कंबोडियातील जीवन-मृत्यूचा माझा दीर्घ प्रवास
वॅथना मीअस यांनी कथित केल्याप्रमाणे
तो १९७४ चा काळ होता. कंबोडियामध्ये मी कमर रूझविरुद्ध लढत होतो. मी कंबोडियन सेनेतील एक अधिकारी होतो. एका युद्धात आम्ही एका कमर रूझ सैनिकाला ताब्यात घेतलं. भविष्यासंबंधी पोल पॉ यानं आखलेल्या योजनांविषयी त्यानं मला जे काही सांगितलं त्यामुळे माझं जीवन पार बदलून गेलं आणि शाब्दिक व आध्यात्मिक या दोन्ही अर्थांनी मी एका दीर्घ प्रवासाला निघालो.a
पण, प्रथम मला माझ्या या सफरीच्या सुरवातीच्या काळाविषयी सांगण्याची अनुमती द्या. कंबोडियातील नॉम पेन्ह या ठिकाणी १९४५ साली माझा जन्म झाला होता; कमर भाषेत कंबोडियाला कम्पूचिया म्हटले जाते. कालांतरानं, गुप्त पोलिस संघात माझ्या आईला एक महत्त्वपूर्ण हुद्दा प्राप्त झाला. देशाचा राज्यकर्ता, राजपुत्र नॉर्डम सीहानूक याची ती एक खास एजंट होती. तिच्या एकटीवर माझी जबाबदारी पडल्यामुळे, शिवाय तिचे वेळापत्रकही अतिशय व्यग्र असल्यामुळे शिक्षणासाठी मला एका बौद्ध मंदिरांत दाखल करणं तिला भाग होतं.
माझी बौद्ध पार्श्वभूमी
एका प्रमुख बौद्ध भिक्षूपाशी मी राहायला गेलो तेव्हा मी अवघ्या आठ वर्षांचा होतो. तेव्हापासून ते १९६९ पर्यंत, घर आणि मंदिर यांतच मी माझा वेळ घालवत असे. मी ज्या भिक्षूची सेवा करत होतो म्हणजे चून नाट हा त्यावेळी कंबोडियातला सर्वात उच्च बौद्ध अधिकारी होता. काही काळ, मी त्याचा सचिव म्हणून काम केलं आणि मग “तीन टोपल्या” (तायपिटाका, किंवा संस्कृत त्रिपिटक) या बौद्ध पवित्र ग्रंथाचं एका प्राचीन भारतीय भाषेतून कंबोडियन भाषेत भाषांतर करण्यात मी त्याला हातभार लावला.
सन १९६४ मध्ये एक भिक्षू म्हणून माझी अधिकृत नेमणूक झाली आणि १९६९ सालापर्यंत याच पदावर मी काम केलं. या कालावधीत, अनेकानेक प्रश्नांचं काहूर माझ्या मनात माजलं होतं; जसे की, जगात इतके दुःख का आहे आणि ते सुरू झालेच कसे? लोक वेगवेगळ्या मार्गांनी आपल्या दैवतांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असल्याचं मी खुद्द पाहिलं होतं, परंतु त्यांची दैवते त्यांच्या समस्या कशारितीने सोडवणार होती हे मात्र त्यांना ठाऊक नव्हतं. मला तसेच इतर भिक्षूंना देखील बौद्ध शास्त्रांमध्ये याचं समाधानकारक उत्तर सापडत नव्हतं. मी इतका निराश झालो, की मंदिरच सोडून देण्याचा मी निर्णय घेतला आणि भिक्षू या पदाचा देखील मी त्याग करून टाकला.
शेवटी १९७१ साली मी कंबोडियन सेनेत भरती झालो. सन १९७१ च्या आसपास मला व्हिएतनाममध्ये पाठवण्यात आलं आणि माझ्या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे मला सेकंड लेफ्टनंटच्या हुद्द्याची बढती तर मिळालीच शिवाय, खास सैन्यांवरही मला नेमण्यात आलं. आम्ही साम्यवादी कमर रूझ आणि वियटकाँग सैन्यांविरुद्ध लढत होतो.
युद्ध आणि कंबोडियातील बदल
मी एक पाषाणहृदयी सैनिक बनलो. जवळजवळ दररोजच जवळून मृत्यू पाहण्याची एव्हाना मला सवय झाली होती. मी स्वतः १५७ युद्धे लढलो होतो. एकदा तर घनदाट जंगलात, एका महिन्याहून अधिक काळ कमर रूझनं आम्हाला वेढा घातला होता. सातशेहून अधिक पुरुष गतप्राण झाले. बचावलेल्या १५ जणांपैकी मी एक होतो; मी जखमी झालो होतो, पण तरी कसाबसा माझा निभाव लागला.
दुसऱ्या एका प्रसंगी, म्हणजे १९७४ साली आम्ही एका कमर रूझ सैनिकाला ताब्यात घेतलं. त्याची उलटतपासणी करत असताना त्यानं मला सांगितलं की, पोल पॉ यानं सगळ्या माजी सरकारी अधिकाऱ्यांचा तसंच लष्करी अधिकाऱ्यांचा समूळ उच्छेद करण्याच्या योजना आखल्या आहेत. त्यानं मला सगळं काही सोडून पळ काढण्यास सांगितलं. तो म्हणाला: “सतत आपलं नाव बदलत राहा. तू कोण आहेस याचा कोणालाही पत्ता लागू देऊ नकोस. अशिक्षित-अडाणी असल्याचं सोंग कर. तुझ्या मागील आयुष्याबद्दल कुणालाही काहीएक सांगू नकोस.” घरी जाण्यासाठी मी त्याला सोडून दिल्यानंतर त्यानं मला दिलेली धोक्याची सूचना मात्र माझ्या मनांत घोळत राहिली.
आम्हा सैनिकांना असं सांगण्यात आलं होतं, की आम्ही आमच्या मातृभूमीसाठी लढत होतो पण आम्ही तर कंबोडियन लोकांचीच कत्तल करत सुटलो होतो. सत्तालोलुप कमर रूझ अर्थात एक साम्यवादी पक्ष तर आमच्याच लोकांचा बनला होता. कंबोडियाच्या ९० लाख रहिवाश्यांपैकी अधिकतर लोक कमर रूझमधील नसले तरीही प्रत्यक्षात ते कमर जातीचे आहेत. मला ते सारंच अर्थहीन वाटायचं. शस्त्र न बाळगणाऱ्या आणि युद्धात काहीएक रस नसणाऱ्या बिचाऱ्या शेतकऱ्यांचे जीव आम्ही घेत होतो.
युद्धातून परतण्याचा अनुभव नेहमीच हृदयविदारक असायचा. आपला पती किंवा आपले वडील परतले की नाही हे पाहण्यासाठी बायकामुलं मोठ्या आतुरतेनं वाट पाहत थांबायचे. त्यांचा माणूस युद्धात मारला गेला आहे असं अनेकांना सांगणं मला भाग होतं. पण, या सगळ्या परिस्थितीत बौद्ध धर्माची मला जी समज होती तिच्यातून मला काडीइतकंही सांत्वन मिळालं नाही.
आज मागे वळून पाहताना, कंबोडियात सगळं काही कसं कसं बदलत गेलं याचा मी विचार करतो. सन १९७० च्या आधी थोडीफार तरी शांती-सुरक्षा होती. केवळ मूठभर लोकांकडेच बंदुका होत्या; खरं तर, परवान्याशिवाय बंदुका बाळगणं बेकायदेशीर होतं. दरोडा किंवा चोरी ही प्रकरणं अगदीच तुरळक होती. पण मग, पोल पॉ आणि त्याच्या सैन्यांनी बंड पुकारले तेव्हा यादवी युद्धाची जी ठिणगी पडली, की त्यानंतर संपूर्ण चित्रच पालटलं. सगळीकडे बंदुकाच बंदुका झाल्या. चक्क बारा-तेरा वर्षांच्या बालकांनाही लष्करी सेवेचं म्हणजे गोळ्या कशा झाडायच्या आणि शत्रूचा जीव कसा घ्यायचा यांचं प्रशिक्षण दिलं जात होतं. पोल पॉच्या लोकांनी काही बालकांना, आपल्याच जन्मदात्या पालकांची हत्या करण्याइतकं फितवलं. सैनिक मुलांना सांगायचे, “तुम्हाला जर तुमच्या मातृभूमीवर प्रेम असेल तर तुमच्या शत्रूंचा तुम्ही द्वेष केलाच पाहिजे. तुमचे आईवडील सरकारसाठी काम करत असले तर ते आपले शत्रूच आहेत आणि म्हणून तुम्ही त्यांना ठार मारलेच पाहिजे—नाहीतर तुम्हालाच ठार केले जाईल.”
पोल पॉ आणि शुद्धीकरण
सन १९७५ मध्ये, पोल पॉनं युद्ध जिंकले आणि मग कंबोडिया एक साम्यवादी राष्ट्र बनले. पोल पॉनं सर्व विद्यार्थ्यांचं, शिक्षकांचं, सरकारी अधिकाऱ्यांचं आणि प्रत्येक सुशिक्षित व्यक्तीचं शुद्धीकरण करण्यास सुरवात केली. चष्मा लावणारा मनुष्य फार शिकला-सवरलेला आहे असे समजून त्याला ठार केले जाई! पोल पॉच्या राजवटीनं अनेकांना शेतात काम करण्यासाठी जबरीनं शहरांतून आणि नगरातून हाकलून लावून खेड्यापाड्यांत धाडलं. सगळ्यांनी एकसारखाच पोशाख घालायचा होता. अपुरे अन्न, ना औषधपाणी, ना कपडालत्ता अशा परिस्थितीत दिवसातले १५ तास आम्हाला राबावं लागत; आणि केवळ २ किंवा ३ तास आम्ही अंथरुणाला पाठ टेकवत असू. अधिक उशीर होण्यापूर्वी माझ्या मायदेशातून पळ काढण्याची मी खूणगाठ बांधली.
त्या कमर रूझ सैनिकांनं दिलेला सल्ला आता मला आठवला. सगळी छायाचित्रे, कागदपत्रे आणि मला गुन्हेगार शाबीत करू शकेल अशी हरएक वस्तू मी फेकून दिली. एक खड्डा खोदून माझी काही कागदपत्रे मी तिथं दडवून ठेवली. मग पश्चिमेस थायलंडच्या दिशेनं मी प्रयाण केलं. ते धोक्याचंच होतं. पोलिसांनी रस्त्यावर रचलेले अडथळे चुकवायचे होते आणि संचारबंदीच्या काळात खरोखर दक्ष राहायचं होतं; कारण केवळ कमर रूझ सैनिकच प्रवास करू शकत होते, ते देखील अधिकृत परवानगीनिशी.
मी एके ठिकाणी माझ्या एका मित्राकडे राहायला गेलो. मग कमर रूझ सैनिकांनी त्या ठिकाणच्या सर्व लोकांना दुसऱ्या एका ठिकाणी हलवलं. त्यांनी शिक्षकांची आणि डॉक्टरांची कत्तल करण्यास सुरवात केली. तीन मित्रांसह मी तिथनं सटकलो. आम्ही जंगलात लपायचो आणि झाडांवर मिळतील ती फळे खाऊन कसेबसे पोट भरायचो. सरतेशेवटी, बॅटमबॅन प्रांतातल्या एका लहानशा गावात माझ्या एका मित्राच्या घरी मी उतरलो. आणि आश्चर्य म्हणजे, पळ कसा काढायचा यावर सल्ला देणाऱ्या त्या माजी सैनिकाशी माझी गाठ पडली! मी त्याला सोडून दिलं होतं म्हणून मग त्यानं देखील तीन महिने मला एका खड्ड्यात लपविलं. त्यानं एका लहान मुलास, खड्ड्यात न डोकावता माझ्याकरता अन्न टाकण्यास सांगितलं होतं.
काही काळातच, मी तिथून पळ काढू शकलो आणि आश्चर्य म्हणजे माझी आई, मावशी आणि माझी बहीण मला भेटली; ते देखील थायलंडच्या सरहद्दीच्या दिशेनंच पलायन करत होते. माझ्यासाठी तो दुःखाचा काळ होता. माझी आई आजारी पडली आणि शेवटी रोगामुळे आणि अन्नाअभावी निर्वासितांच्या छावणीत तिची जीवनज्योत मालवली. तथापि, प्रकाशाचा आणि आशेचा एक किरण माझ्या जीवनात आला. सोफी यूम ही स्त्री माझ्या जीवनात आली आणि आम्ही विवाहबद्ध झालो. माझी मावशी आणि बहीण यांच्यासोबत आम्ही थायलंडची सरहद्द पार करून संयुक्त राष्ट्रांच्या एका निर्वासितांच्या छावणीत पोहंचलो. कंबोडियाच्या यादवी युद्धात आमच्या कुटुंबानं भली मोठी किंमत मोजली. माझा भाऊ आणि माझी भावजय यांसोबतच आमच्या कुटुंबाचे १८ सदस्य आम्हाला कायमचे पारखे झाले.
संयुक्त संस्थानांत एक नवे जीवन
निर्वासितांच्या छावणीत आमची पार्श्वभूमी पडताळली गेली आणि मग संयुक्त संस्थानांत नेता यावं म्हणून संयुक्त राष्ट्रसंघ, आम्हाला स्पॉन्सर करील अशा कुणाचा शोध करू लागले. शेवटी त्यांना यश आले! सन १९८० मध्ये आम्ही सेंट पॉल, मिनेसोटोमध्ये पाय ठेवला. एका नवीन देशात राहून आयुष्य बनवायचं असल्यास, होता होईल तितक्या लवकर इंग्रजी भाषा शिकणं जरूरीचं आहे हे मला ठाऊक होतं. अधिक शिक्षण घ्यायचं असताना माझ्या स्पॉन्सरनं मला केवळ काही महिनेच शाळेत पाठवलं. आणि या उलट, एका हॉटेलमध्ये त्यानं मला द्वारपालाची नोकरी मिळवून दिली. परंतु, माझ्या तोडक्या मोडक्या इंग्रजीमुळे बराच गोंधळ उडायचा. मालक मला शिडी आणायला सांगायचा आणि मी त्याला कचऱ्याचा डबा नेऊन द्यायचो!
एक भीतीदायक भेट
सन १९८४ चा समय; रात्रपाळी करत असल्यामुळे मी दिवसा विश्रांती घ्यायचो. आम्ही ज्या क्षेत्रात राहत होतो तिथं आशियाई आणि कृष्णवर्णीय यांच्यात कमालीचा ताणतणाव होता. गुन्हे आणि मादक द्रव्ये, या गोष्टी तर अगदी सर्रासपणे चालायच्या. एकदा सकाळी दहा वाजता, दारापाशी कोणी कृष्णवर्णीय मनुष्य उभा आहे हे सांगण्यासाठी माझ्या पत्नीनं मला झोपेतून जागं केलं. तो मनुष्य आपल्याला लुटायला आला असं समजून ती घाबरून गेली होती. दारावर असलेल्या छिद्रातून मी पाहिलं तेव्हा हातात ब्रिफकेस घेतलेला आणि अगदी सुसभ्य पोशाखात असलेला एक कृष्णवर्णीय गृहस्थ उभा असलेला मला दिसला; पण त्याच्यासोबत एक श्वेतवर्णीय मनुष्य देखील होता. यात काळजी करण्यासारखं मला काहीच दिसलं नाही.
तो काय विकत आहे हे मी त्याला विचारलं. त्यावर त्यानं मला टेहळणी बुरूज आणि सावध राहा! या नियतकालिकांच्या प्रती दाखवल्या. मला काहीच समजत नव्हतं. केवळ दोन महिन्यांपूर्वीच पाच ग्रंथांच्या संचासाठी एका प्रॉटेस्टंट सेल्समनने १६५ डॉलरसाठी मला फसवलं होतं त्यामुळं ही नियतकालिकं नाकारण्याचा मी प्रयत्न केला. तथापि, त्या कृष्णवर्णीय मनुष्यानं नियतकालिकांतील चित्रं मला दाखविली. ती चित्रे किती मनोहर आणि सुंदर होती! शिवाय, त्या गृहस्थाचे हावभाव अत्यंत मैत्रिपूर्ण होते. म्हणून मग मी १ डॉलर देऊन ती नियतकालिकं घेतली.
दोन आठवड्यांनंतर तो गृहस्थ पुन्हा आला आणि माझ्याजवळ कंबोडियन बायबल आहे का, याविषयी त्यानं विचारणा केली. खरं तर, एका नॅझरीन चर्चमधून मला या भाषेतलं बायबल मिळालं होतं पण त्यातलं काहीच मला समजत नव्हतं. परंतु, दोन भिन्न वंशांचे पुरुष माझ्या दारी आले होते यामुळेच मी प्रभावित झालो होतो. मग त्यानं मला विचारलं, “तुम्हाला इंग्रजी शिकायला आवडेल का?” खरं तर मला शिकायचंच होतं पण त्यासाठी माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत हे मी त्याला स्पष्ट सांगून टाकलं. काहीच पैसे वगैरे न घेता केवळ बायबलवर आधारित एका प्रकाशनातून तो मला शिकवणार असल्याचं त्यानं मला सांगितलं. तो कोणत्या धर्माचा होता हे मला माहीत नसलं तरी मी मनात विचार केला, ‘एक पैसाही न देता आपल्याला इंग्रजी लिहायला-वाचायला शिकता येईल.’
इंग्रजी भाषेचं आणि बायबलचं शिक्षण
मी प्रगती करत होतो, पण मंद गतीनं. तो मला बायबलचे पहिले पुस्तक, उत्पत्ती दाखवायचा आणि मी कंबोडियन भाषेत त्यास “लो का बॅट” म्हणायचो. तो म्हणायचा, “बायबल” आणि मी म्हणायचो, “कोम्पी.” मी प्रगती करू लागलो तसं मला उत्तेजन मिळू लागलं. माझा इंग्रजी-कंबोडियन शब्दकोश, एक टेहळणी बुरूज नियतकालिक, बायबलचे नवे जग भाषांतर आणि माझे कंबोडियन बायबल, हे सर्व मी कामावर घेऊन जात असे. जेवणाच्या सुट्टीत, प्रकाशनांची तुलना करून एके वेळी एक शब्द शिकून मी इंग्रजीचा अभ्यास केला आणि ती शिकून घेतली. या मंद प्रगतीसाठी आणि त्यासोबतच साप्ताहिक अभ्यासासाठी तीन वर्षं लागली. पण, शेवटी मी इंग्रजी वाचण्यास शिकलो!
माझी पत्नी अद्यापही बौद्ध मंदिरात जात होती आणि पूर्वजांसाठी अन्न वेगळे काढून ठेवत होती. खरं तर, केवळ माश्यांना याचा फायदा व्हायचा! मी लष्करात होतो त्या काळात आणि बौद्ध धर्म अनुसरत होतो त्या काळात माझ्यामध्ये अनेक वाईट सवयी खोलवर रुजल्या गेल्या होत्या. मी एक भिक्षू होतो तेव्हा लोक आपल्या अर्पणांसहित सिगारेटी देखील आणायचे. त्यांचा असा विश्वास होता, की भिक्षूंनी धूम्रपान करणे म्हणजे त्यांच्या पूर्वजांनी धूम्रपान केल्यासारखे आहे. अशाप्रकारे मला निकोटीनचे व्यसन लागले. याशिवाय, युद्धात धैर्य एकवटण्यासाठी लष्करात असताना मी बेसुमार दारू प्यायचो आणि अफू सेवन करायचो. म्हणून मग मी बायबलचा अभ्यास करू लागलो तेव्हा मला अनेक मोठे बदल करणं आवश्यक होतं. याच काळात, प्रार्थना किती सहायक असते याची जाणीव मला झाली. केवळ काही महिन्यांतच मी सर्व वाईट सवयी सोडून दिल्या. यामुळे माझ्या कुटुंबातील सदस्यांना किती आनंद झाला!
सन १९८९ मध्ये मिनेसोटो या ठिकाणी एक साक्षीदार म्हणून माझा बाप्तिस्मा झाला. याच काळात, कंबोडियन भाषा बोलणारा साक्षीदारांचा एक मोठा गट तसेच कंबोडियन लोकांची वस्ती लाँग बीच, कॅलिफोर्नियामध्ये असल्याचं मला समजलं. मी आणि माझ्या पत्नीनं विचारविनिमय केल्यानंतर आम्ही लाँग बीच येथे स्थलांतर करण्याचं ठरवलं. या बदलामुळे किती मोठा फरक पडला होता! प्रथम माझ्या बहिणीचा, त्यानंतर माझ्या मावशीचा (जी सध्या ८५ वर्षांची आहे) आणि मग माझ्या पत्नीचा बाप्तिस्मा झाला. त्यांच्या पाठोपाठ माझ्या तीन मुलांनीही बाप्तिस्मा घेतला. कालांतरानं, माझ्या बहिणीनं एका साक्षीदाराशी विवाह केला; सध्या मंडळीमध्ये एक वडील म्हणून तो सेवा करत आहे.
इथं संयुक्त संस्थानांत आम्ही अनेक संकटप्रसंगांतून वाटचाल केली आहे. पैशांची तीव्र चणचण आणि काही आरोग्य समस्याही आम्ही अनुभवल्या असल्या तरी, बायबल तत्त्वांना जडून राहिल्यानं यहोवावरील आमचा भरवसा आम्ही टिकवून ठेवला आहे. आध्यात्मिक क्षेत्रात यहोवाने माझे प्रयत्न आशीर्वादित केले आहेत. सन १९९२ मध्ये मंडळीत एक सेवा सेवक म्हणून माझी नेमणूक झाली आणि १९९५ साली लाँग बीच येथे मी एक वडील बनलो.
मी एक बौद्ध भिक्षू होतो आणि मग कंबोडियाच्या युद्धग्रस्त रणभूमीवर एक अधिकारी होतो तेव्हा सुरू झालेल्या या दीर्घ प्रवासाचा, आमच्या या नवीन निवासस्थानात आणि देशात सुखशांतीनं शेवट झाला. शिवाय, यहोवा देव आणि येशू ख्रिस्त यांच्यावरील आमचा नव्यानेच मिळालेला विश्वासही आमच्यापाशी आहे. कंबोडियात आजही लोक एकमेकांची कत्तल करताहेत हे जाणून मला अत्यंत दुःख होतं. यामुळेच, मला आणि माझ्या कुटुंबाला धीर धरून नवीन जगाची—जिथं सर्व युद्धांना विरामचिन्ह मिळेल आणि जिथं सर्व लोक जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती करतील—घोषणा करण्याचे प्रोत्साहन मिळते!—यशया २:२-४; मत्तय २२:३७-३९; प्रकटीकरण २१:१-४.
[तळटीप]
a त्यावेळी पोल पॉ हा कमर रूझ सैन्याचा एक साम्यवादी नेता होता; या सैन्यानं युद्धात विजय मिळवून कंबोडियाचा ताबा घेतला होता.
[२४ पानांवरील नकाशा/चित्र]
व्हिएतनाम
लाओस
थायलंड
कंबोडिया
बॅटमबॅन
नॉम पेन्ह
[चित्राचे श्रेय]
Mountain High Maps® Copyright © 1997 Digital Wisdom, Inc.
[२४ पानांवरील चित्र]
बौद्ध भिक्षू असताना
[२६ पानांवरील चित्र]
राज्य सभागृहापाशी माझ्या कुटुंबासह