तरुण लोक विचारतात
इतर जण माझ्याबद्दल माझ्यामागे बोलत असतील तर मी काय करू?
वाईट का वाटतं?
मागे बोललेल्या काही गोष्टींमुळे खूप नुकसान होतं. जसं की, आपली बदनामी करण्यासाठी मुद्दामहून बोललेलं खोटं. गोष्ट इतकी गंभीर नसली तरी त्यामुळे वाईट वाटू शकतं; खासकरून जेव्हा ती जीवाभावाच्या वाटणाऱ्या व्यक्तीने तुमच्याबद्दल बोलली असते तेव्हा.—स्तोत्र ५५:१२-१४.
“मला कळलं की माझी मैत्रीण माझ्यामागे बोलत होती. ती म्हणत होती की मला दुसऱ्यांची अजिबात पर्वा नाही. खूप वाईट वाटलं मला! माझ्याबद्दल ती असं कसं बोलू शकते, हे मला समजलंच नाही.”—ॲशली.
सत्य: आपल्याबद्दल अफवा पसरवणारी व्यक्ती आपली जवळची असो किंवा नसो, इतर जण आपल्याबद्दल वाईट बोलत आहेत हे कळल्यावर वाईटच वाटतं.
वाईट बातमी—तुम्ही ते नेहमीच टाळू शकत नाही
लोक बऱ्याच कारणांमुळे आपल्याबद्दल बोलत असतात. त्यांपैकी काही म्हणजे:
मनापासून असलेली काळजी. माणसांना मिळून-मिसळून राहायला आवडतं. त्यामुळे साहजिकच आपण एकमेकांशी बोलतो आणि एकमेकांबद्दल बोलतो. खरंतर, बायबलसुद्धा आपल्याला काही प्रमाणात लोकांमध्ये आवड घ्यायचं प्रोत्साहन देतं.—फिलिप्पैकर २:४.
“एकमेकांबद्दल बोलणं हा नेहमीच लोकांच्या आवडीचा विषय ठरलाय.”—बियांका.
“लोकांच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेणं आणि त्याबद्दल इतरांशी बोलणं मला आवडतं. माहीत नाही का, पण आवडतं!”—कॅटी.
रिकामा वेळ. जुन्या काळात काही लोक “नेहमी काहीतरी नवीन सांगण्यात किंवा ऐकण्यात आपला वेळ घालवायचे; हाच त्यांचा उद्योग होता.” (प्रेषितांची कार्यं १७:२१) आजसुद्धा असंच होतं!
“जीवनात काहीच खास चाललेलं नसलं, की लोक स्वतःच काहीतरी विचित्र प्रकार करतात. आणि मग त्यांना बोलायला एक विषय मिळतो!”—जोएना.
कमीपणाची भावना. बायबल सांगतं की आपण दुसऱ्यांसोबत स्वतःची तुलना करू नये आणि ते बरोबरच आहे. (गलतीकर ६:४) कारण तुलना केल्यामुळे आपल्यात कमीपणाची भावना येते. पण दुःखाची गोष्ट म्हणजे, या भावनेवर मात करण्यासाठी काही लोक इतरांबद्दल खोट्या अफवा पसरवतात.
“खोट्या अफवा पसरवणारे जे बोलतात, त्यावरून त्यांच्याबद्दल खूप काही कळतं. सहसा ज्या लोकांबद्दल ते अफवा पसरवतात, त्यांच्याबद्दल त्यांच्या मनात कुठेतरी हेवा असतो. आपण समोरच्यांपेक्षा कसे भारी आहोत हे स्वतःलाच पटवून देण्यासाठी ते अफवा पसरवतात.”—फिल.
सत्य: तुम्हाला आवडो की ना आवडो, लोक एकमेकांविषयी बोलतील; ते तुमच्याविषयीही बोलतील.
चांगली बातमी—यामुळे तुमचं आयुष्य थांबत नाही
तुमच्यामागे बोललेल्या गोष्टी पूर्णपणे टाळणं तुमच्या हातात नसलं, तरी त्याला कसा प्रतिसाद द्यायचा हे मात्र तुमच्या हातात असतं. आजूबाजूला तुमच्याबद्दल खुसूरपुसूर चालली आहे हे तुमच्या लक्षात येतं, तेव्हा तुमच्याकडे दोन पर्याय असतात.
पर्याय १: दुर्लक्ष करा. सहसा सर्वात चांगला उपाय म्हणजे आपल्याबद्दल ऐकण्यात आलेल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणं; खासकरून ती क्षुल्लक असेल तर. अशा वेळी बायबलचा सल्ला लागू करा. ते म्हणतं: “लगेच रागावू नकोस.”—उपदेशक ७:९.
“एकदा तर माझ्याबद्दल अशी अफवा पसरलेली, की मी ज्या मुलाला कधीच भेटले नाही त्याला डेट करतेए. ती खरी नव्हती, त्यामुळे मी ती हसण्यावारी नेली.”—ॲलिझ.
“अफवांविरुद्ध लढायचं म्हटलं, तर चांगलं नावं असण्यासारखं दुसरं हत्यार नाही. लोकांमध्ये तुमचं चांगलं नाव असेल, तर तुमच्याबद्दल पसरवलेल्या अफवांवर फार कमी लोक विश्वास ठेवतील. कारण शेवटी सत्याचाच विजय होतो.”—ॲलिसन.
टीप: (१) तुमच्याबद्दल काय म्हटलं गेलं आणि (२) त्यामुळे तुम्हाला कसं वाटलं ते लिहून काढा. एकदा का तुम्ही त्याबद्दल आपल्या “मनाशी विचार” केला, की तुम्हाला त्याकडे दुर्लक्ष करायला सोपं जाईल.—स्तोत्र ४:४.
पर्याय २: ज्याने तुमच्याबद्दल अफवा पसरवली आहे त्याच्याशी बोला. काही वेळा, एखादी अफवा गंभीर स्वरूपाची वाटत असल्यामुळे तुम्हाला कदाचित समोरच्याशी बोलावंच लागेल.
“तुमच्याबद्दल अफवा पसरवणाऱ्यांशी तुम्ही जेव्हा बोलता, तेव्हा त्यांना कळून चुकतं की तुम्हाला त्याबद्दल कळलंय. सोबतच, तुम्हाला त्या गोष्टीची शहानिशाही करता येते आणि समस्याही सोडवता येऊ शकते.”—ॲलिझ.
जे तुमच्यामागे बोलले त्यांच्याशी बोलण्याआधी खाली दिलेल्या बायबल तत्त्वांवर विचार करा आणि त्यासोबतचे प्रश्नही स्वतःला विचारा.
“जो ऐकून घेण्याआधीच उत्तर देतो, त्याच्यासाठी ते मूर्खपणाचं आणि लाजिरवाणं ठरतं.” (नीतिवचनं १८:१३) ‘मी ऐकलेल्या सगळ्याच गोष्टी खऱ्या आहेत का? मी ज्याच्याकडून अफवा ऐकली आहे, त्याच्या ऐकण्यात काही गफलत झाली असेल का?’
“प्रत्येकाने ऐकायला उत्सुक आणि बोलण्यात संयमी असावं; लगेच रागावू नये.” (याकोब १:१९) ‘ज्याने अफवा पसरवली आहे त्याच्याशी लगेच बोलणं योग्य राहील का? भावनांच्या आहारी जाऊन किंवा आधीच एक मत बनवून मी त्याच्याशी बोलणार नाही, याची मला खातरी आहे का? किंवा थोडा वेळा जाऊ दिल्यावर आणि माझं मन शांत झाल्यावर त्याच्याशी बोलणं बरं राहील का?’
“ज्या गोष्टी इतरांनी आपल्यासाठी कराव्यात असं तुम्हाला वाटतं, त्या सर्व गोष्टी तुम्हीही त्यांच्यासाठी केल्या पाहिजेत.” (मत्तय ७:१२) ‘जर मी त्याच्या जागी असतो आणि तो माझ्या जागी असता, तर त्याने हे प्रकरण कसं हाताळावं अशी माझी इच्छा असती? त्याने ही चर्चा कोणत्या ठिकाणी करावी असं मला वाटलं असतं? माझ्याशी बोलताना त्याने कोणते शब्द वापरावेत आणि कसं बोलावं अशी माझी अपेक्षा असती?’
टीप: ज्याने अफवा पसरवली आहे त्याच्याशी बोलण्याआधी तुम्ही काय बोलणार आहात हे लिहून काढा. मग एक-दोन आठवडे थांबा, लिहिलेल्या गोष्टी पुन्हा वाचा आणि त्यात काही फेरबदल करायचे असतील, तर तेही लक्षात घ्या. तसंच, याबद्दल तुमच्या आईवडिलांना किंवा प्रौढ मित्राला सांगा आणि त्यांचा सल्ला घ्या.
सत्य: जीवनातल्या बऱ्याच गोष्टींवर आपलं नियंत्रण नसतं. अफवांच्या बाबतीतही तेच आहे. पण याचा अर्थ असा होत नाही, की अफवांमुळे सगळंच संपलं आणि आता तुम्ही काही करू शकत नाही!