वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 ६/८ पृ. १८-२०
  • तुमचे जीवनमान सुधारण्याचे पाच मार्ग

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमचे जीवनमान सुधारण्याचे पाच मार्ग
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • क्रमांक १: बाग लावा
  • क्रमांक २: मोठ्या प्रमाणात विकत घ्या
  • क्रमांक ३: अन्‍नपदार्थ टिकवण्याची कला शिकून घ्या
  • क्रमांक ४: लहान प्रमाणात पशुपालन करून पाहा
  • क्रमांक ५: योग्य स्वच्छता राखा
  • स्वच्छता राखणे का इतके महत्त्वाचे आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • तुम्ही घर कसे सांभाळू शकता?
    कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य
  • सुदृढ राहण्यासाठी. . .
    सावध राहा!—२०१५
  • तुमची प्रकृती सांभाळण्याचे सहा मार्ग
    सावध राहा!—१९९७
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९८
g98 ६/८ पृ. १८-२०

तुमचे जीवनमान सुधारण्याचे पाच मार्ग

मध्य आफ्रिकी प्रजासत्ताकमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

महागाई, रोगराई, कुपोषण, दारिद्र्‌य—या समस्या विकसनशील देशांमध्ये सर्वव्याप्त आहेत. आणि निदान मानवी दृष्टिकोनातून तरी यांवर कोणताही तात्काळ उपाय असल्याचे दिसत नाही. तुम्ही एखाद्या विकसनशील देशात राहत असल्यास तुमचे जीवनमान सुधारण्यासाठी तुम्ही काही करू शकता का? होय, करू शकता! पुढील पाच सल्ले तुम्हाला मदतगार व व्यावहारिक असल्याचे आढळतील.

क्रमांक १: बाग लावा

नीतिसूत्रे २८:१९ मध्ये बायबल म्हणते: “जो आपली शेती स्वतः करितो त्याला भरपूर अन्‍न मिळते.” खरोखरच, जमिनीच्या एका लहानशा प्लॉटवर किती काही उगवले जाऊ शकते हे जाणून तुम्ही कदाचित अवाक व्हाल. ल झार्डन पॉटाझे स्यू ले ट्रॉपीक (उष्णकटिबंधातील भाजीपाल्याची बाग) या आपल्या पुस्तकात लेखक हीन्क वायनबर्च प्रतिपादित करतात, की ५० ते १०० चौरस मीटर प्लॉटवर सहा सदस्यांच्या कुटुंबास पुरतील इतक्या भाज्या उत्पन्‍न करता येऊ शकतात!

तुम्ही घरच्या घरी जे उगवू शकता त्यांची खरेदी करण्यासाठी पैसा का बरे खर्च करावा? माती आणि हवामानानुसार भेंडी, मिरची, पालक, कोथिंबीर, गवती चहा, कांद्याची पात, भोपळा, रताळी, ऊस, टोमॅटो, काकडी आणि मका या सर्व भाज्या अगदी तुमच्या घरापाशी लावल्या जाऊ शकतात. कमीतकमी, अशा प्रकारची बाग तुमच्या कुटुंबाच्या आहारास पूरक तरी ठरेल; शिवाय, उत्पादन अधिक असल्यास तुम्ही ते विकूही शकता.

पुरेशी जागा असल्यास विविध फळझाडे लावण्याचा देखील तुम्ही विचार करू शकता. कधी कधी तर केवळ एक फळझाड तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला पुरून उरेल इतके उत्पन्‍न देऊ शकते. मृत जैविक पदार्थांचा खत म्हणून दुसऱ्‍यांदा वापर करण्यासाठी त्यांवर प्रक्रिया करणे अर्थात मिश्र खत तयार करण्याविषयी शिकून घेतल्याने अन्‍नपदार्थांचे उत्पन्‍न सुधारण्यास तुम्हाला मदत मिळेल. तुमच्या कुटुंबासाठी अन्‍न उत्पन्‍न करणे व दोन पैसे कमवणे याव्यतिरिक्‍त झाडांचे आणखीनही काही फायदे असू शकतात. योग्य ठिकाणी लावलेली झाडे सावली, स्वच्छ हवा देऊ शकतात; शिवाय तुमचा परिसरही अधिक रम्य व मनोहर बनवू शकतात.

तथापि, बागकामाविषयी तुम्हाला फारशी माहिती नसल्यास काय? तुमच्या मित्रांना, शेजाऱ्‍यांना किंवा परिचितांना याविषयी अधिक अनुभव आहे का? असल्यास, त्यांच्याकडून मदत किंवा सल्ला घेण्यात काय हरकत आहे? तसेच, बागकामाची माहिती देणारी पुस्तके तुम्ही विकत घेऊ शकता किंवा कोणाकडून तरी ती मागवून घेऊ शकता.—सावध राहा! नियतकालिकाच्या मे २२, १९७४ (इंग्रजी) अंकातील “फळभाज्यांची बाग का लावू नये बरे?” हा लेख पाहा.

क्रमांक २: मोठ्या प्रमाणात विकत घ्या

पीठ, तांदूळ आणि तेल ही मूलभूत अन्‍नधान्ये तुम्ही किरकोळ प्रमाणात विकत घेता का? असे असल्यास, तुम्ही तुमचे बरेचसे पैसे वाया घालवत आहात. त्या ऐवजी शक्यतो दोन, तीन किंवा अधिक कुटुंबे मिळून अशी अन्‍नधान्ये मोठ्या प्रमाणात विकत घेण्याचा प्रयत्न करा. विशिष्ट प्रकारची हंगामी फळे किंवा हंगामी भाज्या मोठ्या प्रमाणात विकत घेतल्याने तुमच्या पैशांची बचत होऊ शकते. कधी कधी तर होलसेलमध्येही तुम्ही काही वस्तू खरेदी करू शकता.

क्रमांक ३: अन्‍नपदार्थ टिकवण्याची कला शिकून घ्या

मोठ्या प्रमाणांत विकत घेणे म्हणजे लवकर नासणारे अन्‍नपदार्थ टिकवण्याचा प्रश्‍न येतोच की. अन्‍नपदार्थ वाळवणे ही एक प्रचलित व व्यावहारिक पद्धत आहे. आफ्रिकेतील बहुसंख्य स्त्रिया फळे, भेंडी, शेंगा, घोसाळे, भोपळ्याच्या बिया आणि वनस्पती वाळवून आपला उदरनिर्वाह चालवत असतात. वाळवण्यासाठी कोणतेही खास उपकरण लागत नाही. हे अन्‍नपदार्थ एखाद्या स्वच्छ जागी पसरले जाऊ शकतात किंवा लटकवले जाऊ शकतात; आणि माश्‍यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी कदाचित एखाद्या पातळ कापडाने ते झाकले जाऊ शकतात. मग बाकीचे काम ऊन आणि वारा करतील.—सावध राहा! नियतकालिकाच्या ऑगस्ट ८, १९७५ (इंग्रजी) अंकातील, “कमीत कमी पैशात तुम्ही खर्चाची तोंडमिळवणी करू शकता का?” हा लेख पाहा.

क्रमांक ४: लहान प्रमाणात पशुपालन करून पाहा

आपल्या स्वतःच्या कोंबड्या, बकऱ्‍या, कबुतरे किंवा इतर प्राणी पाळणे तुम्हाला शक्य आहे का? अनेक ठिकाणी मांस हा चैनीचा पदार्थ बनला आहे. परंतु, इतरांकडून थोडीशी मदत घेतल्याने काही प्राणी पाळण्याचे तुम्ही शिकू शकता. तुम्हाला जेवणात मासे आवडतात का? असल्यास, एखादा लहान फिश पाँड तयार करण्याचेही तुम्ही शिकू शकता. मांस, अंडी आणि मासे यांमध्ये तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याकरता अत्यावश्‍यक असलेले लोह, कॅलशियम, जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने असतात.

क्रमांक ५: योग्य स्वच्छता राखा

तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी स्वच्छता देखील महत्त्वाची आहे. अस्वच्छ अवस्था, सर्व प्रकारच्या रोगराईंचे कारण असलेली उंदरे, माश्‍या आणि झुरळे यांस आकर्षित करते. हे खरे, की स्वच्छता राखण्यासाठी तुम्हाला वेळेची आणि पैशांची किंमत मोजावी लागेल. पण, औषधोपचारासाठी आणि डॉक्टरांच्या बिलांसाठी मोजाव्या लागणाऱ्‍या किंमतीपेक्षा स्वच्छता राखण्याची किंमत तशी फारच कमी असते. माणसामाणसात आणि देशादेशांत स्वच्छतेचा दर्जा भिन्‍न असला तरीही काही सर्वसामान्य तत्त्वे सर्वत्र लागू होणारी असतात.

स्वच्छतागृहांचेच उदाहरण घ्या. खेड्यापाड्यांत ही बहुधा घाणेरडी आणि पडीत अवस्थेतच असतात आणि हेच रोगराईंचे सर्वात मुख्य कारण होय. स्थानिक आरोग्य कर्मचारी कमीत कमी खर्चात एक स्वच्छ शौचालय किंवा प्रसाधनगृह बांधण्याच्या सूचना कदाचित तुम्हाला देऊ शकतील.

तुमच्या घराबाबत काय? ते नीटनेटके व सुव्यवस्थित आहे का? तुमच्या घरात कुबट वास तर येत नाही का? आणि मग तुमच्या स्वयंपाकघराबद्दल काय? ते देखील नीटनेटके आणि स्वच्छ आहे का? चांगले आरोग्य टिकवण्यासाठी अन्‍नपदार्थ स्वच्छ असावेत तसेच ते योग्य प्रकारे शिजवलेही जावेत. दूषित पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात जंतू आणि परोपजीवी आढळतात. यास्तव, पाणी वापरण्याआधी ते गाळून किंवा उकळून घ्या. जेवण्याकरता वापरली जाणारी भांडी गरम पाण्यात विसळून घ्या आणि अन्‍नपदार्थ हाताळण्याआधी हात स्वच्छ धुवा. स्वच्छ, घट्ट झाकण असलेल्या भांड्यांतच पाणी भरा.

तुम्हाला खरोखरच स्वच्छता राखायची असल्यास कुत्री, मांजरी, कोंबड्या आणि बकऱ्‍या यांना स्वयंपाकघरात फिरू देऊ नका. तसेच घुशींना व उंदरांना भांड्यांवरून फिरू देऊ नका; त्यामुळे अन्‍नपदार्थ दूषित होतात. उंदरांचा केवळ एक साधारण पिंजरा या समस्या सोडवू शकेल.—सावध राहा! नियतकालिकांच्या सप्टेंबर २२, १९८८ (इंग्रजी) अंकातील, “स्वच्छता राखण्याची आव्हाने पेलणे” हा लेख पाहा.

सरतेशेवटी, केवळ देवाचे राज्यच मानवजातीच्या सर्व समस्या सोडवू शकेल. (मत्तय ६:९, १०) तथापि, दरम्यानच्या काळात, सुचवलेले हे साधेसोपे सल्ले तुमचे जीवनमान सुधारण्यास तुमची मदत करू शकतील.

[१८ पानांवरील चित्र]

बाग लावा

[१९ पानांवरील चित्र]

मोठ्या प्रमाणात विकत घ्या

[१९ पानांवरील चित्र]

अन्‍नपदार्थ टिकवण्याची कला शिकून घ्या

[२० पानांवरील चित्र]

लहान प्रमाणात पशुपालन करून पाहा

[२० पानांवरील चित्र]

योग्य स्वच्छता राखा

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा