बाप्तिस्मा आम्हास कसे वाचवितो?
“बाप्तिस्मा . . . आम्हास वाचवीत आहे.”—१ पेत्र ३:२१, द एम्फॅटिक डायग्लॉट.
१, २. कोणा व्यक्तीने बाप्तिस्मा घेण्याआधी कशाची पूर्ति करणे जरुरीचे आहे?
तारणाचा शोध घेणाऱ्यांना यहोवाने काही विशिष्ट गरजा ठेवलेल्या आहेत. यांनी अचूक ज्ञानाची प्राप्ती केली पाहिजे, विश्वास राखला पाहिजे, आपल्या पापांविषयी पश्चाताप केला पाहिजे, रुपांतर करवून घेतले पाहिजे, देवाला आपले समपर्ण केले पाहिजे आणि विश्वासधारक या नात्याने बाप्तिस्मा घेतला पहिजे. (योहान ३:१६; १७:३; प्रे. कृत्ये ३:१९; १८:८) बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवारांनी अगदी जाहीरपणे हे वक्तव्य करण्यास हवे की येशूच्या अर्पणाच्या आधारावर त्यांनी आपल्या पापाविषयीचा पश्चाताप केला आहे आणि यहोवाला स्वतःचे समर्पण केले आहे. याशिवाय, समर्पण व बाप्तिस्मा या गोष्टी त्याची यहोवाचा साक्षीदार अशी ओळख देतात हेही त्याने समजून घेण्यास हवे.
२ बाप्तिस्म्याविषयी असणारी सर्व व्यवस्था आणि आपल्या विश्वासाचे जाहीर वक्तव्य तारणासाठी जरुरीचे आहे. (रोमकर १०:१०) प्रेषित पेत्राने जेव्हा, “बाप्तिस्मा . . . आम्हास वाचवीत आहे” असे लिहिले तेव्हा याची पुष्टी मिळाली. (१ पेत्र ३:२१, एम्फॅटिक डायग्लॉट) पण या शब्दांचा आम्ही कसा अर्थ घ्यावा? संदर्भ काय दाखवितो?
बाप्तिस्मा कसा वाचवितो
३. पहिले पेत्र ३:१८-२१ चा सारांश तुम्ही तुमच्या शब्दात कसा सांगाल?
३ पेत्राने स्पष्ट केले की, येशूने पुनरुत्थानानंतर आत्मिक व्यक्ती या नात्याने बंदीशाळेतील दुष्ट आत्म्यांना म्हणजे यहोवाच्या मोठ्या दिवसाकरता राखून ठेवण्यात आलेल्या दुरात्म्यांना धिक्काराचा संदेश दिला. या दुरात्म्यांनी “पूर्वी नोहाच्या दिवसात तारू तयार होत असता देव सहन करीत वाट पाहत होता त्यावेळी . . . त्याची आज्ञा अवमानली,” म्हणजे रुपांतरित शरीरे धारण करुन स्त्रियांसोबत विवाह संपादिले. त्या तारवात “केवळ आठ जण [नोहा, त्याची बायको, त्याचे पुत्र व त्यांच्या बायका] पाण्यातून वाचविण्यात आले.” पेत्र पुढे म्हणतोः “त्याच्या लाक्षणिक अर्थाने आता बाप्तिस्मा (म्हणजे, केवळ देहाचा मळ धुऊन टाकणे नव्हे, तर चांगला विवेकभाव मिळविण्यासाठी देवाकडे विनंति करणे) येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे तुमचे तारण करीत आहे.”—१ पेत्र ३:१८-२१; उत्पत्ती ६:१, २; २ पेत्र २:४; २ करिंथकर ७:१.
४. “त्याच्या लाक्षणिक अर्थाने” असे म्हणण्यात पेत्र कशाला उद्देशून बोलत होता?
४ “त्याच्या लाक्षणिक अर्थाने” असे पेत्राने म्हटले त्याचा काय अर्थ होत होता? त्याचा हा अर्थ होता की, विश्वासावर आधारलेला बाप्तिस्मा हा, ज्यांना प्रलयाच्या पाण्यातून वाचविण्यात आले त्या नोहा व त्याच्या कुटुंबाच्या संरक्षणाशी जुळता आहे. तारवाच्या बाहेर असणाऱ्यांचा प्रलयामध्ये नाश झाला. ते तारु बांधण्यासाठी नोहाठायी विश्वास असणे जसे जरुरीचे होते, त्याचप्रमाणे, जे येशू ख्रिस्ताचे शिष्य आणि यहोवाचे साक्षीदार होतात त्यांच्याठायी देखील या अभक्त जगाकडून व याचा देव दियाबल सैतान याच्याकडून जे दबाव आणण्यात येतील त्यात टिकून राहण्यासाठी विश्वासाची गरज आहे.—इब्रीयांस ११:६, ७; १ योहान ५:१९.
५. “येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे” तारण होते हे कसे?
५ बाप्तिस्मा मुळात वाचूव शकत नाही. जरी आम्ही ‘देहाचा मळ धुऊन टाकला पाहिजे’ तरी ती गोष्ट आम्हाला वाचवू शकत नाही. उलटपक्षी, “येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे” तारण शक्य आहे. बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवारांनी हा विश्वास ठेवण्यास हवा की, देवाच्या पुत्राने यज्ञार्पित मरण सहन केले व त्याचे पुनरुत्थान करण्यात आले यामुळेच तारण आता शक्य झाले आहे. यासोबत, येशू हा त्यांचा प्रभु असून त्याला जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करण्याचा अधिकार देण्यात आला आहे याचाही त्यांनी स्वीकार केला पाहिजे. येशू ख्रिस्त स्वर्गात गेला व “तो . . . आता देवाच्या उजवीकडे आहे,” असे पेत्र म्हणाला, “आणि त्याच्या स्वाधीन देवदूत, अधिकारी व सत्ताधीश हे ठेवले आहेत,” असेही तो पुढे म्हणतो.—१ पेत्र ३:२२.
६. चांगला विवेकभाव मिळविण्यासाठी बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवाराने आधीच काय केलेले असण्यास हवे?
६ पेत्राने बाप्तिस्म्याचा संबंध “चांगला विवेकभाव मिळविण्यासाठी देवाला विनंति करणे” याच्याशी सुद्धा जोडला. चांगला विवेकभाव मिळविण्यासाठी बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवाराने आपल्या पापांविषयी पश्चाताप केला पाहिजे, चुकीच्या मार्गाक्रमणापासून मागे वळाले पाहिजे आणि प्रार्थनेच्या माध्यमाने देवाला येशू ख्रिस्ताच्या द्वारे बिनशर्त असे समर्पण केले पाहिजे. बाप्तिस्मा घेतलेला व्यक्ती देवाच्या दर्जानुरुप स्वतःला राखण्याकरवी तो चांगला विवेकभाव जतन करतो तर मग तो अशा सुरक्षित स्थितीत येतो जेथे यहोवाचा प्रतिकूल न्यायदंड लागू होत नाही.
बाप्तिस्म्यास पात्र होणे
७. बाप्तिस्म्याबाबत पाहू जाता ख्रिस्ती धर्मराज्यातील मिशनऱ्यांनी काय केले?
७ येशूने आपल्या अनुयायांना शिष्यांचा बाप्तिस्मा करावा अशी आज्ञा दिली तेव्हा त्यांनी विधर्म्यांवर हजारोंच्या संख्येने पाणी शिंपडावे असे म्हटले नव्हते. पण ख्रिस्ती धर्मराज्यातील मिशनऱ्यांनी कोणते काम केले? भारताच्या बाबतीत १५४५ मध्ये जेसुईट फ्रान्सीस झेवियर यांनी लिहिलेः “त्रावणकोर राज्यात . . . काही महिन्यांच्या कालावधीतच मी दहा हजारांपेक्षा अधिक पुरुष, स्त्रिया व बालकांचा बाप्तिस्मा केला. . . . मी खेडोपाडी जाऊन लोकांना ख्रिस्ती केले.” हा ‘ख्रिस्ती बनविण्याचा’ येशूचा मार्ग नव्हे. लोकांना बाप्तिस्म्यासाठी स्वतःला पात्र केले पाहिजे.
८. तथाकथित असणारी पौलाची यादी बाप्तिस्म्याकरता सादर होणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत काय म्हणते?
८ प्रेषितांच्या काळानंतर ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्यांमध्येही बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत कडक धोरणे होती. अशा या उमेदवारांसाठी पवित्र शास्त्रेत्तर यादी, जी चुकीने प्रेषित पौलाने दिलेली आहे असे समजले जाते ती म्हणतेः “त्यांच्या आचारपद्धती आणि जीवनाक्रमण याविषयी चौकशी केली जावी . . . ते अविवाहित आहेत काय, तर त्यांनी व्यभिचार करता कामा नये; त्यांनी कायदेशीर विवाह करावा. . . . कोणी वेश्या येऊ पाहते तर तिने आपला बाहेरख्यालीपणा सोडून टाकला पाहिजे; नसल्यास तिचा स्वीकार करण्यात येऊ नये. कोणी मूर्त्या बनविणारा येऊ पाहतो तर त्याने आपला हा व्यवसाय सोडून द्यावा, नाहीतर त्याला त्यागावे. . . . तसेच ज्याचा उच्चार करण्याची लाज वाटते असा कोणी पापी, . . . कोणी जादूगार, मांत्रिक, ज्योतिषी, भूतविद्या करणारा, जादूचा मंत्र सांगणारा, . . . ताईत करणारा, पंचाक्षरी, भविष्य सांगणारा, दैववादी, हस्तरेषा पाहणारा . . . येऊ इच्छितो तर, यांची काही काळासाठी परिक्षा करावी . . . आणि त्यांनी आपले हे आचार सोडून दिले तरच त्यांचा स्वीकार केला जावा; पण त्यांना हे मान्य नाही तर त्यांचा धिक्कार करण्यात येवो.”
९. बाप्तिस्मा घेण्याची इच्छा दाखविणाऱ्या सोबत मंडळीतील वडील चर्चेचे वर्ग का घेतात?
९ यहोवाचे साक्षीदार, आत्ताच उल्लेखलेल्या लिखाणाचा अवलंब करीत नाहीत, पण बाप्तिस्मा घेण्याची इच्छा करणाऱ्यांच्या बाबतीत वडील चर्चासत्र अवलंबितात. ते का? ते यासाठी की, हे लोक विश्वासधारक आहेत व यांनी ईश्वरी गरजा पूर्ण केल्या असून यहोवाला स्वतःचे समर्पण केलेले आहे याची खात्री व्हावी. (प्रे. कृत्ये ४:४; १८:८; २ थेस्सलनीकाकर ३:२) ऑरगनाईझ्ड टू अकम्प्लीश आवर मिनिस्ट्री या पुस्तकातील प्रश्नांची चर्चा केल्यामुळे ती व्यक्ती बाप्तिस्मा घेण्यास पात्र आहे का ते ठरविता येते. त्याला काही मुद्यांची स्पष्टता झालेली नसल्यास अथवा त्याने ईश्वरी दर्जानुरुप स्वतःचे जीवन आणलेले नसल्यास वडील अशाला आनंदाने आध्यात्मिक सहाय्य देतात.
१०. आमची बाप्तिस्मा घेण्याची इच्छा आहे तर आमची मनोवृत्ती कशी असावी?
१० देवाचे उद्देश शिकून घेण्यास मदत मिळावी याकरता त्याने आम्हाबाबतीत जो कनवाळूपणा व्यक्त केला त्याची रसिकता बाळगल्यास आम्ही, प्रेषित पौलाने आशिया मायनरमधील अंत्युखियातील ज्या लोकांना प्रचार केला त्यांच्यासारखे असू. यहुद्यांचा विरोध होत होता तरी, “हे [देवाकरवी स्वीकारित होण्याच्या संधीविषयी] ऐकून परराष्ट्रीय [विदेशी लोक] आनंदित झाले आणि त्यांनी यहोवाच्या वचनाचा महिमा वर्णिला; तेव्हा जितके सार्वकालिक जीवनासाठी नेमलेले होते तितक्यांनी विश्वास धारण केला.” (प्रे. कृत्ये १३:४८) अशा विश्वासधारकांचा बाप्तिस्मा झाला.
युवकावस्थेतील बाप्तिस्मा
११. युवक या अर्थाने देवाला समर्पण करणे उचित आहे का, आणि तुम्ही असे का म्हणता?
११ त्या “सार्वकालिक जीवनासाठी नेमलल्या” व्यक्तींमध्ये काही युवक समाविष्ठ असावेत. हे लक्षात घ्या की, शमुवेल आणि बाप्तिस्मा करणारा योहान यांना त्यांच्या जन्माआधीच देवास सोपून देण्यात आले होते तरी आईवडीलांना आपल्या मुलांकरता समर्पण करता येत नाही. (१ शमुवेल १:११, २४-२८; २:११, १८, १९; लूक १:१५, ६६) तथापि, चांगल्या पवित्र शास्त्राच्या तालमीमुळे कित्येक तरुण लोक बाप्तिस्म्यासाठी तयार होतात. जिचा नवयौवनात बाप्तिस्मा झाला त्या मिशनरी भगिनीने लिहिलेः “जेव्हा मला निर्माणकर्ता अस्तित्वात आहे हे कळू लागले तेव्हापासूनच मी त्याची सेवा करण्यासाठी समर्पित झाले. तरीपण तो व त्याचे उद्देश याविषयीच्या उपयुक्त माहितीमुळे माझ्याठायीच्या इच्छेचे दृश्य स्वरुप या नात्याने मी बाप्तिस्मा घेण्याचे ठरविले. तरीपण मी जे काही करणार त्याविषयी माझी आई साशंक होती त्यामुळेच तिने म्हटले की, आणखी कोणाची बाप्तिस्म्यासाठी तयारी होईपर्यंत थांबून राहा.” बाप्तिस्मा घेण्याची इच्छा धरणारी आणखी एक स्त्री मिळाली तेव्हा ही भगिनी पुढे म्हणतेः “त्या काळी उमेदवारांसाठी खास सूचना देणारे असे वर्ग नव्हते; तरीपण संस्थेकरवी नियुक्त करण्यात आलेले सर्व्हीस डायरेक्टर मला, मी जे पाऊल घेणार त्याच्या गंभीरतेविषयी प्रेमळपणे बोलले. त्यांनी सांगितलेल्या सर्व शर्तींचा मी मोठ्या उत्सुकतेने स्वीकार केला आणि मे १९२१ मधील एका रविवारी लखलखीत सूर्यप्रकाशात सकाळी माझा व [त्या स्त्रीचा] बाप्तिस्मा झाला.”
१२. लहानांकरवी करण्यात येणाऱ्या समर्पणाविषयी बंधु रसेल यांनी कोणता दृष्टीकोण बाळगला होता?
१२ १९१४ मध्ये सी. टी. रसेल (त्या वेळेचे वॉचटावर सोसायटीचे अध्यक्ष) यांना एक पत्र आले, ज्यात एका समविश्वासू ख्रिस्ती बांधवाने त्यांना हे विचारले होते की, त्यांच्या १२ वर्षांच्या मुलाला, त्याने देवाला स्वतःचे समर्पण करावे असे सांगावे का. याला उत्तर देताना रसेल यांनी लिहिले की, “मी जर तुमच्या जागेवर असतो तर मुलावर स्वअर्पणाचे [समर्पण] दडपण टाकले नसते, तर ज्यांना देवाचे ज्ञान व त्याच्या भव्य उद्देशांची माहिती मिळालेली आहे त्या सर्व बुद्धीजिवी लोकांनी चोखाळण्याचा मार्ग या अर्थी ही गोष्ट मी त्याच्या मनासमोर उभी केली असती. . . . स्वअर्पणाशिवाय कोणलाही सार्वकालिक जीवन मिळणार नाही . . . स्वअर्पण केल्यामुळे तुमच्या मुलाला काही इजा पोहंचणार नाही, पण त्याची मोठी मदत केली जाईल. . . . दहा वर्षांच्या मुलाला स्वअर्पणाची पूर्ण रसिकता विचारात, शब्दात आणि कृतीत पूर्णपणे कळू शकत नाही हे कोण सांगू शकतो? मागे पाहता मला हे दिसते की, मी माझे स्वअर्पण प्रथमच बारा वर्षांच्या थोडेसे पुढे गेल्यावर केले होते.”
१३. या मासिकाने सुमारे ९४ वर्षांआधी युवकांना काय म्हटले होते?
१३ जुलै १, १८९४ च्या झायन्स वॉच टावर या मासिकाने म्हटलेः “देवास आपले अंतःकरण वाहिलेल्या आणि येशूचे अनुकरण करण्याचा दैनंदिन प्रयत्न करणाऱ्या आमच्या सर्व मुलांना व तरुणांना वॉचटावर तुम्हाला आपल्या सदिच्छा पाठवीत आहे. आम्हाला आमच्यामधील काही लेकरांची माहिती आहे ज्यांची येशूवर खूप प्रीती आहे. ही लेकरे, जे येशूवर प्रीती करीत नाहीत व त्याला संतुष्ट करीत नाहीत त्यांच्यामध्ये येशूकरता उभी राहण्यास लाजत नाहीत. यांना, त्यांच्या शाळकरी मित्रांकरवी, सुवार्ता सांगितली जाते म्हणून थट्टा मिळते व उपहास केला जातो तरी ते शूरपणे व खरेपणाने देवाच्या बाजूला आहेत. याचप्रमाणे, आम्हातील काही युवकांनी या जगाच्या इच्छा व सुखविलास यांना त्यागले आहे हे, खासपणे यात प्रभुला आपल्या जीवनाचे [समर्पण] केलेले विश्वासू युवक आहेत हे पाहण्याचा आम्हाला मोठा आनंद वाटत आहे. आमच्या कार्यालयात काम करणारे काही कर्मचारी तसेच बहुतेक यशस्वी पायनियर्स हे अद्याप वयाने तरुण आहेत.” तुम्हीही तरुण असाल तर मग, यहोवा देवाला समर्पण करण्यासंबंधाने आपल्या पालकांशी का बोलणी करु नये?
पालकांची भूमिका
१४. यहोवास समर्पण करणाऱ्या युवकांना कोणते लाभ मिळत असतात?
१४ पालकांचे मार्गदर्शन लाभून ज्यांना बाप्तिस्म्यापर्यंत निरविण्यात आले त्या मुलांना कोणते लाभ मिळाले त्यांचा विचार करा. (इफिसकर ६:४) आध्यात्मिक गोष्टींचा विचार राखल्यामुळे त्यांना जगाचे पाश व गुंतवणूक यांच्यापासून वाचण्यात मदत मिळते. (१ योहान २:१५-१७) ‘देहाची पेरणी’ केल्यामुळे ज्या दुःखद परिणामांची कापणी हाती पडते ती यांना मिळत नाही. (गलतीकर ५:२२, २३) देवास समर्पण केल्यामुळे ते त्याच्यासोबतच्या निकट नातेसंबंधाचा उपभोग घेतात. शिवाय “यहोवावर भाव ठेव”ण्याचे त्यांनी शिकून घेतले असल्यामुळे त्यांना स्वर्गीय सूज्ञानाचे मार्गदर्शन मिळते व ते सुखाच्या आणि शांतीच्या मार्गाने चालतात.—नीतीसूत्रे ३:५, ६, १३, १७.
१५. आपल्या मुलांच्या जीवनास योग्य वळण लावण्यासाठी ख्रिस्ती पालकांना काय करता येणे शक्य आहे?
१५ यहोवास केले जाणारे समर्पण हे युवकांना इतके लाभदायक असल्यामुळे ख्रिस्ती पालकांनी आपल्या मुलांच्या जीवनाला या अनुषंगाने वळण लावण्यासाठी होता होईल तितके करण्याची गरज आहे. तीमथ्याप्रमाणे या युवकांना बाळपणापासून शास्त्रवचनांचे शिक्षण दिले पाहिजे म्हणजे ‘ज्या गोष्टी ते शिकतील व ज्यांची त्यांना खात्री झालेली असेल त्या ते दृढ धरुन राहतील.’ (२ तीमथ्य ३:१४, १५) सुभक्तीने जीवन व्यतित करणाऱ्या पालकांना देवाबरोबरील आपले नातेसंबंध, अनुभव आणि प्रौढ स्वरुपाचा न्याय यांच्या योगाने आपल्या उदाहरणीय जीवनाकरवी मुलांना चांगले वातावरण देता येईल. याचे योग्य मार्गदर्शन दिल्यास युवकांवर करण्यात येणारे प्रयत्न व्यर्थ जाणार नाहीत.—नीतीसूत्रे २२:६.
१६. तुमचे उदाहरण व शिक्षण यात मुलांना काय पाहता आले पाहिजे?
१६ आपले उदाहरण व शिक्षण याकरवी आपल्या मुलांना यहोवाची संस्था व सैतानाची संस्था यात कोणता स्पष्ट फरक आहे त्याची रेषा काढून दाखवता येईल. या जगाशी कसल्याही प्रकारची हातमिळवणी करता येणार नाही, तसेच ख्रिश्चनांनी जगाचे सर्व हातचलाखीचे प्रकार, अभक्त स्वरुपाचा सुखविलास, इच्छाआकांक्षा आणि सहवास यांना धिक्कारले पाहिजे हे त्यांना दाखवून द्या. (१ करिंथकर १५:३३; २ करिंथकर ४:२) आपला मनोदय आणि स्वतःचे शिक्षण व उदारहण याकरवी मुलांना जगाचे सुखविलास किती भ्रामक आहेत तसेच यहोवाच्या साक्षीदारांच्या तुलनेत जगाचे लोक केवढे फसवे आहेत ते स्पष्टपणे पाहू द्या. देवाने आपल्या पवित्र आत्म्याकरवी तुम्हाला कसे निरविले आहे, त्रासात पडणाऱ्या मार्गापासून तुम्हाला कसे वाचविले आहे आणि कठीण व दुःखाच्या काळात त्याने तुम्हाला कसा आधार दिला याचे त्यांना विवेचन करा. आपल्या मुलांना गर्व, महत्वाकांक्षा, छचोरपणा आणि मूर्खता या जगाच्या मार्गात राहू दिले तरी ती आज ना उद्या विश्वास धारण करणारी होतीलच अशा फसव्या विचारात राहू नका. या जगाने तुमच्या मुलांना आपल्या मिठीत जखडण्याआधीच त्याच्या दुष्ट प्रभावापासून दूर राखण्यासाठी कडे उभारा आणि त्यांनी आपल्या भावना व आशा यहोवावर विसंबून ठेवण्यासाठी त्यांना मदत द्या.
बाप्तिस्म्याच्या पुढे पाहणे
१७. (अ) बाप्तिस्मा घेतलेले काही ख्रिस्ती माघारे का फिरतात? (ब) आम्ही आमच्या समर्पणाकडे कोणत्या दृष्टीने पाहिले पाहिजे?
१७ बाप्तिस्मा घेणारा वृद्ध असो की तरुण, त्याने यहोवाला विश्वासू राहिलेच पाहिजे. तर मग, काही बाप्तिस्मा घेतलेले ख्रिस्तीजन आध्यात्मिकदृष्ट्या मागे पडत असल्याचे का दिसते बरे? याला विविध कारणे असली तरी एक मात्र मूलभूत आहे व ते म्हणजे, समर्पणाचा अर्थ यांना पूर्णपणे कळालेला नसतो. आम्ही कोणा व्यवसायास आपले समर्पण करीत नसतो. तसे झाल्यास आम्ही आमच्या कामात दंग राहू, पण आध्यात्मिक व्यक्ती बनू शकणार नाही. यासाठीच आपण हे लक्षात घेतले पाहिजे की आम्ही कोणा व्यवसायास नव्हे तर एका व्यक्तीस—यहोवा देवास समर्पित आहोत. यामुळे, आमचे समर्पण हे एखादे काम सुरु करण्याआधी त्याला वाहून घेण्यासाठी करायचे असते हा चुकीचा दृष्टीकोण आम्हात राहणार नाही. समर्पण करण्याच्या बाबीकडे एका महत्वपूर्ण नातेसंबंधात स्वतःला गोवून घेत आहोत व तो नातेसंबंध सतत जोपासला गेला व सुरक्षित ठेवला जाण्यास हवा या दृष्टीने पाहिले पाहिजे. याबाबतीत येशू ख्रिस्ताचे उदाहरण लक्षनीय आहे. त्याने यहोवापुढे स्वतःला सादर केले तेव्हा त्याचे मनोगत काय होते त्याविषयी हे भविष्यवादित शब्द असे सांगतातः “पाहा मी आलो आहे, . . . हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे. तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे.”—स्तोत्रसंहिता ४०:६-८; इब्रीयांस १०:५-१०.
१८. देवाचे शास्त्र येशूच्या “अंतर्यामी” कसे होते?
१८ येशूच्या “अंतर्यामी” यहोवाचे शास्त्र कसे होते बरे? त्याने एका यहुदी परुशाला असे सांगितले होते की, यहोवा हा आमचा देव एकच देव असून त्याच्याशिवाय दुसरा कोणीही नाही व याद्वारे त्याने यहोवाच्या सार्वभौमत्वाला उंचावले होते. यानंतर, येशूने हे स्पष्ट केले की, देवाच्या नियमशास्त्राचे सार, यहोवावर आपल्या संपूर्ण अंतःकरणानिशी, समजबुद्धीने, व शक्तीने प्रीती केली पाहिजे व सोबत आपणासारखीच आपल्या शेजाऱ्यावर प्रीती दाखवली पाहिजे यात आहे. (मार्क १२:२८-३४) या मूळ कारणामुळेच येशू म्हणू शकला की, ‘देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद वाटतो.’ हे एक चांगले काम आहे या दृष्टीकोणातून नव्हे तर यहोवा देवासोबत जवळचे नातेसंबंध राखल्यामुळे तो आपल्या या मार्गाक्रमणात, कितीही मोठ्या परिक्षा आणि त्रास आला तरीही विश्वासूपणे टिकून राहू शकला. आम्हीही यहोवाचे सार्वभौमत्व मान्य केले आणि अढळ निष्ठेने त्याच्यावर प्रीती केली तर मग आम्ही आपले समर्पण व बाप्तिस्मा यांना जागल्यासारखे होईल.
१९. यहोवासोबतचा आमचा नातेसंबंध आणि आम्हाला करावयाचे काम यात कोणता संबंध आहे?
१९ अर्थातच, आमचे देवाबरोबरील नाते व आम्हाला करावयाचे काम यात थोडा संबंध आहे हे खरे. राज्य प्रचाराचे काम केल्यामुळे आपण यहोवावरील प्रीतीचे प्रदर्शन करीत असतो. याबाबतीत, यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळातील पूर्वीचे सदस्य दिवंगत ग्रांट सुटर यांनी एकदा असे लिहिलेः “यहोवाची सेवा करण्याचा हक्क आणि ती करण्याची जबाबदारी याविषयीचे [एका फिरत्या देखरेख्यांचे] भाषण ऐकताना, मी काय करावे व काय करण्याची माझी इच्छा होती ते मला समजले. यामुळेच मी माझे यहोवाला व्यक्तिगत समर्पण केले व तेव्हाच माझ्या कुटुंबातील इतर सदस्यांनीही हेच केले. मग, सॅन जोस, कॅलिफोर्निया येथे ऑक्टोबर १०, १९२६ रोजी आम्ही सर्वांनीच, यहोवाला केलेल्या समर्पणाचे द्योतक म्हणून पाण्यात बुडून बाप्तिस्मा घेतला. . . . बाप्तिस्म्यानंतर . . . माझ्या वडीलांनी बाप्तिस्म्याच्या विधिवर देखरेख ठेवणाऱ्या वडीलाला म्हटलेः ‘तुम्ही लोक प्रकाशने घेऊन जाता ना, मग आम्हाला देखील तेच काम करायचे आहे व तेही आत्ताच.’ अशाप्रकारे आमच्या कुटुंबाने क्षेत्रकार्याला सुरवात केली.” आज, बाप्तिस्म्याच्या आधीच लायक व्यक्ती क्षेत्रकार्यात अर्थभरीत सहभाग घेऊ लागतात.
बाप्तिस्मा आम्हाला वाचवितो
२०, २१. (अ) यहोवाच्या सेवकांवर कोणत्या मार्गाने “चिन्ह” करण्यात येते? (ब) हे “चिन्ह” काय आहे, व ते असणे याचा काय अर्थ होतो?
२० आमच्या कामामुळेच, आम्ही “यहोवाचे आहोत” असे दाखवू शकतो. समर्पित सेवक या नात्याने विश्वासूपणे काम करीत राहण्यावरच आमचे तारण अवलंबून आहे! (रोमकर ६:२०-२३; १४:७, ८) प्राचीन काळी सेवक किंवा दासावर कपाळी चिन्ह करीत. आज प्रचार कार्यामुळे ‘तागाचे वस्त्र घातलेला प्रतिनमुनेदार मनुष्य’—येशूच्या अभिषिक्त अनुयायांतील शेष—या व्यवस्थीकरणातून बचाव लाभणाऱ्या लोकांना “चिन्ह” करीत आहेत. या कामात अभिषिक्तांना त्यांचे सहकारी, “दुसरी मेंढरे” यांची साथ लाभत आहे. (यहेज्केल ९:१-७; योहान १०:१६) पण ते “चिन्ह” काय आहे? ते याचे दृश्य प्रमाण आहे की, आम्ही यहोवा देवास समर्पित आहोत आणि येशूचे बाप्तिस्मा घेतलेले शिष्य व त्याच्यासारखे व्यक्तीमत्व धारण केलेले लोक आहोत.
२१ आम्ही हे “चिन्ह” स्वीकारुन व ते जतन करुन ठेवण्यात आजच्या काळात नितांत गरज आहे. कारण आपण या “अंतसमयात” खूपच पुढे किंवा शेवटास आलो आहोत. (दानीएल १२:४) आमचा बचाव व्हावयाचा आहे तर मग, आमचे सद्य जीवन किंवा हे सध्याचे व्यवस्थीकरण याच्या ‘शेवटपर्यंत टिकून राहिले’ पाहिजे. (मत्तय २४:१३) अशा या पद्धतीने, आम्ही यहोवाचे साक्षीदार या नात्याने विश्वासू राहिलो तरच आमचा बाप्तिस्मा आम्हाला वाचवील.
उजळणीसाठी प्रश्न
◻ बचाव मिळविण्यासाठी आम्हाकडून कसली अपेक्षा आहे?
◻ बाप्तिस्मा घेणाची इच्छा असणाऱ्यांसोबत वडीलजन चर्चा का करतात?
◻ बाप्तिस्म्याप्रत निरविणारे आध्यात्मिक मार्गदर्शन मुलांना देण्यासाठी पालक काय करु शकतात?
◻ आम्ही कोणा व्यवसायाच्या अनुषंगाने आपले समर्पण करीत असतो का?
◻ बाप्तिस्मा आम्हाला कसा वाचवितो?
[२० पानांवरील चित्रं]
बाप्तिस्मा हा नोहा व त्याचे कुटुंब यांचा तारवाद्वारे झालेल्या बचावासोबत कसा जुळणारा आहे ते तुम्हाला माहीत आहे का?
[२२ पानांवरील चित्रं]
समर्पण व बाप्तिस्मा युवकांना लाभ देतात. कसे ते तुम्हाला ठाऊक आहे का?