अध्याय २
देवाविषयीचे ज्ञान प्रकटविणारे पुस्तक
१, २. आपल्याला आमच्या निर्माणकर्त्याच्या मार्गदर्शनाची का गरज आहे?
मानवजातीला सूचना व मार्गदर्शन देण्यासाठी आपला प्रेमळ निर्माणकर्ता एखादे पुस्तक देईल ही अगदी व्यवहार्य गोष्ट आहे. खरे म्हणजे, मानवांना मार्गदर्शनाची गरज आहे, याच्याशी तुम्ही सहमत नाही का?
२ एक संदेष्टा व इतिहासकार याने २,५०० पेक्षा अधिक वर्षांआधी असे लिहिले: “पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही.” (यिर्मया १०:२३) या विधानाची सत्यता आज पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात दिसत आहे. यामुळेच इतिहासकार विल्यम एच. मॅकनील यांनी असे परीक्षण केले: “या ग्रहावर जितके मानवी अनुभव घडले ते सर्व जवळजवळ संकटमय स्थितींची श्रृंखला आणि समाजाच्या प्रस्थापित व्यवस्थेमध्ये फाटाफूट करणारे होते.”
३, ४. (अ) बायबलच्या अभ्यासाबद्दल आपण कोणता पवित्रा घ्यावा? (ब) बायबलचे परीक्षण आपण कसे करणार आहोत?
३ बायबल सुज्ञ मार्गदर्शनाबद्दलच्या आमच्या सर्व गरजा पूर्ण करते. बायबलचे पहिल्यांदा परीक्षण करताना बहुतेकांना भारी कठीण वाटू लागते हे खरे आहे. ते मोठे पुस्तक आहे आणि त्याचे काही भाग समजण्यास सोपे नाहीत. पण समजा, तुम्हाला एक मोलवान असा वडिलार्जित वारसा मिळवण्याकरता काय केले पाहिजे त्याची माहिती देणारे कायदेशीर मृत्युपत्र देण्यात आले आहे. तर मग, तुम्ही त्याचे काळजीपूर्वक परीक्षण करण्याकरता वेळ देणार नाही का? त्यातील काही भाग तुम्हाला समजण्यास कठीण वाटत असल्यास, ज्यांना त्या गोष्टींची समज आहे अशांकडून तुम्ही नक्कीच मदत घ्याल. तेव्हा, बायबलकडे देखील अशाच मनोवृत्तीने का पाहू नये? (प्रेषितांची कृत्ये १७:११) भौतिक वारशापेक्षा अधिक गोष्टी वादविषयाच्या आहेत. आपण मागील अध्यायात शिकल्याप्रमाणे देवाविषयीचे ज्ञान आपल्याला सार्वकालिक जीवनाकडे नेते.
४ देवाविषयीचे ज्ञान प्रकटविणाऱ्या पुस्तकाचे आपण परीक्षण करू या. आम्ही प्रथमतः बायबलचा एकंदरीत दृष्टिकोन सादर करणार आहोत. त्यानंतर, आपण अधिक माहितगार लोक ते देवाचे प्रेरित वचन असल्याचा त्याजवर विश्वास का ठेवतात त्याच्या कारणांची चर्चा करणार आहोत.
बायबलमध्ये कशाचा समावेश आहे
५. (अ) इब्री शास्त्रवचनांत काय समाविष्ट आहे? (ब) ग्रीक शास्त्रवचनांत काय समाविष्ट आहे?
५ बायबलची ६६ पुस्तके असून ती जुना करार व नवा करार असे सहसा म्हटल्या जाणाऱ्या दोन विभागांत विभागलेली आहेत. बायबलची ३९ पुस्तके प्रामुख्यत्वे इब्री आणि २७ पुस्तके ग्रीक भाषेत लिहिण्यात आली. इब्री शास्त्रवचनांत उत्पत्ती ते मलाखी येथपर्यंतची पुस्तके असून त्यात सृष्टी आणि मानव यांच्या इतिहासाच्या पहिल्या ३,५०० वर्षांचा अहवाल आढळतो. बायबलच्या या भागाचे परीक्षण करीत असता आपल्याला, देवाने इस्राएल लोकांसोबत त्यांचा सा.यु.पू. १६ व्या शतकात एक राष्ट्र असा जन्म घडला तेव्हापासून सा.यु.पू. ५ व्या शतकापर्यंत, कसा व्यवहार राखला हे शिकायला मिळते.a ग्रीक शास्त्रवचनांत मत्तय ते प्रकटीकरण ही पुस्तके आहेत व ती सा. यु. पहिल्या शतकातील येशू ख्रिस्त व त्याच्या शिष्यांची कार्ये व शिकवणी यावर लक्ष केंद्रित करतात.
६. आपण सबंध बायबलचा अभ्यास का करावा?
६ काही जणांचे म्हणणे आहे की, “जुना करार” यहूद्यांकरता आणि “नवा करार” ख्रिश्चनांकरता आहे. परंतु, २ तीमथ्य ३:१६ नुसार ‘सर्व शास्त्रवचने परमेश्वरप्रेरित असून ती लाभदायक आहेत.’ या कारणास्तव, शास्त्रवचनांच्या योग्यप्रकारच्या अभ्यासात सबंध बायबलचा समावेश असला पाहिजे. खरे म्हणजे, बायबलचे दोन भाग एकमेकांना पूरक असून ते एका सर्वसाधारण विषयाला विकसित करण्यासाठी एकमेकात सुसंगतपणे मिसळतात.
७. बायबलचा मुख्य विषय काय आहे?
७ तुम्ही कदाचित चर्चमधील धार्मिक विधींना बऱ्याच वर्षांपासून उपस्थित राहिला असाल व तेथे बायबलच्या काही भागाचे मोठ्याने केलेले वाचन ऐकले असेल. किंवा तुम्ही देखील त्यातील काही उतारे स्वतःच वाचले असतील. पण तुम्हाला हे माहीत होते का की, उत्पत्ती ते प्रकटीकरणापर्यंत बायबलमध्ये एकाच विचारांची साखळी आहे? होय, बायबलमध्ये एकच सुसंगत विषय व्यापलेला आहे. तो कोणता आहे? तो, देवाने मानवजातीवर आधिपत्य गाजवण्याच्या हक्काचे समर्थन आणि त्याच्या राज्याद्वारे त्याच्या प्रेमळ उद्देशांची पूर्तता हा आहे. हा उद्देश देव कसा पूर्ण करणार ते आपण नंतर पाहणार आहोत.
८. बायबल देवाच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल काय प्रकट करते?
८ देवाचे उद्देश काय आहेत ते कळवण्यासोबतच बायबल त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन देखील घडवते. उदाहरणार्थ, देवाला भावना आहेत आणि आपण ज्या निवडी करतो त्या त्याला महत्त्वाच्या वाटतात हे आपल्याला बायबलमधून शिकायला मिळते. (स्तोत्र ७८:४०, ४१; नीतिसूत्रे २७:११; यहेज्केल ३३:११) स्तोत्र १०३:८-१४ म्हणते की, देव “दयाळू व कृपाळू आहे, तो मंदक्रोध व दयामय आहे.” तो आम्हाला मोठ्या ममतेने सांभाळतो, कारण ‘त्याला हे ठाऊक आहे की, आपण केवळ माती आहोत’ व मृत्यूनंतर मातीला परत जाऊन मिळतो. (उत्पत्ति २:७; ३:१९) खरेच, केवढे अद्भुत गुण तो प्रदर्शित करतो! अशाप्रकारच्या देवाची भक्ती करावी असे तुम्हाला वाटत नाही का?
९. बायबल देवाच्या दर्जांबद्दल स्पष्ट दृष्टिकोन आम्हाला कसा देते आणि अशा ज्ञानापासून आपल्याला कसा फायदा होऊ शकतो?
९ बायबल देवाच्या दर्जांबद्दलचा स्पष्ट दृष्टिकोन आपल्याला देते. यांना कधीकधी नियम म्हणून उद्धृत करण्यात आले आहे. तथापि, बहुतेक वेळा वस्तुपाठांद्वारे शिकवण्यात येणाऱ्या तत्त्वांमध्ये ते परावर्तित होतात. प्राचीन इस्राएलाच्या इतिहासात घडलेल्या काही घटना देवाने आमच्या लाभांकरता लिहून ठेवल्या आहेत. हे स्पष्ट अहवाल, लोक जेव्हा देवाच्या उद्देशाच्या एकमतात काम करतात तेव्हा काय घडते आणि जेव्हा ते आपला स्वैराचारी मार्ग घेतात तेव्हा काय होते ते दाखवतात. (१ राजे ५:४; ११:४-६; २ इतिहास १५:८-१५) या सत्य जीवनकथा वाचल्यावर त्या आपल्या हृदयाला नक्कीच चाटून जातील. लिहिलेल्या घटनांचे दृश्य आपल्या डोळ्यांपुढे उभे केल्यास आपण त्यात समाविष्ट असणाऱ्या लोकांच्या बरोबर पाहू शकतो. अशाप्रकारे चांगल्या उदाहरणांपासून आपला फायदा होऊ शकतो आणि अपराध्यांना पाश ठरलेले धोके टाळू शकतो. तथापि, या एका महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर जरूरीचे आहे: आपण बायबलमध्ये जे वाचतो ते देवाकडून खरेच प्रेरित आहे याची खात्री आपल्याला कशी होऊ शकते?
तुम्ही बायबलवर भाव ठेवू शकता का?
१०. (अ) बायबल अप्रचलित बनले आहे असे काहींना का वाटते? (ब) बायबलबद्दल २ तीमथ्य ३:१६, १७ आपल्याला काय सांगते?
१० सल्ला देणारी बरीच पुस्तके थोड्या वर्षातच अप्रचलित झाली हे तुमच्या लक्षात आले असेल. पण बायबलबद्दल काय? ते तर खूपच जुने आहे, त्यातील शेवटले शब्द लिहून जवळपास २,००० वर्षे लोटली आहेत. या कारणास्तव, ते आमच्या आधुनिक युगात लागू होणारे नाही असे काहींना वाटते. पण, बायबल जर देवाकडील प्रेरित पुस्तक आहे तर त्याचा सल्ला, त्याला कितीही युगे उलटली असली तरी नेहमीच अद्ययावत असला पाहिजे. शास्त्रवचने अद्याप “सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्याकरिता उपयोगी [असली पाहिजेत], ह्यासाठी की, देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.”—२ तीमथ्य ३:१६, १७.
११-१३. बायबल आपल्या काळासाठी व्यावहारिक आहे असे आम्ही का म्हणू शकतो?
११ बायबलची तत्त्वे, ती प्रथम लिहिण्यात आली तेव्हा जशी लागू होत होती तशीच आज देखील लागू होणारी आहेत असे सूक्ष्म परीक्षण प्रकट करते. उदाहरणार्थ, मानवी स्वभावाबद्दल बघता, बायबल अशी काही समज दाखवते जी, मानवजातीतील प्रत्येक पिढीला लागू होण्याजोगी आहे. हे आपल्याला मत्तयाचे पुस्तक अध्याय ५ ते ७ मध्ये आढळणाऱ्या येशूच्या डोंगरावरील प्रवचनात अगदी सहजपणे पाहावयास मिळते. या प्रवचनाने दिवंगत भारतीय नेते मोहनदास क. गांधी यांच्यावर इतकी छाप पाडली होती की, त्यांनी त्या काळातील ब्रिटीश अधिकाऱ्यांना असे म्हटले, “ख्रिस्ताने डोंगरावरील प्रवचनामध्ये दिलेल्या शिकवणींबद्दल जेव्हा तुमच्या व माझ्या देशाचे एकमत होईल तेव्हा आपण फक्त आपल्याच देशांचे नव्हे तर सर्व जगाचे प्रश्न सोडवलेले असतील.”
१२ येशूच्या शिकवणींमुळे लोकांवर छाप पडली यात कोणतेही आश्चर्य नाही! डोंगरावरील प्रवचनात त्याने खऱ्या आनंदाचा मार्ग आपल्याला दाखवला आहे. मतभेद कसे मिटवावेत याचीही त्याने स्पष्टता केली. येशूने प्रार्थना कशी करावी त्याबद्दलचा सल्ला पुरवला. त्याने भौतिक गरजांबद्दल सर्वसुज्ञ प्रवृत्ती राखण्याकडे निर्देश केला आणि इतरांबरोबर योग्य नातेसंबंध राखण्याकरता सुवर्ण नियम दिला. त्याच्या प्रवचनात धार्मिक लबाड्या कशा शोधाव्या आणि सुरक्षित भवितव्य कसे मिळवावे असे काही अनेक मुद्दे देखील होते.
१३ डोंगरावरील प्रवचनात तसेच बाकीच्या इतर पृष्ठांमध्येही बायबल, जीवनातील आपली स्थिती सुधारता यावी यासाठी काय करावे आणि काय करण्याचे टाळावे हेही आपल्याला स्पष्टपणे सांगते. त्याचा सल्ला इतका व्यावहारिक आहे की, एका शिक्षणतज्ज्ञाकडून असे उद्गार निघाले: “मी उच्च पदवीधर असून उच्च माध्यमिक शाळेत सल्लागार म्हणून आहे. मी मानसिक आरोग्य व मानसशास्त्रावर बरेच काही वाचन केले आहे; तरीपण बायबल यशस्वी विवाह, बाल गुन्हेगारीला थोपवावे, मित्र कसे मिळवावे व ते टिकवून ठेवावे यासारख्या गोष्टींबद्दल जो सल्ला देते तो मी वाचलेल्या गोष्टींपेक्षा किंवा विद्यालयातील अभ्यासापेक्षा अधिक श्रेष्ठ असल्याचे मला दिसले आहे.” बायबल व्यावहारिक व अद्ययावत असण्यासोबतच भरवसा ठेवण्याजोगेही आहे.
अचूक व खात्रीशीर
१४. बायबल वैज्ञानिकदृष्ट्या अचूक आहे हे कोणते उदाहरण दाखवून देते?
१४ बायबल हे विज्ञानाचे पाठ्यपुस्तक नसले तरी ते वैज्ञानिकदृष्ट्या अचूक आहे. उदाहरणार्थ, एक काळ असा होता जेव्हा लोक पृथ्वी सपाट असल्याचे मानत होते; पण यशया संदेष्ट्याने तिचा ‘मंडळ’ (इब्री, चुघ, येथे त्याची “गोल” अशी कल्पना असण्याचा अर्थ मिळतो) असा उल्लेख केला. (यशया ४०:२२) यशयाच्या काळाच्या हजारो वर्षानंतर देखील गोलाकार पृथ्वीबद्दलची कल्पना सार्वत्रिक बनली नव्हती. याशिवाय, ३,००० पेक्षाही अधिक वर्षांआधी लिहिण्यात आलेले ईयोब २६:७ म्हणते की, देवाने “पृथ्वी निराधार टांगली आहे.” बायबलचे एक प्रामाण्य म्हणतात: “पृथ्वी अंतराळात निराधार आहे हे खगोलशास्त्राने सांगितलेले सत्य ईयोबाला कसे माहीत होते हा प्रश्न पवित्र शास्त्रवचनांचा प्रेरितपणा नाकारणाऱ्यांना समजणे कठीण आहे.”
१५. वृत्तांताचे कथन करण्याच्या पद्धतीद्वारे बायबलवरील आत्मविश्वास कसा बळकट होतो?
१५ बायबलमधील वृत्तांताचे कथन करण्याची पद्धत देखील कालखंडात जुन्या झालेल्या या प्राचीन पुस्तकावरील आपला भरवसा दृढ बनवते. बायबलमध्ये सांगण्यात आलेल्या घटना दंतकथेप्रमाणे नव्हे तर विशिष्ट लोक व तारखांशी संबंधित आहेत. (१ राजे १४:२५; यशया ३६:१; लूक ३:१, २) प्राचीन काळातील इतिहासकारांनी त्यांच्या शासनकर्त्यांच्या विजयांचे भडक वर्णन दिले आणि त्यांचे पराजय व चुका यांना लपवून ठेवले, पण बायबलचे लेखक खरे व प्रामाणिक होते—त्यांच्या स्वतःच्या गंभीर पापांबद्दल देखील.—गणना २०:७-१३; २ शमुवेल १२:७-१४; २४:१०.
भविष्यवाणीचे पुस्तक
१६. बायबल देवाकडील प्रेरित पुस्तक आहे याचा सर्वात मोठा पुरावा कोणता आहे?
१६ बायबल हे ईश्वरप्रेरित पुस्तक आहे याचा निर्णायक पुरावा पूर्ण झालेली भविष्यवाणी देते. बायबलमध्ये पुष्कळ भविष्यवाण्या आहेत व त्यांची सविस्तरपणे पूर्णता झाली. अर्थातच, या गोष्टीला यत्किंचितही मनुष्य जबाबदार असू शकत नाही. मग, या भविष्यवाण्यांमागे कोण आहे? बायबल स्वतःच असे म्हणते की, “भविष्यवाणी मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेली नाही; तर पवित्र आत्म्याने [किंवा देवाच्या क्रियाशील शक्तीने] प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून ती सांगितली आहे.” (२ पेत्र १:२१, NW) काही उदाहरणांना विचारात घ्या.
१७. बाबिलोनचे पतन घडेल असे कोणत्या भविष्यवाण्यांनी भाकीत केले आणि यांची पूर्णता कशी झाली?
१७ बाबिलोनचे पतन. यशया व यिर्मया या दोघांनी भाकीत केले की, बाबिलोनचे पतन मेद व पर्शियनांद्वारे घडेल. या घटनेबद्दल यशयाच्या भविष्यवाणीचे लिखाण बाबिलोनवर विजय मिळवण्याच्या साधारण २०० वर्षांआधी करण्यात आले हे लक्षवेधक आहे! भविष्यवाणीच्या पुढील गोष्टी इतिहासात खात्रीशीर अहवाल म्हणून संग्रहीत आहेत: एक कृत्रिम कालवा खणून युफ्रेटीस नदीचे पाणी वळवून तिचे पात्र आटवणे (यशया ४४:२७; यिर्मया ५०:३८); बाबिलोनच्या नदीवरील वेशींच्या पहाऱ्यामधील कुचराई (यशया ४५:१); आणि कोरेश नावाच्या अधिपतीद्वारे संपादलेला विजय.—यशया ४४:२८.
१८. ‘ग्रीसच्या राजाचे’ उत्थान व पतन याबद्दलची बायबलची भविष्यवाणी कशी पूर्ण झाली?
१८ ‘ग्रीसच्या राजाचे’ उत्थान व पतन. एका दृष्टान्तामध्ये दानीएलाने एका बकऱ्याने एडक्याला धडक दिल्याचे व त्याची दोन शिंगे मोडून काढल्याचे पाहिले. मग, बकऱ्याचे मोठे शिंग मोडले गेले आणि त्याच्या जागी चार शिंगे आली. (दानीएल ८:१-८) दानीएलाला असे स्पष्ट करण्यात आले: “दोन शिंगे असलेला एडका तू पाहिला; ते मेदय व पारस यांचे राजे. तो दांडगा बकरा ग्रीसचा राजा; त्याच्या डोळ्यांच्या मधोमध असलेले मोठे शिंग हा पहिला राजा. एक शिंग मोडून त्याच्या जागी चार शिंगे निघाली याचा अर्थ असा की त्या राज्यातून चार राज्ये उद्भवतील; मग त्याचे बल पहिल्या राज्याइतके राहावयाचे नाही.” (दानीएल ८:२०-२२) या भविष्यवाणीला अनुसरून साधारण दोन शतकानंतर, “ग्रीसचा राजा” थोर सिकंदर याने दोन शिंगाचे, मेदय-पारसाचे साम्राज्य उलथून पाडले. सिकंदरचा सा. यु. पू. ३२३ मध्ये मृत्यू झाला व त्याच्या जागी त्याचे चार सेनापती आले. तथापि, यातील कोणाचेही राज्य सिकंदरच्या साम्राज्याइतके प्रबल ठरले नाही.
१९. येशू ख्रिस्तामध्ये कोणत्या भविष्यवाण्या पूर्ण झाल्या?
१९ येशू ख्रिस्ताचे जीवन. येशूचा जन्म, सेवकपण, मृत्यु व पुनरुत्थान याबद्दल पूर्ण झालेल्या शेकडो भविष्यवाण्या इब्री शास्त्रवचनांत आहेत. उदाहरणार्थ, ७०० पेक्षा अधिक वर्षांआधी मीखाने मशीहा किंवा ख्रिस्ताचा बेथलहेम येथे जन्म होईल असे भाकीत केले होते. (मीखा ५:२; लूक २:४-७) मीखाच्या काळात असणारा यशया याने मशीहाला मार देण्यात व त्याजवर थुंकण्यात येईल असे भाकीत केले. (यशया ५०:६; मत्तय २६:६७) पाचशे वर्षांआधी जखऱ्याने भाकीत केले की, मशीहाचा चांदीच्या ३० तुकड्यांसाठी विश्वासघात होईल. (जखऱ्या ११:१२; मत्तय २६:१५) एक हजारपेक्षा अधिक वर्षांआधी दाविदाने येशू मशीहाच्या मृत्यूशी संलग्न असणाऱ्या परिस्थितींचे भाकीत केले. (स्तोत्र २२:७, ८, १८; मत्तय २७:३५, ३९-४३) शिवाय साधारण पाच शतकांआधी दानीएलच्या भविष्यवाणीने मशीहा केव्हा प्रकट होणार तसेच त्याच्या सेवकपणाचा काळ व त्याच्या मृत्यूची वेळ याबद्दल कळवले. (दानीएल ९:२४-२७) येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण झालेल्या भविष्यवाण्यांपैकी हे काही केवळ नमुने आहेत. नंतर त्याच्याबद्दल अधिक वाचन केल्यामुळे तुम्हाला अधिक लाभ मिळू शकेल.
२०. भविष्यवाणीची पूर्णता झालेल्या बायबलच्या अचूक अहवालाने आम्हाला कोणता आत्मविश्वास देण्यास हवा?
२० याशिवाय, इतर दीर्घ पल्ल्याच्या अनेक बायबल भविष्यवाण्या देखील पूर्ण झाल्या आहेत. ‘पण,’ तुम्ही म्हणाल, ‘याचा माझ्या जीवनावर काय प्रभाव पडू शकतो?’ बरे, तुम्हाला कोणी कित्येक वर्षांपासून खरे सांगत आला आहे आणि आता त्याने तुम्हाला काहीतरी नवीन सांगितले तर तुम्ही एकाएकी संशय घेणार का? नाही! देवाने सबंध बायबलमधून सत्य सांगितले आहे. त्यामुळे बायबल, येणाऱ्या पार्थिव परादीसबद्दल सांगत असलेल्या भविष्यवाण्यांच्या अनुषंगाने जे अभिवचन देते त्यावर तुमचा भरवसा वाढावयास नको का? खरेच, आपल्याला पहिल्या शतकातील येशूच्या शिष्यांपैकी एक पौल याच्यासारखाच आत्मविश्वास वाटू शकतो. त्याने असे लिहिले की, ‘देवाला खोटे बोलवत नाही.’ (तीतास पत्र १:२, NW) याचप्रमाणे, आपण शास्त्रवचने वाचतो व त्यांच्या सल्ल्याचा अवलंब करतो तेव्हा मानवाला स्वतःला जे साध्य करता येणार नाही असे ज्ञान मिळवत असतो, कारण बायबलच सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान प्रकट करणारे पुस्तक आहे.
देवाविषयीच्या ज्ञानाकरता “इच्छा धरा”
२१. तुम्ही बायबलमध्ये शिकत असलेल्या काही गोष्टी तुम्हाला भाराप्रमाणे वाटायला लागल्या तर तुम्ही काय करावे?
२१ तुम्ही बायबलचा अभ्यास करताना तुम्हाला गतकाळात ज्या गोष्टी शिकायला मिळाल्या त्यापेक्षा काहीतरी वेगळे शिकावयास मिळेल. तुम्हाला हेही आढळेल की, तुम्हाला अत्यंत प्रिय वाटणाऱ्या काही धार्मिक पद्धती देवाला संतुष्ट करणाऱ्या नाहीत. या स्वैराचारी जगात जे दर्जे सर्वसाधारण मानले जातात त्यापेक्षा उच्च असे देवाचे बरोबर व चूक ठरवण्याचे दर्जे आहेत हे तुम्हाला शिकायला मिळेल. हे तुम्हाला प्रथमदर्शनी मोठ्या भारासारखे वाटेल. पण धीर धरा! देवाविषयीचे ज्ञान मिळवण्यासाठी शास्त्रवचनांचे बारकाईने परीक्षण करा. बायबलचा सल्ला तुम्हाला तुमचे विचार आणि कृती यांजमध्ये बदल करण्याची हाक देण्याची शक्यता आहे या गोष्टीसाठी तयार असा.
२२. तुम्ही बायबलचा अभ्यास कशासाठी करीत आहात आणि हे तुम्हाला दुसऱ्यांना समजावून सांगण्यासाठी तुम्ही कशी मदत करू शकाल?
२२ तुम्ही करीत असलेल्या बायबल अभ्यासाला तुमचे हितचिंतक मित्र व नातेवाईक विरोध करण्याची शक्यता आहे, परंतु येशूने म्हटले: “जो कोणी माणसांसमोर मला पत्करील त्याला मीहि आपल्या स्वर्गातील पित्यासमोर पत्करीन; पण जो कोणी माणसांसमोर मला नाकारील त्याला मीहि आपल्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन.” (मत्तय १०:३२, ३३) तुम्ही एखाद्या बनावट पंथाचे सभासद व्हाल किंवा धर्मवेडे व्हाल अशी काहींना भीती वाटेल. पण खरे पाहता, तुम्ही तर देव व त्याच्या सत्याचे अचूक ज्ञान मिळवण्याचा अधिक प्रयत्न करीत असता. (१ तीमथ्य २:३, ४) ही समज इतरांना पटवून देताना समंजस असा, तुम्ही जे शिकता त्याबद्दल त्यांच्याशी बोलत असता वाद घालू नका. (फिलिप्पैकरांस ४:५) बायबलचे ज्ञान लोकांचा खरेपणाने फायदा करते असे दिसून आल्यावर पुष्कळांना ‘वचनावाचून जिंकून घेता येते’ हे लक्षात ठेवा.—१ पेत्र ३:१, २.
२३. देवाविषयीच्या ज्ञानासाठी तुम्ही कशी ‘इच्छा धरू शकता’?
२३ बायबल आपल्याला आर्जवते: “नूतन जन्मलेल्या बालकांसारखे वचनाला अनुलक्षून असणाऱ्या निऱ्या दुधाची इच्छा धरा.” (१ पेत्र २:२, NW) एखादे बालक आपल्या आहाराकरता त्याच्या आईवर विसंबून असते आणि ती गरज पूर्ण व्हावी याकरता ते हट्ट धरते. याचप्रमाणे, आपण देखील देवाकडून येणाऱ्या ज्ञानावर विसंबून आहोत. याकरता, अभ्यासात सातत्य राखून त्याच्या वचनाची “इच्छा धरा.” दररोज बायबलचे वाचन करण्याच्या ध्येयाला वास्तविक बनवा. (स्तोत्र १:१-३) याद्वारे तुम्हाला समृद्ध आशीर्वाद मिळतील, कारण देवाच्या नियमांबद्दल स्तोत्र १९:११ म्हणते: “ते पाळिल्याने मोठी फलप्राप्ति होते.”
[तळटीप]
a सा.यु.पू. याचा अर्थ “सामान्य युगाच्या पूर्वी” असा होतो व तो इ.स.पू. (“इसवी सनापूर्वी”) यापेक्षा अधिक बरोबरचा अर्थ देतो. सा.यु. हे “सामान्य युग” याला सूचित करते, ज्याला बहुधा इ.स. म्हणजे इसवी सन, “आमच्या प्रभूच्या वर्षी” असे म्हणण्यात येते.
तुमच्या ज्ञानाचे परीक्षण करा
बायबल इतर कोणत्याही पुस्तकाप्रमाणे नाही ते कशाप्रकारे?
तुम्ही बायबलवर भाव का ठेवू शकता?
बायबल हे देवाचे प्रेरित वचन आहे हे तुम्हाला कशावरून पटते?
[१४ पानांवरील चौकट]
स्वतःच्या बायबलशी अधिक परिचित व्हा
बायबलशी परिचित होणे तितके कठीण नसावे. बायबलच्या पुस्तकांचा क्रम व त्यांचे ठिकाण काढण्यासाठी त्यातील अनुक्रमणिकेचा वापर करण्याचे शिकून घ्या.
संदर्भ सोपा व्हावा म्हणून बायबलच्या पुस्तकांना अध्याय व वचने दिली आहेत. ही अध्यायांची योजना १३ व्या शतकात जोडण्यात आली आणि १६ व्या शतकातील एका फ्रेंच मुद्रकाने ग्रीक शास्त्रवचनांचे विभाजन वचनांमध्ये केले असे दिसते. अध्याय व वचनांनी युक्त असणारे पहिले संपूर्ण बायबल १५५५ मध्ये प्रकाशित झालेले लॅटिनमधील व्हल्गेट हे आहे.
या पुस्तकात शास्त्रवचनांचा जो संदर्भ नमूद करण्यात आला आहे त्यातील पहिला आकडा अध्यायाचा असून पुढचा वचनाचा आहे. उदाहरणार्थ, “नीतीसूत्रे २:५” याचा अर्थ नीतीसूत्राचे पुस्तक, अध्याय २, वचन ५ असा आहे. देण्यात आलेल्या शास्त्रवचनांना काढून पाहण्याद्वारे तुम्हाला बायबलची वचने सहजपणे काढता येतील.
बायबलशी परिचित होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्याचे दररोज वाचन करणे होय. पहिल्यांदा हे आव्हानात्मक वाटेल. तथापि, तुम्ही एका दिवसाला तीन ते पाच अध्यायांचे वाचन त्यांची लांबी लक्षात घेऊन केल्यास एका वर्षात बायबलचे सबंध वाचन तुम्ही पूर्ण कराल. त्याची आजच का सुरवात करू नये?
[१९ पानांवरील चौकट]
बायबल—एक अद्वितीय पुस्तक
• बायबल “परमेश्वरप्रेरित” आहे. (२ तीमथ्य ३:१६) जरी लोकांनी लिखाण केले असले तरी देवाने त्यांच्या विचारांना मार्गदर्शन दिल्यामुळे बायबल खरेच “देवाचे वचन” आहे.—१ थेस्सलनीकाकर २:१३.
• बायबल हे १६ शतकांपेक्षा अधिक कालावधीमध्ये लिहिण्यात आले. लेखक सुमारे ४० होते व ते सर्व वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील होते. तरीसुद्धा, तयार झालेले संपूर्ण पुस्तक सुरवातीपासून ते शेवटपर्यंत सुसंगत आहे.
• बायबल इतर कोणत्याही पुस्तकांपेक्षा अधिक झंझावाती वादविषयांमधून टिकून राहिले आहे. मध्ययुगीन काळात लोकांना, शास्त्रवचनांची एखादी प्रत स्वतःपाशी बाळगल्याच्या क्षुल्लक कारणामुळे खांबावर बांधून जाळण्यात आले.
• बायबल हे जगातील पहिल्या क्रमांकाचे अधिक खप होणारे पुस्तक आहे. त्याचा पूर्ण किंवा काही भागात २,००० पेक्षा अधिक भाषेत अनुवाद करण्यात आला आहे. अब्जावधी प्रतींचे मुद्रण झाले आणि जगात कोठे बायबल मिळू शकणार नाही अशी जागा क्वचितच असेल.
• बायबलचा सर्वात जुना भाग सा. यु. पूर्वीच्या १६ व्या शतकाचा आहे. हे, हिंदूंचे ऋग्वेद (सा. यु. पू. १३०० मध्ये) किंवा बौद्धांच्या “तीन टोपल्यांची सर्वसामान्य तत्त्वे” (सा. यु. पाचवे शतक) किंवा इस्लामचे कुराण (सा. यु. सातवे शतक), तसेच शिन्तोंचे निहोंगी (सा. यु. ७२०) सामोरे येण्याच्या आधीचे आहे.
[Full-page picture on page 20]