गर्भपात—व “जीवनाचा झरा”
आज आधुनिक तंत्राच्या साहाय्याने डॉक्टर गर्भाचे लिंग सुलभतेने निश्चित करू शकतात. पण त्या गर्भाच्या मनाचा कल कोण सांगू शकेल? एक जिवंत मानवी व्यक्ती या नात्याने त्याचे संभवनीय व्यक्तीमत्व कोण बघू शकतो? (उत्पत्ती २:७) यहोवा देव, जो “जीवनाचा झरा,” तोच केवळ पाहू शकतो. (स्तोत्रसंहिता ३६:९) यासाठी खालील शास्त्रवचनीय उदाहरणे पहा.
कुलपित्यांच्या समाज पद्धतीमधील वारशाविषयीच्या नियमांचा ज्येष्ठपुत्राच्या श्रेष्ठतेशी संबंध होता. तरीही इसहाकाची पत्नी रिबका ही जुळ्या मुलांनी गर्भवती होती तेव्हा देवाने तिला सांगितलेः “वडील धाकट्याची सेवा करील.” याकोब व एसाव यांच्या जन्माच्या बऱ्याच आधी त्यांच्या व्यक्तीमत्वाविषयी यहोवाला माहिती होती हे त्यांच्या प्रत्यक्ष जीवनमानावरुन सिद्ध झाले.—उत्पत्ती २५:२२, २३.
यानंतर अनेक शतकांनी एका देवदूताने जखऱ्या या याजकाला सांगितले की, त्याची बायको अलीशिबा हिला एक मुलगा होईल व त्याचे नाव योहान असे ठेवावे. या मुलाला बाप्तिस्मा करणारा योहान असे नंतर ओळखण्यात येऊ लागले. त्याला मसीहा येशूसाठी मार्ग तयार करण्याचा मान मिळाला. या कामासाठी मनाने लीन असण्याची गरज जरुरीची होती व ती या मुलात असल्याचे देवाने आधीच ओळखले होते.—लूक १:८-१७.
मानवी गर्भ—किती मोलाचा?
दावीद राजाने मान्य केले की, “तूच [यहोवाने] माझ्या आईच्या उदरी माझी घडण केली. . . . मी गर्भात पिंडरुपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले, आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेविले होते.”—स्तोत्रसंहिता १३९:१३-१६.
“जीवनाचा झरा” असणाऱ्या यहोवा देवाला प्रत्येक मानवी गर्भधारणा मोलाची वाटते. केवढ्या मोलाची ते मोशेच्या नियमशास्त्रात निर्गम २१:२२, २३ मध्ये स्पष्ट करण्यात आले आहेः “माणसे झोंबाझोंबी करीत असताना एखाद्या गर्भवती स्त्रीला मार लागला . . . , व प्राणघातक अपघात झाल्यास जीवाबद्दल जीव घ्यावा.”—न्यू.व.
पवित्र शास्त्राच्या काही भाषांतरांमध्ये असे भासविण्यात आले आहे की, गर्भापेक्षा त्याच्या मातेला काय झाले याला महत्त्व दिले आहे. परंतु मूळ इब्री भाषेतील मसूदा माता किंवा गर्भाला होणाऱ्या प्राणघातक अपघाताला उद्देशून आहे.
आरंभीची ख्रिस्ती विचारधारा
येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांचा पहिल्या शतकात मृत्यु झाल्यानंतर अनेक लोकांनी त्यांच्या शिकवणींचे स्पष्टीकरण केले. हे लोक, पवित्र शास्त्राच्या लेखकांप्रमाणे प्रेरित नव्हते, पण त्यांचे विवेचन या वादाविषयी समकालीन लोकांचे धार्मिक विचार प्रतिबिंबित करीत असल्यामुळे जाणून घेणे आस्थेचे आहे. त्यापैकी काही खाली दिले आहेत.
बर्णबाचे पत्र, अध्याय १९:५ (इ. स. १००-१३२ च्या सुमारास)
“गर्भपात करवून तू बाळाचा वध करू नये; तसेच त्याचा जन्म झाल्यावर देखील त्याचा नाश करू नये.”
डिडाक, किंवा बारा प्रेषितांची शिकवण (इ. स. १५० च्या सुमारास)
“जीवनाचा मार्ग हा होयः . . . गर्भातील बालकाची तू हत्या करू नये वा नवजात शिशूचा खून करू नये.”
टर्टुलियन: अपॉलॉजी, अध्याय ९:८ (इ. स. १९७ च्या सुमारास)
“पण आम्हाला खून करण्यास कायमची बंदी आहे. मानव बनण्यासाठी जोवर रक्त शोषले जात आहे तोवर उदरातील गर्भाचाही नाश करण्यास आम्हाला अनुमती नाही. बाळ जन्माला येण्यापासून रोखणे म्हणजे अपेक्षित खून होय. जन्माला आलेल्या जिवाचा नाश करणे काय किंवा त्याच्या जन्माला येण्यात अडथळा आणणे काय यात काहीही फरक पडत नाही. होऊ घातलेला मानव हा मानवच आहे.”
बेसिल: ॲम्फिलोकियस याला पत्र (इ. स. ३४७)
“जिने जाणूनबुजून गर्भाचा नाश केला तिला खुनाची शिक्षा भोगावी लागेल. गर्भ आकाराला आला होता की नव्हता याविषयी कोणताही शब्दच्छल आम्हाला मान्य नाही.”
ख्रिस्ती दृष्टीकोण
मानवी अपूर्णता वा अपघातामुळे केव्हाही अपूर्ण वाढ झालेला गर्भ बाहेर पडणे वा गर्भपात होणे घडू शकते. परंतु, केवळ नको असलेल्या मुलाचा जन्म रोखण्यासाठी मुद्दाम गर्भपात घडवणे हे वेगळे. आपण पाहिल्याप्रमाणे पवित्र शास्त्रानुसार ती जाणूनबुजून केलेली मनुष्यहत्या होय.
“पृथ्वीचा व तिच्या उपजाचा फैलाव करणारा, तिच्यावरील लोकांत प्राण घालणारा व तिच्यावर संचार करणाऱ्यांस जीवन देणारा” कोण आहे? तो कोणी माणूस नव्हे तर सर्वांच्या जीवनाचा झरा, यहोवा देव होय. (यशया ४२:५) आपल्या संततीला जीवन देण्याची आपली देवप्रणीत क्षमता हा एक मोलाचा अधिकार आहे. इतर सर्व बाबींप्रमाणे त्यासाठी देखील “आपणातील प्रत्येक जण आपापल्या संबंधी [देवाला] हिशेब देईल.”—रोमकर १४:१२. (g87 4/8)
[पानांवरील चौकट]
आनंदी गर्भधारणा
१९७३ मध्ये वॉचटावर मासिकाने गर्भपाताविषयी पवित्र शास्त्राच्या दृष्टीकोणाची चर्चा करणारा एक लहान लेख प्रसिद्ध केला होता. दोन तरुण विद्यार्थ्यांनी तो वाचला. यामधील मुलगी गर्भवती होती. तिचे व बाळाच्या पित्याचे गर्भपात करून घेण्याबद्दल एकमत झाले होते. पण या लेखाने त्यांना विचार करायला लावले. याचा परिणाम त्यांनी बाळ होऊ द्यायचे ठरविले.
त्या माणसाला नुकतीच यहोवाच्या साक्षीदारांनी भेट दिली. तो म्हणालाः “तुमच्या पवित्र शास्त्र साहित्याविषयी मला पराकाष्ठेचा आदर आहे. त्या परखड लेखामुळेच आज माझी बायको व मी एका १३ वर्षांच्या लोभसवाण्या मुलीचे पालक आहोत!”
पवित्र शास्त्राच्या मार्गाचे अवलंबन त्यांना नक्कीच फायद्याचे ठरले.
[पानांवरील चित्राचे श्रेय]
H. Armstrong Roberts