मुख्य विषय
आपत्ती आल्यावर ही पावलं उचला आणि जीव वाचवा!
“कानाचे पडदे फाटतील इतका मोठा विस्फोट झाला होता. मी पडता-पडता वाचलो. पूर्ण ऑफिसमध्ये धूर झाला होता. आमच्या बिल्डींगला आग लागली होती.”—जोशुवा.
भूकंप, चक्रीवादळ, दहशतवादी हल्ले, शाळेतला गोळीबार! यांबद्दलच्या बातम्या आपल्याला बऱ्याचदा वाचायला मिळतात. पण अशा एखाद्या आपत्तीबद्दल वाचणं आणि ती स्वतः अनुभवणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मग त्यातून वाचण्याची आपली शक्यता वाढवण्यासाठी, आपण आपत्ती येण्याआधी, त्या वेळी आणि त्यानंतर काय करू शकतो? चला पाहू या.
आपत्ती येण्याआधी—तयारी करा!
आपत्ती कोणावरही येऊ शकते. त्यामुळे त्यातून वाचण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं पाऊल म्हणजे, तयारी करणं. मग तयारी करण्यासाठी आपण काय करू शकतो?
मनाची तयारी करा. आपत्ती येऊ शकते आणि तुम्हाला आणि तुमच्या जवळच्या लोकांना त्याची झळ बसू शकते हे मान्य करा. त्यामुळे आधीच तयारी करा. आपत्ती आल्यानंतर त्याची तयारी करण्यात काहीच अर्थ नाही.
आपत्तींबद्दलची माहिती घ्या. तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी कोणत्या आपत्ती येऊ शकतात ते जाणून घ्या. सुरक्षित ठिकाणं कोणती आहेत त्याची माहिती काढा. आपत्तीसाठी तुमचं घर आणि तुम्ही ज्या ठिकाणी राहता, ते सुरक्षित आहे का याचाही विचार करा. ज्या गोष्टींमुळे आग लागू शकते त्या अशाच इथे-तिथे ठेवू नका. जसं की, मच्छर अगरबत्ती, सिगरेट, मेणबत्ती, रॉकेलसारखं इंधन. तसंच, जेवण बनवताना गॅस चालू ठेवून दुसरीकडे जाऊ नका.
आपत्तीसाठी उपयोगी पडणाऱ्या वस्तू तयार ठेवा. त्या वेळी वीज पुरवठा, पाणी पुरवठा, फोन आणि वाहतुकीच्या सोयी नसू शकतात. जर तुमच्याकडे गाडी असेल तर त्यात पेट्रोल भरून ठेवा. तसंच घरात नेहमी अन्नपाणी असू द्या आणि गो-बॅग तयार ठेवा.—“तुमच्याकडे गरजेच्या गोष्टी आहेत का?” ही चौकट पाहा.
तुमच्याजवळ मित्रांचे नंबर असू द्या; मग ते जवळ राहत असोत किंवा लांब.
आपत्ती आल्यावर बाहेर पडायची योजना बनवा आणि त्याचा सराव करा. तुम्ही जिथे राहता किंवा काम करता, तिथून कोणत्या रस्त्यांनी पटकन बाहेर पडता येईल त्याची माहिती घ्या. तसंच मुलं शाळेत असताना आपत्ती आली तर काय करायचं याविषयी मुलांशी बोला. पूर्ण कुटुंब कुठे भेटेल त्या जागा ठरवा. जसं की शाळा किंवा बाग. दोन जागा ठरवा; एक जी घराच्या जवळ आहे आणि दुसरी जी घरापासून लांब आहे. अधिकारी असा सल्ला देतात की तुम्ही वेळोवेळी आपल्या कुटुंबासोबत अशा ठिकाणी चालत जावं.
दुसऱ्यांना मदत करायचा विचार करा. जसं की, वयस्कर आणि आजारी लोकांना.
आपत्तीच्या वेळी—लवकर पाऊल उचला!
सुरुवातीला उल्लेख केलेला जोशुवा म्हणतो: “जेव्हा आग लागली तेव्हा लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. ते तिथून पटकन निघत नव्हते. त्यांना परिस्थितीचं गांभीर्य नव्हतं. काही लोक त्यांचा कंप्यूटर बंद करत होते, तर काही जण आपली पाण्याची बॉटल भरत होते. एक माणूस म्हणाला, ‘आपण थोडं थांबू या.’” इतर जण जरी ती परिस्थिती हलक्यात घेत असले, तरी जोशुवा मोठ्याने ओरडून म्हणाला: “आपण आत्ताच्या आत्ता इथून बाहेर निघालं पाहिजे!” असं म्हटल्यावर त्याच्यासोबत काम करणाऱ्यांना त्या परिस्थितीची जाणीव झाली आणि ते त्याच्या मागे भरभर पायऱ्या उतरू लागले. उतरताना जोशुवा त्यांना म्हणत होता: “जर कोणी पडलं तर त्याला उचला आणि चालत राहा. आपण यातून नक्कीच वाचू!”
आग लागते तेव्हा. गुडघ्यांवर रांगत-रांगत लवकरात लवकर सगळ्यात जवळच्या रस्त्याने बाहेर पडा. धुरामुळे समोरचं दिसणं कठीण होतं. आणि बहुतेक जणांचा मृत्यू नाकातोंडात धूर गेल्यावर होतो. त्यामुळे स्वतःचं सामानसुमान सोबत घेण्याच्या भानगडीत पडू नका. कारण काही सेकंदात होत्याचं नव्हतं होऊ शकतं आणि तुमचा जीव जाऊ शकतो.
भूकंप येतो तेव्हा. घरात सुरक्षित अशा ठिकाणी आसरा घ्या. कदाचित तुम्ही एखाद्या मजबूत टेबलाखाली किंवा पलंगाखाली जाऊ शकता. भूकंपानंतरही त्याचे झटके जाणवू शकतात. त्यामुळे लवकरात लवकर बिल्डींगमधून बाहेर पडा आणि त्यापासून दूर जा. बचाव पथकातल्या लोकांना यायला उशीर होऊ शकतो, त्यामुळे शक्य असेल तर इतरांनाही मदत करा.
त्सुनामी येते तेव्हा. समुद्राचं पाणी किनाऱ्यापासून अचानक दूर जायला लागलं, तर पटकन उंच ठिकाणच्या जागी पळा. कारण मोठ्या प्रमाणावर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे.
चक्रीवादळ येतं तेव्हा. उशीर न लावता सगळ्यात सुरक्षित ठिकाणी जा.
पूर येतो तेव्हा. पाणी भरलेल्या बिल्डींगमध्ये जाऊ नका. पाण्यात चालू नका किंवा गाडीही चालवू नका. कारण पुराच्या पाण्यात गटाराचं पाणी आणि कचरा असू शकतो. त्यासोबतच त्या पाण्यात विजेच्या तुटलेल्या तारा, उघडी गटारंसुद्धा असू शकतात. या गोष्टी पटकन दिसत नसल्यामुळे त्या धोकेदायक असू शकतात.
तुम्हाला माहीत होतं का? दोन फुटापर्यंतच्या वाहत्या पाण्यात एक कार वाहून जाऊ शकते. अशा प्रकारे पुरात गाडी चालवल्यामुळे बहुतेकांनी आपला जीव गमावलाय.
अधिकाऱ्यांनी निघायला सांगितल्यावर तिथून लगेच निघा! तुमच्या मित्रांना कळवा की तुम्ही कुठे आहात, नाहीतर तुम्हाला शोधण्यात ते त्यांचा जीव धोक्यात घालतील.
तुम्हाला माहीत होतं का? अशा परिस्थितीत फोनवर बोलणं शक्य होणार नाही, पण मेसेज बऱ्याचदा पोहोचतो.
जर अधिकाऱ्यांनी तुम्हाला घरात किंवा सुरक्षित ठिकाणी राहायला सांगितलं, तर त्यांचं ऐका. रासायनिक, जैविक (विषाणुमुळे पसरलेली महामारी) किंवा आण्विक आपत्ती किंवा हल्ला झाला, तर घराबाहेर पडू नका. हवा जिथून आत-बाहेर जाऊ शकते अशा गोष्टी बंद ठेवा. जसं की दरवाजा आणि खिडक्या. जर आण्विक आपत्ती आली तर बिल्डींगच्या सगळ्यात खालच्या भागात किंवा तळघराच्या (बेसमेंटच्या) आतल्या खोलीत जा. यामुळे हानिकारक रेडिएशनपासून तुम्ही सुरक्षित राहाल. टीव्ही, रेडिओवरच्या बातम्या ऐका. जोपर्यंत अधिकारी धोका टळल्याचं सांगत नाहीत, तोपर्यंत बाहेर पडू नका.
आपत्तीनंतर—सुरक्षित राहा!
आजारापासून किंवा धोक्यापासून सुरक्षित राहाण्यासाठी खाली दिलेल्या सल्ल्यांचा विचार करा:
शक्य असेल तर आपत्ती शिबीराऐवजी जवळच्या लोकांसोबत राहा.
जिथे राहत आहात ती जागा स्वच्छ ठेवा.
साफसफाई करताना स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्या. जसं की कचरा काढत असताना हातमोजे, मजबूत बूट, टोपी आणि मास्क घाला. विजेच्या तारांपासून आणि आगीच्या ठिणग्यांपासून सावध राहा.
शक्य होईल तितकं नेहमीसारखं आपली कामं करत राहा. तुमच्या मुलांना कळू द्या की तुम्ही शांत आहात आणि तुम्ही आशा सोडलेली नाही. कुटुंब होऊन उपासनेशी संबंधित कामं करा. मुलांकडून शाळेचा अभ्यास करून घ्या आणि त्यांच्यासोबत खेळा. आपत्तीबद्दलच्या बातम्या जास्त बघू नका. तुमचा राग इतरांवर काढू नका. मदत स्वीकारा आणि इतरांनाही मदत करा.
आपत्तीमुळे नुकसान होतं हे मान्य करा. सरकार आणि मदतकार्य पुरवणाऱ्यांचं लक्ष गमावलेल्या वस्तूंची भरपाई करण्यावर नसतं, तर आपला जीव वाचवण्यावर असतं. जिवंत राहण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला स्वच्छ पाणी, अन्न, कपडे आणि निवारा पाहिजे असतो.—१ तीमथ्य ६:७, ८.
आपत्तीच्या नंतर भावनिक त्रास होतो हे ओळखा आणि त्यासाठी मदत घ्या. हा त्रास सहसा आपत्तीच्या नंतर जाणवतो. याची लक्षणं म्हणजे चिंता वाटणं, उदास राहणं आणि वागण्यात अचानक बदल होणं. तसंच विचार करायला, काम करायला कठीण जाणं आणि झोप खराब होणं. अशा वेळी मित्रांशी बोला.
जोशुवाच्या कामाच्या ठिकाणी लागलेल्या आगीत त्याचा जीव वाचला. पण त्याच्यासोबत काम करणाऱ्या बऱ्याच जणांनी आपला जीव गमावला. यहोवाच्या साक्षीदारांमध्ये असलेल्या प्रौढ पुरुषांकडून म्हणजे वडिलांकडून, तसंच डॉक्टरांकडूनही त्याला मदत मिळाली. तो म्हणतो: “त्यांनी मला याची खातरी दिली की माझं वाईट वाटणं साहजिक आहे आणि जसजसा वेळ जाईल तसतसा मी बरा होईन. सहा महिन्यांनंतर मला वाईट स्वप्नं पडायची कमी झाली. पण इतर लक्षणं बरी व्हायला जास्त वेळ लागला.”
आपत्तीमुळे खूप वाईट वाटतं, कारण त्यात निर्दोष लोकांचा बळी जातो. काही लोकांना असं वाटतं की आपल्यावर अन्याय झालाय. त्यामुळे ते नकळत देवाला दोष देतात, तर जोशुवासारखे बरेच लोक स्वतःला दोष देतात. जोशुवा म्हणतो: “मला अजूनही वाटतं की मी आणखी जास्त लोकांना वाचवू शकलो असतो. कपण मला या गोष्टीमुळे बरं वाटतं की देव लवकरच या पृथ्वीवरून अन्याय काढून टाकेल आणि सगळं काही ठीक करेल. तोपर्यंत मी माझ्या जीवनातला प्रत्येक दिवस अनमोल समजतो आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी नेहमी प्रयत्न करतो.”—प्रकटीकरण २१:४, ५.a
a भविष्यासाठीच्या देवाच्या अभिवचनांबद्दल आणि देवाने दुःख का राहू दिलंय याबद्दलच्या माहितीसाठी कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या हे पुस्तक पाहा. ते www.jw.org/mr वर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.