये’ वा शुद्ध मिठाचे गुणधर्म हरवू नये म्हणून सावधगिरी बाळगावी. त्यापेक्षा आपण देवाच्या आत्म्याची फलप्राप्ती निपजविण्याचा हर प्रयत्न करू या. आम्ही आपल्या बोलण्यात सदा कृपायुक्‍त, देवाच्या राज्याचा संदेश घोषित करण्यात सदा आवेशी राहू या म्हणजे इतरांच्या जीवनाचे रक्षण करण्यात व ते टिकवून ठेवण्यात आम्हाला मदत देता येईल. या कुजक्या जगाच्या कुजकेपणाला आम्हाला विरघळवू देऊ नये तर आपण सर्वजण, “तुम्ही पृथ्वीचे मीठ आहा” या येशूच्या म्हणण्याच्या खोलीचे व त्याजशी निगडीत असणाऱ्‍या बहुमूल्य हक्काचे स्वत:ला स्मरण देत राहू या.

आपल्या आठवणीला उजाळा द्या

◻ ‘आम्ही आमचे बोलणे मिठाने रूचकर’ कसे करू शकतो?

◻ ख्रिश्‍चनांनी ‘आपणामध्ये मीठ असू देणे’ का जरूरीचे आहे?

◻ येशूचे अनुयायी कोणत्या अर्थी “पृथ्वीचे मीठ” आहेत?

◻ ‘मिठाने रूचकर’ असणाऱ्‍या ख्रिश्‍चनांकरवी कोणत्या गोष्टी टाळल्या जातात?

◻ मत्तय ५:१३ च्या अनुषंगाने आज यहोवाच्या सेवकांचा दृष्टिकोण कसा असावयास हवा?

[१३ पानांवरील चित्र]

कोवळ्‌या वयात दानीएल “नाही” म्हणण्यास शिकला

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा