धडा ०६
सजीव सृष्टीची सुरुवात कशी झाली?
बायबल देवाबद्दल म्हणतं: “तू सर्व गोष्टी निर्माण केल्या.” (प्रकटीकरण ४:११) तुम्ही हे मानता का? काही जण म्हणतात की सृष्टी कोणीही निर्माण केली नाही; ती आपोआपच आली. जर हे खरं असेल, तर आपल्या जीवनाला काहीच उद्देश नाही असा याचा अर्थ होईल. पण जर यहोवा देवाने सगळ्या गोष्टी निर्माण केल्या असतील, तर नक्कीच त्यामागे त्याचा काहीतरी उद्देश असला पाहिजे, नाही का?a जीवसृष्टीच्या सुरुवातीबद्दल बायबलमध्ये काय सांगितलंय आणि ते पटण्यासारखं का आहे, यावर विचार करू या.
१. या विश्वाची सुरुवात कशी झाली?
बायबल म्हणतं, “सुरुवातीला देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली.” (उत्पत्ती १:१) बरेच वैज्ञानिकही मान्य करतात की विश्वाला एक सुरुवात आहे. पण देवाने ते कसं निर्माण केलं? त्याने त्याच्या ‘क्रियाशील शक्तीने’ म्हणजे पवित्र शक्तीने ग्रह-तारे, आकाशगंगा आणि विश्वातलं सगळं काही निर्माण केलं.—उत्पत्ती १:२.
२. देवाने पृथ्वी का बनवली?
यहोवाने “पृथ्वी विनाकारण बनवली नाही, तर तिच्यावर लोकांनी राहावं म्हणून तिला घडवलं.” (यशया ४५:१८) मानवांना पृथ्वीवर कायम आनंदाने राहता यावं, अशा रितीने यहोवाने ती घडवली. (यशया ४०:२८ आणि ४२:५ वाचा.) विज्ञानाच्या शोधांवरून दिसून येतं की पृथ्वीसारखा कोणताच ग्रह नाही. हा एकच ग्रह आहे, ज्यावर मानव राहू शकतात.
३. इतर प्राण्यांपेक्षा माणूस इतका वेगळा का आहे?
पृथ्वी बनवल्यावर यहोवाने सजीव सृष्टी निर्माण केली. सगळ्यात आधी त्याने झाडं-झुडपं आणि प्राणी निर्माण केले. मग “देवाने आपल्या प्रतिरूपात माणूस निर्माण केला.” (उत्पत्ती १:२७ वाचा.) माणूस इतका वेगळा का आहे? कारण, त्याला देवाच्या प्रतिरूपात निर्माण करण्यात आलंय. यामुळे आपण देवामध्ये असलेले गुण दाखवू शकतो, जसं की, प्रेम आणि न्याय. तसंच देवाने आपल्याला अशा प्रकारे निर्माण केलंय, की आपण नवीन भाषा शिकू शकतो आणि कला, संगीत यांसारख्या गोष्टींचा आनंद घेऊ शकतो. यासोबतच, आपण आपल्या निर्माणकर्त्याची उपासना करू शकतो, जी कोणताही प्राणी करू शकत नाही.
आणखी जाणून घेऊ या
सजीव सृष्टी देवाने निर्माण केली आहे असं आपण का म्हणू शकतो? बायबलमध्ये निर्मितीबद्दल जे सांगितलंय त्यावर आपण भरवसा ठेवू शकतो का? तसंच, मानवांमध्ये दिसणाऱ्या चांगल्या गुणांवरून देवाबद्दल काय कळतं? हे पाहू या.
४. जीवसृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीची रचना करण्यात आली आहे
जीवसृष्टीतल्या गोष्टींची नक्कल करून माणसं वेगवेगळ्या वस्तू बनवतात, तेव्हा त्यांची स्तुती केली जाते. मग ज्या गोष्टींची ते नक्कल करतात, त्या मुळात कोणी बनवल्या? आणि त्यासाठी कोणाची स्तुती झाली पाहिजे? व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्नावर चर्चा करा.
माणसांनी निसर्गातल्या कोणकोणत्या गोष्टींची नक्कल केली आहे?
घराचंच उदाहरण घेतलं, तर प्रत्येक घर कोणी ना कोणीतरी बनवलेलं असतं. मग निसर्गातल्या गोष्टींची रचना कोणी केली आणि त्या कोणी बनवल्या? इब्री लोकांना ३:४ वाचा, आणि मग या प्रश्नांवर चर्चा करा:
निसर्गातल्या कोणत्या गोष्टींची रचना पाहून तुम्हाला आश्चर्य वाटतं?
विश्वातल्या सगळ्या गोष्टींची रचना करण्यात आली आहे, हे पटण्यासारखं आहे का? तुम्हाला असं का वाटतं?
तुम्हाला माहीत होतं का?
jw.org वर “उत्क्रांती की निर्मिती?” या लेखमालेत, तसंच “जीवनाच्या सुरुवातीबद्दल मतं” यात तुम्हाला या विषयावर आणखी लेख आणि व्हिडिओ पाहायला मिळतील.
“प्रत्येक घर कोणी ना कोणी बांधलेलं असतं. पण ज्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या तो देव आहे”
५. बायबलमध्ये निर्मितीबद्दल जे सांगितलंय ते पटण्यासारखं आहे
उत्पत्ती पुस्तकाच्या १ ल्या अध्यायात, पृथ्वी आणि तिच्यावरच्या सगळ्या गोष्टींच्या निर्मितीबद्दल सांगितलंय. तुमचा यावर विश्वास बसतो का? की ही एक काल्पनिक कथा आहे असं तुम्हाला वाटतं? व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्नांवर चर्चा करा.
पृथ्वी आणि तिच्यावरची सृष्टी सहा दिवसांत निर्माण करण्यात आली असं बायबल सांगतं. पण हे २४ तासांचे दिवस होते का?
बायबलमध्ये निर्मितीबद्दल जे सांगितलंय ते पटण्यासारखं आहे का? तुम्हाला असं का वाटतं?
उत्पत्ती १:१ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
वैज्ञानिक म्हणतात की या विश्वाला एक सुरुवात आहे. मग वैज्ञानिक जे म्हणतात आणि आपण आताच बायबलमध्ये जे वाचलं, या दोन्ही गोष्टींवरून तुम्ही काय म्हणाल?
काहींना वाटतं, की सृष्टीची निर्मिती करण्यासाठी देवाने उत्क्रांतीचा वापर केला असेल. उत्पत्ती १:२१, २५, २७ वाचा, आणि मग या प्रश्नांवर चर्चा करा:
देवाने एका-पेशीचा जीव बनवला आणि मग त्यातून मासे, प्राणी आणि मानवांची उत्क्रांती होऊ दिली, असं बायबल शिकवतं का? की देवाने स्वतः सगळ्या “जातींचे” जीव निर्माण केले?b
६. देवाने जे काही बनवलं त्यात मानव सगळ्यात वेगळे आहेत
आपण प्राण्यांपेक्षा खूप वेगळे आहोत. उत्पत्ती १:२६ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
आपल्याला देवाच्या प्रतिरूपात निर्माण केलं असल्यामुळे आपण प्रेम आणि दया यांसारखे गुण दाखवू शकतो. मग यावरून देवाच्या स्वभावाबद्दल काय कळतं?
काही जण म्हणतात: “बायबलमध्ये निर्मितीबद्दल जे सांगितलंय, ती फक्त एक काल्पनिक कथा आहे.”
तुम्ही काय म्हणाल, आणि का?
थोडक्यात
हे विश्व आणि सजीव सृष्टी यहोवाने बनवली आहे.
उजळणी
या विश्वाची सुरुवात कशी झाली याबद्दल बायबल काय म्हणतं?
देवाने एका-पेशीच्या जिवापासून वेगवेगळ्या जातींच्या प्राण्यांची उत्क्रांती होऊ दिली का? की त्याने स्वतः या सर्वांना निर्माण केलं?
माणूस इतर सगळ्या प्राण्यांपेक्षा वेगळा का आहे?
हेसुद्धा पाहा
निसर्गातल्या सुंदर रचनांवरून काय दिसून येतं हे जाणून घ्या.
बायबलमध्ये निर्मितीबद्दल जे सांगितलंय त्याबद्दल आईवडील आपल्या मुलांना कसं समजवू शकतात हे पाहा.
उत्क्रांतीचा सिद्धान्त बायबलमधल्या माहितीशी जुळतो का हे पाहा.
“क्या परमेश्वर ने विकासवाद के ज़रिए सब जीव-जंतुओं को बनाया?” (वेबसाईटवरचा लेख)
सृष्टी निर्माण करण्यात आली, की आपोआप आली? जीवाश्मांच्या अभ्यासावरून किंवा विज्ञानाच्या प्रयोगांवरून काय दिसून येतं, हे वाचा.
जीवसृष्टीची सुरुवात—विचार करण्यासारखे पाच प्रश्न (माहितीपत्रक)
a देवाने मानवांना कोणत्या उद्देशाने बनवलं, हे आपण २५ व्या धड्यात पाहू या.
b बायबलमध्ये “जाती” हा शब्द सजीवांच्या एका मोठ्या समूहाला सूचित करतो.