वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 १०/८ पृ. २८-२९
  • जगावरील दृष्टिक्षेप

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जगावरील दृष्टिक्षेप
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • प्रोजेक्ट टायगर निष्फळ ठरतो
  • दिसतात वृद्ध पण मरतात तारुण्यात
  • सोने खणणाऱ्‍या वाळवी
  • विजेचा धोका
  • सेल्युलर-टेलिफोन शिष्टाचार
  • भूकंप पूर्वसूचित नाहीत
  • विद्युत कार आणि पर्यावरण
  • वनस्पती स्फोटक पदार्थ फस्त करतात
  • सहस्रकाचे वेडेपण
  • सावधान: कोलोबसची ओलांडणी
  • इंटरनेट याचा सुज्ञपणे उपयोग करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • इंटरनेट सावध का असावे?
    सावध राहा!—१९९७
  • खरी सुरक्षितता एक फसवे उद्दिष्ट
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • जगावरील दृष्टिक्षेप
    सावध राहा!—२००६
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९७
g97 १०/८ पृ. २८-२९

जगावरील दृष्टिक्षेप

प्रोजेक्ट टायगर निष्फळ ठरतो

देशाच्या राष्ट्रीय प्राण्याचे विलोपन टाळण्याच्या हेतूने सन १९७३ मध्ये, भारतात प्रोजेक्ट टायगर राबवण्यात आला होता. त्यावेळी भारतातील वाघांची संख्या १,८२७ पर्यंत घटली होती. त्या प्रोजेक्टला आंतरराष्ट्रीय पाठबळ व लक्षणीय यश देखील मिळाले. १९८९ साली, भारतीय वाघांची संख्या ४,००० पेक्षा अधिक वाढली. तथापि, इंडिया टुडे यानुसार, आता पुन्हा एकदा वाघ धोक्यात आहे. भारतातील वाघांची अंदाजित संख्या ३,००० हून कमी झाली आहे. का बरे? काहींच्या म्हणण्याप्रमाणे शिकारचोर सरासरी, प्रती दिवशी किमान एका वाघाची तरी शिकार करतात. मोठ्या मांजराचे [वाघाचे] संरक्षण करण्यासाठी प्रोजेक्ट टायगर राबविण्यात आला होता. परंतु, असे करण्यात तो निष्फळ ठरला आहे असेच दिसून येते. अहवाल असे म्हणतो, की “बहुतेक वेळा शिकारचोरांच्या बंदुकीच्या गोळ्यांमुळे वनपालाचे धैर्य खचते, शिवाय त्याच्यापाशी योग्य शस्त्रसामग्रीही नसते.” तर मग वाघांसाठी, “अस्तित्वाची जागा विलोपनाने घेतली आहे.”

दिसतात वृद्ध पण मरतात तारुण्यात

पुढील अहवाल सूचित करतात त्यानुसार, धूम्रपान केल्याने लवकरच म्हातारपण येते असा संशोधकांचा विश्‍वास आहे. ब्रिटनचे लॅन्सेट यानुसार, दीर्घकाळापासून धूम्रपान करणाऱ्‍यांचे केस अकाली पिकण्याची शक्यता चारपट असते तर टक्कल असणे अथवा टक्कल पडणे यांची शक्यता दुप्पट असते. यावर अहवाल देताना, युसी बर्केली वेलनेस लेटरने याकडे लक्ष वेधले, की ध्रूमपान न करणाऱ्‍यांच्या तुलनेत, धूम्रपान करणाऱ्‍यांना अधिक सुरकुत्या पडतात व त्यांचे दात पडण्याची शक्यताही दुप्पट असते. ब्रिटिश मेडिकल जर्नल यात नमूद केलेल्या एका अलीकडील अभ्यासाचा उल्लेख अहवाल करतो जेथे दाखवून दिले आहे, की धूम्रपान न करणाऱ्‍या पुरुषांच्या तुलनेत आयुष्यभर धूम्रपान करणाऱ्‍यांची, वयाचे ७३ वे वर्ष गाठण्याची शक्यता केवळ निम्मी असते. याव्यतिरिक्‍त, गुड हाऊसकिपिंग नियतकालिक अहवाल देते की, “धूम्रपान करणाऱ्‍यांसोबत राहणाऱ्‍या लोकांना हृदयरोग होण्याची शक्यता २० टक्के अधिक आहे.”

सोने खणणाऱ्‍या वाळवी

सन १९८४ मध्ये, नायजरच्या आफ्रिकी देशात एका खेडूताच्या हाती सोने लागले आणि परिणामस्वरूपी निर्माण झालेल्या गोल्ड रशने अनेक देशांतील खनिकांना या प्रदेशाकडे आकृष्ट केले. कॅनडियन भूशास्त्रज्ञ क्रिस ग्लीसन आठवून सांगतात, की प्राचीन आफ्रिकन संस्कृतीत, सोन्याचे साठे शोधण्यासाठी लोक वाळवींच्या वारुळांचा उपयोग करत असत. नायजर म्हणजे वाळवींच्या जातींचे माहेरघरच आहे; त्या अतिशय मोठी वारुळे बांधतात ज्यांपैकी काही १.८ मीटर उंचीची व १.८ मीटर व्यासाची असतात. नॅशनल जिऑग्रफीक नियतकालिक स्पष्टीकरण देते की, पाण्याच्या शोधात वाळवी जसजशा बीळे खणतात—कधीकधी तर ७५ मीटर इतक्या खोलवर देखील जातात—तसतशी त्यांची वारुळेही मोठमोठी होत जातात. ग्लीसन यांनी अनेक वारुळांतील मातीचे नमुने घेतले, या आशेने की कोठे खोदावे हे त्यांना त्यांवरून समजेल. पुष्कळशा नमुन्यांमध्ये सोने आढळले नाही, पण काहींमध्ये आढळले! त्यांच्या निदर्शनास असेही आले की, “ज्या वारुळांवर सोन्याचे लेश होते ती सर्व सोन्याने ओतप्रोत भरली होती.” असे दिसून येते की वाळवी, पाण्याच्या शोधात खोदतात तेव्हा त्यांच्या मार्गात जे काही येते, मग ते सोने असले तरी ते सर्व पृष्ठभागावर आणले जाते.

विजेचा धोका

द ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राच्या अहवालानुसार, “लोक कल्पना करतात त्यापेक्षा कितीतरी अधिक वेळा प्राणघातक विजेचे झटके बसत असतात.” ऑस्ट्रेलियामध्ये विजेच्या झटक्यामुळे दर वर्षी पाच ते दहा लोक मृत्युमुखी पडतात, तर १०० हून अधिक लोक जखमी होतात, असेही स्पष्टीकरण अहवाल देतो. बसणाऱ्‍या झटक्याची पुसटशीही पूर्वकल्पना नसली तरी, “ज्या मूठभर लोकांना विजेचा झटका बसणारच होता त्यांचे केस चक्क उभे राहिल्याचे त्यांनी सांगितले आहे,” असे मेलबोर्नच्या ब्युरो ऑफ मीट्यरॉलजीचे फिल ऑल्फर्ड म्हणतात. विजेचा झटका बसण्याच्या शक्यता टाळायच्या असल्यास, ऑल्फर्ड अशी शिफारस करतात, की एखाद्या मजबूत इमारतीत अथवा धातूच्या संरचनेपासून विलग असलेल्या व मजबूत छप्पर असलेल्या एखाद्या वाहनात, झंझावाती वादळापासून तुम्ही आश्रय घ्यावा.

सेल्युलर-टेलिफोन शिष्टाचार

फार इस्टर्न इकोनॉमिक रिव्ह्यू यानुसार सुटसुटीत सेल्युलर टेलिफोन्सच्या आगमनाने, पुरातन काळातील काही शिष्टाचारांच्या गरजेवर भर दिला आहे. दोन्ही पक्षांबद्दल अर्थात, फोनच्या दुसऱ्‍या टोकापासून बोलणाऱ्‍या व्यक्‍तीसंबंधी व आपल्या सभोवताली जे कोणी असतील त्यांच्यासंबंधी देखील आदरशील तथा विचारशील असण्याचे उत्तेजन हाँगकाँग व्यापार सल्लागार टिना लीयू देतात. त्या असाही सल्ला देतात, की सुस्पष्टपणे बोलावे पण त्याचा अर्थ ओरडावे असा होत नाही; शिवाय फोनचा वापर करत असताना खाणेपिणे कटाक्षाने टाळावे. त्या अशी शिफारस करतात, की सभांदरम्यान घेतलेल्या कॉल्समध्ये कपात करावी व ते दुसरीकडे कनेक्ट करावेत, किंवा मग रुग्णालये, ग्रंथालये व प्रेक्षकस्थान अशा ठिकाणी, व्हायब्रेटर रिंग सिग्नल वापरावा. सामाजिक प्रसंगी कॉल्सना प्रत्युत्तर देऊन व्यत्यय आणल्याने मित्रमंडळीला व नातेवाईकांना वाटेल की त्यांची उपेक्षा होत आहे. उपहारगृहात भोजन करण्याबद्दल लीयू असे विवेचन मांडतात: “एखाद्या पुरुष व स्त्रीच्या संकेतभेटीदरम्यान, पुरुष जर फोनवर बोलत असेल तर, त्याने दिलेला फुलांचा गुच्छ कोमेजून जाण्याआधी त्याने आपले बोलणे संपवून टाकावे.”

भूकंप पूर्वसूचित नाहीत

अलीकडेच भूकंप तज्ज्ञांचे एक आंतरराष्ट्रीय मंडळ, भूकंपाच्या वैज्ञानिक पूर्वसूचनांवर चर्चा करण्यासाठी लंडनमध्ये एकत्रित आले. त्यांचे अनुमान? “१०० पेक्षा अधिक वर्षांपासून अनेक भूवैज्ञानिकांचा असा विचार होता की [मोठे भूमिकंप] होण्याआधी, सुस्पष्ट दिसून येणाऱ्‍या तसेच सहजासहजी ओळखण्याजोग्या पूर्वसूचना असल्या पाहिजेत ज्या, भयाची सूचना देण्याकरता आधारभूत समजल्या जाऊ शकतात, असे टोकियो विद्यापीठाचे डॉ. रॉबर्ट गेलर यांनी इओएस या प्रकाशनात लिहिले. “असे दिसून येते की, काही विशिष्ट भूकंप बहुधा अंगभूतरित्याच पूर्वसूचित नसतात,” त्यामुळे उलटपक्षी या विचारसरणीत मूलभूत फेरबदल होण्याची आवश्‍यकता आहे. अचूक पूर्वसूचना कदाचित शक्य नसल्या तरी भूकंपाचा विस्तारित अहवाल असलेल्या क्षेत्रांतील भूकंपाच्या संभावनेचा व त्या संभावनेच्या परिमाणाचा अंदाज वैज्ञानिक बांधू शकतात. उदाहरणार्थ, येत्या ५० वर्षांत संयुक्‍त संस्थानाच्या खंडात, जबरदस्त कंप कोठे होण्याची शक्यता आहे हे यु.एस. भूशास्त्रीय सर्वेक्षणाने तयार केलेला एक अभिनव नकाशा सूचित करतो. या माहितीवर आधारित, सरकारी एजन्सी असे सूचित करतात, की कॅलिफोर्नियाची ७० टक्क्याहून अधिक लोकसंख्या सध्या अशा क्षेत्रांत वास्तव्य करून आहे जेथे असा धोका होण्याची संभावना आहे.

विद्युत कार आणि पर्यावरण

पर्यावरणासाठी, पेट्रोलवर चालणाऱ्‍या कारपेक्षा बॅट्रीवर चालणाऱ्‍या कार बऱ्‍या असतात का, हे पाहण्यासाठी जर्मन ऑटोमोबाईल कंपनीने अभ्यास केला. सूड्यिटशे झेटुंग या वृत्तपत्रानुसार, १९९२ आणि १९९६ या कालावधीत १३ लाख किलोमीटर प्रवास केलेले १०० वाहनचालक या अभ्यासात समाविष्ट होते. विद्युत कारचे माईलेज कमी असले तरी त्यांचे अनेक फायदेही असल्याचे आढळून आले होते: जसे की, जेथे कोठे त्यांचा वापर करण्यात आला तेथे कोणत्याही प्रत्यक्ष उत्सर्गाशिवाय, आवाज न करता त्या धावल्या. तथापि, एका प्रमुख समस्येने मात्र ह्‍या सर्व फायद्यांवर पाणी सोडले आहे. ती म्हणजे, बॅट्रीज पुन्हा चार्ज करण्यात प्राथमिक ऊर्जेचा जो खप होतो तो, पेट्रोलवर चालणाऱ्‍या वाहनांमार्फत होणाऱ्‍या ऊर्जेच्या खपापेक्षा अधिक असतो; वाहनाच्या वापरावर आधारित तो १.५ ते ४ वेळा अधिक असतो—शिवाय ही ऊर्जा मग इतरत्र उत्पन्‍न करावी लागते. किती ऊर्जा उत्पन्‍न होते यावर आधारित अशी शक्यता आहे, की “पेट्रोलवर चालणाऱ्‍या वाहनांच्या तुलनेत विद्युत कार पर्यावरणासाठी अधिक अपायकारक आहेत,” असे विवेचन वृत्तपत्र देते.

वनस्पती स्फोटक पदार्थ फस्त करतात

शुगर-बीट वनस्पती व पाँडवीडसारखीच एक प्रकारची वनस्पती यांच्यामध्ये, दारूगोळा असलेल्या पुरातन स्थलांतील भूमीतून व पाण्यातून स्फोटक पदार्थ बाहेर काढून, सुरक्षितपणे त्यांचे विघटन करण्याची क्षमता असते, असा अहवाल नव वैज्ञानिक (इंग्रजी) नियतकालिक देते. ह्‍यूस्टन, टेक्सासच्या रिस विद्यापीठातील वैज्ञानिकांनी, पेरीविंकलला व पॅरेट फेदर या सर्वसामान्य पाँडवीडला टिएनटी भरविले. आठवड्याभरातच, त्यांच्या ऊतींमधील स्फोटक पदार्थांचा एकेक कण नाहीसा झाला होता. तसेच या वनस्पतींना जाळल्यामुळे कोणताही स्फोट झाला नव्हता. त्याचवेळी, मेरीलँड विद्यापीठातील संशोधकांना याचा शोध लागला, की सर्वसामान्य शुगर-बीट पेशी व निष्कर्षणे, नाट्रोग्लिसरीन शोषूण त्याचे विघटनही करू शकतात. सूक्ष्मजंतूपासून वैज्ञानिकांना कोणतीही मदत मिळाली नाही हे सिद्ध करण्यासाठी त्यांच्या दोन्ही गटांनी आधीच वनस्पतींना निर्जंतूक केले होते. लेख असेही म्हणतो की, “सध्या, बांधकाम करण्यासाठी दारूगोळा असलेले पुरातन स्थल, उपयोगक्षम करणे बहुधा अतिशय धोकेदायक व महागडे देखील बनले आहे; परंतु, भूमीतून व पाण्यातून निष्कर्षणे बाहेर काढून, सुरक्षितपणे त्यांचे विघटन करण्यासाठी, स्वस्तात उगवलेल्या वनस्पतींचा उपयोग केल्यास बदल होण्याची शक्यता आहे.” याची निकडीची गरज आहे, कारण “समुद्रात दारूगोळ्यांचे अवशेष फेकण्याची सध्या हयात असलेली पद्धत आता कालबाह्‍य होत चालली आहे.”

सहस्रकाचे वेडेपण

न्यूजविक नियतकालिक म्हणते: “असे दिसते की, पहिल्या महायुद्धाने उदय होणाऱ्‍या व नंतर अण्विक युद्धाचे स्वरूप धारण करणाऱ्‍या २० व्या शतकाचा आता, मनोरंजनाच्या युगाने अस्त होत आहे.” १९९९ नूतन वर्षाची संध्या साजरी करण्यासाठी, “विश्‍वभरातील हॉटेल्स, आतापासून पूर्ण बुक झाले आहेत. तथापि, सहस्रकाची सुरवात नेमकी कोठून होणार हा विषय सध्या वादाचा भोवऱ्‍यात आहे.” यु.एस.न्यूज ॲण्ड वर्ल्ड रिपोर्टने नोंद केल्याप्रमाणे, “किरीबाटी राष्ट्रातून या समस्येला तोंड फुटले. आधी आंतरराष्ट्रीय दिनांक-रेषा, द्विपमालेच्या मधून जाते असे: पूर्व किरीबाटीमध्ये रविवार असला की पश्‍चिम किरीबाटीमध्ये सोमवार असायचा.” त्या राष्ट्राने असे म्हणून ही समस्या सोडवली, की जानेवारी १, १९९५ पासून दिनांक-रेषा अगदी पूर्वेस असलेल्या त्याच्या कॅरोलाईन द्विपाला वळसा घालून जाईल. याचा अर्थ, नूतन दिवसाची सुरवात पाहणारा, किरीबाटी हा पहिलाच देश असेल. तथापि, टोंगा आणि न्यूझीलंड यांसारख्या इतर राष्ट्रांना मात्र ही “पहिली” प्रतिष्ठा हवी होती. रॉयल ग्रिनविच वेधशाळेनुसार हा प्रश्‍न वास्तविकतेला सोडून आहे. अहवाल असे म्हणतो, की “सप्टेंबर विषुवदिनापासून मार्च विषुवदिनापर्यंत दक्षिणध्रुवावर सुर्योदय होत असल्यामुळे, सहस्रकाची सुरवात दक्षिणेच्या अगदी खालच्या टोकापासून होईल.” तथापि, वेधशाळा असेही म्हणते की हे, २००० वर्षी नाही, तर जानेवारी १, २००१ वर्षी होईल.

सावधान: कोलोबसची ओलांडणी

दक्षिण केनियाच्या किनारपट्टीवरील डायना अरण्य हे पूर्व आफ्रिकेतील त्या तुरळक ठिकाणांपैकी एक आहे जेथे कोलोबस माकडाचा अद्यापही उत्कर्ष होत आहे. तथापि, समुद्रकाठचा गजबजलेला रस्ता कसा ओलांडावा हा या प्राण्यांसमोर असणारा एक मोठा प्रश्‍न आहे. एका अंदाजानुसार, प्रत्येक महिन्याला कमीतकमी १२ माकडे रस्त्यावरील कार्समुळे दगावतात, असा अहवाल पूर्व आफ्रिका वन्य जीवन संस्थेचे नियतकालिक, स्वॉरा देते. हे हत्याकांड कमी करण्यासाठी डायनाच्या आसपास राहणाऱ्‍या काही चिंतातूर रहिवाश्‍यांनी पावले उचलण्याचा निश्‍चय केला. वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी असा आर्जव करण्याव्यतिरिक्‍त अलीकडेच, रस्त्यापासून उंचीवर त्यांनी एक दोर-पूल देखील बांधला आहे. माकडे या पुलाचा उपयोग करत असल्याचे दृश्‍य पाहून उत्तेजित झालेले रहिवासी आणखीन पूल बांधण्याच्या योजना आखत आहेत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा