वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w24 मे पृ. २०-२५
  • योग्य विवाह जोडीदार कसा शोधायचा?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • योग्य विवाह जोडीदार कसा शोधायचा?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • योग्य जोडीदार शोधण्यासाठी
  • त्याच्याबद्दल किंवा तिच्याबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करा
  • डेटींग सुरू करण्यासाठी
  • इतर जण कशी मदत करू शकतात?
  • तुमच्या जोडीदारासोबतची तुमची मैत्री घट्ट करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
  • डेटींग करताना योग्य निर्णय कसा घेता येईल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • यशस्वी विवाहाकरता तयारी करणे
    कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य
  • मला यशस्वी प्रणयाराधन करता येणे शक्य आहे का?
    तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
w24 मे पृ. २०-२५

अभ्यास लेख २१

गीत १०७ देवाच्या प्रीतीचा आदर्श

योग्य विवाह जोडीदार कसा शोधायचा?

“सद्‌गुणी बायको कोणाला मिळू शकते?  ती पोवळ्यांहूनही जास्त मौल्यवान असते.”​—नीति. ३१:१०.

या लेखात:

एखाद्याला लग्नासाठी योग्य जोडीदार कसा शोधता येईल? आणि मंडळीतले इतर जण याबाबतीत कशी मदत करू शकतात? यासाठी मदत करणाऱ्‍या बायबल तत्त्वांवर या लेखात चर्चा करण्यात आली आहे.

१-२. (क) डेटींग सुरू करण्याआधी एखाद्या भावाने किंवा बहिणीने कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत? (ख) डेटींगचा काय अर्थ होतो? (“शब्दांचा अर्थ” पाहा.)

तुम्ही लग्नाचा विचार करताय का? जीवनात आनंदी राहण्यासाठी लग्न करणं गरजेचं नसलं, तरी बरेच अविवाहित भाऊबहीण मग ते तरुण असोत किंवा जास्त वय झालेले असोत लग्न करण्याचा विचार करतात. पण लग्न करण्याचा विचार करण्याआधी तुम्ही आध्यात्मिक, भावनिक आणि आर्थिकरीत्या लग्नासाठी तयार असलं पाहिजे.a (१ करिंथ. ७:३६) कारण तेव्हाच वैवाहिक जीवनात यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते.

२ पण लग्नासाठी योग्य जोडीदार शोधणं नेहमीच सोपं नसतं. (नीति. ३१:१०) आणि जरी तुम्हाला एखादी व्यक्‍ती भेटली तरी तिला चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी तिच्यासोबत डेटींगb सुरू करणं सोपं नसतं. या लेखात एखाद्या भावाला किंवा बहिणीला योग्य जोडीदार शोधण्यासाठी आणि तिच्यासोबत डेटींग सुरू करण्यासाठी कोणत्या गोष्टी मदत करू शकतील, यावर चर्चा करण्यात आली आहे. तसंच मंडळीतले इतर जण याबाबतीत त्यांना कशी मदत करू शकतील, याबद्दलसुद्धा चर्चा करण्यात आली आहे.

योग्य जोडीदार शोधण्यासाठी

३. जोडीदार शोधताना एखाद्या भावाने किंवा बहिणीने कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत?

३ जर तुम्हाला लग्न करायचं असेल तर डेटींग सुरू करण्याआधी आपल्या जोडीदारामध्ये कोणत्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत, हे माहीत असणं गरजेचं आहे. नाहीतर योग्य जोडीदार नसलेल्या व्यक्‍तीसोबत आपण डेटींग करायला लागू. किंवा असंही होईल की एक चांगला जोडीदार आहे आणि आपलं त्याच्याकडे लक्ष जाणार नाही. हे खरंय की आपला जोडीदार बाप्तिस्मा घेतलेला साक्षीदार असला पाहिजे. (१ करिंथ. ७:३९) पण हेही लक्षात घ्या की बाप्तिस्मा घेतलेली कोणतीही व्यक्‍ती तुमच्यासाठी चांगला जोडीदार असेलच असं नाही. म्हणून तुम्ही या गोष्टीवर विचार करू शकता: ‘जीवनात माझी कोणती ध्येयं आहेत? विवाह जोडीदारामध्ये कोणते गुण असणं गरजेचं आहे असं मला वाटतं? आणि याबाबतीत मी जास्त अपेक्षा तर करत नाही ना?’

४. जोडीदार शोधण्याच्या बाबतीत काही जण यहोवाला काय प्रार्थना करतात?

४ जर तुम्ही लग्नाचा विचार करताय, तर एक चांगला जोडीदार मिळण्यासाठी तुम्ही नक्कीच प्रार्थना केली असेल. (फिलिप्पै. ४:६) हे खरंय की यहोवा कोणालाही जोडीदार शोधून देण्याचं वचन देत नाही. पण त्याला तुमच्या गरजांची आणि भावनांची काळजी आहे. आणि एक चांगला जोडीदार शोधायला तो तुम्हाला मदत करू शकतो. म्हणून आपल्या गरजांबद्दल, भावनांबद्दल त्याला सांगत जा. (स्तो. ६२:८) धीरासाठी आणि बुद्धीसाठी प्रार्थना करा. (याको. १:५) अमेरिकेत राहणारा जॉनc नावाचा अविवाहित भाऊ म्हणतो: “जोडीदारामध्ये कोणते गुण असावेत याबद्दल मी यहोवाला सांगतो. आणि अशी एखादी व्यक्‍ती असेल तर तिला भेटण्याच्या बऱ्‍याचशा संधी मला मिळाव्यात म्हणून मी त्याला प्रार्थना करतो. तसंच पती बनण्यासाठी ज्या गुणांची गरज आहे ते गुण वाढवण्यासाठी मला मदत कर अशीही मी प्रार्थना करतो.” श्रीलंकेत राहणारी तानिया नावाची एक बहीण म्हणते: “एक चांगला जोडीदार जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत यहोवाला विश्‍वासू राहण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी त्याने मला मदत करावी म्हणून मी त्याला प्रार्थना करते.” पण एक चांगला जोडीदार मिळेपर्यंत तुम्हाला जर थांबावं लागत असेल, तर तोपर्यंत यहोवा तुमच्या शारीरिक आणि भावनिक गरजांची काळजी घेईल असं वचन तो तुम्हाला देतो.​—स्तो. ५५:२२.

५. यहोवावर प्रेम करणाऱ्‍या अविवाहित भाऊ बहिणींना भेटण्यासाठी तुम्ही काय करू शकता? (१ करिंथकर १५:५८) (चित्रसुद्धा पाहा.)

५ बायबल आपल्याला “प्रभूचं काम जास्तीत जास्त प्रमाणात करत” राहण्याचं प्रोत्साहन देतं. (१ करिंथकर १५:५८ वाचा.) तुम्ही यहोवाच्या सेवेत व्यस्त राहिला आणि वेगवेगळ्या भाऊबहिणींसोबत वेळ घालवला, तर तुम्हाला प्रोत्साहन आणि आनंद मिळेल. पण त्यासोबतच यहोवाच्या सेवेवर लक्ष लावणाऱ्‍या तुमच्यासारख्याच अविवाहित भाऊबहिणींना भेटण्याची संधीही तुम्हाला मिळेल. तुम्ही यहोवाला खूश करण्यासाठी जितका जास्त प्रयत्न कराल तितकाच जास्त तुम्हाला खरा आनंद अनुभवता येईल.

कोलाज: १. प्रचार करताना एक अविवाहित बहीण एका वयस्कर बहिणीसोबत बोलत आहे. २. तीच बहीण बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी जेवण वाढत आहे. ३. एक अविवाहित भाऊ एका जोडप्याच्या घरी मेंढपाळ भेटीसाठी एका वडिलांसोबत आला आहे. ४. तोच भाऊ त्याच बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी मशीनवर काम करतोय.

तुम्ही यहोवाच्या सेवेत व्यस्त राहिला आणि वेगवेगळ्या भाऊबहिणींसोबत वेळ घालवला, तर तुम्हाला लग्न करायची इच्छा असलेले अविवाहित भाऊबहीण भेटतील (परिच्छेद ५ पाहा)


६. जोडीदार शोधताना अविवाहित व्यक्‍तीने कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?

६ पण योग्य जोडीदार शोधत असताना, तीच गोष्ट तुमच्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची बनू नये म्हणून सावध राहा. (फिलिप्पै. १:१०) कारण खरा आनंद तुमचं लग्न झालंय की नाही यावर नाही, तर यहोवासोबतच्या तुमच्या नात्यावर अवलंबून असतो. (मत्त. ५:३) शिवाय हेही लक्षात घ्या, की जेव्हा तुम्ही अविवाहित असता तेव्हा आपली सेवा वाढवण्याचं जास्त स्वातंत्र्य तुमच्याकडे असतं. (१ करिंथ. ७:३२, ३३) म्हणून वेळेचा चांगला वापर करा. अमेरिकेत राहणाऱ्‍या जेसिका नावाच्या बहिणीचं जवळपास ४० वय असताना लग्न झालं. ती म्हणते, “मी प्रचाराचं काम करत राहिले. त्यामुळे लग्न होईपर्यंत, आहे त्या परिस्थितीत समाधानी राहायला मला मदत झाली.”

त्याच्याबद्दल किंवा तिच्याबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करा

७. एखादी व्यक्‍ती तुम्हाला आवडते हे त्या व्यक्‍तीला सांगण्याआधी तिला चांगल्या प्रकारे जाणून घेणं का महत्त्वाचं आहे? (नीतिवचनं १३:१६)

७ एखादी व्यक्‍ती तुमच्यासाठी चांगली जोडीदार ठरू शकते असं जेव्हा तुम्हाला वाटतं तेव्हा काय? ती तुम्हाला आवडते म्हणून तुम्ही तिला लगेच सांगाल का? बायबल म्हणतं, की “शहाणा माणूस सुज्ञपणे वागतो.” (नीतिवचनं १३:१६ वाचा.) त्यामुळे त्या व्यक्‍तीला चांगल्या प्रकारे जाणून घेतल्याशिवाय असं पाऊल उचलणं योग्य ठरणार नाही. म्हणून सुज्ञपणे त्या व्यक्‍तीला पारखणं योग्य ठरेल. नेदरलँड्‌समधला अश्‍विन नावाचा एक भाऊ म्हणतो: “भावना पटकन उत्तेजित होतात, पण तितक्याच लवकर त्या विरूनपण जातात. म्हणून त्या व्यक्‍तीला जाणून घेतल्याशिवाय फक्‍त भावनांच्या भरात तिच्यासोबत डेटींग करणं शहाणपणाचं ठरणार नाही.” असंही होऊ शकतं, की त्या व्यक्‍तीला चांगल्या प्रकारे जाणून घेतल्यावर ती व्यक्‍ती आपल्यासाठी योग्य नाही असं तुम्हाला जाणवेल.

८. एखादी व्यक्‍ती चांगली जोडीदार ठरू शकते असं वाटतं, तेव्हा त्या व्यक्‍तीबद्दल तुम्ही कशा प्रकारे माहिती काढू शकता? (चित्रसुद्धा पाहा.)

८ एखाद्या व्यक्‍तीला समजू न देता तुम्ही तिच्याबद्दल माहिती कशी काढू शकता? त्यासाठी तुम्ही मंडळीच्या सभांमध्ये किंवा सोबत वेळ घालवण्यासाठी भाऊबहीण एकत्र येतात, तेव्हा त्या व्यक्‍तीची आध्यात्मिकता, तिचं व्यक्‍तिमत्त्व आणि इतरांसोबतचं तिचं वागणं-बोलणं या गोष्टींचं तुम्ही परीक्षण करू शकता. तसंच त्या व्यक्‍तीचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत? ती नेहमी कोणत्या गोष्टींबद्दल बोलत असते? (लूक ६:४५) तिची आणि तुमची ध्येयं सारखीच आहेत का? या गोष्टींविषयीसुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकता. यासोबतच, त्या व्यक्‍तीला चांगल्या प्रकारे ओळखणाऱ्‍या एखाद्या वडिलांना किंवा अनुभवी भावाला किंवा बहिणीला तुम्ही तिच्याबद्दल विचारू शकता. (नीति. २०:१८) तसंच मंडळीत त्या व्यक्‍तीचं नावं कसं आहे आणि तिचा स्वभाव कसा आहे, हेसुद्धा तुम्ही विचारू शकता. (रूथ २:११) पण हे सगळं करत असताना सतत तिच्या अवतीभोवती राहून तिच्याविषयी सगळं काही जाणून घ्यायचा प्रयत्न करू नका. म्हणजे अशी कोणतीही गोष्ट करू नका, ज्यामुळे तिला अवघडल्यासारखं वाटेल.

कोलाज: आधीच्या चित्रात दाखवलेला अविवाहित भाऊ आणि बहीण मंडळीच्या सभेमध्ये एकमेकांच्या नकळत जाणून घेत आहेत. १. तो भाऊ वयस्कर जोडप्यासोबत कसं बोलतोय हे ती बहीण पाहत आहे. २. ती बहीण आठवड्यादरम्यान होणाऱ्‍या सभेत भाग करत असताना तो भाऊ तिला बघतोय.

आवडत असलेल्या व्यक्‍तीला आपल्या भावना बोलून दाखवण्याआधी काही काळासाठी तिच्या नकळत तिला जाणून घ्या (परिच्छेद ७-८ पाहा)


९. एखाद्या व्यक्‍तीसोबत डेटींग सुरू करण्याआधी तुम्हाला कोणत्या गोष्टीची खातरी असली पाहिजे?

९ पण आपल्या भावना बोलून दाखवण्याआधी एखाद्याने किती काळ थांबून राहावं? कारण याबाबतीत तुम्ही घाई केली, तर तुम्ही खूप उतावीळ आहात असं दिसेल. (नीति. २९:२०) हेच जर तुम्ही खूपच वेळ लावला तर निर्णय घ्यायच्या बाबतीत तुम्ही ठाम नाही असंही दिसून येईल; खासकरून त्या व्यक्‍तीला तुम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहात हे त्या व्यक्‍तीला जाणवतं तेव्हा. (उप. ११:४) हे लक्षात घ्या, की एखाद्याला आपल्या भावना बोलून दाखवण्याआधी तुमचं त्या व्यक्‍तीसोबत लग्न होईलच याची खातरी असण्याची गरज नाही. पण तुम्हाला याची खातरी असली पाहिजे, की तुम्ही लग्नासाठी तयार आहात आणि ती व्यक्‍ती कदाचित तुमच्यासाठी एक चांगला जोडीदार ठरू शकते.

१०. एखाद्या व्यक्‍तीला तुम्ही आवडता हे तुम्हाला जाणवलं, पण तुम्हाला तिच्यासोबत डेटींग करायची इच्छा नसेल तर तुम्ही काय केलं पाहिजे?

१० पण दुसऱ्‍या व्यक्‍तीच्या मनात तुमच्याबद्दल भावना आहेत असं जर तुम्हाला जाणवलं तर काय? जर तुम्हाला तिच्याबद्दल तसं वाटत नसेल, तर त्या व्यक्‍तीला तसं स्पष्टपणे सांगा. कारण तुमच्या मनात त्या व्यक्‍तीबद्दल भावना नसताना तिला तसा विचार करू देणं, हे योग्य ठरणार नाही.​—१ करिंथ. १०:२४; इफिस. ४:२५.

११. ज्या देशांमध्ये मुला-मुलींसाठी दुसऱ्‍यांनी स्थळ पाहणं अपेक्षित असतं त्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे?

११ काही देशांमध्ये आईवडिलांनी किंवा इतर नातेवाईकांनी मुलासाठी किंवा मुलीसाठी स्थळ बघणं अपेक्षित असतं. तर काही देशांमध्ये घरचे लोक किंवा मित्रमंडळी मुलासाठी किंवा मुलीसाठी स्थळ शोधतात आणि मग मुला-मुलीची भेट घालून त्यांचं जुळतंय का ते बघतात. जर तुम्हालाही एखाद्या मुला-मुलीचं जुळतंय का ते बघायला किंवा एखाद्यासाठी स्थळ बघायला सांगितलं असेल, तर दोघांच्या आवडी-निवडींचा आणि अपेक्षांचा विचार करा. आणि जर तुम्हाला त्यांच्यासाठी योग्य असा जोडीदार सापडला, तर त्याचं व्यक्‍तिमत्त्व, स्वभाव, गुण आणि त्याची आध्यात्मिकता कशी आहे, याबद्दल जितकी माहिती काढता येईल तितकी काढा. पैसा, शिक्षण आणि समाजातलं कुटुंबाचं स्थान या गोष्टींपेक्षा त्या व्यक्‍तीचं यहोवासोबतचं नातं जास्त महत्त्वाचं आहे. तसंच नेहमी हे लक्षात ठेवा, की ज्याच्यासाठी तुम्ही स्थळ पाहताय, त्या भावाने किंवा बहिणीनेच लग्नाविषयीचा अंतिम निर्णय घेतला पाहिजे.​—गलती. ६:५.

डेटींग सुरू करण्यासाठी

१२. जर तुम्हाला एखाद्यासोबत डेटींग करायची इच्छा असेल, तर मग त्याबद्दल तुम्ही त्या व्यक्‍तीला कसं सांगू शकता?

१२ जर तुम्हाला कोणा संगतीतरी डेटींग करायची इच्छा असेल, तर मग त्याबद्दल तुम्ही त्या व्यक्‍तीला कसं सांगू शकता?d त्यासाठी तुम्ही एखाद्या सार्वजनिक ठिकाणी किंवा कॉलवर त्या व्यक्‍तीसोबत बोलू शकता. त्या व्यक्‍तीला आपल्या हेतूबद्दल स्पष्टीपणे  सांगा. (१ करिंथ. १४:९) आणि जर गरज असेल तर त्या व्यक्‍तीला उत्तरासाठी पुरेसा वेळ द्या. (नीति. १५:२८) जर त्या व्यक्‍तीची तुमच्यासोबत डेटींग करायची इच्छाच नसेल तर तिच्या भावनांचा आदर करा.

१३. जेव्हा एखादी व्यक्‍ती तुम्हाला डेटींगसाठी विचारते तेव्हा तुम्ही काय करू शकता? (कलस्सैकर ४:६)

१३ जर एखाद्या व्यक्‍तीने तुम्हाला डेटींगसाठी विचारलं असेल, तर काय? तुम्हाला विचारण्यासाठी नक्कीच त्या व्यक्‍तीला धाडस लागलं असेल. म्हणून त्या व्यक्‍तीशी प्रेमाने आणि आदराने बोला. (कलस्सैकर ४:६ वाचा.) जर तुम्हाला उत्तर द्यायला वेळ लागणार असेल तर तसं तिला सांगा. पण उत्तर द्यायला खूप जास्त वेळ लावू नका. (नीति. १३:१२) जर तुम्हाला त्या व्यक्‍तीसोबत डेटींग करायची इच्छा नसेल, तर तिच्या भावना न दुखावता, पण स्पष्टपणे  सांगा. ऑस्ट्रियामध्ये राहणाऱ्‍या भावाला, हॅन्सला एका बहिणीने जेव्हा विचारलं तेव्हा त्याने कसं उत्तर दिलं त्याबद्दल तो म्हणतो: “मी तिला माझा निर्णय अगदी प्रेमाने, पण स्पष्टपणे सांगितला. आणि मी हे लगेच केलं. कारण मला तिला कुठलीही खोटी आशा द्यायची नव्हती. शिवाय इतर वेळीही तिच्याशी बोलताना मी नेहमी काळजीपूर्वकच बोलायचो.” दुसरीकडे, जर तुम्हालासुद्धा त्या व्यक्‍तीसोबत डेटींग करायची इच्छा असेल, तर डेटींगविषयी तुमच्या भावना आणि अपेक्षा काय आहेत हे त्या व्यक्‍तीला बोलून दाखवा. कारण इतर गोष्टींमुळे किंवा संस्कृतीमुळे कदाचित तुमच्या आणि तिच्या अपेक्षा वेगवेगळ्या असू शकतात.

इतर जण कशी मदत करू शकतात?

१४. आपण अविवाहित भाऊबहिणींना कशी मदत करू शकतो?

१४ ज्यांना लग्न करायची इच्छा आहे, त्यांना आपण कशी मदत करू शकतो? एक मार्ग म्हणजे आपण नेहमी विचार करून त्यांच्याशी बोललं पाहिजे. (इफिस. ४:२९) आपण स्वतःला विचारू शकतो: ‘लग्न करायची इच्छा असलेल्या भाऊबहिणींना मी नेहमी चिडवतो का, त्यांची चेष्टा करतो का? एखादा अविवाहित भाऊ आणि बहीण बोलत असतात, तेव्हा त्यांच्यात काहीतरी चाललंय असा समज मी करून घेतो का?’ (१ तीम. ५:१३) आपण कधीच अविवाहित भाऊबहिणींना त्यांनी जर लग्न केलं नाही, तर त्यांच्या जीवनात काहीतरी कमी आहे असं भासवायचा प्रयत्न करू नये. आधी उल्लेख केलेला हॅन्स म्हणतो: “काही भाऊ मला म्हणतात, ‘अरे लग्न करायचंय की नाय तुला? वय निघत चाललंय तुझं. नंतर अवघड होईल.’ असं बोलल्यामुळे एखाद्या भावाला किंवा बहिणीला वाईट वाटू शकतं किंवा आपण लवकरात लवकर लग्न केलं पाहिजे असा दबाव त्यांच्यावर येऊ शकतो.” त्याऐवजी आपण अविवाहित भाऊबहिणींची नेहमी प्रशंसा करायचा प्रयत्न केला पाहिजे.​—१ थेस्सलनी. ५:११.

१५. (क) एखाद्याला जोडीदार शोधायला मदत करताना, आपण रोमकर १५:२ मधल्या तत्त्वाप्रमाणे काय केलं पाहिजे? (चित्रसुद्धा पाहा.) (ख) व्हिडिओमधला कोणता मुद्दा तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला?

१५ एखाद्या भावाचं किंवा बहिणीचं जुळू शकतं असं जर तुम्हाला वाटत असेल तर काय? बायबल म्हणतं की आपण इतरांच्या भावनांचा विचार केला पाहिजे. (रोमकर १५:२ वाचा.) बऱ्‍याच अविवाहित भाऊबहिणींना लग्नाच्या बाबतीत कोणी सुचवलेलं आवडत नाही. आणि आपण त्यांच्या इच्छांचा आदर केला पाहिजे. (२ थेस्सलनी. ३:११) काही जणांना कदाचित याबाबतीत आपण सुचवलेलं आवडत असेल, पण आपण हे त्यांच्या परवानगीशिवाय करू नये.e (नीति. ३:२७) पण कदाचित असेही काही जण असतील ज्यांना कोणालाही थेट भेटायला आवडत नसेल. जर्मनीतली लिडिया नावाची एक अविवाहित बहीण म्हणते: “जेव्हा भाऊबहीण एकत्र येतात, तेव्हा आपण त्या ठिकाणी त्याला आणि तिला बोलवू शकतो. आणि त्यांना एकमेकांना भेटायची संधी देऊन बाकीचं त्यांच्यावर सोडून देऊ शकतो.”

मंडळीतले भाऊबहीण सोबत वेळ घालवण्यासाठी एकत्र आलेले असताना एक अविवाहित भाऊ आणि बहीण एकमेकांशी बोलत आहेत.

बरेच भाऊबहीण एकत्र येतात तेव्हा अविवाहित भाऊबहिणींना एकमेकांना भेटायची संधी मिळते (परिच्छेद १५ पाहा)


१६. अविवाहित भाऊबहिणींनी काय लक्षात ठेवलं पाहिजे?

१६ आपण सगळेच, मग विवाहित असोत किंवा अविवाहित, आनंदी आणि समाधानी जीवन जगू शकतो. (स्तो. १२८:१) तुम्हाला लग्न करायचंय पण एक चांगला जोडीदार अजून भेटला नसेल, तरीसुद्धा तुम्ही यहोवाच्या सेवेवर लक्ष देऊन त्याची सेवा करत राहू शकता. मकाओमध्ये राहणारी शीन-ये नावाची एक बहीण म्हणते: “नंदनवनात आपण आपल्या जोडीदारासोबत जितका काळ घालवणार आहे, त्याच्या तुलनेत अविवाहित असण्याचा तुमचा काळ खूपच कमी आहे. म्हणून त्या काळाचा आनंद घ्या आणि त्याचा चांगला वापर करा.” पण जर एक चांगला जोडीदार ठरू शकेल अशी एखादी व्यक्‍ती तुम्हाला भेटली आणि तिच्यासोबत तुम्ही डेटींग सुरू केली असेल तर काय? तर मग योग्य निर्णय घेण्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारे डेटींग कसं करता येईल याबद्दल पुढच्या लेखात चर्चा करण्यात आली आहे.

तुमचं उत्तर काय असेल?

  • एक चांगला जोडीदार शोधायला तुम्ही काय करू शकता?

  • एखाद्या व्यक्‍तीसोबत डेटींग सुरू करण्याआधी तिच्याबद्दल माहीत करून घेणं का गरजेचंय?

  • लग्न करायची इच्छा असलेल्या भाऊबहिणींना मंडळीतले इतर जण कशी मदत करू शकतात?

गीत १३७ विश्‍वासू स्त्रिया, आमच्या ख्रिस्ती बहिणी

a तुम्ही डेटींगसाठी तयार आहात का हे समजून घेण्यासाठी jw.org वरचा “डेटिंग​—भाग १: क्या मैं डेटिंग के लिए तैयार हूँ?” हा हिंदीतला लेख पाहा.

b शब्दांचा अर्थ: या आणि पुढच्या लेखात “डेटींगवर” चर्चा करण्यात आली आहे. एखादी व्यक्‍ती आपल्यासाठी चांगला विवाह जोडीदार ठरू शकेल का हे पाहण्यासाठी, जेव्हा एक मुलगा आणि मुलगी एकमेकांना भेटून चांगल्या प्रकारे जाणून घ्यायचा प्रयत्न करतात तेव्हा त्याला डेटींग म्हणतात. काही देशांमध्ये याला कोर्टशिपसुद्धा म्हटलं जातं. डेटींगची सुरुवात कधी होते? जेव्हा एक मुलगा आणि मुलगी एकमेकांना पसंत करत असल्याचं एकमेकांना सांगतात तेव्हा डेटींगची सुरुवात होते. आणि लग्न करायचा किंवा डेटींग थांबवायचा निर्णय घेईपर्यंत ती चालू राहते.

c काही नावं बदलण्यात आली आहेत.

d काही संस्कृतींमध्ये, सहसा ख्रिस्ती भाऊ ख्रिस्ती बहिणींना डेटींगसाठी विचारतात. असं असलं तरी बहीणसुद्धा एखाद्या भावाला विचारू शकते. (रूथ ३:१-१३) जास्त माहितीसाठी २२ ऑक्टोबर २००४ च्या इंग्रजीतल्या सावध राहा!  मासिकातला “यंग पिपल आस्क . . . हाऊ कॅन आय टेल हिम हाऊ आय फील?” हा लेख पाहा.

e विश्‍वासाची लढाई जिंकणारे—ज्यांचं लग्न झालेलं नाही  हा jw.org वरचा व्हिडिओ पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा