अभ्यास लेख ४०
गीत १११ आपल्या आनंदाची कारणं!
यहोवा आपला “सर्वात मोठा आनंद” आहे
“माझा सर्वात मोठा आनंद असलेल्या देवाजवळ . . . मी येईन.”—स्तो. ४३:४.
या लेखात:
कोणत्या गोष्टींमुळे आपला आनंद हिरावू शकतो आणि तो आनंद आपल्याला पुन्हा कसा मिळवता येईल, ते पाहा.
१-२. (क) आज जगातल्या बऱ्याच लोकांची परिस्थिती कशी आहे? (ख) या लेखात आपण कोणत्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत?
आज जगातले लोक आनंदी राहण्यासाठी खूप धडपड करतात. पण तरी त्यांना कायम टिकणारा आनंद मिळत नाही. बऱ्याच लोकांना दुःखं सोसावी लागतात. त्यांना वाटतं, की त्यांची परिस्थिती कधीच बदलणार नाही. यहोवाच्या सेवकांपैकी काही जणांच्या मनातसुद्धा अशाच भावना येऊ शकतात. आपण “शेवटच्या दिवसांत” जगत असल्यामुळे आपल्यालासुद्धा कठीण परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो.—२ तीम. ३:१.
२ या लेखात आपण दोन गोष्टींवर चर्चा करणार आहोत: कोणत्या गोष्टी आपला आनंद हिरावून घेऊ शकतात? आणि तो आनंद आपल्याला पुन्हा कसा मिळवता येईल? पण त्याआधी खऱ्या आनंदाचा स्रोत कोण आहे, हे आपण जाणून घेतलं पाहिजे.
खऱ्या आनंदाचा स्रोत
३. सृष्टीतून आपल्याला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं? (चित्रंसुद्धा पाहा.)
३ यहोवा एक आनंदी देव आहे आणि त्याची अशी इच्छा आहे की आपणसुद्धा आनंदी राहावं. त्याच्या आनंदी स्वभावाची झलक आपल्याला त्याच्या सृष्टीतून पाहायला मिळते. त्याने आपल्याला दिलेली सुंदर पृथ्वी, आपल्या आजूबाजूला केलेली रंगांची उधळण, मस्ती करणारे खेळकर प्राणी आणि भरपूर प्रमाणात असलेलं चविष्ट अन्न. खरंच, यहोवाचं आपल्यावर मनापासून प्रेम आहे आणि आपण आनंदी राहावं असं त्याला वाटतं.
Baby elephant: Image © Romi Gamit/Shutterstock; penguin chicks: Vladimir Seliverstov/500px via Getty Images; baby goats: Rita Kochmarjova/stock.adobe.com; two dolphins: georgeclerk/E+ via Getty Images
मस्ती करणारे खेळकर प्राणी पाहून आपल्याला यहोवा किती आनंदी देव आहे हे समजतं (परिच्छेद ३ पाहा)
४. (क) जगात इतकं दुःख असूनसुद्धा कोणत्या गोष्टीमुळे यहोवा आनंदी राहतो? (ख) यहोवाने आपल्याला कोणती भेट दिली आहे? (स्तोत्र १६:११)
४ यहोवा ‘आनंदी देव’ असला, तरी आज जगात लोकांना किती दुःख आणि हालअपेष्टा सहन कराव्या लागतात, हे त्याला चांगलं माहीत आहे. (१ तीम. १:११) पण, असं असलं तरी तो आनंदी राहतो. असं का? कारण त्याला माहीत आहे, की हे दुःख फक्त काही काळासाठी आहे. इतकंच काय, तर दुःख कायमचं नाहीसं करण्यासाठी त्याने एक दिवससुद्धा ठरवलाय. आणि त्या दिवसाची तो धीराने वाट पाहतोय. पण असं असलं तरी, आज आपल्याला काय सोसावं लागतं याची त्याला जाणीव आहे. आणि आपली मदत करायची त्याची इच्छा आहे. मग तो आपली मदत कशी करतो? तो आपल्याला आनंदी राहायला मदत करतो. ही त्याने आपल्याला दिलेली एक प्रेमळ भेट आहे. (स्तोत्र १६:११ वाचा.) त्याने आपल्या मुलाला म्हणजे येशूला आनंदी राहायला कशी मदत केली यावर आता आपण विचार करू या.
५-६. यहोवाच्या सृष्टीत येशू सगळ्यात आनंदी व्यक्ती का आहे?
५ यहोवाने निर्माण केलेल्या संपूर्ण सृष्टीत येशू सर्वात आनंदी व्यक्ती आहे. आपण असं का म्हणू शकतो? याची दोन कारणं आहेत. (१) “[येशू] अदृश्य देवाचं प्रतिरूप” आहे आणि प्रत्येक गोष्टीत तो यहोवासारखा वागतो. (कलस्सै. १:१५; १ तीम. ६:१५) (२) त्याने खऱ्या आनंदाचा स्रोत असलेल्या यहोवा देवासोबत सगळ्यात जास्त वेळ घालवलाय.
६ यहोवा येशूला जे काही करायला सांगतो ते सगळं तो आनंदाने करतो. (नीति. ८:३०, ३१; योहा. ८:२९) तो विश्वासूपणे सगळ्या गोष्टी करत असल्यामुळेच यहोवा त्याच्यावर खूश आहे आणि त्याला त्याचा अभिमान आहे.—मत्त. ३:१७.
७. आपण खरा आनंद कसा मिळवू शकतो?
७ यहोवाला चांगल्या प्रकारे जाणून घेतल्यामुळे आपल्यालासुद्धा आनंद मिळू शकतो. कारण तोच खऱ्या आनंदाचा स्रोत आहे. आपण जितकं जास्त यहोवाबद्दल शिकू आणि त्याच्यासारखं वागू, तितकं जास्त आपण आनंदी होऊ. यहोवा जे सांगतो ते केल्यामुळे आपण आनंदी राहू शकतो. तसंच, तो आपल्यावर खूश आहे हे माहीत असल्यामुळेसुद्धा आपल्याला आनंद होतो.a (स्तो. ३३:१२) पण कधीकधी आपल्याला आनंदी राहणं कठीण जाऊ शकतं. मग याचा अर्थ असा होतो का, की यहोवा आपल्यावर खूश नाही? मुळीच नाही! आपण अपरिपूर्ण असल्यामुळे आपल्याला कधीकधी दुःखाचा, त्रासाचा आणि निराशेचा सामना करावा लागतो आणि ही गोष्ट यहोवाला माहीत आहे. (स्तो. १०३:१४) तर चला, कोणत्या गोष्टी आपला आनंद हिरावून घेऊ शकतात आणि तो आनंद आपल्याला पुन्हा कसा मिळवता येईल यावर आता चर्चा करू या.
कोणत्याही गोष्टीला तुमचा आनंद हिरावू देऊ नका
८. जीवनातल्या समस्यांचा आपल्यावर काय परिणाम होऊ शकतो?
८ पहिली गोष्ट: जीवनातल्या समस्या. छळामुळे, नैसर्गिक विपत्तीमुळे, गरीबीमुळे, आजारपणामुळे किंवा वाढत्या वयामुळे कदाचित तुमच्यावर समस्या येत असतील. आणि त्यामुळे तुम्हाला फार दुःख सोसावं लागत असेल. यातल्या काही गोष्टींवर आपलं नियंत्रण नसल्यामुळे आपण सहज आपला आनंद गमावू शकतो. बायबलमध्येसुद्धा असं म्हटलंय, की “दुःखामुळे मन खचून जातं.” (नीति. १५:१३) वडील म्हणून सेवा करणाऱ्या बाबीस नावाच्या भावाचा विचार करा. त्याने चार वर्षांच्या काळात आपल्या भावाला आणि आईवडिलांना गमावलं. तो भाऊ असं म्हणतो: “मला खूप एकटं आणि हताश वाटत होतं. माझा भाऊ आणि माझे आईवडील होते, तेव्हा मला त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवता आला नाही. माझ्यावर एका पाठोपाठ एक समस्या येत होत्या. त्यामुळे मी पार तुटून गेलो होतो.” खरंच, जीवनातल्या समस्यांमुळे आपण पार खचून जाऊ शकतो.
९. आपण आपला आनंद पुन्हा कसा मिळवू शकतो? (यिर्मया २९:४-७, १०)
९ आनंद पुन्हा कसा मिळवता येईल? ज्या गोष्टींवर आपलं नियंत्रण नाही त्यांबद्दल विचार करायचं थांबवून आणि आपल्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल विचार करून, आपण आपला आनंद पुन्हा मिळवू शकतो. जग असं शिकवतं, की सगळंकाही आपल्या मनासारखं असलं तरंच आपण आनंदी राहू शकतो. पण, बायबल शिकवतं, की परिस्थिती आपल्याला हवी तशी नसली, तरी आपण आनंदी राहू शकतो. उदाहरणार्थ, बाबेलच्या बंदिवासात असलेल्या यहुद्यांना यहोवाने सांगितलं, की त्यांनी त्यांची परिस्थिती स्वीकारावी आणि आहे त्या परिस्थितीत आनंद टिकवून ठेवायचा प्रयत्न करावा. (यिर्मया २९:४-७, १० वाचा.) या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो? आपण आपली परिस्थिती स्वीकारली पाहिजे आणि आपल्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. लक्षात ठेवा, की यहोवा तुम्हाला कधीच सोडून देणार नाही. तो तुम्हाला नेहमी मदत करत राहील. (स्तो. ६३:७; १४६:५) इफी नावाच्या बहिणीचा विचार करा. तिचा अपघात झाल्यामुळे तिला आता चालणं-फिरणं शक्य नाही. ती म्हणते: “यहोवाने, माझ्या कुटुंबाने आणि भाऊबहिणींनी मला खूप मदत केली आहे. जर मी हार मानली, तर त्यांनी माझ्यासाठी जे केलंय त्याची मला काहीच किंमत नाही असं होईल. म्हणून त्यांनी आणि यहोवाने माझ्यासाठी जे काही केलंय, त्याबद्दल कदर दाखवण्यासाठी आनंदी राहण्याचा मी पूर्ण प्रयत्न करते.”
१०. समस्या असतानासुद्धा आपण आनंदी का राहू शकतो?
१० आपल्या जीवनात समस्या असल्या किंवा आपल्यासोबत किंवा आपल्या कुटुंबासोबत वाईट गोष्टी घडत असल्या, तरीसुद्धा आपण आनंदी राहू शकतो.b (स्तो. १२६:५) असं आपण का म्हणू शकतो? कारण आपला आनंद आपल्या परिस्थितीवर अवलंबून नाही. मरीया नावाची पायनियर बहीण म्हणते: “आपल्यावर समस्या आल्या तरीसुद्धा आपण आनंदी राहिलं पाहिजे. पण याचा अर्थ असा होत नाही, की आपण आपल्या भावना व्यक्तच करू शकत नाही. उलट याचा अर्थ असा होतो, की आपण यहोवाने दिलेली वचनं विसरलेलो नाही. आपला पिता आपल्याला आपला आनंद टिकवून ठेवायला मदत करेल.” लक्षात असू द्या, की परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपल्या समस्या तात्पुरत्या आहेत. जणू काही समुद्र किनाऱ्यावरच्या पाऊलखुणा. लवकरच लाटा त्यांना धुवून टाकतील आणि त्यांचं काहीच नामोनिशाण उरणार नाही.
११. प्रेषित पौलच्या उदाहरणामुळे तुम्हाला कसं प्रोत्साहन मिळालं?
११ जर आपल्या मनात असा विचार येत असेल, की आपल्या जीवनात समस्या आहेत त्यामुळे यहोवा आपल्यावर खूश नाही तर काय? असं असेल, तर आपण यहोवाच्या अशा विश्वासू सेवकांचा विचार करू शकतो, ज्यांच्या जीवनातसुद्धा समस्या होत्या. प्रेषित पौलचा विचार करा. ‘विदेश्यांना, राजांना आणि इस्राएलच्या मुलांना’ सत्य सांगण्यासाठी येशूने त्याला स्वतः निवडलं होतं. (प्रे. कार्यं ९:१५) हा खरंच एक खूप मोठा बहुमान होता! असं असलं तरी, पौलच्या जीवनात खूप समस्या होत्या. (२ करिंथ. ११:२३-२७) प्रेषित पौलच्या जीवनात समस्या होत्या याचा अर्थ असा होता का, की यहोवा त्याच्यावर खूश नाही? नक्कीच नाही. उलट तो या समस्या धीराने सोसत होता यावरून दिसून आलं, की यहोवाचा त्याच्यावर आशीर्वाद आहे. (रोम. ५:३-५) आता स्वतः बद्दल विचार करा. तुमच्या जीवनात समस्या आहेत तरीसुद्धा तुम्ही त्या धीराने सोसताय. त्यामुळे तुम्ही या गोष्टीची खातरी ठेवू शकता, की यहोवा तुमच्यावर नक्की खूश आहे.
१२. पूर्ण न झालेल्या अपेक्षांमुळे आपला आनंद कसा हिरवू शकतो?
१२ दुसरी गोष्ट: पूर्ण न झालेल्या अपेक्षा. (नीति. १३:१२) यहोवावर आपलं प्रेम आहे आणि त्याने आपल्यासाठी जे केलंय त्याबद्दल आपल्याला कदर आहे. म्हणूनच त्याच्या सेवेत आपण वेगवेगळी ध्येयं ठेवतो. पण जर आपण आपल्या परिस्थितीचा विचार न करता ध्येयं ठेवली, तर आपण निराश होऊ शकतो. (नीति. १७:२२) हॉली नावाची पायनियर म्हणते: “मला सुवार्तिकांसाठी असलेल्या प्रशालेला जायचं होतं, दुसऱ्या देशात जाऊन सेवा करायची होती किंवा रामापो बांधकाम प्रकल्पात काम करायचं होतं. पण माझी परिस्थिती बदलली आणि मला माझी ध्येयं गाठता आली नाहीत. त्यामुळे मी निराश झाले. जेव्हा तुम्हाला काही गोष्टी करायच्या असतात पण करता येत नाही तेव्हा तुमची चिडचिड होते.” आज बऱ्याच भाऊबहिणींना असंच वाटतं.
१३. आज जर आपल्या परिस्थितीमुळे आपल्याला यहोवाच्या सेवेत हवं ते करता येत नसेल, तर आपण कोणती ध्येयं ठेवू शकतो?
१३ आनंद पुन्हा कसा मिळवता येईल? लक्षात असू द्या, यहोवा आपल्याकडून अवाजवी अपेक्षा करत नाही. तसंच, आपण त्याच्या सेवेत जे करतोय त्यावरून तो आपलं मोल ठरवत नाही. यहोवाची इच्छा आहे की आपण आपल्या मर्यादांची जाणीव ठेवावी आणि त्याला विश्वासू राहावं. (मीखा ६:८; १ करिंथ. ४:२) आपण त्याच्या सेवेत काय करतो यापेक्षा, आपण आतून कशा प्रकारची व्यक्ती आहोत यावर तो जास्त लक्ष देतो. मग यहोवा आपल्याकडून ज्या अपेक्षा करतो, त्यापेक्षा जास्त अपेक्षा स्वतःकडून करणं योग्य राहील का?c नक्कीच नाही. तर मग आपल्या मर्यादांमुळे आपल्याला यहोवाच्या सेवेत जास्त करता येत नसेल, तर आपल्याला जे करता येतं त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही तरुणांना शिकवू शकता का? किंवा वृद्ध लोकांना प्रोत्साहन देऊ शकता का? तुम्ही स्वतः भेटून, फोन करून किंवा मेसेज पाठवून एखाद्या व्यक्तीला प्रोत्साहन देण्याचं ध्येय ठेवू शकता. जर तुम्ही अशी गाठता येणारी ध्येयं ठेवलीत, तर यहोवा खूश होईल आणि तुम्हाला आनंदी राहायला मदत करेल. लक्षात असू द्या, की यहोवाच्या नवीन जगात आपल्याला त्याची सेवा करण्याच्या अगणित संधी असतील. इतक्या की आपण त्यांची कल्पनाही करू शकत नाही. आधी उल्लेख केलेली हॉली म्हणते: “मी विचार करते, की ‘माझ्याकडे तर हजारो वर्षांचा काळ आहे.’ त्यावेळी मी यहोवाच्या सेवेत हवं ते करू शकेन.”
१४. आणखी कोणत्या गोष्टींमुळे आपला आनंद हिरावू शकतो?
१४ तिसरी गोष्ट: फक्त स्वतःच्या इच्छा पूर्ण करायच्या मागे लागणं. काही लोक सोशल मिडियाचा वापर करून हे सांगतात, की स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यातच खरा आनंद आहे. यामुळे आपणसुद्धा असा विचार करायला लागू शकतो, की छंद जोपासल्यामुळे, शॉपिंग केल्यामुळे आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला गेल्यामुळे आपण आनंदी होऊ शकतो. या सगळ्या गोष्टींचा आनंद घेणं चुकीचं नाही. कारण यहोवाने आपल्याला चांगल्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी बनवलंय. पण काही लोकांनी जेव्हा फक्त याच गोष्टींमधून आनंद मिळवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना जाणवलं की त्यांतून खरा आनंद मिळत नाही. इवा नावाची पायनियर म्हणते: “ज्यांना फक्त स्वतःची इच्छा पूर्ण करायची असते त्यांचं मन कधीच भरत नाही.” आपण जर फक्त स्वतःला खूश करायचा प्रयत्न केला तर आपल्या हाती निराशाच येईल.
१५. शलमोन राजाच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो?
१५ स्वतःच्या इच्छा पूर्ण केल्यामुळे काय नुकसान होऊ शकतं, हे आपण शलमोन राजाच्या अनुभवातून शिकू शकतो. त्याने स्वतःच्या इच्छा पूर्ण करून आनंद मिळवायचा प्रयत्न केला. जसं की वेगवेगळ्या प्रकारचं चविष्ट अन्न खाऊन, मधुर संगीत ऐकून आणि त्याच्या काळातल्या महागड्या वस्तू विकत घेऊन. पण शेवटी त्याची निराशा झाली. त्याने म्हटलं: “कितीही पाहिलं, तरी डोळ्यांचं समाधान होत नाही; कितीही ऐकलं, तरी कानांचं समाधान होत नाही.” (उप. १:८; २:१-११) काही लोकांना वाटतं, की त्यांच्याकडे पैसा असला तर ते काहीही करू शकतात आणि आनंद मिळवू शकतात. पण ही गोष्ट खोटी आहे. अशा गोष्टी आपल्याला कधीच खऱ्या अर्थाने आनंद देऊ शकत नाहीत.
१६. इतरांना ‘दिल्यामुळे’ आपण आपला आनंद पुन्हा कसा मिळवू शकतो? (चित्रंसुद्धा पाहा.)
१६ आनंद पुन्हा कसा मिळवता येईल? येशूने शिकवलं, की “घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे.” (प्रे. कार्यं २०:३५) ॲलेकोस नावाचे वडील म्हणतात: “मी इतरांसाठी छोट्याछोट्या गोष्टी करण्यावर लक्ष देतो. जेव्हा मी इतरांना मदत करतो, तेव्हा मला काय हवंय याबद्दल जास्त विचार माझ्या मनात येत नाहीत आणि मी आनंदी असतो.” मग तुम्ही इतरांसाठी काय करू शकता? जर तुम्हाला कोणी समस्येत असलेलं दिसलं, तर त्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करा. कदाचित तुम्हाला त्याच्या समस्या सोडवता येणार नाहीत. पण त्याचं लक्ष देऊन ऐकून, त्याच्याशी दयाळूपणे वागून आणि त्याला त्याचं ओझं यहोवावर टाकून द्यायची आठवण करून देऊन, तुम्ही त्याला सांत्वन देऊ शकता. (स्तो. ५५:२२; ६८:१९) तुम्ही त्याला या गोष्टीचीसुद्धा आठवण करून देऊ शकता, की यहोवाने त्याला सोडलेलं नाही. (स्तो. ३७:२८; यश. ५९:१) तुम्ही त्याच्यासाठी काही छोट्याछोट्या गोष्टीसुद्धा करू शकता. जसं की त्याला जेवण बनवून देणं, त्याच्यासोबत चालायला जाणं. तसंच, तुम्ही त्याला तुमच्यासोबत प्रचाराला बोलावू शकता, म्हणजे त्याला आणखीन बरं वाटेल. इतरांना प्रोत्साहन देण्यासाठी यहोवाला तुमचा वापर करू द्या. जर तुम्ही स्वतःऐवजी इतरांवर लक्ष दिलं, तर तुम्ही खऱ्या अर्थाने आनंदी व्हाल!—नीति. ११:२५.
आपल्याला काय हवं आहे याचा नेहमी विचार करण्याऐवजी इतरांना मदत करायचा प्रयत्न करा (परिच्छेद १६ पाहा) d
१७. आपल्याला जर खऱ्या अर्थाने आनंदी व्हायचं असेल, तर आपण काय केलं पाहिजे? (स्तोत्र ४३:४)
१७ आपण जर आपल्या स्वर्गातल्या पित्याला आणखीन चांगल्या प्रकारे जाणून घ्यायचा प्रयत्न केला, तर आपण खऱ्या अर्थाने आनंदी होऊ. बायबल आपल्याला खातरी देतं, की यहोवा आपला “सर्वात मोठा आनंद” आहे. (स्तोत्र ४३:४ वाचा.) आज आपल्या जीवनात कितीही समस्या असल्या, तरी आपल्याला चिंता करायची गरज नाही. तर चला, आपण आपलं लक्ष यहोवा देवावर लावू या, कारण तोच खऱ्या आनंदाचा स्रोत आहे!—स्तो. १४४:१५.
गीत १५५ सदासर्वदाचा आनंद
a “खरा आनंद यहोवाकडून मिळतो” ही चौकट पाहा.
b उदाहरणार्थ, २०२३ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #५ मध्ये ब्रदर डेनीस आणि सिस्टर आयरीना क्रिस्टेन्सन यांचा अनुभव पाहा.
c आणखी माहितीसाठी, १५ जुलै २००८ च्या टेहळणी बुरूज अंकातला “स्वतःकडून वाजवी अपेक्षा ठेवा व आनंदी राहा” हा लेख पाहा.
d चित्राचं वर्णन: एक बहीण स्वतःसाठी बऱ्याच गोष्टींची शॉपिंग करते. पण जेव्हा ती एका वृद्ध बहिणीसाठी फुलं विकत घेते तेव्हा तिला जास्त आनंद होतो.