वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w24 सप्टेंबर पृ. २०-२५
  • तुम्ही इशाऱ्‍यांकडे लक्ष देत आहात का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही इशाऱ्‍यांकडे लक्ष देत आहात का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मेंढरं आणि बकऱ्‍या
  • समजदार आणि मूर्ख कुमारी
  • तालान्त
  • कोणाला “घेतलं जाईल”?
  • इशाऱ्‍यांकडे लक्ष द्या
  • तुम्ही “जागृत” राहाल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • दक्ष आणि कष्टाळू असा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • ‘विश्‍वासू दास’ परीक्षा पार करतो!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • रुपयांच्या दाखल्यातून आपण काय शिकतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
w24 सप्टेंबर पृ. २०-२५

अभ्यास लेख ३८

गीत २५ एक खास प्रजा

तुम्ही इशाऱ्‍यांकडे लक्ष देत आहात का?

“एकाला घेतलं जाईल आणि दुसऱ्‍याला सोडून दिलं जाईल.”—मत्त. २४:४०.

या लेखात:

आपण येशूच्या तीन दाखल्यांवर चर्चा करणार आहोत. तसंच, या जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीला जो न्यायाचा काळ असेल, त्याच्याशी यांचा कसा संबंध आहे हेही पाहणार आहोत.

१. लवकरच येशू काय करणार आहे?

आज आपण एका रोमांचक काळात जगत आहोत. लवकरच येशू प्रत्येक व्यक्‍तिचा न्याय करेल. आणि या न्यायाच्या आधी कोणकोणत्या घडामोडी घडतील हे त्याने सांगितलंय. त्यासाठी त्याने शिष्यांना त्याच्या अदृश्‍य उपस्थितीचं आणि जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीचं “चिन्ह” दिलं. (मत्त. २४:३) या चिन्हाबद्दल आपल्याला मत्तयच्या २४ आणि २५ अध्यायात तसंच मार्कच्या १३ आणि लूकच्या २१ अध्यायात वाचायला मिळतं.

२. या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत आणि त्यामुळे आपल्याला कशी मदत होईल?

२ येशूने तीन दाखल्यांचा वापर करून आपल्याला इशारे दिले आहेत आणि तयार राहायला मदत केली आहे. त्याने मेंढरं आणि बकऱ्‍या, समजदार आणि मूर्ख कुमारी आणि तालान्तांचे दाखले दिले आहेत. या प्रत्येक दाखल्यातून एका व्यक्‍तीचा न्याय, ती व्यक्‍ती कशी वागते यावर कसा अवलंबून आहे, हे समजून घ्यायला आपल्याला मदत होईल. या तीन दाखल्यांचा अभ्यास करत असताना त्यांतून आपण कोणते धडे शिकू शकतो आणि ते कसे लागू करू शकतो हे पाहू या. सगळ्यात आधी आपण मेंढरं आणि बकऱ्‍यांच्या दाखल्यावर चर्चा करू या.

मेंढरं आणि बकऱ्‍या

३. येशू लोकांचा न्याय कधी करेल?

३ मेंढरं आणि बकऱ्‍यांच्या दाखल्यातून येशूने अशा लोकांच्या न्यायाबद्दल सांगितलं ज्यांना आनंदाच्या संदेशाला प्रतिसाद द्यायची आणि अभिषिक्‍त बांधवांना पाठिंबा द्यायची संधी आहे. (मत्त. २५:३१-४६) तो हा न्याय ‘मोठ्या संकटाच्या’ दरम्यान आणि हर्मगिदोनच्या आधी करेल. (मत्त. २४:२१) जसं मेंढपाळ मेंढरांना बकऱ्‍यांपासून वेगळं करतो, तसं येशू अभिषिक्‍त भावांना एकनिष्ठपणे पाठिंबा देणाऱ्‍यांना आणि न देणाऱ्‍यांना एकमेकांपासून वेगळं करेल.

४. यशया ११:३, ४ प्रमाणे येशू लोकांचा नीतीने न्याय करेल अशी खातरी आपण का बाळगू शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)

४ यहोवाचा नियुक्‍त न्यायाधीश या नात्याने येशू लोकांचा नीतीने न्याय करेल असं बायबल सांगतं. (यशया ११:३, ४ वाचा.) तो लोकांच्या वागण्या-बोलण्याचं आणि स्वभावाचं, तसंच ते अभिषिक्‍त भावांशी कसं वागतात यांचं परीक्षण करेल. (मत्त. १२:३६, ३७; २५:४०) त्यामुळे येशूला त्याच्या अभिषिक्‍त भावांना आणि त्यांच्या कामाला कोण पाठिंबा देत आहे हे माहीत होईल.a त्यांना पाठिंबा देण्याचा एक मार्ग म्हणजे प्रचारकार्यात त्यांना मदत करणं. जे त्याच्या कार्याला पाठिंबा देतात त्यांना तो “नीतिमान” म्हणून या पृथ्वीवर ‘सर्वकाळच्या जीवनाची’ आशा देतो. (मत्त. २५:४६; प्रकटी. ७:१६, १७) जे आपली एकनिष्ठता टिकवून ठेवतात त्यांच्यासाठी हा किती अद्‌भुत आशीर्वाद आहे! मोठ्या संकटादरम्यान आणि त्यानंतरही विश्‍वासू राहिल्यामुळे त्यांची नावं “जीवनाच्या पुस्तकात” लिहिली जातात.—प्रकटी. २०:१५.

येशू पृथ्वीच्या वर असलेल्या सिंहासनावर बसलाय. तो लोकांच्या दोन गटांकडे बघतोय. कोलाज: भाऊबहीण यहोवाची उपासना करत आहेत. १. एका बहिणीच्या हातात टॅब आहे आणि ती आकाशाकडे बघत आहे. २. एक जोडपं बायबल वाचत आहे. ३. भाऊबहीण संघटनेच्या बांधकाम प्रकल्पासाठी काम करत आहेत. ४. तुरुंगात असलेला एक भाऊ प्रार्थना करतोय. ५. एक वयस्कर बहीण सभेत उत्तरं देत आहे. ६. हॉस्पिटलमध्ये आजारी असलेली एक बहीण तिथे काम करणाऱ्‍या स्त्रीला पत्रिका देत आहे. ७. एक वडील त्याच्या कुटुंबासोबत अभ्यास करत आहे. कोलाज: काही स्त्री-पुरुष बायबल तत्त्वांच्या विरुद्ध वागत आहेत. १. एक माणूस जुगार खेळताना प्रार्थना करतोय. २. एक माणूस एका स्त्रीला मारतोय. ३. आंदोलक संतापलेले आहेत. ४. हातात बंदूक असलेला माणूस एका स्त्रीचा पाठलाग करतोय. ५. एक पाळक सैनिकांसाठी प्रार्थना करतोय. ६. एक स्त्री ड्रग्ज घेत आहे.

येशू लवकरच लोकांचा न्याय करेल; त्यावरून कळेल की ते बकऱ्‍यांसारखे आहेत की मेंढरांसारखे (परिच्छेद ४ पाहा)


५. मेंढरं आणि बकऱ्‍यांच्या दाखल्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं आणि याचा कोणाला फायदा होऊ शकतो?

५ विश्‍वासू आणि एकनिष्ठ असल्याचं दाखवून द्या. येशूने मेंढरं आणि बकऱ्‍यांचा दिलेला दाखला खरंतर पृथ्वीवरची आशा असणाऱ्‍यांना लागू होतो. ते ख्रिस्ताच्या भावांना प्रचारकार्यात मदत करतात. तसंच, येशूने निवडलेला अभिषिक्‍त बांधवांचा लहान गट करत असलेलं नेतृत्व एकनिष्ठपणे स्वीकारतात. या दोन गोष्टी करून ते त्यांचा विश्‍वास दाखवून देतात. (मत्त. २४:४५) ज्यांना स्वर्गाची आशा आहे त्यांनासुद्धा या दाखल्यात दिलेल्या इशाऱ्‍याकडे लक्ष देण्याची गरज आहे. का बरं? कारण येशू त्यांच्याही वागण्या-बोलण्याकडे आणि स्वभावाकडे लक्ष देतो आणि त्यांनाही विश्‍वासू असल्याचं दाखवून द्यावं लागेल. खरंतर येशूने असे आणखी दोन दाखले दिले आहेत, ज्यांत अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांसाठी काही विशिष्ट इशारे दिले आहेत. हे दाखलेसुद्धा आपल्याला मत्तयच्या २५ व्या अध्यायात वाचायला मिळतात. आता आपण समजदार आणि मूर्ख कुमारींच्या दाखल्यावर चर्चा करू या.

समजदार आणि मूर्ख कुमारी

६. पाच कुमारींनी समजदार असल्याचं कसं दाखवून दिलं? (मत्तय २५:६-१०)

६ कुमारींच्या दाखल्यात येशूने अशा दहा कुमारींबद्दल सांगितलं, ज्या नवऱ्‍या मुलाला भेटायला निघाल्या होत्या. नवरा मुलगा लग्नाच्या मेजवानीत आपल्याला घेऊन जाईल अशी त्या सगळ्यांना आशा होती. (मत्त. २५:१-४) येशूने पाच जणींना “समजदार” म्हटलं आणि इतर पाच जणींना “मूर्ख” म्हटलं. समजदार कुमारी तयार होत्या आणि सतर्क होत्या. नवरा मुलगा रात्री कितीही उशीरा आला तरी त्या वाट पाहायला तयार होत्या. त्यामुळे त्यांनी अंधारात प्रकाश देण्यासाठी दिवे आणले होते. इतकंच काय तर नवऱ्‍या मुलाला यायला उशीर झाला तर त्यासाठी त्यांनी जास्त तेलसुद्धा आणलं होतं. यावरून कळतं, की त्या आपले दिवे पेटते ठेवण्यासाठी तयार होत्या. (मत्तय २५:६-१० वाचा.) जेव्हा नवरा मुलगा आला तेव्हा समजदार कुमारी लग्नाच्या मेजवानीला त्याच्यासोबत गेल्या. त्याच प्रकारे जे अभिषिक्‍त ख्रिस्ती येशू येईपर्यंत सतर्क आणि विश्‍वासू राहून तयार असल्याचं दाखवतील त्यांना बक्षीस मिळेल. ते बक्षीस म्हणजे हे अभिषिक्‍त ख्रिस्ती नवऱ्‍या मुलासोबत म्हणजे येशूसोबत त्याच्या स्वर्गातल्या राज्यात सामील होतील.b (प्रकटी. ७:१-३) पण मग त्या पाच मूर्ख कुमारींचं काय?

७. पाच मूर्ख कुमारींचं काय झालं आणि का?

७ मूर्ख कुमारी समजदार कुमारींसारख्या नव्हत्या. त्यांचे दिवे विझणार होते आणि स्वतःसोबत त्यांनी जास्त तेलही आणलं नव्हतं. जेव्हा त्यांना कळलं, की आता नवरा मुलगा लवकरच येणार आहे तेव्हा त्या तेल आणायला गेल्या. आणि नवरा मुलगा आला तरी त्या परत आल्या नव्हत्या. पण “ज्या कुमारी तयार होत्या त्या त्याच्यासोबत लग्नाच्या मेजवानीला आत गेल्या आणि दार बंद करण्यात आलं.” (मत्त. २५:१०) नंतर जेव्हा मूर्ख कुमारी परत आल्या तेव्हा त्यांनाही आत जायचं होतं. पण नवरा मुलगा त्यांना म्हणाला: “मी तुम्हाला ओळखत नाही.” (मत्त. २५:११, १२) या कुमारी, नवरा मुलगा येईपर्यंत त्याची वाट पाहायला तयार नव्हत्या. मग यातून अभिषिक्‍त जनांना काय शिकायला मिळतं?

८-९. कुमारींच्या दाखल्यातून अभिषिक्‍तांना कोणती गोष्ट शिकायला मिळते? (चित्रसुद्धा पाहा.)

८ तयार आणि सतर्क असल्याचं दाखवून द्या. इथे येशू अभिषिक्‍तांमध्ये दोन गट असतील असं म्हणत नव्हता. म्हणजे, एक जगाच्या समाप्तीपर्यंत वाट पाहायला तयार असणारा गट असेल आणि दुसरा तसं करायला तयार नसणारा गट असेल, असं तो सांगत नव्हता. याउलट, अभिषिक्‍त जन शेवटपर्यंत धीर धरून विश्‍वासू राहायला तयार नसतील तर त्यांचं काय होईल, हे तो सांगत होता. जर ते शेवटपर्यंत विश्‍वासू राहिले नाहीत, तर त्यांना त्यांचं बक्षीस मिळणार नव्हतं. (योहा. १४:३, ४) ही खरंच एक गंभीर गोष्ट आहे! आपल्याला स्वर्गातली आशा असो किंवा पृथ्वीवरची, आपण सगळ्यांनीच कुमारींच्या या दाखल्यातून मिळणाऱ्‍या इशाऱ्‍यांकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्यापैकी प्रत्येकाने शेवटपर्यंत धीर धरण्यासाठी जागं राहिलं पाहिजे आणि तयार असलं पाहिजे.—मत्त. २४:१३.

९ कुमारींच्या दाखल्यातून सतर्क आणि तयार राहणं किती महत्त्वाचं आहे, यावर जोर दिल्यानंतर येशूने तालान्तांचा दाखला दिला. या दाखल्यात आपण मेहनती असलं पाहिजे यावर जोर दिला आहे.

एक भाऊ बातम्या बघतोय आणि बायबलमध्ये वाचलेल्या गोष्टींशी त्यांची तुलना करतोय. बाजूला गोल आकाराच्या चित्रात दहा कुमारींचा दाखला दाखवलाय.

आपल्यापैकी प्रत्येकाने तयार आणि सतर्क राहून कुमारींच्या दाखल्यातून मिळणारा इशारा गंभीरतेने घेतला पाहिजे आणि शेवटपर्यंत धीर धरला पाहिजे (परिच्छेद ८-९ पाहा)


तालान्त

१०. दोन दासांनी विश्‍वासू असल्याचं कसं दाखवून दिलं? (मत्तय २५:१९-२३)

१० तालान्तांच्या दाखल्यात येशूने तीन दासांबद्दल सांगितलं. त्यातले दोन त्यांच्या मालकाला विश्‍वासू होते आणि एक नव्हता. (मत्त. २५:१४-१८) दोन दासांनी मालकाचे पैसे वाढवण्यासाठी मेहनत घेतली आणि विश्‍वासू असल्याचं दाखवून दिलं. परदेशी जाण्याआधी त्यांच्या मालकाने त्यांना बरेच पैसे (तालान्त) दिले होते. तीन दासांपैकी दोन दास मेहनती होते आणि त्यांनी त्या पैशांचा चांगला वापर केला. मग याचा काय परिणाम झाला? जेव्हा त्यांचा मालक परत आला, तेव्हा त्याला द्यायला त्यांच्याकडे दुप्पट रक्कम होती. याबद्दल मालकाने त्यांची प्रशंसा केली आणि त्यांना आपल्या “आनंदात सहभागी” करून घेतलं. (मत्तय २५:१९-२३ वाचा.) पण तिसऱ्‍या दासाबद्दल काय? त्याने मालकाच्या पैशांचं काय केलं?

११. “आळशी” दासाचं काय झालं आणि का?

११ तिसऱ्‍या दासाला एक तालान्त मिळाला होता. पण तो “आळशी” होता. त्याला मिळालेल्या तालान्ताचा त्याने चांगला वापर करावा अशी त्याच्या मालकाची अपेक्षा होती. पण त्याऐवजी त्याने ते पैसे जमिनीत पुरले. मालक जेव्हा परत आला तेव्हा त्या दासाकडे आपल्या मालकाला द्यायला त्या एका तालान्ताशिवाय आणखी काहीच नव्हतं. तसंच, त्या दासाची मनोवृत्तीसुद्धा चांगली नव्हती. मालकाची संपत्ती वाढवता आली नाही म्हणून माफी मागण्याऐवजी त्याने अन्यायीपणे मालकाला “तुम्ही कठोर आहात,” असं म्हटलं. त्या दासाची ही गोष्ट मालकाला आवडली नाही. म्हणून मालकाने त्याला दिलेला तालान्त परत घेतला आणि त्याला घरातून हाकलून दिलं.—मत्त. २५:२४, २६-३०.

१२. आज दोन विश्‍वासू दास कोणाला सूचित करतात?

१२ या दाखल्यातले दोन विश्‍वासू दास अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना सूचित करतात. म्हणून मालक असलेला येशू त्यांना आपल्या ‘आनंदात सहभागी व्हायला’ सांगतो. त्यामुळे स्वर्गातलं बक्षीस मिळवण्यासाठी पहिल्या पुनरुत्थानात त्यांना उठवलं जातं. (मत्त. २५:२१, २३; प्रकटी. २०:५ख) दुसऱ्‍या बाजूला आळशी दासाच्या उदाहरणातून अभिषिक्‍तांना एक इशारा मिळतो. तो कसा?

१३-१४. तालान्तांच्या दाखल्यातून अभिषिक्‍त जनांना काय शिकायला मिळतं? (चित्रसुद्धा पाहा.)

१३ मेहनती असल्याचं दाखवून द्या. या ठिकाणी येशूला असं म्हणायचं नव्हतं, की अभिषिक्‍त जन पुढे जाऊन आळशी बनतील. उलट, त्यांचा आवेश जर कमी झाला तर काय होईल हे त्याला सांगायचं होतं. त्यांचा आवेश जर कमी झाला तर त्यांच्या “बोलावलं जाण्याचा आणि निवडलं जाण्याचा,” बहुमान ते गमावून बसणार होते आणि स्वर्गातल्या राज्यात त्यांना प्रवेश मिळणार नव्हता.—२ पेत्र १:१०.

१४ येशूने दिलेल्या कुमारींच्या आणि तालान्तांच्या दाखल्यात त्याने हे स्पष्ट केलं, की सर्व अभिषिक्‍त जनांनी तयार आणि सतर्क राहण्यासोबतच मेहनती असणंसुद्धा गरजेचं होतं. पण याशिवाय येशूने अभिषिक्‍तांसाठी इशारा ठरेल असं अजून काही सांगितलं होतं का? हो. मत्तय २४:४०, ४१ मध्ये येशूने जे म्हटलं त्यात आपल्याला तो इशारा वाचायला मिळतो.

एक अभिषिक्‍त बहीण एका स्त्रीसोबत बायबल अभ्यास करत आहे. बाजूला गोल आकाराच्या चित्रात येशूचा तालान्तांचा दाखला दाखवलाय.

येशूची इच्छा आहे की अभिषिक्‍त जनांनी शेवटपर्यंत मेहनत घ्यावी (परिच्छेद १३-१४ पाहा)d


कोणाला “घेतलं जाईल”?

१५-१६. अभिषिक्‍त जनांना सावध राहण्याची गरज आहे हे समजून घ्यायला मत्तय २४:४०, ४१ मधून कशी मदत होते?

१५ या तीन दाखल्यांबद्दल बोलण्याआधी येशूने अभिषिक्‍तांच्या शेवटल्या न्यायाबद्दल सांगितलं. या न्यायातून कोणाला संमती मिळेल हे त्यातून दिसून येणार होतं. त्याने शेतात काम करणाऱ्‍या दोन माणसांबद्दल आणि जात्यावर दळणाऱ्‍या दोन स्त्रियांबद्दल सांगितलं. ही दोन्ही माणसं एकसारखं काम करत होती आणि दोन स्त्रियाही एकसारखं काम करत होत्या. पण त्या दोन्ही स्त्रियांपैकी आणि माणसांपैकी ‘एकाला घेतलं जाणार होतं आणि दुसऱ्‍याला सोडून दिलं जाणार होतं’ असं येशूने म्हटलं. (मत्तय २४:४०, ४१ वाचा.) मग येशूने आपल्या शिष्यांना असं सांगितलं: “म्हणून जागे राहा, कारण तुमचा प्रभू कोणत्या दिवशी येतोय हे तुम्हाला माहीत नाही.” (मत्त. २४:४२) कुमारींचा दाखला दिल्यानंतर येशूने असंच काहीतरी सांगितलं. (मत्त. २५:१३) मग या दोन्ही ठिकाणी त्याने जे म्हटलं त्याचा एकमेकांशी काही संबंध होता का? संबंध होता असं दिसतं. कारण फक्‍त प्रामाणिक आणि विश्‍वासू अभिषिक्‍त जनांनाच ‘घेतलं जाणार’ होतं म्हणजे येशू स्वर्गातल्या राज्यात त्यांना प्रवेश देणार होता.—योहा. १४:३.

१६ सावध असल्याचं दाखवून द्या. जे अभिषिक्‍त जन आध्यात्मिक रितीने सावध राहत नाहीत त्यांना “निवडलेल्या” लोकांसोबत गोळा केलं जाणार नाही. (मत्त. २४:३१) ही गोष्ट देवाच्या सगळ्याच सेवकांना लागू होते; मग त्यांची आशा स्वर्गातली असो किंवा पृथ्वीवरची. येशूने सावध आणि विश्‍वासू राहण्याबद्दल जे सांगितलं त्या गोष्टीला त्यांनी एक इशारा म्हणून घेतलं पाहिजे.

१७. यहोवा त्याच्या पवित्र शक्‍तीद्वारे एका व्यक्‍तीला कधी अभिषिक्‍त करतो, याबद्दल आपल्याला चिंता करायची गरज का नाही?

१७ आपण यहोवाला चांगल्या प्रकारे ओळखल्यामुळे त्याच्या न्याय करायच्या पद्धतीवर आपला पूर्ण भरवसा आहे. यहोवाने काही जणांना अभिषिक्‍त म्हणून जर अलीकडच्या वर्षांमध्ये निवडलंय, तर त्याबद्दल आपल्याला चिंता करायची गरज नाही.c कारण द्राक्षमळ्याच्या उदाहरणात येशूने अकराव्या तासाला आलेल्या मजुरांबद्दल काय म्हटलं होतं, ते आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे. (मत्त. २०:१-१६) दिवसाच्या अगदी शेवटच्या तासाला आलेल्या मजुरांना, दिवसाच्या सुरुवातीला आलेल्या मजुरांइतकीच मजुरी देण्यात आली होती. त्याचप्रमाणे, जेव्हा एक अभिषिक्‍त व्यक्‍ती शेवटपर्यंत विश्‍वासू राहते तेव्हा तिला स्वर्गातल्या जीवनाचं बक्षीस दिलं जाईल, मग ती कधीही अभिषिक्‍त झाली असली तरीही.

इशाऱ्‍यांकडे लक्ष द्या

१८-१९. या लेखात चर्चा करण्यात आलेल्या दाखल्यांमधून आपल्याला काय शिकायला मिळालं?

१८ आत्तापर्यंत आपण काय शिकलो? पृथ्वीवर कायमचं जीवन जगायची आशा असणाऱ्‍यांना येशूच्या मेंढरं आणि बकऱ्‍यांच्या दाखल्यातून एक महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळते. ती म्हणजे त्यांनी आत्ता आणि येणाऱ्‍या मोठ्या संकटाच्या काळात यहोवाला विश्‍वासू आणि एकनिष्ठ राहण्याची गरज आहे. कारण भविष्यात जेव्हा मोठं संकट सुरू होईल तेव्हा येशू न्याय करेल आणि विश्‍वासू असलेल्यांना ‘सर्वकाळाच्या जीवनासाठी’ योग्य ठरवेल.—मत्त. २५:४६.

१९ आपण दोन दाखल्यांवरही विचार केला, ज्यांमध्ये अभिषिक्‍त जनांना इशारा देण्यात आला होता. येशूने दिलेल्या समजदार आणि मूर्ख कुमारींच्या दाखल्यात पाच कुमारी समजदार होत्या, म्हणजेच त्या तयार आणि सतर्क होत्या. तसंच, नवऱ्‍या मुलाला यायला कितीही वेळ लागला तरी त्या वाट पाहायला तयार होत्या. पण मूर्ख कुमारी मात्र तयार नव्हत्या. त्यामुळे जेव्हा नवरा मुलगा आला तेव्हा त्याने लग्नाच्या मेजवानीला त्यांना सोबत घेतलं नाही. आज आपणसुद्धा, येशू या जगाच्या व्यवस्थेचा नाश करेपर्यंत कितीही वेळ लागला तरी वाट पाहायला तयार असलं पाहिजे. तसंच, येशूच्या तालान्तांच्या दाखल्यात आपण मेहनती असणाऱ्‍या दोन विश्‍वासू दासांबद्दल पाहिलं. त्यांनी आपल्या मालकासाठी मेहनत घेतली आणि त्याची पसंती मिळवली. पण आळशी दासाने मात्र तसं काही केलं नाही. यावरून आपल्याला काय शिकायला मिळतं? आपणसुद्धा शेवट येईपर्यंत यहोवाच्या सेवेत व्यस्त राहिलं पाहिजे. शेवटी आपण हेसुद्धा पाहिलं की अभिषिक्‍तांना स्वर्गातलं बक्षीस मिळवण्यासाठी येशूद्वारे वर “घेतलं जाईल.” पण त्यासाठी त्यांना सावध राहण्याची गरज आहे. म्हणूनच स्वर्गात येशूसोबत “एकत्र केलं” जाण्यासाठी ते खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. आणि हर्मगिदोनाच्या युद्धानंतर ते कोकऱ्‍याच्या लग्नात येशूची वधू म्हणून सहभाग घेतील.—२ थेस्सलनी. २:१; प्रकटी. १९:९.

२०. जे यहोवाच्या इशाऱ्‍यांकडे लक्ष देतात त्यांच्यासाठी तो काय करेल?

२० न्यायाचा दिवस झपाट्याने जवळ येत असला, तरी आपल्याला घाबरण्याची गरज नाही. कारण आपण जर विश्‍वासू राहिलो तर स्वर्गातला आपला प्रेमळ पिता “मनुष्याच्या मुलासमोर उभं राहता यावं” म्हणून आपल्याला “असाधारण सामर्थ्य” देईल. (२ करिंथ. ४:७; लूक २१:३६) आपली आशा स्वर्गातली असो किंवा पृथ्वीवरची, आपण जर येशूने दिलेल्या दाखल्यातल्या इशाऱ्‍यांकडे लक्ष दिलं, तर आपण आपल्या पित्याचं मन आनंदित करू. यहोवाच्या अपार दयेमुळे आपली ‘नावं जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली’ दिसतील.—दानी. १२:१; प्रकटी. ३:५.

खाली दिलेल्या दाखल्यांमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?

  • मेंढरं आणि बकऱ्‍यांचा दाखला.

  • समजदार आणि मूर्ख कुमारींचा दाखला.

  • तालान्तांचा दाखला.

गीत २६ ‘केलं त्यांच्यासाठी, ते माझ्यासाठी!’

a मे २०२४ च्या टेहळणी बुरूज अंकातला “यहोवा भविष्यात लोकांचा न्याय कसा करेल?” हा लेख पाहा.

b जास्त माहितीसाठी १५ मार्च २०१५ च्या टेहळणी बुरूज अंकातला “तुम्ही ‘जागृत’ राहाल का?” हा लेख पाहा.

c जानेवारी २०२० च्या टेहळणी बुरूज अंकात पान २९-३० वर असलेले परिच्छेद ११-१४ पाहा.

d चित्रांचं वर्णन: एक अभिषिक्‍त बहीण प्रचारकार्यात भेटलेल्या एका तरुण स्त्रीचा बायबल अभ्यास घेत आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा