यहोवा कोण आहे?
बायबलचं उत्तर
बायबलमध्ये सांगितलंय, की ‘यहोवा’ हा खरा देव आहे आणि त्यानेच सगळं काही निर्माण केलंय. (प्रकटीकरण ४:११) येशूसारखंच अब्राहाम आणि मोशे या संदेष्ट्यांनीसुद्धा यहोवाची उपासना केली. (उत्पत्ती २४:२७; निर्गम १५:१, २; योहान २०:१७) तो फक्त एका राष्ट्राचा नाही, तर “सबंध पृथ्वीचा” देव आहे.—स्तोत्र ४७:२.
बायबल सांगतं, की देवाला एक विशिष्ट नाव आहे; ते म्हणजे यहोवा. (निर्गम ३:१५; स्तोत्र ८३:१८) हे नाव, “होणे” असा अर्थ असलेल्या एका हिब्रू क्रियापदातून आलंय. बऱ्याच विद्वानांचं असं म्हणणं आहे, की देवाच्या नावाचा अर्थ “तो व्हायला लावतो” असा होतो. हा अर्थ अगदी योग्यच आहे. कारण यहोवा निर्माणकर्ता आणि त्याचा उद्देश पूर्ण करणारा देव आहे. (यशया ५५:१०, ११) बायबल आपल्याला देवाच्या नावासोबतच त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलही माहिती देतं. ते सांगतं, की प्रेम हा त्याचा प्रमुख गुण आहे.—निर्गम ३४:५-७; लूक ६:३५; १ योहान ४:८.
प्राचीन हिब्रू भाषेत देवाचं नाव लिहिण्यासाठी יהוה (य-ह-व-ह) ही चार अक्षरं वापरण्यात आली आहेत. हिब्रू भाषेत देवाच्या नावाचा नेमका उच्चार कसा केला जायचा हे माहीत नाही. पण बऱ्याच मराठी भाषेतल्या बायबलमध्ये देवाच्या नावाचा उच्चार सहसा “यहोवा” असा केला जातो. जसं की पंडिता रमाबाई भाषांतर. इंग्रजी भाषेत देवाच्या नावाचा उच्चार “जेहोवा” असा केला जातो. देवाचं नाव पहिल्यांदा १५३० मध्ये विल्यम टिंडेल यांच्या भाषांतरात पाहायला मिळतं.a
प्राचीन हिब्रू भाषेत देवाच्या नावाचा नेमका उच्चार कसा केला जायचा हे का सांगता येत नाही?
प्राचीन हिब्रू भाषेत लिहिताना फक्त व्यंजनं वापरली जायची. त्यात स्वर नसायचे. कोणत्या ठिकाणी कोणता स्वर वापरून वाचायचं हे एका हिब्रू वाचकाला चांगलं माहीत असायचं. पण हिब्रू शास्त्रवचनांचं (“जुन्या कराराचं”) लिखाण झाल्यावर काही यहुदी असं मानू लागले, की देवाच्या नावाचा उच्चार करणं चुकीचं आहे. हा खरंतर एक अंधविश्वास होता. त्यामुळे ते जेव्हा एखादं शास्त्रवचन मोठ्याने वाचायचे, तेव्हा जिथे देवाचं नाव यायचं तिथे ते “प्रभू” किंवा “देव” असे शब्द वापरून वाचायचे. मग बरीच शतकं उलटून गेली आणि हा अंधविश्वास पसरत गेला. त्यामुळे काळाच्या ओघात लोक देवाच्या नावाचा मूळ उच्चार विसरून गेले.b
काहींचं असं म्हणणं आहे की देवाच्या नावाचा उच्चार “याव्हे” असा केला जायचा, तर इतर काहींचं म्हणणं आहे की ते वेगळ्या प्रकारे उच्चारलं जायचं. ग्रीक भाषेत अनुवाद केलेल्या लेवीय पुस्तकाचा एक भाग मृत समुद्राजवळ सापडला. त्यात देवाचं नाव याओ असं दिलंय. सुरुवातीच्या काही ग्रीक लेखकांनीसुद्धा म्हटलं, की देवाच्या नावाचा उच्चार याए, याबे आणि याऊवे असा असावा. पण यांपैकी कोणता उच्चार प्राचीन हिब्रू भाषेत वापरला जायचा हे नक्की सांगता येत नाही.c
देवाच्या नावाबद्दल असलेले काही गैरसमज
गैरसमज: ज्या भाषांतरांत “यहोवा” हे नाव पाहायला मिळतं ते भाषांतरकारांनी स्वतः त्यात टाकलंय.
खरी माहिती: मूळ हिब्रू भाषेत, देवाचं चार अक्षरी नाव יהוה (य-ह-व-ह) जवळजवळ ७,००० वेळा वापरण्यात आलंय.d पण बायबलच्या बऱ्याच भाषांतरकारांनी आपल्या भाषांतरांतून देवाचं नाव काढून टाकलंय आणि त्याऐवजी “प्रभू” किंवा “देव” यांसारखे शब्द वापरले आहेत.
गैरसमज: सर्वशक्तिमान देवाला एखाद्या विशिष्ट नावाची गरज नाही.
खरी माहिती: देवाने स्वतः बायबलच्या लेखकांना हजारो वेळा त्याचं नाव लिहायची प्रेरणा दिली. तसंच, त्याच्या उपासकांनी त्याचं नाव वापरावं अशीही त्याची इच्छा आहे. (यशया ४२:८; योएल २:३२; मलाखी ३:१६; रोमकर १०:१३) इतकंच नाही, तर ज्या खोट्या संदेष्ट्यांनी लोकांना त्याचं नाव विसरायला लावायचा प्रयत्न केला त्यांना देवाने फटकारलं.—यिर्मया २३:२७.
गैरसमज: आपण यहुदी परंपरेचं पालन केलं पाहिजे आणि बायबलमधून देवाचं नाव काढून टाकलं पाहिजे.
खरी माहिती: हे खरंय, की बायबलच्या प्रती तयार करणारे काही यहुदी शास्त्री देवाचं नाव घेत नव्हते. पण बायबलच्या प्रतींमधून मात्र त्यांनी देवाचं नाव काढून टाकलं नाही. आपण मात्र देवाच्या आज्ञांच्या विरोधात असलेल्या कोणत्याही मानवी परंपरांचं आपण पालन करू नये अशी देवाची इच्छा आहे.—मत्तय १५:१-३.
गैरसमज: हिब्रू भाषेत देवाच्या नावाचा उच्चार कसा केला जायचा हे आपल्याला माहीत नाही. त्यामुळे आपण देवाचं नाव घेतलं नाही पाहिजे.
खरी माहिती: काहींना असं वाटतं, की आपण कोणतीही भाषा बोलत असलो, तरी देवाच्या नावाचा एकाच प्रकारे उच्चार करावा अशी देवाची इच्छा आहे. पण बायबलमधून आपल्याला समजतं, की प्राचीन काळात वेगवेगळ्या भाषा बोलणारे देवाचे उपासक एखाद्याच्या नावाचा उच्चार वेगवेगळ्या पद्धतीने करायचे.
इस्राएलमध्ये न्यायाधीश म्हणून सेवा करणाऱ्या यहोशवाचंच उदाहरण घ्या. हिब्रू भाषा बोलणाऱ्या पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांनी त्याच्या नावाचा उच्चार येहोशूआ असा केला असावा. तर ग्रीक भाषा बोलणाऱ्यांनी त्याच्या नावाचा उच्चार ईसुअस असा केला असावा. बायबलमध्ये यहोशवाचं हिब्रू भाषेतलं नाव ग्रीक भाषेतही वापरलं आहे. यावरून कळतं, की त्या काळातले ख्रिस्ती एखाद्याच्या नावाचा उच्चार त्यांच्या मातृभाषेत सहसा जसा व्हायचा तसाच करायचे.—प्रेषितांची कार्यं ७:४५; इब्री लोकांना ४:८.
हेच तत्त्व देवाच्या नावाचं भाषांतर करण्याच्या बाबतीत लागू केलं जाऊ शकतं. देवाच्या नावाचा नेमका उच्चार कसा केला पाहिजे, यापेक्षा बायबलमध्ये जिथे-जिथे देवाचं नाव आलं पाहिजे तिथे-तिथे ते असणं जास्त महत्त्वाचं आहे.
a विल्यम टिंडेल यांनी, बायबलच्या पहिल्या पाच पुस्तकांच्या भाषांतरात देवाच्या नावाचा उल्लेख “येहुआ” असा केला. काही काळाने इंग्रजी भाषेत बदल झाला आणि देवाच्या नावासाठी आधुनिक शब्द-लेखन वापरलं गेलं. उदाहरणार्थ, १६१२ मध्ये हेन्री आईन्सवर्थ यांनी स्तोत्रं या पुस्तकाच्या भाषांतरात सगळीकडे “येहोवा” हा उच्चार वापरला. मग १६३९ मध्ये जेव्हा या पुस्तकाची सुधारित आवृत्ती प्रकाशित करण्यात आली, तेव्हा त्यात “जेहोवा” हा उच्चार वापरला गेला. पुढे १९०१ मध्ये, अमेरिकन स्टॅन्डर्ड व्हर्शन हे बायबल तयार करणाऱ्या भाषांतरकारांनी, हिब्रू लिखाणांत जिथे-जिथे देवाचं नाव आलं आहे तिथे-तिथे “जेहोवा” हा उच्चार वापरला.
b द न्यू कॅथोलिक एन्सायक्लोपिडिया, दुसरी आवृत्ती, खंड १४, पान ८८३-८८४ मध्ये असं म्हटलंय: “यहुदी लोक बाबेलच्या बंदिवासातून परत आल्याच्या काही काळानंतर ‘याव्हे’ या नावाला विशेष आदर दिला जाऊ लागला. म्हणून त्या नावाच्या जागी अदोनाय (म्हणजे प्रभू) किंवा इलोहीम (म्हणजे देव) हे शब्द वापरायची प्रथा सुरू झाली.”
c जास्त माहितीसाठी नवे जग भाषांतर यातला अतिरिक्त लेख क४, “हिब्रू शास्त्रवचनांत देवाचं नाव” पाहा.
d थिओलॉजिकल लेक्झिकन ऑफ दी ओल्ड टेस्टामेंट, खंड २, पान ५२३-५२४ पाहा.