अध्याय ९
आपल्या मृत प्रियजनांचे काय होते?
१. मृत्यू एखाद्या प्रियजनावर घाला घालतो तेव्हा लोकांना कसे वाटते?
“आपल्याला प्रिय असणाऱ्या कोणाचा मृत्यू होतो तेव्हा खूप दुःख होते, कारण मृत्यू कल्पना करता येत नाही इतकी मोठी पोकळी निर्माण करतो.” असे उद्गार एका मुलाने, प्रथम त्याचा बाप व लगेच काही अवधीनंतर त्याची आई वारली तेव्हा काढले. त्याला होणाऱ्या यातना व काही गमावल्याची जाणीव यामुळे “भारी दुःखात बुडाल्यासारखे” वाटायला लावले. कदाचित तुम्हाला देखील असेच दुःख अनुभवण्यास मिळाले असेल. त्यामुळे तुमचे प्रियजन कोठे आहेत आणि त्यांना कधी परत पाहता येईल का, याचे तुम्हाला नवल वाटत असेल.
२. मृत्यूसंबंधाने कोणते गोंधळाचे प्रश्न उपस्थित होतात?
२ काही शोकित पालकांना असे सांगण्यात आले की, “देवाला आवडणाऱ्या, त्याला प्रिय वाटणाऱ्या लोकांना तो आपल्याकडे घेतो.” हे खरे आहे का? आमचे मृत प्रियजन आत्मिक क्षेत्रात गेले का? काही म्हणतात त्याप्रमाणे निर्वाण किंवा सर्व दु:ख व इच्छा यापासून मुक्त असणारी परमसुखाची ती स्थिती आहे का? आमचे ज्याच्यावर प्रेम आहे असे लोक परादीसमधील अमर जीवनाचे दार ओलांडून गेले आहेत का? किंवा, जसे काहींचे म्हणणे आहे त्याप्रमाणे, मृत्यू हा देवाला नाखूष करणाऱ्या लोकांना सर्वकाळ यातना मिळण्याच्या जागी ढकलतो का? मृत आमच्या जीवनावर परिणाम करू शकतात का? अशा प्रश्नांची खरी उत्तरे मिळण्यासाठी आपण देवाचे वचन, बायबलचा परामर्श घेतला पाहिजे.
मनुष्य काय आहे?
३. सॉक्रेटीस व प्लॅटो यांचे मृतांबद्दल काय मत होते आणि त्याचा आज लोकांवर काय परिणाम होत आहे?
३ सॉक्रेटीस व प्लॅटो या प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्त्यांनी असे प्रतिपादिले की, पुरुष व स्त्रीमध्ये अंतर्यामी अमर असे काहीतरी आहे—आत्मा, जो मृत्यूपासून मोकळा होतो व कधीही मरत नाही. आज, जगभर लाखो लोकांचा असाच विश्वास आहे. हा विश्वास, मृतांच्या कल्याणाबद्दल वाटणाऱ्या चिंतेप्रमाणेच त्यांच्याबद्दल भीती देखील निर्माण करतो. परंतु, मनुष्य खरोखर काय आहे आणि तो मरतो तेव्हा काय होते याबद्दल बायबल अगदी वेगळेच शिकवते.
४. (अ) मनुष्य काय आहे याविषयी उत्पत्तीचे पुस्तक आपल्याला काय सांगते? (ब) आदामाला सजीव बनवण्याकरता देवाने त्याच्यामध्ये काय घातले?
४ मनुष्याला कसे बनवण्यात आले याविषयी बायबलमधील वर्णन साधेसोपे व सुसंगत आहे; ते मानवांच्या क्लिष्ट तत्त्वज्ञानासारखे व अंधश्रद्धेसारखे कोड्यात टाकणारे नाही. बायबलच्या पहिल्याच पुस्तकात, अर्थात उत्पत्ति २:७ येथे असे म्हटले आहे: “परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडिला व त्याच्या नाकपुड्यांत जीवनाचा श्वास फुंकिला, तेव्हा मनुष्य जीवधारी निफेश a[इब्री भाषेत शब्दशः, “श्वास घेणारा”] झाला.” (NW) लक्ष द्या, मनुष्याला आत्मा देण्यात आला नाही. त्याउलट, अचेतन शरीरात, शक्ती किंवा “जीवनाचा श्वास” फुंकण्यात आला आणि मगच तो एक मनुष्य किंवा एक जिवंत व्यक्ती बनला. यावरून स्पष्ट होते की, मनुष्याला जिवंत, सचेतन व्यक्ती बनण्यासाठी त्याच्यामध्ये आत्मा असण्याची गरज नाही. आदामाचे जीवन श्वासोच्छ्वासाद्वारे टिकवण्यात आले. तथापि, देवाने आदामामध्ये जीवनाचा श्वास घातला तेव्हा त्याच्या फुफ्फुसांत हवा भरण्यापेक्षा अधिक काही समाविष्ट होते. पृथ्वीवरील सर्व जिवंत प्राण्यांठायी “जीवनी शक्ती” असल्याचे बायबल म्हणते.—उत्पत्ति ७:२२, NW.
५, ६. (अ) “जीवनी शक्ती” काय आहे? (ब) स्तोत्र १४६:४ मध्ये उल्लेखण्यात आलेला “श्वास” शरीराला सचेतन बनवण्याचे थांबवतो तेव्हा काय घडते?
५ ही “जीवनी शक्ती” काय आहे? ती जीवनाची अशी महत्त्वपूर्ण ठिणगी आहे, जी देवाने आदामाच्या निर्जीव शरीरात घातली. ही शक्ती नंतर श्वासोच्छ्वासाच्या प्रक्रियेद्वारे टिकवून ठेवण्यात आली. पण, स्तोत्र १४६:४ मध्ये सांगण्यात आलेला “श्वास” काय आहे? ते वचन, मरणाऱ्या व्यक्तीबद्दल असे सांगते: “त्याचा श्वास निघून जातो, तो आपल्या मातीत परत जातो, त्याच दिवशी त्याचे संकल्प नष्ट होतात.” (पं.र.भा.) जेव्हा बायबलच्या लेखकांनी “श्वास” हा शब्द या पद्धतीने वापरला तेव्हा त्यांच्या मनात, शरीराला सोडून जाणारा व त्यानंतर जिवंत राहणारा आत्मा नव्हता.
६ मरणाच्या वेळी माणसांतून जो “श्वास” निघतो तो, आमच्या निर्माणकर्त्याकडून येणारी जीवनी शक्ती आहे. (स्तोत्र ३६:९; प्रेषितांची कृत्ये १७:२८) जसे वीज ज्या उपकरणाला शक्ती देते त्याचे गुणधर्म धारण करीत नाही; तसेच या जीवनी शक्तीला देखील, ती सचेतन करणाऱ्या कोणत्याही प्राण्यांचे गुणधर्म नसतात. जेव्हा कोणी मरतो तेव्हा “श्वास” (जीवनी शक्ती) शरीरातील पेशींची सचेतना संपवतो, जसे वीज बंद केली म्हणजे विजेचा दिवा मालवतो. तसेच, जेव्हा जीवनी शक्ती मनुष्याचे शरीर टिकवून धरण्याचे थांबवते तेव्हा संपूर्ण मनुष्य मरतो.—स्तोत्र १०४:२९.
‘तू मातीला परत जाऊन मिळशील’
७. आदामाने देवाची अवज्ञा केल्यास काय घडणार होते?
७ देवाने पापी आदामासाठी मृत्यूचा काय अर्थ होणार होता ते स्पष्टपणे सांगितले. देवाने म्हटले: “तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुनः मातीला जाऊन मिळशील; कारण तिच्यातून तुझी उत्पत्ति आहे; तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील.” (उत्पत्ति ३:१९) आदाम कोठे परतणार होता? जमिनीतील मातीमध्ये जेथून त्याची निर्मिती करण्यात आली होती. मेल्यावर आदाम अस्तित्वातच राहणार नव्हता!
८. मानव कोणत्या बाबतीत पशूंपेक्षा श्रेष्ठ नाहीत?
८ या बाबतीत मानवांचा मृत्यू व जनावरांचा मृत्यू यामध्ये काहीही फरक नाही. ते देखील निफेश आहेत आणि तोच “श्वास” किंवा जीवनी शक्ती त्यांना सचेतन करीत राहते. (उत्पत्ति १:२४) उपदेशक ३:१९, २० मध्ये सुज्ञ मनुष्य शलमोन आम्हाला सांगतो: “जसा हा मरतो तसाच तोहि मरतो; आणि त्या सर्वांना एकच श्वास आहे, तर पशूंपेक्षा मनुष्याला [मरणाच्या बाबतीत] काही श्रेष्ठता नाही. . . . सर्व धुळीतून उत्पन्न झालेले आहेत, आणि सर्व फिरून धुळीस मिळतात.” (पं.र.भा.) मनुष्य पशूंपेक्षा श्रेष्ठ दर्जाचा होता कारण त्याची निर्मिती देवाच्या स्वरूपाप्रमाणे, यहोवाचे गुण परावर्तित करण्याच्या क्षमतेसह झाली होती. (उत्पत्ति १:२६, २७) पण, मेल्यावर मानव तसेच पशू सुद्धा मातीत परत मिळतात.
९. मृतांची स्थिती कशी असते आणि ते कोठे जातात?
९ मृत्यूचा काय अर्थ होतो त्याबद्दल शलमोन आणखी स्पष्टता देतो. तो म्हणतो: “आपणांस मरावयाचे आहे हे जिवंताला निदान कळत असते; पण मृतांस तर काहीच कळत नाही.” होय, मृतांना अजिबात जाणीव नसते. या अनुषंगाने, शलमोनाने असे आर्जवले: “जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर; कारण ज्या अधोलोकाकडे [शिओल] तू जावयाचा आहेस तेथे काही उद्योग, युक्तिप्रयुक्ति, बुद्धि व ज्ञान यांचे नाव नाही.” (उपदेशक ९:५, १०) मृत कोठे जातात? अधोलोकाकडे (इब्री, शिʹओहल) जी मानवजातीची सर्वसाधारण कबर आहे. मृत झालेल्या आमच्या प्रियजनांना कसलीही जाणीव नाही. त्यांना कोणताही त्रास, दुःख होत नाही आणि ते आम्हावर कसलाही परिणाम करू शकत नाही.
१०. मरण हाच शेवट नाही असे आपण का म्हणू शकतो?
१० मग, आम्ही सर्वांनी व आमच्या प्रियजनांनी केवळ थोडी वर्षे जगावे आणि नंतर कायमचे अस्तित्वविरहित व्हावे असे आहे का? बायबलनुसार तर तसे नाही. आदामाने बंड केले तेव्हा लगेच यहोवा देवाने मानवी पापाच्या भयंकर परिणामांना उलटवून टाकेल अशी एक व्यवस्था स्थापिली. देवाने मानवजातीकरता केलेल्या संकल्पामध्ये मरणाचा समावेश नव्हता. (यहेज्केल ३३:११; २ पेत्र ३:९) याकरता, मृत्यू हा आमच्याकरता किंवा आमच्या प्रियजनांकरता शेवट असण्याची गरज नाही.
“झोपला आहे”
११. येशूने त्याचा मृत मित्र लाजर याच्या स्थितीचे कसे वर्णन केले?
११ आम्हाला व आमच्या मृत प्रियजनांना आदामाकडून आलेल्या मृत्यूपासून सोडवावे हा यहोवाचा संकल्प आहे. या कारणामुळे, देवाचे वचन मृतांना निद्रित असल्याचे संबोधते. उदाहरणार्थ, येशू ख्रिस्ताने त्याचा मित्र लाजर वारल्याचे कळाल्यावर त्याच्या शिष्यांना म्हटले: “आपला मित्र लाजर झोपला आहे, पण मी त्याला झोपेतून उठवावयास जातो.” या विधानाचा अर्थ त्याचे शिष्य लगेच समजू न शकल्यामुळे येशूने त्यांना स्पष्टपणे म्हटले: “लाजर मेला आहे.” (योहान ११:११, १४) यानंतर येशू बेथानी येथे गेला; तेथे लाजरच्या बहिणी मार्था व मरीया त्यांच्या भावाच्या मरणाबद्दल शोक करीत होत्या. येशूने मार्थाला म्हटले की, “तुझा भाऊ पुन्हा उठेल,” तेव्हा तिने, मानवी कुटुंबावर असलेल्या मरणाच्या परिणामांना उलटवण्याचा जो देवाचा संकल्प आहे त्यावरील स्वतःचा विश्वास जाहीर केला. ती म्हणाली: “तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानसमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे.”—योहान ११:२३, २४.
१२. वियोगी मार्थेला मृताबद्दल कोणती आशा वाटत होती?
१२ मरणानंतर जिवंत असू शकणाऱ्या कोणा अमर जीवाबद्दलचा उल्लेख मार्थाने स्वतःच्या बोलण्यात केला नव्हता. लाजर स्वतःचे अस्तित्व पुढे चालू ठेवण्याकरता कोणा आत्मिक क्षेत्रात गेला असा तिचा विश्वास नव्हता. मार्थाचा विश्वास मृतांचे पुनरुत्थान होण्याच्या आश्चर्यकारक आशेवर होता. लाजराच्या शरीरातून अमर जीव निघून गेला होता हे नव्हे तर, तिचा मृत भाऊ आता कोठेच अस्तित्वात नाही हे तिला कळले होते. यास्तव, तिच्या भावाचे पुनरुत्थान हाच उपाय होता.
१३. येशूठायी देवाकडून कोणते सामर्थ्य मिळालेले आहे आणि त्याने ते सामर्थ्य कसे दाखवले?
१३ मानवजातीची मुक्तता करण्यासाठी यहोवा देवाने येशू ख्रिस्ताला सामर्थ्य दिले आहे. (होशेय १३:१४) यामुळेच, मार्थेच्या विधानाला प्रतिसाद देताना येशूने म्हटले: “पुनरुत्थान व जीवन मीच आहे; जो माझ्यावर विश्वास ठेवितो तो मेला असला तरी जगेल.” (योहान ११:२५) याबाबतीत स्वतःला देवाकडून मिळालेले सामर्थ्य आहे हे येशूने, मरून चार दिवस उलटलेल्या लाजराच्या कबरेकडे जाऊन दाखवून दिले. त्याने त्याला पुन्हा जिवंत केले. (योहान ११:३८-४४) येशू ख्रिस्ताने केलेले हे तसेच इतर पुनरुत्थान ज्यांनी पाहिली त्यांना केवढा आनंद वाटला असावा याचा जरा विचार करा.—मार्क ५:३५-४२; लूक ७:१२-१६.
१४. पुनरुत्थान व अमर जिवाची कल्पना यांचा का मेळ बसू शकत नाही?
१४ थोडेसे थांबून याचा जरा गंभीरपणे विचार करा: मरणानंतर अमर जीव जिवंत राहात असला तर कोणाचेही पुनरुत्थान होण्याचे अथवा त्याला जीवनात परत आणण्याची काही गरज नाही. खरे म्हणजे, लाजरासारखा माणूस जर अद्भुत स्वर्गीय वतनात दाखल झाला आहे तर अशाचे पुनरुत्थान करून त्याला पृथ्वीवरील अपरिपूर्ण जीवनात आणणे हे काही दयेचे कृत्य नसणार. वस्तुतः बायबल “अमर जीव” या शब्दप्रयोगाचा कधीच वापर करीत नाही. उलटपक्षी, पाप करणारा मानवी जीव मरतो असे शास्त्रवचने म्हणतात. (यहेज्केल १८:४, २०) अशाप्रकारे, पुनरुत्थान ही मृत्यूपासून खरी सुटका देणारी तरतूद असल्याचे बायबल दर्शवते.
‘स्मृती कबरेतील सर्व’
१५. (अ) “पुनरुत्थान” या संज्ञेचा काय अर्थ होतो? (ब) वैयक्तिकांचे पुनरुत्थान यहोवा देवाकरता समस्या का होणार नाही?
१५ “पुनरुत्थान” याकरता येशूच्या शिष्यांनी जो शब्द वापरला त्याचा अक्षरशः अर्थ “उठणे,” किंवा “उभे राहणे” असा आहे. हे मृताच्या निर्जिव स्थितीतून उठणे—जणू मानवजातीच्या सर्वसाधारण कबरेतून उठून उभे राहण्यासारखे आहे. यहोवा देव कोणाही व्यक्तीचे अगदी सहजपणे पुनरुत्थान करू शकतो. का बरे? कारण यहोवा जीवनाचा आद्यप्रवर्तक आहे. आज मानव, पुरुष व स्त्रियांचे आवाज व प्रतिमा यांची व्हिडीओ टेप तयार करू शकतो आणि त्यांच्या मरणानंतर हे चित्रध्वनिमुद्रण पुन्हा बघू शकतो. त्याचप्रमाणे, आमचा सर्वसमर्थ निर्माणकर्ता खात्रीने कोणाही व्यक्तीची सविस्तर माहिती संग्रहीत करू शकतो व तो तिला नवे तयार केलेले शरीर देऊन त्याचे किंवा तिचे पुनरुत्थान करू शकतो.
१६. (अ) स्मृती कबरेत असणाऱ्या सर्वांच्या बाबतीत येशूने कोणते अभिवचन दिले? (ब) एखाद्याचे पुनरुत्थान कशासाठी झाले आहे हे कसे ठरवले जाईल?
१६ येशू ख्रिस्ताने म्हटले: “[स्मृती] कबरेतील सर्व माणसे त्याची [येशूची] वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील अशी वेळ येत आहे.” (योहान ५:२८, २९) यहोवाच्या स्मरणात असलेल्या सर्वांचे पुनरुत्थान होऊन त्यांना त्याच्या मार्गाचे शिक्षण देण्यात येईल. जे देवाविषयीच्या ज्ञानाच्या एकमतात स्वतःची हालचाल राखतील त्यांच्यासाठी त्याचा अर्थ जीवनाचे पुनरुत्थान असा होईल. पण देवाचे शिक्षण व त्याचे आधिपत्य झिडकारणाऱ्यांना त्यांचे पुनरुत्थान नापसंतीचा न्याय व्यक्त करण्यासाठी झालेले असेल.
१७. कोणाचे पुनरुत्थान होईल?
१७ अर्थातच, ज्यांनी यहोवाचे सेवक म्हणून धार्मिकतेचा मार्ग आचरला आहे त्यांचे पुनरुत्थान होईल हे स्वाभाविक आहे. खरे म्हणजे, पुनरुत्थानाच्या आशेनेच पुष्कळांना हिंसाचारी छळात असताना मृत्यूला तोंड देण्यासाठी बळकटी दिली. देव त्यांना पुन्हा जीवन देऊ शकतो हे त्यांना ठाऊक होते. (मत्तय १०:२८) तथापि लाखो लोक, देवाचे नीतीमान दर्जे स्वतःला पूर्ण करता येतील की नाही हे दाखवण्याआधीच वारले आहेत. यांचे देखील पुनरुत्थान होईल. यहोवाने या संबंधाने जो संकल्प राखला आहे त्याबद्दल आत्मविश्वास असल्यामुळे प्रेषित पौलाने हे म्हटले: “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल, अशी . . . आशा मी देवाकडे पाहून धरितो.”—प्रेषितांची कृत्ये २४:१५.
१८. (अ) प्रेषित योहानाला पुनरुत्थानाचा कोणता दृष्टान्त लाभला? (ब) “अग्नीच्या सरोवरात” कशाचा नाश होतो आणि हे “सरोवर” कशाचे सूचक आहे?
१८ देवाच्या राजासनापुढे उभे असलेल्या पुनरुत्थित लोकांचा थरारक दृष्टान्त प्रेषित योहानाला बघायला मिळाला. तेव्हा योहानाने लिहिले: “समुद्राने आपल्यामधील मृत मनुष्यांस बाहेर सोडले; मृत्यु व अधोलोक ह्यांनी आपल्यातील मृतांस बाहेर सोडले; आणि ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरविण्यात आला. तेव्हा मरण व अधोलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकली गेली. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय.” (प्रकटीकरण २०:१२-१४) जरा विचार करा! देवाच्या स्मरणात असलेल्या सर्व मृतांना मानवजातीची साधारण कबर हेडीज (ग्रीक, हेʹडीज), किंवा शिओल यातून मुक्त होण्याचे भवितव्य आहे. (स्तोत्र १६:१०; प्रेषितांची कृत्ये २:३१) आपण देवाची सेवा करू का हे त्यांना स्वतःच्या कृत्यांद्वारे दाखवून देण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर, “मरण व अधोलोक” यांना संपूर्ण नाशाला सूचित असणाऱ्या “अग्नीच्या सरोवरात” टाकून दिले जाईल. “गेहेन्ना” ही संज्ञा देखील हाच अर्थ देते. (लूक १२:५) मानवजातीची सर्वसाधारण कबर पूर्णपणे रिकामी होईल आणि पुनरुत्थानाचे कार्य पूर्ण होईल तेव्हा तिचे अस्तित्व संपेल. देव कोणालाही यातना देत नाही हे बायबलमधून शिकणे किती सांत्वनदायक आहे!—यिर्मया ७:३०, ३१.
पुनरुत्थान कोणत्या ठिकाणासाठी?
१९. मानवजातीपैकी काहींचे स्वर्गाकरता का पुनरुत्थान होईल आणि देव अशांना कोणत्या प्रकारचे शरीर देईल?
१९ मर्यादित स्त्री-पुरुषांचे पुनरुत्थान स्वर्गातील जीवनासाठी होईल. येशूसोबत राजे व याजक या नात्याने असताना ते, पहिला मानव आदाम याजकडून मानवजातीने वारशाने घेतलेल्या मरणाचे सर्व परिणाम काढून टाकण्यामध्ये सहभाग घेतील. (रोमकर ५:१२; प्रकटीकरण ५:९, १०) ख्रिस्तासोबत आधिपत्य गाजवण्याकरता देव किती लोकांना स्वर्गात घेणार? बायबलनुसार केवळ १,४४,००० जणांना. (प्रकटीकरण ७:४; १४:१) यहोवा या पुनरुत्थान लाभलेल्या प्रत्येकाला आत्मिक शरीर देईल, म्हणजे ते त्याच्यासोबत स्वर्गात राहू शकतील.—१ करिंथकर १५:३५, ३८, ४२-४५; १ पेत्र ३:१८.
२०. पुनरुत्थितांसहित आज्ञाधारक मानवजातीला कशाचा अनुभव घडेल?
२० जे वारले त्यापैकी बहुतेकांचे परादीसमय पृथ्वीवर पुनरुत्थान होईल. (स्तोत्र ३७:११, २९; मत्तय ६:१०) काही लोकांना स्वर्गात पुनरुत्थान लाभण्याच्या कारणापैकी एक म्हणजे देवाचा पृथ्वीबद्दलचा संकल्प पूर्ण करणे हे होय. येशू ख्रिस्त व स्वर्गातील १,४४,०००, आज्ञाधारक मानवजातीला आपल्या मूळ पालकांनी भिरकावून दिले त्या परिपूर्णतेप्रत हळूवारपणे आणतील. यामध्ये पुनरुत्थितांचा देखील समावेश असेल, जे येशूने त्याच्या बाजूला वधस्तंभावर मरणाऱ्या एका माणसाला दिलेल्या अभिवचनानुसार सूचित होते की, “तू मजबरोबर सुखलोकात असशील.”—लूक २३:४२, ४३.
२१. यशया संदेष्टा व प्रेषित योहान यांच्या मते मृत्यूचे काय होणार?
२१ आज निरर्थकता निर्माण करणारा मृत्यू परादीस पृथ्वीवरून काढून टाकण्यात येईल. (रोमकर ८:१९-२१) यशया संदेष्ट्याने घोषित केले की, यहोवा देव “मृत्यु कायमचा नाहीसा” करील. (यशया २५:८) आज्ञाधारक मानवजात दुःख व मृत्यूपासून मुक्तता अनुभवील त्या काळाचा दृष्टान्त प्रेषित योहानाला देण्यात आला. खरेच, “देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत. कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.”—प्रकटीकरण २१:१-४.
२२. पुनरुत्थानाबद्दलचे ज्ञान तुमच्यावर कसा परिणाम करते?
२२ बायबलचे सुस्पष्ट शिक्षण, मृतांचे काय होते त्याबद्दलचा गोंधळ दूर करते. शास्त्रवचने अगदी साधेपणाने म्हणतात की, मृत्यु हा “शेवटला शत्रू” असून तो नष्ट केला जाईल. (१ करिंथकर १५:२६) पुनरुत्थानाच्या आशेच्या ज्ञानापासून आपण केवढे बळ व सांत्वन मिळवू शकतो! शिवाय, देवाच्या स्मरणात असणारे आमचे मृत प्रियजन मरणाच्या निद्रेतून जागे होतील व ते, देवाने त्याच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी ज्या उत्तम गोष्टी राखून ठेवल्या आहेत अशा सर्वांचा उपभोग घेतील यामुळे आम्हाला केवढा आनंद होऊ शकतो! (स्तोत्र १४५:१६) या सर्व आशीर्वादांची पूर्तता देवाच्या राज्याद्वारे साध्य केली जाईल. पण त्याचे आधिपत्य केव्हा सुरू व्हायचे होते? आपण पाहू या.
[तळटीप]
a निफेश हा इब्री शब्द बायबलमध्ये सुमारे ७०० वेळा आला आहे आणि तो शब्द मानवातील एखाद्या वेगळ्या आणि अमूर्त भागाला नव्हे तर नेहमी मूर्त आणि शारीरिक गोष्टीला सूचित करतो.
तुमच्या ज्ञानाचे परीक्षण करा
मनुष्य काय आहे?
तुम्हाला मृतांच्या स्थितीचे कसे वर्णन करता येईल?
कोणाचे पुनरुत्थान होईल?
[८५ पानांवरील चित्र]
येशूने लाजराला जसे कबरेतून बाहेर बोलावले तसेच लाखो लोकांचे पुनरुत्थान घडेल
[८६ पानांवरील चित्र]
‘देव मृत्यू कायमचा नाहीसा करील’ तेव्हा सर्वत्र आनंदीआनंद असेल