धडा २२
तुम्हीही इतरांना आनंदाचा संदेश कसा सांगू शकता?
बायबलमधून नवनवीन गोष्टी शिकत असताना कदाचित तुम्हाला वाटेल, की ‘या गोष्टी तर सगळ्यांना माहीत व्हायला पाहिजेत.’ अगदी बरोबर आहे! सगळ्यांना या गोष्टी माहीत व्हायलाच पाहिजेत. पण कदाचित या शिकलेल्या गोष्टी दुसऱ्यांना सांगायला तुम्हाला थोडीशी भीती वाटत असेल. तर आता आपण या धड्यात पाहू, की तुम्ही ही भीती मनातून कशी घालवू शकता आणि बायबलमधल्या चांगल्या गोष्टी इतरांना आनंदाने कशा सांगू शकता.
१. तुम्ही शिकलेल्या गोष्टी ओळखीच्या लोकांना कशा सांगू शकता?
येशूचे शिष्य म्हणाले, “ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या आणि ऐकल्या आहेत त्यांबद्दल बोलायचं आम्ही थांबवू शकत नाही.” (प्रेषितांची कार्यं ४:२०) आपल्याला समजलेलं सत्य खूप मौल्यवान आहे हे त्यांना माहीत होतं, आणि म्हणून ते सत्य जास्तीत जास्त लोकांना सांगायची त्यांची इच्छा होती. तुम्हालाही त्यांच्यासारखंच वाटतं का? तर मग तुम्ही शिकलेल्या गोष्टी तुमच्या घरच्यांना आणि मित्रांना आदराने सांगण्यासाठी योग्य संधी शोधा.—कलस्सैकर ४:६ वाचा.
सुरुवात अशी करता येईल
घरातल्या लोकांसोबत गप्पागोष्टी करताना, बायबलच्या एखाद्या विषयाबद्दल सांगण्यासाठी असं म्हणा: “या आठवड्यात मला एक खूप छान माहिती मिळाली.”
तुमच्या ओळखीची व्यक्ती आजारी किंवा चिंतेत असेल तर तिला एखादं सांत्वन देणारं वचन दाखवा.
कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी जेव्हा तुम्हाला विचारतो, की ‘कसं काय चाललंय?’ तेव्हा बायबल अभ्यासात किंवा मंडळीच्या सभेत शिकायला मिळालेली एखादी नवीन गोष्ट त्याला सांगा.
ओळखीच्या लोकांना jw.org ही वेबसाईट दाखवा.
तुमचा बायबल अभ्यास होतो तेव्हा इतरांनाही बसायला सांगा किंवा jw.org वरून बायबल अभ्यासाची विनंती कशी करायची हे त्यांना दाखवा.
२. मंडळीसोबत मिळून प्रचार करायचे कोणते फायदे आहेत?
येशूच्या शिष्यांनी आनंदाचा संदेश फक्त ओळखीच्या लोकांनाच नाही, तर अनोळखी लोकांनाही सांगितला. येशूने शिष्यांना “प्रत्येक नगरात . . . जोडीजोडीने आपल्यापुढे पाठवलं.” (लूक १०:१) असं पद्धतशीरपणे प्रचाराचं काम केल्यामुळे जास्तीत जास्त लोकांना आनंदाचा संदेश ऐकायला मिळाला. सोबत मिळून प्रचार केल्यामुळे शिष्यांना या कामातून खूप आनंदही मिळाला. (लूक १०:१७) तुम्हालाही मंडळीसोबत मिळून प्रचार करायला आवडेल का?
आणखी जाणून घेऊ या
मनातली भीती तुम्ही कशी घालवू शकता आणि आनंदाचा संदेश सांगितल्यामुळे मिळणारं समाधान कसं अनुभवू शकता यावर चर्चा करू या.
३. यहोवा तुमच्या सोबत असेल
काहींना अशी भीती वाटत असेल, की मी प्रचार केला तर लोक माझ्याबद्दल काय विचार करतील किंवा ते माझं ऐकून घेतील का?
तुम्हालाही शिकलेल्या गोष्टी इतरांना सांगायची भीती वाटते का? का वाटते किंवा का नाही?
व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्नावर चर्चा करा.
या तरुण साक्षीदारांनी आपल्या मनातली भीती कशी दूर केली?
यशया ४१:१० वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
तुम्हाला प्रचार करायची भीती वाटते तेव्हा तुम्ही प्रार्थना का केली पाहिजे?
तुम्हाला माहीत होतं का?
बऱ्याच यहोवाच्या साक्षीदारांना आधी वाटायचं की दुसऱ्यांना आनंदाचा संदेश सांगणं त्यांना कधीच जमणार नाही. जसं की, सरगी नावाच्या एका भावाला पूर्वी कमीपणाच्या भावनेमुळे लोकांशी बोलायला खूप कठीण वाटायचं. पण मग त्याने बायबलचा अभ्यास केला. तो म्हणतो, “मला भीती तर वाटायची, पण तरीही मी शिकलेल्या गोष्टी इतरांना सांगायला सुरुवात केली. आणि आश्चर्य म्हणजे, बायबलबद्दल इतरांशी बोलल्यामुळे माझा आत्मविश्वास आपोआपच वाढला. आणि म्हणून शिकलेल्या या नवीन गोष्टींवर माझा विश्वास आणखी पक्का झाला.”
४. नेहमी आदराने बोला
इतरांना आनंदाचा संदेश सांगताना तुम्ही काय बोलाल याकडेच नाही, तर ते कसं बोलाल याकडेही लक्ष द्या. २ तीमथ्य २:२४ आणि १ पेत्र ३:१५ वाचा, आणि मग या प्रश्नांवर चर्चा करा:
इतरांशी बायबलबद्दल बोलताना, तुम्ही या वचनांमध्ये दिलेल्या सल्ल्याचा कसा उपयोग कराल?
तुमच्या घरच्यांना किंवा मित्रांना तुम्ही सांगितलेल्या गोष्टी कदाचित पटणार नाहीत. अशा वेळी तुम्ही काय करू शकता? तुम्ही काय नाही केलं पाहिजे?
‘हेच बरोबर आहे’ असं म्हणण्याऐवजी, दुसऱ्यांच्या भावना न दुखवता, प्रश्न विचारून योग्य निष्कर्षावर पोहोचायला मदत करणं का चांगलंय?
५. आनंदाचा संदेश सांगितल्यामुळे खूप समाधान मिळतं
यहोवाने येशूला आनंदाचा संदेश सांगायचं काम दिलं होतं. येशूने या कामाकडे कोणत्या दृष्टीने पाहिलं? योहान ४:३४ वाचा, आणि मग या प्रश्नांवर चर्चा करा:
जिवंत राहण्यासाठी अन्न खाणं महत्त्वाचं आहे आणि यामुळे आनंदही मिळतो. मग येशूने देवाच्या इच्छेप्रमाणे करणं (ज्यात आनंदाचा संदेश सांगणंही सामील आहे) हे अन्न खाण्यासारखं आहे असं का म्हटलं?
आनंदाचा संदेश सांगितल्यामुळे समाधान मिळतं असं तुम्हाला का वाटतं?
हे करून पाहा
आठवड्यादरम्यान होणाऱ्या सभेत, संभाषण कसं सुरू करायचं याबद्दल दिलेल्या सल्ल्यांकडे लक्ष द्या.
विद्यार्थी भाग सादर करण्यासाठी नाव कसं द्यायचं हे तुमच्या शिक्षकाला विचारा. हे भाग सादर केल्यामुळे तुम्ही बायबलमधून शिकलेल्या गोष्टी इतरांना आत्मविश्वासाने सांगू शकाल.
या पुस्तकातल्या “काही जण म्हणतात” किंवा “कदाचित कोणी विचारेल” या भागांत, सहसा विचारले जाणारे प्रश्न दिले आहेत. या प्रश्नांची उत्तरं कशी देता येतील याचा सराव करा.
कदाचित कोणी विचारेल: “काय मग, कसं चाललंय?”
जेव्हा कोणी तुम्हाला असं विचारतं, तेव्हा बायबलमधून शिकलेल्या गोष्टी त्यांना सांगण्यासाठी तुम्ही या संधीचा वापर कसा करू शकता?
थोडक्यात
आनंदाचा संदेश सांगितल्यामुळे आपल्याला समाधान मिळतं. आणि सुरुवातीला थोडं कठीण वाटत असलं तरी ते मुळात तेवढं कठीण नाही.
उजळणी
आनंदाचा संदेश सांगणं का महत्त्वाचं आहे?
आपण तो आदराने इतरांना कसा सांगू शकतो?
तुम्हाला प्रचार करायची भीती वाटत असेल तर तुम्ही ती मनातून कशी दूर करू शकता?
हेसुद्धा पाहा
jw.org कॉन्टॅक्ट कार्ड देऊन आनंदाचा संदेश सांगायच्या चार सोप्या पद्धती पाहा.
कोणत्या चार गुणांमुळे तुम्हाला आनंदाचा संदेश सांगायला मदत होईल ते पाहा.
“बायबल विद्यार्थ्यांनो, तुम्ही प्रचारक बनायला तयार आहात का?” (टेहळणी बुरूज, सप्टेंबर २०२०)
बायबलच्या एका उदाहरणातून आपल्याला आणि लहान मुलांनाही आनंदाचा संदेश सांगायचं धैर्य कसं मिळतं ते पाहा.
यहोवाला ओळखत नसलेल्या कुटुंबातल्या सदस्यांना बायबलबद्दल कसं सांगता येईल हे जाणून घ्या.
“सत्यात नसलेल्या नातेवाइकांच्या मनापर्यंत पोचणे” (टेहळणी बुरूज, १५ मार्च, २०१४)