आमच्या वाचकांचे मनोगत
धार्मिक स्वातंत्र्य गेल्या कित्येक वर्षांपासून मी नियमितपणे तुमच्या सावध राहा! नियतकालिकाचे वाचन करत आहे; “तुमचे धार्मिक स्वातंत्र्य—धोक्यात आहे का?” (फेब्रुवारी ८, १९९९) ही लेखमाला प्रकाशित केल्याबद्दल तुमचे आभार मानण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे. एकेकाळी मध्य युगात धर्माच्या बाबतीत भयंकर असहिष्णुता होती आणि लोकांना स्वतंत्रपणे आपापला धर्म पाळण्यापासून वंचित करण्याकरता अधिकाऱ्यांची मती भ्रष्ट करण्यात कॅथलिक चर्च यशस्वी झाले होते, हे सर्व मला ठाऊक होतं म्हणा; पण फ्रान्समध्ये आजही जे काही चाललंय हे समजल्यावर प्रश्न पडतो, ‘लोकांचे धार्मिक स्वातंत्र्य हिरावून का हा देश स्वतःलाच बदनाम करू पाहत आहे?’ याचा अंतिम परिणाम काय होईल याची कृपया तुमच्या कोट्यवधी वाचकांना कल्पना द्या. माझी आशा आहे, की एक ना एक दिवस फ्रान्स जरूर एक सहिष्णू देश होईल आणि इतर देशांना त्याचा हा आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा लागेल.
सी. सी., प्वेर्त रिको
सात मुलांचं संगोपन फेब्रुवारी ८, १९९९ च्या अंकात बर्ट आणि मार्गेट डिकमन यांचा अनुभव दिल्याबद्दल आभारी. या अनुभवातून आम्हाला आमच्या तीन्ही मुलांना उत्तम आध्यात्मिक वारसा मिळेल या उद्देशाने त्यांचं संगोपन करण्याची प्रेरणा मिळाली. आमच्या मुलांनाही हा अनुभव फार आवडला. शिक्षा म्हणून ज्याला त्याच्या वाट्याचा केक दिला नव्हता त्या डग नावाच्या मुलाचं उदाहरण त्यात दिलं होतं. आणि आमची मुलं नेहमी एकमेकांना या उदाहरणाची आठवण करून देत असल्याचं आम्ही ऐकलं आहे! हा उत्तेजनात्मक लेख प्रकाशित केल्याबद्दल आभारी.
एस. जे., भारत
पवित्र आत्मा “बायबलचा दृष्टिकोन: देवाचा पवित्र आत्मा काय आहे?” (फेब्रुवारी ८, १९९९) या लेखासाठी मी तुमचे आभार मानू इच्छितो. गेल्या काही वर्षांपासून मी स्वतः एक यहोवाचा साक्षीदार असलो तरीही यहोवा देवाविषयी आपण अधिकाधिक जाणून घ्यावंसं वाटतं. या लेखानं, विचारलेल्या प्रश्नाचं अगदी उत्तमपणे आणि कुणालाही समजेल अशा प्रकारे उत्तर दिलं. मी जितकं अधिक यहोवाविषयी, त्याच्या कार्यांविषयी जाणतो तितकी अधिक मला त्याच्याविषयी आत्मियता वाटते.
वाय. बी., रशिया
सोने “सोने—त्याभोवती असलेले गूढतेचे वलय” (ऑक्टोबर ८, १९९९) हा तुमचा लेख मी वाचला. सदर लेखात तुम्ही असं म्हटलं आहे, की सन १९४५ मधील जर्मन शासनाच्या शरणागतीनंतर मित्र राष्ट्रांच्या सैन्यदलाने जर्मनीतील काइजरोडाची मिठागरे हस्तगत केली. पण, वस्तुस्थिती अशी आहे, की युद्ध संपण्याच्या तीन आठवड्यांपूर्वी मित्र राष्ट्रांनी ही मिठागरे हस्तगत केली होती.
जे. एस., जर्मनी
या गोष्टीचा खुलासा केल्याबद्दल आभारी आहे. तुम्ही म्हटलात ते बरोबर आहे, मे ८, १९४५ रोजी जर्मनीनं शरणागती पत्करली त्याच्या एक महिन्याआधी म्हणजे एप्रिल ४, १९४५ रोजी काइजरोडाची मिठागरे हस्तगत करण्यात आली.—संपादक.
दुरुन प्रणयाराधन करणे “तरुण लोक विचारतात . . . दूर राहूनही प्रणयाराधन करणं कसं शक्य आहे?” (फेब्रुवारी ८, १९९९) हा लेख आधीच मला मिळाला असता तर किती बरं झालं असतं! मी संयुक्त संस्थानांत राहते आणि लॅटिन अमेरिकेत राहाणाऱ्या एक युवकाशी मी पत्रव्यवहार सुरू केला होता. आयुष्यात काहीही मला इतकं कठीण वाटलं नव्हतं. एकमेकांशी कितीही प्रामाणिक असण्याचा प्रयत्न केलात तरी पत्रव्यवहारातून एखाद्याला खऱ्या अर्थाने जाणणे शक्य नाही. दोघं एकमेकांपासून दूर असल्यामुळे वास्तवापासून अतिशय वेगळ्या अशा कल्पनाविश्वात तुम्ही रमू लागता. आमच्या बाबतीत असं झालं, की आम्ही दोघं वेगळ्या संस्कृतीचे होतो. शेवटी, आमचा नातेसंबंध संपुष्टात आला तेव्हा मला जीवनात रस उरला नाही. पण, माझ्या कुटुंबियांच्या प्रेमामुळे, त्यांनी दिलेल्या आधारामुळे या कटू अनुभवातून मी कशीबशी सावरले.
एस. एच., संयुक्त संस्थाने
यहोवाच्या साक्षीदारांच्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात माझी एका मुलीशी भेट झाली आणि आम्ही एकमेकांना पत्रं लिहू लागलो. खरंच, संस्कृती आणि भाषा यात जमीनअस्मानाचा फरक असतो तेव्हा एखाद्याला आपले विचार समजावून सांगणं फार कठीण जातं. म्हणून मग मी आता त्या मुलीची भाषा शिकू लागलो. टेपरेकॉर्डरचा उपयोग करण्याबाबत तुम्ही दिलेला सल्ला फार उत्तम होता. त्याबद्दल आभारी आहे.
ए. एस., जर्मनी
संयुक्त संस्थानांत भरलेल्या एका आंतरराष्ट्रीय अधिवेशनात पूर्वेकडच्या देशांत राहणाऱ्या एका ख्रिस्ती बहिणीशी माझी ओळख झाली. पण, तिच्याशी पत्रव्यवहार कसा सुरू करावा याबद्दल एक ना अनेक शंका मनात घोळत होत्या. त्यामुळे याविषयी मी प्रार्थना केली आणि काही दिवसानंतरच हा अतिशय सुरेख लेख हाती पडला. कितीतरी वेळा मी हा लेख वाचून काढला आहे. माझ्या सर्व शंकांचं निरसन झालं.
जी. आर., इटली