‘मृत्युछायेच्या दरीत’ सांत्वन
बार्ब्रा श्वीट्सर यांच्याद्वारे कथित
कधीकधी आयुष्यात सर्वकाही अगदी सुरळीत चालायचं तेव्हा माझं जीवन ‘हिरव्यागार कुरणासारखं’ मनोरम असायचं. परंतु, ‘मृत्यूछायेच्या दरीतून’ वाटचाल करणं काय असतं हे देखील मी अनुभवलं आहे. पण तरीही, माझी खात्री झाली आहे, की यहोवा आपला मेंढपाळ असल्यामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीतून आपण निभावून जाऊ शकतो.—स्तोत्र २३:१-४.
सन १९९३ मध्ये मी आणि माझ्या पतींनी आयुष्याची जवळजवळ सत्तरी गाठली तेव्हा एक नवीन साहसी कार्य—बायबल शिक्षकांची अधिक गरज असलेल्या इक्वादोरच्या क्षेत्रांत सेवा करणं—हाती घेण्याचा निर्णय आम्ही घेतला. आम्ही मूळचे अमेरिकन असलो तरीही आम्ही स्पॅनिश बोलू शकत होतो; शिवाय आम्हाला कोणतीच आर्थिक बांधिलकीही नव्हती. ‘माणसे धरण्याकरता’ इक्वादोर फलदायी असल्याचं आम्हाला माहीत असल्यामुळे या फलदायी पाण्यात आपले जाळे टाकण्याचा आम्ही निर्णय घेतला.—मत्तय ४:१९.
वॉच टावर सोसायटीच्या इक्वादोर शाखा दफ्तरात काही दिवस मजेत गेल्यानंतर आम्ही मोठ्या उत्सुकतेने माचाला—विशिष्ट गरज असलेले एक शहर—या ठिकाणी प्रयाण करण्यासाठी ग्वायाकीलच्या बस स्थानकावर गेलो. आम्ही बससाठी थांबलो असताना माझे पती फ्रेड यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं; यामुळं आमचा प्रवास पुढे ढकलण्याचं आम्ही ठरवलं. फ्रेड सामानाजवळ बसले असताना, शाखा दफ्तरात माघारी जाण्याची व्यवस्था करण्यासाठी मी एका टेलिफोन बूथमध्ये गेले. काही क्षणांत मी पुन्हा तिथं आले आणि पाहते तर माझे पती गायब!
यानंतर मी फ्रेडला पुन्हा कधीच जिवंत पाहिलं नाही. मी फोन करण्यासाठी गेले असता तिथं बस स्थानकावरच त्यांना हृदयविकाराचा एक जबरदस्त झटका आला होता. मी वेड्यासारखी त्यांना इथं तिथं शोधू लागले तेव्हा बस स्थानकाच्या एका अधिकाऱ्यानं मला सांगितलं, की फ्रेडला दवाखान्यात नेण्यात आलं आहे. मी दवाखान्यात पोहंचेपर्यंत फ्रेडची जीवन ज्योत मालवली होती.
अचानक, एका परक्या देशात मी सर्वस्वी एकाकी झाले, घर नाही आणि डोकं टेकवायला माझ्या पतीचा खांदा नाही. “डोकं टेकवायला,” हे मी अशासाठी म्हणते कारण तेव्हापर्यंत फ्रेड पुढाकार घेऊन आम्हा दोघांसाठी सर्वकाही करत असे. मला स्वतःमध्ये इतका आत्मविश्वास वाटत नसल्यामुळे त्यांनीच या गोष्टी कराव्यात यात मी संतुष्टी मानत होते. पण आता, मलाच निर्णय घ्यायचे होते, माझं अस्ताव्यस्त झालेलं जीवन सुरळीत करायचं होतं आणि त्याच वेळी माझ्या दुःखातूनही सावरायचं होतं. ही अतिशय उद्ध्वस्त करणारी भावना होती; जणू ‘मृत्यूछायेच्या दरीत’ मी लोटले गेले होते. मला एकटीला या सर्वाला तोंड द्यायला जमेल का?
सत्य शिकणे आणि साधी राहणीमान ठेवणे
मी आणि फ्रेड पहिल्यांदाच एकमेकांना भेटलो तेव्हा आम्ही दोघंही घटस्फोटित होतो. एक चांगली मैत्री दाट नातेसंबंधात बहरत गेली आणि आम्ही विवाह करण्याचं ठरवलं. सिॲटल, वॉशिंग्टन, यु.एस.ए. इथले आम्ही नावापुरते चर्चला जाणारे लोक. जॅमी नावाची एक आनंदी तरुण पायनियर (पूर्ण-वेळेचे सुवार्तिक) प्रचार करता करता आमच्या घरी येईपर्यंत आमच्या जीवनात धर्माला एवढं काही महत्त्वाचं स्थान नव्हतंच. ती तरुणी इतकी गोड होती की माझ्यासोबत बायबल अभ्यास करण्याचा तिचा प्रस्ताव मी लगेच स्वीकारला.
यात फ्रेडनंही रस घेतल्यामुळे जॅमीच्या आईबाबांनी आमचा अभ्यास घेतला आणि वर्षभरानं म्हणजे १९६८ साली आमचा दोघांचा बाप्तिस्मा झाला. सुरवातीपासूनच, देव राज्याच्या हितांना प्रथम स्थानी ठेवण्यास आम्ही उत्सुक होतो. (मत्तय ६:३३) आमचा अभ्यास घेतला त्या जोडप्यानं म्हणजे लॉर्न आणि रूडी नूस्ट यांनी याबाबतीत खरोखरच एक आदर्श राखला. आमचा बाप्तिस्मा झाला त्याच्या थोड्याच काळानंतर त्यांनी अधिक गरज असलेल्या संयुक्त संस्थानाच्या पूर्व किनारपट्टीवरील एका नगरात स्थलांतर केलं. त्याच वेळी अधिक गरज असलेल्या क्षेत्रांत कार्य करण्याच्या इच्छेचं बीज आमच्या हृदयात पेरलं गेलं.
स्थलांतर करण्यामागं आमचं आणखीन एक कारण होतं. फ्रेड एका मोठ्या डिपार्टमेंट स्टोअरचे मॅनेजर होते. त्यांचं काम फारच वेळखाऊ होतं आणि त्यांना याची जाणीव झाली, की दुसरीकडे कुठं स्थलांतर केल्यानं आपली राहणी साधी ठेवण्यास तसेच सत्याकडे आणि आमच्या दोन मुलांकडे लक्ष देण्यास त्यांना अधिक वेळ मिळू शकेल. माझ्या पहिल्या पतीकडून मला एक मुलगी झाली होती; तिचा विवाह होऊन तिनं आणि तिच्या पतीनंही आता सत्य स्वीकारलं होतं; त्यामुळे सीॲटल सोडून जाण्याचा निर्णय कठीणच होता. तरीसुद्धा त्यांनी माझे हेतू समजून घेतले आणि माझ्या निर्णयास पाठिंबा दिला.
अशाप्रकारे १९७३ साली आम्ही स्पेनला स्थलांतर केलं; त्यावेळी या देशात, सुवार्तेच्या प्रचारकांची आणि पुढाकार घेणाऱ्या बांधवांची नितान्त गरज होती. फ्रेडच्या अंदाजानुसार आम्ही जर काटकसर केली तर स्पेनमधील आमचा खर्च भागवण्यास आम्ही बचत केलेला पैसा पुरेसा होता, आणि सेवेत आम्ही अधिकतर वेळ घालवू शकत होतो. आणि आम्ही अगदी असंच केलं. लवकरच, फ्रेड एक वडील म्हणून सेवा करू लागले आणि १९८३ साली आम्ही दोघेही पायनियर झालो.
तब्बल २० वर्षे आम्ही स्पेनमध्ये सेवा केली, तिथली भाषा शिकून घेतली आणि अनेक उत्तम अनुभवांचा आस्वाद घेतला. बहुतेक वेळा मी आणि फ्रेडनं एकत्र मिळून प्रचार केला आणि विवाहित जोडप्यांसह अभ्यास केला; यांच्यापैकी अनेकजण आज बाप्तिस्माप्राप्त साक्षीदार आहेत. स्पेनमध्ये काही दिवस राहिल्यानंतर हायडी आणि माईक या आमच्या दोन लहान मुलांनी देखील पायनियर सेवा सुरू केली. भौतिकरित्या आमच्यापाशी फारच कमी असलं तरीही हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुखावह काळ राहिला आहे. आमचं जीवन अगदी साधंसुधं होतं. कुटुंब या नात्याने आम्ही बराच वेळ एकत्र घालवू शकत होतो आणि बायबलच्या अहवालात दिलेल्या विधवेच्या तेलाप्रमाणेच आम्ही बचत केलेल्या पैशाचा चोखंदळ उपयोग केल्याने आम्हाला कधीच पैशांची वाण पडली नाही.—१ राजे १७:१४-१६.
पुन्हा एकदा स्थलांतर
सन १९९२ मध्ये आम्ही पुन्हा एकदा स्थलांतर करण्याचा विचार करू लागलो. आमची मुलं आता वयात आली होती आणि स्पेनमध्ये पूर्वीइतकी गरजही आता राहिली नव्हती. इक्वादोरमध्ये सेवा केलेल्या आमच्या ओळखीच्या एका मिशनरीकडून आम्हाला कळलं होतं, की त्या देशात पायनियर आणि वडिलांची नितान्त गरज आहे. एका नवीन देशात स्थलांतर करण्याचं आता आमचं वय राहिलं नाही असा विचार आम्ही केला का? मुळीच नाही; कारण आमची दोघांची तब्येत तशी बऱ्यापैकी होती आणि आम्हाला प्रचार कार्य तर फार आवडायचं. यास्तव, आम्ही इक्वादोर शाखेशी संपर्क साधला आणि आमच्या योजना आखू लागलो. खरं तर, स्पेनच्या उत्तरी भागात सेवा करणारी माझी मुलगी हायडी आणि तिचे पती क्वान मानवेल देखील आमच्यासोबत येण्यास उत्सुक होते.
शेवटी फेब्रुवारी १९९३ साली आम्ही सर्व व्यवस्था केल्या आणि एका नवीन देशांत पोहंचलो. इक्वादोरमध्ये पायनियरींग करण्याच्या आशेबाबतही आम्हाला खूप उत्सुकता होती; कारण या ठिकाणी अनेक लोक बायबलचा अभ्यास करण्यास उत्सुक होते. तिथल्या शाखेत आमचं हार्दिक स्वागत झाल्यानंतर, विशिष्ट गरज असलेली ठिकाणे म्हणून सूचित केलेली काही शहरं पाहून घेण्याचं आम्ही ठरवलं. पण, मग माझ्या पतीचा मृत्यू झाला.
‘मृत्यूछायेच्या दरीत’
सुरवातीला मला जबरदस्त धक्का बसला आणि नंतर यावर काही केल्या माझा विश्वासच बसेना. यापूर्वी फारच क्वचित फ्रेड आजारी पडले असतील. आता मी काय करावं? कुठं जावं? मला काहीच सुचत नव्हतं.
माझ्या आयुष्याच्या त्या खडतर काळात मला आध्यात्मिक व दयावान बंधूभगिनींचा आधार लाभला; यांच्यापैकी बहुतेकजण तर मला ओळखतही नव्हते. शाखा दफ्तरातील बांधव अतिशय प्रेमळ होते आणि अंत्यसंस्काराच्या व्यवस्थेसहित सर्वकाही त्यांनीच हाताळलं. विशेषतः, बोनो या ख्रिस्ती दांपत्यानं मला दाखवलेलं प्रेम मी कधीच विसरू शकणार नाही. मला त्यांनी कधीच एकटं सोडलं नाही; इतकं की, मला एकटं एकटं वाटू नये म्हणून कित्येक दिवस बहीण ईडित बोनो माझ्याच खोलीत झोपायच्या. खरं तर, सबंध बेथेल कुटुंबानं इतकं प्रेम आणि विचारशीलता दाखवली की जणू एका उबदार, सुरक्षित पांघरूणात त्यांनी मला गुंडाळलं होतं.
काही दिवसांतच, माझी तीन मुलं देखील माझ्याकडे आली आणि त्यांचा आधार माझ्यासाठी अमूल्य ठरला. दिवसा नेहमीच माझ्या अवतीभोवती अनेक प्रेमळ लोक असले तरीही रात्र मला खायला उठायची. याच वेळी यहोवानं मला सांभाळून घेतलं. जेव्हा केव्हा भयानक एकाकीपणा मला खायला उठायचा तेव्हा मी प्रार्थनेमार्फत यहोवाच्या समीप जायचे आणि तो माझं सांत्वन करायचा.
अंत्यसंस्कारानंतर मला प्रश्न पडला, की आता माझ्या आयुष्याचं मी काय करावं? मला इक्वादोरमध्ये राहण्याची इच्छा होती कारण आम्हा दोघांचा तसा निर्णय होता; पण ते जमेल असं मला वाटलं नव्हतं. म्हणून मग हायडी आणि क्वान मानवेल—जे खरं तर मागाहून इक्वादोरला येणार होते—यांनी आपल्या योजनेत फेरबदल केला जेणेकरून ते लगेच इक्वादोरला येऊ शकले असते आणि आम्ही सर्वजण एकत्र मिळून सेवा करू शकलो असतो.
महिन्याभरातच लॉहा—शाखा दफ्तरानं शिफारस केलेलं एक शहर—या ठिकाणी आम्हाला एक घर मिळालं. लवकरच, सगळं काही संघटित करण्यात, नवीन घरामध्ये स्थिरावण्यात आणि एका नवीन देशात प्रचार सुरू करण्यात मी व्यस्त झाले. त्या सर्व कार्यांमुळे माझं दुःख थोडंफार हलकं झालं. या शिवाय, फ्रेडचा अतिशय लळा असलेल्या माझ्या मुलीपाशी मी माझं मन मोकळं करू शकत होते आणि यामुळेही मला हलकं हलकं वाटलं.
तथापि, एका नवीन नित्यक्रमाशी मी जुळवून घेते ना घेते तोच काही महिन्यांत, मी माझ्या आयुष्यातली किती मोठी गोष्ट गमावली आहे ही जाणीव आणखीन भेदक झाली. मी फ्रेडसोबत घालवलेल्या आनंदी क्षणांचा विचार करू शकत नसल्याचं मला आढळलं कारण त्या क्षणांचा विचार केल्याने मी फार अस्वस्थ व्हायचे. मी भूतकाळ मागे टाकला पण भविष्याचा विचार करणंही मला जमत नव्हतं; या अवस्थेनिशी मी एक एक दिवसाला सामोरी जात होते. परंतु, प्रत्येक दिवशी काहीतरी अर्थपूर्ण करणे, विशेषतः प्रचार कार्य करण्याचा मी प्रयत्न केला. यामुळेच माझा टिकाव लागला.
प्रचार करणं आणि बायबल शिकवणं या गोष्टी मला नेहमीच मनापासून आवडतात आणि इक्वादोरमधील लोक अतिशय स्वागतशील असल्यामुळे हे कार्य मोठं आनंददायी होतं. त्या ठिकाणी मी पहिल्यांदाच घरोघरचं कार्य केलं तेव्हा एका तरुण स्त्रीशी माझी गाठ पडली जिनं म्हटलं: “हो, मला बायबल शिकायला आवडेल!” इक्वादोरमधील हा माझा पहिला बायबल अभ्यास होता. अशा प्रकारच्या अनुभवांनी माझं लक्ष वेधून घेतलं आणि आपल्याच दुःखाचा अधिक विचार करण्यापासून मला परावृत्त केलं. यहोवानं माझ्या क्षेत्र सेवेवर आशीर्वादांचा भरभरून वर्षाव केला. असं वाटायचं जणू मी प्रचाराला जायचे त्या प्रत्येक वेळी मला एखादा उत्तम अनुभव यायचाच.
शंकाच नाही, की पायनियर या नात्याने सेवा करत राहणं एक आशीर्वाद होता. यामुळे माझ्यावर एक जबाबदारी पडली जी मला पूर्ण करायची होती तसंच प्रत्येक दिवशी काही सकारात्मक काम मला लाभलं. थोड्याच काळात, मी चक्क सहा बायबल अभ्यास संचालित करत होते.
माझ्या सेवेद्वारे मला लाभलेलं समाधान स्पष्ट करण्यासाठी एका मध्यमवयीन स्त्रीचा उल्लेख मला करावासा वाटतो जिनं अलीकडेच बायबल शिकवणुकींचं खरं मोल जाणलं आहे. मी जेव्हा जेव्हा तिला एखादं शास्त्रवचन दाखवते ती प्रथम ते पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न करते आणि मग त्यातील सल्ला अंमलात आणण्यास ती तयार असते. या आधी तिनं एक अनैतिक जीवन व्यतीत केलं असलं तरीही अलीकडेच एका पुरुषानं विवाहाशिवाय एकत्र राहण्याची मागणी तिच्याकडे केली तेव्हा तिनं त्याला खंबीरपणे नकार दिला. शास्त्रवचनीय दर्जांच्या पक्षाने खंबीरपणे उभे राहण्यास तिला किती आनंद वाटला त्याबद्दल तिनं मला सांगितलं; कारण यापूर्वी तिला कधीच इतकी मनःशांती लाभली नव्हती. असे अभ्यास माझं हृदय उल्हासित करतात आणि इतरांना माझी मदत होते ही भावना देऊन जातात.
आनंद टिकवून ठेवणे
शिष्य बनविण्याच्या कार्यातून मला अमाप आनंद मिळत असला तरीही माझं दुःख मी इतक्या सहजासहजी विसरू शकले नाही. मी अधूनमधून दुःखी व्हायचे. माझ्या मुलीनं आणि माझ्या जावयानं मला विलक्षण आधार दिला; पण कधीकधी मी त्या दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवताना पाहते तेव्हा पती गमावल्याचं दुःख मला प्रकर्षानं जाणवतं. मला माझ्या पतीची उणीव तीव्रपणे भासते; याचं कारण, आम्ही दोघं एकमेकांच्या अगदी समीप होतो केवळ यामुळे नव्हे, तर कित्येक गोष्टींसाठी मी सर्वस्वी त्यांच्यावरच विसंबून राहायचे यामुळे देखील. असे काही क्षण असतात जेव्हा त्यांच्याशी बोलता येत नसल्यामुळे, त्यांचा सल्ला घेता येत नसल्यामुळे किंवा क्षेत्र सेवेत मला आलेला एखादा अनुभव त्यांना सांगता येत नसल्यामुळे अपरिमित दुःख होतं आणि एक प्रकारची पोकळी निर्माण होते जिचा सामना करणं मुळीच सोपं नसतं.
अशा प्रसंगी कोणती गोष्ट माझी मदत करते? मी कळकळून यहोवाला प्रार्थना करते आणि माझं मन दुसऱ्या कोणत्याही सकारात्मक गोष्टीत रमविण्यासाठी त्याच्याकडे मदत मागते. (फिलिप्पैकर ४:६-८) आणि तो हमखास माझी मदत करतो. आज काही वर्षांनंतर, मी आणि फ्रेडनं एकत्र घालवलेल्या काही आनंदी क्षणांची मला आठवण होते. यावरून मी हळूहळू सावरतेय हे दिसून येतं. स्तोत्रकर्त्या दावीदाप्रमाणे मला असं वाटतं जणू ‘मृत्यूछायेच्या दरीतून’ मी वाटचाल केली आहे. पण, यहोवानं माझं सांत्वन केलं आणि विश्वासू बांधवांनी मला योग्य दिशा दाखवली.
मी शिकलेले धडे
सगळ्या गोष्टींत नेहमी फ्रेड पुढाकार घेत असल्यामुळे मी आयुष्यात कधी पुढाकार घेऊन काही करू शकेल असा विचार मी कधीच केला नव्हता. पण यहोवाच्या, माझ्या कुटुंबाच्या आणि बांधवांच्या मदतीनं मी ते करू शकले. काही बाबतींत तर मी पूर्वीपेक्षा अधिक खंबीर बनले आहे. पूर्वीपेक्षा अधिक वेळा मी साहाय्यासाठी यहोवाकडे वळते आणि स्वतः निर्णय घेण्याचं मी शिकत आहे.
अधिक गरज असलेल्या स्पेनमध्ये मी आणि फ्रेडनं २० वर्षं एकत्र मिळून सेवा केली याबद्दल मी किती संतुष्ट आहे. या व्यवस्थीकरणात उद्या, नव्हे पुढच्या क्षणी देखील काय होईल ते सांगता येत नाही; त्यामुळे मला असं वाटतं, की आपल्याला वेळ आहे तोवर यहोवासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी शक्य तितकं करणं फार महत्त्वाचं आहे. त्या काळानं आमचं जीवन व विवाह अतिशय समृद्ध केला आणि त्यामुळेच पती गमावल्याचं दुःख मी झेलू शकले याची मला खात्री झाली आहे. फ्रेडचा मृत्यू झाला त्यापूर्वीच पायनियरींग करणं हा आमचा एक जीवनक्रम झाल्यामुळे एका नवीन वास्तवाशी जुळवून घेण्याचा संघर्ष करत असताना माझ्यापुढे एक उद्देश असल्याची जाणीव मला होती.
फ्रेडचा मृत्यू झाला तेव्हा मला असं वाटलं होतं, की आयुष्यात आता काहीच राहिलं नाही. पण खरं सांगू, तसं मुळीच नव्हतं. यहोवाच्या सेवेत मला कार्य करायचं होतं, शिवाय लोकांना मदतही करायची होती. सत्याची गरज असलेले इतके लोक माझ्या सभोवताली असताना मी माघार कशी घेणार? येशूनं सांगितलं त्याप्रमाणं इतरांना मदत करणं माझ्या हितार्थ होतं. (प्रेषितांची कृत्ये २०:३५) क्षेत्रात आलेल्या अनुभवांनी मला पुढील गोष्टींची आस धरण्यास आणि त्यासाठी योजना करण्यास मदत केली.
काही दिवसांपूर्वीच, एकाकीपणाच्या परिचित भावनेनं पुन्हा एकदा मला ग्रासलं. पण, बायबल अभ्यास संचालित करण्यासाठी मी घराबाहेर पडले तशी मला उभारी आली. दोन तासांनंतर, संतुष्ट आणि प्रोत्साहित होऊन मी घरी परतले. स्तोत्रकर्त्याने म्हटले त्याप्रमाणे आपणही कधीकधी ‘अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करू’ पण यहोवा आपले प्रयत्न आशीर्वादित करतो तेव्हा आपण ‘हर्षाने कापणी करतो.’—स्तोत्र १२६:५, ६.
अलीकडेच, उच्च रक्तदाबामुळे मला माझ्या आराखड्यात थोडासा फेरबदल करावा लागला आणि आता मी नियमितपणे सहायक पायनियरींग करत आहे. या व्यवस्थीकरणात मी माझ्या दुःखातून पूर्णपणे कधी सावरू शकेन असं मला वाटत नाही; पण तरीही सध्या मी एक समाधानकारक जीवन जगत आहे. माझ्या तीन मुलांना पूर्ण-वेळेच्या सेवेत पाहून मी मनोमन सुखावते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, नवीन जगात फ्रेडला भेटण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे. माझी खात्री आहे, की इक्वादोरमध्ये मी जे कार्य करू शकले—आमच्या योजना फलद्रूप झाल्या—हे ऐकून ते रोमांचित होतील.
मी प्रार्थना करते, की स्तोत्रकर्त्याचे शब्द माझ्याबाबतीत खरे ठरोत. “खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील; आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन.”—स्तोत्र २३:६.
[१२ पानांवरील चित्र]
सॅन लूकस, लॉहा, इक्वादोर येथे सेवाकार्य करताना