मग्दालीया मरीया कोण होती?
बायबलचं उत्तर
मग्दालीया मरीया ही येशू ख्रिस्ताची विश्वासू शिष्या होती. मरीयाला मग्दालीया हे नाव गालील समुद्राच्या जवळ असलेल्या मगदाला या शहरावरून (कदाचित त्याला मगदान असं म्हटलं जायचं) मिळालं असेल. कदाचित मरीया तिथे राहिली असावी.
येशू आणि त्याच्या शिष्यांसोबत प्रवास करणाऱ्या स्त्रियांमध्ये मग्दालीया मरीयासुद्धा होती. तिने येशूच्या आणि त्याच्या शिष्यांच्या गरजा पुरवण्यासाठी उदारतेने मदत केली. (लूक ८:१-३) येशूला मारण्यात आलं हे तिने प्रत्यक्ष पाहिलं आणि ज्यांनी येशूला पुनरुत्थानानंतर पाहिलं त्यांच्यामध्ये ती पहिली होती.—मार्क १५:४०; योहान २०:११-१८.
मग्दालीया मरीया वेश्या होती का?
मग्दालीया मरीया वेश्या होती असं बायबलमध्ये कुठेही सांगण्यात आलेलं नाही. पण येशूने तिच्यातून सात दुष्ट स्वर्गदूतांना बाहेर काढलं होतं हे बायबल सांगतं.—लूक ८:२.
मग मरीया वेश्या होती असं लोक का म्हणतात? कारण तिच्या मृत्यूच्या बऱ्याच काळानंतर काही लोकांनी असा दावा केला, की ज्या स्त्रीने (कदाचित ती वेश्या असावी) येशूचे पाय तिच्या अश्रूंनी धुतले आणि केसांनी पुसले ती स्त्री मरीया मग्दालीयाच आहे. त्या स्त्रीचं नाव बायबलमध्ये देण्यात आलेलं नाही. (लूक ७:३६-३८) पण बायबलमध्ये आपल्याला याचा कोणताही पुरावा मिळत नाही.
मग्दालीया मरीया “प्रेषितांची प्रेषित” होती का?
ती “प्रेषितांची प्रेषित” नव्हती. कॅथोलिक चर्चमध्ये तिला “संत मग्दालीया मरीया” आणि “प्रेषितांची प्रेषित” असं म्हणतात. कारण ज्यांनी येशूच्या पुनरुत्थानाची बातमी त्याच्या प्रेषितांना कळवली त्यांच्यामध्ये मरीया पहिली होती. (योहान २०:१८) पण यामुळे आपण तिला प्रेषित म्हणू शकत नाही. शिवाय, ती प्रेषित असल्याचं बायबलमध्ये आपल्याला कुठेही वाचायला मिळत नाही.—लूक ६:१२-१६.
बायबलचं लिखाण पहिल्या शतकाच्या शेवटी-शेवटी पूर्ण झालं. याच्या बऱ्याच काळानंतर चर्चच्या अधिकाऱ्यांनी मग्दालीया मरीयाला “संत” ही पदवी द्यायचं ठरवलं. दुसऱ्या आणि तिसऱ्या शतकात जी लिखाणं लिहिण्यात आली, त्यात असं सांगण्यात आलं की येशूचे काही शिष्य मग्दालीया मरीयावर जळायचे. पण ही लिखाणं बायबलचा भाग नाहीत. त्यामुळे या कहाण्या देवाच्या प्रेरित वचनांचा भाग असू शकत नाहीत.
मग्दालीया मरीया येशूची पत्नी होती का?
ती येशूची पत्नी नव्हती. खरंतर बायबल स्पष्टपणे सांगतं की येशूने कधीच लग्न केलं नाही.a
a “येशूचं लग्न झालं होतं का? त्याला भावंडं होती का?” हा लेख पाहा.