अभ्यास लेख ४१
गीत १३ ख्रिस्ताचा आदर्श
येशूने पृथ्वीवर घालवलेल्या शेवटच्या ४० दिवसांमधून शिकायला मिळणारे धडे
“४० दिवसांच्या काळादरम्यान तो बऱ्याचदा त्यांना दिसला आणि त्यांच्याशी देवाच्या राज्याबद्दल बोलत राहिला.”—प्रे. कार्यं १:३.
या लेखात:
पृथ्वीवर असताना येशूने शेवटच्या ४० दिवसांमध्ये जे उदाहरण मांडलं त्याचं आपण अनुकरण कसं करू शकतो ते पाहा.
१-२. येशूचे दोन शिष्य अम्माऊसला जात असताना काय घडतं?
कल्पना करा, की इ.स. ३३ सालचा निसान महिन्याचा १६ वा दिवस आहे. येशूचे शिष्य खूप दुःखी आहेत. त्यासोबतच ते खूप घाबरलेले आहेत. त्यांच्यापैकी दोघे जण यरुशलेम सोडून जवळपास ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या अम्माऊस नावाच्या गावात जात आहेत. ते शिष्य खूप निराश आहेत. कारण ते ज्याचं अनुकरण करत होते त्या येशूलाच ठार मारण्यात आलं होतं. मसीहा आपल्यासाठी बऱ्याच चांगल्या गोष्टी करणार आहे अशी आशा त्यांना होती आणि आता ती धुसर झाल्यासारखी वाटत होती. पण लवकरच या माणसांना एक आश्चर्याचा धक्का बसणार होता.
२ तेवढ्यात एक अनोळखी माणूस त्यांच्याजवळ येतो आणि त्यांच्यासोबत चालू लागतो. येशूच्या बाबतीत घडलेल्या गोष्टी ते अगदी निराश होऊन त्या माणसाला सांगतात. मग तो माणूस अशा गोष्टी त्यांना सांगू लागतो, ज्या शिष्य कधीच विसरू शकणार नव्हते. “मोशेपासून सुरुवात करून सर्व संदेष्ट्यांची लिखाणं” स्पष्ट करत तो त्यांना मसीहाला दुःख सोसून का मरावं लागलं ते सांगतो. जेव्हा ती तीन माणसं अम्माऊसमध्ये पोचतात तेव्हा तो अनोळखी माणूस त्याची ओळख त्यांना सांगतो. तो सांगतो की तोच पुनरुत्थान झालेला येशू आहे. मसीहा जिवंत आहे हे कळताच त्या शिष्यांना किती आनंद झाला असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो!—लूक २४:१३-३५.
३-४. येशूच्या शिष्यांसोबत काय झालं आणि या लेखात आपण काय पाहणार आहोत? (प्रेषितांची कार्यं १:३)
३ पृथ्वीवर असताना शेवटच्या ४० दिवसांत येशू त्याच्या शिष्यांना बऱ्याचदा भेटला. (प्रेषितांची कार्यं १:३ वाचा.) त्या काळात येशूने दुःखी आणि घाबरलेल्या शिष्यांना खूप प्रोत्साहन दिलं. आणि यामुळे ते आनंदाने आणि धाडसाने राज्याचा आनंदाचा संदेश लोकांना सांगू शकले आणि शिकवू शकले.a
४ येशूच्या जीवनाच्या या रोमांचक काळाचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. या लेखात, येशूने (१) त्याच्या शिष्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, (२) शास्त्रवचनांची त्यांची समज वाढवण्यासाठी आणि (३) मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळायला त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी त्या वेळेचा उपयोग कसा केला ते पाहू या. तसंच, या प्रत्येक गोष्टीत आपण येशूच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकतो हेसुद्धा आपण पाहू या.
इतरांना प्रोत्साहन द्या
५. येशूच्या शिष्यांना प्रोत्साहनाची गरज का होती?
५ येशूच्या शिष्यांना प्रोत्साहनाची गरज होती. का बरं? कारण काहींनी येशूसोबत पूर्णवेळ राहण्यासाठी आपली घरंदारं, कुटुंबं आणि आपला व्यवसाय सोडून दिला होता. (मत्त. १९:२७) काही जणांना तर येशूचे शिष्य बनल्यामुळे वाळीत टाकल्यासारखी वागणूक दिली जात होती. (योहा. ९:२२) त्यांनी हे सगळे त्याग यासाठी केले होते, कारण त्यांचा विश्वास होता की येशूच वचन दिलेला मसीहा आहे. (मत्त. १६:१६) पण जेव्हा येशूला मृत्यूदंड देण्यात आला तेव्हा त्यांच्या सगळ्या आशा धुळीला मिळाल्या आणि ते खूप निराश झाले.
६. पुनरुत्थान झाल्यावर येशूने काय केलं?
६ येशूला आपल्या शिष्यांचं दुःख कळत होतं. त्याला माहीत होतं की त्यांचं हे दुःख विश्वासच्या कमतरतेमुळे नाही, तर त्याला गमावल्यामुळे आहे. म्हणून त्याच्या पुनरुत्थानाच्या दिवशीच त्याने शिष्यांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. उदाहरणार्थ, त्याच्या कबरेपुढे रडणाऱ्या मग्दालीया मरीयाला तो भेटला. (योहा. २०:११, १६) तसंच या लेखाच्या सुरुवातीला सांगितलेल्या त्या दोन शिष्यांनाही भेटला. शिवाय तो प्रेषित पेत्रलाही भेटला. (लूक २४:३४) मग आपण येशूच्या उदाहरणातून काय शिकू शकतो? तो पहिल्यांदा जेव्हा मग्दालीया मरीयाला भेटला तेव्हा काय घडलं त्याचा विचार करा.
७. योहान २०:११-१६ मध्ये सांगितल्याप्रमाणे निसान १६ च्या पहाटेला येशूला काय दिसलं आणि त्यामुळे त्याने काय केलं? (चित्रसुद्धा पाहा.)
७ योहान २०:११-१६ वाचा. निसान महिन्याच्या १६ व्या दिवशी भल्या पहाटे काही स्त्रीया येशूच्या कबरेजवळ आल्या. (लूक २४:१, १०) आता त्यांच्यापैकी मग्दालीया मरीयाच्या बाबतीत काय झालं याकडे लक्ष देऊ या. जेव्हा मरीया कबरेजवळ आली तेव्हा तिला ती रिकामी दिसली. हे पाहून ती धावत पेत्र आणि योहानला त्याबद्दल सांगायला गेली. आणि ते जेव्हा काय झालंय ते बघायला कबरेजवळ येत होते, तेव्हा तीसुद्धा त्यांच्या मागोमाग गेली. कबर रिकामी असल्याची खातरी झाल्यावर ते घरी परतले. पण मरीया तिथेच थांबली आणि रडू लागली. पण येशू आपल्याला पाहतोय हे तिला माहीतच नव्हतं. या विश्वासू स्त्रीला रडताना पाहून येशूला खूप वाईट वाटलं आणि त्याला तिचं सांत्वन करावंसं वाटलं. म्हणून तो तिच्यासमोर प्रकट झाला. आणि त्याने एक साधीशी गोष्ट करून तिला प्रोत्साहन दिलं. तो तिच्याशी बोलला आणि त्याने तिला एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली. त्याने तिला त्याच्या शिष्यांना पुनरुत्थानाची बातमी कळवायला सांगितली.—योहा. २०:१७, १८.
भाऊबहिणींच्या समस्यांकडे लक्ष देऊन आणि त्यांना सांत्वन देऊन येशूचं अनुकरण करा (परिच्छेद ७ पाहा)
८. आपण येशूचं अनुकरण कसं करू शकतो?
८ आपण येशूचं अनुकरण कसं करू शकतो? येशूप्रमाणेच आपण जर आपल्या भाऊबहिणींच्या समस्या समजून घेतल्या आणि त्यांच्याशी सहानुभूतीने बोललो, तर त्यांना यहोवाची सेवा करत राहायला प्रोत्साहन देण्यासाठी आपण बरंच काही करू शकतो. जोसलीन नावाच्या एका बहिणीचा अनुभव लक्षात घ्या. एका भयंकर अपघातात तिने तिच्या बहिणीला गमावलं. ती म्हणते: “बरेच महिने मला त्या धक्क्यातून सावरता आलं नाही.” पण एका भावाने आणि त्याच्या पत्नीने तिला त्यांच्या घरी बोलवलं, तिचं सहानुभूतीने ऐकून घेतलं आणि देवाच्या नजरेत ती किती मौल्यवान आहे, याची तिला खातरी करून दिली. ती पुढे सांगते: “मला असं वाटलं, की यहोवाने त्यांचा वापर करून मला समुद्रात उठलेल्या एका भयंकर वादळातून बाहेर काढून एका सुरक्षित लाईफ बोटमध्ये ठेवलं. त्यांनी माझ्या मनात यहोवाची सेवा करत राहण्याची इच्छा पुन्हा जिवंत केली.” आपणसुद्धा इतर जण जेव्हा त्यांचं मन आपल्यासमोर मोकळं करतात तेव्हा त्यांचं लक्ष देऊन ऐकू शकतो आणि त्यांच्याशी सहानुभूतीने बोलू शकतो. असं केल्यामुळे आपल्याला त्यांना यहोवाच्या सेवेत स्थिर करता येईल.—रोम. १२:१५.
शास्त्रवचनांचा वापर करून तर्क करा
९. येशूच्या शिष्यांना कोणत्या आव्हानाचा सामना करावा लागला आणि येशूने या बाबतीत त्यांना कशी मदत केली?
९ येशूच्या शिष्यांनी देवाचं वचन स्वीकारलं होतं आणि आपल्या जीवनात ते लागू करण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला होता. (योहा. १७:६) तरी येशूला वधस्तंभावर गुन्हेगारासारखं मरताना पाहून ते गोंधळून गेले. येशूच्या लक्षात आलं, की त्यांच्या मनात उठणाऱ्या या शंका विश्वासाच्या कमतरतेमुळे नसून शास्त्रवचनांची जास्त समज नसल्यामुळे होत्या. (लूक ९:४४, ४५; योहा. २०:९) त्यामुळे येशूने त्यांना शास्त्रवचनांवर तर्क करायला शिकवलं. अम्माऊसच्या रस्त्यावर तो जेव्हा दोन शिष्यांना भेटला तेव्हा त्याने हे कसं केलं ते लक्षात घ्या.
१०. येशूच मसीहा आहे हे येशूने त्याच्या शिष्यांना कसं पटवून दिलं? (लूक २४:१८-२७)
१० लूक २४:१८-२७ वाचा. लक्षात द्या, की येशूने त्या शिष्यांना तो कोण आहे हे लगेच सांगितलं नाही. याउलट, त्याने त्यांना प्रश्न विचारले. का बरं? कदाचित त्यांच्या मनात काय आहे, हे त्यांनी बोलून दाखवावं अशी त्याची इच्छा होती. आणि त्यांनी तेच केलं. त्यांनी येशूला सांगितलं, की तो इस्राएलला रोमी जुलमापासून मुक्त करेल अशी त्यांची अपेक्षा होती. म्हणून त्यांनी त्यांच्या चिंता व्यक्त केल्यानंतर येशूने शास्त्रवचनांचा वापर केला आणि जे काही घडलंय त्यामुळे बऱ्याच भविष्यवाण्या कशा पूर्ण झाल्या याबद्दल सांगितलं.b नंतर त्याच संध्याकाळी येशूने इतर शिष्यांना याबद्दल समजावून सांगितलं. (लूक २४:३३-४८) मग या अहवालातून आपण काय शिकू शकतो?
११-१२. (क) येशूने ज्या पद्धतीने बायबलची सत्यं इतरांना शिकवली त्यातून आपण काय शिकू शकतो? (चित्रंसुद्धा पाहा.) (ख) नॉर्टीच्या बायबल शिक्षकाने त्याला कशी मदत केली?
११ आपण येशूचं अनुकरण कसं करू शकतो? सगळ्यात आधी बायबल विद्यार्थ्यांना शिकवताना असे प्रश्न विचारा ज्यांमुळे तुम्हाला त्यांच्या मनातलं जाणून घेता येईल. (नीति. २०:५) त्यांच्या भावना समजून घेतल्यावर त्यांच्या परिस्थितीला लागू होतील अशी शास्त्रवचनं कशी शोधायची हे त्यांना दाखवा. पण काय करायचं हे त्यांना सांगू नका. त्याऐवजी शास्त्रवचनांवर तर्क कसा करायचा आणि बायबलमधली तत्त्वं आपल्या जीवनात कशी लागू करायची हे समजून घ्यायला त्यांना मदत करा. घानामधल्या नॉर्टी नावाच्या भावाचा अनुभव लक्षात घ्या.
१२ नॉर्टी १६ वर्षांचा होता तेव्हा त्याने बायबल अभ्यास करायला सुरुवात केली. पण लवकरच त्याला त्याच्या घरच्यांकडून विरोध होऊ लागला. मग कोणत्या गोष्टीमुळे त्याला ठाम राहायला मदत झाली? त्याच्यासोबत बायबल अभ्यास करणाऱ्या भावाने मत्तयच्या १० व्या अध्यायाचा वापर करून त्याला समजावलं, की खऱ्या ख्रिश्चनांचा छळ केला जाईल. नॉर्टी म्हणतो: “जेव्हा माझा छळ सुरू झाला तेव्हा मला खातरी पटली, की मला सत्य मिळालंय.” त्याच्या शिक्षकाने त्याला मत्तय १०:१६ वर तर्क करायला मदत केली. यामुळे त्याला घरच्यांसोबत धार्मिक विषयांवर चर्चा करत असताना सावध राहायला, पण त्यासोबतच आदराने बोलायला मदत झाली. त्याच्या बाप्तिस्म्यानंतर त्याला पायनियर सेवा करायची इच्छा होती. पण त्याने विद्यापीठात उच्च शिक्षण घ्यावं अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. नॉर्टीने काय केलं पाहिजे हे त्याला सांगण्याऐवजी त्या भावाने त्याला प्रश्न विचारून शास्त्रवचनांमधल्या तत्त्वांवर तर्क करायला मदत केली. मग याचा काय परिणाम झाला? नॉर्टीने पूर्णवेळच्या सेवेत जायचा निर्णय घेतला. हे ऐकून त्याच्या वडिलांनी त्याला घर सोडायला सांगितलं. मग या सगळ्या गोष्टींमुळे नॉर्टीला कसं वाटलं? तो म्हणतो: “मला याची खातरी पटली आहे, की मी अगदी योग्य निर्णय घेतलाय.” आपणसुद्धा इतरांना शास्त्रवचनांवर तर्क करायला मदत करण्यासाठी वेळ काढतो तेव्हा खरे ख्रिस्ती म्हणून स्वतःचा विश्वास भक्कम करण्यासाठी आपण त्यांना मदत करत असतो.—इफिस. ३:१६-१९.
इतरांना शास्त्रवचनांवर तर्क करायला मदत करून येशूचं अनुकरण करा (परिच्छेद ११ पाहा)e
“माणसांच्या रूपात भेटी” बनण्यासाठी भावांना मदत करा
१३. आपल्या पित्याने दिलेलं काम पुढे चालू राहावं म्हणून येशूने काय केलं? (इफिसकर ४:८)
१३ पृथ्वीवर असताना येशूने त्याच्या पित्याने दिलेलं काम अगदी चांगल्या प्रकारे पूर्ण केलं. (योहा. १७:४) ‘तुम्हाला जर एखादं काम चांगल्या प्रकारे पूर्ण करायचं असेल, तर तुम्ही ते स्वतःच केलं पाहिजे,’ अशी येशूची मनोवृत्ती नव्हती. त्याच्या साडेतीन वर्षांच्या सेवाकार्यात त्याने इतरांना काम करण्यासाठी प्रशिक्षण दिलं. स्वर्गात परतण्याआधी येशूने त्याच्या शिष्यांना एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली. त्यांच्यापैकी काही जण तर २० ते ३० च्या वयोगटातलेच होते. तरीसुद्धा त्याने त्यांच्यावर यहोवाच्या मौल्यवान मेंढरांना सांभाळण्याची आणि प्रचाराच्या आणि शिकवण्याच्या कामात पुढाकार घेण्याची जबाबदारी सोपवली. (इफिसकर ४:८ वाचा.) या समर्पित, एकनिष्ठ आणि मेहनती पुरुषांना “माणसांच्या रूपात भेटी” बनण्यासाठी मदत करायला येशूने त्याच्या शेवटच्या ४० दिवसांचा कसा वापर केला?
१४. पृथ्वीवरच्या शेवटच्या ४० दिवसांमध्ये येशूने त्याच्या शिष्यांना आध्यात्मिक रितीने प्रगती करण्यासाठी कशी मदत केली? (चित्रसुद्धा पाहा.)
१४ येशूने त्याच्या शिष्यांना स्पष्टच, पण प्रेमाने सल्ला दिला. उदाहरणार्थ, त्याच्या लक्षात आलं की त्यांच्यापैकी काही जणांमध्ये शंका घेण्याची वृत्ती आहे. त्यामुळे त्याने त्यांना सल्ला दिला. (लूक २४:२५-२७; योहा. २०:२७) तसंच त्याने त्यांना सांगितलंय की त्यांनी धनसंपत्ती मिळवण्याऐवजी यहोवाच्या लोकांची काळजी घेण्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. (योहा. २१:१५) शिवाय यहोवाच्या सेवेत इतरांना कोणते बहुमान मिळत आहेत याबद्दल त्यांनी विनाकारण चिंता करत बसू नये, याचीही त्याने त्यांना आठवण करून दिली. (योहा. २१:२०-२२) तसंच त्याने शिष्यांच्या मनात असलेल्या राज्याबद्दलच्या चुकीच्या कल्पनाही सुधारल्या आणि त्यांना आनंदाच्या संदेशावर लक्ष लावायला मदत केली. (प्रे. कार्यं १:६-८) मग मंडळीतले वडील येशूकडून काय शिकू शकतात?
आणखी जबाबदाऱ्यांसाठी पात्र ठरायला भावांना मदत करून येशूचं अनुकरण करा (परिच्छेद १४ पाहा)
१५-१६. (क) मंडळीतले वडील कोणत्या मार्गांनी येशूचं अनुकरण करू शकतात? समजावून सांगा. (ख) पॅट्रीकला सल्ला मिळाल्यामुळे कसा फायदा झाला?
१५ मंडळीतले वडील येशूचं अनुकरण कसं करू शकतात? त्यांनी भावांना, अगदी तरुण भावांनासुद्धा मंडळीतल्या मोठ्या जबाबदाऱ्या हाताळण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहीजे.c या भावांकडून कोणतीच चूक होऊ नये अशी अपेक्षा वडील त्यांच्याकडून करत नाहीत. तसंच मंडळीतले वडील त्यांना प्रेमळपणे प्रशिक्षणही देतात. यामुळे त्यांना नम्र, भरवशालायक राहायला आणि इतरांची सेवा करण्यासाठी पुढे यायला मदत होते.—१ तीम. ३:१; २ तीम. २:२; १ पेत्र ५:५.
१६ पॅट्रीक नावाच्या एका भावाला सल्ला स्वीकारल्यामुळे कसा फायदा झाला त्याचा विचार करा. तरुण असताना तो अगदी बहिणींशीसुद्धा खूप कठोरपणे आणि उद्धटपणे बोलायचा. पॅट्रीकचा हा स्वभाव एका अनुभवी वडिलांच्या लक्षात आला आणि त्यांनी त्याला अगदी प्रेमाने पण स्पष्टपणे सल्ला दिला. पॅट्रीक म्हणतो: “बरं झालं त्यांनी मला हा सल्ला दिला. मला हवे असलेले बहुमान इतरांना मिळत आहेत हे पाहून मी खूप निराश व्हायचो. पण वडिलांच्या सल्ल्यामुळे मला हे समजून घ्यायला मदत झाली, की मी मंडळीत बहुमान किंवा पद मिळवण्याऐवजी नम्रपणे भाऊबहिणींची सेवा करण्यावर लक्ष दिलं पाहिजे.” याचा परिणाम असा झाला की पॅट्रीक २३ वर्षांचा असतानाच त्याला वडील म्हणून नेमण्यात आलं.—नीति. २७:९.
१७. येशूचा आपल्या शिष्यांवर भरवसा आहे हे त्याने कसं दाखवलं?
१७ येशूने त्याच्या शिष्यांना फक्त प्रचाराचीच नाही तर शिकवण्याचीही जबाबदारी सोपवली. (मत्तय २८:२० ची हिंदीमधली “उन्हें . . . सिखाओ” ही अध्ययन नोट पाहा.) आपण या जबाबदारीसाठी पात्र नाही असं शिष्यांना कदाचित वाटलं असेल. पण शिष्य ही जबाबदारी पार पाडू शकतात याबद्दल येशूला अजिबात शंका नव्हती. आणि त्याने त्यांना तसं सांगितलंही. त्यांच्यावरचा भरवसा व्यक्त करताना येशूने म्हटलं: “जसं पित्याने मला पाठवलंय, तसं मीही तुम्हाला पाठवतोय.”—योहा. २०:२१.
१८. मंडळीतले वडील येशूचं अनुकरण कसं करू शकतात?
१८ मंडळीतले वडील येशूचं अनुकरण कसं करू शकतात? अनुभवी वडील इतरांना जबाबदाऱ्या सोपवतात. (फिलिप्पै. २:१९-२२) उदाहरणार्थ, मंडळीतले वडील सभागृहाच्या साफसफाईच्या कामात आणि देखभालीच्या कामात तरुण भावांना सामील करून घेऊ शकतात. ते भावांना एखादं काम सोपवल्यानंतर त्या कामाचं प्रशिक्षण देऊ शकतात. आणि भरवसा ठेवू शकतात की ते नेमून दिलेलं काम व्यवस्थितपणे पार पाडतील. नवीनच वडील म्हणून नेमलेला मॅथ्यू नावाचा एक भाऊ म्हणतो, की ज्या वडिलांनी त्याला जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रशिक्षण दिलं आणि त्याच्यावर पूर्णपणे भरवसा ठेवला त्यांची तो मनापासून कदर करतो. तो म्हणतो: “मी ज्या चुका करत होतो त्या चुकांकडे त्यांनी माझ्या प्रशिक्षणाचाच एक भाग म्हणून पाहिलं आणि मला सुधारण्यासाठी मदत केली. याचा मला खूप फायदा झाला.”d
१९. आपण काय करायचा निश्चय केला पाहिजे?
१९ येशूने पृथ्वीवरचे आपले शेवटचे ४० दिवस इतरांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना शिकवण्यासाठी आणि प्रशिक्षण देण्यासाठी वापरले. आपणसुद्धा येशूच्या उदाहरणाचं जवळून अनुकरण करायचा निश्चय केला पाहिजे. (१ पेत्र २:२१) त्यासाठी येशू नक्कीच आपल्याला मदत करेल. कारण शेवटी त्याने असं अभिवचन दिलं: “जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीपर्यंत मी नेहमी तुमच्यासोबत असेन.”—मत्त. २८:२०.
गीत १५ याहाचा जो एकुलता त्याची स्तुती करा
a पुनरुत्थान झाल्यावर येशू बऱ्याचदा आपल्या शिष्यांना भेटला, असं आनंदाच्या संदेशाच्या पुस्तकांतून आणि बायबलच्या इतर पुस्तकांतून कळतं. जसं की, तो मग्दालीया मरीयाला (योहा. २०:११-१८); इतर स्त्रियांना (मत्त. २८:८-१०; लूक २४:८-११); २ शिष्यांना (लूक २४:१३-१५); पेत्रला (लूक २४:३४); थोमासोडून इतर प्रेषितांना (योहा. २०:१९-२४); सगळ्या प्रेषितांना ज्यांत थोमासुद्धा होता (योहा. २०:२६); ७ शिष्यांना (योहा. २१:१, २); ५०० पेक्षा जास्त शिष्यांना (मत्त. २८:१६; १ करिंथ. १५:६); त्याचा भाऊ याकोबला (१ करिंथ. १५:७); सगळ्या प्रेषितांना (प्रे. कार्यं १:४) आणि बेथानीजवळ असलेल्या प्रेषितांना भेटला. (लूक २४:५०-५२) येशू कदाचित इतर वेळीही शिष्यांना भेटला असेल, पण त्याबद्दल बायबलमध्ये काही सांगितलेलं नाही.—योहा. २१:२५.
b मसीहाबद्दलच्या भविष्यवाण्यांची सूची पाहण्यासाठी jw.org वर असलेला “मसीहाबद्दलच्या भविष्यवाण्यांवरून हे सिद्ध होतं का की येशूच मसीहा आहे?” हा लेख पाहा.
c काही वेळा २५ ते ३० वयोगटातल्या तरुण वडिलांनाही विभागीय पर्यवेक्षक म्हणून नियुक्त केलं जाऊ शकतं. पण या भावांना वडील म्हणून सेवा करण्याचा चांगला अनुभव असला पाहिजे.
d तरुण भावांना जबाबदाऱ्यांसाठी पात्र ठरायला मदत करण्याबद्दल आणखीन सल्ले हवे असतील, तर ऑगस्ट २०१८ च्या टेहळणी बुरूज अंकातले पान ११-१२ वर असलेले परिच्छेद १५-१७ पाहा, तसंच १५ एप्रिल २०१५ च्या अंकातली ३-१३ पानांवरची माहिती पाहा.
e चित्राचं वर्णन: शास्त्रवचनांवर तर्क करायला मदत केल्यानंतर, एक बायबल विद्यार्थी नाताळाच्या सजावटीचं सर्व सामान कचरापेटीत फेकून द्यायचा निर्णय घेतो.