“देवाने जे जोडलं आहे” त्याचा आदर करा
“देवाने जे जोडलं आहे, ते कोणत्याही मनुष्याने वेगळं करू नये.”—मार्क १०:९.
१, २. इब्री लोकांना १३:४ हे वचन आपल्याला काय करण्याचं उत्तेजन देतं?
आपल्या सर्वांचीच इच्छा आहे की आपण यहोवाचा आदर करावा. आपला आदर मिळवण्यास तो पात्र आहे. तसंच, त्याने असंही वचन दिलं आहे की जर आपण त्याचा आदर केला तर तोही आपला आदर करेल. (१ शमु. २:३०; नीति. ३:९; प्रकटी. ४:११) यहोवाची इच्छा आहे की आपण इतर मानवांचाही जसं की सरकारी अधिकाऱ्यांचा आदर करावा. (रोम. १२:१०; १३:७) पण जीवनातील एक असा पैलू आहे ज्यात आपल्याला खासकरून आदर दाखवण्याची गरज आहे. तो म्हणजे विवाह.
२ प्रेषित पौलने म्हटलं: “विवाहबंधनाचा सर्वांनी आदर करावा, आणि अंथरूण निर्दोष असावे.” (इब्री १३:४) या वचनात पौल फक्त एक सर्वसाधारण विधान करत नव्हता, तर तो ख्रिश्चनांना विवाहाचा आदर करण्याचं, म्हणजेच त्याला मौल्यवान लेखण्याचं उत्तेजन देत होता. तुम्हीदेखील विवाहाला त्याच दृष्टिकोनातून पाहता का? खासकरून जर तुम्ही विवाहित असाल तर तुमचा दृष्टिकोनही पौलसारखाच आहे का?
३. येशूने विवाहाबद्दल कोणता महत्त्वपूर्ण सल्ला दिला? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)
३ तुम्ही जर विवाहाला मौल्यवान लेखत असाल, तर तुम्ही एका खूप चांगल्या व्यक्तीच्या उदाहरणाचं अनुकरण करत आहात. येशूने स्वतः विवाहाचा आदर केला. परूशी लोकांनी त्याला घटस्फोटाबद्दल विचारलं तेव्हा त्याने सर्वात पहिल्या विवाहाबद्दल यहोवाने जे म्हटलं त्याचा उल्लेख केला: “पुरुष आपल्या आईवडिलांना सोडेल, आणि तो व त्याची पत्नी एकदेह होतील.” मग येशूने म्हटलं: “देवाने जे जोडलं आहे, ते कोणत्याही मनुष्याने वेगळं करू नये.”—मार्क १०:२-१२ वाचा; उत्प. २:२४.
४. विवाहासाठी यहोवाचा उद्देश काय होता?
४ येशूने हे मान्य केलं की यहोवाने विवाहाची व्यवस्था केली आणि विवाह कायमस्वरूपी असला पाहिजे. यहोवाने पहिलं लग्न लावून दिलं तेव्हा त्याने आदाम-हव्वाला असं मुळीच सांगितलं नव्हतं की पुढे जाऊन ते घटस्फोट घेऊ शकतात. याउलट देवाचा उद्देश होता की ते दोघं विवाहबंधनात नेहमीकरता राहावेत.
विवाह व्यवस्थेत तात्पुरते बदल
५. मृत्यूचा विवाहावर कसा प्रभाव पडला?
५ आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आदामने पाप केलं तेव्हा बऱ्याच गोष्टी बदलल्या. त्यांपैकी एक बदल म्हणजे मानवांचा मृत्यू होऊ लागला आणि त्याचा प्रभाव विवाहावरही पडला. प्रेषित पौलने ख्रिश्चनांना सांगितलं की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याचं विवाहबंधन तुटतं आणि तिचा जोडीदार परत लग्न करू शकतो.—रोम. ७:१-३.
६. नियमशास्त्रातून आपल्याला विवाहाबद्दल यहोवाचा दृष्टिकोन कसा समजतो?
६ देवाने इस्राएल राष्ट्राला जे नियमशास्त्र दिलं त्यात विवाहाबद्दल काही नियम दिले होते. उदाहरणार्थ, इस्राएली पुरुषांना एकापेक्षा जास्त लग्न करायची परवानगी होती. ही प्रथा यहोवाने त्यांना नियमशास्त्र देण्याआधीपासूनच चालत आली होती. पण, नियमशास्त्रामुळे स्त्रीयांचं आणि मुलांचं गैरवागणूकीपासून संरक्षण झालं. उदाहरणार्थ, एखाद्या इस्राएली पुरुषाने एका दासीसोबत लग्न केलं आणि नंतर जरी त्याने दुसऱ्या स्त्रीशी लग्न केलं, तरी पहिल्या पत्नीच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी अजूनही त्याच्यावरच होती. त्याने तिचा सांभाळ आणि संरक्षण करावं अशी यहोवाची इच्छा होती. (निर्ग. २१:९, १०) हे खरं आहे की आज आपण नियमशास्त्राच्या अधीन नाही. पण त्या नियमांवरून आपल्याला समजतं की यहोवाच्या नजरेत विवाह खूप मौल्यवान होता. यामुळे आपल्याला विवाहाचा आदर करण्याचं उत्तेजन मिळतं.
७, ८. (क) अनुवाद २४:१ या वचनानुसार नियमशास्त्रात घटस्फोटाबद्दल काय सांगितलं होतं? (ख) घटस्फोटाबद्दल यहोवाचा दृष्टिकोन काय आहे?
७ नियमशास्त्रात घटस्फोटाबद्दल काय सांगितलं होतं? यहोवाची मुळात कधीच इच्छा नव्हती की एका पती-पत्नीने घटस्फोट घ्यावा. पण नियमशास्त्रात असं सांगितलं होतं की जर एका पुरुषाला आपल्या पत्नीची “वागणूक अनुचित” वाटली तर तो तिला घटस्फोट देऊ शकतो. (अनुवाद २४:१ वाचा.) “अनुचित वागणूक” यामध्ये कोणत्या गोष्टी सामील आहेत हे नियमशास्त्रात सांगण्यात आलं नव्हतं. पण हे नक्कीच क्षुल्लक चुकांना सूचित करत नसून, खूप लाजिरवाण्या वागणुकीला किंवा एखाद्या गंभीर पापाला सूचित करत असावं. (अनु. २३:१४) पण दुःखाची गोष्ट म्हणजे येशूच्या काळापर्यंत बरेच यहुदी लोक “कोणत्याही कारणाने आपल्या पत्नीला घटस्फोट” देत होते. (मत्त. १९:३) अशा प्रकारची मनोवृत्ती आपण कधीही बाळगू नये.
८ संदेष्टा मलाखीच्या दिवसांत घटस्फोट देणं खूप सर्वसामान्य झालं होतं. बरेच पुरुष खोट्या देवांची उपासना करणाऱ्या तरुण स्त्रीयांशी लग्न करण्यासाठी आपल्या पत्नीला घटस्फोट देत होते. पण त्याबद्दल यहोवाला कसं वाटलं हे त्याने स्पष्ट शब्दांत सांगितलं. त्याने म्हटलं: “मला सूटपत्राचा [घटस्फोटाचा, NW] तिटकारा आहे.” (मला. २:१४-१६) विवाहाबद्दल यहोवाने सृष्टीच्या सुरुवातीला असं म्हटलं होतं की पुरुष “आपल्या स्त्रीशी जडून राहील; ती दोघे एकदेह होतील.” (उत्प. २:२४) आणि मलाखीच्या दिवसांतही यहोवाचा दृष्टिकोन बदलला नव्हता. येशूने यहोवाच्या दृष्टिकोनाला दुजोरा देत असं म्हटलं: “देवाने जे जोडलं आहे, ते कोणत्याही मनुष्याने वेगळं करू नये.”—मत्त. १९:६.
घटस्फोटाचं एकमेव कारण
९. मार्क १०:११, १२ या वचनातील शब्दांचा काय अर्थ होतो?
९ काही जणांच्या मनात प्रश्न येऊ शकतो की, ‘घटस्फोट घेऊन पुन्हा लग्न करण्यासाठी ख्रिश्चनांकडे काही शास्त्रवचनीय आधार आहे का?’ येशूच्या शब्दांवर लक्ष द्या: “जो कोणी आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन दुसरीशी लग्न करतो तो तिच्याविरुद्ध व्यभिचार करतो, आणि जर एखाद्या स्त्रीने आपल्या पतीला घटस्फोट देऊन दुसऱ्याशी लग्न केलं, तर तीही व्यभिचार करते.” (मार्क १०:११, १२; लूक १६:१८) येशूच्या शब्दांवरून स्पष्ट होतं की तो विवाहाचा आदर करायचा आणि इतरांनीही तसं करावं अशी त्याची इच्छा होती. जर एका पुरुषाने आपल्या विश्वासू पत्नीला घटस्फोट देऊन पुन्हा लग्न केलं, तर तो व्यभिचार करत आहे असा त्याचा अर्थ होईल. हीच गोष्ट एका स्त्रीच्या बाबतीतही खरी आहे. जर तिने आपल्या विश्वासू पतीला घटस्फोट दिला आणि दुसरं लग्न केलं तर तीदेखील व्यभिचार करत आहे असा त्याचा अर्थ होईल. याचं कारण म्हणजे फक्त घटस्फोट घेतल्यामुळे विवाहबंधन तुटत नाही. देवाच्या नजरेत ते दोघं अजूनही विवाहित आहेत आणि तो त्यांना “एकदेह” समजतो. येशूने असंदेखील म्हटलं की जर एका पुरुषाने आपल्या निर्दोष पत्नीला घटस्फोट दिला तर तिच्या हातून व्यभिचार होऊ शकतो. येशूने असं का म्हटलं? कारण त्या काळात घटस्फोट झालेल्या एका स्त्रीला असं वाटणं स्वाभाविक होतं, की आर्थिक आधार मिळवण्यासाठी तिला पुन्हा लग्न करणं गरजेचं आहे. आणि जर त्या स्त्रीने लग्न केलं तर त्यालादेखील व्यभिचार समजलं जायचं.
१०. घटस्फोट घेण्याचं आणि पुन्हा लग्न करण्याचं एकमेव कारण कोणतं आहे?
१० येशूने सांगितलं की घटस्फोट घेण्याचं फक्त एकच कारण असू शकतं. त्याने म्हटलं: “मी तर तुम्हाला सांगतो, की जो कोणी अनैतिक लैंगिक कृत्यांशिवाय इतर कोणत्याही कारणामुळे आपल्या पत्नीला घटस्फोट देतो आणि दुसऱ्या स्त्रीशी लग्न करतो, तो व्यभिचार करतो.” (मत्त. १९:९) डोंगरावरील प्रवचनात येशूने हाच मुद्दा सांगितला होता. (मत्त. ५:३१, ३२) दोन्ही ठिकाणी येशूने “अनैतिक लैंगिक” कृत्यं असा उल्लेख केला. यात अनेक गंभीर पाप येऊ शकतात जसं की व्यभिचार, वेश्याव्यवसाय, अविवाहित लोकांमधील लैंगिक संबंध, समलैंगिकता आणि प्राण्यांसोबत शरीरसंबंध ठेवणं. जर एखाद्या पुरुषाने अनैतिक लैंगिक कृत्य केलं तर त्याला घटस्फोट द्यायचा की नाही हे त्याची पत्नी ठरवू शकते. जर तिने त्याला घटस्फोट द्यायचा निर्णय घेतला, तर इथून पुढे यहोवा त्यांना विवाहित समजणार नाही.
११. जोडीदाराने अनैतिक लैंगिक कृत्य केलं असलं तरी निर्दोष जोडीदार कोणत्या कारणांमुळे त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेऊ शकतो?
११ येशूने असं नाही म्हटलं, की जर एखाद्या विवाहित व्यक्तीने अनैतिक लैंगिक कृत्य केलं, तर तिच्या जोडीदाराने तिला घटस्फोट दिलाच पाहिजे. उदाहरणार्थ, पतीने अनैतिक लैंगिक कृत्य केलं असलं, तरी एक पत्नी त्याच्यासोबत राहण्याची निवड करू शकते. असं का? कदाचित तिचं अजूनही त्याच्यावर प्रेम असेल आणि ती त्याला माफ करायला तयार असेल. तसंच ती विचार करू शकते की ते दोघे मिळून त्यांचं विवाहबंधन मजबूत करतील. तसंच, जर तिने घटस्फोट घेतला आणि पुन्हा लग्न केलं नाही तर तिला काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. जसं की, तिच्या भौतिक आणि शारीरिक गरजांबद्दल काय? तिला एकटेपणा जाणवेल का? घटस्फोट घेतल्यामुळे तिच्या मुलांवर कसा परिणाम होईल? असं केल्यामुळे मुलांना सत्यात वाढवणं तिला आणखी कठीण जाईल का? (१ करिंथ. ७:१४) यावरून हे स्पष्ट आहे की जर निर्दोष जोडीदाराने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला तर त्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल.
१२, १३. (क) होशेयच्या विवाहात काय घडलं? (ख) होशेयने गोमरला परत का स्वीकारलं आणि त्यांच्या उदाहरणावरून आपण विवाहाबद्दल काय शिकतो?
१२ संदेष्टा होशेयच्या उदाहरणावरूनही आपल्याला देवाचा विवाहाबद्दलचा दृष्टिकोन समजतो. यहोवाने होशेयला गोमर नावाच्या स्त्रीसोबत लग्न करायला सांगितलं. ही स्त्री पुढे जाऊन व्यभिचार करणार होती आणि तिला “जारकर्माची मुले” होणार होती. गोमर आणि होशेय यांना एक मुलगा झाला. (होशे. १:२, ३) नंतर, गोमरला एक मुलगी आणि आणखी एक मुलगा झाला, पण ही दोघंही तिला दुसऱ्या पुरुषापासून झाली असं दिसून येतं. गोमरने अनेक वेळा व्यभिचार केला, तरीदेखील होशेयने आपला विवाह मोडला नाही. कालांतराने तिने होशेयला सोडून दिलं आणि ती दुसऱ्या पुरुषाची दासी बनली. पण असं असूनही होशेय तिला परत घरी घेऊन आला. (होशे. ३:१, २) यहोवाला होशेयच्या उदाहरणाचा उपयोग करून हे दाखवायचं होतं की इस्राएल राष्ट्राने इतर देवांची उपासना करून त्याच्यासोबत अनेक वेळा विश्वासघात केला असला, तरी त्याने त्यांना माफ केलं. होशेयच्या जीवनातून आपण विवाहाबद्दल काय शिकू शकतो?
१३ एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीने अनैतिक लैंगिक कृत्य केलं, तर तिच्यासोबत राहायचं की नाही हा निर्णय तिचा निर्दोष जोडीदार घेऊ शकतो. येशूने म्हटलं की घटस्फोट घेण्याचं हे शास्त्रीय कारण आहे आणि मग तो निर्दोष जोडीदार पुन्हा विवाह करू शकतो. पण, जर त्या निर्दोष जोडीदाराने आपल्या सोबत्याला माफ करण्याचा निर्णय घेतला तर ते चुकीचं ठरणार नाही. होशेयने गोमरला पुन्हा स्वीकारलं. घरी परतल्यावर होशेयने तिला सांगितलं की तिने कोणत्याही पुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवू नये आणि तिला म्हटलं की काही काळासाठी “मी पण तुझ्याशी संबंध ठेवणार नाही.” (होशे. ३:३, मराठी कॉमन लँग्वेज) पण कालांतराने होशेयने त्याच्या पत्नीसोबत संबंध नक्कीच ठेवले असतील. हे या गोष्टीला दर्शवणार होतं की यहोवा इस्राएली लोकांना माफ करून त्यांच्यासोबत पुन्हा एक जवळचं नातं जोडायला तयार होता. (होशे. १:११; ३:३-५) यावरून आज आपण विवाहाबद्दल काय शिकतो? समजा एका ख्रिस्ती व्यक्तीने व्यभिचार केला आहे. पण याबद्दल माहीत असूनही जर तिच्या निर्दोष जोडीदाराने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले, तर याचा अर्थ होईल की त्याने तिला माफ केलं आहे. (१ करिंथ. ७:३, ५) यानंतर घटस्फोट घेण्यासाठी निर्दोष जोडीदाराजवळ कोणतंही शास्त्रीय कारण उरणार नाही. त्या जोडप्याने सोबत मिळून आपला विवाह मजबूत करावा आणि विवाहाबद्दल देवाचा दृष्टिकोन बाळगण्यास एकमेकांना मदत करावी.
गंभीर समस्या असतानाही विवाह व्यवस्थेचा आदर करा
१४. काही विवाहात १ करिंथकर ७:१०, ११ या वचनानुसार काय होऊ शकतं?
१४ यहोवा आणि येशू यांच्यासारखंच सर्व ख्रिश्चनांनी विवाहाचा आदर केला पाहिजे. पण आपण सर्व अपरिपूर्ण असल्यामुळे काही जणांना हे करणं कधीकधी कठीण जाऊ शकतं. (रोम. ७:१८-२३) यामुळेच आपण जेव्हा पहिल्या शतकातील काही ख्रिस्ती जोडप्यांच्या विवाहात असलेल्या गंभीर समस्यांबद्दल वाचतो, तेव्हा आपल्याला आश्चर्य होत नाही. पौलने सल्ला दिला की “पत्नीने आपल्या पतीपासून वेगळे होऊ नये.” पण काही लोकांना हा सल्ला पाळणं जमलं नाही.—१ करिंथकर ७:१०, ११ वाचा.
ख्रिस्ती जोडपं आपला विवाह तुटण्यापासून कसं वाचवू शकतं? (परिच्छेद १५ पाहा)
१५, १६. (क) विवाहात समस्या असल्या तरी जोडप्याने काय करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि का? (ख) जोडीदार सत्यात नसला तरी हे तत्त्व कसं लागू होतं?
१५ पहिल्या शतकातील ही जोडपी कोणत्या कारणांमुळे विभक्त झाली हे पौलने सांगितलं नाही. पण आपल्याला हे माहीत आहे की याचं कारण अनैतिक लैंगिक कृत्य नव्हतं. कारण जर असं असतं तर त्या स्त्रीजवळ घटस्फोट घेऊन पुन्हा लग्न करण्याचं शास्त्रीय कारण असतं. पौलने म्हटलं की जर एक पत्नी आपल्या पतीपासून विभक्त होत असेल, तर “तिने एकतर अविवाहित राहावे, किंवा मग आपल्या पतीसोबत समेट करावा.” याचा अर्थ यहोवाच्या नजरेत ते अजूनही पती-पत्नी होते. पौलने म्हटलं की जर जोडप्यांमध्ये काही मतभेद किंवा समस्या असल्या आणि त्याचं कारण अनैतिक लैंगिक कृत्य नसलं, तर त्यांचा उद्देश समेट करण्याचा असला पाहिजे. म्हणजेच त्या समस्या आणि मतभेद सोडवून त्यांनी एकत्र राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज अशी जोडपी मंडळीतील वडिलांची मदत घेऊ शकतात. वडील कोणाचीही बाजू न घेता, बायबलमधून त्यांना व्यावहारिक सल्ला देतील.
१६ पण एका ख्रिस्ती व्यक्तीचा जोडीदार सत्यात नसला तेव्हा काय? जर त्यांच्या विवाहात समस्या असल्या तर ते विभक्त होऊ शकतात का? आपण आधी पाहिलं की घटस्फोट घेण्यासाठी फक्त एकच शास्त्रवचनीय आधार आहे आणि तो म्हणजे अनैतिक लैंगिक कृत्य. पण एक व्यक्ती कोणत्या परिस्थितींमध्ये विभक्त होऊ शकते हे बायबलमध्ये सांगण्यात आलेलं नाही. पौलने फक्त इतकं म्हटलं: “जर एखाद्या स्त्रीचा पती विश्वासात नसेल, पण तिच्यासोबत राहण्यास तयार असेल, तर तिने आपल्या पतीला सोडू नये.” (१ करिंथ. ७:१२, १३) हा सल्ला आजदेखील लागू होतो.
१७, १८. विवाहात गंभीर समस्या असूनही काही ख्रिश्चनांनी आपल्या जोडीदारासोबतच राहण्याचा निर्णय का घेतला?
१७ पण काही परिस्थितींमध्ये असं घडलं आहे की “विश्वासात” नसलेल्या पतीने आपल्या शब्दांतून किंवा कार्यांतून दाखवून दिलं आहे की तो “तिच्यासोबत राहण्यास तयार” नाही. उदाहरणार्थ, तो कदाचित तिला खूप मारहाण करत असेल, आणि याची तीव्रता कदाचित इतकी असेल की तिच्या आरोग्याला किंवा जीवाला धोका आहे असं तिला वाटत असेल. तो कदाचित कुटुंबाच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यास नकार देत असेल, किंवा कदाचित तिला देवाची सेवा करण्यापासून पूर्णपणे रोखत असेल. अशा परिस्थितींमध्ये एक ख्रिस्ती बहीण असा विचार करू शकते की तिचा पती “तिच्यासोबत राहण्यास तयार” नाही आणि यामुळे ती विभक्त होण्याचा निर्णय स्वतः घेऊ शकते. मग तिच्या पतीने स्पष्टपणे असं बोलून दाखवलं नसलं तरी ती असा निर्णय घेऊ शकते. पण अशाच परिस्थितींमध्ये असलेल्या काही ख्रिश्चनांनी आपल्या जोडीदारासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी बरंच काही सहन केलं आहे आणि आपला विवाह मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यांनी असा निर्णय का घेतला?
१८ अशी परिस्थिती असल्यामुळे जरी एखादं जोडपं विभक्त झालं, तरी यहोवाच्या नजरेत ते विवाहितच असेल. पण आधी उल्लेख केलेल्या समस्यांना त्यांना सामोरं जावं लागेल. समस्या असूनही जोडप्यांनी एकत्र का राहावं याचं आणखी एक कारण प्रेषित पौलने सांगितलं. त्याने म्हटलं: “विश्वासात नसलेला पती, आपल्या पत्नीशी झालेल्या विवाहामुळे पवित्र ठरतो आणि विश्वासात नसलेली पत्नी, आपल्या पतीशी झालेल्या विवाहामुळे पवित्र ठरते; नाहीतर तुमची मुले अशुद्ध ठरली असती, पण आता ती पवित्र आहेत.” (१ करिंथ. ७:१४) बऱ्याच ख्रिश्चनांनी कठीण परिस्थितीतही सत्यात नसलेल्या आपल्या जोडीदारासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. काहींच्या बाबतीत तर त्यांच्या जोडीदाराने पुढे जाऊन सत्य स्वीकारलं. त्यांनी आपला विवाह टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला याचा त्यांना किती आनंद झाला असेल याची आपण कल्पना करू शकतो.—१ करिंथकर ७:१६ वाचा; १ पेत्र ३:१, २.
१९. ख्रिस्ती मंडळीमध्ये कोणत्या कारणामुळे आपल्याला आनंदी जोडपी पाहायला मिळतात?
१९ येशूने घटस्फोटाविषयी सल्ला दिला आणि प्रेषित पौलने विभक्त होण्याचा निर्णय घेण्याआधी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात याबद्दल सांगितलं. देवाच्या सेवकांनी विवाहाचा आदर करावा अशी त्या दोघांची इच्छा होती. आज जगभरात अशी अनेक ख्रिस्ती जोडपी आहेत ज्यांनी आपला विवाह यशस्वी बनवला आहे. तुमच्या मंडळीतही अनेक आनंदी जोडपी असतील. त्यांच्या वैवाहिक जीवनात विश्वासू पती आपल्या पत्नीवर मनापासून प्रेम करतात आणि प्रेमळ पत्नी आपल्या पतीचा आदर करतात. ही सर्व जोडपी आपल्या जीवनातून दाखवतात की विवाहाचा आदर करणं शक्य आहे. आज आपल्याला हे पाहून खूप आनंद होतो की लाखो जोडपी देवाच्या पुढील शब्दांना खरं ठरवत आहेत: “या कारणामुळे, पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील.”—इफिस. ५:३१, ३३.