यशयाचे पुस्तक यहोवाला “इस्राएलांचा पवित्र प्रभू” या अर्थी गौरविते
यशयाचे पुस्तक यहोवाला खासपणे “इस्राएलांचा पवित्र प्रभु” या अर्थाने गौरविते व ही संज्ञा त्याला पंचवीस वेळा उल्लेखिते. याशिवाय ते यहोवाचा मशिहा वा अभिषिक्त, देवाच्या लोकांची मुक्तता घडवून आणणारा, त्याच्याकडे सुद्धा अचूकरित्या निर्देश करते.
ऐतिहासिक पार्श्वभूमि
यशया १:१ आपल्याला कळवते की यशयाने या गोष्टीचा दृष्टांत यहुदाचे राजे उज्जीया, योथाम, आहाज व हिज्कीया यांच्या काळी पाहिला. तो आंतरराष्ट्रीय तणावाचा व यहुदाच्या लोकांवर खोट्या धर्मप्रवृतीने मोठा परिणाम घडवून आणला तेव्हांचा काळ होता. यशयाची सेवा सुरु झाली तेव्हा आरंभालाच, उज्जीया राजा, त्याने उद्दामपणे याजकाची कर्तव्ये आपणाकडे ओढून घेतल्यामुळे कोडी झाला होता, तो मरतो. (२ इतिहास २६:१६, १९–२१) त्याचा पुत्र योथाम याच्या कारकीर्दीत या राजाने योग्य तेच केले तरी त्याचे “प्रजाजन अधिकाधिक बिघडत चालले” हा अहवाल दिला गेला.—२ इतिहास २७:२; २ राजे १५:३४.
यानंतर आहाज राजा आला, त्याने सोळा वर्षांच्या कारकीर्दीत राष्ट्रापुढे वाईट उदाहरण ठेवले व बाल उपासना व मानवी यज्ञार्पणाचे विधि आचरले. त्याने “यहोवाचा मोठा अपराध केला.” (२ इतिहास २८:१–४, १९) याच वेळी अराम व इस्राएल या द्वयी राज्यांनी यरूशलेमावर स्वारी केली तेव्हा आहाजने यशयाचा सल्ला नाकारून अश्शुरचा राजा तिग्लथ पिलसर ३ याजकडे लष्करी मदत मागितली. (२ राजे १६:५–८; यशया ७:१–१२) अशाप्रकारे आहाजने ‘मानवाला आपला बाहू करून यहोवापासून आपले अंतःकरण फिरविले.’ (यिर्मया १७:५) अश्शुरने मदत देण्याचे कबूल केले पण अर्थातच त्यामागे आपले साम्राज्य वाढवावे हा त्याचा हेतु होता. अश्शुरच्या सैन्याने अरामाचे दिमिष्क हस्तगत केले आणि यार्देन पलिकडे वसाहतीस असणाऱ्या धार्मिक दृष्ट्या धर्मत्यागी बनलेल्या इस्राएलांना बंदिवासात नेले.—१ इति. ५:२६.
कालांतराने शमरोनाने सुद्धा आपला खंड देण्याचे नाकारले तेव्हा त्यावर वेढा घातला गेला व निवासितांना बंदिवासात नेण्यात आले. (२ राजे १६:९; १७:४–६; १८:९–१२) यामुळे दहा वंशीय राज्य संपुष्टात आले व फक्त यहुदाच सभोवताली विदेशी राष्ट्रांनी घेरलेला असा राहिला. सन्हेरिबाने यरूशलेमाला शरणागतिचे आव्हान देखील केले. तथापि हिज्कीयाच्या राज्यकीर्दीत परिस्थिती बदलली. हिज्कीयाने यहोवावर भाव प्रदर्शित केला व यहोवाने त्याच्या सोबत असल्याचे सिद्ध करून दाखविले.—२ राजे १८:५–७; यशया अध्याय ३६ व ३७.
ज्याच्या काळी यशयाने आपले भविष्यवादित कार्य आरंभिले त्या उज्जीयाने आपली कारकीर्द इ.स. पू. ८२९ मध्ये आरंभिली तर हिज्कीयाने आपली कारकीर्द इ.स.पू. ७१६ पर्यंत संपविली. तथापि यशयाने संदेष्टा या अर्थी केलेली सेवा त्यापेक्षाहि कमी वर्षांची झालेली दिसते. यशया अध्याय ६ वचन १ “उज्जीया राजा मरण पावला त्यावर्षी” (इ.स.पू. ७७७) चा उल्लेख करते. याच वेळी यशयाला या अध्यायात नमूद असणारी नेमणूक यहोवाकडून मिळाली. याच्या आधी असणारी माहिती त्याने आधी नमूद केली असावी हे दिसते. आता ३६व्या अध्यायातील पहिल्या वचनात “हिज्कीया राजाच्या कारकीर्दीच्या चौदाव्या वर्षी” (इ.स.पू. ७३२/७३१) असा संदर्भ नमूद आहे. याच्या किती काळानंतर यशयाने आपले लिखाण संपविले असावे ते आम्हास ज्ञात नाही; ते बहुधा लवकरच संपले असावे.
यशयाच्या पुस्तकातील विशिष्ठ भागाचे लिखाण केव्हा झाले त्याची तारीख समजण्यास काही संदर्भ उपयुक्त ठरतात. उदाहरणार्थ ७व्या अध्यायातील १ले वचन म्हणते की आहाज राजाच्या काळी इस्राएलाचा राजा पेकह याने यरूशलेमावर चढाई केली. आहाजाची कारकीर्द इ.स.पू. ७६२ ते साधारण ७४६ पर्यंत होती आणि पेकहची राजवट साधारण इ.स.पू. ७५८ ला संपली त्यामुळे ती घटना या वर्षाआधी घडली असावी. याशिवाय यशया १४:२८ पलेशेथविरूद्धची दंडाज्ञेची तारीख “आहाज मरण पावला त्यावर्षी” देते जी बहुधा इ.स.पू. ७४६ ही आहे. हे संदर्भ यशयाच्या पुस्तकातील घटना काळाच्या प्रवाहात केव्हा घडल्या ते निश्चित करण्यास मदत देतात.
लेखनाचे ऐक्य
आधुनिक समयात काही पवित्रशास्त्र टीकाकारांनी, यशयाचे सबंध पुस्तक यशयाने स्वतः लिहिले नाही असे प्रतिपादिले. त्यांचे म्हणणे आहे की ४० ते ६६ अध्यायातील मजकूर हा त्या निनावी व्यक्तीकरवी लिहीण्यात आला जो बाबेलोनी दास्यत्वातनू यहुद्यांना मुक्तता मिळण्याचा काळ समीप आला होता त्यावेळी हयात होता. आणखी काही टिकाकार पुस्तकाच्या आणखी काही भागाला बाजूला काढून म्हणतात तो यशया ऐवजी कोणीतरी लिहीला असावा. तथापि, पवित्रशास्त्र या दाव्यांशी सहमत होत नाही.
ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांच्या प्रेरित लेखकांनी यशया १ ते ३९ तसेच ४० ते ६६ अध्यायातील मजकूर “यशया संदेष्ट्या करवी” असल्याचे त्याला श्रेय दिले आहे. यांनी एकाच नावाच्या दोन व्यक्ती होत्या किंवा एका भागाच्या लेखकाचे नाव ज्ञात नाही असे कधीही म्हटले नाही. (उदाहरणार्थ, मत्तय ३:३ व ४:१४–१६ यशया ४०:३ व ९:१, २ सोबत; शिवाय योहान १२:३८:४१ यशया ५३:१ व ६:१, १० सोबत पडताळा.) याशिवाय आणखी अनेक ठिकाणी ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनाचे लेखक यशयाच्या पुस्तकातील उत्तरार्धाच्या भागाच्या लिखाणाचे श्रेय कोणा निनावी लेखकास नव्हे तर स्पष्टरित्या यशया संदेष्ट्या”स देतात. (मत्तय १२:१७–२१ हे यशया ४२:१–४ सोबत, रोमकर १०:१६ हे यशया ५३:१ सोबत पडताळा.) नाजारेथ येथील सभास्थानात “यशया संदेष्ट्याच्या ग्रंथा”तून येशू ख्रिस्ताने वाचन केले त्यावेळी तो यशया ६१:१, २ मधून वाचत होता.—लूक ४:१७–१९.
याबरोबर मृतसमुद्रात सापडलेली यशयाची गुंडाळी (जी इ.स.पू. पहिल्या व दुसऱ्या शतकातील आहे असे मानले जाते) सुद्धा हा पुरावा दर्शवून आहे की मूळ प्रतीपासून नक्कल करणाऱ्या लेखकांनी ३९व्या अध्यायाच्या भविष्यवादाच्या समाप्तीनंतर पुस्तकाचा दुसरा विभाग सुरु झाला असे काही मानले नव्हते. त्यांनी, ३९व्या अध्यायाचा मजकूर ज्या ओळीत संपतो तेथेच ४०व्या अध्यायाच्या मजकुराचा आरंभ लिहिला.
शतकानुशतके यशयाचे संपूर्ण पुस्तक हे दोघा वा अधिकाचे नव्हे तर एकट्याचेच लिखाण या अर्थी गृहीत धरण्यात आले. ३९व्या अध्यायापासून ४० व्या अध्यायाकडे झालेले प्रगमन यशया ३९:६, ७ मध्ये जे लिहिण्यास आले त्याच्या दृष्टीने पाहता सुसुत्रीपणाचे आहे असे दिसते. तो मजकूर नंतर बाबेलोन्यांकरवी जो दंड करण्यात आला त्यास कशी वाट देणारा ठरला त्याची माहिती देतो. या पुस्तकाच्या लिखाणाचे श्रेय एकापेक्षा अधिक लेखकांना देणाऱ्यांना असे वाटत नाही की सुमारे दोन शतके आधी यशयाने बंदीस्त यहुद्यांची कोरेश या अधिपतीद्वारे मुक्तता घडेल असे भाकित केले. त्यांच्या मते हा अहवाल नंतर म्हणजे कोरेशाने आपली युद्ध मोहीम सुरु केली त्याच्या नंतर लिहिण्यात आला. (यशया ४४:२८; ४५:१) तथापि, हेच लोक सबंध पुस्तकाचा गर्भितार्थ जाणण्यात की हे साहित्य, देवाला आपल्या लोकांविषयी जे घडेल ते सांगण्याची क्षमता, पूर्वज्ञान आहे हे खासपणे सांगते हे ओळखू शकत नाहीत. अद्याप न जन्मलेल्या पण बाबेलोनावर विजय मिळवून यहुद्यांची मुक्तता करणाऱ्या अधिपतिचे नावानिशी भविष्यकथन सुमारे २०० वर्षे आधी करते. त्याची पूर्णता दाखवणार होती की हे लिखाण इश्वरी उगमाकडचे आहे. तो काही यशयाने भविष्याविषयी बांधलेला अंदाज नव्हता तर प्रत्यक्षात त्याने म्हटले त्याप्रमाणे ‘यहोवाने असे म्हटले होते.’ (यशया ४५:१) यशयाच्या लिखाणाच्या या भागाचे लिखाणश्रेय कोरेशाच्या काळातील कोणा लेखकास दिल्याने टीकाकार समस्यांपासून विमुक्त होऊ शकत नाही. ते का बरे? कारण पुस्तकाच्या याच भागाने याच्याहि पुढील भविष्य काळातील घटना म्हणजेच येशू ख्रिस्त या मशीहाचे पृथ्वीवरील जीवन व उपाध्यपण यातील घटनांचे सविस्तररित्या भाकित पुरवले आहे. या भविष्यवादांच्या पूर्णता यशयाचा भविष्यवाद कोणा तोतया लेखकाचा संग्रह नव्हे तर इश्वरी प्रेरणेचा आहे असे त्यावर शिक्कामोर्तब करतो.
यशयाने ४० ते ६६ अध्यायातील मजकुराचे लिखाण केले हे अशाच काही कारणास्तव अमान्य करणारे हे सुद्धा अमान्य करतात की त्याने बाबेलोनच्या पतनाविषयी १३वा अध्याय लिहिला. तरीपण १३व्या अध्यायाचे प्रास्ताविकच मुळात याप्रकारे आहे: “बाबेलाविषयी आमोजाचा पुत्र यशया याला दृष्टांतात प्राप्त झालेली देववाणी.” तद्वत हे उघड आहे की हा तोच “आमोजाचा पुत्र यशया” असावा ज्याचे नाव पहिल्या अध्यायाच्या सुरुवातीस आढळते.
पवित्र शास्त्राच्या इतर भागाशी असणारी सुसंगतता
यशयाचे लिखाण हे पवित्र शास्त्राच्या कित्येक इतर भागात विस्तारितपणे गुंफले गेले आहे. यशयाच्या काळाच्या सुमारे शतक वा त्यापेक्षा थोड्या अधिक समयानंतर यिर्मयाने राजांच्या पुस्तकात आढळून येणारे लिखाण लिहिले, पण हे लक्षवेधक आहे की २ राजे १८:१३ ते २०:१९ मध्ये जे लिखित आहे ते प्रत्यक्षतयः यशयाच्या ३६ ते ३९ अध्यायात आढळणारे लिखाण आहे. यशयाने विचारात घेतलेल्या माहितीप्रमाणेच इतर संदेष्टे लिखाण करतात इतकेच नाही तर इतर पवित्र शास्त्र लेखकांनी यशयाच्या लिखाणातून कितीतरी स्पष्ट उल्लेख घेतलेले आहेत हे दाखवता येईल.
यशयाच्या पुस्तकातून ज्या भविष्यवादांचा वारंवार उल्लेख घेण्यात येतो ते मशीहाविषयी सविस्तर वर्णन देणारे भाकीत आहेत. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनाच्या लेखकांनी यापैकी कित्येकांचा खास संदर्भ घेऊन त्याचा अवलंब दाखविला आहे. उदाहरणार्थ, यशया ७:१४ मध्ये त्याचा जन्म कुमारिकेमार्फत होईल असे भाकित करण्यात आले. (मत्तय १:२३) तो इशाय पुत्र दावीदाच्या घराण्यात जन्म घेईल (यशया ९:७; ११:१, १०; लूक १:३२, ३३; रोमकर १५:८, १२); अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी ऐकू येईल, यहोवाच्या या प्रतिनिधिकरता मार्ग तयार करण्यात येईल असेही भाकित करण्यात आले. (यशया ४०:३; मार्क १:१–४) त्याची नियुक्ति यशया ६१:१, २ मध्ये लिखित करण्यात आली होती (लूक ४:१७–२१), शिवाय हे सुद्धा भाकित केले गेले की त्याच्या उपाध्यपणामुळे गालीलातील लोकांना एक मोठा उजेड मिळेल. (यशया ९:१, २; मत्तय ४:१३–१६) तो आमचे रोग वाहील (यशया ५३:४; मत्तय ८:१६, १७); त्याच्यावर विश्वास ठेवण्यात येणार नाही (यशया ५३:१; योहान १२:३७, ३८); तो रस्त्यात आरडाओरडा, भांडण करणार नाही (यशया ४२:१–४; मत्तय १२:१४–२१); त्याला धिक्कारण्यात येईल, ठेच लागणारा धोंडा होईल, पण तोच कोनशिला ठरेल (यशया ८:१४, १५; २८:१६; १ पेत्र २:६–८); तडाखे बसले व निंदा झाली तरी विरोधकांपुढे तो गप्प राहील (यशया ५०:६; ५३:७, ८; योहान १९:३, ९; मार्क १४:५३–६५; १५:१–१५); त्याची अपराध्यांत गणना होईल (यशया ५३:१२; मत्तय २६:५५, ५६; २७:३८); पापे वाहण्यासाठी आणि कित्येकांना देवापुढे नीतीमान भूमिकेत उभे राहण्याचा मार्ग उघडण्यासाठी तो यज्ञार्पित मरण सहन करील (यशया ५३:५, ८, ११, १२; रोमकर ४:२५) आणि त्याला श्रीमंतांबरोबर पुरण्यात येईल अशीही भाकिते करण्यात आली होती. (यशया ५३:९; मत्तय २७:५७–६०; योहान १९:३८–४२) मशीहाची स्पष्ट ओळख दाखवली जावी याकरता स्वतः येशू ख्रिस्ताने व त्याच्या प्रेषितांनी यशयामधून वेळोवेळी संदर्भ उल्लेखित केले हाते हे पहाणे मोठे मनोरंजक आहे.
पवित्र शास्त्राच्या इतर प्रेरित लेखकांनी यशयाच्या भविष्यवादातून जे संदर्भ घेतले तेच याचे पूर्ण स्वरूप बनते असे नाही. तरीपण या भविष्यवादांद्वारेच यशया हा केवढा प्रसिद्ध माणूस होता ते दिसून येते. हे भविष्यवाद आणि पुस्तकातील इतर लिखाण इस्राएलाचा पवित्र प्रभु यहोवा याचे गौरव करते. तोच आपल्या अभिषिक्त पुत्राद्वारे आपल्या लोकांना तारण देतो.