भाग ५
देव अब्राहामाला व त्याच्या कुटुंबाला आशीर्वाद देतो
अब्राहामाच्या वंशाची भरभराट होते. इजिप्तमध्ये देव योसेफाचा सांभाळ करतो
आपल्या परमप्रिय पुत्राला एके दिवशी यातनामय मरण सोसावे लागेल याची देवाला कल्पना होती. ही गोष्ट, उत्पत्ति ३:१५ मध्ये दिलेल्या भविष्यवाणीत अप्रत्यक्षपणे सुचवण्यात आली होती. आपल्या पुत्राचे बलिदान देण्यासाठी देवाला किती मोठा त्याग करावा लागेल याची मानवांना जाणीव करून देण्याचा एखादा मार्ग होता का? होय, बायबलमध्ये याचे एक जिवंत उदाहरण आपल्याला आढळते. देवाने अब्राहामाला आपला प्रिय पुत्र इसहाक याचे बलिदान करण्यास सांगितले.
अब्राहाम हा उल्लेखनीय विश्वास असलेला मनुष्य होता. तुम्हाला आठवत असेल की प्रतिज्ञा केलेली संतती किंवा मुक्तिदाता इसहाकाच्या वंशातून येणार असल्याचे देवाने अब्राहामाला अभिवचन दिले होते. तेव्हा, गरज पडल्यास देव इसहाकाला पुन्हा जिवंत करू शकतो असा भरवसा बाळगून अब्राहाम आपल्या पुत्राचे बलिदान देणारच होता, पण इतक्यात देवाच्या दूताने त्याला रोखले. जो पुत्र अब्राहामासाठी जगातल्या सर्व संपत्तीपेक्षा जास्त मौल्यवान होता त्याला अर्पण करायला तयार झाल्याबद्दल यहोवाने अब्राहामाची प्रशंसा केली आणि त्याला दिलेल्या प्रतिज्ञांचे पुन्हा आश्वासन दिले.
पुढे इसहाकाला एसाव आणि याकोब ही दोन मुले झाली. याकोब हा एसावापेक्षा फार वेगळा होता. त्याने आध्यात्मिक गोष्टींचे महत्त्व जाणले आणि त्याबद्दल त्याला आशीर्वादही लाभले. देवाने याकोबाचे नाव बदलून त्याला इस्राएल हे नाव दिले आणि इस्राएलचे १२ पुत्र इस्राएल वंशांचे प्रमुख बनले. पण, त्या कुटुंबापासून एक मोठे राष्ट्र कसे काय बनले?
इस्राएलचे पुत्र आपल्या धाकट्या भावाचा, योसेफाचा द्वेष करू लागले तेव्हा घटनांची एक मालिकाच सुरू झाली. त्यांनी त्याला गुलाम म्हणून विकले आणि त्यानंतर त्याला इजिप्तमध्ये नेण्यात आले. पण, देवाने त्या विश्वासू, धाडसी तरुणाला आशीर्वादित केले. अनेक हालअपेष्टा सोसल्यानंतर, शेवटी इजिप्तच्या फारो राजाने एका मोठ्या अधिकारपदासाठी योसेफाची निवड केली. ही घटना अगदी नेमक्या वेळी घडली कारण त्याच वेळी देशात मोठा दुष्काळ पडल्यामुळे याकोबाने अन्नधान्य विकत आणण्यासाठी आपल्या पुत्रांना इजिप्तमध्ये पाठवले होते. इजिप्तमध्ये अन्नधान्य विक्रीच्या कार्यावर योसेफच अधिकारी होता. हृदयपालट झालेल्या आपल्या भावांशी योसेफाची झालेली भेट अतिशय भावस्पर्शी होती. त्याने त्यांना क्षमा केली व सबंध कुटुंबाची इजिप्तमध्ये येऊन राहण्याची व्यवस्था केली. त्यांची भरभराट होत राहावी म्हणून इजिप्तचा एक उत्तम प्रदेश त्यांना देण्यात आला. देवानेच आपला उद्देश पूर्ण करण्याकरता या सर्व गोष्टी घडवून आणल्या होत्या हे योसेफाने ओळखले.
याकोबाने आपल्या आयुष्याचे शेवटचे दिवस इजिप्तमध्ये आपल्या मोठ्या कुटुंबाच्या सहवासात घालवले. त्याच्या मृत्यूच्या वेळी त्याने भाकीत केले, की प्रतिज्ञा केलेली संतती किंवा मुक्तिदाता एक शक्तिशाली राजा असेल व आपला पुत्र यहूदा याच्या वंशातून तो येईल. पुढे अनेक वर्षांनंतर योसेफानेही आपल्या मृत्यूच्या आधी असे भाकीत केले, की एके दिवशी देव याकोबाच्या कुटुंबाला इजिप्तमधून सोडवेल.
—उत्पत्ति २० ते ५० अध्याय; इब्री लोकांस ११:१७-२२ वर आधारित.