नियमन मंडळाकडून पत्र
प्रिय बांधवांनो,
“आम्ही आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करत सर्वदा तुम्हा सर्वांविषयी देवाची उपकारस्तुती करतो. आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम, व आपल्या प्रभु येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळे धरलेला धीर ह्यांचे आम्ही निरंतर स्मरण करतो.” (१ थेस्सलनी. १:२, ३) या वचनांतील शब्द अगदी आमच्या मनातील आहेत! तुमच्याबद्दल आणि तुम्ही करत असलेल्या चांगल्या कामांबद्दल आम्ही यहोवाचे खरोखर खूप आभार मानतो. कोणती सत्कर्मे?
गेल्या वर्षी तुम्ही केलेल्या राज्य प्रचाराच्या कामांतून तुमचा विश्वास व तुमचं प्रेम दिसून आलं. तुमच्यापैकी अनेकांनी सेवा वाढवण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधून काढले. काही प्रचारक, राज्य प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी किंवा परदेशात राहायला गेले. तर इतरांनी सार्वजनिक साक्षकार्यात जास्त भाग घेऊन आपली सेवा वाढवली. अनेकांनी स्मारकविधीच्या काळात, विभागीय पर्यवेक्षकांच्या भेटीच्या काळात किंवा ऑगस्ट २०१४ मध्ये असलेल्या खास मोहिमेच्या काळात साहाय्यक पायनियरींग केली. तुम्हा सर्वांची परिस्थिती वेगवेगळी असली तरी, सर्वांनी स्वतःला यहोवाच्या सेवेत झोकून दिलं ज्याबद्दल आम्ही तुमची प्रशंसा करतो. (कलस्सै. ३:२३, २४) यहोवाच्या सेवेत तुम्ही “विश्वासाने” केलेल्या कामांबद्दल आम्ही यहोवाचे आभारी आहोत.
संपूर्ण जगभरात, राज्याच्या विस्तारासाठी लागणाऱ्या इमारतींच्या बांधकामांत तुम्ही “प्रीतीने केलेले श्रम” यांचीदेखील आम्ही प्रशंसा करतो. या इमारतींची अत्यंत गरज आहे कारण यहोवाच्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. (यश. ६०:२२) विचार करा: गेल्या वर्षी ८२,०१,५४५ प्रचारकांचा उच्चांक होता आणि दर महिन्याला ९४,९९,९३३ बायबल अभ्यास चालवण्यात आले! प्रचारकांमध्ये झपाट्यानं होणाऱ्या या वाढीमुळं अनेक शाखा कार्यालये पाडून आणखी मोठी करावी लागली. आणि अर्थातच, यामुळं मग अनेक राज्य सभागृहांची गरज भासू लागली. त्याचबरोबर जगातील अनेक भागात, भाषांतरकारांच्या राहण्याची व कामाची सोय करण्यासाठी क्षेत्रीय भाषांतर कार्यालयांची (आर.टी.ओ) व्यवस्था करावी लागत आहे.
आता आपण स्वतःला विचारू शकतो: ‘या सर्व बांधकाम प्रकल्पांना मी हातभार कसा लावू शकतो?’ आपल्यातील काही जण बांधकामात भाग घेऊ शकतात. आणि बांधकामासाठी आपल्याजवळ काही कौशल्य नसलं तरी, या महत्त्वपूर्ण कार्यांना आर्थिक रीत्या हातभार लावण्याचा सुहक्क आपल्या सर्वांनाच आहे. (नीति. ३:९, १०) प्राचीन काळात निवासमंडपाचं बांधकाम चाललं होतं तेव्हा इस्राएल लोक इतकं दान देत होते की शेवटी, ‘आता पुरे करा,’ म्हणून घोषणा करावी लागली! (निर्ग. ३६:५-७) बायबलमधील असे अहवाल वाचल्यावर आपल्यालादेखील दान देण्याची प्रेरणा मिळते, नाही का? पवित्र सेवेच्या या महत्त्वपूर्ण बाबतीत तुम्ही प्रेमानं “श्रम” घेत आहात म्हणूनदेखील आम्ही यहोवाचे आभार मानतो.
छळ होत असतानाही यहोवाशी विश्वासू असलेल्या बांधवांना बघून आम्हाला अत्यंत आनंद होतो. उदाहरणार्थ, दक्षिण कोरियातील आपल्या बांधवांना १९५० पासून छळाचा सामना करावा लागत आहे. तटस्थ राहिल्यामुळं अनेक तरुण बांधवांना काही काळ किंवा जास्त काळ तुरुंगवास सहन करावा लागत आहे. कित्येक पिढ्यांपासून आपले बांधव न घाबरता व धीरानं हा त्रास सहन करत आहेत! हे पाहून आपला विश्वास आणखी मजबूत होतो.
एरिट्रिया देशात तर आपले तीन बांधव २० पेक्षा अधिक वर्षांपासून तुरुंगात आहेत. बाकीच्या आपल्या काही बांधवांना, बहिणींना व मुलांना काही काळासाठी तुरुंगात डांबण्यात आलं आहे. त्यांना सोडवण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले तरी, आतापर्यंत त्यांचा काहीएक उपयोग झाला नाही. पण तुरुंगातील आपले बांधवसुद्धा हताश झालेले नाहीत. त्यांचा इतका छळ होत आहे तरीपण ते यहोवाशी विश्वासू आहेत. अशा बांधवांसाठी प्रार्थना करायला आपण कधीही विसरू नये.—रोम. १:८, ९.
अर्थात बहुतेक बंधुभगिनी तुरुंगात नाहीत. तुमच्यापैकी इतर अनेक जण उतारवय, दीर्घकाळचा आजार, सत्यात नसलेल्या विवाह सोबत्याकडून किंवा नातेवाईकांकडून छळ सहन करत आहेत. शिवाय, प्रत्येकाच्या काही न काही समस्या आहेत ज्या फक्त त्यांना स्वतःलाच माहीत असतात. तरीसुद्धा तुम्ही सर्व यहोवाची विश्वासूपणे सेवा करत आहात. (याको. १:१२) आणि याबद्दल आम्ही तुमची मनापासून प्रशंसा करतो. तुमचा हा धीर पाहून आम्ही यहोवाचे आभार मानतो.
होय, विश्वासानं तुम्ही करत असलेलं काम, प्रेमानं तुम्ही घेत असलेले श्रम आणि तुम्ही दाखवत असलेला धीर याबद्दल आम्ही “परमेश्वराचे उपकारस्मरण” करतो “कारण तो चांगला आहे.” (स्तोत्र १०६:१) आमचं तुम्हा सर्वांवर प्रेम आहे. यहोवा तुम्हा सर्वांना शक्ती देवो, तुमची काळजी घेवो व तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करो, अशी आम्ही त्याला प्रार्थना करतो; जेणेकरून तुम्ही अनंत-अनंत काळ त्याची सेवा करू शकाल.
आपले बांधव,
यहोवाच्या साक्षीदारांचे नियमन मंडळ