बायबलचा दृष्टिकोन
वैवाहिक विश्वासघात झाल्यावर विवाह टिकवता येतो का?
“मी तुम्हास सांगतो की, जो कोणी आपल्या बायकोला जारकर्माच्या कारणाशिवाय टाकून दुसरी करितो तो व्यभिचार करितो.”—मत्तय १९:९.
असे म्हणून येशू ख्रिस्ताने ख्रिस्ती व्यक्तीला आपल्या अविश्वासू सोबत्याला घटस्फोट देण्यास अनुमती दिली.a परंतु, निर्दोष सोबत्याने विवाह न मोडण्याचा निर्णय घेतला आणि त्या जोडप्याने आपला नातेसंबंध पुनर्स्थापित करण्याचा निश्चय केला तर काय? या जोडप्यासमोर कोणती आव्हाने आहेत आणि या आव्हानांचा ते यशस्वीरित्या सामना कसे करू शकते? बायबल या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यास कसे मदत करते ते आपण पाहू या.
उद्ध्वस्त झालेले घर
विश्वासघातामुळे केवढे नुकसान होते ते आपण आधी समजून घेतले पाहिजे. पती आणि पत्नी “दोन नव्हत तर एकदेह” होतील हा विवाहाच्या आरंभकर्त्याचा उद्देश होता असे येशू ख्रिस्ताने म्हटले. त्याने पुढे म्हटले: “म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.” होय, मानवांना अतूट बंधनात जोडण्याकरता विवाहाची तरतूद केली आहे. व्यभिचार करून एखादी व्यक्ती जेव्हा वैवाहिक शपथ मोडते तेव्हा दुःखमय परिणाम घडून येतात.—मत्तय १९:६; गलतीकर ६:७.
निर्दोष सोबत्याला किती पीडा सोसावी लागते हा त्याचा पुरावा आहे. व्यभिचाराच्या परिणामांची तुलना घरे उद्ध्वस्त करणाऱ्या प्रचंड वादळाशी केली जाऊ शकते. डॉ. शर्ली पी. ग्लास यांनी असे निरीक्षण केले: “माझा सोबती मेला असता तर मला सोपं गेलं असतं असं माझ्याकडं आलेल्या अनेक पेशंटनी म्हटलंय.” पण, ज्यांचे सोबती मरण पावलेत ते कदाचित याजशी सहमत होणार नाहीत हे खरे आहे. तथापि, व्यभिचाराचा भयंकर दुःखद परिणाम असतो हे यावरून स्पष्ट होते. काही लोक तर या विश्वासघातातून पूर्णतः कधीच सावरत नाहीत.
अशा या दुःखाचा विचार करून एखादी व्यक्ती कदाचित असा प्रश्न करील, ‘व्यभिचारामुळे विवाह मोडावा का?’ तशी जरूरी नाही. व्यभिचाराबद्दल येशूने केलेल्या विधानावरून दिसून येते की, विश्वासू सोबत्याला घटस्फोट घेण्याचा शास्त्रवचनीय पर्याय आहे पण घटस्फोट घेतलाच पाहिजे असे कोणतेही बंधन नाही. काही जोडपी आवश्यक ते बदल करून जे काही फिस्कटते ते पुन्हा जोडण्याचे आणि दृढ करण्याचे ठरवतात—पण याचा अर्थ व्यभिचार माफ होतो असे नाही.
अर्थात, दोन्ही सोबती एकमेकांना विश्वासू असतात तेव्हाच वैवाहिक नातेसंबंधात आवश्यक बदल करावेत हे सर्वात उत्तम. तथापि, बेइमानी झाल्यावरही काही निर्दोष सोबती आपला विवाह टिकवतात. सर्वकाही सुरळीत होईल अशी आशा धरून निर्णय घेण्याऐवजी निर्दोष सोबत्याने सर्व परिणामांचा साधकबाधक विचार करावा. संभवतः, ती आपल्या मुलांच्या गरजांचा तसेच स्वतःच्या आध्यात्मिक, भावनिक, शारीरिक आणि आर्थिक गरजांचाही विचार करेल.b विवाह टिकवता येईल का याचाही विचार केल्यास उत्तमच होईल.
विवाह टिकवण्याजोगा आहे का?
तुफानाने उद्ध्वस्त झालेले घर पुन्हा बांधण्याचा प्रयत्न करण्याआधी बांधणाऱ्याने ते घर उभारता येऊ शकते का हे पाहावे. त्याचप्रमाणे, विश्वासघातामुळे मोडकळीस आलेला नातेसंबंध पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करण्याआधी एखाद्या जोडप्याला—विशेषतः विश्वासू सोबत्याला—वैवाहिक जवळीक आणि भरवसा पुनर्स्थापित करण्याच्या शक्यतेचे वास्तविक मूल्यमापन करणे आवश्यक वाटेल.
दोषी सोबत्याने मनापासून पश्चात्ताप व्यक्त केला आहे, की त्याउलट, “आपल्या मनात” अद्यापही व्यभिचार करत आहे ही गोष्ट विचारात घेण्यास हवी. (मत्तय ५:२७, २८) आपण परिवर्तन करू असे तो बोलत असला, तरी स्वतःचा अनैतिक संबंध एकदम तोडून टाकण्यास तो मागेपुढे पाहत आहे का? (निर्गम २०:१४; लेवीय २०:१०; अनुवाद ५:१८) अद्यापही त्याची भिरभिरी फिरणारी वाईट नजर आहे का? आपल्या व्यभिचाराचा दोष तो पत्नीवर ढकलतो का? असे असले, तर विवाहात पुन्हा भरवसा निर्माण करण्याचे प्रयत्न सफल ठरण्याची शक्यता नाही. दुसऱ्या बाजूला पाहता, त्याने आपला हा अनुचित संबंध तोडून अपराध झाल्याचे मान्य केले आणि विवाह पुन्हा एकदा सुरळीत करण्याची पूर्ण जबाबदारी स्वतःवर असल्याचे प्रदर्शित केले, तर मग एक ना एक दिवशी खरा भरवसा निर्माण होईल अशी आशा धरण्यास पत्नीला आधार मिळू शकतो.—मत्तय ५:२९.
त्याचप्रमाणे, विश्वासू सोबतीण क्षमस्वी असू शकते का? पण याचा अर्थ तिला जे तीव्र दुःख झाले ते तिने व्यक्त करू नये अथवा काहीच घडले नाही असे सोंग करावे असा होत नाही. तर, कालांतराने त्याविषयी मनात अढी न बाळगण्याचा तिने प्रयत्न करावा असा त्याचा अर्थ होतो. अशाप्रकारची क्षमा दाखवायला वेळ लागतो पण ही क्षमा विवाह पुन्हा उभारण्यास मदतीचा खंबीर आधार पुरवते.
“मलमा” काढणे
विश्वासू सोबत्याने विवाह टिकवण्याचा निर्णय घेतला असल्यास, एखादे जोडपे पुढे काय करील? वादळाने उद्ध्वस्त झालेल्या घराभोवती पडलेला मलमा जसा काढावा लागतो त्याचप्रमाणे विवाहाभोवती झालेला “मलमा” काढून टाकला पाहिजे. दोघांनीही एकमेकांना आपल्या भावना सांगितल्या तर काही प्रमाणात हे साध्य करता येऊ शकते. नीतिसूत्रे १५:२२ म्हणते: “मसलत मिळाली नाही म्हणजे बेत निष्फळ होतात.” “बेत” असा भाषांतरित केलेला इब्री शब्द जवळीकीस सूचित करतो आणि स्तोत्र ८९:७ [NW] येथे त्याचा अशाच पद्धतीने अनुवाद केला आहे. म्हणून त्यामध्ये फक्त वरवरचे भाव व्यक्त होत नाहीत तर तो प्रामाणिक आणि मनातले व्यक्त करणारा परस्परसंवाद असतो ज्यात दोघेही आपल्याला काय वाटते ते व्यक्त करतात.—नीतिसूत्रे १३:१०.
उदाहरणार्थ, काही प्रकरणात, पत्नीला आपल्या पतीकडून याबाबतीत आणखी माहिती हवी असेल. हे प्रेमप्रकरण कसे सुरू झाले? ते केव्हापासून चालत होते? त्याविषयी आणखी कोणाला माहीत आहे? या सर्व गोष्टींची चर्चा करणे जोडप्याला जड जाईल हे मान्य आहे. तथापि, भरवसा पुन्हा निर्माण करण्यासाठी ही माहिती आवश्यक आहे असे विश्वासू सोबत्याला वाटेल. असे असल्यास, अविश्वासू सोबत्याने या प्रश्नांची प्रामाणिकपणे आणि विचारपूर्वक उत्तरे द्यावीत हे उत्तम असेल. या परस्परसंवादाचा हेतू मन दुखावण्याचा नव्हे तर झालेली जखम भरून काढण्याचा आहे हे लक्षात ठेवून त्याने प्रेमळ आणि नम्र पद्धतीने सगळे काही स्पष्ट करावे. (नीतिसूत्रे १२:१८; इफिसकर ४:२५, २६) जे काही घडले त्याविषयी स्वतःच्या भावना व्यक्त करत असताना दोघांनीही तारतम्य, आत्मसंयम बाळगण्याची आणि सहानुभूतीपूर्वक ऐकून घेण्याची गरज आहे.c—नीतिसूत्रे १८:१३; १ करिंथकर ९:२५; २ पेत्र १:६.
जे यहोवाचे साक्षीदार आहेत त्यांना मंडळीच्या वडिलांची मदत घ्यावीशी वाटेल. अर्थात, ख्रिश्चनांबाबत पाहू जाता, जोडप्याच्या आणि मंडळीच्या आध्यात्मिक कल्याणाविषयी चिंता असणाऱ्या वडिलांच्या कानावर व्यभिचारासारखी गंभीर पापे तत्काळ घातली जावीत. कदाचित, वडिलांना भेटल्यावर व्यभिचारी व्यक्तीने खरा पश्चात्ताप व्यक्त केल्यामुळे त्याला मंडळीत राहू दिले असेल. अशा प्रसंगी, वडीलजन दोन्ही सोबत्यांना वरचेवर साहाय्य देऊ शकतात.—याकोब ५:१४, १५.
पुनर्स्थापना
जोडप्याने होता होईल तितका सावरण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांच्या विवाहातील महत्त्वपूर्ण बाजू पुन्हा एकदा उभारण्यास ते उत्तम स्थितीत असतील. त्याकरता महत्त्वपूर्ण परस्परसंवाद चालूच ठेवला पाहिजे. कमतरता दिसल्या तर त्यात योग्य तो सुधार केला जावा.
विशेषतः, दोषी सोबत्याला बदल करावे लागतील. असे असले तरीसुद्धा, विश्वासू सोबतीणीने विवाहातील कमजोर भाग बळकट करण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला पाहिजे. पण याचा अर्थ, व्यभिचारासाठी ती कारणीभूत आहे किंवा व्यभिचार माफ केला जाऊ शकतो असा होत नाही—कारण अशाप्रकारचे पाप करण्यास कोणतीही योग्य सबब नाही. (पडताळा उत्पत्ति ३:१२; १ योहान ५:३.) त्याचा केवळ असाच अर्थ होतो की, विवाहात कदाचित काही समस्या होत्या आणि त्या समस्या सुधारण्याची गरज होती. आता घर पुनर्स्थापित करण्याचे काम दोघांचेही आहे. दोघांचीही मूल्ये आणि संकल्प दृढ करण्याची गरज आहे का? आध्यात्मिक कार्यांकडे कानाडोळा करण्यात आला आहे का? अशा या महत्त्वपूर्ण कमतरता शोधून आवश्यक ते बदल करण्याची क्रिया, संपूर्णतः उद्ध्वस्त झालेल्या विवाहास पुनर्स्थापित करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
डागडुजी
एखाद्या भक्कम घराचीही नियमितरित्या डागडुजी करावी लागते. तर मग, पुनर्स्थापित नातेसंबंध टिकवून ठेवणे किती महत्त्वाचे आहे. वेळ सरल्यामुळे आपले नवीन निर्धार पूर्ण करण्याचा दृढनिश्चय या जोडप्याने कधीही मावळू देऊ नये. परस्परसंवाद नाहीसा होण्यासारख्या क्षुल्लक अडथळ्यांमुळे नाउमेद होण्याऐवजी त्यांनी सगळेकाही पूर्ववत करण्यासाठी तत्काळ पावले उचलावीत आणि पुढे प्रगती करत राहावी.—नीतिसूत्रे २४:१६; गलतीकर ६:९.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पती-पत्नीने आध्यात्मिक परिपाठाला सर्वात जास्त प्राधान्य द्यावे आणि या परिपाठास अथवा त्यांच्या विवाहास दुसऱ्या कार्यहालचालीनंतरचे अर्थात दुय्यम स्थान देऊ नये. स्तोत्र १२७:१ म्हणते: “परमेश्वर जर घर बांधीत नाही तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत.” त्याचप्रमाणे, येशूनेही इशारा दिला: “जो कोणी ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल; त्याने आपले घर वाळूवर बांधिले. मग पाऊस पडला, पूर आला, वाराहि सुटला, व त्या घरास लागला; तेव्हा ते पडले, अगदी कोसळून पडले.”—मत्तय ७:२४-२७.
होय, बायबल तत्त्वांचे पालन करणे कठीण आहे म्हणून हलगर्जीपणा केला, तर वैवाहिक विश्वासूपणाच्या पुढील वादळी परीक्षेत विवाह कोलमडण्याची शक्यता असेल. परंतु, पती-पत्नीने सर्व बाबतीत बायबल दर्जांचे पालन केल्यास त्यांच्या विवाहाला ईश्वराकडून आशीर्वाद मिळेल. त्याचप्रमाणे वैवाहिक विश्वासूपणा कायम ठेवण्याची प्रबळ प्रेरणा—अर्थात, विवाहाचा आरंभकर्ता, यहोवा देव यास संतुष्ट करण्याची इच्छा देखील त्यांना असेल.—मत्तय २२:३६-४०; उपदेशक ४:१२.
[तळटीपा]
a व्यभिचारी सोबत्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेण्यामागे योग्य कारणे आहेत. या बाबतीत तपशीलवार माहितीकरता, सावध राहा! (इंग्रजी) या ऑगस्ट ८, १९९५ च्या अंकातील “बायबलचा दृष्टिकोन: व्यभिचार—माफ करावा अथवा करू नये?” हा लेख पाहा.
b आम्ही अविश्वासू सोबत्याला पुल्लिंगी संबोधन वापरत आहोत. एका सर्वेक्षणानुसार विश्वासघात करण्यात पुरुषांचे प्रमाण स्त्रियांपेक्षा दुप्पट आहे. असे असले तरीसुद्धा, ख्रिस्ती पुरुष निर्दोष सोबत्याच्या जागी असल्यास येथे चर्चिण्यात आलेली तत्त्वे समानतेने लागू होतात.
c लक्ष देऊन ऐकण्याविषयी, पाहा सावध राहा! (इंग्रजी), जानेवारी २२, १९९४, पृष्ठ ६-९, आणि डिसेंबर ८, १९९४, पृष्ठे १०-१३.