न्यूझीलंडचे इवलेशे दीप्तिवाहक
न्यूझीलंडमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून
सगळीकडे गर्द अंधार पसरलेला होता—चंद्राचा कुठंच ठावठिकाणा नव्हता आणि आकाश अगदी निरभ्र होतं. छावणीतले दिवे गेले तेव्हा आम्हाला असं वाटलं जणू आम्ही लुकलुकणाऱ्या ताऱ्यांच्याच विश्वात आहोत. एका खिंडीच्या तळाशी असलेल्या ऊष्ण पाण्याच्या तलावाकडे आम्ही उतरून गेलो. या ऊष्ण पाण्याच्या दोन्ही कडेला वृक्षवल्ली तरारून वाढली होती. आम्ही पाण्यात उतरलो आणि दिवसभराच्या प्रवासाचा थकवा घालवला. निसर्गतः गरम पाण्याचा झरा असलेला हा तलाव, रात्री मुक्काम केलेल्या आमच्या मोटार छावणीजवळ होता.
मला आकाशात एक तारा वेगानं पुढं जाताना दिसला. मी माझ्या पत्नीला ते सांगायला म्हणून गेलो आणि तेवढ्यात माझा तोल गेला आणि मी पाण्यात धपकन् पडलो. अचानक कित्येक तारे विझले—होय, अक्षरशः गुडुपच झाले; हे पाहून मला आश्चर्यच वाटलं! आणि मी आश्चर्यानं बोलायला गेलो, तर एक संपूर्ण तारकापुंजच नाहीसा झाला. जणू मी आकाशाला बीळच पाडलं होतं!
नेमकं काय झालं असावं असा विचार करत असतानाच, एक एक करून हे तारे पुन्हा दृश्य झाले आणि मग मला दिसलं की, एक तारकापुंज तर बाकीच्या सगळ्या ताऱ्यांपेक्षा माझ्या अगदी जवळ होता. काही तर, माझ्या हातालाच लागत होते. आम्ही आयुष्यात पहिल्यांदा, न्यूझीलंडमधील हे सोनकिडे पाहिले होते. आमच्यावरती असलेल्या वृक्षवेलींच्या अदृश्य भीतींवरून हे सोनकिडे लोंबकळत होते, आणि त्यांचा हा मृदु प्रकाश तारकामय पार्श्वभूमीत बेमालूम मिसळून गेला होता.
न्यूझीलंडचा सोनकिडा, अळी नसून एक कीटक आहे. जगातील इतर भागांतल्या सोनकिड्यांपासून आणि काजव्यांपासून हा वेगळा आहे. अरॅक्नोकॅम्पा ल्युमिनोसा या त्याच्या नावावरून तो एखादा दीप्तिमान कोळी असावा असं तुम्हाला वाटलं असावं. पण तसंही नाही.
त्यानंतर लगेचच, न्यूझीलंडच्या उत्तर बेटांवरील वायटोमो गुहांमध्ये आम्हाला दुसऱ्यांदा हे सोनकिडे पाहायला मिळाले. या सोनकिड्यांच्या भुयारातील आमच्या प्रवासाचं वर्णन मी तुम्हाला सांगतो; हे बारीक किडे पाहायला आम्ही बोटीत बसून गेलो.
वायटोमो भुयार
सोनकिड्याची गुहा एक अद्भुत ठिकाण आहे; तिथं, कित्येक हजारो वर्षांमध्ये तयार झालेल्या चुनखडीच्या झुंबरांची आणि चुनखडीच्या स्तंभांची भव्य कलाकृती प्रदर्शित करण्याकरता रोशनाई केली होती. प्रत्येक भागात आल्यावर आमचा मार्गदर्शक दिवे लावायचा आणि ते विलक्षण आकार आणि बोगदे पाहून आम्ही स्तिमित व्हायचो—पाताळातलं हे अद्भुत गोष्टींचं अनपेक्षित आणि अलौकिक जग होतं. अंधःकारात उतरणाऱ्या पायऱ्यांच्या वरती आम्ही एकत्र जमलो तेव्हा आमच्या पावलांचा घुमणारा आवाज अतिशय भयाण वाटत होता. आम्हाला काही वेळानं अंधारात दिसू लागलं तेव्हा, एकदम उंचावर हिरवा प्रकाश लुकलुकत असलेला आमच्या नजरेस पडला. हेच ते सोनकिडे!
आम्ही एका धक्क्यावर आलो आणि बोटीत चढलो. धक्क्यापासून दूर, आम्ही अंधारात पुढं जाऊ लागलो. मग, आम्ही एका कोपऱ्यात आलो, तेव्हा संपूर्ण मंदाकिनीचं लहानसं रूप ज्याला म्हणता येईल असंच दृश्य आम्हाला दिसलं—गुहेचं संपूर्ण छत सोनकिड्यांनी लदबदलं होतं. लेखक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी या ठिकाणाला “जगातले आठवे आश्चर्य” असं संबोधलं.
हा विलक्षण सोनकिडा
आमचा प्रवास संपल्यावर, सोनकिड्याबद्दल कुतूहल वाटल्यामुळं त्याच्याविषयी आणखीन जाणून घ्यावं असं आम्हाला वाटलं. आणि आम्हाला त्याविषयी मिळालेली माहिती त्या पाहिलेल्या दृश्याइतकीच आकर्षक होती. न्यूझीलंडमधील या सोनकिड्याच्या जीवनाची सुरवात होते बारीकशा डिंभाच्या रूपात; तेव्हापासूनच त्याचा प्रकाश चालू असतो. हा सोनकिडा आपल्या तोंडामधील वेगळ्या ग्रंथींच्या साहाय्याने श्लेष्म आणि रेशीमचा एक झोपाळा करून गुहेच्या छतावर तो चिकटवतो. हा झोपाळा खरं म्हणजे एक लंबगोलाकाराचे कोशावरण असतं ज्यात हे डिंभ हालचाल करू शकतं.
सोनकिड्याला जिवंत राहण्यासाठी अन्नाची गरज असते, म्हणून सहा ते नऊ महिन्यांपर्यंत तो मच्छीमारी करतो. त्याचं हे भक्ष्य पाण्यातून येत असलं, तरी हवेत पकडलं जातं. या अत्यावश्यक झऱ्यातून मिज, मच्छर, स्टोन फ्लाय आणि मे फ्लाय असे हे कीटक येतात जे प्रकाशाकडे आकर्षित होतात. त्यांना अडकवण्यासाठी हा सोनकिडा आपल्या झोपाळ्यातून रेशमाचे धागे (कधीकधी तर ७० धागे सुद्धा) सोडतो. या प्रत्येक धाग्यावर ओळीनं श्लेष्माचे चिकट थेंब असतात, म्हणून हे धागे खाली लटकणाऱ्या लहान मोत्यांच्या माळांसारखे दिसतात.
हा सोनकिडा, ज्या प्रकारे हे जाळे प्रकाशतो तो भाग सर्वात विलक्षण आहे. न्यूझीलंडमधील हा सोनकिडा, चेता संस्थेशी ज्यांचा प्रकाश जोडलेला नाही त्या गटातील कीटकांपैकी एक आहे. पण तरीही आपल्या मर्जीनुसार तो हा प्रकाश बंद करू शकतो. हा प्रकाश अवयव, उत्सर्जक नलिकांच्या बुडाशी असतो आणि डिंभाच्या श्वसन संस्थेचा काही भाग परावर्तक म्हणून काम करून प्रकाश खालच्या बाजूला परावर्तित केला जातो. प्रकाश निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेले ऑक्सिजन किंवा रसायने रोखून हा सोनकिडा प्रकाश बंद करतो.
परंतु, सोनकिड्याच्या कोशावरणाच्या शेवटी दिसणारा प्रकाश, भक्ष्य किड्यासाठी आशेचा किरण नसतो. तो किडा या घातक पडद्यात उडत जातो आणि तिथं हळूहळू एका रसायनामुळं तो बेशुद्ध होतो असं म्हटलं जातं. धडपडणाऱ्या भक्ष्याचं कंपन जाणवल्यावर हे डिंभ आपला जीव धोक्यात घालून झोपाळ्यातून बाहेर डोकावतो आणि शरीराच्या आकुंचनाच्या साहाय्याने तो धागा तोंडात खेचून घेतो.
सहा ते नऊ महिने मच्छीमारी केल्यानंतर, आता डिंभ कोशावरणातून बाहेर येऊन प्रौढ कीटकाच्या जीवनाचा आनंद घेतो. पण, हा प्रौढ किडा खरंच जीवनाचा आनंद घेतो का याबद्दल शंकाच वाटते. हा प्रौढ किडा फक्त दोन किंवा तीन दिवस जिवंत राहतो कारण त्याला मुख नसल्यामुळं तो काहीच खाऊ शकत नाही. त्याचा उर्वरित काळ तो प्रजोत्पादन करण्यात घालवतो. प्रौढ नर किडे कोशावरणातून निघताच मादी किड्यांचे फलन करतात. मादीला एकएक करून आपली अंडी घालायला एक संपूर्ण दिवस लागतो आणि त्यानंतर ती मरून जाते. अशाप्रकारे, मानवांना अमर्याद सुख देणाऱ्या चमकत्या आकाशगंगेच्या निर्मितीला हातभार लावून न्यूझीलंडच्या इवल्याशा दीप्तिवाहकाचे १० ते ११ महिन्यांचे जीवनचक्र संपुष्टात येते.
[१७ पानांवरील चित्र]
बाजूचे पान: सोनकिड्याच्या भुयारात प्रवेश करताना
[१७ पानांवरील चित्र]
वरती: सोनकिड्यांनी प्रकाशमय झालेल्या भुयाराचं छत
[१७ पानांवरील चित्र]
उजवीकडे: सोनकिड्याचं जाळं
[१६ पानांवरील चित्राचे श्रेय]
पृष्ठे १६-१७ वरील चित्रे: Waitomo Caves Museum Society Inc.