“डोळ्याबद्दल डोळा” या नियमाचा काय अर्थ होता?
बायबलचं उत्तर
मोशेने प्राचीन इस्राएल राष्ट्राला दिलेल्या देवाच्या नियमशास्त्रात “डोळ्याबद्दल डोळा” हा नियम देण्यात आला होता. नंतर याच नियमाचा उल्लेख येशूने डोंगरावरच्या प्रवचनात केला. (मत्तय ५:३८, निर्गम २१:२४, २५; अनुवाद १९:२१) एखाद्या अपराधी व्यक्तीचा न्याय करताना, त्याला त्याच्या अपराधाप्रमाणेच शिक्षा देण्यात यावी असा या नियमाचा अर्थ होता.a
हा नियम जाणूनबुजून एखाद्याला इजा पोचवणाऱ्या व्यक्तीला लागू केला जायचा. मुद्दामहून एखाद्याला इजा पोचवणाऱ्या व्यक्तीबद्दल नियमशास्त्रात म्हटलं होतं: “मोडलेल्या हाडाबद्दल मोडलेलं हाड, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, याप्रमाणे त्याने जी काही दुखापत केली असेल, तीच त्यालाही केली जावी.”—लेवीय २४:२०.
“डोळ्याबद्दल डोळा” हा नियम का देण्यात आला?
“डोळ्याबद्दल डोळा” या नियमामुळे एखाद्याला कायदा हातात घ्यायची किंवा बदला घ्यायची सूट मिळत नव्हती. उलट या नियमामुळे न्यायनिवाडा करणाऱ्यांना, अपराध्याला खूप कठोर किंवा खूप साधी शिक्षा न देता त्याच्या अपराधाप्रमाणे योग्य ती शिक्षा द्यायला मदत व्हायची.
या नियमामुळे आणखी एक फायदा व्हायचा. तो म्हणजे, एखाद्याचं जाणूनबुजून नुकसान करायची किंवा त्याच्याविरुद्ध कट रचायची कोणाची हिंमत होत नव्हती. याबद्दल नियमशास्त्रात म्हटलं होतं, की “बाकीचे लोक [देवाच्या नियमांप्रमाणे न्याय होताना पाहणारे] जेव्हा याबद्दल ऐकतील, तेव्हा त्यांना भीती वाटेल आणि ते तुमच्यामध्ये पुन्हा कधीही अशी वाईट गोष्ट करणार नाहीत.”—अनुवाद १९:२०.
“डोळ्याबद्दल डोळा” हा नियम ख्रिश्चनांनाही लागू होतो का?
नाही, हा नियम ख्रिश्चनांना लागू होत नाही. कारण हा मोशेच्या नियमशास्त्राचा भाग होता आणि येशूच्या खंडणी बलिदानामुळे हे नियमशास्त्र रद्द झालं.—रोमकर १०:४.
असं असलं तरी, या नियमामुळे देव कसा विचार करतो हे आपल्याला समजतं. उदाहरणार्थ, यावरून आपल्याला कळतं, की कोणावरही अन्याय होऊ नये असं यहोवाला वाटतं. (स्तोत्र ८९:१४) शिवाय, यावरून न्याय करायचे त्याचे स्तरही समजतात. जसं की, एखाद्या अपराध्याला ‘योग्य प्रमाणात शिस्त लावली जावी’ असं त्याला वाटतं.—यिर्मया ३०:११.
“डोळ्याबद्दल डोळा” या नियमाबद्दल असलेले गैरसमज
गैरसमज: “डोळ्याबद्दल डोळा” हा नियम खूप कठोर आहे.
खरी माहिती: या नियमामुळे एखाद्याला खूप क्रूरपणे किंवा कठोरपणे शिक्षा द्यायची सूट मिळत नव्हती. उलट, हा नियम योग्यपणे लागू केला जायचा तेव्हा न्यायनिवाडा करणारी व्यक्ती, अपराध कोणत्या परिस्थितीत घडलाय आणि तो जाणूनबुजून करण्यात आलाय का हे चांगल्या प्रकारे तपासायची आणि मग शिक्षा द्यायची. (निर्गम २१:२८-३०; गणना ३५:२२-२५) त्यामुळे असं म्हणता येईल, की हा नियम एखाद्याला अतिशय कठोर शिक्षा देण्यापासून रोखायचा.
गैरसमज: “डोळ्याबद्दल डोळा” या नियमामुळे एकानंतर एक बदला घ्यायचं चक्र सुरू व्हायचं
खरी माहिती: मोशेच्या नियमशास्त्रात स्पष्टपणे सांगितलं होतं, की “तू बदला घेऊ नकोस किंवा आपल्या भाऊबंदांबद्दल मनात राग बाळगू नकोस.” (लेवीय १९:१८) त्यामुळे असं म्हणता येईल, की हा नियम वैयक्तिकपणे बदला घ्यायला प्रोत्साहन देत नव्हता. उलट, यामुळे लोकांना देवावर आणि चूक सुधारण्यासाठी त्याने दिलेल्या कायदेशीर तरतुदींवर विश्वास ठेवायला प्रोत्साहन मिळायचं.—अनुवाद ३२:३५.
a या न्यायीक तत्त्वाला कधीकधी लेक्स टॅलिओनिस या लॅटिन शब्दानेसुद्धा ओळखलं जातं. प्राचीन काळातल्या काही संस्कृतींच्या कायदेशीर व्यवस्थेमध्येसुद्धा या तत्त्वाचा समावेश असल्याचं दिसून येतं.