यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीतून काढून टाकलेल्या लोकांशी यहोवाचे साक्षीदार कसं वागतात?
आम्ही सगळ्यांसोबतच प्रेमाने, दयेने आणि आदराने वागायचा पुरेपूर प्रयत्न करतो. जर यहोवाच्या साक्षीदारांपैकी एखादा उपासनेत थंड पडला किंवा त्याने ती करायची सोडून दिली, तर आम्ही त्याच्याशी बोलायला पुढाकार घेतो,a त्याला आपल्या प्रेमाची खातरी देतो आणि यहोवा देवासोबत पुन्हा नातं जोडायला मदत करतो.—लूक १५:४-७.
पण काही वेळा एखाद्या व्यक्तीच्या चुकीच्या वागण्यामुळे तिला यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीतून काढून टाकलं जाऊ शकतं. (१ करिंथकर ५:१३) असं असलं तरी, त्या व्यक्तीला मंडळीतून काढून टाकलं जाऊ नये असं आम्हाला वाटत असतं. यासाठी आम्ही तिला आधीपासून मदत करत असतो. कारण आमच्यासोबत उपासना करणाऱ्यांवर आमचं मनापासून प्रेम आहे. पण मंडळीतून जरी तिला काढून टाकावं लागलं तरी बायबल सांगतं, त्याप्रमाणे आम्ही नंतरसुद्धा तिच्याशी प्रेमाने आणि आदराने वागतो.—मार्क १२:३१; १ पेत्र २:१७.
एका व्यक्तीला कोणत्या कारणांमुळे मंडळीतून काढून टाकलं जाऊ शकतं?
बायबल स्पष्टपणे सांगतं, की जर एखाद्या यहोवाच्या साक्षीदाराने गंभीर पाप केलं आणि स्वतःमध्ये बदल केला नाही, तर त्याला मंडळीतून काढून टाकलं जावं.b (१ करिंथकर ५:११-१३) मग अशी कोणती गंभीर पापं आहेत ज्यांमुळे एखाद्याला मंडळीतून काढून टाकलं जाऊ शकतं? बायबल स्पष्टपणे सांगतं की व्यभिचार, दारुडेपणा, हत्या, कौटुंबिक हिंसाचार आणि चोरी यांसारख्या गंभीर पापांसाठी एखाद्याला मंडळीतून काढून टाकलं जाऊ शकतं.—१ करिंथकर ६:९, १०; गलतीकर ५:१९-२१; १ तीमथ्य १:९, १०.
पण गंभीर पाप केलेल्या व्यक्तीला लगेच मंडळीतून काढून टाकलं जात नाही. तिने आपल्या वागण्यात बदल करावेत म्हणून मंडळीतले वडीलc आधी तिला मदत करतात. (रोमकर २:४) ते तिच्याशी सौम्यतेने आणि प्रेमाने वागतात. (गलतीकर ६:१) यामुळे तिला तिची चूक लक्षात येऊ शकते आणि केलेल्या चुकांचा तिला पस्तावा होऊ शकतो. (२ तीमथ्य २:२४-२६) पण वारंवार मदत करायचा प्रयत्न करूनही जर ती व्यक्ती बायबलच्या विरोधात वागत असेल आणि पस्तावा करत नसेल, तर तिला मंडळीतून काढून टाकावं लागतं. मग वडील मंडळीत त्या व्यक्तीबद्दल फक्त अशी घोषणा करतात, की ‘ती आतापासून यहोवाची साक्षीदार नाही.’
पाप करणाऱ्याने बदल करावेत म्हणून वडील त्याच्यासोबत सौम्यतेने आणि प्रेमाने वागतात
पाप करणाऱ्या व्यक्तीला मंडळीतून काढून टाकल्यामुळे कोणते चांगले परिणाम दिसून येतात? एक म्हणजे, नैतिकतेबद्दल असलेले देवाचे स्तर पाळायचं मंडळीला प्रोत्साहन मिळतं आणि त्या व्यक्तीच्या वाईट प्रभावापासून मंडळी सुरक्षित राहते. (१ करिंथकर ५:६; १५:३३; १ पेत्र १:१६) तसंच, दुसरा चांगला परिणाम म्हणजे, पाप करणाऱ्या व्यक्तीला आपली वाईट कामं थांबवायची आणि बदल करायची प्रेरणा मिळते.—इब्री लोकांना १२:११.
मंडळीतून काढून टाकलेल्या लोकांशी यहोवाचे साक्षीदार कसे वागतात?
बायबल म्हणतं की ख्रिश्चनांनी मंडळीतून काढून टाकलेल्या व्यक्तीची “संगत सोडून” द्यावी. इतकंच काय तर, त्यांनी ‘तिच्यासोबत जेवायलाही बसू नये.’ (१ करिंथकर ५:११) त्यामुळे आम्ही मंडळीतून काढून टाकलेल्या व्यक्तीसोबत ऊठबस करत नाही किंवा वेळ घालवत नाही. असं असलं तरी, आम्ही तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत नाही. आम्ही तिच्याशी आदराने वागतो. ती आमच्या सभांनाही येऊ शकते. सभांमधल्या भाऊबहिणींची इच्छा असेल तर ते तिचं थोडक्यात स्वागत किंवा नमस्कारही करू शकतात.d तसंच, तिला मंडळीत परत यायचं असेल तर ती मंडळीच्या वडिलांकडे मदतसुद्धा मागू शकते.
मंडळीतून काढून टाकण्यात आलेले आमच्या सभांना येऊ शकतात
पण मंडळीतून काढून टाकलेल्या व्यक्तीचा विवाह जोडीदार आणि तिची मुलं अजूनही यहोवाचे साक्षीदार असतील तर काय? ती व्यक्ती आता कुटुंबासोबत यहोवाची उपासना करत नसली, तरी कुटुंबासोबत तिचं नातं आधीसारखंच राहील. ते एकाच घरात राहत असल्यामुळे विवाह जोडीदारासोबत आणि मुलांसोबतचं तिचं नातं काही बदलत नाही. त्यामुळे त्यांनी एकमेकांशी प्रेमानेच वागलं पाहिजे.
मंडळीतून काढून टाकलेली व्यक्ती वडिलांकडे विनंती करू शकते, की त्यांनी तिला येऊन भेटावं. मग भेटल्यावर वडील प्रेमळपणे तिला बायबलवर आधारित सल्ला देतील. तसंच, ते तिला पस्तावा करायला आणि यहोवाकडे परत यायला प्रोत्साहनही देतील. (जखऱ्या १:३) पुढे तिने आपला वाईट मार्ग सोडून बायबलच्या स्तरांनुसार जगायची इच्छा कामांतून दाखवून दिली, तर ती पुन्हा यहोवाची साक्षीदार बनू शकते. बायबल काळातल्या करिंथ मंडळीने आपल्यात बदल केलेल्या एका पापी माणसाला “प्रेमळपणे क्षमा करून सांत्वन” दिलं होतं. त्याच प्रकारे, मंडळीतले भाऊबहीणही तिला मंडळीत परत घेतल्यावर तिला प्रेमळपणे क्षमा करून तिचं सांत्वन करतात.—२ करिंथकर २:६-८.
मंडळीत परत घेतलेल्यांना आता कसं वाटतं?
ज्यांना मंडळीतून काढून टाकण्यात आलं होतं आणि ज्यांनी देवाकडे परत यायचा निर्णय घेतला, त्यांचं काय म्हणणं आहे ते पाहू या.
“मी जेव्हा मंडळीत परत यायचा निर्णय घेतला, तेव्हा मला वाटलं की आता वडील मला खूप प्रश्न विचारतील. मी बरीच वर्षं मंडळीपासून दूर होते. त्यामुळे मी कायकाय केलं ते सगळं त्यांना जाणून घ्यायचं असेल असं मला वाटलं. पण याउलट त्यांनी मला फक्त एवढंच म्हटलं, ‘तू आता इथून पुढे काय करणार आहेस याकडे लक्ष दे.’ ते ऐकून मला इतकं बरं वाटलं की काय सांगू!”—मारीया, अमेरिका.
“मी मंडळीत परत आलोय हे पाहून मंडळीतल्या भाऊबहिणींना खूप आनंद झाला. त्यांच्या प्रेमामुळे मला जाणवलं, की यहोवाने आणि त्यांनी मला माफ केलंय. त्यामुळे मला पुढे वाटचाल करता आली. तसंच, यहोवासोबतचं नातं पुन्हा मजबूत करायला वडिलांनीही मला नेहमी मदत केली. त्यांनी मला दिलासा दिला. यहोवाला माझी अजूनही कदर आहे आणि त्याचं माझ्यावर प्रेम आहे हे समजून घ्यायला त्यांनी मला मदत केली.”—मॅलकम, सिएरा लियोन.
“यहोवाचं त्याच्या लोकांवर खूप प्रेम आहे. त्यामुळे तो त्याची संघटना शुद्ध राहील याकडे लक्ष देतो. पाप करणाऱ्यांना मंडळीतून काढून टाकणं हे काही लोकांना खूप कठोर वाटू शकतं, पण हे गरजेचंय आणि यामागे प्रेमच आहे. माझा देव प्रेमळ आणि क्षमा करणारा आहे याचा मला आनंद आहे.”—सॅन्डी, अमेरिका.
a इथे पुल्लिंगी सर्वनाम वापरण्यात आलं असलं, तरी या लेखातली माहिती पुरुष आणि स्त्री अशा दोघांनाही लागू होते.
b आधी आम्ही पस्तावा न करणाऱ्याबद्दल, त्याला मंडळीतून बहिष्कृत करण्यात आलं आहे असं म्हणायचो. पण आता आम्ही बायबलमधले शब्द वापरून त्याला मंडळीतून काढून टाकण्यात आलंय असं म्हणतो.
c मंडळीतले वडील हे देवाला विश्वासू आणि अनुभव असलेले पुरुष असतात. ते यहोवाच्या लोकांना बायबलमधून शिकवतात. तसंच, ते त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांची काळजी घेतात. यासाठी त्यांना पगार मिळत नाही.—१ पेत्र ५:१-३.
d अगदीच गंभीर प्रकरणांमध्ये, एक व्यक्ती मंडळी सोडून जाते आणि मंडळीचं नुकसान करण्याचा प्रयत्न करते किंवा मंडळीतल्या इतरांना चुकीच्या गोष्टी करायला प्रवृत्त करते. अशा वेळी, आम्ही त्या व्यक्तीला बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे “नमस्कारही” करत नाही.—२ योहान ९-११.