आपल्याला जसं वाटतं त्याप्रमाणे निर्णय घेणं नेहमी योग्य असतं का?
काय बरोबर आणि काय चुकीचं: लोक कशाच्या आधारावर निर्णय घेतात?
काही गोष्टी योग्य तर काही गोष्टी चुकीच्याच आहेत, हे सगळेच मान्य करतात. उदाहरणार्थ, खून करणं, बलात्कार करणं, लहान मुलांचं लैंगिक शोषणं करणं यांसारख्या गोष्टींना सगळेच वाईट समजतात. याउलट, सगळ्यांशी समानतेने वागणं, दयाळूपणा दाखवणं, सहानूभूतीने वागणं अशा गोष्टींची प्रशंसा केली जाते. पण बऱ्याच लोकांना वाटतं, की लैंगिक संबंध, प्रामाणिकपणा, लहान मुलांना वाढवणं या बाबतीत बरोबर आणि चुकीचं असं काहीच नसतं. त्यांना वाटतं या बाबतीत कोणतेही निर्णय घेतले तर ते चांगलेच आहेत. बऱ्याच वेळा, आपल्याला कसं वाटतं किंवा आपल्या आसपासच्या लोकांना कसं वाटतं याचा विचार करून या गोष्टींच्या बाबतीत लोक निर्णय घेतात. पण अशा प्रकारे निर्णय घेणं नेहमीच योग्य ठरेल का?
आपल्याला जे योग्य वाटतं त्याच्या आधारावर आपण निर्णय घेतले पाहिजेत का?
बऱ्याच वेळा काय बरोबर आहे आणि काय चुकीचं याबद्दल आपल्याला कसं वाटतं याच्या आधारावर आपण निर्णय घेतो. याला आपल्या विवेकाच्या आधारावर निर्णय घेणं असंही म्हणतात. (रोमकर २:१४,१५) अगदी लहान वयापासून मुलांना, चांगलं वागणं आणि वाईट वागणं काय असतं हे समजतं. इतकंच काय तर त्यांनी काही चुकीचं केलं तर त्यांना वाईटसुद्धा वाटतं. आपण जसजसं मोठं होत जातो तसतसं आपल्या कुटुंबाकडून, आपल्या मित्रांकडून, आपल्या शिक्षकांकडून, आपल्या समाजातून, आपल्या धर्मातून, आपल्या संस्कृतीतून बरोबर काय आणि चुकीचं काय याबद्दल आपण आणखी शिकतो. आणि मग आपण जे निर्णय घेतो ते आपण जे शिकलोय त्याच्या आधारावर आहेत की नाही, हे आपला विवेक आपल्याला सांगतो.
बरोबर काय आणि चुकीचं काय हे जाणून घेतल्यामुळे, आपण इतरांशी सहानूभूतीने वागायला, आभार मानायला, सगळ्यांशी समानतेने वागायला आणि इतरांना दयाळूपणा दाखवायला शिकतो. तसंच, ज्याच्यांबद्दल आपल्याला काळजी आहे त्यांचं मन दुखावण्यापासूनसुद्धा आपण दूर राहतो. शिवाय, आपण अशा गोष्टींपासूनसुद्धा दूर राहतो, ज्यांमुळे आपल्याला लाजल्यासारखं होईल किंवा मग आपल्याला दोषी असल्यासारखं वाटेल.
आपल्याला जसं वाटतं त्याप्रमाणे निर्णय घेणं नेहमी योग्य असतं का? गॅरीक नावाच्या व्यक्तीने तरूणपणी जे जीवन निवडलं त्याबद्दल तो असं म्हणतो, “मी स्वतःचे स्तर स्वतःच ठरवायचो.” पण नंतर त्याला कळलं, की त्याला जे योग्य वाटतं होतं त्याप्रमाणे जीवन जगल्यामुळे वाईट परिणाम झाले. तो पुढे म्हणतो, की त्याने जे जीवन निवडलं “ती एक अशी अंधाराची वाट होती जिच्यावर अनैतिकता, ड्रग्स घेणं, दारूडेपणा, खूप हिंसा यांसारख्या गोष्टी होत्या.”
इतरांना जसं वाटतं त्याप्रमाणे आपण निर्णय घेतले पाहिजेत का?
आपल्याला कसं वाटतं या आधारावर निर्णय घेण्यासोबतच, आपण जे निर्णय घेतो त्यामुळे इतरांना कसं वाटेल याच्या आधारावरसुद्धा आपण निर्णय घेतो. असं केल्यामुळे, आपल्याला त्यांच्या अनुभवातून फायदा होऊ शकतो. जेव्हा आपण आपल्या कुटुंबाला कसं वाटेल, मित्रांना कसं वाटेल आणि समाजाला कसं वाटेल याच्या आधारावर निर्णय घेतो, तेव्हा आपल्याला त्यांचा आदर मिळतो.
इतरांना कसं वाटतं त्याप्रमाणे निर्णय घेणं नेहमी योग्य असतं का? प्रिसिलाने तरुणपणी तेच केलं जे तिचे इतर मित्र-मैत्रिणी करत होते. आणि तिने लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवले. पण नंतर तिला कळलं, की इतरांना ज्या गोष्टी योग्य वाटतात त्या करून ती अजिबात खूश नव्हती. ती म्हणते, “माझे इतर मित्र-मैत्रिणी जे करत होते ते करून मला अजिबात चांगलं वाटतं नव्हतं. आणि त्यांच्यासारखं वागून मी मूर्खासारखे आणि चुकीचे निर्णय घेतले.”
योग्य निर्णय घ्यायचा यापेक्षा चांगला मार्ग आहे का?
बरोबर काय आणि चुकीचं काय हे ठरवताना, आपल्याला कसं वाटतं आणि इतरांना कसं वाटतं याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. पण, असा विचार केल्यामुळे आपल्याला नेहमीच चांगले निर्णय घेता येतील असं नाही. आपण जे निर्णय घेऊ त्याचे काय परिणाम होतील हे माहीत नसल्यामुळे कधीकधी आपल्या स्वतःला दु:ख होऊ शकतं किंवा मग आपण इतरांना दुखावू शकतो. (नीतिवचनं १४:१२) कधीकधी आपल्याला किंवा इतरांना जे योग्य वाटतं ते बरोबरच असेल असं नाही. आणि ते धोकादायक असू शकतं आणि आपल्याला आपले विचार पुढे बदलावे लागू शकतात. विचार करा, असं वागणं जे आधी इतरांना चुकीचं वाटायचं ते आता सगळ्यांनाच मान्य आहे. तर, काही गोष्टी ज्या आधी लोकांना चुकीच्या वाटायच्या, त्या लोकांना आता बरोबर वाटतात.
इतरांना कसं वाटतं त्याप्रमाणे निर्णय घेणं नेहमी योग्य असतं का?
बरोबर काय आणि चुकीचं काय याबद्दल आणखी चांगलं मार्गदर्शन आपल्याला मिळू शकतं का? आपण अशा नैतिक स्तरांवर चालू शकतो का ज्यांमुळे आपल्याला पुढे निराश व्हावं लागणार नाही किंवा पस्तावा होणार नाही?
आनंदाची गोष्ट म्हणजे, आपण कोणत्या नैतिक स्तरांप्रमाणे चाललं पाहिजे याबद्दल भरवशाचं आणि सगळ्या बाबतीत लागू होणारं असं मार्गदर्शन आहे. आपण या जगात कुठेही राहत असलो, तरी आपण हे मार्गदर्शन लागू करू शकतो. पुढच्या लेखात आपण हे पाहू, की बरोबर काय आणि चुकीचं काय हे ठरवण्यासाठी आपल्याला हे भरवशाचं मार्गदर्शन कुठून मिळू शकतं.