यहोवाच्या साक्षीदारांचं नियमन मंडळ कसं काम करतं?
नियमन मंडळ, प्रौढ आणि अनुभवी ख्रिस्ती बांधवांचा एक लहान गट आहे. हे बांधव जगभरातल्या यहोवाच्या साक्षीदारांना मार्गदर्शन पुरवतात. ते दोन महत्त्वाची कामं पाहतात:
यहोवाच्या साक्षीदारांची प्रकाशनं, सभा आणि प्रशाला यांद्वारे बायबलवर आधारित मार्गदर्शन देण्याच्या कामावर ते देखरेख करतात.—लूक १२:४२.
ते जगभरात यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रचारकार्याचं मार्गदर्शन करतात. तसंच, मिळालेल्या दानाचा कसा वापर केला जावा याबद्दल निर्णय घेतात.
पहिल्या शतकात ‘यरुशलेममध्ये’ असलेले “प्रेषित आणि वडील” संपूर्ण ख्रिस्ती मंडळीच्या वतीने निर्णय घ्यायचे. आज यहोवाच्या साक्षीदारांचं नियमन मंडळसुद्धा त्याच प्रकारे कार्य करतं. (प्रेषितांची कार्यं १५:२) त्या विश्वासू प्रेषितांप्रमाणे आणि वडिलांप्रमाणेच, नियमन मंडळाचे सदस्यसुद्धा साक्षीदारांच्या संघटनेचे पुढारी नाहीत. यहोवा देवाने येशू ख्रिस्ताला मंडळीचं मस्तक म्हणून नियुक्त केलंय ही गोष्ट ते ओळखतात आणि कोणताही निर्णय घेताना बायबलचं मार्गदर्शन घेतात.—१ करिंथकर ११:३; इफिसकर ५:२३.
नियमन मंडळातले सदस्य कोण आहेत?
नियमन मंडळात असलेल्या बांधवांची नावं: केनेथ कुक, गेज फ्लिगल, सॅम्युएल हर्ड, जेफ्री जॅक्सन, जॉडी जेडली, स्टीफन लेट्, गेरिट लॉश, जेकब रम्फ, मार्क सँडरसन, डेविड स्प्लेन, आणि जेफ्री विंडर. ते अमेरिकेतल्या वॉरविकमध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयात सेवा करतात.
नियमन मंडळाचं काम कसं चालतं?
नियमन मंडळाने वेगवेगळ्या जबाबदाऱ्या हाताळण्यासाठी सहा समित्या तयार केल्या आहेत. नियमन मंडळातला प्रत्येक बांधव यांपैकी एक किंवा त्यापेक्षा जास्त समित्यांमध्ये सेवा करतो.
संयोजक समिती: ही समिती कायद्याशी संबंधित गोष्टींची देखरेख करते. तसंच, नैसर्गिक विपत्ती आणि दुर्घटना होतात किंवा यहोवाच्या साक्षीदारांचा त्यांच्या धार्मिक विश्वासांमुळे छळ होतो किंवा साक्षीदारांशी संबंधित इतर कोणतीही आणीबाणीची परिस्थिती निर्माण होते, तेव्हा ही समिती आवश्यक ती मदत पुरवण्यात पुढाकार घेते.
सभासद समिती: ही समिती बेथेल कुटुंबातल्या सदस्यांच्या गरजा पूर्ण करण्याचं काम पाहते.
प्रकाशन समिती: ही समिती बायबल आधारित साहित्य तयार करण्याच्या आणि ते वितरित करण्याच्या कामावर देखरेख करते. तसंच सभागृहांच्या, भाषांतर कार्यालयांच्या आणि शाखा कार्यालयांच्या बांधकामावरही ही समिती देखरेख करते.
सेवा समिती: ही समिती ‘राज्याचा आनंदाचा संदेश’ जगभरात घोषित करण्याच्या कामावर देखरेख करते.—मत्तय २४:१४.
शिक्षण समिती: ही समिती सभा, प्रशाला आणि ऑडियो-विडियो कार्यक्रमांमधून दिल्या जाणाऱ्या आध्यात्मिक शिक्षणाचं साहित्य तयार करण्याच्या कामावर देखरेख करते.
लेखन समिती: ही समिती छापील साहित्य आणि वेबसाईट यातून दिलं जाणारं आध्यात्मिक मार्गदर्शन तयार करण्याच्या कामावर तसंच भाषांतराच्या कामावरही देखरेख करते.
या समित्यांमध्ये काम करण्यासोबतच, नियमन मंडळ संघटनेच्या गरजांबद्दल चर्चा करण्यासाठी दर आठवडी एकत्र येतं. या सभांमध्ये ते बायबल काय सांगतं यावर चर्चा करतात आणि देवाच्या पवित्र शक्तीच्या मार्गदर्शनाप्रमाणे एकमताने निर्णय घेतात.—प्रेषितांची कार्यं १५:२५.
नियमन मंडळाचे सहायक कोण आहेत?
हे नियमन मंडळाच्या समित्यांना मदत करणारे भरवशालायक ख्रिस्ती बांधव आहेत. (१ करिंथकर ४:२) त्यांना ज्या समितीत नियुक्त करण्यात येतं, त्या समितीला नेमलेलं काम करण्यासाठी लागणारं कौशल्य आणि अनुभव त्यांच्याकडे असतो. दर आठवडी होणाऱ्या समितीच्या सभेला ते उपस्थित राहतात. ते स्वतः कोणताही निर्णय घेत नाहीत. पण ते त्यांचा अनमोल सल्ला आणि आवश्यक माहिती पुरवतात. तसंच, समितीने घेतलेले निर्णय ते लागू करतात आणि कामाच्या प्रगतीवर लक्ष ठेवतात. काही वेळा त्यांना जगातल्या वेगवेगळ्या भागांत भाऊबहिणींना भेट देण्यासाठी, तसंच वार्षिक सभा किंवा गिलियड ग्रॅजुएशन यांसारख्या कार्यक्रमांमध्ये भाग हाताळण्यासाठी नियमन मंडळाद्वारे नियुक्त केलं जातं.
समिती |
नाव |
|---|---|
संयोजक समिती |
|
सभासद समिती |
|
प्रकाशन समिती |
|
सेवा समिती |
|
शिक्षण समिती |
|
लेखन समिती |
|