तरुण लोक विचारतात
शिक्षकांसोबत पटत नसेल तर मी काय केलं पाहिजे?
शिक्षकांची दहशत
जवळपास प्रत्येकच विद्यार्थ्याच्या जीवनात असा एक शिक्षक असतो, जो खूप खडूस, खूप अपेक्षा करणारा आणि नीट न वागणारा वाटू शकतो.
२१ वर्षांचा लुईस म्हणतो: “आमची एक शिक्षिका होती. ती नेहमी शिवीगाळ करायची आणि मुलांसोबत खूप वाईट वागायची. ती काही वर्षांतच रिटायर होणार होती. त्यामुळे तिला वाटायचं, की अशा वागण्याचा तिच्या नोकरीवर काहीच परिणाम होणार नाही.”
२५ वर्षांची मेलेनी सांगते, की तिची शिक्षिका दुसऱ्या मुलांशी चांगलं वागायची, पण तिच्याशी खूप वाईट वागायची. ती म्हणते: “बहुतेक जण जो धर्म पाळत होते, तो मी पाळत नसल्यामुळे ती माझ्याशी असं वागायची. ती मला म्हटली, की तुला आता याची सवय करून घ्यावी लागेल.”
जर तुमचेही शिक्षक तुमच्याशी असं वागत असतील, तर तुमच्या शाळेचं वर्ष सुरळीत जावं म्हणून खाली दिलेल्या गोष्टी करून पाहा.
हे करून पाहा
जुळवून घ्या. प्रत्येक शिक्षकाची त्याच्या विद्यार्थ्यांकडून वेगवेगळी अपेक्षा असते. त्यामुळे तुमच्या शिक्षकांची तुमच्याकडून काय अपेक्षा आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करा आणि त्याप्रमाणे वागा.
बायबलचं तत्त्व: “बुद्धिमान माणूस ऐकतो आणि आणखी शिकतो.”—नीतिवचनं १:५.
“माझ्या लक्षात आलं, की मी माझ्या टीचरच्या म्हणण्याप्रमाणे केलं पाहिजे. त्यामुळे मी तसं करायला खूप मेहनत घेतली. म्हणून मला त्यांच्याशी जुळवून घ्यायला मदत झाली.”—क्रिस्टफर.
आदराने वागा. तुमच्या शिक्षकांशी नेहमी आदराने आणि प्रेमाने बोला. तुम्हाला वाटत असेल, की ते वाईट वागतात तर मीही तसंच वागलं पाहिजे. पण त्यांच्याशी उद्धटपणे वागू नका. लक्षात असू द्या, की तुम्ही त्यांचे विद्यार्थी आहात, मित्र नाही.
बायबलचं तत्त्व: “तुमचं बोलणं नेहमी प्रेमळ, मिठाने रुचकर केल्यासारखं असावं, म्हणजे प्रत्येकाला कसं उत्तर द्यायचं हे तुम्हाला समजेल.”—कलस्सैकर ४:६.
“शिक्षकांना मुलांकडून जो आदर मिळाला पाहिजे तो त्यांना नेहमीच मिळत नाही. त्यामुळे तुम्ही जेव्हा त्यांचा आदर करायचा प्रयत्न करता, तेव्हा त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो आणि ते तुमच्याशी चांगलं वागू शकतात.”—सिएरा.
समजूतदारपणा दाखवा. शिक्षकसुद्धा आपल्यासारखीच माणसं आहेत. त्यांनासुद्धा इतरांसारखंच जीवनाच्या चिंतांचा आणि ताणतणावांचा सामना करावा लागतो. त्यामुळे पटकन असा विचार करू नका, की ‘माझे शिक्षक खूप खडूस आहेत’ किंवा ‘त्यांना मी अजिबात आवडत नाही.’
बायबलचं तत्त्व: “आपण सगळेच बऱ्याच वेळा चुकतो.”—याकोब ३:२.
“शिक्षक म्हणून नोकरी करणं काही सोपं काम नाही. सगळ्या मुलांना शिस्त लावणं, त्यांना शिकवणं तोंडची गोष्ट नाही. त्यामुळे मी माझ्या शिक्षिकेचं ओझं हलकं करायचा प्रयत्न करते. असं केल्यामुळे त्यांचं एका मुलाचं टेन्शन कमी होतं.”—ॲलेक्सीस.
आईवडिलांशी बोला. तुमचे आईवडील तुम्हाला आधार द्यायला नेहमी तयार असतात. तुम्ही शाळेत चांगलं करावं असं त्यांना वाटतं. म्हणून तुमचे शिक्षक तुमच्याशी चांगलं वागत नाहीत, तेव्हा तशा परिस्थितीत योग्य ते करायला आणि शिक्षकांशी चांगलं वागायला ते तुम्हाला मदत करू शकतात.
बायबलचं तत्त्व: “मनमोकळी चर्चा होत नाही, तेव्हा योजना निष्फळ होतात.”—नीतिवचनं १५:२२.
“समस्या कशा सोडवायच्या हे आपल्यापेक्षा मम्मीपप्पांना चांगलं माहीत असतं. त्यामुळे त्यांचं ऐका. त्यात आपलाच फायदा आहे.”—ऑलिव्हिया.
शिक्षकांशी कसं बोलावं?
तुमचं आणि तुमच्या शिक्षकांचं पटत नसेल, तर काही वेळा तुम्हाला त्यांच्याशी बोलायची गरज पडू शकते. तुम्हाला असं करायला भीती वाटत असली तरी घाबरू नका. कारण लक्षात ठेवा, की तुम्ही वाद घालायला नाही तर त्यांच्याशी बोलायला जात आहात. असं केल्यानंतर, हे किती सोपं होतं आणि याचा किती चांगला परिणाम झालाय हे पाहून तुम्हालाच आश्चर्य वाटेल.
बायबलचं तत्त्व: ‘शांतीसाठी होईल तितका प्रयत्न करा.’—रोमकर १४:१९.
“तुमची टीचर जर फक्त तुमच्याशीच खडूसपणे वागत असेल, तर तुमच्याकडून काही चुकलंय का असं त्यांना विचारा. त्या जे सांगतील त्यावरून तुम्हाला कळेल, की तुम्हाला कुठे बदल करायची गरज आहे.”—जुलियाना.
“तुमचे शिक्षक तुमच्याशी ज्या प्रकारे वागतात त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं हे तुम्ही त्यांना क्लासच्या आधी किंवा नंतर एकट्यात भेटून शांतपणे सांगू शकता. तुम्ही ही परिस्थिती कशी चांगल्या प्रकारे हाताळली ते पाहून, ते तुमच्याशी कदाचित समजदारपणे आणि आदराने वागतील.”—बेन्जामिन.
अनुभव
“मला चांगले मार्क पडत नव्हते आणि माझी टीचरही मला काहीच मदत करत नव्हती. मला शाळा सोडून द्यावंसं वाटत होतं. कारण तिने माझं जगणं मुश्किल केलं होतं.
मग मी एका सरांकडे गेले. त्यांनी मला सांगितलं: ‘ती तुला चांगल्या प्रकारे ओळखत नाही, आणि तूपण तिला चांगल्या प्रकारे ओळखत नाही. म्हणून तुला काय प्रॉब्लेम आहे हे तू तिला जाऊन सांगितलं पाहिजे. कदाचित तुझ्यामुळे बाकीच्या मुलांनाही मदत होईल. कारण त्यांनाही तिच्याशी बोलायला भीती वाटते.’
सरांनी मला जे सांगितलं ते करायची माझी अजिबात इच्छा नव्हती. पण मी त्या गोष्टीचा विचार केला आणि मला त्यांचं बोलणं पटलं. परिस्थिती सुधारावी असं जर मला वाटत असेल, तर मी स्वतः पाऊल उचललं पाहिजे.
त्यामुळे दुसऱ्या दिवशी मी माझ्या टीचरला भेटले आणि खूप आदराने तिच्याशी बोलले. मी टीचरला सांगितलं, की ती क्लासमध्ये जे काही शिकवते ते मला खूप आवडतं आणि मला आणखी शिकून घ्यायचंय. पण मला काही गोष्टी समजत नाहीत आणि त्यासाठी काय करायचं हेही कळत नाही. म्हणून मग तिने मला काही सल्ले दिले. इतकंच काय, तर ती मला ई-मेलने किंवा क्लास सुटल्यावर मदत करायलाही तयार झाली.
याचं मला खूप आश्चर्य वाटलं. टीचरशी बोलल्यानंतर ती माझ्याशी खूप चांगलं वागायला लागली आणि त्या पुढची माझी शाळेची वर्षं चांगली गेली.”—मारिया.
टीप: जर तुमचं तुमच्या शिक्षकांशी पटत नसेल, तर या गोष्टीकडे तुमच्या पुढच्या आयुष्याचं प्रशिक्षण म्हणून पाहा. २२ वर्षांची कॅटी म्हणते: “तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यावरही तुम्हाला अधिकारपदावर असलेले सगळे लोक चांगलेच भेटतील असं नाही. जर तुम्हाला आता तुमच्या शिक्षकांशी जुळवून घेता आलं, तर भविष्यात तुम्हाला तशा प्रकारच्या लोकांशीही जुळवून घेता येईल.”