वयोवृद्धांची संख्या जगामध्ये वाढत आहे
सन १५१३ मध्ये, हुआन पॉन्स दे लेऑन हा स्पॅनिश शोधक उत्तर अमेरिकेच्या एका अज्ञात किनाऱ्यालगत बोटीतून प्रवास करत होता. एका वृत्तानुसार, ते ठिकाण फुलांनी भरलेले असल्यामुळे त्याने त्याला फ्लोरिडा असे नाव दिले; स्पॅनिश भाषेत त्याचा अर्थ “फुलांनी भरलेला” असा होतो. साजेसे नाव सहजासहजी सापडले. परंतु, तो जिच्या शोधात निघाला होता ती गोष्ट—वृद्धांना तरुण बनवणारा पाण्याचा झरा—त्याला काही सापडलाच नाही. कित्येक महिने तो सबंध परिसर पालथा घातल्यानंतर तारुण्य देणाऱ्या काल्पनिक झऱ्याचा शोध थांबवून तो शोधक तेथून निघून गेला.
पॉन्स दे लेऑनच्या काळापासून आजपर्यंत तारुण्याचा झरा कोणालाही सापडलेला नाही; तथापि, बेटी फ्रीडन या लेखिकेने ज्याला “वार्धक्याचा झरा” म्हटले तो मात्र मनुष्याला सापडलेला दिसतो. जगभरात वयोवृद्ध लोकांच्या संख्येत विलक्षण वाढ झाल्यामुळे तिने असे म्हटले. आज इतके लोक वृद्ध होऊ लागले आहेत की जगातल्या लोकसंख्येचा चेहराच बदलत आहे. जणू जगच म्हातारे होत चालले आहे.
“मानव समाजाचा सर्वात मोठा पराक्रम”
याविषयी जनसांख्यिक सविस्तर माहिती देतात. या शतकाच्या सुरवातीला, अगदी श्रीमंत असलेल्या देशांमध्येही अपेक्षित आयुर्मर्यादा ५० वर्षांपेक्षा कमी होती. पण, आज ती अचानक ७५ हून अधिक झाली आहे. तसेच, आज चीन, हाँडुरास, इंडोनेशिया आणि व्हिएतनामसारख्या विकसनशील राष्ट्रांमध्येही, अपेक्षित आयुर्मर्यादा अवघ्या चार दशकांत २५ वर्षांनी वाढली आहे. दर महिन्याला सबंध जगभरात दहा लाख लोक साठी गाठताहेत. आणि आश्चर्य म्हणजे, आज जगाच्या एकंदर लोकसंख्येपैकी सर्वात झपाट्याने वाढणारी संख्या ही तरुणांची नसून ८० आणि त्याहून अधिक वर्षांच्या “सर्वात वृद्ध” लोकांची आहे.
सायन्स पत्रिकेत, जनसांख्यिक आयलीन क्रिमन्स असे म्हणतात की, “अपेक्षित आयुर्मर्यादेतील वाढ हा मानव समाजाचा सर्वात मोठा विजय ठरला आहे.” संयुक्त राष्ट्रेही याला सहमत आहे आणि या साध्यतेकडे लक्ष वेधण्यासाठी १९९९ हे साल वयोवृद्धांचे आंतरराष्ट्रीय वर्ष घोषित करण्यात आले आहे.—पृष्ठ-३ वरील पेटी पाहा.
दृष्टिकोनात बदल होणे आवश्यक
परंतु, मानवाच्या अपेक्षित आयुर्मर्यादेत वाढ होण्यापुरताच हा विजय नाही. तर, म्हातारपणासंबंधी मानवाच्या दृष्टिकोनातही बदल झाला आहे. हे खरे की, आजही म्हातारपणाच्या विचाराने अनेकजण चिंताग्रस्त होतात, एवढेच नव्हे तर त्याची त्यांना धास्तीसुद्धा वाटते कारण म्हातारपण म्हटले की सहसा दुर्बल शरीर आणि कमजोर बुद्धी असेच वाटते. तथापि, म्हातारपण आणि आजारपण यांचा संबंध जोडला जाऊ नये असे म्हातारपणाचा अभ्यास करणारे संशोधक ठासून सांगतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये म्हातारे होण्याची क्रिया वेगळी असते. संशोधकांचे म्हणणे आहे की, काळानुसारचे वय आणि जैविक वय यात फरक आहे. (“वयोवृद्ध होणे म्हणजे काय?” ही पेटी पाहा.) दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, वयोवृद्ध असणे आणि प्रकृती खालावणे या दोन गोष्टी सोबतच घडतात असे नाही.
उलट, म्हातारपणाला सुरवात झाल्यावर, निरोगी राहण्यासाठी तुम्ही काही पावले उचलू शकता. अर्थात, या उपायांनी गेलेले तारुण्य पुन्हा एकदा येणार नाही पण निदान वाढत्या वयात प्रकृती चांगली राहू शकेल. पुढच्या लेखात यांतील काही उपायांची चर्चा केली आहे. सध्या तुम्हाला म्हातारपणाचा विषय महत्त्वाचा वाटत नसला तरीपण तो लेख तुम्हाला वाचावासा वाटेल कारण आज ना उद्या तो विषय महत्त्वाचा वाटू लागेल.
[३ पानांवरील चौकट/चित्रं]
वयोवृद्धांचे आंतरराष्ट्रीय वर्ष
“मी स्वतः ६० वर्षांचा झाल्यामुळे . . . , आधी दिलेल्या आकडेवारीत आता मीही गणला जातो,” असे युएन सेक्रेटरी-जनरल कोफी आनन यांनी अलीकडेच वयोवृद्धांच्या आंतरराष्ट्रीय वर्षाची घोषणा करताना म्हटले. मि. अनान यांच्या जोडीला आणखी पुष्कळ लोक आहेत. संशोधकांचे म्हणणे आहे की, या शतकाच्या समाप्तीपर्यंत अनेक देशांमध्ये ५ लोकांपैकी १ व्यक्ती ६० वर्षांची किंवा त्याहून वृद्ध झालेली असेल. कदाचित काहीजणांची देखभाल करावी लागेल पण त्या सर्वांना आपले स्वातंत्र्य, आपला आत्मसन्मान आणि आपली उत्पादन क्षमता मात्र पुन्हा मिळवण्याची गरज असेल. जनसंख्येत हा आमूलाग्र बदल झाल्यामुळे निर्माण झालेल्या अडचणींवर मात करण्यात धोरणकर्त्यांना मदत करण्यासाठी आणि “समाजात वयोवृद्धांच्या मूल्याची” चांगली जाणीव निर्माण करण्यासाठी १९९२ साली युएन जनरल असेम्बलीने १९९९ हे साल वयोवृद्धांचे आंतरराष्ट्रीय वर्ष योजण्याचे ठरवले होते. “सर्व वयोगटांतील लोकांचा सर्वसमावेशक समाज” हे या खास वर्षाचे घोषवाक्य आहे.
[चित्र]
कोफी आनन
[चित्राचे श्रेय]
UN photo
UN/DPI photo by Milton Grant
[४ पानांवरील चौकट/चित्र]
वयोवृद्ध होणे म्हणजे काय?
“जैविकरित्या म्हातारपणाचे वर्णन करण्याचा मार्ग फार अस्पष्ट आहे,” असे एका संशोधकाला वाटते. “कोणालाही याचे पूर्णतः आकलन झालेले नाही,” असे दुसऱ्याचे मत आहे. तरीपण, गेरोंटोलॉजिस्ट (म्हातारपणाचा अभ्यास करणारे वैज्ञानिक) यांनी त्याची व्याख्या देण्याचा प्रयत्न केला आहे. सोप्या शब्दांत सांगायचे तर त्यांचे असे म्हणणे आहे की, वय म्हणजे एखाद्याच्या अस्तित्वाचा एकूण कालावधी. पण, वय होणे हाच तेवढा म्हातारपणाचा अर्थ नाही. सहसा, वय होत असलेले मूल असे कधीच म्हटले जात नाही कारण वय होणे या संज्ञेमध्ये शक्ती क्षीण होण्याचा अर्थ आहे. त्यासाठी म्हातारपण म्हणजे, वय झाल्यामुळे एखाद्या व्यक्तीवर होणारा विपरीत परिणाम आहे. काही लोक आपल्या वयापेक्षा तरुण दिसतात. उदाहरणार्थ, कोणा व्यक्तीला “तुम्ही इतक्या वयाचे वाटत नाहीत” असे म्हटले जाते त्यावरून हे स्पष्ट होते. काळामुळे आलेले म्हातारपण आणि जैविकरित्या आलेले म्हातारपण यांच्यातला फरक दाखवण्यासाठी संशोधक सहसा जैविकरित्या आलेल्या म्हातारपणाचे (ज्यात शारीरिक प्रकृतीही ढासळते) वर्णन जीर्णता असे करतात.
प्राणीशास्त्राचे प्राध्यापक, स्टीव्हन एन. ऑस्टड जीर्णतेचे वर्णन, “काळासोबत शरीराची जवळजवळ प्रत्येक कार्यहालचाल मंदावणे” असे करतात. त्याचप्रमाणे म्हातारपण राष्ट्रीय संस्थेचे डॉ. रिचर्ड एल. स्प्रॉट यांचे असे म्हणणे आहे की, म्हातारपणात, “आपल्याला तणावांचा नीट सामना करायला मदत करणारी शरीराची व्यवस्था हळूहळू क्षीण होते.” तरीपण, म्हातारपणाची स्पष्ट व्याख्या देणे कठीणच आहे असे बहुतेक तज्ज्ञांना वाटते. त्याचे कारण, रेणवीय जीवविज्ञान तज्ज्ञ डॉ. जॉन मेडीना देतात: “६० लाख कोटी पेशी असलेला मनुष्य म्हातारा होऊ लागतो तेव्हा त्याच्या डोक्यापासून पायाच्या नखांपर्यंत, प्रथिनांपासून डीएनएपर्यंत, जन्मापासून मृत्यूपर्यंत असंख्य क्रिया घडतात.” त्यामुळे, म्हातारपण “सर्वात क्लिष्ट जैविक समस्या आहे” असे अनेक संशोधकांचे मत पडते यात काही आश्चर्य नाही!