वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 ४/८ पृ. ४-६
  • तणाव—नावाचे “स्लो पॉइझन”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तणाव—नावाचे “स्लो पॉइझन”
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • तणाव आणि तुमची रोगप्रतिकारशक्‍ती
  • ना एकमात्र कारण ना एकमात्र उपाय
  • तणाव, चांगला आणि वाईट
    सावध राहा!—१९९८
  • तुम्ही तणावात आहात का?
    सावध राहा!—२०२०
  • तणाव म्हणजे काय?
    सावध राहा!—२०२०
  • तणावावर नियंत्रण करणे अशक्य नाही!
    सावध राहा!—१९९८
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९८
g98 ४/८ पृ. ४-६

तणाव—नावाचे “स्लो पॉइझन”

“लोक सहसा म्हणतात, ‘जिवाला एवढा ताण करून घेऊ नकोस, नाहीतर आजारी पडशील.’ कदाचित त्यांना कल्पनाही नसेल की जैवशास्त्रानुसार त्यांचे म्हणणे अगदी शास्त्रोक्‍त आहे.”—डॉ. डेव्हिड फेल्टन.

जिल, ही एक अविवाहित माता आहे; वयात आलेला एक मुलगा, जवळजवळ रिकामेच होत आलेले बँक खाते आणि स्वतःच्या आईवडिलांशी बेबनाव, या सर्व गोष्टींच्या तणावामुळे ती आधीच जर्जर झालेली. त्यात, काही कारण नसताना तिच्या हाताच्या त्वचेवर खाजणारे, झोंबणारे पुरळ उठले. ॲन्टिबायोटिक्स, कॉर्टिसोन मलम, शिवाय ॲन्टिहिस्टमाइन्स (ॲलर्जीची औषधे), सर्व करून झाले पण कशाचाही उपयोग झाला नाही. उलट, ते पुरळ जिलच्या चेहऱ्‍यासहित, सबंध शरीरावर पसरले. आता या आणखी एका समस्येच्या ताणामुळे, आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी तिची स्थिती झाली.

जिलला एका त्वचारोग उपचारकेंद्रात पाठवण्यात आले जेथे रोग्यांची भावनात्मक स्थिती देखील तपासली जाते. या उपचारकेंद्राचे सहसंस्थापक डॉ. थॉमस ग्रॅग सांगतात, “आम्ही त्यांच्या [रोग्यांच्या] जीवनातल्या घडामोडींविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो.” सहसा त्यांना असे आढळते की औषधोपचाराला प्रतिसाद न देणाऱ्‍या त्वचारोगांनी पीडित असलेल्यांना, वैद्यकीय उपचारासहित जीवनातल्या ताणतणावाला तोंड देण्यासाठी मदतीची गरज असते. अर्थात, डॉ. ग्रॅग कबूल करतात की, “ताणतणावामुळेच त्वचारोग होतो असे म्हणणे अपर्याप्त ठरेल. पण भावनात्मक स्थितीचा त्वचारोगांवर बराच प्रभाव पडतो, असे आपण नक्कीच म्हणू शकतो. आणि म्हणून रोग्याला फक्‍त वेगवेगळ्या स्टेरॉईड क्रीम्सची नावं लिहून देण्यापेक्षा आपण त्याला जीवनातल्या ताणतणावाला तोंड देण्यासाठीही मदत दिली पाहिजे.”

जिलच्या मते ताणतणावावर नियंत्रण करायला शिकल्यामुळे तिच्या त्वचेचे आणखी नुकसान होण्यापासून राहिले. “अजूनही अधूनमधून अचानक पुरळ उठतात, पण आधीसारखा तो भयंकर प्रकार नाही.” हे एक असामान्य प्रकरण आहे का? मुळीच नाही. कित्येक डॉक्टरांचे मत आहे की गांधी उठणे, सोरिॲसिस (विसर्पिका), मुरूम, आणि इसब यांसारख्या त्वचारोगांना कारणीभूत ठरणाऱ्‍या घटकांपैकी तणाव हा देखील एक आहे. पण तणावापासून केवळ तुमच्या त्वचेलाच धोका आहे, असे नाही.

तणाव आणि तुमची रोगप्रतिकारशक्‍ती

अलीकडील संशोधनावरून दिसून आले आहे की तणावामुळे तुमची रोगप्रतिकारशक्‍ती कमजोर होऊन अनेक संसर्गजन्य रोगांना तुमच्या शरीरात प्रवेश करण्याचा एक मार्ग मोकळा होऊ शकतो. विकृतिशास्त्रज्ञ रॉनल्ड ग्लेसर यांनी सांगितल्याप्रमाणे, “प्रत्यक्ष तणावामुळे तुम्ही आजारी पडत नसता. पण तणावामुळे तुमच्या रोगप्रतिकारशक्‍तीवर जो परिणाम होतो, त्यामुळे तुमचा आजारी पडण्याचा धोका बळावतो.” विशेषतः सर्दीपडसे, फ्ल्यू आणि हर्पिझ या रोगांचा तणावाशी संबंध आहे असे दाखविणारा सबळ पुरावा उपलब्ध आहे. या रोगांच्या विषाणूंचा आपल्या शरीराशी सतत संपर्क येत असला तरीसुद्धा सामान्य परिस्थितीत आपली रोगप्रतिकारशक्‍ती त्यांचा यशस्वीपणे सामना करते. पण काही तज्ज्ञांच्या मते व्यक्‍ती जेव्हा अस्वस्थ मनःस्थितीत असते, तेव्हा ही प्रतिकारशक्‍ती निकामी होऊ शकते.

जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून नेमक्या कोणत्या प्रक्रिया घडतात हे जरी अद्याप कळलेले नाही, तरीसुद्धा काहींनी असा तर्क केला आहे की, तणावाखाली असताना, त्याला तोंड देण्याकरता शरीराला सज्ज करणारे हॉर्मोन रक्‍तप्रवाहातून सोडले जातात तेव्हा ते तुमच्या रोगप्रतिकाराच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण करू शकतात. पण या हॉर्मोन्सचे कार्य तात्पुरते असल्यामुळे सहसा काळजी करण्याची गरज नसते. तथापि, काहींच्या मते तणाव प्रदीर्घ आणि तीव्र असतो तेव्हा व्यक्‍तीची रोगप्रतिकार यंत्रणा इतकी कमजोर होते की त्याला सहज रोग जडतात.

म्हणूनच कदाचित, कॅनडातील डॉक्टरांनी असा अंदाज बांधला आहे की सहसा डोकेदुखी, निद्रानाश, थकवा आणि जठरांत्रीय समस्यांसाठी त्यांच्याकडे येणाऱ्‍या एकूण रोग्यांपैकी जवळजवळ ५० ते ७० टक्के रोग्यांच्या समस्या ताणतणावाशी संबंधित असतात. अमेरिकेत, हा आकडा अंदाजे ७५ ते ९० टक्क्यांपर्यंत येतो. डॉ. जीन किंग यांच्या मते, “दीर्घकालीन तणाव स्लो पॉइझनसारखा असतो,” असे त्यांचे विधान अतिशयोक्‍त नाही.

ना एकमात्र कारण ना एकमात्र उपाय

हे सर्व खरे असले तरीसुद्धा निव्वळ तणावामुळे, वैद्यकीय दुष्परिणाम होण्याइतपत माणसाच्या रोगप्रतिकार यंत्रणेवर प्रभाव पडू शकतो याविषयी शास्त्रज्ञांना खात्री नाही. म्हणून, ज्या कोणाला तणाव असतो, मग तो दीर्घकालीन असला तरीसुद्धा, अशी प्रत्येक व्यक्‍ती आजाराला बळी पडेलच असे छातीठोकपणे म्हणता येणार नाही. त्याउलट, तणाव नसल्यास, माणूस खात्रीने निरोगी राहील असेही म्हणता येत नाही; शिवाय, आशावादी प्रवृत्ती आणि सकारात्मक विचारांच्या साहाय्याने केवळ इच्छाशक्‍तीच्या जोरावर आजार घालवता येतो या चुकीच्या कल्पनेवर विश्‍वास ठेवून वैद्यकीय उपचार न घेणे देखील शहाणपणाचे ठरणार नाही. डॉ. डॅनिएल गोलमन ताकीद देतात की: “सर्व व्याधींवर उपचार म्हणजे तुमची मनोवृत्ती, ही जी धारणा आहे तिच्या फलस्वरूप, मानसिक स्थितीचा आजारपणावर कितपत प्रभाव पडतो यासंबंधी सर्वदूर गोंधळ आणि गैरसमज पसरले आहेत; भरीस भर म्हणजे काही वेळा या धारणेमुळे आजारी पडल्याबद्दल लोक स्वतःला जबाबदार ठरवू लागतात, जणू काही आजारपण हे अयोग्य विचारसरणीचे किंवा आध्यात्मिक दृष्ट्या अपात्र असण्याचे चिन्ह आहे.”

आजारपणाचे कारण म्हणून कोणत्याही एका गोष्टीला जबाबदार ठरवणे सहसा शक्य नसते, हे आठवणीत ठेवले पाहिजे. तरीसुद्धा, तणाव आणि रोगांमध्ये असलेला संबंध लक्षात घेता, हे “स्लो पॉइझन” कमी करण्याचे शिकून घेणे केव्हाही शहाणपणाचेच आहे या गोष्टीला पुष्टी मिळते.

हे कसे साध्य करता येईल यावर विचार करण्याआधी, तणावाचे कोणकोणते प्रकार असतात आणि काहीवेळा हा तणाव तुम्हाला लाभदायकही कसा ठरू शकतो हे आपण पाहू.

[५ पानांवरील चौकट]

तणावाशी संबंधित असणारे काही विकार

• ॲलर्जी

• संधिशोथ (आर्थ्रायटिस)

• दमा

• पाठ, मान, आणि खांदे दुखणे

• सर्दीपडसे

• विषण्णता (डिप्रेशन)

• अतिसार

• फ्ल्यू

• जठरांत्रीय विकार

• डोकेदुखी

• हृदयरोग

• निद्रानाश

• अर्धशिशी (मायग्रेन)

• आपाचक व्रण (पेप्टिक अल्सर)

• लैंगिक अक्रियाशीलता

• त्वचाविकार

[६ पानांवरील चित्र]

बहुतेकांना तणावामुळेच डॉक्टरांकडे यावे लागते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा