किलिमांजारो—आफ्रिकेचे शिखर
केनियामधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून
अवघ्या १५० वर्षांआधी, आफ्रिकेतील अंतःप्रदेश जवळजवळ अज्ञातच होता. बाहेरच्या जगातल्या लोकांसाठी हा भला मोठा खंड अपरिचित आणि रहस्यमय होता. पूर्व आफ्रिकेविषयी सांगितल्या जाणाऱ्या निरनिराळ्या रंजक गोष्टींपैकी एक गोष्ट युरोपियन लोकांना फारच विचित्र वाटायची. योहॅन्नस रेपमॅन आणि योहॅन एल. क्रॅफ या जर्मन मिशनऱ्यांनी असे कळवले होते की १८४८ साली त्यांनी विषुववृत्ताजवळ एक मोठा पर्वत पाहिला होता आणि त्याचे शिखर बर्फाने आच्छादलेले होते.
आफ्रिकेसारख्या उष्णप्रदेशात एक बर्फाच्छादित पर्वत असण्याबद्दल केवळ शंकाच व्यक्त केली गेली नाही, तर ही गोष्ट एक थट्टेचा विषय बनली. पण या अतिप्रचंड पर्वताविषयी सांगितल्या जाणाऱ्या गोष्टींमुळे भूगोलशास्त्रज्ञांना आणि शोधकांना तो प्रत्यक्ष पाहण्याची मोठी उत्कंठा आणि कुतूहल होते, आणि त्यांनी शेवटी या मिशनऱ्यांच्या म्हणण्याचे खरेखोटे केलेच. पूर्व आफ्रिकेत खरंच “किलिमांजारो” नावाचा एक बर्फाच्छादित ज्वालामुखीजन्य पर्वत होता. या नावाचा काही लोक “महान पर्वत” असा अर्थ असल्याचे सांगतात.
आफ्रिकेचे “शिखर”
आज किलिमांजारो विलोभनीय सौंदर्यासाठी आणि डोळ्यात भरणाऱ्या भव्यतेसाठी सर्वज्ञात आहे. आफ्रिकेतील रखरखीत, धूळकट मैदानांतून चरायला निघालेल्या हत्तींचा झुंड आणि पाठीमागे डौलात उभा असलेला बर्फाच्छादित “किली. . .” इतके विहंगम दृश्य क्वचितच पाहायला मिळेल.
किलिमांजारो हा आफ्रिका खंडातील सर्वात उंच पर्वत आणि जगातल्या सर्वात मोठ्या सुप्त ज्वालामुखींपैकी आहे. तो टांझानिया येथे असून, विषुववृत्ताच्या अगदी दक्षिणेकडे आणि केनियाच्या सीमारेषेच्या शेजारी स्थित आहे. याठिकाणी, पृथ्वीच्या पोटातून चार अरब घन मीटर पेक्षा जास्त ज्वालामुखीजन्य पदार्थ बाहेर पडले आणि अशारितीने या गगनचुंबी पर्वताचा जन्म झाला.
या पर्वताच्या अवाढव्यपणात त्याच्या विलगतेचीही भर पडते. सर्वांपासून दूर, एकटाच ऐटीत उभ्या असलेल्या या पर्वताने, समुद्र सपाटीपासून ९०० मीटरवर असणाऱ्या मासाय अरण्य प्रदेशातून उदय पावून तब्बल ५,८९५ मीटरची उंची गाठलेली आहे! म्हणूनच किलिमांजारो पर्वताला आफ्रिकेचे शिखर म्हटले आहे यात काही नवल नाही.
किलिमांजारो यास “काफल्याचा पर्वत” देखील म्हटले जात असे, कारण चमकणाऱ्या दीपस्तंभासारखे त्याचे हिमटोप आणि हिमवाह कोणत्याही दिशेला गेल्यास शेकडो किलोमीटर अंतरावरूनही स्पष्ट दिसायचे. गत शतकांत, आफ्रिकेतील अंतरस्थ जंगलांतून प्रचंड प्रमाणात हस्तीदंत, सोने आणि गुलाम घेऊन निघालेल्या कितीतरी काफल्यांना याच पर्वताच्या हिमाच्छादित शिखराने मार्ग शोधून काढण्यास मदत केली.
अलौकिक शिखरे
किलिमांजारोवर दोन ज्वालामुखे आहेत. कीबो हे प्रमुख ज्वालामुख असून त्याचे समाकार शिखर, हिम आणि बर्फाने कायम आच्छादलेले असते. पूर्वेकडे मावेन्झी हे ५,१५० मीटर उंचीचे आणखी एक शिखर आहे; कीबो आणि माउंट केनियाच्या पाठोपाठ हे आफ्रिकेतील तिसरे अत्युच्च पर्वतशिखर आहे. कीबोच्या सौम्य उतार असलेल्या कड्यांच्या तुलनेत, मावेन्झी हे सर्व बाजूंनी उंचसखल अणकुचीदार खडकांच्या भिंती असलेले, जणू शिल्पकारानेच गढलेले एक अतिसुंदर शिखर आहे. कीबो आणि मावेन्झी यांची शिखरे ४,६०० मीटरच्या उंचीवर एका विस्तीर्ण दगडाळ सपाट प्रदेशामुळे एकमेकांशी जोडली गेली आहेत. कीबोच्या पश्चिमेस शीरा नावाचे शिखर आहे; हे एका पुरातन ज्वालामुखीचे पडित अवशेष असून वर्षानुवर्षे वाऱ्याने आणि पाण्याने झिजून गेल्यामुळे आता येथे समुद्र सपाटी पासून ४,००० मीटर उंचावर असलेल्या एका पाणथळ पठाराचे हृदयंगम दृश्य पाहायला मिळते.
परिस्थितीकीची अद्भुत किमया
उंची, पावसाचे प्रमाण, आणि वनस्पतीजीवन यांच्या आधारावर किलिमांजारोची परिस्थितीकी वेगवेगळ्या क्षेत्रांत विभाजित आहे. पायथ्याजवळील उतारांवर अर्वाचीन संस्कृतीचा स्पर्शही न झालेली उष्णप्रदेशीय जंगले आहेत, येथे हत्ती आणि केप बफेल्लोचे कळप भटकताना दिसतात. जंगलाच्या छताच्या भागांत उंचावरती वेगवेगळ्या जातीची माकडे राहतात आणि कधीकधी लाजाळू माउंटन बुशबक आणि डायकर यांसारखे वेगवेगळ्या प्रकारचे मृग देखील ओझरते दिसतात जे क्षणार्धातच घनदाट झाडाझुडपांत नजरेआड होतात.
जंगलाच्या क्षेत्रानंतर हेथर क्षेत्र आहे. वर्षानुवर्षे वाऱ्यावादळांचे धक्के झेललेली जुनी गांठाळ वृक्षे, म्हाताऱ्या माणसांच्या लांब भुऱ्या दाढीसारख्या दिसणाऱ्या असंख्य दगडफुलांनी आच्छादलेली असतात. येथे पर्वताचा खुला विस्तार सुरू होतो आणि चोहीकडे महाकाय हेथर वृक्षे पाहायला मिळतात. हिरव्यागार गवताच्या दाट झुबक्यांमध्ये अधूनमधून विखुरलेल्या रंगीबेरंगी फुलांनी सजलेला तो विस्तार पाहून डोळ्यांचे पारणे फिटते.
वृक्षरेखेच्या आणखीन उंचावर, जमिनीलगतच्या वनस्पतींचा थर आढळतो. वृक्षांच्याऐवजी, येथे चार मीटरच्या उंचीपर्यंत वाढणाऱ्या जायंट ग्राउंडसल्स या असामान्य दिसणाऱ्या वनस्पती, तसेच मोठ्या कोबीच्या किंवा आर्टीचोक्सच्या आकाराच्या लोबीलिया या वनस्पतीही आढळतात. खडकाळ थरांच्याभोवती एव्हरलास्टिंग फ्लावर्स नावाची गवतासारखी आणि सुकलेल्या फुलांसारखी दिसणारी फुले उगवतात; त्यांमुळे भुरक्या धुळकट रंगाच्या या भूदृश्यात थोडा तरी रंग भरला जातो.
आणखीन उंचावर गेल्यास, जमिनीलगतच्या वनस्पतींचा थर संपून आल्पीय क्षेत्र सुरू होते. या प्रदेशात प्रमुखपणे गर्द बदामी आणि धुळकट रंगांची झाक असलेले काहीसे निस्तेज रंग दिसतात. या विरळ, रूक्ष विस्तारात फार कमी वनस्पती उगवतात. कीबो आणि मावेन्झी ही दोन मुख्य शिखरे याच ठिकाणी, उंच प्रदेशांतील शुष्क आणि खडकाळ वाळवंटाच्या एका विस्तीर्ण पट्ट्याने एकमेकांशी जोडली गेली आहेत. येथे अतितीव्र तापमान असते; दिवसा ते ३८ अंशांपर्यंत चढते तर रात्री गोठणांकाच्या कितीतरी अंश खालपर्यंत घसरते.
शेवटी आपण अत्युच्च क्षेत्र गाठतो. येथे गार आणि स्वच्छ हवा असते. निळ्याशार आकाशासमोर येथील हिमवाह आणि हिमटोप पांढरेशुभ्र दिसतात; पर्वताच्या गर्द पार्श्वभूमीपुढे त्यांचे सौंदर्य अवर्णनीय असते. येथे हवा विरल असून समुद्र सपाटीवरील हवेत ऑक्सिजनचे जितके प्रमाण आढळते त्यापेक्षा निम्मेच येथे असते. कीबोच्या सपाट शिखरावर ज्वालामुख आहे, जे अगदी गोल आकाराचे असून त्याचा २.५ किलोमीटर इतका व्यास आहे. या ज्वालामुखात पर्वताच्या अगदी मध्यभागी एक भला मोठा राखेचा खळगा आहे; त्याचे आडवे अंतर ३३० मीटर असून ज्वालामुखीच्या आत १२० मीटरइतकी त्याची खोली आहे. या निद्रिस्त ज्वालामुखीच्या आतली खळबळ लहान लहान धूममुखांतून (धुराच्या छिद्रांतून) गंधक वाफांच्या रूपात हळुवारपणे थंडगार हवेत बाहेर पडताना दिसते.
किलिमांजारोच्या महाकाय आकारमानामुळे तेथे एक विशिष्ट प्रकारचे हवामान तयार झाले आहे. हिंदी महासागराकडील, अर्धशुष्क सखल प्रदेशांवरून वाहणारे ओलसर वारे पर्वतावर येऊन आदळतात आणि तेथून ते वरच्या दिशेला विचलित होऊन द्रवीभूत झाल्यामुळे पाऊस पडतो. यामुळे पायथ्याशी असणारे उतार कॉफी लागवड आणि इतर पिकांच्या दृष्टीने सुपीक बनतात; या पिकांवर पर्वताच्या पायथ्याशी राहणारे लोक अवलंबून असतात.
“किलीवर” विजय
किलिमांजारोच्या छत्रछायेत राहणाऱ्या लोकांचा असा अंधविश्वास होता की या पर्वताच्या उतारांवर दुष्टात्मे राहतात आणि कोणीही पर्वताच्या हिमाच्छादित टोकावर चढून जाण्याचा प्रयत्न केल्यास हे आत्मे त्याला दुखापत करतील. या भीतीमुळे स्थानिक लोक शिखर गाठण्याचा प्रयत्न करीत नसत. शेवटी १८८९ साली दोन जर्मन शोधक पर्वतावर चढून गेले आणि त्यांनी आफ्रिकेच्या अत्युच्च शिखरावर पाऊल ठेवले. दुसरे शिखर, मावेन्झी चढायला जास्त कठीण असल्यामुळे ते १९१२ सालापर्यंत पादाक्रांत करण्यात आलेले नव्हते.
आज किलिमांजारोवर चढून जाण्याची संधी कोणत्याही सुदृढ व्यक्तीसाठी खुली आहे आणि पूर्व आफ्रिकेला येणारे कितीतरी पर्यटक मोठ्या आवडीने या पर्वतावर चढून जातात. या पर्वतावर चढून जाण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी टांझानियन पार्क अधिकाऱ्यांनी अगदी सुव्यवस्थित सोयीसवलती उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आवश्यक पेहराव आणि साधने भाड्याने मिळतात. प्रशिक्षित ओझी वाहणारे आणि गाईड्सची सोय आहे आणि या गिर्यारोहण सहलीच्या सुरवातीपासून शेवटपर्यंत अनेक ठिकाणी राहण्याची उत्तम व्यवस्था उपलब्ध आहे. पर्वतावर वेगवेगळ्या उंचीवर पक्क्या हट्स आहेत ज्यात गिर्यारोहक आश्रय घेऊ शकतो आणि त्याच्या मुक्कामाचीही येथे व्यवस्था होऊ शकते.
किलिमांजारोचे प्रत्यक्ष दर्शन म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव असून तो माणसाला विचार करायला भाग पाडतो. देवाविषयीचे या उद्गारांना कोणीही सहज संमती देईल: ‘तू आपल्या सामर्थ्यांने पर्वत स्थिर ठेवितोस.’ (स्तोत्र ६५:६) खरंच, आफ्रिकेत अत्यंत उंचावर ऐटीत उभा असलेला एकटा किलिमांजारो मोठ्या प्रभावीपणे महान निर्माणकर्त्याच्या सामर्थ्याची ग्वाही देतो.
[२०, २१ पानांवरील नकाशा/चित्र]
आफ्रिका
केनिया
किलिमांजारो
टांझानिया